विदाऊट अ ट्रेस - १ - लॉस्ट कॉलनी

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
25 Nov 2016 - 8:42 am

Without A Trace

अनादी अनंत कालावधीपासून मानवाला अज्ञात प्रदेशाचं कायम आकर्षण राहीलेलं आहे. जास्तीत जास्तं भूमीवर आपलं स्वामित्वं प्रस्थापित करावं ही सहज मानवी प्रवृत्ती हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे. इसवीसनापूर्वीपासूनच भूमध्य समुद्राच्या सान्निध्यात ग्रीक आणि इजिप्शियन संस्कृती पूर्णत्वाला पोहोचलेल्या होत्या. पूर्णत्वास गेलेल्या या संस्कृतींना नित्यनवीन प्रदेशाची आस होतीच! अलेक्झांडरने भूमध्य समुद्र ओलांडून पर्शियन साम्राज्य काबिज करुन भारतावर केलेलं आक्रमण या विस्तारवादी मनोवृत्तीचाच परिपाक होता.

इसवीसनानंतर चौदाव्या शतकापर्यंत युरोप आणि आशिया खंडांतील देशांमधील वाहतूक ही ब्रिटन, फ्रान्स, इटली, स्पेन, पोर्तुगाल यांच्यासारख्या देशांमधून भूमध्य समुद्र ओलांडून दक्षिण किनार्‍यापर्यंत जहाजांतून आणि मग पुढे खुष्कीच्या मार्गाने आशिया खंडातल्या प्रदेशांच्या दिशेने होत असे. भूमध्य समुद्राच्या दक्षिण किनार्‍याला असलेली बसरा, बगदाद ही बंदरं आणि या मार्गावर असलेली काँस्टँटिनोपल (इस्तंबूल) यासारखी शहरं अत्यंत भरभराटीला आलेली होती. मात्रं या मार्गाने वाहतूक करताना इथल्या राज्यकर्त्यांना जकात आणि कररुपाने पैसा द्यावा लागत असे! युरोपियन व्यापार्‍यांना आणि त्यांच्या साम्राज्यवादी शासकांना नेमकी हीच गोष्ट जाचक वाटत होती. त्याचबरोबर खुष्कीच्या मार्गाने प्रवास करताना अनेक ठिकाणी लुटारुंचा धोका होताच! परंतु आशिया खंडाकडे जाण्याचा हा एकच मार्ग उपलब्धं असल्याने त्यांच्यासमोर दुसरा पर्यायही नव्हता.

१४८८ मध्ये पोर्तुगीज दर्यावर्दी बार्थेल्योमु डायझने आफ्रीका खंडाच्या दक्षिण टोकाला - केप ऑफ गुड होप - वळसा घालून हिंदी महासागरात प्रवेश केला. व्यापार आणि धर्मप्रसार या दुहेरी हेतूने युरोपातून पूर्वेला थेट हिंदुस्तानच्या पश्चिम किनार्‍यावर पोहोचणारा मार्ग डायझच्या सफरीमुळे खुला झाला. डायझच्या पावलावर पाऊल टाकत (जहाजावर जहाज म्हणू हवं तर) याच मार्गाने २० मे १४९८ या दिवशी वास्को-द-गामा कालिकत बंदरात उतरला. व्यापार आणि धर्मप्रसाराबरोबरच युरोपियनांचा आणखीन एक हेतू म्हणजे जगभरात जास्तीत जास्तं प्रदेशात आपल्या वसाहती निर्माण करणं!

वास्को-द-गामा भारतात पोहोचण्यापूर्वीच १४९२ मध्ये एक स्पॅनिश दर्यावर्दी आशिया खंडात पोहोचण्याच्या हेतूने अटलांटीक महासागरातून पश्चिमेच्या दिशेला निघाला होता. केप ऑफ गुड होपला वळसा घालून पूर्वेला जाण्यापेक्षा अटलांटीक मधून पश्चिम दिशेने मार्गक्रमणा केल्यास मसाल्याची बेटं आणि हिंदुस्तानच्या पूर्व किनार्‍यावर पोहोचणं सहजसाध्यं आहे असं त्याचं ठाम मत होतं! ३ ऑगस्ट १४९२ ला स्पेन सोडून तो नव्या दुनियेच्या शोधात निघाला आणि दोन महिन्यांनी १२ ऑक्टोबर १४९८ ला त्याला जमिन दिसली!

हा स्पॅनिश दर्यावर्दी म्हणजे अर्थात ख्रिस्तोफर कोलंबस!

कोलंबस आशिया खंडाचा पूर्व किनारा समजून ज्या बेटावर उतरला होता ते होतं बहामा बेट! कोलंबसने या बेटाचं सॅल सॅल्व्हाडोर असं स्पॅनिश नामकरण केलं आणि ते बेट ज्या द्वीपसमुहाचा भाग होतं त्या द्वीपसमुहाला इस्ट इंडीज!

१४९३ मध्ये स्पेनला परतल्यावर कोलंबसने १५०४ पर्यंत आणखीन तीन सफरींमध्ये कॅरेबियन समुद्रातील अनेक बेटांचा शोध लावला, परंतु या बेटांच्या पश्चिमेला असलेल्या खंडाच्या मुख्य भूभागावर पाय ठेवणं मात्रं त्याला कधी जमलं नाही. शेवटच्या सफरीत तो पनामा देशात पोहोचला. आपण शोधलेला भूभाग हा आशियाचा पूर्व किनारा आहे याबद्दल कोलंबसची इतकी पक्की खात्री होती की इटालियन संशोधक अमेरिगो वेस्पुचीने कॅरेबियन बेटं आणि ब्राझिल हा आशिया खंडाचा भाग नाही हे सप्रमाण सिद्धं केल्यावरही तो आपल्या मताला चिकटून होता. परिणामी या नवीन भूभागाला कोलंबसऐवजी वेस्पुचीच्या 'अमेरिकस्' या इटालियन प्रारुपावरुन नाव देण्यात आलं,

अमेरीका!

कोलंबसने या प्रदेशातून भरपूर प्रमाणात लूट जमा करुन सोने, चांदी आणि इतर मौल्यवान वस्तूंचा खजिना स्पेनला आणला होता. कोलंबसपाठोपाठ इतर अनेक दर्यावर्दींनी अमेरीकेची वाट धरली. १५१३ मध्ये स्पॅनिश दर्यावर्दींनी फ्लोरीडाच्या किनार्‍यावर पाऊल ठेवलं. इथून पुढे संशोधकांनी अ‍ॅपलचिन पर्वतराजी, मिसिसिपी नदीपासून ते पश्चिमेला थेट ग्रँड कॅनियनपर्यंत मजल मारली! १५४० मध्ये फ्रान्सिस्को कोरोनॅडो याने अरिझोना पासून उत्तरेला कॅन्सास आणि पश्चिमेला कॅलिफोर्नियापर्यंत प्रदेश पादाक्रांत केला. या प्रदेशात विखुरलेल्या लहान-लहान स्पॅनिश वसाहती म्हणजे टेक्सासमधलं सॅन अ‍ॅन्टोनिओ, अरिझोनातलं टस्कन, न्यू मेक्सिकोतलं अल्बुकर्की आणि कॅलिफोर्नियातली लॉस एंजलिस आणि सॅन फ्रान्सिस्को ही आज भरभराटीला आलेली शहरं!

स्पॅनिश दर्यावर्दींनी अमेरीकेतून लुटून आणलेल्या खजिन्याच्या बातम्या युरोपातील इतर देशांत पोहोचल्यावर तिथल्या बुभुक्षित राज्यकर्त्यांची आणि दर्यावर्दींची नजर अमेरीकेकडे वळली नसती तरच नवल!

वास्तविक कोलंबस बहामाला पोहोचण्यापूर्वी ८ व्या शतकातच नॉर्वेजियन व्हायकींग टोळ्यांनी उत्तर आर्क्टीकमधील अनेक बेटांवर वसाहती उभारल्या होत्या. मात्रं अमेरीकेच्या मुख्य भूभागावर व्हायकींग्ज कधीच गेले नाहीत! ग्रीनलंडच्या पश्चिमेचं एल्स्मेअर बेट हे व्हायकींग वसाहतींचं पश्चिमेचं टोक होतं. मात्रं तेराव्या शतकाच्या शेवटी लिटील आईस एजमुळे या सर्व वसाहतीतील रहिवाशांनी पुन्हा स्कॅंडीनेव्हीयाची वाट धरली होती.

१५२४ मध्ये फ्रान्सच्या राजाने इटालियन दर्यावर्दी गिओव्हिनी व्हेराझानो याला अमेरीकेच्या सफरीवर पाठवलं, परंतु फ्रेंच वसाहत स्थापन करण्याच्या त्याच्या प्रयत्नांना फारसं यश आलं नाही. १५३४ मध्ये जॅकस् कार्टीयरने न्यू फ्रान्स या नावाने उत्तरेत कॅनडाच्या क्यूबेक प्रदेशापासून दक्षिणेत फ्लोरीडातल्या जॅक्सनव्हीलपर्यंत फ्रेंच वसाहती उभारण्याचा प्रयत्नं केला, परंतु १६०८ मध्ये सॅम्युएल चँप्लेनने क्युबेक सिटीची स्थापना करेपर्यंत वर्षाभरापेक्षा कोणतीही फ्रेंच वसाहत टिकली नाही. पोर्तुगीज दर्यावर्दींनी १५०१-१५०२ मध्ये कॅनडाचा न्यू फाऊंडलंड-लॅब्रेडॉर हा प्रदेश पादाक्रांत केला. परंतु पोर्तुगीजांनी यथावकाश उत्तर अमेरीकेचा नाद सोडून दक्षिण अमेरीकेकडे मोर्चा वळवला आणि ब्राझीलवर कब्जा केला! याच मोहीमेत अमेरिगो वेस्पुचीने कॅरेबियन बेटं आणि ब्राझील हा आशियाचा पूर्व किनारा नसून तो एक नवीन खंड आहे हे सप्रमाण सिद्धं केलं! तुलनेने डचांचे अमेरीकेत वसाहती निर्माण करण्याचे प्रयत्नं सुरु होण्यास सोळावं शतक उजाडावं लागलं होतं!

कधीही सूर्य न मावळणारं साम्राज्यं उभारणारे इंग्रज या सगळ्यात कुठे होते?

१४९७ मध्ये इटालियन दर्यावर्दी गिओव्हानी कॅबोटो उर्फ जॉन कॅबोट इंग्लंडचा राजा ७ वा हेनरी याच्या आदेशावरुन व्हायकींग्ज टोळ्यांच्या मार्गाने ग्रीनलंडच्या मोहीमेवर गेला होता. २४ जून १४९७ या दिवशी तो न्यू फाऊंडलंड-लॅब्रेडॉर बेटाच्या पूर्व किनार्‍यावर असलेल्या बंदरात पोहोचला. या बंदराचं नाव पडलं सेंट जॉन्स! पुढे टॉर्सिल्सच्या तहातल्या कलमांनुसार या प्रदेशावर पोर्तुगीजांनी दावा केला आणि वर उल्लेख केल्याप्रमाणे १५०१-१५०२ मध्ये पोर्तुगीज संशोधक या प्रदेशात पोहोचले. यानंतर सुमारे सत्तर वर्षांपेक्षा अधिक काळ इंग्लिश दर्यावर्दींनी अमेरीकेकडे दुर्लक्षंच केलं होतं!

