मिनार - An Insight

चित्रा लेले's picture
चित्रा लेले in लेखमाला
8 Mar 2017 - 6:09 am

.

मिनार!

माझी आणि तिची ओळख प्राचार्यांच्या कक्षात झाली. "मिनार आपल्या महाविद्यालयात प्रवेश घेते आहे. तिला राज्यशास्त्र विषय हवा आहे आणि तिला स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत. तिला तुमच्या वर्गात घ्या." प्राचार्यांनी ओळख करून दिली आणि मिनार माझी विद्यार्थिनी झाली. पण खरं तर तिनेच मला कितीतरी गोष्टी शिकवल्या आहेत.

चुणचुणीत, वर्गात शंका विचारणारी, "मिस, मला काय वाटतं..." म्हणत आपलं मत मांडणारी मिनार हळूहळू रुळत गेली, आमच्या वर्गाचा भाग बनली. तिचं दिव्यांग असणं कधी जाणवलं नाही. पण एकदा नेहमीसारखं "आपण आता सत्ता संकल्पना पाहू", "सत्ता आणि प्रभाव यातील फरक बघा" असं शिकवताना मिनार मध्ये थांबवून हसून म्हणाली, "मिस, मी काय पाहू आणि बघू?" त्या वेळी नकळत का होईना, अनेकदा माझी भाषा असंवेदनशील होत होती याची मला जाणीव झाली. हा माझा पहिला धडा होता.

मुंबईच्या एका झोपडपट्टीत मिनारचा जन्म झाला. घरी आई-वडील आणि दोन भाऊ. प्रीमॅच्युअर जन्म झाल्याने जन्मापासूनच सोबत आलेलं आंधळेपण. घरात वडील टॅक्सी चालवत होते आणि आई गृहिणी होती. घरात शिक्षणाचा किरणही पोहोचलेला नसल्याने मिनारच्या शिक्षणाचा विचारही झाला नाही. पण शेजारच्या एक काकू मदतीला आल्या आणि तिला दादरच्या कमला मेहता ब्लाइंड शाळेत घेऊन गेल्या. मूळच्या हिंदीभाषिक मिनारने ही शाळा मराठीत असल्याने पुढचं शिक्षण मराठीत घ्यायला सुरुवात केली. मराठी आणि इंग्लिश ब्रेल लिपी ती शिकली. सातवीनंतर मात्र तिच्या संघर्षाला खरी सुरुवात झाली. आता तिने पुढचं शिक्षण सामान्य शाळेतून घ्यायचा निर्णय घेतला. शाळेतील प्राचार्यांना आणि शिक्षकांना ती जबाबदारीच वाटत गेली आणि पुरेसं प्रोत्साहन मिळालं नाही. या वेळी NABने (National Association for Blindने) मदत पुरवली. मृणालताई आणि प्रज्ञाताई तिला शाळेत तसंच शाळेबाहेरही मदत करू लागल्या. याच काळात वर्षाताईंनी तिला हेलेन केलरचं आत्मचरित्र वाचायला दिलं. मिनार म्हणते, "ते पुस्तक माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचं ठरलं. काहीतरी करून दाखवायचं, या विचाराने मी पेटून उठले." त्या वेळी talking softwares फार महागही होती आणि सहज उपलब्धही नव्हती. त्यामुळे अभ्यास करताना खूप मेहनत करावी लागली. मिनार जिद्दीने अभ्यासाला लागली आणि ८५.८६ टक्के घेऊन ती दहावी उत्तीर्ण झाली. मिनार महाराष्ट्रात २००६ या वर्षी दिव्यांग व्यक्तींमध्ये पहिली आली होती. स्थानिक नेते, संस्था, वृत्तपत्रे यांनी सत्कार केले, तिचं कौतुक झालं. आता पुढे मिनारने ठरवलं - महाविद्यालयीन शिक्षण घ्यायचं आणि ते मात्र इंग्लिश माध्यमातून! पण हाही प्रवास सुकर नव्हता.

सेंट झेविअर्स कॉलेजमध्ये अकरावीला प्रवेश मिळाला, पण मिनारला IT विषय हवा होता, तो दिला गेला नाही. तिने कला शाखेतून अभ्यास सुरू केला. बाहेर पडणं, एकटीने प्रवास करणं, वर्ग-परीक्षा सगळं नवीन होतं आणि यात रुळणंही सहज नव्हतं. याच टप्प्यावर मिनारला जिवाभावाचे मित्रमैत्रिणी मिळाले. त्यांनी तिला मराठी माध्यमातून इंग्लिश माध्यमात येताना मदत केली. त्यांनी मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांत पुस्तकं रेकॉर्ड करून तिला दिली. घरातून मदत सहकार्य नसताना तिला कायम मदत केली, प्रोत्साहन दिलं ते या मित्रावर्गाने! अकरावीला खूपच कमी मार्क पडले आणि वर्ष वाया गेलं. यावर खचून न जाता तिने बारावी बाहेरून द्यायचा निर्णय घेतला. पुन्हा जिद्दीने अभ्यास सुरू केला. पण तिची परीक्षा तर बोर्ड परीक्षेआधीच झाली! परीक्षेच्या थोडे दिवस आधी मिनारला अपघात झाला. तिला रस्त्यावर एका दुचाकीस्वाराने उडवलं. यातून सावरत उभी राहत मिनारने बारावी दिली आणि ती ६९ टक्क्यांनी उत्तीर्ण झाली.

