शेजाऱ्याचा डामाडुमा - भारताचे सख्खे शेजारी-एक होते हिंदू राष्ट्र - भारत आणि'सख्खा' शेजारी नेपाळ-१

अनिंद्य's picture
अनिंद्य in जनातलं, मनातलं
1 Jan 2017 - 2:44 pm

===========================================================================

शेजाऱ्याचा डामाडुमा - भारताचे सख्खे शेजारी : प्रस्तावना... नेपाळ-०१... नेपाळ-०२... नेपाळ-०३... नेपाळ-०४...
नेपाळ-०५... नेपाळ-०६...

===========================================================================

एक होते हिंदुराष्ट्र - भारत आणि 'सख्खा' शेजारी नेपाळ - १

भारत आणि नेपाळ सख्खे शेजारी आणि सांस्कृतिकदृष्ट्या सुद्धा एकमेकांशी घट्ट बांधल्या गेलेले देश. संबंध मात्र कायम 'कभी प्यार कभी तकरार' धर्तीचे. हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या नेपाळची ‘जगातील एकमेव हिंदू राष्ट्र’ अशी ओळख अगदी मागच्या दशकापर्यंत होती. नेपाळला जग कायम 'हिमालयीन हिंदू किंगडम' असेच संबोधत आले आहे. त्याचे कारण हिमालयाचा प्रदेश, तेथे दीर्घकाळ असलेली राजेशाही आणि ९१% हिंदू लोकसंख्या.

‘राजा श्रीविष्णूचा अवतार आणि प्रजेचा पालनकर्ता' ह्या सनातन हिंदू संकल्पनेवर आधारलेली नेपाळी राजेशाही अनेकानेक वर्षे टिकून राहिली. नेपाळच्या राजाला सामान्य जनतेच्या मनात मोठ्या आदराचे स्थान होते - अगदी देवतुल्य विभूती जणू. हे राजावर असलेले जनतेचे प्रेम खरे होते कि खोटे हा प्रश्न पडावा अशी आजची स्थिती आहे. गृहयुद्धाचे, रक्तपाताचे दिवस आले-गेले, सर्वात अलोकप्रिय राजे ठरून शेवटचे नेपाळ नरेश ज्ञानेंद्र पायउतार झाले, नेपाळमध्ये राजेशाही उलथवून लोकशाहीचे प्रयोग सुरु झाले, नेपाळची 'जगातील एकमेव हिंदू राष्ट्र' ही ओळख मागे पडून नेपाळ 'धर्मनिरपेक्ष' राष्ट्र म्हणून उदयाला आले, ह्या सगळ्यालाही आता एक तप होत आले.

अर्थात अगदी दहा-बारा वर्षांपूर्वीपर्यंत नेपाळ स्वतःला जरी हिंदू राष्ट्र म्हणवत असले तरी ते एकसंध एकजिनसी राष्ट्र कधीच नव्हते. साठ वेगवेगळ्या भाषा बोलणारी दोनशेच्या वर वेगवेगळ्या जातीसमाजाची लोकं, शेजारच्या तिबेट आणि भूतान मधून मोठ्या प्रमाणात आलेले शरणार्थी आणि तराई भागात शतकानुशतकं वसलेले भारतीय वंशाचे मधेसी लोक असा नेपाळी समाजाचा बहुमुखी चेहरा आहे. समाजात फूट पाडणारा जातीयवाद आणि प्रचंड गरिबी आहेच. त्यात प्रतिकूल हवामान, भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्ती, वाढता फुटीरतावाद, भ्रष्टाचाराने बरबटलेली सरकारी यंत्रणा आणि गटातटाचे राजकारण करण्यात मश्गुल राजकारणी असे आजच्या नेपाळचे वर्णन अनेक नेपाळी विचारवंत करतात आणि ते बव्हंशी खरेही आहे.

ह्या पार्श्वभूमीवर नेपाळ नरेश सर्वसामान्य नेपाळी जनतेच्या ऐक्याचे आणि नेपाळी अस्मितेचे (कदाचित शेवटचेच) प्रतिक होते. राजेशाही अस्तित्वात असेपर्यंत भारताचे नेपाळशी अनेकांगी संबंध होते, म्हणजे जे सरकार किंवा देशपातळीवर असतात त्यापेक्षा 'पीपल टू पीपल' ज्याला म्हणतात ते. म्हणजे तसे अजूनही आहेत, पण संबंधातली ऊर्जा आणि उष्मा उतरणीला आहे हे सहज जाणवते.

