मराठी भाषा दिन २०१७: भाषा आणि बोली

अमोल४५७२'s picture
अमोल४५७२ in लेखमाला
21 Feb 2017 - 6:24 am

1

पूर्वी आदिमानव अप्रगत होता, त्या काळात हातवारे, खुणा करून त्याचं मनोगत व्यक्त करत असे. नंतरच्या काळात तो जसजसा प्रगत होत गेला, शेती करू लागला, गटागटाने राहू लागला, तसतसा हातवारे व खाणाखुणा यापेक्षाही जास्त तोंडाने विविध आवाज काढून व्यक्त होऊ लागला. समान आवाज व चेहऱ्यावरील हावभाव यातूनच पुढे भाषेचा उगम होत गेला.

भाषा ही परस्पर संवादाचं, अभिव्यक्तीचं माध्यम आहे. 'जी बोलली जाते ती भाषा' अन् खरं तर हीच भाषेची मूळ व्याख्या आहे. भाषा ही भूगोल-, समाज-, कालसापेक्ष असते.

मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा आणि राजभाषा भाषा आहे. महाराष्ट्रातील समस्त मराठी जनतेची संपर्क भाषा, व्यवहार भाषा व ज्ञानभाषा मराठीच आहे. मराठी भाषा संपन्न आहे. मराठीची शब्दसंपत्ती समृद्ध आहे. सूक्ष्मातिसूक्ष्म आशय व्यक्त करण्याची ताकद या भाषेत आहे.

स्थलकालमानपरत्वे प्रामुख्याने बोलीभाषा, उपभाषा, प्रमाणभाषा, शुद्ध भाषा, मिश्र भाषा, प्राचीन भाषा, आधुनिक भाषा, ज्ञान भाषा इत्यादी हे ढोबळमानाने मराठी भाषेचे प्रकार मानता येतील.

दर दहा मैलांवर भाषा बदलते, असं म्हणतात. भाषेतील हा बदल अतिशय सूक्ष्म असल्याने चटकन लक्षात येत नाही.

जगभरातले समाज-संस्कृतीचे अभ्यासक म्हणतात की, ‘बोली टिकल्या तर भाषा टिकतील. भाषा टिकल्या तर संस्कृती टिकेल आणि संस्कृती टिकली तर समाज आणि त्याची वैशिष्ट्यपूर्ण मूल्यव्यवस्था टिकून राहील.'

बोलीभाषा म्हणजे काय? तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या मुलखांतून बोलली जाणारी स्थानिक भाषा. उदा. कोकणी, अहिराणी-खान्देशी, वऱ्हाडी, वैदर्भीय, कोल्हापूर-साताराकडची बोली. या बोलींमधून, पिढ्यान् पिढ्यांपासून प्रचलित असलेली अशी कितीतरी लोकगीतं, वाक्प्रचार, म्हणी त्या त्या मुलखातल्या बोलींचं वेगळेपण तर दाखवतातच; त्याशिवाय त्यातून व्यक्त होणारी भूमिनिष्ठ लोकसंस्कृती, परंपरा, कुळाचार आणि चालीरीतींची वैशिष्ट्यंसुद्धा तितक्याच समर्थपणे व्यक्त करतात.

इतकंच नव्हे, तर महाराष्ट्रातील जीवनयापनाचं पारंपरिक साधन म्हणजे शेेती; मग शेतीबद्दलची गाणी, स्त्रीगीतं, जात्यावरच्या ओव्या, गाऱ्हाणी, उत्सव व दशावतारी पात्राचे संवाद वा तमाशातली मावशी, किस्ना आणि गौळणींचे संवाद, वग यातून तिथल्या संस्कृतीचं मूर्तिमंत दर्शन होत राहतं.

बोलीभाषा या आजच्या काळातील नव्हे, तर शेकडो वर्षांच्या प्रवासातून व रोजच्या व्यवहारातून विकसित झालेल्या आहेत. त्यामुळे बोलीभाषा या तिथल्या समाजाची आणि प्रदेशाची अभिव्यक्ती असते.