१५७८ मध्ये हंफ्रे गिल्बर्ट याने इंग्लंडची राणी एलिझाबेथ १ ली हिच्याकडून उत्तर अमेरीकेत ब्रिटीश वसाहतीची स्थापना करण्यासाठी सहा वर्ष इतक्या कालावधीसाठी परवाना मिळवला. या परवान्याची मुदत संपण्यापूर्वी १५८३ च्या जून महिन्यात अनेक अडचणींवर मात करुन ५ जहाजांमधून गिल्बर्ट न्यूफाऊंडलंडच्या मोहीमेवर निघाला. गिल्बर्टच्या या मोहीमेत त्याचा सावत्रं भाऊ वॉल्टर रॅले हा देखिल सामिल होता, परंतु अर्ध्या वाटेवरुन आपल्या जहाजातून माघारी फिरुन त्याने इंग्लंडचा किनारा गाठला! सेंट जॉन्स इथे पोहोचल्यावर गिल्बर्टने न्यू फाऊंडलंड-लॅब्रेडॉर बेट इंग्लंडच्या राणीच्या वतीने आपल्या ताब्यात घेतलं, परंतु अपुर्‍या साधनसामग्रीमुळे तिथे वसाहत स्थापन करण्याचा विचार त्याला सोडून द्यावा लागला. परतीच्या वाटेवर वादळात सापडल्यामुळे गिल्बर्टच्या चारपैकी दोन जहाजं बुडाली. स्क्विरल या आपल्या जहाजासह गिल्बर्टने अटलांटीकचा तळ गाठला!

सफर अर्ध्यात सोडून इंग्लंडला परतलेल्या वॉल्टर रॅलेने गिल्बर्टच्या मृत्यूनंतर त्याच्या नावे असलेला वसाहती उभारण्याचा परवाना राणीकडून स्वतःच्या नावावर करुन घेण्यात अजिबात दिरंगाई केली नाही. मात्रं हा परवाना देताना राणीने रॅलेला अमेरीकेत वसाहत न उभारल्यास परवाना रद्द करण्याची तंबी दिली होती. त्याचबरोबर या नवीन प्रदेशात वसाहती स्थापन करताना तिथल्या संपत्तीची लूट करण्याचा राणीचा आदेश होता!

“Discover, search, find out, and view such remote heathen and barbarous Lands, Countries, and territories … to have, hold, occupy, and enjoy!”

अर्थात अमेरीकेत केवळ वसाहती स्थापन करणं हा ना राणीचा हेतू होता ना रॅलेचा. वसाहतींच्या बुरख्याआड अमेरीकेतून खजिना घेऊन येणारी स्पॅनिश जहाजं लुटण्यासाठी - थोडक्यात चाचेगिरी करण्यासाठी - इंग्लिश आरमारी तळ उभारण्याची ही योजना होती!

२७ एप्रिल १५८४ या दिवशी फिलीप अ‍ॅमडास आणि आर्थर बार्लो यांच्या अधिपत्याखाली पहिल्या इंग्लिश मोहीमेने अमेरीकेच्या दिशेने प्रस्थान केलं. दोन महिन्यांच्या प्रवासानंतर ४ जुलै या दिवशी इंग्लिश जहाजं अमेरीकेच्या पूर्व किनार्‍यालगत असलेल्या रोनॉके बेटावर (नॉर्थ कॅरोलिना) पोहोचली!

अअ‍ॅमडास आणि बार्लो यांच्या या पहिल्या मोहीमेचा मुख्य उद्देश हा आसपासच्या प्रदेशाची पाहणी करणं आणि वसाहतीसाठी योग्यं जागा निश्चित करणं हा होता. त्याचबरोबर त्या प्रदेशात वस्ती करुन असलेल्या अमेरीकन आदिवासी जमातींशी संधान बांधणं हा देखिल एक हेतू होता. त्यादृष्टीने रोनॉके बेटाच्या परिसरात असलेल्या सेकोट्न आणि क्रोएट्न आदिवासींशी संपर्क साधण्यात अ‍ॅमडास आणि बार्लो यांनी यश मिळवलं. सेकोट्न आदिवासींचा नेता विन्गीना याने इंग्रजांना अत्यावश्यक असलेले खाद्यपदार्थ दिलेच, त्याचबरोबर आसपासच्या प्रदेशाची तपशीलवार माहितीही पुरवली. अर्थात यामागे विन्गीनाचा अंतस्थं हेतू वेगळाच होता. त्याच परिसरात वास्तंव्यास असलेल्या न्यूसिक या दुसर्‍या आदिवासी जमातीविरुद्धच्या युद्धात इंग्रजांनी आपल्याला मदत करावी अशी त्याची अपेक्षा होती!

अ‍ॅमडास आणि बार्लो यांना आदिवासींच्या आपापसातील भानगडीत पडण्यात अजिबात रस नव्हता. वास्तविक पुढे जगभर हे उद्योग हौसेनं करणार्‍या इंग्रजांचा हा नकार काहीसा चकीतच करणारा आहे. इंग्रजांनी नकार दिल्यावर विन्गीनाने स्वतःच्या बळावर न्यूसिक जमातीविरुद्ध युद्धं छेडलं खरं, परंतु त्याच्या मनाता काहीशी अढी निर्माण झालीच! सेकोटन आणि विशेषतः क्रोएट्न आदिवासी हे अत्यंत विश्वासू आणि धाडसी असल्याचं इंग्रजांच्या निदर्शनास आलं होतं. अ‍ॅमडास आणि बार्लो यांनी आपली पहिली मोहीम आटपून ऑगस्टमध्ये इंग्लंडला जाण्यास रोनॉके बेट सोडलं तेव्हा त्यांच्याबरोबर मँटेओ हा क्रोएट्न आणि वॅन्चेस हा सेकोट्न असे दोन आदिवासीही होते!

१५८४ च्या सप्टेंबरमध्ये इंग्लंडला पोहोचल्यावर या दोन आदिवासींना पाहण्यास इतकी गर्दी झाली की अखेर वॉल्टर रॅलेने इतरांना या दोघांना भेटण्यास बंदी घातली! अमेरीकेच्या भूमिवर वसाहत निर्माण करण्याच्या दृष्टीने या दोघा आदिवासींकडून जास्तीत जास्तं माहिती मिळवण्याच्या दृष्टीने रॅलेने दोघांना एका अत्यंत हुशार आणि चाणाक्षं संशोधकाच्या ताब्यात दिलं..

थॉमस हॅरीएट!

हॅरीएटने दोघा आदिवासींचा ताबा घेतला आणि रॅलेच्या प्रासादात त्यांच्याशी संवाद साधण्यास सुरवात केली. दोघा आदिवासींपैकी वॅन्चेस खूपच अबोल होता. त्याला इंग्लिश लोक आणि अमेरीकेत येण्याच्या त्यांच्या हेतूबद्दल अनेक रास्तं शंका असल्याचं हॅरीएटने नमूद केलं होतं. आपण इंग्रजांचे पाहुणे नसून कैदी आहोत अशी त्याची भावना झाली होती. त्यामानाने मँटेओ बराच बोलका आणि स्नेहशील असल्याचं हॅरीएटच्या ध्यानात आलं. त्याच्याकडून हॅरीएटला आदिवासींच्या चालीरितींबद्दल बरीच माहिती मिळालीच, त्याचबरोबर आदिवासींची भाषाही त्याने मँटेओकडून बर्‍यापैकी आत्मसात केली होती! इतकंच नव्हे मँटेओलाही काही प्रमाणात इंग्लिश भाषा शिकवण्यात तो यशस्वी झाला होता!

९ एप्रिल १५८५ या दिवशी रॅलेच्या योजनेनुसार अमेरीकेत वसाहत निर्माण करण्याच्या दृष्टीने पुन्हा एकदा इंग्रजांनी प्लायमाऊथ बंदरातून प्रस्थान केलं. या मोहीमेत टायगर, रोबक, रेड लायन, एलिझाबेथ आणि डोरोथी या पाच जहाजांचा समावेश होता. या मोहीमेचा प्रमुख होता रिचर्ड ग्रेनव्हील. ग्रेनव्हीलच्या जोडीला राल्फ लेन, जेम्स व्हाईट यांचा समावेश होता. थॉमस हॅरीएटची या मोहीमेचा शास्त्रीय सल्लागार म्हणून रॅलेने नेमणूक केली होती. मँटेओ आणि वॅन्चेस अर्थातच घरी परतण्यास उत्सुक होतेच! विशेषतः वॅन्चेस. मोहीमेची एकूण तयारी पाहता अमेरीकेला येण्याचा इंग्रजांचा हेतू वेगळाच आहे अशी त्याची खात्री पटत चालली होती!

अमेरीकेच्या वाटेवर असताना पोर्तुगालच्या किनार्‍यापासून काही अंतरावर टायगर जहाजाची वादळामुळे इतर जहाजांपासून ताटातूट झाली. पूर्वी ठरलेल्या योजनेप्रमाणे प्युर्टोरिको गाठून इतर जहाजांची वाट पाहण्याचा ग्रेनव्हीलने निर्णय घेतला. ११ मे या दिवशी टायगर प्युर्टो रिकोच्या गयानिला उपसागरात येऊन पोहोचलं.

प्युर्टोरिको ही स्पॅनिश वसाहत होती. तिथे पोहोचल्यावर ग्रेनव्हीलने तिथल्या स्पॅनिश गव्हर्नरची भेट घेऊन त्याच्याशी मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित केले. प्युर्टोरिकोच्या बेटावर एक लहानसा किल्ला बांधण्याचं कामही ग्रेनव्हीलने लगोलग हाती घेतलं. वरकरणी स्पॅनिश गव्हर्नरशी चांगले संबंध जोडताना एका बाजूला स्पॅनिश जहाजांवर छापे घालून लूटमार करण्यासही ग्रेनव्हीलने अनमान केला नव्हता! अशाच एका चाचेगिरीच्या मोहीमेत स्पॅनिश खलाशांकडून धाकदपटशाने इंग्रजांनी अन्नसामग्री उपटली होती. स्पॅनिश खलाशांनी अन्नसामग्री सुपूर्द करेपर्यंत काही खलाशांना इंग्रजांनी ओलिस म्हणूनही डांबून ठेवलं होतं! ग्रेनव्हीलचे हे सर्व उद्योग प्युर्टोरिकोपासून काही मैल अंतरावर आणि स्पेनच्या दिशेने निघालेल्या जहाजांच्याबाबतीत सुरु असल्याने प्युर्टोरिकोच्या स्पॅनिश गव्हर्नरला याची गंधवार्ताही नव्हती! मात्रं हे सर्व उद्योग बारकाईने पाहत असलेल्या वॅन्चेसचं मात्रं दिवसागणिक इंग्रजांबद्दल प्रतिकूल मत होत चाललं होतं! इंग्रजांच्या दगाबाज स्वभावाचं त्याला पुरेपूर दर्शन झालं होतं!