नेपाळ हा सर्वबाजुनी जमिनीने वेढलेला देश. प्रचंड विस्तार असलेल्या चीन आणि भारत ह्या दोन शेजारी देशांच्या सावलीत काहीसा झाकोळलेला. सर्वात जवळ असलेले समुद्री बंदर म्हणजे भारतातले कोलकाता, ते ही साधारण १००० किलोमीटर दूर. त्यामुळे जवळपास सर्व महत्वाच्या आयातीसाठी नेपाळला भारतावर अवलंबून राहावे लागते. पेट्रोल-डीझेल असो की अन्नधान्य, कपडे असोत की औषधे, नेपाळला भारताशिवाय पर्याय नाही आणि जर असला तर खूप महाग.

चीन हासुद्धा नेपाळचा शेजारीच आहे. नेपाळला 'मदत' करायला कायम उत्सुक असलेला शेजारी. जगभर सर्वत्र बाजारपेठा चिनी मालाने खच्चून भरलेल्या दिसत असल्या तरी समुद्रमार्गे (तेच स्वस्त पडत असल्यामुळे) नेपाळला काही माल पाठवायचा झाल्यास चीनला भारतातील कोलकाता किंवा बांगलादेशातील ढाका बंदर गाठावे लागते. पुढील वाहतूक रस्त्याने. त्यामुळे कुठलाही चीनी माल शेजारच्या नेपाळला पोचवायला त्यांना लागणारा कमीतकमी वेळ म्हणजे ४५ दिवस.

ह्याचा अर्थ चीन नेपाळला खुष्कीच्या मार्गाने काही पाठवतच नाही असे नाही. मदतीला उत्सुक शेजारी असल्यामुळे कधी कधी चीन बरेच कष्ट करून नेपाळच्या मदतीला धावून जातो. सरलेल्या वर्षी म्हणजे २०१६ च्या एप्रिल-मे महिन्यात भारत-नेपाळ संबंध खूपच ताणले गेले होते. तराईतील 'मधेसी' (मूलतः भारतीय वंशाच्या) जनतेच्या संपामुळे भारताचे मालवाहू ट्रक नेपाळ सीमेवर अडकून पडले असताना काठमांडू आणि अन्य शहरामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला. नेपाळला ‘ताबडतोब’ मदत करण्यासाठी चीन सरकारने त्यांच्या गान्सू प्रांतातल्या लाँझाऊ शहरातून एक अगदी १२९ वाघिणी असलेली 'सुपर फास्ट' मालगाडी काठमांडूकडे रवाना केली. तर हा सर्वात जवळचा मार्ग होता फक्त ३१५५ किमी. तोही विचित्र - प्रथम २४३१ किमी रेल्वेनी तिबेटमधल्या झिगेज पर्यंत, मग तेथे सर्व माल वाघिणीतून ट्रक्समध्ये टाकून रस्त्यानी ५६४ किमी प्रवास करून नेपाळ सीमेवर असलेल्या गिरोंग चौकी पर्यन्त आणि तेथून नेपाळी प्रदेशातून १६० किमी रस्त्याचा प्रवास करून काठमांडू शहरात! म्हणजे ११ मे च्या दुपारी निघालेली तातडीची मदत पोचली ती २२ मे ला रात्री.... तर अश्या 'ताबडतोब' केलेल्या मदतीची तुलना भारतातून सहज होऊ शकणाऱ्या आणि पूर्वापार होत असलेल्या मदत आणि व्यापाराशी होऊ शकत नाही.

१५ जागी व्यापार चौक्या असलेली खुली नेपाळ- भारत सीमा आणि त्यामुळे सर्व जीवनावश्यक वस्तूंची सहज सोपी आयात, एकमेकांच्या देशात व्हिसाशिवाय मुक्त प्रवेश आणि वास्तव्याची मुभा, व्यापार आणि नोकरीधंदा करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य, एकमेकांच्या मुक्त सीमेवरून होणारा व्यापार, उच्चशिक्षण, वैद्यकीय मदत, नोकरी धंदा, सैन्यात भरती अश्या अनेक स्तरांवर नेपाळ आणि भारतीय समाज जोडला गेला आहे.