प्रमाणभाषेलाही कालमानपरत्वे नवनवीन शब्दांची आवश्यकता असते, ती गरज या बोलीभाषांमधील शब्दांमधून सहज भागवली जाते; नव्हे, या विविध बोलीभाषा म्हणजे प्रमाणभाषेसाठी शब्दांच्या खाणीच आहेत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. बोलीतले अनेक शब्द काळाच्या ओघात प्रमाणभाषेनेही स्वीकारलेले दिसून येतात. काही वेळा बोलीतले शब्द प्राचीन अभंगांतून, पौराणिक साहित्यातूनही आढळून येतात.

बोलीभाषेतील शब्द हे इतर भाषांमधून घेतलेले नसतात, तर ते शेकडो वर्षांच्या वापरातून विकसित झालेले मूळ शब्द असतात.

विशिष्ट बोलींमधून विशिष्ट परिसर, संस्कृती आणि त्याच्याशी निगडित असलेली तिथल्या माणसांची मानसिकता समोर येत असते. बोलीतील बारकावे समजून घ्यायचे, तर जातिनिहाय नि भौगोलिक अंतरागणिक त्यात पडत गेलेले फरक, नजीकच्या सीमेपलीकडील भाषेचा प्रभाव इत्यादी घटकही समजून घ्यावे लागतील. उदा. राजस्थानी भाषेशी साम्य असलेली 'गोरमाटी' ही बंजारा समाजाची बोलीभाषा. त्यातील बरेचसे शब्द मराठीत रुळले आहेत. अहिर राजाच्या काळातली 'अहिराणी' वा कान्हदेशचा अपभ्रंश होऊन खान्देशची बोली म्हणजेच 'अहिराणी'.

स्थानिक लोकसंस्कृती आणि जीवन व्यवहार यांचं यथामूल वर्णन करणारे आणि अनेकदा त्या, त्या भूभागातील लोकांच्या मानसिकतेशी आणि स्वभाववैशिष्टय़ांशी चपखलपणे जोडले गेलेले बोलीतले शब्द, वाक्प्रचार वा म्हणी यांचा वापर अनेक प्रादेशिक व ग्रामीण लेखकांच्या लेखनातून मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो.

बोलीभाषांमधील म्हणी म्हणजे लोकपरंपरेने स्वीकारलेली त्या त्या समाजातील नीती-अनीती, रूढी-परंपरा, मानवी स्वभाव, उपदेश, उपहास, विनोद इ.चं सुटसुटीत पद्धतीने केलेली दृष्टान्तस्वरूप विधानं होय. मोजक्या शब्दांत मोठा आशय व्यक्त करणाऱ्या म्हणी म्हणजे भाषेतील अत्यंत अमूल्य असा खजिनाच. म्हणी हा बोलीभाषेतील प्रकार प्रमाणभाषेने बेमालूमपणे सामावून घेतलाय.

बोलीभाषेतून व्यक्त होणारी माणसांच्या स्वभावाची अशी कैक वैशिष्टय़ं - शिव्या, बेधडकपणा, इरसालपणा, बेरकीपणा, इ. - वेगवेगळ्या बोलीभाषांमध्येही पाहायला मिळतो. प्रमाणभाषेत लैंगिक स्वरूपाच्या शिव्या अथवा वर्णन करायला माणूस तसा जरा बिचकतोच; पण ग्रामीण भागातल्या बाप्ये तर सोडाच, बायकाही लैंगिकतेशी संबंधित शिव्या बिनदिक्कत देऊन प्रतिपक्षाचा उद्धार करतात. त्यात त्यांना स्वत:ला वा इतरांनाही काही वावगं वाटत नाही.

मालवण, कोल्हापूर, मराठवाडा या भागातील लेखकांनी त्या त्या भागातील लोकजीवन चितारण्यासाठी प्रादेशिक बोलींचा प्रभावी वापर केला आहे. बहिणाबाईंच्या अहिराणी बोलीतल्या कवितांमुळे बोलीच्या सौंदर्याची आणि सामर्थ्यांची प्रचिती सर्वांनाच येते, असं म्हणणं योग्यच ठरेल. बहिणाबाई चौधरी, सोपानदेव चौधरी, बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे, ना.धों. महानोर हे थोर साहित्यिक व कवी अहिराणीनेच दिले आहेत.