. बारावीनंतर मास मीडिया शिकण्यासाठी तिने एका प्रथितयश महाविद्यालयात प्रवेश घेतला. पण "तुझ्यासारख्या दिव्यांग व्यक्तीला हे कसं जमेल?" असं सांगून प्रवेश नाकारला गेला, तेव्हा मिनार एस.एन.डी.टी. (श्री नाथीबाई दामोदर ठाकरसी) महिला विद्यापीठामध्ये आली. आमच्या महाविद्यालयात वसतिगृहाची सोय होती. त्यामुळे तिचा प्रवासाचा त्रास आणि वेळ वाचणार होता.

एस.एन.डी.टी.त आल्यावर राज्यशास्त्र विषय इंग्लिश माध्यमातून नव्हता. वर्गही मराठीतून होत असत. पण मिनारने बी.ए.साठीही खूप मेहनत घेतली. talking softwares वाचनालयात मिनारनेच आणून दिलं. आम्ही प्राध्यापकांनी तिच्या काही नोट्स रेकॉर्ड केल्या. आम्ही सुरभी या महाविद्यालयातील फेस्टमध्ये, तसंच इतर महाविद्यालयांतील स्पर्धांमध्येही मिनारला नेहमी भाग घेण्यास सांगितलं. तिच्यात काही कमी आहे हे तिला जाणवूच द्यायचं नाही असं ठरवलंच होतं. मिनारही आमच्या एकेक आव्हानाला सहज स्वीकारत होती. मला आठवतं, एकदा वर्गात सहज विषय निघाला तेव्हा "मला हिमेश रेशमिया आवडतो आणि तो चांगला गातो" म्हणून भांडली होती सगळ्यांशी! मी वर्गात नाही असं सांगून मुली तिला गाणं म्हणायचा आग्रह करत होत्या, तेव्हा म्हणाली होती, "मिस आहेत वर्गात. मी त्यांना अनुभवू शकते!" मला बघू न शकणारी मिनार माझं असणं-नसणं समजत असे, याचा प्रत्यय मला अनेकदा येत गेला. पाठ्यपुस्तक आणि संदर्भ वाचून झाले की "आता आणखी काय वाचू?" म्हणून मिनार मागे लागायची. पदवीनंतर पुढच्या शिक्षणाला जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शिकण्याचा तिचा मानस होता, म्हणून त्याची तयारी ती करत होती. मी शिक्षक म्हणून मिनारला काय दिलं माहीत नाही, पण तिने मात्र निराश न होता लढत राहणं मला शिकवलं.

२०११ साली प्रथम वर्गात पदवी घेऊन मिनार उत्तीर्ण झाली. त्यानंतरही मिनारने आवर्जून संपर्क ठेवला. JNUची प्रवेश परीक्षा देणं सुरू होतं. एकीकडे राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण distance पद्धतीने घेणं सुरू होतं. मिनारचा फोन यायचा आंतरराष्ट्रीय संबंध, उत्तराधुनिकता, भारतीय पक्ष पद्धती असं बरंच काही आणि त्याचे संदर्भ पुस्तक विचारात राहायची. याच दरम्यान दिल्ली येथील All India Confederation of Blinds (AICB)मधून एक वर्षाचा संगणक प्रशिक्षण वर्ग मिनारने यशस्वीपणे पूर्ण केला. या वर्गानंतर विविध संगणकीय बाबी ती लीलया हाताळू लागली. C+++, HTML, Java Script यासारख्या भाषाही तिला येऊ लागल्या. "मिस, मला नं संगणकावर काम करायला खूप आवडतं आणि माहितेय, खरं तर मला सिस्टीम क्रॅक करणं आवडतं. माझाकडे सगळी क्रॅक softwares आहेत आणि हो, मला हॅकिंगही करता येतं. सोपं असतं. मी शिकवेन तुम्हाला!" आता मला संगणकीय क्षेत्रातले धडेही मिनार देऊ लागली होती.