आपल्याकडे नेपाळबद्दल काही विशिष्ट कल्पना आहेत. अर्थातच भ्रामक आणि चुकीच्या. बहुतेक नेपाळी म्हणजे वॉचमन गुरखे किंवा हॉटेलातील वेटर/सेवक, नेपाळी मुली म्हणजे वारांगना-वेश्या, नेपाळी लोक म्हणजे दोनवेळा खायची भ्रांत असलेले गरीब लोक वगैरे वगैरे. वास्तविक नेपाळचा गरीमामयी इतिहास वेगळेच चित्र दाखवतो. रामायणात म्हणल्याप्रमाणे नेपाळ ही जनक कन्या सीतेची भूमी. नेपाळातील लुम्बिनी हे शाक्यमुनी गौतम बुद्धाचे जन्मस्थान. बुध्दधर्माच्या उत्कर्षाची आणि चीन-तिबेट-सिक्कीम सर्वदूर गौतम बुद्धाचा संदेश पोहचवण्याचा वारसा असलेली भूमी. मौर्य सम्राट अशोकाने बांधलेल्या स्वयंभूनाथ स्तूपाची, थेट वेदात उल्लेखलेल्या नगाधिराज हिमालयाचे सर्वोच्च शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टची भूमी. एकाचवेळी भारतीय, ब्रिटिश आणि नेपाळी अश्या तिन्ही देशांच्या सैन्यात पराक्रम गाजवणाऱ्या असामान्य शूर गोरखा सैनिकांची भूमी!

तर असा हा आपला शेजारी देश. आरश्याला दोन बाजू असाव्यात तसा - एक लखलखती उज्वल बाजू आणि दुसरी थोडी काळवंडलेली बाजू असलेला - काहीसा आपल्या भारतासारखाच !

थोडे अवांतर:

नेपाळ-भारत घनिष्टतेला जुन्या काळात एक आणखी कारण होते - नेपाळी राजघराणे आणि त्यांचे सरदार आणि उमराव यांचे भारतातल्या तालेवार राजपूत घराण्यांत सोयरिक करण्याचे धोरण. अश्या नातेसंबंधांची यादी अगदी प्रचंड आहे. भारत आणि नेपाळ राजकुलात लग्नसंबंध हे अतिप्राचीन आहेत. गुप्त सम्राट चंद्रगुप्त प्रथम आणि नेपाळी लिच्छवी राज्याची राजकन्या कुमारदेवी ह्यांचे लग्न हे अगदी तत्कालीन चलनी नाण्यांवर कोरल्या जाण्याइतपत महत्वाची घटना होती. नजीकच्या इतिहासात खरी सुरवात झाली नेपाळ नरेश राजा त्रिभुवन यांच्या तेरा औरस राजकन्यांपैकी नलिनी आणि भारती या दोन राजकन्यांच्या भारतीय राजघराण्यात झालेल्या लग्न संबंधांनी. नंतर नेपाळी पंतप्रधान शरद शमशेर जंगबहादूर राणांची कन्या यशोराज्यलक्ष्मी हिचे काश्मीरचे राजे महाराजा करण सिंग यांचेशी झालेले शुभमंगल. मग ग्वाल्हेरचे सिंधिया (शिंदे) सरकार आपल्या प्रिय कन्येचे (उषाराजे) लग्न नेपाळच्या प्रसिद्ध राणा वंशांत करते झाले. बडोद्याचे महाराजकुमार संग्रामसिंग गायकवाड ह्यांच्या पत्नी नेपाळी राणा तर ग्वाल्हेरचे महाराजा माधवराव सिंधिया यांच्या आई राजमाता विजयाराजे सिंधिया आणि पत्नी माधवीराजे दोन्ही नेपाळी राणावंशीय राजकन्या. शेवटचे नेपाळ नरेश ज्ञानेंद्र ह्यांच्या सुनबाई हिमानी ह्या राजस्थानातील सीकर संस्थानाच्या राजकन्या... एक ना अनेक असे लग्नसंबंध भारतातील तत्कालीन शक्तिशाली राजघराण्यात झाल्यामुळे नेपाळी सरदार आणि उमरावांमध्ये भारताबद्दल एक वेगळीच आपुलकीची भावना दिसून येते, किंवा दिसून यायची असे म्हणू या.

क्रमशः

===========================================================================

शेजाऱ्याचा डामाडुमा - भारताचे सख्खे शेजारी : प्रस्तावना... नेपाळ-०१... नेपाळ-०२... नेपाळ-०३... नेपाळ-०४...
नेपाळ-०५... नेपाळ-०६...

