कोकणची धाकड गर्ल - अश्विनी वास्कर

पूर्वाविवेक's picture
पूर्वाविवेक in लेखमाला
8 Mar 2017 - 6:49 am

.

आपल्या महाराष्ट्रात फार पूर्वीपासूनच कुस्ती आणि 'बॉडी बिल्डिंग' म्हणजेच 'शरीरसौष्ठव' या मर्दानी खेळांची परंपरा आहे. मुंबई श्री ते महाराष्ट्र श्री हा टप्पा पार पाडून सुहास खामकर, प्रशांत साळुंखे, संग्राम चौगुले यासारखे महाराष्ट्राचे अनेक सुपुत्र राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्थरावर विजयाचा झेंडा फडकवत आहेत. आता त्यांच्या जोडीने कोकणातील एका छोट्या शहरातील मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली मुलगी पराक्रम गाजवू लागली आहे. ती आहे रायगड जिल्ह्यातील पेण येथील अश्विनी भालचंद्र वास्कर. मुंबईत ७ डिसेंबर १४ रोजी झालेल्या 'वर्ल्ड बॉडी बिल्डिंग अँड फिजिक्स स्पोर्ट्स' या स्पर्धेत अश्विनीने भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. या स्पर्धेत तिला अपेक्षित यश लाभलं नाही, पण अनेक अडचणींशी सामना देत तिने केवळ आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर परदेशी खेळाडूंना टक्कर दिली. आम्हां पेणकरांना तिचा सार्थ अभिमान वाटतो. ती कोकणातील आणि IBBFकडून (Indian Body Building Federationकडून) खेळणारी भारतातील पहिली महिला बॉडी बिल्डर आहे.

खालील फोटोत तिच्या महत्त्वाच्या स्पर्धांची माहिती दिली आहे -

.

मी तिच्याकडे मुलाखत घेण्यास गेले. मुलाखत घ्यायची माझी पहिलीच वेळ असल्याने थोडं दडपण आलं होत. पण तिथं गेल्यावर अश्विनीशी आणि तिच्या बाबांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्या गप्पांमधूनच तिचा साधेपणा, सच्चेपणा आणि आत्मविश्वास दिसू लागला.

. . .

प्रश्नः अश्विनी, बॉडी बिल्डिंगसारखं पुरुषप्रधान क्षेत्र कसं काय निवडलंस? या क्षेत्रात यायचं कधी आणि कसं ठरवलंस?

अश्विनी: या क्षेत्रात येणं हा केवळ योगायोगच ठरला.
रत्नागिरीला MSc in Fisheries Science पूर्ण केल्यावर मुंबईत Central Institute Of Fisheriesमध्ये नोकरी करत असताना, वाढलेलं वजन कमी करण्यासाठी जिमला जायला सुरुवात केली. मी खूप लठ्ठ झाले होते आणि वजन कमी करणं हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर होता. व्यायाम करता करता व्यायामाची आवड निर्माण झाली. एक वर्षात अनावश्यक वजन कमी झाल्यामुळे हुरूप वाढला आणि पुढे या क्षेत्रात अजून काहीतरी करावंसं वाटू लागलं. पण नेमकं काय करावं हे माहीत नव्हतं, म्हणून K11 या मुंबईस्थित संस्थेत 'फिटनेस ट्रेनर'चे कोर्स केले. तिथेच मला या क्षेत्रातील माझे मार्गदर्शक-गुरू कैझाद कपाडिया भेटले. त्यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रोत्साहनाने पूर्ण वेळ 'फिटनेस ट्रेनर' व्हायचं ठरवलं. योग्य व्यायाम आणि आहार घेत होते, त्यामुळे शरीर आकार घेऊ लागलं, अगदी तेव्हाही स्पर्धेसाठी जायचं ठरवलं नव्हतं.