जागतिकीकरणाच्या या काळात इंग्लिशसारखी भाषा नव्या जगाची मध्यवर्ती भाषा म्हणून पुढे येत असताना देशोदेशीच्या स्थानिक भाषा झपाट्याने नष्ट होऊ लागल्या आहेत. भारतापुरताच विचार केला, तरी आपल्या जवळपास २०हून अधिक बोलीभाषा नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचं डॉ. गणेश देवींसारख्या भाषा-अभ्यासकाने अलीकडेच दाखवून दिलं आहे.

बोलीभाषा या प्रमाणभाषेच्या जीवन वाहिन्या मानल्या, तर बोलीभाषांचा स्रोत आटला तर प्रमाणभाषाही नष्ट व्हायला वेळ लागणार नाही.

प्रत्यक्ष व्यवहारात स्थानिक बोलीभाषांचा वापर व्हायला हवा. जर सर्वांनी प्रमाणभाषेचा आग्रह-दुराग्रह धरला, तर लोक बोलीभाषाच काय, प्रमाणभाषेचाही वापर सोडून इतर भाषांकडे वळण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सध्या आजचा तरुण वर्ग याच तऱ्हेने हिंदी, इंग्लिश भाषेकडे वळला असल्याचं जाणवतं. आजच्या मराठी भाषेच्या स्वरूपासंबंधी विचार करताना प्रामुख्याने जाणवतं ते तिचं झपाट्याने बदलत चाललेलं रूप. मराठी माणसं - विशेषत: मराठी तरुण पिढी ज्या प्रकारचं मराठी बोलतात किंवा लिहितात, ते इतकं प्रदूषित असतं, हिंदी-इंग्लिशमिश्रित-म्हिंग्लिश असतं, की भविष्यात मराठी भाषेचं काय होईल अशी चिंता वाटते.

ज्या प्रदेशात बोलीभाषांना महत्त्व दिलं गेलं नाही, तिथल्या बोलीभाषा बोलणारे स्थानिक कालांतराने हिंदी भाषा बोलू लागले. महाराष्ट्राच्या उपराजधानीचा दर्जा असलेलं महाराष्ट्रातलंच नागपूर शहर व त्या जवळपासचा प्रदेश हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. तसंच महाराष्ट्राच्या इतर सीमाभागातील काही शहरांबद्दलही म्हणता येईल.

त्या दृष्टीकोनातून काही मुद्दे मला सुचवावेसे वाटतात.

१) प्रमाणभाषा ही शासकीय स्तरावर, सरकारी कामकाजात वापरली गेली पाहिजे.
२) प्रसारमाध्यमं - मग ती दृकश्राव्य माध्यमं असोत कि आकाशवाणी असो की वृत्तपत्र असो, सर्वांनी कार्यक्रमांमध्ये वा बातम्यांमध्ये प्रमाणभाषेचा वापर करायला हवा.
३) शिक्षण क्षेत्रातही, विद्यार्थ्यांना प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण प्रमाणभाषेत द्यायला हवं.
४) स्थानिक साहित्यिक, लेखक, कवी यांवी त्या त्या बोलीभाषेत साहित्य निर्माण करावं आणि प्रकाशकांनीही बोलीभाषेतील साहित्य राष्ट्रीय कर्तव्य म्हणून प्रकाशित करण्यास लेखकांना प्रोत्साहन द्यावं. मालवणी बोली बोलणारा पुलंचा अंतू बर्वा हे त्याचं उत्तम उदाहरण आहे.
५) तसंच बोलीभाषेतील कलावंतानीही दृकश्राव्य माध्यमांद्वारे बोलीभाषा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावी. श्री. भारत गणेशपुरे यांनी वऱ्हाडी बोलीभाषेत सादर केलेले कार्यक्रम लोकप्रिय झाले आहेत, तर मच्छींद्र कांबळी यांच्या मालवणी भाषेतील 'वस्त्रहरण' नाटकाने नि देशपांड्यांच्या 'वऱ्हाड निघालंय लंडनला' या एकपात्री नाटकाने तर सर्वच विक्रम मोडलेत.