या प्रशिक्षणानंतर रायपूर येथे NABच्या शाळेत संगणकीय प्रशिक्षक म्हणून मिनार रुजू झाली. सुमारे एकशे दहा मुली त्या शाळेत होत्या. वय वर्ष ६ ते १६ अशा वयोगटातील मुली मिनारच्या विद्यार्थिनी होत्या. रायपूरला सुमारे एक वर्ष मिनार हे काम करत होती. तिथे असतानाही आम्ही दोघी संपर्कात होतो. "मिस, खरंच शिकवायला मजा येते. एक सांगू? तंत्रज्ञान जणू वरदान आहे आमच्यासाठी! एक inclusive पर्यावरण निर्माण करण्यात खूप मदत होतेय त्याने!" तंत्रज्ञानाची विधायक बाजू मिनार सांगत होती आणि मला आनंद होता तिच्या विश्लेषणाचा! 'inclusive' 'exclusive' 'social justice' 'equality' याचे पैलू समजणाऱ्या मिनारचा!

. एकदा मध्येच मिनार भेटीला आली, खूप गप्पा झाल्या. ती आता Tata Consultancy Services (TCS) कंपनीमध्ये रुजू होत होती. ती नुकतीच बंगळुरूमध्ये TCS मैत्रीद्वारा अडतीस दिवसांचं प्रशिक्षण घेऊन आली होती. आता कोलकत्ता येथे तिची बदली झाली होती. मिनार सिंग, system engineer, TCS असं कार्ड पाहून खूप आनंद झाला. मिनार म्हणाली, "आता तुम्हाला माझी पार्टी घ्यावीच लागेल. माझा पगार झालाय!" आणि आम्ही कॉलेजचे दिवस आठवत आइसक्रीम पार्टी केली! वर्गात विद्यार्थिनी म्हणून आलेली मिनार आज आपल्या पायावर उभी होती!

सध्या मिनार कोलकत्त्यामध्ये कार्यरत आहे. स्पर्धा परीक्षांचं स्वप्न ती अजूनही बाळगून आहे. "मिस, मी आता हळूहळू UPSC परीक्षेची तयारी करणार आहे" असं आवर्जून सांगते! नोकरी लागली तरी तिथेही तिची धडपड सुरू आहे. आता लढा आहे समतेसाठी!

"मिस, कॉलेजची आठवण येते. तिथे कधी माझं दिव्यांग असणं जाणवलं नाही. कुणी तसं वागवलंच नाही! वर्गात वसतिगृहात सगळं किती छान होतं! फिरणं, खरेदी करणं, फॅशन स्ट्रीटवर भटकणं सगळ्यांनी माझ्यासोबत केलं! मला वेगळं वागवल्याची भावना कधी आली नाही. मी कधी लोढणं नव्हते! पण आता हे TCSमध्ये खूप जाणवतं. मीटिंग्जला जाताना ऐकू येतं, "आता मिनारला कोण नेईल?" वाईट वाटतं." मिनार रुजू झाल्यावर साडेचार महिने तिला तांत्रिक कारणं सांगून पगार दिला गेला नाही. यावर व्यवस्थापनाशी भांडून तिला आपला हक्क मिळवावा लागला. आताही आम्ही बोलतो, तेव्हा "पुरेसं काम देत नाहीत हो मिस" असा सल मिनारच्या बोलण्यात असतो. पण ती निराश न होता काय करायला हवंय याची चर्चा करते. व्यवस्थापनाकडे तक्रार नोंदवत राहते, मानसिक त्रासाबद्दल बोलत राहते. समाजात दिव्यांगांसाठी संवेदनशीलता वाढायला हवी, शाळेत त्यांना समान वागणूक हवी, सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे सर्व खेळ, स्पर्धा त्यांनाही खुले असावे, वृत्तपत्रांनी एक कॉलम तरी दिव्यांगांसाठी ठेवावा. दिव्यांगाच्या संदर्भातील विधायक गोष्टी, त्यांच्या कामगिरीची माध्यमांनी दखल घेऊन प्रसार करायला हवा..... फेसबुकवर व्यक्त होत राहते, आपली मतं ठामपणे मांडत राहते.

"मी TCSमध्ये असणं म्हणजे दिव्यांग आमच्याकडे काम करतात, आम्ही inclusive आहोत हे केवळ मिरवणं, दाखवणं आहे का? दिव्यांगांना सामान्य वागणूक आणि समतेची वागणूक कधी मिळणार? आम्हाला इतर कार्मचार्‍यांसारखं का नाही वागवत? भेदभाव का?" मिनार प्रश्न मांडत जाते. समतेची संकल्पना व्यवहारात आजही कशी अपुरी आहे, हे मला शिकवत जाते.
.
.
.

महिला दिन विशेषांक २०१७

प्रतिक्रिया

पैसा's picture

9 Mar 2017 - 1:04 pm | पैसा

मिनारला आमच्या सर्वांतर्फे शुभेच्छा द्या प्लीज!