माझ्या पहिल्या स्पर्धेच्या फक्त १२ दिवस आधी माझे गुरू आणि सहकारी यांच्या प्रोत्साहमुळे मी स्पर्धेत उतरायचं ठरवलं आणि तिथूनच हा प्रवास सुरू झाला. हे सगळं घडलं व्यायामाला सुरुवात केल्यापासून फक्त दीड वर्षात.

.

प्रश्नः बॉडी बिल्डिंगसाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. तुझा रोजचा सर्व आहार कसा असतो?

अश्विनी: दिवसातून मी दोनदा किंवा एकदा मिळून ३ ते ४ तास व्यायाम करते. यात वेट लिफ्टिंग, स्कॉट्स यावर जास्त भर असतो. स्पर्धा जवळ आली की व्यायाम आणि आहार वाढवला जातो. मी प्रथिनयुक्त आहार जास्त घेते. कर्बोदकं एकदम कमी प्रमाणात. नैसर्गिक रूपातील प्रथिनं घेण्यावर माझा जास्त भर असतो. दर ३ तासाने खावं लागतं.

प्रश्नः इतकी प्रचंड मेहनत करण्यासाठी तुला मानसिक बळ कसं मिळतं? आमचा तर दर वर्षी १ जानेवारीपासून व्यायामाला सुरुवात करण्याचा संकल्प थोड्याच दिवसात बारगळतो.
हल्लीच 'दंगल' पहिला, त्यात मेहनतीच्या जोडीला असणारा आहार-विहारावरील संयम पाहण्यात आला. पाणीपुरी वगैरे चमचमीत खायचं नसतं, हे खरं आहे का?

अश्विनी: कारण मी वर्षाच्या मधूनच व्यायाम सुरू केला. जस्ट जोकिंग हं. (आणि ती खूप मनमोकळं हसली.) व्यायाम आवडू लागला आणि मग त्याचं व्यसन बनलं. शिवाय बॉडी डेव्हलप होताना मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिक्रिया मानसिक बळ वाढवत होत्या. जिममधल्या सहकाऱ्यांचाही खूप मोलाचा वाट आहे. "तू कर! तू हे सहज करू शकशील." असा आत्मविश्वास त्यांनी दिला.
चटक-मटक खाण्यामुळे चयापचय संस्थेत बिघाड निर्माण होतो. आणि विशेषतः स्पर्धेची तयारी करत असतात त्या वेळचा व्यायाम आणि आहार यामुळे शरीरात जे बदल घडत असतात, त्यास अशा खाण्यामुळे अडथळा येतो आणि अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. त्या वेळेस अगदी थोडं जरी चटक-मटक खाल्लं तरी फरक पडतो. मग सगळीच मेहनत वाया जाते.

प्रश्नः आजही आपल्याकडे 'कमी कपड्यातील स्त्री'कडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन कसा आहे याची तुला जाणीव असेलच. पण तुझा खेळच शरीराचं 'सौष्ठव' दाखवण्याचा, त्याचा तुला संकोच वाटला होता का? स्वतःच्या संकोचावर कशी मात केलीस?

अश्विनी: पहिल्यांदा जेव्हा तसा पोषाख करून स्पर्धेला उतरणार होते, तेव्हा फारच संकोच वाटत होता. पण आजूबाजूला त्या पोषाखातल्या मुली पाहिल्यावर थोडी भीड चेपली. आणि तिथे जमलेल्या लोकांच्या नजरा मुळीच टोचत नव्हत्या. कारण खेळ म्हणून शरीराचं 'सौष्ठव' बघण्यातच रस होता आणि नजरेत कौतुक होतं, हे जेव्हा जाणवलं तेव्हा संकोच दूर होऊन आत्मविश्वास आला.

.

प्रश्नः शिवाय घरच्यांची प्रतिक्रिया काय होती? त्यांचा विरोध झाला का?

