एक होती क्रिस्टीना…

पद्मावति's picture
पद्मावति in लेखमाला
8 Mar 2017 - 6:38 am

.

सन १९३९च्या सप्टेंबरमध्ये एक ब्रिटिश जहाज केपटाउनहून इंग्लंडला यायला निघाले होते. त्या जहाजावर हरवलेल्या गोष्टींची यादी रोज एका फळ्यावर लावली जाई. २८ सप्टेंबरला सकाळी त्या फळ्यावर दोन गोष्टींची नोंद झाली….

१. लॉस्ट- वन शर्ट

२. लॉस्ट- वॉर्सा

अगदी टिपिकल ब्रिटिश ड्राय ह्यूमर!

सन १९३९पर्यंत हिटलरने युरोपमध्ये धूमाकूळ घालायला सुरुवात केली होती. झेकोस्लोव्हाकिया आणि ऑस्ट्रिया घशात घालून आता जर्मन गरुडाची नजर वळली होती पोलंडवर.

वर्षानुवर्षे रशियन राजवटीखाली काढल्यानंतर आताशा कुठे गेल्या दशकापासून पोलंड स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा मिरवीत होते. सार्‍या देशात उत्साहाचे वातावरण होते. वॉर्सा तर पूर्व युरोपमधील एक महत्त्वाचे शहर म्हणून आकाराला येऊ लागले होते. अशातच जर्मनीने १९३९मध्ये सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला या देशावर पूर्ण ताकदीनिशी धडक मारली. इकडे रशियन सैन्यसुद्धा पूर्वेकडून पोलंडमधे घुसले. पोलिश सेनेचा आणि जनतेचा प्रतिकार कमजोर पडला. सुमारे साठ हजार सैनिक मारले गेले. रोज पराभवांच्या नवीन बातम्या जगभरात जाऊन धडकत होत्या.

इंग्लंडला निघालेल्या त्या ब्रिटिश जहाजावर क्रिस्टीना स्कारबेक ही मुलगी आपल्या नवर्‍याबरोबर प्रवास करीत होती. वॉर्सा पडल्याची ती बातमी लाखो पोलिश जनतेप्रमाणेच क्रिस्टीनाच्याही आयुष्यात प्रचंड उलथापालथ करणार होती आणि त्याचबरोबर तिच्या जीवनाला एक जबरदस्त कलाटणीही देणार होती.

पोलंडच्या स्कारबेक या प्रसिद्ध उमराव घराण्यात क्रिस्टीनाचा जन्म झाला. लहानपणापासूनच तिच्या वडिलांनी तिला घोडेस्वारी, गिर्यारोहण, स्कीइंग अशा गोष्टींचे प्रशिक्षण दिले. मुळातच अत्यंत धाडसी आणि साहसप्रिय स्वभावाच्या क्रिस्टीनाने या गोष्टी अगदी सहजतेने आत्मसात केल्या. तिच्या वडिलांकडून तिने आणखी एक गोष्ट घेतली होती, ती म्हणजे आपल्या देशाविषयी प्रचंड अभिमान आणि प्रेम.

पोलंड पडल्याच्या पहिल्या धक्क्यातून सावरताच या मुलीच्या डोक्यात आपल्याला आपल्या देशासाठी आता काय करता येईल याचा विचार सुरू झाला. जहाज इंग्लंडमध्ये पोहोचताक्षणी तिने अजिबात वेळ न दवडता थेट ब्रिटिश सिक्रेट इंटेलजन्स सर्व्हिसशी संपर्क साधला.

इंग्लंडसुद्धा जर्मनीविरुद्ध लष्करी कारवाया करतच होते, पण थेट हल्ला कसा करता येईल यावर त्यांचा जास्त भर होता. तेव्हा सिक्रेट इंटेलिजन्स सर्व्हिस (एस.आय.एस.) कार्यरत जरी असली, तरी त्यांच्याकडे जर्मनीविरुद्ध गुप्त कारवाया करण्याची काही ठोस योजना अजून तयार नव्हती. अशात क्रिस्टीनाने आपली पोलंडमध्ये जाऊन नाझींविरुद्ध हेरगिरी करण्याची योजना त्यांच्यापुढे मांडली. नंतर अवघ्या दोनच दिवसांत क्रिस्टीना स्कारबेक ही पोलिश मुलगी ब्रिटिश सिक्रेट सर्व्हिसची एजंट म्हणून बुडापेस्टला रवाना झाली.

