दंगल

कैलासवासी सोन्याबापु's picture
कैलासवासी सोन्याबापु in लेखमाला
29 Oct 2016 - 12:11 am

दंगल

भाग १ (सुरुवात) :-

अ‍ॅन ऑफिसर्स वाईफ.

अस्मिता आळस देत कूस बदलती झाली, तेव्हा राजेश उठला होता. तिच्या झोपी गेलेल्या पण शांत चेहर्‍यावर मिलनाची गोडी विलसत होती, तिचे ते रूपडे डोळ्यात साठवत राजेश उठला अन अलगद पावलांनी बाथरूममध्ये गेला, त्याने स्वतःला न्याहाळले. दाढी अंमळ वाढलीच होती. त्याने हळूच ट्रिमर सुरू केले.

दोन मिनिटांतच ट्रिमरच्या किरकिर आवाजामुळे झोप मोडलेली त्याची लाडकी अस्मी दारात येऊन उभी राहिली. पाठमोर्‍या राजेशला तिने डोळे भरून पाहिले. एखाद्या रोमन योद्ध्याचा पुतळा असावा तसे त्याचे स्नायू ठसठशीत दिसत होते. हलत्या हातासोबत पाठीचे स्नायूसुद्धा लयबद्ध हालत होते. चाहूल लागली म्हणून तो गर्रकन मागे वळला, तर स्वतःला बेडशीटमध्ये लपेटलेली अस्मी पाहून तो हसला. तिला म्हणाला,
"उठलीस! चहा घेणार?"
उत्तर आले नाहीच, कारण ट्रिमरचा आवाज म्हणजे ड्युटी हे समीकरण पक्के डोक्यात असलेली अस्मी, गोठून जागच्या जागी उभी होती. अर्ध्या तासात राजेशने त्याची सॅक भरली, चहा घेतला अन अस्मिताला जवळ घेऊन म्हणाला,
"मी लवकर परत येईन..."
क्षणात मन घट्ट करून तिने त्याला कव घातली, अन म्हणाली,
"ड्युटी फर्स्ट, ऑफिसर, ड्युटी फर्स्ट." पाठमोरा राजेश फाटकातून दिसेनासा होईपर्यंत ती त्यालाच पाहत होती, तेव्हा बाहेर अंधारच होता.