अश्विनी: माझ्या पहिल्या स्पर्धेच्या फक्त १२ दिवस आधी स्पर्धेत उतरायचं असं ठरवलं. तेव्हा प्रथम वडिलांना फोन केला. त्यांना स्पर्धेविषयी सांगितलं आणि पोषाखाबाबत कल्पना दिली. त्यांनी सर्व म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आणि विचार करण्यासाठी दोन दिवस मागितले. मनात धाकधूक होती, कारण शाळेत असताना मी एक वनपीस आणला होता, तो त्यांनी घालू दिला नव्हता. पण दुसऱ्याच दिवशी त्यांचा फोन आला आणि ते म्हणाले की "तुझी इच्छा आहे ना, तर मग तू जरूर कर. तू एक खेळ खेळते आहेस, हे कुठलंही वाईट काम नाही. तू खूप मेहनत कर आणि जिद्दीने स्पर्धेत उतर. मला तुझा नेहमीच अभिमान वाटेल." वडिलांचा आणि माझ्या सर्व कुटुंबाचा भक्कम आधार आणि प्रोत्साहन यामुळेच मी इथवर मजल मारू शकले.

प्रश्नः तुला एक स्त्री म्हणून काही त्रासदायक अनुभव आले का? आंतरराष्ट्रीय स्पर्धेबाबत तुझा अनुभव कसा आहे?

अश्विनी: नाही, कधीच नाही. उलट नेहमी कौतुकाचा वर्षावच झाला. स्पर्धेला सोबत माझे वडील, मार्गदर्शक आणि स्पर्धेसाठी आलेले सहकारी असायचे, मी निर्धास्त होते.
मी जेव्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला होता, तेव्हा पहिल्यांदाच अशा प्रकारच्या स्पर्धा भारतात होत होत्या. त्यामुळे सर्वांना कौतुकमिश्रित कुतूहल फार होतं. आणि स्त्री स्पर्धक म्हणून मी त्या स्पर्धेत पहिल्यांदा भारतात प्रदर्शन करणार होते, याचा मला फार अभिमान वाटतो.

प्रश्नः या खेळात एकूण किती वर्षं कारकिर्द आहे?

अश्विनी: अमर्याद. मेहनत करण्याची तुमची तयारी आहे तिथपर्यंत! एर्नेस्टीन शेफर्ड या ८० वर्षे वयाच्या अमेरिकन महिला बॉडी बिल्डरने हे जगाला दाखवून दिलं आहे. आई झाल्यानंतरही अनेक जणी या क्षेत्रात कार्यरत आहेत.

प्रश्नः तुझ्यामुळे प्रेरित झालेल्या मुलींना तू मार्गदर्शन करतेस का? या क्षेत्रात कारकिर्द करायची असेल, तर कधीपासून सुरुवात करायला हवी?

अश्विनी: हो, अर्थातच! मला खूप समाधान मिळतं त्यात. मुलींच्या आणि त्यांच्या पालकांच्या मनात 'बॉडी बिल्डिंग'विषयी खूपच गैरसमज असतात, मी त्यांच्या मनात असणारे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करते.
खरं तर तुमची इच्छाशक्ती प्रबळ असेल, तर या क्षेत्रात येण्यासाठी कुठलीच वयोमर्यादा नाही. आधी उल्लेख केलेल्या एर्नेस्टीन शेफर्ड यांनी वयाच्या ५६व्या वर्षी आपली कारकिर्द सुरू केली होती. पण साधारण ८ वर्षानंतर या दृष्टीने व्यायाम सुरू करायला हरकत नाही.

प्रश्नः पुढे तुझ्या काय योजना आहेत? लग्नानंतर हे सुरू ठेवणार आहेस का?

अश्विनी: सध्या गुडघ्याला दुखापत झाली आहे, शिवाय प्रायोजक मिळत नसल्याने मी स्पर्धेमध्ये उतरत नाही आहे. पण त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत.
लग्नाचा विचार चालू आहे. लग्नानंतर नव्या दमाने मी यात उतरणार आहे.