पोलंड जरी नाझींच्या ताब्यात गेले असले, तरी हंगेरी मात्र अजूनही स्वतंत्र होते. पोलंडमध्ये कसे काम सुरू करता येईल याचा आराखडा डोक्यात ठेवून क्रिस्टीना बुडापेस्टला येऊन पोहोचली.
तिकडे पोलिश जनता पराभवाने पार कोलमडली होती. गेस्टापोंचे आणि जर्मन सैन्याचे अत्याचार दिवसेंदिवस वाढत होते. कत्तली, फाशी, गोळ्या घालणे हा नेहमीचा दिनक्रम झाला होता. इंग्लंडकडून आपल्याला काहीही मदत मिळणार नाही अशी हतबलता जनतेला आली होती. नाही म्हणायला देशात वेगवेगळ्या भूमिगत संघटना थोड्याफार कार्यरत होत्या. पण त्यांच्यात काहीच सुसूत्रता नव्हती आणि लढण्यासाठी शस्त्रे तर नाहीच नाही.
क्रिस्टीनाच्या डोळ्यापुढे उद्दिष्ट स्वच्छ होते. पोलिश जनतेचे मनोबल वाढविणे हा तिचा प्राथमिक उद्देश होता. त्यासाठी जरुरी होते सर्वप्रथम एस.आय.एस. आणि भूमिगत संघटना यांच्यामध्ये संपर्क प्रस्थापित करणे. पण प्रश्न असा होता की आताच्या नाझीव्याप्त पोलंडमध्ये जाणार कसे? सरळ वाटेने जाणे अशक्य असले, तरी क्रिस्टीनाच्या डोक्यात मात्र एक भन्नाट कल्पना आकारास येत होती.

टॅट्रा माउंटन्समधला तिचा वर्षानुवर्षांचा स्कीइंगचा अनुभव आता तिच्या कामात येणार होता आणि तोच टॅट्रा माउंटन आपल्या चढउतारांच्या मार्गाने तिला तिच्या मायदेशी घेऊन जाणार होता.

फेब्रुवारी १९४०मध्ये क्रिस्टीनाने जीवघेण्या बर्फाळ थंडीत दोन दिवस सतत चालत, चढत, स्कीइंग करत स्लोव्हाकियामार्गे पोलंडची सीमा पार केली आणि एक नवीन नाव, नवीन ओळख घेऊन मजल-दरमजल करीत वॉर्साला येऊन पोहोचली.

वॉर्साला पोहोचल्यावर तिने पोलिश क्रांतिकारकांच्या टोळ्यांशी संपर्क साधायला सुरुवात केली. पुढच्या काही महिन्यांत तिच्या कामाला जबरदस्त वेग आला. ठिकठिकाणच्या भूमिगत नेत्यांशी संपर्क साधणे, त्यांच्यामधे समन्वय राखणे आणि नाझींच्या हालचालींची माहिती गोळा करून ती एस.आय.एस.ला पाठविणे. लष्करी वाहनांच्या हालचाली, शस्त्रांच्या कारखान्यात किती प्रमाणात शस्त्रास्त्रे निर्माण केली जाताहेत, ती शस्त्रे कुठे कुठे पाठवली जात आहेत ही सर्व माहिती मायक्रोफिल्ममध्ये साठवायची आणि ती मायक्रो फिल्म स्वत:च्या हातमोज्यांच्या शिवणीमध्ये लपवून पुन्हा डोंगररांगांमधून चालत, स्कीइंग करत हंगेरीमध्ये आणायची.

या प्रवासात तिला भक्कम साथ मिळाली ती तिच्या साथीदाराची, प्रियकराची. त्याचे नाव होते आंडरजेझ (अँड्र्यू) कोवेर्स्की!

हा निडर आणि शूर पोलिश आर्मी लेफ्टनंट बुडापेस्टमध्ये अतिशय महत्त्वाचे काम करत होता.
हजारो युद्धकैदी पोलंडमध्ये खितपत पडले होते. या युद्धकैद्यांच्या नशिबात आज ना उद्या फायरिंग स्क्वाडला तोंड देणे अटळ होते. त्या कैद्यांमध्ये अत्यंत निष्णात पायलट्सचा आणि सैनिकांचा समावेश होता. या लोकांना पोलंडच्या बाहेर काढून सुरक्षित जागी पोहोचविणे हे कार्य अँड्र्यू आणि त्याचे सहकारी करत होते.