मराठी भाषेचा अभिमान बाळगणाऱ्यांनी, तिच्यावर नितांत प्रेम करणाऱ्यांनी तिच्या रक्षणाचा आणि तिचं पावित्र्य राखण्याचा कसोशीने प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी बोलीभाषा जिवंत ठेवण्याचा, विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच आपल्या मातृभाषेचं सौंदर्य व सौष्ठंव तिला पुन्हा प्राप्त होईल आणि मराठी भाषा म्हणजे 'अमृतातेही पैजा जिंकणारी' ठरेल.

अमोल सुधाकर शिंपी.

1

प्रतिक्रिया

पैसा's picture

21 Feb 2017 - 8:03 am | पैसा

मुद्देसूद लेख आवडला.

प्रत्यक्ष व्यवहारात स्थानिक बोलीभाषांचा वापर व्हायला हवा. जर सर्वांनी प्रमाणभाषेचा आग्रह-दुराग्रह धरला, तर लोक बोलीभाषाच काय, प्रमाणभाषेचाही वापर सोडून इतर भाषांकडे वळण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

मराठी माणसं - विशेषत: मराठी तरुण पिढी ज्या प्रकारचं मराठी बोलतात किंवा लिहितात, ते इतकं प्रदूषित असतं, हिंदी-इंग्लिशमिश्रित-म्हिंग्लिश असतं, की भविष्यात मराठी भाषेचं काय होईल अशी चिंता वाटते.

ज्या प्रदेशात बोलीभाषांना महत्त्व दिलं गेलं नाही, तिथल्या बोलीभाषा बोलणारे स्थानिक कालांतराने हिंदी भाषा बोलू लागले. महाराष्ट्राच्या उपराजधानीचा दर्जा असलेलं महाराष्ट्रातलंच नागपूर शहर व त्या जवळपासचा प्रदेश हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. तसंच महाराष्ट्राच्या इतर सीमाभागातील काही शहरांबद्दलही म्हणता येईल.

हे सर्वच पटलं नाही. मराठीला भविष्य नक्कीच आहे. थोडी लवचिकता हवीच.
नागपूरला हिंदी भाषा चालण्यामागे इतरही काही ऐतिहासिक कारणे असावीत. तिथले लोक अधिक चांगले सांगू शकतील.

मराठी भाषा दिनानिमित्त एका उत्तम लेखासाठी धन्यवाद! मिपावर अजून जरूर लिहा.

संस्कृत - प्राकृतचे नाते होते तसे आता मराठी आणि मराठीच्या बोलीभाषा असे असावे असे लेखकाला सुचवावयाचे आहे का ?

माहितगार's picture

21 Feb 2017 - 11:14 am | माहितगार

संस्कृत - प्राकृतचे नाते होते तसे आता प्रमाण-मराठी आणि मराठीच्या बोलीभाषा असे असावे असे लेखकाला सुचवावयाचे आहे का ?

पैसा's picture

21 Feb 2017 - 8:05 pm | पैसा

समजा असले तरी आता संस्कृत आणि प्राकृत दोन्ही रोजच्या वापरातून बाहेर गेल्या आहेत. मग जागतिकीकरण नावाच्या झपाट्यात मराठीसारख्या प्रादेशिक भाषा आणि तिच्या बोली यांचे भविष्य काय असेल?

एक अवांतरः आज जागतिक मातृभाषा दिवस आहे. इतर प्रादेशिक भाषांमधे याबद्दल (म्हणजे इंग्रजीमुळे प्रादेशिक भाषांचा र्‍हास) असे काही लिखाण झालेले सापडते का?

खानदेशचं कान्हदेश बर्‍याचदा प्रक्षिप्त वाटतं. खरं खोटं देव जाणे.

सुचिकांत's picture

21 Feb 2017 - 10:10 pm | सुचिकांत

छान लिहिला आहे लेख.

पीशिम्पी's picture

22 Feb 2017 - 1:11 am | पीशिम्पी

एकदम झक्कास !!

संदिप एस's picture

23 Feb 2017 - 11:24 am | संदिप एस

लेखातले सगळेच मुद्दे आवडले! असेच लिहीत रहा!!

फिझा's picture

27 Feb 2017 - 12:06 pm | फिझा

लेख आवडला !!