प्युर्टोरिकोच्या किनार्‍यावर उभारण्यात येत असलेल्या किल्ल्याचं काम पूर्ण झाल्याच्या दुसर्‍या दिवशीच एलिझाबेथ हे जहाज तिथे येऊन पोहोचलं. परंतु जून महिना उजाडल्यावरही इतर जहाजांचा पत्ता नव्हता. वाट पाहून कंटाळलेल्या ग्रेनव्हीलने ७ जूनला प्युर्टोरिको सोडलं आणि रोनॉकेची वाट धरली. परंतु २६ जूनला ओक्राकोक खाडीत जहाज वाळूच्या किनार्‍याला धडकलं. जहाजाचं नुकसान झालंच, परंतु अन्नसामग्रीत मोठ्या प्रमाणावर समुद्राचं पाणी घुसल्यामुळे खाद्यपदार्थांची टंचाई निर्माण झाली! टायगरवरच्या खलाशांनी जहाजाची दुरुस्ती केली खरी परंतु आता अन्नपाण्याविना त्यांचे हाल होऊ लागले होते!

३ जुलैला ग्रेनव्हीलने वॅन्चेसच्या नेतृत्वात एक तुकडी आपल्या आगमनाची विन्गीनाला वर्दी देण्यास पुढे पाठवली. रोनॉके बेटावर उतरताच वॅन्चेसने संधी साधून पोबारा केला आणि आपली वसाहत गाठून इंग्रजांबद्दल आपल्याला आलेल्या अनुभवांचं तपशीलवार वर्णन केलं आणि आपल्या भूमीवर कोणत्याही परिस्थितीत इंग्रजांना पाय रोवू देण्यास कडाडून विरोध करण्याचं विन्गीनाला त्याने निक्षून सांगितलं!

रोनॉके बेटावर पोहोचल्यावर रोबक आणी डोरोथी ही जहाजं रोनॉकेला पोहोचलेली पाहून ग्रेनव्हीलला हायसं वाटलं! या दोन्ही जहाजांबरोबरच रेड लायन हे जहाजही रोनॉके बेटाच्या परिसरात आलं होतं, परंतु आपल्या प्रवाशांना रोनॉके बेटावर सोडून जहाजाच्या कॅप्टनने चाचेगिरीसाठी न्यू फाऊंडलंडची वाट सुधरली होती! रोनॉके बेटावर पोहोचल्यावर ग्रेनव्हीलला वॅन्चेसने इंग्रजांची साथ सोडून आपल्या जमातीचा आसरा घेतल्याची बातमी कळल्यावर त्याने विन्गीनाची भेट घेऊन वॅन्चेसला आपल्या ताब्यात देण्यासाठी दटावलं, पण विन्गीनावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही! इंग्रजांनी अन्नपदार्थाची केलेली मागणीही त्याने धुडकावलीच, उलट पुन्हा इंग्रजांनी आपल्या गावात पाय न ठेवण्याची त्याने धमकी दिली!

ग्रेनव्हील आणि कंपनीने प्युर्टोरिकोप्रमाणे रोनॉके बेटाच्या उत्तर बाजूला किल्ला बांधण्यास सुरवात केली. या किल्ल्याचं बांधकाम सुरु असतानाच त्या परिसरातले आदिवासी आणि इंग्रजांच्या दरम्यान संघर्षाची पहिली ठिणगी पडली.

इंग्रजांच्या तुकडीतील काही जणांनी आपल्याबरोबर चांदीची काही भांडी रोनॉके इथे आणली होती. एक दिवस नेहमीप्रमाणे सर्व सामनाची मोजदाद करताना या चांदीच्या भांड्यांपैकी एक गायब असल्याचं राल्फ लेनच्या ध्यानात आलं! एखाद्या आदिवासीनेच ही चोरी केली असणार याबद्द्ल इंग्रजांची पक्की खात्री होती. या प्रकाराला पायबंद घालण्याच्या आणि मुख्यतः आपली दहशत पसरवण्याच्या हेतूने ग्रेनव्हीलने टोकाचा निर्णय घेतला. ज्या आदिवासीने ही चोरी केली आहे असा इंग्रजांचा आरोप होता त्या अ‍ॅक्वास्कॉग आदिवासी जमातीची वस्ती असलेल्या खेड्यावर हल्ला करुन इंग्रजांनी संपूर्ण वस्तीला आग लावली! विन्गीनाच्या सेकोट्न आदिवासींशी इंग्रजांनी आधीच शत्रुत्वं घेतलं होतं. त्यात आता अ‍ॅक्वास्कॉग आदिवासींची भर पडली होती! इंग्रजांकडे आता मँटेओ हा एकमेव विश्वासपात्रं आदिवासी सहकारी उरला होता!

रोनॉके बेटावरचा किल्ला बांधून होताच, १०८ इंग्रजांना रोनॉके बेटावर सोडून १७ ऑगस्ट १५८५ या दिवशी टायगर जहाजावरुन ग्रेनव्हीलने इंग्लंडची वाट धरली. १५८६ च्या एप्रिल महिन्यात अन्नसामग्री आणि आणखीन मनुष्यबळासह रोनॉकेवर परतण्याचा त्याचा इरादा होता. रोनॉके बेट सोडण्यापूर्वी जेम्स लेनची तिथल गव्हर्नर म्हणून ग्रेनव्हीलने नेमणूक केली.

रोनॉके वसाहतीतलं इंग्रजांचं आयुष्यं संघर्षपूर्णच होतं. बेटावर मका सोडल्यास कोणत्याही दुसर्‍या गोष्टीची शेती करणं शक्यं नव्हतं. मक्याचं पीकही तसं बेभरवशाचंच होतं. अन्नपदार्थांचा तुटवडा सुरवातीपासूनच होता. त्यातच कोएटन आदिवासींचा अपवाद वगळता इतर आदिवासी जमाती कायमच संघर्षाच्या पवित्र्यातच असत! अर्थात याला इंग्रज आणि त्यांची आदिवासींना तुच्छ लेखण्याची वृत्ती कारणीभूत होतीच. पण थॉमस हॅरीएटच्या ववृतांतानुसार इंग्रज आणि आदिवासींमधल्या तणावाला सर्वात जास्तं जबाबदार होता तो म्हणजे या वसाहतीचा गव्हर्नर असलेला राल्फ लेन!

लेन हा अत्यंत हडेलहप्पी आणि हुकूमशाही प्रवृत्तीचा होता. रोनॉके वसाहतीतल्या अनेक इंग्रजांशीही त्याचे अनेकदा खटके उडत असत. आदिवासींशी तर त्याची वागणूक निव्वळ क्रूरपणाची आणि अमानुष होती. त्याच्या दृष्टीने आदिवासी हे कस्पटासमान होते. त्यांच्यावर अत्याचार करताना त्याला आसुरी आनंद होत असे. वसाहतीला होणारा धान्याचा तुटवडा दूर करण्यासाठी त्याने एक नामी उपाय शोधून काढला होता. आपल्या सहकार्‍यांसह आदिवासींच्या वसाहतीवर धाडी घालून हाती लागतील तेवढ्या आदिवासींना तो जेरबंद करुन आणत असे आणि त्यांच्या बदल्यात आदिवासींकडून इंग्रजांसाठी अन्नपदार्थांची मागणी करत असे! ही मागणी पूर्ण होईपर्यंत पकडून आणलेले हे आदिवासी ओलिस म्हणून लेनच्या ताब्यात असत! या आदिवासींकडून जास्तीत जास्तं माहिती मिळवण्यासाठी त्यांना अमानुष मारहाण आणि इतर अत्याचारांना सामोरं जावं लागत असे. इंग्रजांच्या तुरुंगातून सुटका झालेल्या आदिवासींच्या छळाच्या कहाण्या कळल्यावर इतर आदिवासींमध्ये इंग्रजांविरुद्ध तिरस्काराची भावना वाढीस लागत होती.

१५८६ चा एप्रिल महिना उलटला तरीही रिचर्ड ग्रेनव्हील रोनॉके बेटावर परतला नव्हता. मे महिन्यात लेनच्या तुरुंगातून स्किको नावाच्या एका आदिवासी तरुणाने स्वतःची सुटका करुन घेतली आणि आपल्या वस्तीच्या दिशेने धूम ठोकली. स्किकोच्या दुर्दैवाने तो पुन्हा इंग्रजांच्या तावडीत सापडला! स्किकोला साखळदंडाने बांधून त्याच्या सर्वांगावर चटके देण्यात आले! खुद्दं लेनसह अनेकांनी त्याला अमानुष मारहाण केली. इतकंच नव्हे तर त्याचा शिरच्छेद करण्याचीही इंग्रजांनी तयारी चालवली होती. जिवाच्या भितीने स्किकोने अखेर आपलं तोंड उघडलं! रोनॉके बेटाच्या आसपास असलेल्या आदिवासी इंग्रजांवर हल्ला करण्याचा बेत आखत असून सेकोट्न आदिवासींचा प्रमुख विन्गीनो याच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी हल्ल्याची तयारी केल्याची स्किकोने कबूली दिली! सर्वात प्रथम लेनचा बळी घेण्याचा विन्गीनोचा इरादा असल्याचं स्किकोकडून कळल्यावर खवळलेल्या लेनने प्रथम हल्ला करण्याचा निर्णय घेतला!

लेन आणि त्याच्या सहकार्‍यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात एका मध्यरात्री सेकोट्न आदिवासींच्या वसाहतीवर हल्ला चढवला. इंग्रजांवर हल्ल्याची योजना आखणार्‍या आदिवासींना इंग्रजांचा हल्ला पूर्णपणे अनपेक्षित होता! आदिवासी या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच इंग्रजांनी निम्म्यावर आदिवासींना कापून काढलं! या धामधुमीतच लेनची नजर विन्गीनावर गेली. लेनने त्याला आपल्याशी द्वंद्वं खेळण्याचं आव्हान दिलं. लेनचं आव्हान स्विकारुन मोकळ्या जागेत येत असतानाच इंग्रजांपैकी कोणीतरी विन्गीनाच्या पाठीत गोळी घातली! विन्गीना जमिनीवर कोसळला पण काही क्षणांत पुन्हा उठून झाडीत पळाला. मात्रं तो निसटून जाऊ शकला नाही. लेनबरोबर हल्ल्यात भाग घेणारा एडवर्ड एन्जेन्ट विन्गीनापाठोपाठ झाडीत शिरला आणि काही वेळातच परतला ते विन्गीनाचं धडावेगळं शीर हाती धरूनच!