बुडापेस्टमध्ये असतांना क्रिस्टीना आणि अँड्र्यू एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघेही एकमेकांना पूरक होते. प्रचंड धाडस, जिवावर उदार होण्याची तयारी, मनस्वी स्वभाव आणि प्रखर देशप्रेम. अगदी मेड फॉर इच अदर. अँड्र्यूच्या कामात आता क्रिस्टीनानेही स्वत:ला झोकून दिले. असे मानले जाते की अँड्र्यूने या युद्धात जवळजवळ पाच हजारांपेक्षा जास्त लोकांना सुरक्षितपणे पोलंडच्या सीमेच्या बाहेर काढले. या कामात क्रिस्टीनाचा सिंहाचा वाटा होता.

मात्र हळूहळू हे दोघे गेस्टापोच्या रडारवर येऊ लागले होते. दोघांचे फोटो आणि माहिती मोस्ट वॉन्टेड लिस्टवर लागली आणि एक दिवस ज्याची भीती होती तेच झाले. अँड्र्यू आणि क्रिस्टीना या दोघांना अटक करण्यात आली.

कित्येक तासांच्या टॉर्चरला दोघांनी अर्थातच दाद दिली नाही. आता यांना एकतर गोळ्या घालून ठार मारण्यात आले असते, नाहीतर त्यांची पाठवणी झाली असती कॉन्सन्ट्रेशन कँपमध्ये. क्रिस्टीनाने मग एक शेवटचा उपाय करून पाहण्याचे ठरविले. अटक होण्याच्या वेळी तिला खोकला झाला होता. तिने काय केले की गार्डसचे लक्ष नसताना स्वत:चीच जीभ तोंडातल्या तोंडात कच्चकन चावली. जिभेतून आलेले रक्त तिच्या तोंडातून यायला लागले. तिचा तो खोकला आणि ते रक्त पाहून गार्ड्स घाबरले. त्यांना वाटले की हिला टीबी झालाय. हा लागट रोग आपल्यालाही होईल या भीतीने त्यांनी क्रिस्टीनाला ताबडतोब सोडून दिले. तिच्या साथीदारालाही टीबीची लागण झाली असल्याची शंका वाटून अँड्र्यूलाही लगोलाग सोडून देण्यात आले.

जीव तर वाचला, पण ओळख उघड झाली होती. अँड्र्यू आणि क्रिस्टीना दोघांना युरोपात राहणे आता अशक्य होते. त्यामुळे त्यांना या युद्धाच्या धामधूमीपासून दूर पाठविण्याचा निर्णय घेतला गेला.

हंगेरीनेही एव्हाना जर्मनीशी हातमिळवणी केली होती. या दोघांना बुडापेस्टमधून बाहेर काढणेसुद्धा तितकेसे सरळ राहिले नव्हते. शेवटी हंगेरीमधील ब्रिटिश राजदूताच्या सहकार्याने क्रिस्टीनाचा नवीन पासपोर्ट बनविला गेला. तिला एक नवीन नावही देण्यात आले. क्रिस्टीना स्कारबेक आता क्रिस्टीन ग्रॅनविल या नावाने ओळखली जाणार होती. एक दिवस त्या ब्रिटिश राजदूताच्या गाडीच्या ट्रंकमध्ये लपून क्रिस्टीनने हंगेरीची सीमा अलगदपणे पार केली.

पुढची दोन वर्षे क्रिस्टीन कैरो, इस्तंबूल, सीरिया, जेरुसलेम असा प्रवास करत होती. पण या दोन वर्षांमध्ये तिला फारशी विशेष कामगिरी देण्यात आली नाही. या तुफानाला अशी शांतता सहन होत नव्हती. तिचा जीव नवनव्या आव्हानांसाठी तळमळायला लागला होता आणि मग तिच्यासमोर एक सुवर्णसंधी चालून आली.

विन्स्टन चर्चिलच्या खंबीर पाठिंब्याने १९४०मध्ये ब्रिटिश इंटेलिजन्सने एका गुप्त संघटनेची - स्पेशल ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्ह (एस.ओ.ई.) स्थापना केली होती. म्हणजे निरनिराळ्या गनिमी काव्याने शत्रूला नामोहरम करणे हे एस.ओ.ई.चे उद्दिष्ट होते. जर्मनव्याप्त प्रदेशांमध्ये स्थानिक क्रांतिकारक संघटना निर्माण करणे, त्यांना शस्त्रास्त्रे पुरविणे, नाझी सैनिकी तुकड्यांवर अचानक छापे मारणे, हेरगिरी करणे इत्यादी.
एस.ओ.ई.साठी क्रिस्टीन आणि तिच्यासाठी एस.ओ.ई. अगदी परफेक्ट मॅच होते.