===========================================================================

हे ठिकाणलेख

प्रतिक्रिया

अमितदादा's picture

1 Jan 2017 - 3:12 pm | अमितदादा

छान लेख..नेपाळ आणि भारतच्या संबंधातील एक महत्वाचा दुवा म्हणून indo-nepal treaty १९५० कडे पाहाता येयील. या कराराने भारत-नेपाळ संबंधाना वेगळे आयाम दिले. लोक आणि व्यापार याची मुक्त देवाणघेवाण याचीच परिणीती. भारतीय लष्कराची गुरखा रेगीमेंत साठी नेपाळ मधून होणारी भरती, भारतीय चलनास असलेल विशेष महत्व किंवा काही अंशी अधिकृतता, भारतीय उचायुक्तांच असलेल अवाजवी महत्व किंवा इतर अश्या अनेक गोष्टी भारत-नेपाळ संबंधाच विशेषत्व अधोरेखित करतात. नेपाळ मधली अराजकता संपवून लोकशाही आणण्यामध्ये भारतान मोठ सहकार्य केल आहे, तसेच नेपाळ मधील अनेक प्रोजेक्ट मध्ये भारताने मोठा वाटा उचलेला आहे. त्याचबरोबर भारताच्या नावावर इकॉनॉमिक ब्लोकेड, अंतर्गत ढवळाढवळ असे काही नकारत्मक गोष्टी ची नोंद आहे. सध्या नेपाळ मधील राजकारण चीन च्या बाजूने झुकत चालाल आहे, चीन आणि नेपाळ ला जोडणाऱ्या रेल्वे आणि रोड ची घोषणा असो किंवा नेपाळ-चीन लष्करी सराव असो.
नेपाळ ने भारत किंवा चीन यांच्या हाताचे बाहुले बनून राहण्यापेक्षा, भारत आणि चीन मधील विकासाचा एक पूल (ब्रिज) म्हणून काम करावे, जे सध्या शक्य वाटत नाही.

पुभाप्र.

अनिंद्य's picture

3 Jan 2017 - 1:44 pm | अनिंद्य

@ अमितदादा,

नेपाळ ने भारत किंवा चीन यांच्या हाताचे बाहुले बनून राहण्यापेक्षा, भारत आणि चीन मधील विकासाचा एक पूल (ब्रिज) म्हणून काम करावे, जे सध्या शक्य वाटत नाही.

- काय मजा आहे बघा. तुम्ही दोन देशांमधील पुलाची उपमा दिली आहे आणि बहुतेक नेपाळी मित्र नेपाळला अडकित्त्यात अडकलेल्या सुपारीची उपमा देतात !

साधा मुलगा's picture

1 Jan 2017 - 3:44 pm | साधा मुलगा

सुंदर लेख, वाचतोय!

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Jan 2017 - 5:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर लेख !

अजून जरा विस्ताराने वाचायला आवडले असते. बर्‍याच भारतियांमध्ये, ज्यांत मी सुद्धा येतो, आपल्या शेजार्‍यांबद्दल बरेच अज्ञान आहे.

अनिंद्य's picture

1 Jan 2017 - 8:59 pm | अनिंद्य

@ अमितदादा, साधा मुलगा, डॉ. सुहास म्हात्रे - प्रतिसादांबद्दल आभार !

नेपाळ पेक्षा भूतान त्याचा एकंदरीत धोरणांमुळे जास्त प्रगत वाटतो.

धर्मराजमुटके's picture

2 Jan 2017 - 1:37 pm | धर्मराजमुटके

डामाडुमा म्हणजे काय ?

अनिंद्य's picture

2 Jan 2017 - 5:16 pm | अनिंद्य

@ धर्मराजमुटके

लहानपणी माझ्या मैत्रिणींच्या तोंडून हा शब्द ऐकला पहिल्यांदा. पूर्व महाराष्ट्रात / विदर्भात एक 'भुलाबाई' म्हणून सण/खेळ असतो, मुलींचा. त्यातल्या एका गाण्यात 'शेजाऱ्याचा डामाडुमा वाजतो तसा वाजू द्या - आम्हाला खेळ मांडू द्या' असे एक गाणे आहे - थोडक्यात 'शेजाऱ्याच्या घरातील घटनांकडे दुर्लक्ष करा' असा अर्थ होतो.

ह्या लेखमालिकेला शीर्षक म्हणून समर्पक वाटला, वापरला :-)

पुढचे सगळे भाग इथेच एकाखाली एक असे दिसतील अशी रचना करायची आहे. काय करावे लागेल ?

प्लीज हेल्प!

पिलीयन रायडर's picture

3 Jan 2017 - 7:49 am | पिलीयन रायडर

तुम्हाला एडिटचा पर्याय नाहीये. सदस्यांना तो नसतो. पण साहित्य संपादकांना सांगुन तुम्ही धाग्यात बदल करुन घेऊ शकता. "साहित्य संपादक" ह्या आयडीलाच त्यासाठी व्यनि करायचा.