भाग २ :- खेळ मांडला....
बिहार-बंगाल-नेपाळ संयुक्त सीमेजवळ, हुजूरचक नामक एका छोट्याशा गावात 'अल रसूल मदरसा' नामक बोर्ड मिरवणार्‍या, एकूण ८ खोल्या असणार्‍या एका दोन मजली इमारतीच्या वरच्या उजवीकडल्या शेवटच्या खोलीत, जिथे मदरशाचे हेड हाफिज राहत, तिथे एक पठाण शेगडी शेकत बसलेला होता. बाहेर थंडी तोबा पडली होती. बिहारातल्या उत्तरभाग - नेपाळ तराईमध्ये थंडी अशीच पडते. उदासवाणी, मनहूस... इतकी मनहूस की दीड दीड महिना सूर्य दिसत नाही. २४ तास पूर्ण आसमंत काळपट धुक्याने ग्रासलेला असा असतो. पठाण शेगडी शेकत बसला होता, तेव्हा हाफिज साहेब एकदम आत आले अन म्हणाले,
"सलाम वालेकुम बशीरमियाँ, झोप लागली की नाही?"
"वालेकुम अस्सलाम. जी हाफिज साहेब, तुम्ही मेहमाननवाजी खूप केलीत, पण मला काही झोप लागली नाही."
"काही कमी राहिली का बशीरमियाँ?" गोरेमोरे झालेले हाफिज विचारते झाले.
"नाही नाही, हाफिज साहेब, कमी तुम्ही नाही केली, पण मला आजकाल झोप येत नाही. सतत ह्या देशामध्ये मारल्या गेलेल्या आपल्या मजलूम बंधू-बहिणींची सूरत दिसते, इंतकामची घडी कधी येईल ह्या विचाराने
अस्वस्थ होतं..."
क्षणभरात बशीरच्या डोळ्यात पेटलेला वडवनाल पाहून हाफिज मात्र शांत झाले. बशीर पुढे म्हणाला,
"नेपाळमधल्या मित्रांचे काय झाले आपल्या??"
"आज पोरगा निरोप घेऊन यावा अशी अपेक्षा आहे बशीरमियाँ."
"ठीक आहे, काही झाले तर कळवा मला." असे म्हणून बशीर आपल्या मोबाइलमध्ये तोंड घालून बसला, तेव्हा हाफिज
तिथून निघाले. रात्री ईशाची नमाज झाल्यावर जेवणे झाली, तेव्हा सगळे शांत शांतच होते. जेवण होऊन आचवल्यावर हाफिज हळूच बशीरला म्हणाले
"बसायचं का वरती?" तेव्हा बशीरने होकार देत वरचा रस्ता पकडला. आज वरच्या खोलीत इंतकाम शिजणार होता, अन लवकरच हुकूमत-ए-हिंद हादरणार होती. खोलीत पोहोचताच एक बाविशीचा पोरसवदा तरुण झटक्यात पुढे आला अन वाकून बशीरच्या हाताचे चुंबन घेत म्हणाला,
"सुभानअल्लाह, ह्या वाघाचे हात चूमता येतील असे कधी वाटले नव्हते, आज खूप भाग्याचा दिवस आहे माझा."
"रहमत, बेटे, इबादत फक्त अल्लाहची करायची. परत हात चूमण्याची गुस्ताखी करू नकोस. ती एक सुफीयाना विकृती आहे, शुद्ध धर्मात नाकबूल असलेली."
"जी"... असे म्हणत गोरामोरा रहमत बाजूला झाला, तसा बशीर खान मांडी पक्की करून बसला अन म्हणाला,
"रहमत मियाँ, अपना पुरा वाक्या बयान करो"
पुढे रहमतने त्याला सांगितले की काठमांडूमधील पाक हायकमिशनमधील पाकिस्तानी सफीर जनाब तारिक जमील बशीरचा दीदार करण्यास बेकारार आहेत अन त्यांना बशीरला मदत करायला प्रचंड आवडेल.
"अल्लाहने राह दाखवली म्हणायची" म्हणत बशीर आपल्या भरघोस दाढीवरून अत्यंत तृप्तीने हात फिरवू लागला होता,
तेव्हा रहमत विचार करत होता - बशीर खान, चौदा वर्षाचा होता तेव्हा ह्याने शाळा सोडली. त्यानंतर १९९२मध्ये दंगलीत ह्याचे आईवडील गेले. मधली वर्षे ह्याने काय केले कोणालाच माहीत नाही, पण २२चा होऊन जेव्हा ह्याने आपला कहर बरसवने सुरू केले, तेव्हा कोण्या एजन्सीला ह्याचे नावही माहीत नव्हते, कोणाकडे एकही फोटो नव्हता. इतके, की ते लोक बशीरला 'द बाँबर घोस्ट' म्हणत. 'बाँब फोडणारे भूत' तीन शब्दांत जबरी अर्थ होता अन अशा ह्या गाझीची सेवा करायचा मौका आपल्याला मिळाला आहे, ह्याचा अर्थ परवरदिगारच्या मनात काही वेगळेच आहे.... रहमतची तंद्री भंग पावली, तेव्हा बशीर त्याला तखलिया फर्मावत होता अन झोपायच्या तयारीत होता, हे पाहून रहमत लगबगीने दिवा मालवून बाहेर पडला.

भाग ३ :- प्रवास.