लवकरच तिचे सैनिकी प्रशिक्षण सुरू झाले. काही महिन्यांतच पॅरशूटिंग, बंदुका चालविणे, ग्रेनेड्सचा उपयोग, गिर्यारोहण, त्याचबरोबर वायरलेस संदेश, कोड वर्ड्स वापरणे, वेगवेगळी रूपे बदलणे अशा काटेकोर ट्रेनिंगनंतर क्रिस्टीन आता पुढच्या कामगिरीसाठी सुसज्ज झाली होती.

गेल्या दोन वर्षांत जर्मनीने फ्रान्ससहित जवळपास सगळा युरोप गिळंकृत केला होता. लाखो लोकांच्या कत्तली झाल्या होत्या आणि लाखो लोक कॉन्सन्ट्रेशन कँप्समध्ये रोज मरत होते. फ्रान्समध्ये फ्रेंच फोर्सेस ऑफ द इंटीरियरचे (एफ.एफ.आय.चे) स्वातंत्र्यसैनिक नाझींचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत होते. अर्थात त्यांना एस.ओ.ई.ची भक्कम साथ होतीच. फ्रान्सममधला ब्रिटिश एजंट होता फ्रान्सिस कॅमट्स.

फ्रान्सिस, स्थानिक लोकांना आपल्याकडे वळवून आपले संख्याबळ वाढविण्याच्या प्रयत्नात होता. त्याचप्रमाणे प्रतिकारासाठी लागणारा दारूगोळा, बंदुका, गोळ्यांची रसद इंग्लंडहून मागविणे आणि आपल्या सैनिकांना त्याचा पुरवठा करणे या कामांसाठी त्याने लंडन हेडक्वॉर्टरकडे साहाय्यकाची मागणी केली.

१९४४च्या फेब्रुवारी महिन्यात एका रात्री फ्रान्सच्या दक्षिण भागात पॅराशूटने एक व्यक्ती लँड झाली. ती व्यक्ती होती क्रिस्टीना स्कारबेक... आता क्रिस्टीन ग्रॅनविल! फ्रान्सिस कॅमट्सची नवीन साहाय्यक, साथीदार आणि नंतर प्रेयसीसुद्धा!!

क्रिस्टीन उत्तम फ्रेंच बोलायची. त्यामुळे फ्रान्समध्ये पहिल्यापासूनच ती अगदी सराईतासारखी वावरायला लागली होती. स्थानिक लोकांच्या मदतीने दळणवळणाचे मार्ग, लष्करी विमानतळांचे नकाशे, नाझी सैनिकी तुकड्यांच्या हालचाली याची माहिती गोळा करून लंडनला पाठविणे, त्याचबरोबर दोस्त राष्ट्रांच्या पॅराट्रूपर्सनी आकाशातून टाकलेली रसद रातोरात जाऊन गोळा करायची, गुप्तपणे साठवायची आणि मग आपल्या लोकांना पुरवायची हे कामही ती मोठ्या जोमाने करत होती.

फ्रान्स-जर्मनीच्या आधिपत्याखाली आल्यापासून नाझींच्या दबावामुळे कित्येक हजार फ्रेंच सैनिक आणि नागरिक जिवाच्या भीतीने जर्मन सैन्यात भरती झाले होते. या लोकांना आपल्याकडे वळवून स्वातंत्र्यसेनेत भरती करवून घेणे हे क्रिस्टीनच्या पुढ्यातले मोठे आव्हान होते.
पुढच्या काही महिन्यांत क्रिस्टीनने फ्रान्सचा दक्षिण पूर्व भाग अक्षरश: पिंजून काढला. गेस्टापोंच्या डोळ्यात धूळ झोकत डोंगरदर्‍यांमधून पायपीट करत ती ठिकठिकाणच्या सैन्याच्या युनिट्सना गुप्तपणे भेटत राहिली.
क्रिस्टीनच्या अथक परिश्रमांना यश आले आणि असंख्य सैनिक आपल्या बंदुकी, गोळ्या, हँड ग्रेनेड्ससमवेत क्रांतिकारक सेनेमध्ये येऊन दाखल झाले.