सेकोट्न आदिवासींवरच्या या हल्ल्यानंतर काही दिवसांतच रोनॉके बेटाच्या परिसरात जहाजांचा एक लहानसा काफीला येऊन धडकला. इंग्लंडहून रिचर्ड ग्रेनव्हील अन्नसामग्री आणि मनुष्यबळासह परतला असावा अशी सुरवातीला सर्वांची समजूत झाली, परंतु ही जहाजं ग्रेनव्हीलच्या तुकडीची नव्हती. कॅरेबियन बेटांतल्या स्पॅनिश वसाहतींवर हल्ला करुन आणि भरपूर लूट गोळा करुन आलेला हा सुप्रसिद्धं दर्यावर्दी होता दक्षिण पॅसिफीकमध्ये ऑस्ट्रेलेशियाकडे जाणार्‍या ड्रेक पॅसेजचा शोध लावणारा फ्रान्सिस ड्रेक! रोनॉके बेटावरील इंग्लिश वसाहतीची अवस्था पाहिल्यावर ड्रेकने लेन आणि इतरांना आपल्या जहाजांवरुन इंग्लंडला परत नेण्याची तयारी दर्शवली. सतत आदिवासींविरुद्धच्या संघर्षाला आणि रोनॉके इथल्या कष्टप्रद आयुष्याला वैतागलेल्या लेन, व्हाईट, हॅरीएट आणि इतरांनी ड्रेकच्या सूचनेचा साभार स्वीकार केला. २२ जुलै १५८६ या दिवशी सर्वजण ड्रेकच्या जहाजावरुन इंग्लंडच्या प्लायमाऊथ बंदरात पोहोचले. त्यांच्याबरोबरच मँटेओदेखिल इंग्लंडला आला होता.

अमेरीकेत वसाहत उभारण्याचा इंग्रजांचा पहिला प्रयत्न अशा रितीने पार फसला होता.

लेन आणि इतरांनी रोनॉके सोडल्यावर जेमतेम आठवड्याभराने रिचर्ड ग्रेनव्हील अन्नसामग्री आणि शंभरावर माणसांसह रोनॉके बेटावर येऊन पोहोचला! रोनॉके बेटावरचा निर्मनुष्यं किल्ला पाहिल्यावर ग्रेनव्हीलने परत इंग्लंडचा मार्ग धरला. मात्रं इंग्लंडला परतण्यापूर्वी सुमारे पंधरा लोकांना त्याने रोनॉके बेटावर ठेवलं होतं. बेटावर इंग्रजांचं अस्तित्वं कायम राहवं आणि त्यावर वॉल्टर रॅलेचा वसाहतीचा हक्कं कायम असावा हा दुहेरी हेतू त्यामागे होता.

रोनॉके इथल्या वास्तव्यात व्हाईट आणि हॅरीएट यांनी आदिवासींशी सतत संघर्ष सुरु असतानाही आजूबाजूच्या परिसराचं बारकाईने निरीक्षण करुन नोंद केली होती. बेटावर आढळणार्‍या वनस्पती आणि प्राण्यांचीही त्याने तपशीलवार वर्गवारी केली होती. तसंच त्या परिसरात आढळणार्‍या आदिवासी जमाती, त्यांच्या चालीरिती. शस्त्रं यांचीही त्याने काळजीपूर्वक मांडणी केली होती. मँटेओकडून आदिवासी बोलीभाषा आत्मसात केल्याने आदिवासींशी संपर्क साधणं त्याला सहजसाध्यं झालं होतं. इंग्लंडला परतल्यावर हॅरीएटने आपली ही सर्व निरीक्षणं आपल्या रिपोर्टमध्ये मांडली. मात्रं ग्रेनव्हील आणि लेन यांच्या आक्रमक धोरणांचा आणि आदिवासींबरोबरच्या रक्तलांच्छित संघर्षाचा इतिहास त्याने जाणिवपूर्वक वगळला होता! रोनॉके बेटावर वसाहत उभारण्यात येत असलेल्या अडचणींमागची वस्तुस्थिती इंग्लिश जनतेसमोर आली तर कोणीही तिथे जाण्यास तयार होणार नाही अशी रॅलेला रास्तं भिती होती. हॅरीएटच्या पुस्तकात रोनॉके बेटावरची इंग्रज आणि आदिवासींच्या शांततापूर्ण सहजीवनाच्या आणि वसाहतीच्या भरभराटीच्या खोट्या कहाण्या रॅलेच्या सूचनेवरुन घुसडण्यात आल्या होत्या! शास्त्रीय निरीक्षणांच्या आणि आदिवासींच्या चालीरितींबद्द्लच्या माहितीच्या दृष्टीने मात्रं हा रिपोर्ट महत्वाचा होता.

रोनॉके इथे वसाहत स्थापन करण्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाला असला तरी रॅलेने हार मानली नाही. आदिवासी आणि इंग्रज यांच्यातील संघर्षाला मुख्यत: गव्हर्नर राल्फ लेनचा स्वभाव आणि त्याचा कारभार कारणीभूत होता हे जॉन व्हाईटने रॅलेशी चर्चा करताना स्पष्टं केलं होतं. अर्थात स्वतः लेनला पुन्हा रोनॉकेमध्ये पाऊल ठेवण्याची इच्छा नव्हतीच! रॅलेने त्याच्याजागी व्हाईटची गव्हर्नर म्हणून नेमणूक केली आणि त्याच्याबरोबर आणखीन १२ सहकार्‍यांची त्याचे मदतनीस म्हणून नेमणूक केली. व्हाईटने रोनॉकेमधे मागे ठेवण्यात आलेल्या इंग्रजांशी संपर्क करावा आणि त्यांना बरोबर घेऊन रोनॉके बेटाऐवजी उत्तरेला असलेल्या चीजपीक बे च्या किनार्‍यावर वसाहत उभारावी अशी रॅलेची योजना होती. व्हाईटच्या ११५ लोकांच्या तुकडीमध्ये त्याची मुलगी एलेनॉर, जावई अ‍ॅनायस डेर आणि इतर अनेक कुटुंबांचा समावेश होता. जोडीला मँटेओ अर्थात होताच!

१५८७ च्या मे महिन्यात 'द लायन' या जहाजावरुन व्हाईट आणि कंपनीने रोनॉकेची वाट धरली. सायमन फर्नांडेझ हा वादग्रस्तं परंतु निष्णात पोर्तुगीज दर्यावर्दी या जहाजाचा कमांडर होता. २२ जुलै १५८७ या दिवशी ते रोनॉके बेटावर पोहोचले. परंतु रिचर्ड ग्रेनव्हीलने मागे ठेवलेल्या एकाही इंग्रज सैनिकाचा पत्ता नव्हता. रोनॉके बेटावर बांधलेल्या किल्ल्यावर उतरुन व्हाईट, हॅरीएट आणि इतरांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना हाडाचे फक्तं काही सापळेच आढळून आले!

रॅलेची मूळ योजना रोनॉके बेटावरच्या इंग्रजांशी संपर्क झाल्यावर उत्तरेला चीजपीक बे च्या किनार्‍यावर इंग्रजांनी वसाहत उभारावी अशी होती. परंतु रोनॉके बेटावर इंग्रजांचा मागमूस न आढळल्यावर कमांडर सायमन फर्नांडेझने चीजपीक बे इथे जाण्यास नकार दिला! व्हाईट आणि इतरांनी रोनॉके इथेच पुन्हा वसाहत उभारावी म्हणून तो अडून बसला! एकापरीने विचार केल्यास हे उघड उघड बंड होतं परंतु फर्नांडेझपुढे व्हाईटचं काही चाललं नाही! व्हाईट आणि इतरांना त्यांच्या साधनसामग्रीसह रोनॉके बेटावर सोडून फर्नांडेझ आपलं जहाज घेऊन निघून गेला!

व्हाईट आणि इतरांनी रोनॉके बेटावरच्या किल्ल्याची आवश्यक दुरुस्ती करुन पूर्वीप्रमाणे आपल्या वसाहतीच्या उभारणीला सुरवात केली.

रोनॉके बेटावर इंग्रजांचं पुन्हा आगमन झालेलं पाहून आसपासच्या आदिवासी जमातींमध्ये अस्वस्थंता पसरली होती. वसाहतीची उभारणी सुरु असतानाच व्हाईटने मँटेओमार्फत क्रोएट्न आणि इतर आदिवासी जमातींशी संपर्क साधण्यास प्राधान्यं दिलं होतं परंतु मँटेओचे क्रोएटन आदिवासी वगळता इतर कोणालाही इंग्रजांशी संबंध ठेवण्यात रस नव्हता. उलट इंग्रजांच्या रोनॉके बेटावरच्या वास्तव्याला इतर आदिवासींचा विरोधच होता. राल्फ लेनचा क्रूर कारभार आणि त्याने विन्गीना आणि त्याच्या सेकोट्न जमातीचं केलेलं हत्याकांड आदिवासी विसरले नव्हते. आदिवासींनी व्हाईटशी संघर्षाचाच पवित्रा घेतला होता. रोनॉकेच्या किनार्‍यावर खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या जॉर्ज होवे याची सेकोट्न आदिवासींनी अत्यंत क्रूरपणे हत्या केली.

रिवर्ड ग्रेनव्हीलने रोनॉके बेटावर मागे ठेवलेल्या १५ इंग्रजांचं नेमकं काय झालं हे जाणून घेण्याची व्हाईट आणि त्याच्या सहकार्‍यांना उत्सुकता होती. मँटेओच्या क्रोएटन जमातीतल्या लोकांकडून या प्रकाराचा उलगडा झाला. रोनॉके बेटावर दक्षिणेला वास्तव्यास असलेल्या रोनॉके आदिवासींनी त्या १५ इंग्रजांचा अत्यंत निर्घृणपणे बळी घेतला होता. राल्फ लेनने केलेल्या सेकोट्न आदिवासींच्या हत्याकांडाची किंमत त्यांना चुकवावी लागली होती.

व्हाईट आणि त्याच्या सहकार्‍यांनी याचा बदला घेण्याचा निश्चय केला. त्यातच नुकतीच जॉर्ज होवेची सेकोटन आदिवासींनी हत्या केल्यामुळे आदिवासींना जरब बसवणं वसाहतीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यंक होतं असं व्हाईट आणि इतरांचं मत पडलं. एव्हाना रोनॉके आदिवासी अमेरीकेच्या मुख्य भूमीवर असलेल्या देस्मंकेप्क या खेड्यात आश्रयास गेले होते. मँटेओकडून ही बातमी कळल्यावर व्हाईट आणि सुमारे २५ इंग्रजांनी शस्त्रास्त्रांनिशी सुसज्ज होऊन या खेड्यावर हल्ला करण्याची योजना आखली.

९ ऑगस्ट १५८७ या दिवशी इंग्रजांनी या खेड्यावर हल्ला चढवला. इंग्रजांबरोबर वाटाड्या म्हणून मँटेओ होता. देस्मंकेप्क इथल्या आदिवासींना या हल्ल्याची कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. अनपेक्षितपणे झालेल्या इंग्रजांच्या हल्ल्यामुळे त्यांचा प्रतिकार जवळपास नगण्यंच होता. व्हाईट आणि त्याच्या सहकार्‍यांनी आदिवासींचं शिरकाण केलं. होवे आणि आणि इतर १५ इंग्रजांच्या हत्येचा बदला घेतल्याच्या आनंदात इंग्रज होते, परंतु हल्ल्यानंतर समोर आलेली वस्तुस्थिती वेगळीच होती...