प्रश्नः बॉडी बिल्डिंग हा खर्चीक खेळ आहे. तू तुझ्या खर्चाचा मेळ कसा घालतेस? स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रायोजक मिळणं खूप गरजेचं आहे का?

अश्विनी: स्पर्धेची तयारी ५ ते ६ महिने आधीपासून करावी लागते. त्यासाठी पूर्ण वेळ इथे द्यावा लागतो. त्यामुळे दुसरीकडे नोकरी करता येत नाही. शिवाय स्पर्धेसाठी आवश्यक असणारं नृत्य प्रशिक्षण घ्यावं लागतं.

माझा फक्त आहाराचा खर्च महिन्याला १५,००० ते २०,००० रुपये इतका आहे. स्पर्धेची तयारी करताना तोच खर्च दुप्पट होतो. शिवाय पोषाख वगैरे धरून प्रत्येक स्पर्धेचा खर्च लाखाच्या घरात जातो. माझ्या पहिल्या काही स्पर्धांसाठी माझ्या वडिलांना आईचे दागिने विकावे लागले होते. माझे वडील STमध्ये कंडक्टर होते. आम्हा तिन्ही भावंडांना त्यांनी मनाप्रमाणे शिकू दिलं. आता ते सेवानिवृत्त झाले आहेत म्हणून आम्ही अ‍ॅक्वेरियम फिश टँकचा व्यवसाय पेणमध्ये सुरू केला आहे.

(याच प्रश्नावर तिच्या वडिलांनी आपल्या मनातील सल बोलून दाखवली.)

तिला स्पर्धेसाठी प्रायोजक मिळत नाही, म्हणून ती स्पर्धेत उतरत नाही. पण पैशांची तरतूद करण्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत. माझी मुलगी खूप मेहनती आहे. तिचे कष्ट वाया जाऊ नयेत असं वाटतं. हल्लीच्या काळात दहीहंडीलासुद्धा प्रायोजक मिळतात, पण गरजू गुणवंत खेळाडूंना मिळत नाहीत. मुबंईत आमचे कुणी नातेवाईक नसल्याने भाड्याच्या घरात राहून ती फिटनेस ट्रेनर म्हणून नोकरी करते. पण त्यातून तिचा स्पर्धेचा खर्च भागत नाही.

अश्विनीसारख्या गुणी खेळाडूच्या सर्व अडचणी दूर व्हाव्यात आणि पुन्हा तिचे नाव राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकावे, अशा शुभेच्छा देत मी तिचा निरोप घेतला.

सर्व फोटो आंतरजालावरून साभार.

. . .

.

महिला दिन विशेषांक २०१७

प्रतिक्रिया

वेल्लाभट's picture

8 Mar 2017 - 3:41 pm | वेल्लाभट

_/\_
दंडवत.
शरीरापेक्षा मनाची जिगर जास्त लागते याला. कमाल. भारी.

मनिमौ's picture

8 Mar 2017 - 4:11 pm | मनिमौ

अश्विनी विषयी आज नवीन माहिती मिळाली. तिच्या भावी कारकीर्दीस शुभेच्छा आणी अशा अपरिचित व्यक्ती ची ओळख करून दिल्याबद्दल तुझे आभार

प्रीत-मोहर's picture

8 Mar 2017 - 5:02 pm | प्रीत-मोहर

___/\__
खरच थोर आहे हे.

अश्विनी प्राउड ऑफ यु!! तुझ्या पुढच्या कारकिर्दीस खूप खूप शुभेच्छा.
तुझ्यापासून प्रेरणा घेऊन नियमित व्यायाम करायचा निश्छय करत आहे.

रुस्तम's picture

8 Mar 2017 - 6:08 pm | रुस्तम

माझी वर्ग मैत्रीण. आम्हाला खूप अभिमान वाटतो...