सहा जून १९४४ या दिवशी दोस्त राष्ट्रांचे सुमारे दोन लाख सैन्य नॉर्मंडीच्या किनार्‍यावर येऊन पोहोचले आणि स्वातंत्र्याची निर्णायक लढाई सुरू झाली. अलाइड फोर्सेसला जबरदस्त साथ दिली ती या क्रांतिकारक सेनेने - रेझिस्टन्स ग्रूप्सनी.

सहा कोटी लोकांचा मृत्यू, उदध्वस्त झालेली शहरे, खचलेले मनोबल आणि भविष्याची भेडसावणारी काळजी जगाच्या डोक्यावर टाकून १९४५मध्ये दुसरे महायुद्ध एकदाचे संपले….

ब्रिटिश सरकारने क्रिस्टीनच्या अतुलनीय कामासाठी तिला जॉर्ज मेडल देऊन तिचा गौरव केला, तसेच फ्रेंच सरकारने Croix de Guerre हा पुरस्कार देऊन तिचा सन्मान केला.

.
(गूगल इमेजेसवरून साभार)

अत्यंत आकर्षक व्यक्तिमत्त्व, भाषांवर प्रभुत्व, प्रचंड साहसी स्वभाव, पारतंत्र्याचा मनस्वी तिटकारा, उत्तम संभाषण कौशल्य आणि आपल्या कामाविषयी नितांत श्रद्धा अशी ही क्रिस्टीना स्कारबेक उर्फ क्रिस्टीन ग्रॅनविल.

पोलंडमध्ये एका प्रतिष्ठित घराण्यात जन्म ते ब्रिटिश सिक्रेट इंटेलिजन्स सर्व्हिसची अत्यंत हुशार एजंट असा आयुष्याचा प्रवास. युरोप, आफ्रिका, मध्यपूर्वेच्या देशांमधले तिने केलेले काम, महत्त्वाच्या आणि अतिधोकादायक प्रसंगांमधून दिसणारा तिचा आत्मविश्वास, भुरळ पडणारे सौंदर्य आणि तिची असंख्य प्रेमप्रकरणेसुद्धा …

'फॅक्ट इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन' - सत्य हे कल्पिताहून अद्भुत असते कधीकधी. क्रिस्टीनची जीवनगाथा ही अशीच आहे. अक्षरश: दंतकथा वाटाव्यात अशा तिच्या कहाण्या.
कालांतराने क्रिस्टीनची कथा एक दंतकथा बनेलही कदाचित.. कोणी सांगावे? तसे झालेच, मात्र तर ती कथा असेल एका वेड्या देशप्रेमाची, दुर्दम्य आशावादाची, अचाट साहसाची... ती गोष्ट असेल एका वादळाची!!

एक होती क्रिस्टीना.......गोष्ट क्रिस्टीना स्कारबेक ग्रॅनविलची!!!!!.
……………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………..
(संदर्भ - The spy who loved - by Clare Mulley हे पुस्तक आणि Polish war hero Krystyna Skarbek Christine Granville हा यू ट्यूबवरील माहितीपट)
.

महिला दिन विशेषांक २०१७

प्रतिक्रिया

पिशी अबोली's picture

8 Mar 2017 - 3:32 pm | पिशी अबोली

जबरदस्त!

कपिलमुनी's picture

8 Mar 2017 - 3:42 pm | कपिलमुनी

एवढ्या भारी सत्यकथेवर अजून चित्रपट बनला नाही हेच आश्चर्य !

उल्का's picture

8 Mar 2017 - 4:09 pm | उल्का

कथेची निवड आणि लेखन दोन्ही छान!

प्रीत-मोहर's picture

9 Mar 2017 - 10:49 am | प्रीत-मोहर

__/\__
जब्बरदस्त . गोष्ट सांगायची तुझी शैलीही आवडलीच :)

अजया's picture

9 Mar 2017 - 11:07 am | अजया

क्लास!

देशप्रेमी शुर क्रिस्टिनाची गोष्ट आवडली.

पुष्करिणी's picture

9 Mar 2017 - 11:18 pm | पुष्करिणी

मस्त लेख, आवडला

स्नेहानिकेत's picture

10 Mar 2017 - 12:34 am | स्नेहानिकेत

मस्त!!!!

सविता००१'s picture

10 Mar 2017 - 3:08 am | सविता००१

सुरेख

पैसा's picture

10 Mar 2017 - 9:02 am | पैसा

हिच्याबद्दल अजून वाचायला पाहिजे!