जॉर्ज होवेची हत्या केल्यावर इंग्रज आपल्यावर आक्रमण करणार याचा रोनॉके आदिवासींनी अचूक अंदाज बांधला होता. त्यामुळे देस्मंकेप्क इथलं बस्तान हलवून ते अधिक अंतर्भागात असलेल्या सेकोट्न जमातीच्या खेड्यात वास्तव्यास गेले होते. देस्मंकेप्क इथे इंग्रजांच्या हल्ल्याला बळी पडलेले आदिवासी हे मँटेओच्या क्रोएट्न जमातीचे होते! इतकंच नव्हे तर खुद्दं मँटेओच्या आईचा त्यांत समावेश होता!

या भयानक प्रकाराची जाणिव होताच इंग्रज मुळापासून हादरले. क्रोएटन ही एकमेव आदिवासी जमात अशी होती जिचे इंग्रजांशी मैत्रीपूर्ण संबंध होते. किमानपक्षी क्रोएटन आदिवासी इंग्रजांच्या जीवावर उठलेले नव्हते. मँटेओ हा एकमेव विश्वासू आदिवासी गाईड इंग्रजांपाशी होता. क्रोएटन जमातीचं हत्याकांडं इंग्रजांच्या हातून झाल्यामुळे क्रोएटन आदिवासी आणि मँटेओ इंग्रजांच्या विरोधात गेल्यास रोनॉके बेटावर इंग्रजांचा निभाव लागणं कठीणच होतं. मात्रं या वेळच्या प्रकारात इंग्रजांची काही चूक नव्हती. मँटेओच्या माहितीनुसार आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजांनी हल्ला केला होता. परंतु रोनॉके आदिवासींनी मँटेओलाही चकवलं होतं.

खुद्दं मँटेओची प्रतिक्रीया काय होती?

आपल्या जमातीच्या झालेल्या हत्याकांडाला आणि आपल्या आईच्या मृत्यूला सर्वस्वी आपली चूक कारणीभूत आहे असं मँटेओचं मत होतं. मँटेओच्या जमातीचे क्रोएटन आदिवासी काहीही चूक नसताना आपल्या जातबांधवांच्या झालेल्या हत्येमुळे खवळले होते. मँटेओवर त्यांनी गद्दारीचा उघड उघड आरोप केला. मँटेओची अवस्था कात्रीत सापडल्यासारखी झाली होती. त्याला इंग्रजांची बाजू पटली होती आणि आपल्या क्रोएटन जमातीचा रागही समजत होता. मोठ्या शर्थीने प्रयत्न करुन त्याने अखेर आपल्या जमातीच्या लोकांचा राग शांत केला आणि इंग्रजांबरोबर पुन्हा सौहार्दाचे संबंध प्रस्थापित केले.

"या वेळेस हॅरीएट माझ्याबरोबर हवा होता!" मँटेओ नंतर व्हाईटशी बोलताना उद्गारला!

देस्मंकेप्क खेड्यातल्या हत्याकांडानंतर क्रोएट्न आदिवासींशी संबंध सुरळीत होत असताना एक आनंददायक बातमी व्हाईटच्या कानी आली.

व्हाईटची मुलगी एलेनॉर हिने एका मुलीला जन्मं दिला!
अमेरीकेच्या भूमीवर पहिलं इंग्लिश बालक जन्माला आलं!
१८ ऑगस्ट १५८७!
व्हर्जिनिया डेर!

रोनॉके बेटावरच्या इंग्रजांमध्ये जॉर्ज होवेच्या हत्येनंतर भितीचं वातावरण होतं. त्यातच देस्मंकेप्क हल्ल्याचा फियास्को झाल्यामुळे तर अनेक इंग्रज हादरुन गेले होते. क्रोएटन आदिवासींशी पुन्हा शांततापूर्ण संबंध प्रस्थापित झालेले असले तरी क्रोएटन आदिवासींपैकी काहीजण मँटेओची गद्दार म्हणूनच संभावना करत होते. इतर आदिवासी जमातींपैकी कोण कधी इंग्रजांच्या जीवावर उठेल याचा नेम नव्हता. अशा परिस्थितीत अधिक अन्नसामग्री, शस्त्रं आणि अधिक मनुष्यबळाची मदत न मिळाल्यास रोनॉके इथली वसाहत वाचवणं अशक्यं आहे असं बहुतेकांचं मत होतं. त्यातच वॉल्टर रॅलेकडून येणारी मदत चीजपीक बे च्या परिसरात येणार होती, कारण सायमन फर्नांडेझने या सर्वांना रोनॉके बेटावर सोडलं असेल अशी कल्पनाही कोणाला आली नसती! रोनॉके बेटावरच्या इंग्रजांपुढे आता एकच मार्ग उरला होता.

गव्हर्नर व्हाईटने इंग्लंडला परतून मदत मिळवणं!

व्हाईटपाशी एक लहानसं एक शीडाचं जहाज होतं. या एक शिडाच्या जहाजातून अटलांटीक पार करणं निव्वळ आत्मघातकीपणाचं होतं. त्यातच ऑगस्ट-सप्टेंबरचा काळ हा अटलांटीक ओलांडण्याच्या दृष्टीने प्रतिकूल असाच समजला जात असे, पण व्हाईट्समोर दुसरा पर्याय नव्हता! मँटेओ आणि टोव्ये हा दुसर्‍या आदिवासीला मदतीला घेऊन आणि जहाजावरच्या खलाशांसह इंग्लंड गाठण्याचा व्हाईटने बेत केला. आपला जावई अ‍ॅनायस डेर याची वसाहतीचा गव्हर्नर म्हणून त्याने नेमणूक केली. मुलगी एलेनॉर, नात व्हर्जिनिया यांच्यासह ११५ जणांना रोनॉके बेटावर सोडून व्हाईटने इंग्लंडला जाण्यासाठी रोनॉके बेट सोडलं.

२७ ऑगस्ट १५८७!

इंग्लंडला परत फिरण्यापूर्वी अ‍ॅनायस डेर आणि इतरांना व्हाईटने अनेक महत्वपूर्ण सूचना केल्या होत्या. रोनॉके बेट हे वसाहतीचं मूळ ठिकाण नसूनही कमांडर सायमन फर्नांडेझने व्हाईट आणि इतरांना रोनॉके बेटावर सोडलं होतं. पुढेमागे वसाहत हलवून दुसर्‍या जागी तिची स्थापना करण्याबद्द्ल व्हाईट आणि त्याच्या सहकार्‍यांची अनेकदा चर्चा झाली होती. वसाहतीची जागा बदलल्यास त्याप्रमाणे आपल्यासाठी संदेश लिहून ठेवण्याची तसंच जबरदस्तीने वसाहत हलवली गेल्यास एका विशिष्टं पद्धतीने क्रॉसची (Maltese cross) खूण करण्याची व्हाईटने डेर आणि इतरांना सूचना दिली.

परतीच्या प्रवासात व्हाईटला अनेक संकटांचा सामना करावा लागला. अनेकदा त्याचं लहानसं जहाज वादळात भरकटलं. खुल्या समुद्रावर हिवाळ्यात प्रवास केल्यामुळे अनेकांना स्कर्व्हीची लागण झाली. उपासमार आणि स्कर्व्हीमुळे व्हाईटचे चार खलाशी मरण पावले! अखेर सुमारे दोन महिन्यांनी व्हाईटचं लहानसं जहाज १६ ऑक्टोबर १५८७ या दिवशी आयर्लंडच्या पश्चिम किनार्‍यावर स्मेर्विक इथे पोहोचलं. इथे दोन दिवसांची विश्रांती घेऊन दुसर्‍या जहाजावरुन व्हाईटने साऊथहॅम्प्टन बंदर गाठलं.

इंग्लंडला परतल्यावर व्हाईटने मँटेओसह ताबडतोब वॉल्टर रॅलेची भेट घेऊन त्याला वसाहतीची दूरावस्था वर्णन करुन सांगितली आणि मदत पाठवण्याची विनंती केली.

व्हाईटच्या दुर्दैवाने तो इंग्लंडला पोहोचण्यापूर्वी दोन आठवडे राणी एलिझाबेथने कोणत्याही जहाजाला इंग्लंडचं बंदर सोडून जाण्यास मनाई करणारा हुकूम काढला होता! याला पार्श्वभूमी होती ती स्पॅनिश आरमाराच्या इंग्लंडवरच्या येऊ घातलेल्या आक्रमणाची. उपलब्धं असलेलं प्रत्येक जहाज स्पॅनिश आरमाराचा मुकाबला करण्यासाठी शाही नौदलात सामिल करण्याचा राणीने हुकूम सोडला होता. वॉल्टर रॅलेने रोनॉके वसाहतीच्या हलाखीचं वर्णन करुन दोन जहाजांमधून मदत पाठवण्याची राणीकडे परवानगी मागितली, परंतु एलिझाबेथने ठाम नकार दिला!

(स्पेनचं इंग्लंडवर आक्रमण होण्याचं कारण कॅथलिक आणि प्रोटेस्टंट पंथियांमधला वाद आणि एलिझाबेथने मेरी (क्वीन ऑफ स्कॉट्स) हिला फर्मावलेली आणि अंमलात आणलेली मृत्यूदंडाची शिक्षा होती. स्पेनच्या राजाला या युद्धात रोमन कॅथलिक चर्चच्या पोपमहाशयांची सक्रीय मदत होती. प्रॉटेस्टंट एलिझाबेथला पदच्युत करुन रोमन कॅथलिक शासकाला इंग्लंडच्या सिंहासनावर बसवण्यासाठी स्पेनने हे युद्धं पुकारलं होतं).

१५८८ मध्ये इंग्लंड आणि स्पेन यांचं युद्धं ऐन भरात असताना व्हाईटने एका शिडाची दोन लहानशी जहाजं मिळवली आणि राणीकडे रोनॉके वसाहतीत परतण्याची परवानगी मागितली. व्हाईटची ही लहानशी जहाजं मोठ्या स्पॅनिश जहाजांविरुद्ध युद्ध करण्यास निरुपयोगी असल्याने राणीने त्याला रोनॉके इथे परतण्यास परवानगी दिली. व्हाईटने मोठ्या उत्साहाने इंग्लंड सोडून अमेरीकेची वाट धरली, परंतु दोन दिवसांच्या प्रवासानंतर फ्रेंच चाचांनी त्याची ब्रेव्ह आणि रो ही दोन्ही जहाजं पकडून त्याची सर्व सामग्री लुटून नेली! व्हाईट आणि त्याचे सहकारी कसेबसे जीव वाचवून इंग्लंडला परतले!