निरोप मिळल्याप्रमाणे बशीर खान काठमांडूमधील पाक हायकमिशनमध्ये पोहोचला होता. तिथे तो जनाब तारिक जमीलसोबत बसला होता. अन तारिकसाहेब त्याच्या तारीफचे पूल बांधत होते.
"वाहवा!! गाझी, वाह वा, तुम्ही खरे शेर ए इस्लाम आहात बघा बशीरमियाँ. बस, तुमच्यासारखे अजून दहा की भारत दार उल हरब चा दार उल इस्लाम व्हायला वेळ लागणार नाही."
चेहर्‍यावरचे मख्ख भाव तसेच ठेवून बशीर म्हणाला,
"ते सगळं ठीक आहे. तारीफ फक्त उपरवाल्याची करा, माझी नको. जरा कामाचे बोलू या का??"
"जी, जरूर जरूर" म्हणत तुपाळ हसत तारिक मियाँ पुढे म्हणाले,
"तुमचा पासपोर्ट तयार आहे, तो घ्या अन इस्लामाबादला पोहोचा. पुढील वार्ता तिथंच झालेली बरी. आजकाल दिवस खराब आहेत. माझ्याच हायकमिशनमध्ये हिंदुस्थानी कुत्री घुसलेली असतील का नसतील त्याचाही भरोसा देता यायचा नाही." तेव्हा फक्त पसंतीदर्शक मान हलवत बशीरने हलके स्मित केले.
त्याच दिवशी सायंकाळी पाकिस्तानच्या इस्लामाबाद एअरपोर्टवर नखशिखान्त पठाणी वेष केलेला बशीर उतरला अन बाहेर आला. ठरल्याप्रमाणे त्याला एक टोयोटा पिकअप ट्रक उभा दिसला. कोणालाही शंका येऊ नये अशा प्रकारे बशीर त्याच्या आजूबाजूला घुटमळू लागला. थोड्याच वेळात त्याला मागच्या नंबरप्लेट अन चॅसीजमध्ये खोचलेली किल्ली सापडली, ती गाडीला लावत त्याने सराईतपणे गाडी एअरपोर्टबाहेर काढली. डॅशबोर्ड उघडून पाहता त्याला एक पिस्तूल, एक कागद सापडला. कागदावरचे शब्द वाचून बशीरने अंमळ स्मित केले अन तो कागद चावून खाऊन टाकला. बशीरने अ‍ॅक्सिलरेटरवर पाय दिला अन सरळ वाट धरली ती पाकिस्तानी नॉर्थन प्रोव्हिन्सची. त्याचे लक्ष होते... नौशेरा. इस्लामाबादमधून बाहेर पडून त्याने हमरस्ता पकडला. थोड्याच वेळात कॅमबेलपूर गाव आले अन काही तासांनी नौशेरा. नौशेरामध्ये एखादी सराय पकडून आराम करावा, अशी विलक्षण ऊर्मी बशीरच्या मनात दाटून आली. पण त्याने स्वतःला समजवले, अन आपल्या रस्त्यावर चालू लागला, उत्तररात्री एकदाचा तो आपल्या इच्छितस्थळी पोहोचला. चित्राल! हिमालय हिंदुकुश गाठ असलेल्या भागात दक्षिणेला एक उत्तुंग हिमशिखर आहे. त्याचे नाव आहे तिरीच मीर, त्याच्याच पायथ्याशी यरकुम नदीकाठी वसलेले गाव म्हणजे चित्राल. स्वात खोरे अन चित्राल म्हणजे भूलोकीचे स्वर्ग, पण शापित!. बशीरसारख्यांना जन्नत. चित्रालला जेव्हा बशीर मस्जिदीत पोहोचला, तेव्हा कच्च्या सडकेमुळे आजूबाजूला धुळीचे लोट उठले होते अन टोयोटा पिकअपच्या प्रखर हेडलाइटमुळे प्रकाशाचा एक झोत तयार होऊन मस्जिदीच्या लोखंडी दिंडीवजा दरवाजावर पडला होता. थोड्याच वेळात एक पांढरी दाढीधारी स्थूल वयस्कर माणसाने त्या दिंडीतला झरोखा उघडून गाडी न्याहाळली अन हळूच दार उघडून बाहेर आला.
"दस्तखत...?" म्हातारा म्हणाला
"१९९२" बशीर बोलला.
"खुशामदिद बेटे, खुशामदिद" म्हातार्‍याने आता पूर्ण दार उघडले अन थोड्याच वेळात टोयोटा पिकअप गिळून तो दरवाजा पूर्वपदावर आला.

भाग ४ :- बंधुत्व, ब्रदरहुड अन खासी दंगल.

चित्रालच्या त्या थंडीतही बशीर सकाळी उठला अन वझू करून फजरेची नमाज पढला. त्याच्यासारखेच आजूबाजूला आणखी तीन तरुणसुद्धा नमाज पढते पाहून बशीरला खूप संतोष झाला. नमाजनंतर सकाळचा नाश्ता सुरू असताना सगळ्यांच्या ओळखी झाल्या. पहिला तौफिक. मूळ काश्मिरी. दुसरा मोहसीन मूळचा पेशावरचाच अन तिसरा हमजा प्रॉपर किशनगंज, बिहारचा. तिघेही मस्ताने होते, अल्लाहच्या वाटेवर कुर्बानी द्यायला तयार होते अन मुख्य म्हणजे अतिशय व्यवस्थित ट्रेन्ड होते. तिघांनाही बाँब बनवणे ते माथेफिरू भाषणे करणे यच्चयावत शिकवले गेले होते. अन बशीर? बशीरला तर ते सगळे गुरूच मानत आपला. रोजचे ह्यांचे रुटीन म्हणजे बाँब तयार करायची प्रॅक्टिस, अर्थात डमी साहित्य वापरून, दिवसाला ५ नमाज पढणे, रोज भारतीय अन जागतिक बातम्या घेऊन कुठे 'जिहाद करायची' गरज आहे ह्यावर खल करणे. साधारण पंधरवडा असा गेल्यावर त्यांची टार्गेट्स फिक्स झाली. पहिले दिल्ली शाहदारा मार्केट, दुसरे पुणे एअरपोर्ट अन तिसरे म्हणजे मुंबईमधल्या लोकल ट्रेन्स. आता ते पक्क्या इराद्याचे चारही मुजाहिद रोज नमाज पढताना अल्लातालाकडे कामयाबी मागू लागले होते. त्यांच्या ऑपरेशनचे नाव ठरले होते 'ऑपरेशन गाझी.'