अजया's picture

8 Mar 2017 - 6:13 pm | अजया

असे स्त्रीयांसाठी क्षेत्र असते हेसुद्धा माहीत नव्हते तिथे एक छोट्याशा गावतली मुलगी एवढा पराक्रम गाजवते तेही अशा अनवट क्षेत्रात.
अश्विनीची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद पूर्वा.

वेगळे क्षेत्र निवडून सातत्याने त्याचा पाठपूरावा करणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. अश्विनीच्या पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा ! तिच्या बाबांचेही खूप कौतूक तिला प्रोत्साहन दिल्यबद्दल. पूर्वाअतुझे खूप खूप आभार तिची ओळख आम्हाला करून दिलीस.

पद्मावति's picture

8 Mar 2017 - 8:36 pm | पद्मावति

___/\__

पूर्वा तुझे खूप खूप आभार तिची ओळख आम्हाला करून दिलीस.

हेच म्हणते.

पिशी अबोली's picture

9 Mar 2017 - 10:25 am | पिशी अबोली

खूप छान मुलाखत. अश्विनीला हॅट्स ऑफ. तिला प्रायोजक मिळावेत ह्या शुभेच्छा..

पियुशा's picture

9 Mar 2017 - 10:39 am | पियुशा

वेगळी वाट निवडल्याबद्दल अश्विनीचे खुप खुप कौतुक न पुढील वाटचालीस शुभेच्छा , धन्स पुर्वा ताइ ह्या लेखाबद्द्ल .अता नव्या जोमाने व्यायम क्रीन म्हनते ;)

रातराणी's picture

9 Mar 2017 - 11:06 am | रातराणी

जबरदस्त!!

वरुण मोहिते's picture

9 Mar 2017 - 11:54 am | वरुण मोहिते

_/\_

सस्नेह's picture

9 Mar 2017 - 12:05 pm | सस्नेह

__/\__
ग्रेट !

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Mar 2017 - 12:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

छोट्याश्या गावातून वर येऊन यश मिळवणार्‍या अश्विनीचे हार्दिक अभिनंदन. तिच्या भविष्यातिल वाटचालीस आणि यशाची शिखरे गाठण्यासाठी अनेकानेक शुभेच्छा !

स्पा's picture

9 Mar 2017 - 12:46 pm | स्पा

__/\__

सलाम

केवढी जिद्द,कष्ट तेही अगदी वेगळ्या क्षेत्रात .कमालच.
छान लेख पूर्वा!

गामा पैलवान's picture

9 Mar 2017 - 6:18 pm | गामा पैलवान

पूर्वाविवेक,

अश्विनी वासकरांच्या जिद्दीस सलाम. त्यांना सत्वर प्रायोजक लाभो.

एक बाळबोध अवांतर प्रश्न आहे. कृपया प्रश्नास हसू नये. धाकड गाण्यावर कुस्तीचं चित्रण होतं ना?

आ.न.,
-गा.पै.

पूर्वाविवेक's picture

9 Mar 2017 - 7:25 pm | पूर्वाविवेक

खरतरं आपणांस काय सांगावे, आपण तर साक्षात पैलवान ! :-))
धाकड म्हणजे मजबूत, ताकदवान, दबंग. खऱ्या हिंदीत हा शब्द आहे कि नाही माहित नाही पण बॉलिवूडच्या डिक्शनरीत मात्र आहे.
तरीही अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहावी.
http://www.bollymeaning.com/2016/11/dhaakar-dhaakkad-dhakad-dhaakad-mean...

गामा पैलवान's picture

10 Mar 2017 - 1:03 pm | गामा पैलवान

हाहाहा! विसरलोच होतो मी पैलवान आहे ते. त्याचं काये की मी पडलो नकली पैलवान आणि अश्विनीताई आहेत खऱ्या ! ;-) एकंदरीत मराठीत धडधाकट म्हणतात तसा धाकड असा हिंदी शब्द असावा.
आ.न.,
-गा.पै.