स्पॅनिश आक्रमणाचा धोका तूर्तास टळल्यावर अखेरीस १५९० च्या मार्च महिन्यात होपवेल आणि मूनलाईट या दोन जहाजांमधून व्हाईटने रोनॉकेची वाट धरली. त्याच्या जोडीला मँटेओ आणि टोव्ये हे दोघे होतेच! अटलांटीकमध्ये अनेक स्पॅनिश जहाजांशी त्यांची गाठ पडली. स्पेनशी युद्धबंदी झालेली असली तरी खुल्या समुद्रात चाचेगिरीला बंदी नव्हती! त्यामुळे होपवेल आणि मूनलाईट जहाजाच्या कॅप्टन्सनी स्पॅनिश जहाजांवर बिनदिक्कतपणे हल्ले चढवण्याचं सत्रं आरंभलं होतं. अर्थात अनेकदा यातून समरप्रसंग उद्भवत होते. अखेरीस ऑगस्टच्या दुसर्‍या आठवड्यानंतर व्हाईट रोनॉके बेटाजवळ येऊन पोहोचला, परंतु खराब हवामानामुळे जहाजांना नांगर टाकणं अशक्यं झालं होतं. एकदा तर नांगर टाकण्याच्या प्रयत्नात होपवेलवरच्या सात खलाशांना जलसमाधी मिळाली! अखेर हवामान निवळल्यावर व्हाईट रोनॉके बेटावर उतरण्यात यशस्वी झाला...

१८ ऑगस्ट १५९०!
व्हाईटची नात व्हर्जिनिया हिचा तिसरा वाढदिवस!

तीन वर्षांपूर्वी व्हाईटने मागे ठेवलेल्या ११५ इंग्रजांपैकी एकाचाही मागमूस नव्हता!
रोनॉके बेटावरचा किल्ला आणि उभारण्यात आलेली सगळी घरं पडीक अवस्थेत असल्याचं व्हाईटला आढळून आलं!
कित्येक महिन्यांत तिथे कोणीही फिरकल्याची एकही खूण आढळून येत नव्हती!
वसाहतीतल्या एका झाडाच्या खोडावर CRO अशी अक्षरं कोरलेली होती.
किल्ल्याच्या एका भिंतीवर CROATOAN अशी अक्षरं कोरलेलीही आढळली.

व्हाईटने काळजीपूर्वक शोध घेऊनही कुठेही त्याने सूचना दिल्याप्रमाणे क्रॉसची (Maltese cross) खूण आढळली नव्हती. त्यावरुन वसाहतीचं स्थलांतर जबरदस्तीने झालेलं नाही असा त्याने निष्कर्ष काढला. किल्ल्याच्या भिंतीवर आढळलेल्या CROATOAN या शब्दाचा त्याच्या दृष्टीने एकच अर्थ निघत होता. वसाहतीतल्या रहिवाशांशी सौहार्दपूर्ण संबंध असणार्‍या क्रोएटन जमातीच्या आश्रयाला वसाहतीतले रहिवासी गेले असावेत! क्रोएटन बेटावर आपल्या वसाहतीतले सर्व रहिवासी, आपली मुलगी आणि नात सुरक्षित असतील आणि तिथे गेल्यास त्यांची निश्चितच भेट होईल अशी पक्की खात्री त्याला झाली!

दोन्ही जहाजांचे कॅप्टन मात्रं क्रोएटन बेटावर शोध घेण्यास फारसे अनुकूल नव्हते. रोनॉके बेटावर उतरताना आधीच सात खलाशी प्राणाला मुकले होते. नांगर टाकण्याच्या प्रयत्नात होपवेलचे तीन नांगर सागरतळाला गेले होते. त्यातच वादळाची चिन्हं दिसू लागली होती. अशा परिस्थितीत क्रोएटन बेटावर शोध घेण्याची व्हाईटची विनंती दोन्ही जहाजांच्या कॅप्टननी धुडकावली. निरुपाय झाल्याने व्हाईट पुन्हा इंग्लंडला परत फिरला. मँटेओ आणि टोव्ये यांनी मात्रं रोनॉके बेट सोडून पुन्हा इंग्लंडला परत जाण्यास नकार दिला. २४ ऑक्टोबर १५९० या दिवशी व्हाईट इंग्लंडला परतला.

१५८८ मध्येच कॅरेबियन समुद्राच्या परिसरातल्या स्पॅनिश अधिकार्‍यांना इंग्रजांच्या या वसाहतीचा वास लागला होता. परंतु ही केवळ ११५ माणसांची वसाहत नसून बराच मोठा ब्रिटीश आरमारी तळ असावा अशी त्यांची कल्पना होती. हा आरमारी तळ चीजपीक बे च्या परिसरात आहे अशीही पक्की बातमी स्पॅनिशांना लागली होती. इंग्रजांच्या या तळाचा शोध घेऊन आणि त्यावर हल्ला करुन तो नष्ट करण्याची स्पॅनिश अधिकार्‍यांनी योजना आखली. साधनसंपत्तीच्या आपल्या लुटीत त्यांना अर्थातच भागीदार नको होता.

स्पॅनिश अधिकार्‍यांनी १५८८ च्या उन्हाळ्यात चीजपीक बे च्या परिसरात इंग्रजांच्या आरमारी तळाचा शोध घेण्याचा बराच प्रयत्नं केला, परंतु तो व्यर्थच ठरला. परतीच्या वाटेवर स्पॅनिश जहाजं वादळात सापडली. स्पॅनिश जहाजांपैकी व्हिक्टर गोन्झालेझचं जहाज जोरदार वार्‍यांमुळे रोनॉके बेटाच्या परिसरात भरकटलं. वादळापासून बचावण्याच्या हेतूने गोन्झालेझ रोनॉके बेटाच्या आश्रयाला आला, परंतु बेटावर नजर टाकताच इंग्रजांचा किल्ला आणि सुस्थितीतली घरं त्याच्या दृष्टीस पडताच तो आश्चर्याने थक्कं झाला! आपण चीजपीक बे च्या परिसरात शोध घेत असलेली हीच इंग्रजांची वसाहत असल्याचं त्याच्या ध्यानात आलं. परंतु रोनॉके बेटाचा लहानसा आकार हा मोठ्या आरमारी तळाच्या दृष्टीने योग्य नव्हता. ही वसाहत हे टेहळणीचं ठिकाण असावं आणि मुख्यं आरमारी तळ चीजपीक बे च्या परिसरात असावा असा त्याने अंदाज बांधला,

गोन्झालेझच्या माहितीच्या आधारे अमेरीकेतला इंग्रजांचा हा तळ उध्वस्तं करण्यासाठी कॅरेबियनच्या परिसरातल्या स्पॅनिश अधिकार्‍यांनी स्पेनहून मदत पाठवण्याची विनंती केली. परंतु जॉन व्हाईटला रोनॉके बेटावर परतून येण्यास प्रतिबंध करणार्‍या इंग्लंड-स्पेन युद्धामुळे स्पॅनिश अधिकार्‍यांच्या या विनंतीलाही स्पेनमधून फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

जॉन व्हाईट इंग्लंडला परतल्यावर तब्बल १२ वर्षांनी वॉल्टर रॅले आपल्या कॉलनीचा ठावठिकाणा शोधण्याच्या मोहीमेवर निघाला अर्थात रोनॉके वसाहतीच्या शोधाबरोबरच चाचेगिरी हा रॅलेचा हेतू होताच! चाचेगिरीतून सवड मिळाल्यावर यथावकाश रॅले रोनॉके बेटाच्या परिसरात पोहोचला, परंतु खराब हवामानामुळे प्रत्यक्ष बेटावर उतरुन शोध घेण्याचा विचार त्याला सोडून द्यावा लागला. तीन वेळा बेटावर उतरण्यात अपयश आल्यावर रॅले इंग्लंडला परतला.

रोनॉके वसाहतीतल्या इंग्रजांचं नेमकं काय झालं?

१६०७ मध्ये इंग्रजांनी जेम्सटाऊन इथे दुसरी वसाहत उभारली. ही वसाहत स्थिरस्थावर झाल्यावर १६०८ पासून इथल्या इंग्रजांनी रोनॉके वसाहतीतल्या इंग्रजांबद्द्ल माहिती गोळा करण्यास सुरवात केली. स्थानिक आदिवासींकडून मिळालेल्या माहितीनुसार जेम्सटाऊनमधल्या अनेकांनी अनेक दिशांनी रोनॉके वसाहतीतल्या लोकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणालाही एकही इंग्रज दृष्टीस पडला नाही.

१६०८ मध्ये जेम्सटाऊनचा गव्हर्नर असलेल्या जॉन स्मिथ याला स्थानिक आदिवासींचा प्रमुख पोहट्न याने एक अत्यंत सनसनाटी खबर दिली. पोहट्नच्या दाव्यानुसार जेम्सटाऊन इथल्या इंग्रजांच्या आगमनापूर्वी काही दिवसच स्वतः पोहट्नने काही गोर्‍या लोकांची हत्या केली होती! पोहट्नचं अधिपत्यं न मानणार्‍या चीजपीयन आदिवासींबरोबर हे गोरे लोक वसाहत करुन राहत होते. पोहट्नच्या धर्मगुरुने हे चीजपीयन आदिवासी एकदिवस बंड करुन उठतील आणि पोहट्नच्या साम्राज्याचा अंत करतील अशी भविष्यवाणी वर्तवली होती! खबरदारीचा उपाय म्हणून चीजपीयन आदिवासी आणि त्यांच्या आश्रयाने राहत असलेल्या गोर्‍या लोकांचा पोहट्नने खात्मा केला होता!

पोहट्नच्या या दाव्याला पुष्टी देणारा वृत्तांत १६१०-११ मध्ये विल्यम स्ट्रेचीने आपल्या रिपोर्टमध्ये नमूद केला आहे. स्ट्रेचीच्या रिपोर्टप्रमाणे २६ एप्रिल १६०७ या दिवशी जेम्सटाऊन वसाहतीतले इंग्रज चीजपीक बे मध्ये उतरण्यापूर्वी अवघे दोन-तीन दिवस पोहट्नने हे हत्याकांड उरकलं होतं. अर्थात पोहट्नच्या दाव्यानंतरही रोनॉके वसाहतीतल्या इंग्रजांचा शोध घेण्यात खंड पडला नव्हता!

आजतागायत हा शोध संपलेला नाही!

रोनॉके वसाहतीतल्या इंग्रजांचं नेमकं काय झालं याबद्द्ल अनेक तर्क - वितर्क मांडले गेले आहेत.