मितान's picture

9 Mar 2017 - 1:34 pm | मितान

थक्क झालेय !!!!
मिनार ची ही कथा कितीतरी दिव्यांग आणि सामान्य व्यक्तींसाठी प्रेरक आहे.
मराठवाड्यातल्या एका दिव्यांग शाळेला मिनार यांचा संदर्भ देत आहे. अनेकानेक धन्यवाद चित्रा !

पलाश's picture

9 Mar 2017 - 2:20 pm | पलाश

लेख अतिशय आवडला.
कितीतरी शिकवून गेला. मिनारचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. तिच्या कॉलेजमधल्या मित्रपरिवाराचा दिव्यांग व्यक्तीला सहजी सामावून घेण्याचा गुण सर्वांनी अंगिकारायला हवा.

मंजूताई's picture

9 Mar 2017 - 3:48 pm | मंजूताई

प्रेरणादायी !

मंजूताई's picture

9 Mar 2017 - 3:48 pm | मंजूताई

प्रेरणादायी !

प्रीत-मोहर's picture

9 Mar 2017 - 4:16 pm | प्रीत-मोहर

"डोळे उघडणारा" लेख आहे.
मिनारकडुन लढा कधीही न सोडण्याचा गुण घेत आहे. धन्यवाद मिनार .
तु लढायच सोइडल नाहीस तर UPSCच काय , काहीही करशील.

सुचेता's picture

10 Mar 2017 - 12:43 pm | सुचेता

जिद्द शिकावी तर हिच्याकडुन

गिरिजा देशपांडे's picture

10 Mar 2017 - 1:03 pm | गिरिजा देशपांडे

ग्रेट!!!!! _/\_

मनिमौ's picture

10 Mar 2017 - 1:16 pm | मनिमौ

मिनार ला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा

चित्रा लेले's picture

10 Mar 2017 - 10:23 pm | चित्रा लेले

लेखवरिल अपल्या सर्वन्च्य प्रतिक्रियन्सथि धन्यवाद..आपल्या शुभेच्छ् जरुर मिनर पर्यन्त पोहोचवेन ..सम्पदकिय मदल आन्क खुप सुन्देर झाला आहे

खूपच जिद्दीची आहे मिनार. लेखन आवडले.

टवाळ कार्टा's picture

11 Mar 2017 - 10:22 pm | टवाळ कार्टा

जबरदस्त

इशा१२३'s picture

11 Mar 2017 - 11:19 pm | इशा१२३

मिनारच्या जिद्दिला _/\_

स्वाती दिनेश's picture

12 Mar 2017 - 4:06 pm | स्वाती दिनेश

मिनार आवडली.
स्वाती

पद्मावति's picture

12 Mar 2017 - 4:07 pm | पद्मावति

_/\_

पिशी अबोली's picture

13 Mar 2017 - 12:14 pm | पिशी अबोली

मिनार आणि तिची जिद्द, दोन्ही आवडलं.

पिशी अबोली's picture

13 Mar 2017 - 12:14 pm | पिशी अबोली

मिनार आणि तिची जिद्द, दोन्ही आवडलं.

नूतन सावंत's picture

13 Mar 2017 - 12:44 pm | नूतन सावंत

मिनार! किती समर्पक नाव! तिची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद,चित्रा.

मारवा's picture

13 Mar 2017 - 6:54 pm | मारवा

एक नंबर परीचय आवडला.
चित्राजी लेख फार आवडला.

प्राजक्ताके's picture

14 Mar 2017 - 3:05 pm | प्राजक्ताके

आमच्या रुईया मधे दिव्यांग मुली यायच्या ते आठवलं. मिनार ला खूप खूप शुभेच्छा !!!!

कविता१९७८'s picture

14 Mar 2017 - 5:34 pm | कविता१९७८

छान लेख. मिनार ला खूप खूप शुभेच्छा !!!!

मिनारला शुभेच्छा आणि अशा 'डोळस' लेखासाठी तुम्हाला धन्यवाद

पियुशा's picture

15 Mar 2017 - 11:13 am | पियुशा

ग्रेट --/\--

भुमी's picture

15 Mar 2017 - 12:11 pm | भुमी

लेख आवडला.

जुइ's picture

15 Mar 2017 - 9:36 pm | जुइ

मिनारच्या जिद्दीला आणि धडाडीला सलाम! आपल्या समाजालाही दिव्यांग व्यक्तिला प्रवाहात समाविष्ठ करून घेण्यासाठी बरेच डोळस प्रयत्न करावे लागतील.

इडली डोसा's picture

16 Mar 2017 - 1:42 am | इडली डोसा

जिद्दिला आणि कष्टांना सलाम. तिला अपेक्षीत अशी समानतेची वागणुक मिळण्या इतपत सामाजीक जागरूकता लवकरच वाढेल अशी आशा करते.

काय जिद्द आहे! सलाम आहे मिनारला. तिची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.