उल्का's picture

10 Mar 2017 - 11:06 am | उल्का

पूर्वा, अतिशय सुंदर मनमोकळी मुलाखत. अश्विनी, खरंच कौतुकास्पद!
तिला लवकरात लवकर प्रायोजक मिळू दे व ती खूप यशस्वी होऊ दे ही शुभेच्छा!

पैसा's picture

10 Mar 2017 - 11:09 am | पैसा

फक्त _/\_

स्वतःची जिद्द, मेहेनत करायची तयारी आणि घरच्यांचा पाठिंबा असेल तर मुलं काहीही करून दाखवू शकतात. तिचं अभिनंदन आणि तिची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

तिच्या पालकांचे विशेष अभिनंदन. समाजाच्या नावाखाली किती पालक आपल्या मुलींना जे हवं ते करू देत नाहीत.

पुष्करिणी's picture

10 Mar 2017 - 11:17 pm | पुष्करिणी

अतिशय स्फूर्तीदायक, खूप खूप शुभेच्छा

चतुरंग's picture

10 Mar 2017 - 11:31 pm | चतुरंग

वेगळीच करिअर निवडून त्यात जिद्दीने पुढे जायचे म्हणजे कमाल आहे, त्यातून घरची पार्श्वभूमी इतकी साधी असताना! अश्विनीला आणि तिच्या कुटुंबियांना सलाम! _/\_
तिला लवकरच प्रायोजक मिळोत.

सविता००१'s picture

11 Mar 2017 - 12:00 pm | सविता००१

सुरेख मुलाखत घेतली आहेस गं.
अश्विनीला तिच्या कारकिर्दीसाठी अनेकोत्तम शुभेच्छा!!

रागिणी९१२'s picture

14 Mar 2017 - 12:04 pm | रागिणी९१२

मुलाखत फार आवडली.
भारतीय स्त्रिया यातही पुरुषांसोबत आघाडीवर आहेत हे वाचून फार आनंद झाला. याबद्दल मला काहीच माहित नव्हते. धन्यवाद अश्विनीची ओळख करून दिल्या बद्दल. _^_

रेवती's picture

16 Mar 2017 - 11:47 pm | रेवती

बाब्बौ! काय ही मेहनत! अश्विनीला प्रायोजक मिळोत अशी इच्छा.

मूनशाईन's picture

17 Mar 2017 - 2:38 am | मूनशाईन

पूर्वा, फार प्रामाणिक आणि प्रेरणादायी अशी मुलाखत. धाकड गर्लची ओळख करून दिल्याबद्दल तुला खूप धन्यवाद.
मेहनत, जिद्द, आत्मविश्वास आणि चिकाटी थोडक्यात सांगायचे म्हणजे अश्विनी! तुझ्या कठोर परिश्रमांना आणि तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या तुझ्या आईवडिलांना आमचा सलाम!

पूर्वा आज वेळ मिळाला बघ वाचायला.

वा खुप छान ओळख करून दिली आहेस अश्विनीची. आपली गाववाली म्हणून अभिमान वाटतोच पण एक स्त्री म्हणून जास्त अभिमान वाटतोय.

सूड's picture

17 Mar 2017 - 10:16 pm | सूड

__/\__

मधुरा देशपांडे's picture

18 Mar 2017 - 11:36 am | मधुरा देशपांडे

सलाम...या मुलाखती साठी धन्यवाद पूर्वा...अश्विनीला खूप शुभेच्छा!!

सुचेता's picture

18 Mar 2017 - 1:51 pm | सुचेता

अश्विनीची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद

बरखा's picture

25 Mar 2017 - 5:15 pm | बरखा

खरच खुप कौतुक वाटत, आज मुली कुठल्याही क्षेत्रात कमी पडत नाहीत. लेख खुप आवडला.

खूप छान ओळख.
मुलाखत आवडली.