वॉल्टर रॅलेची मूळ योजना चीजपीक बे इथे वसाहत उभारण्याची असतानाही कमांडर सायमन हर्नांडेझने व्हाईट आणि इतरांना रोनॉके इथे उतरवलं होतं. फर्नांडेझने हा पवित्रा का घेतला असावा याबद्द्ल अनेक मतमतांतरं आहेत. फर्नांडेझचा पूर्वेतिहास अत्यंत वादग्रस्तं होता. मूळचा पोर्तुगीज असलेला फर्नांडेझ उत्कृष्ट दर्यावर्दी असला तरी एक लुटारु चाचा होता. जॉन कॅलिस या कुप्रसिद्ध चाचाचा तो जवळचा सहकारी होता. फर्नांडेझचा मुख्य रोख स्पॅनिश जहाजांवर असल्याने इंग्लंडच्या किनार्‍यावर त्याच्या या उद्योगांकडे काणाडोळा करण्याचंच राणीचं धोरण होतं! एका मोहीमेत सात पोर्तुगीज खलाशांची त्याने हत्या केल्यावर इंग्लंडमधला पोर्तुगीज राजदूत फ्रान्सिस्को गिराल्डी याच्या आग्रहाखातर त्याला अटक करुन फाशीची शिक्षा सुनावण्यात आली खरी, परंतु त्याकाळी इंग्लंडमधला सर्वोत्कृष्ट दर्यावर्दी असलेला फर्नांडेझसारखा माणूस इंग्रजांच्या दृष्टीने पोर्तुगीजांच्या जीवापेक्षा जास्तं मोलाचा होता. राणीचा सरदार असलेल्या फ्रान्सिस वेल्मिंगहॅमने ही गोष्टं नेमकी हेरुन बर्‍याच खटपटी करुन त्याची मुक्तता करवली! सुटका झाल्यावर हंफ्रे गिल्बर्टने अमेरीकेच्या मोहीमेत फर्नांडेझची स्क्विरल या जहाजाचा कमांडर म्हणून नेमणूक केली. केवळ सुदैवानेच स्क्विरल वादळात सापडण्यापूर्वी तो काही कामानिमित्त दुसर्‍या जहाजावर आल्यामुळे वाचला होता. गिल्बर्टच्या मृत्यूनंतर फर्नांडेझने रॅलेच्या पदरी नोकरी पत्करली होती.

एका मतप्रवाहानुसार व्हाईट आणि इतरांना रोनॉके इथे उतरवून स्पॅनिश जहाजं लुटण्याच्या उद्देशाने फर्नांडेझला कॅरेबियन बेटं गाठण्याची घाई झाली होती. जॉन व्हाईटच्या मते रोनॉके वसाहत नष्टं होण्यास फर्नांडेझच कारणीभूत होता. चीजपीक बे इथे वसाहत उभारली गेली असती तर ती निश्चितच बहरली असती असं व्हाईटचं ठाम मत होतं. रोनॉके परिसरातल्या आदिवासींचं आधीच इंग्रजांबद्द्ल प्रतिकूल मत होतं, त्यातच मँटेओच्या चुकीमुळे झालेल्या क्रोएटन आदिवासींच्या हत्याकांडामुळे आगीत तेल ओतल्यासारखं झालं होतं. मोठ्या संख्येने आदिवासींनी हल्ला केल्यास रोनॉके बेटावर वसाहत वाचण्याची शक्यता खूप कमी होती.

ली मिलरच्या मते फर्नांडेझने चीजपीक बे इथे जाण्यास नकार देणं हा अमेरीकेत वसाहत उभारण्याचा वॉल्टर रॅलेचा प्रयत्नं यशस्वी होऊ नये या व्यापक कटाचा एक भाग होता. रॅलेचा रोनॉके इथे वसाहत स्थापन करण्याचा पहिला प्रयत्न फसला असला, तरी त्याचं खापर ग्रेनव्हील आणि लेनच्या कारभारापेक्षा आदिवासींवर फुटलं होतं. राणीने रॅलेला पुन्हा परवाना आणि सर्वतोपरी मदत देऊ केली होती. रॅलेचा झपाट्याने होत असलेला उत्कर्ष फ्रान्सिस वेल्मिंगहॅमला सहन होत नव्हता! वसाहत निर्माण करण्यात रॅलेला यश मिळू नये या हेतूने वेल्मिंगहॅमने फर्नांडेझला हाताशी धरलं होतं. वेल्मिंगहॅममुळे फाशीच्या तख्तावरुन सहीसलामत सुटका झाल्याने फर्नांडेझ त्याच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेला होता. आपल्या दरबारी राजकारणात वेल्मिंगहॅमने त्याचा मोहरा म्हणून वापर करुन घेतला असावा!

१५८७ मध्ये जॉन व्हाईट इंग्लंडला परतल्यावर १५८८ च्या उन्हाळ्यात व्हिक्टर गोन्झालेझला अपघातानेच रोनॉके वसाहतीचा शोध लागला होता. वसाहतीतल्या माणसांचा उल्लेख गोन्झालेझच्या रिपोर्टमध्ये नसला तरी किल्ला आणि घरं सुस्थितीत असल्याचा स्पष्टं उल्लेख केलेला आहे. रोनॉके बेटाच्या परिसरात एक अगदी लहानसं एक शिडाचं जहाज आणि आदिवासींच्या अनेक होड्या आढळल्याचं रिपोर्टमध्ये नमूद केलेलं आहे. बेटाच्या उत्तरेकडच्या किनार्‍यापासून मुख्य भूभागाच्या अंतर्भातात जाण्यासाठी असलेल्या खाडीचाही या रिपोर्टमध्ये उल्लेख केलेला आढळतो.

गोन्झालेझच्या रिपोर्टवरुन १५८८ च्या उन्हाळ्यापर्यंत तरी रोनॉके वसाहत नांदती होती असं मानण्यास वाव आहे. एक शक्यता अशी होती की रोनॉके वसाहतीजवळ आलेलं गोन्झालेझचं जहाज हे स्पॅनिश असल्याचं वसाहतीतल्या लोकांनी ओळखलं आणि आपला पत्ता लागल्यावर स्पॅनिशांचं मोठ्या संख्येने आक्रमण होण्याची त्यांना भिती वाटली. वसाहतीतल्या लोकांजवळची शस्त्रं आदिवासींपासून स्वसंरक्षण करण्यास आणि जरुर पडल्यास आक्रमण करण्यास पुरेशी होती, परंतु स्पॅनिश आरमाराच्या हल्ल्यापुढे या शस्त्रांचा टिकाव लागणं अशक्यंच होतं. गोन्झालेझ रोनॉके बेटांवरुन गेल्यावर संभाव्य स्पॅनिश हल्ल्याचा धोका टाळण्याच्या दृष्टीने वसाहतीतल्या लोकांनी क्रोएट्न आदिवासींची वस्ती असलेल्या क्रोएट्न बेटाचा आसरा घेण्याचा निर्णय घेऊन रोनॉके बेट सोडलं असावं.

याच तर्काचा आणखीन पुढे विस्तार केला तर खरोखरच स्पॅनिशांनी हल्ला करुन रोनॉकेच्या इंग्रजांची कत्तल उडवली का असा प्रश्नं पुढे येतो. मात्रं अगदी १६०० सालापर्यंत कॅरेबियन परिसरातले स्पॅनिश अधिकारी या वसाहतीचा शोध घेत असल्याचे पुरावे उपलब्धं असल्याने स्पॅनिशांचा हल्ला रोनॉके इथे झाला नसावा असं मानण्यास वाव आहे.

एका तर्कानुसार रोनॉके वसाहतीतल्या इंग्रजांनी क्रोएटन बेटावरच्या आदिवासींच्या जमातीत आसरा घेतला होता. क्रोएटन बेटावरुन या आदिवासींबरोबर त्यांनी अमेरीकेच्या मुख्य भूभागावर असलेल्या आदिवासींच्या खेड्यात स्थलांतर केलं. इथे पोहोचल्यावर इंग्रज वेगवेगळ्या गटांमध्ये विखुरले गेले आणि वेगवेगळ्या आदिवासींच्या जमातीत मिसळून गेले. या तर्काला पुष्टी देणारी नोंद विल्यम स्ट्रेचीच्या रिपोर्टमध्ये आढळते. पेक्राक्निक आणि ओचॅन्होन इथल्या आदिवासी वसाहतींमध्ये त्याला दगडी बांधणीची दुमजली घरं आढळली होती. आदिवासींच्या दाव्यानुसार दुमजली घरांच्या बांधकामाची कला कधीकाळी त्यांच्या आश्रयाला असलेल्या इंग्रजांकडून त्यांनी आत्मसात केली होती.

पोहट्नने हत्या केलेले गोरे लोक हे यापैकीच एका गटातले इंग्रज होते का?

स्ट्रेचीच्या रिपोर्टमध्ये रिटॅनॉक इथल्या इनो आदिवासींच्या वसाहतीत चार गोरे पुरुष, दोन मुलं आणि एक लहान मुलगी आश्रयास असल्याचाही उल्लेख आहे. हे गोरे लोक त्यांच्या वसाहतीवर झालेल्या हल्ल्यातून जीव बचावून चेनॉके नदीच्या काठाने पळून इनो आदिवासींच्या आश्रयाला आले होते. स्ट्रेचीच्या रिपोर्टप्रमाणे जेम्सटाऊनच्या इंग्रजांनी रिटॅनॉक इथली इनो आदिवासींची वसाहत गाठली, परंतु आदिवासींनी त्यांना कोणतीही माहिती देण्यास नकार दिला!

१६९६ मध्ये टार नदीच्या परिसरात वास्तव्यास असलेल्या फ्रेंच वसाहतीतल्या लोकांची ट्स्करोरा आदिवासींशी गाठ पडली. यापैकी काही आदिवासींचे पिंगट केस आणि निळे डोळे पाहून फ्रेंच चकीत झाले होते. इतकंच नव्हे तर या टस्करोरा आदिवासींपैकी काहीजण इतरांच्या तुलनेत रंगाने बरेच उजळ होते! त्या परिसरातली सर्वात जवळची इंग्लिश वसाहत म्हणजे जेम्सटाऊन, पण जेम्सटाऊनच्या इंग्रजांचा टस्करोरा आदिवासींशी संबंध आल्याचा कोणताही उल्लेख आढळून येत नाही. अशा परिस्थितीत या आदिवासींना त्यांची बदललेली शारिरीक लक्षणं ही रोनॉके वसाहतीतल्या इंग्रजांकडून मिळाली असावीत अशी एकच शक्यता उरते.

जॉन लॉसनने १७०९ च्या आपल्या रिपोर्टमध्ये क्रोएटन बेटावरच्या आदिवासींनी आपले पूर्वज रोनॉके बेटावरचे इंग्रज असल्याचा दावा केल्याचं स्पष्टपणे नमूद केलं आहे. हे क्रोएटन इंग्लिश भाषेत प्रविण होते. इतकंच नव्हे तर त्यापैकी काहीजण इंग्लिश भाषेतली कागदपत्रं वाचू शकत होते! त्याखेरीज एक अत्यंत विस्मयकारक गोष्टं म्हणजे यापैकी अनेक आदिवासींमध्ये आढळून येणारे पिंगट केस आणि निळे डोळे! या दोन गोष्टी त्यांना अर्थातच इंग्रजांकडून वारसाहक्काने मिळाल्या असाव्यात. इंग्रजांबद्द्ल त्यांना आपले पूर्वज म्हणून आत्मियता होती. इंग्रजांना लागेल ती मदत देण्याची त्यांची तयारी होती!

१८८० मध्ये नॉर्थ कॅरोलिना राज्याचा प्रतिनिधी असलेला हॅमिल्टन मॅकमिलन याने त्याच्या आदिवासी शेजार्‍यांनी रोनॉके वसाहतीतले इंग्रज आपले पूर्वज असल्याचा दावा केल्याचं नमूद केलं आहे. मॅकमिलनने या आदिवासींची बारकाईने चौकशी केल्यावर जुन्या इंग्लिश शब्दांशी साधर्म्य असलेले अनेक शब्दं आदिवासींच्या बोलीभाषेत असल्याचं त्याला आढळून आलं! इतकंच नव्हे तर या आदिवासी लोकांपैकी अनेकांची आडनावं ही रोनॉके वसाहतीतल्या इंग्रजांच्या आडनावांशी जवळीक दर्शवणारी होती!