पण मला असं सुचवावं वाटतंय की नवा धागा असु द्यावा प्रत्येक देशाचा. त्याने चर्चेला बरं पडतं. तुम्ही प्रत्येक भागात मागच्या भागाची लिंक देऊ शकता. त्यासाठी डॉ. सुहास म्हात्रे ह्यांची सध्या चालु असलेली न्यू यॉर्कची लेखमाला पहा. भटकंती विभागात सापडेल. त्यात जशा लिंक्स दिल्या आहेत, तुम्ही सुद्धा देऊ शकता.

फक्त "भटकंती" मध्ये संपादनाचा पर्याय लेखकाला असतो. (जुन्या मिपा थीमवर तरी होता.) तसा बाकी विभागात नसतो. त्यामुळे तुम्हाला समजा उद्या सर्व ७-८ भागांमध्ये , सर्व ७-८ भागांच्या लिंक्स अपडेट करायच्या असतील की जेणेकरुन कोणताही भाग उघडला तरी सर्व लिंक्स वाचकाला हाताशी मिळाव्यात, तर मात्र तुम्हाला साहित्य संपादकांची मदत घ्यावी लागेल. अर्थात ते काही फार अवघड नाही.

अनिंद्य's picture

3 Jan 2017 - 1:49 pm | अनिंद्य

@ पिलीयन रायडर
आभार!
प्रयत्न करतो.

साहित्य संपादकांना पाठवलेल्या निरोपाला - This message cant be sent असा मेसेज येत आहे, काय चुकत असावे?

उपेक्षित's picture

3 Jan 2017 - 5:39 pm | उपेक्षित

सुंदर लेख पण थोडा आटोपता घेतला असे राहून राहून वाटले.

अनिंद्य's picture

3 Jan 2017 - 9:15 pm | अनिंद्य

आणखी काही भाग लिहित आहे. मराठीत लिहिण्याचा सराव कमी आहे, लवकरच पुढचे भाग टाकतो.

पाटीलभाऊ's picture

3 Jan 2017 - 6:24 pm | पाटीलभाऊ

सुदर लेख

खटपट्या's picture

5 Jan 2017 - 11:17 am | खटपट्या

छान माहीती
आपले माधवराव शींदे (सींदीया) यांच्या पत्नी नेपाळ राजघराण्याच्या राजकन्या होत्या असे ऐकीवात होते.

अनिंद्य's picture

8 Jan 2017 - 4:00 pm | अनिंद्य

@ मनिमौ, कबीरा, उपेक्षित, पाटीलभाऊ, खटपट्या
- आभार

रुपी's picture

25 May 2017 - 6:00 am | रुपी

सिनेमा संपताना किंवा सुरुवातीला "स्पेशल थँक्स टू" खाली ज्यांची नावे असतात त्यांनी या सिनेमासाठी नक्की काय मदत केली असेल असे मला नेहमीच कुतूहल वाटते. त्याचे उत्तर मिळेल न मिळेल, पण इथे मनिमौ ला का थँक्स बरं? ;)

अनिंद्य's picture

25 May 2017 - 11:29 am | अनिंद्य

@ रुपी,

सिनेमाबद्दल तर मलाही माहित नाही पण माझा उत्साह वाढवणाऱ्या प्रत्येक प्रतिसादकर्त्याचे मी नेहेमी व्यक्तीशः आभार मानतो.

Just realised की मनिमौ यांनी आधीच्या भागात लेखन आवडत असल्याचे सांगितले, माझ्या नजरचुकीने त्यांना ह्या भागात थँक्स दिलेत :-) You really have an eye for detail, great !

पैसा's picture

19 Jan 2017 - 10:50 pm | पैसा

वाचते आहे. छान ओळख.

दीपक११७७'s picture

24 May 2017 - 6:59 pm | दीपक११७७

छान सुरुवात, माहीती पुर्ण लेख मला, पुढचे भाग पण वचण्याची उत्सुकता वाढली.

फारच मस्त माहिती! खूप छान लेखनशैली आहे!

अनिंद्य's picture

26 May 2017 - 1:31 pm | अनिंद्य

@ पैसा,
@ दीपक११७७,
@ रुपी,

आभार

मालिकेचे ९ भाग प्रसिद्ध केले आहेत, तेही वाचावे असा आग्रह.

- अनिंद्य