गिरिजा देशपांडे's picture

10 Mar 2017 - 1:00 pm | गिरिजा देशपांडे

छान लेख, आवडला.

मनिमौ's picture

10 Mar 2017 - 1:35 pm | मनिमौ

मिळवून वाचते नक्की

किती धाडसी बाला , हुरुप येतो अस काही वाचल की :)

पूर्वाविवेक's picture

10 Mar 2017 - 4:47 pm | पूर्वाविवेक

तुझे लेख नेहमी गोष्टीसारखे असतात. हा लेख पण प्रचंड आवडलाय हे सांगायलाच नको.

विभावरी's picture

10 Mar 2017 - 5:17 pm | विभावरी

कमाल आहे क्रिस्टीनाची !!

नूतन सावंत's picture

10 Mar 2017 - 5:18 pm | नूतन सावंत

पद्मावति ,सुरेख लेख.अगदी गोष्ट सांगितल्यासारखा.मी माझ्या अकरा वर्षांच्या भाचीला तो वाचून दाखवला.तिलाही प्रचंड आवडला,इतका,की, ती म्हणाली,"मीपण माझ्या देशासाठी स्पाय बनणार."म्हटलं,"ती बुडापेस्टला कशी पोचली, त्या मायक्रोफिल्म्स् कशा पोचवते होती ,ते पाहिलंस न?तुला तर खाली उतरलं , की,गाडी नसली तर टॅक्सी लागते. तुझी शाळा तर चालत जाण्याच्या अंतरावर आहे पण बाबा तेव्हाही टू व्हीलरने नेतो".
त्यवर तिने मी आता शाळेत आणि जवळपास चालत जाणार असे कबूल केले आहे.हे तुझ्या लेखाचे निर्विवाद यश आहे.

मितान's picture

10 Mar 2017 - 5:19 pm | मितान

खरोखर अद्भुत !!!!!

मंजूताई's picture

10 Mar 2017 - 5:40 pm | मंजूताई

कथा आवडली क्रिस्तीनाची

जव्हेरगंज's picture

11 Mar 2017 - 11:20 pm | जव्हेरगंज

चांगला लेख!!

बापरे! थरारक आयुष्य जगलीये क्रिस्टीना.

शामसुता's picture

18 Mar 2017 - 3:10 pm | शामसुता

"फॅक्ट इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन' - सत्य हे कल्पिताहून अद्भुत असते कधीकधी. क्रिस्टीनची जीवनगाथा ही अशीच आहे. "
पद्मा, क्रिस्टीनाचा जीवनपट अतिशय चांगल्या पध्दतीने मांडला आहेस.

चिनार's picture

18 Mar 2017 - 3:34 pm | चिनार

जबरदस्त, अद्भुत !!!!
तुमच्या लेखनशैलीमुळे आणखीनच मजा आली वाचताना...!!

सपे-पुणे-३०'s picture

19 Mar 2017 - 3:24 pm | सपे-पुणे-३०

कथा आवडली. क्रिस्टिना बद्दल अधिक माहिती वाचायला नक्की आवडेल.

कवितानागेश's picture

19 Mar 2017 - 9:58 pm | कवितानागेश

जबरदस्त!

स्वाती दिनेश's picture

19 Mar 2017 - 10:09 pm | स्वाती दिनेश

क्रिस्टिना आवडली,
स्वाती

पद्मावति's picture

20 Mar 2017 - 3:12 pm | पद्मावति

सर्व प्रतिसादकांचे अगदी मनापासून आभार.

एवढ्या भारी सत्यकथेवर अजून चित्रपट बनला नाही हेच आश्चर्य ! माझ्याही मनात हाच प्रश्न आला होता. पण म्हणतात की इयान फ्लेमिंग क्रिस्टीनाच्या प्रेमात पडला होता ( अर्थात हे एक स्पेक्यूलेशनच)
अशी मान्यता आहे कि त्याच्या कॅसिनो रॉयल मधील Vesper Lynd चे कॅरेक्टर क्रिस्तीन वरूनच घेतले होते.

सुचेता's picture

20 Mar 2017 - 3:21 pm | सुचेता

आवडली,

रुपी's picture

11 Apr 2017 - 3:39 am | रुपी

जबरदस्त! छान लेखन.
हे पुस्तक मिळवून वाचणार लवकरच!