रोनॉके वसाहतीतले इंग्रज खरंच आदिवासी जमातींमध्ये मिसळून गेले होते का?

१९३७ ते १९४१ च्या दरम्यान नॉर्थ कॅरोलिनाच्या परिसरात अनेक संशोधकांनी रोनॉके वसाहतीतल्या एलेनॉर डेर हिने माहीती कोरलेले दगड सापडल्याचा दावा केला. या दगडांवर लिहीलेल्या हकीकतीनुसार १५९९ पर्यंत स्वतः एलेनॉर हयात होती आणि रोनॉके बेट सोडून त्यांनी अमेरीकेच्या मुख्य भूमीच्या अंतर्भागात आश्रय घेतला होता. 'डेर स्टोन्स' या नावाने प्रसिद्ध झालेया या दगडांनी काही काळ चांगलीच खळबळ उडवली होती. परंतु १९४१ मध्ये बॉयडन स्पार्क्स या पत्रकाराने हा सगळा प्रकार म्हणजे एक बनाव होता हे सप्रमाण सिद्धं केलं.

१९९८ मध्ये इस्ट कॅरोलिना युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी रोनॉके वसाहतीतल्या इंग्रजांचं नेमकं काय झालं याचा छडा लावण्यासाठी रोनॉके बेटाच्या दक्षिणेला असलेल्या हॅट्रस बेटावर केप क्रीक इथे उत्खननाला प्रारंभ केला. रोनॉके बेटापासून सुमारे पन्नास मैलावर असलेल्या बेटावर उत्खननादरम्यान त्यांना एक १० कॅरेट सोन्याची अंगठी, दोन बंदुकांचे अवशेष आणि तांब्याची जुनी इंग्लिश नाणी आढळून आली. या अंगठीवर आढळलेल्या सिंहाची प्रतिमा असलेल्या खुणेवरुन आणि बंदुकांवर असलेल्या खुणांवरुन संशोधकांनी या दोन्ही गोष्टी केंडल नावाच्या इंग्रज अधिकार्‍याच्या मालकीच्या असाव्यात असा तर्क मांडला. हा केंडल १५८५-८६ च्या दरम्यान रोनॉके बेटावरच्या वसाहतीत वास्तव्यास होता आणि राल्फ लेनबरोबर इंग्लंडला परतला होता.

हॅट्रस बेट म्हणजेच जॉन व्हाईटने उल्लेख केलेलं क्रोएटन बेट!

ही अंगठी खरोखरच जर केंडलच्या मालकीची असेल तर १५८५-८६ पासूनच इंग्रजांचं क्रोएटन बेटावर येणं-जाणं होतं असा तर्क यातून निघतो. क्रोएटन आदिवासींशी इंग्रजांचे असलेले आपुलकीचे संबंध पाहता रोनॉके बेटावरच्या रहिवाशांनी क्रोएटन आदिवासींच्या वसाहतीत आश्रय घेतला असावा या दाव्याला बळकटी येते.

केप क्रीक इथे नंतरच्या उत्खननात अनेक गोष्टी आढळून आल्या. १६ व्या शतकात वापरली जाणारी इंग्लिश बनावटीची छोटी तलवार, तसंच पाटीचा एक लहानसा तुकडाही आढळून आला. या पाटीच्या एका कोपर्‍यात इंग्रजी M हे अक्षर जेमतेम दिसू शकत होतं. अशीच पाटी जेम्सटाऊन इथल्या उत्खननातही आढळून आली होती. अनेक आदिवासी वस्तूही या उत्खननात समोर आल्या.

जॉन व्हाईटने १५८५ ते १५८७ या दोन वर्षांच्या काळात अमेरीकेच्या पूर्व किनार्‍याचा उत्तरेला चीजपीक बे पासून दक्षिणेला केप लुकआऊट पर्यंत काढलेला नकाशा ब्रिटीश म्युझियममध्ये जतन करुन ठेवण्यात आलेला आहे. २०१२ मध्ये या नकाशाचं बारकाईने निरीक्षण करताना संशोधकांना एक विलक्षण गोष्टं आढळली. या नकाशात अमेरीकेच्या मुख्य भूमीवर सुमारे पन्नास मैल अंतर्भागात एका विशिष्ट भागावर X अशी गुप्त खूण केलेली संशोधकांना आढळून आली. ही खूण म्हणजे रोनॉके बेटावरच्या रहिवाशांना बेट सोडून स्थलांतर करण्याची वेळ आलीच तर आश्रय घेण्याची जागा असावी असा तर्क आहे.

जॉन व्हाईटच्या या नकाशातल्या खुणेच्या आगी उत्खनन करणार्‍या संशोधकांना मातीच्या भांड्यांचे काही तुकडे आढळून आले. त्याचबरोबर जवळच एका जुन्या आदिवासी वसाहतीच्या खुणाही त्यांना आढळून आल्या! जेम्सटाऊन वसाहतीतून दक्षिणेच्या दिशेला १६५५ पूर्वी कोणीही इंग्रज आल्याची नोंद आढळत नाही. या ठिकाणी आढळलेल्या भांड्यांचे तुकडे आणि केप क्रीक इथे सापडलेल्या भांड्यांमधलं साधर्म्य पाहता, रोनॉके बेटावरचे इंग्रज रहिवासी इथे आश्रयास आले असावे असा तर्क सहजच मांडता येऊ शकतो. भांड्यांच्या तुकड्यांप्रमाणे इथे बंदुकीच्या नळ्या, अन्न साठवण्याचा जार अशा अनेक जुन्या गोष्टी संशोधकांना आढळून आल्या आहेत.

रोनॉके बेटावरच्या इंग्रजांचं नेमकं काय झालं याचं समाधानकारक स्पष्टीकरण मात्रं कोणालाही अद्यापही देता आलेलं नाही.
रोनॉके बेटावरची ही वसाहत द लॉस्ट कॉलनी म्हणून अमेरीकेच्या इतिहासात अद्यापही एक रहस्यं बनून राहिलेली आहे!

संदर्भ :-

An account of the particularities of the imployments of the English men left in Roanoke by Richard Grenville under the charge of Master Ralph Lane Generall of the same, from the 17. of August 1585. until the 18. of June 1586. at which time they departed the Countrey; sent and directed to Sir Walter Ralegh. - राल्फ लेन
A Briefe and True Report of the New Found Land of Virginia - थॉमस हॅरीएट
The Historie of Travaile Into Virginia Britannia - विल्यम स्ट्रेची
Set Fair for Roanoke: Voyages and Colonies - डेव्हीड क्वीन
A New Voyage to Carolina - जॉन लॉसन
Big Chief Elizabeth: The Adventures and Fate of the First English Colonists in America - जाईल्स मिल्टन
Roanoke: Solving the Mystery of the Lost Colony - ली मिलर
A New World: England's First View of America - किम स्लोन

कथालेख

प्रतिक्रिया

वाचतेय.नव्या लेखमालिकेचं स्वागत.पुभाप्र.
हा भाग जरा जास्त मोठा झालाय का?

सामान्य वाचक's picture

25 Nov 2016 - 9:35 am | सामान्य वाचक

असले वाचले कि त्या फिरंग्यांबद्दल चिडचिड होते

महासंग्राम's picture

25 Nov 2016 - 9:39 am | महासंग्राम

वाह ... जबरदस्त मालिका सुरु केलीत देवा !!!

नाखु's picture

25 Nov 2016 - 10:21 am | नाखु

आणि अफाट आहे हे सारं.

फिरंगे पहिल्यापासून रक्त्पिपासू दिसतायत.

बोका-ए-आझम's picture

25 Nov 2016 - 10:27 am | बोका-ए-आझम

शेवटी या मालिकेला मुहूर्त मिळालेला आहे! पुभाप्र!

मारवा's picture

25 Nov 2016 - 10:30 am | मारवा

जबरदस्त !

टवाळ कार्टा's picture

25 Nov 2016 - 11:12 am | टवाळ कार्टा

जबराट

चांदणे संदीप's picture

25 Nov 2016 - 12:40 pm | चांदणे संदीप

याचेच तीन भाग करायला पाहिजे होते काय?

सविस्तर प्रतिसाद नंतर देतो!

Sandy

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Nov 2016 - 1:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

रोचक विषयावरील मालिकेची सुंदर सुरुवात ! खूप आवडली. पुभाप्र.

वसाहतवादाचा काळ जितका धाडसी दर्यावर्दी, नवीन जगाबद्दलचे कुतुहल आणि व्यापाराचे नवे मार्ग शोधणे या मानवाच्या चांगल्या गुणांनी भरलेला आहे तेवढाच तो स्वार्थ, खुनशीपणा, वंशवाद आणि नाव व पैसा कमावण्यासाठी कोणत्याही क्रूर थराला जाण्यात हयगय न करणार्‍या काळ्या मानवी स्वभावाचे दर्शन करणारा आहे.

लेखनाबरोबर संबधित नकाशे दिल्यास मजकूर समजायला मदत होऊन लेखमाला अधिकच रोचक होईल, असे वाटते. भाग जरा लहान असले तर बरे होईल. मजकूरातले काही तपशील जरा तपासावेत म्हणजे इतक्या सुंदर लेखनात किंचित कसरही राहणार नाही...

१. अलेक्झांडरने भूमध्य समुद्र ओलांडून पर्शियन साम्राज्य काबिज करुन भारतावर केलेलं आक्रमण...

अलेक्झांडरकडे नौदल नव्हते. त्यामुळे त्याच्या मोहिमांत भूमध्य समुद्र कधीच ओलांडला गेला नाही. त्याच्या सर्व मोहिमा खुष्कीच्या मार्गाने (जमीनीवरून) केल्या गेल्या. भूमध्य समुद्राच्या विरुद्ध तटावर असलेल्या इजिप्तलाही तो भूमध्य समुद्राच्या दक्षिण किनार्‍यावरून वळसा घालून गेला. पर्शियन नौदलाने त्याच्या या कमजोरीचा फायदा घेत त्याला खूप त्रास दिला होता.

२. भूमध्य समुद्राच्या दक्षिण किनार्‍याला असलेली बसरा, बगदाद ही बंदरं...

ही शहरे भूमध्य समुद्राला लागून नाहीत. टायग्रिस नदीशेजारी वसलेले बगदाद शहर कोणत्याही समुद्राला लागून नाही, ते बंदर नाही. बसरा हे अरबी खाडीच्या (अरेबियन/पर्शियन गल्फच्या) उत्तर टोकावर तिच्यात सामील होणार्‍या (टायग्रिस व युफ्रेटिस नद्यांच्या संगमाने बनलेल्या) 'शात अल् अरब' नावाच्या नदीवर वसलेले शहर व बंदर आहे.

वरुण मोहिते's picture

25 Nov 2016 - 1:04 pm | वरुण मोहिते

पुभाप्र