रोज ऑपरेशन गाझीचा अभ्यास करताना त्यांना न्यूजपेपर वाचवा लागत असे. कायम बातम्या अभ्यासाव्या लागत. असाच एक दिवस मध्यपूर्वेतल्या बातम्यांवर चर्वितचर्वण करत बसलेल्या तौफिक, मोहसीन अन हमजाच्या मधोमध बशीरने एक पेपर भिरकावला, तसे सगळे त्याच्याकडे चमकून पाहू लागले. बशीरच्या चेहर्‍यावर अंगार पसरला होता. धुसफुसत तो म्हणाला,
"बघा, बघा काय दिवस आलेत इस्लामवर."
ती बातमी होती चीनमध्ये मुसलमान लोकांना रोजे ठेवायला केल्या गेलेल्या बंदीबद्दल. बाकी सगळे एकदम गंभीर होऊन बसले. काहीच बोलायला कोणीच तयार नव्हते. बशीर मात्र क्रुद्ध झाला होता. तो तसाच मोहसीनवर ओरडला,
"ह्या असल्या कुफरात निझामतीशी संग करतोय आपण. लाज वाटली पाहिजे पाकिस्तानी निझामतीला. मूर्ख लेकाचे. ह्यांच्या डोळ्यावर चिनी मदतीने झापडे आलीत."
मोहसीन फक्त गोरामोरा होऊन ऐकत होता.
"ते काही नाही." बशीरने जाहीर केले, "पहिले ह्या चीनमधील मजलूम बंधुभगिनींना मदत, मगच ऑपरेशन गाझी."
तिघांनी आश्चर्याने त्याच्याकडे चमकून पाहिले. हळूच खाकरत हमजा म्हणाला
"पण मियाँ...."
"पणबिण काहीच नाही. रोजेदारीला मना करतातच कसे हे नास्तिक चिनी??"
बशीरचा अवतार पाहून पुढे कोणीच काहीच बोलले नाहीत. थोड्या वेळाने मात्र तिघेही त्याला भेटले अन ह्या मॉडिफिकेशनला संमती कळवली आपली. आता रोजची तयारी चीनला डोळ्यापुढे ठेवून होऊ लागली. हे ऑपरेशन वेगळे असणार ह्याची बशीरने सगळ्यांना जाणीव करून दिली.

रमजानच्या पंधराव्या दिवशी मात्र ते निघाले. रमजान म्हणजे हिंसा न करायचा महिना. ऑपरेशन गाझीसुद्धा ईदनंतरच होते. पण इथे प्रश्न रमजान साजरा करायचाच होता, तो त्यांना सलत होता, अन म्हणून आत्ता चित्रालहून वेगात निघालेली टोयोटा पिकअप आझाद काश्मीरमार्गे चीनकडे सुसाट सुटली होती. थेट सियाचीनकडे जाणार्‍या रस्त्याला उजवीकडे टाकून त्यांनी डावी बाजू धरली अन अफगाणिस्तान-ताजिकिस्तान-चीन-पाकिस्तान सीमावर्ती भागाकडे मोर्चा वळवला. ह्या भागात सीमा वगैरे कागदोपत्रीच असतात, राष्ट्र अगदी चीनसारखे बलाढ्य असले तरी!. सुसाट धावणार्‍या त्या टोयोटा पिकअपचे लक्ष्य होते उरमुकी शहर. उईघुर मुस्लीम बांधवांचे शहर. खाशा तुर्की वंशाच्या मुस्लिमांचे घर. झिन झियांग प्रोव्हिन्सची राजधानी, हानवंशीय चिनी लोकांच्या टाचेखाली रगडला जाणारा सामान्य उईघुर. चौघे उरमुकीमध्ये पोहोचले, तेव्हा रात्र झाली होती. त्यांच्या लोकल काँटॅक्टने भीतभीतच नमाज पढली, कसाबसा इफ्तार झाला अन रात्री खलबते शिजू लागली.
"तुम्हाला लाज कशी नाही वाटत अशा कुफरातमध्ये राहायला?"
बशीरने विचारले, तसे तो चिनी उईघुर मनुष्य मान खाली घालून रडू लागला. बशीरसहित चौघांनी त्याला सावरले. नंतर जवळपास रात्रभर ते त्याचे बौद्धिक घेत होते, सकाळ होऊ लागली, तशी त्यांनी फजरची नमाज पढली, त्या उईघुर भावाला गळ्याशी लावले आल्या पावली परत फिरले. जाता जाता मात्र त्यांनी एक टोयोटा पिकअपच्या मागे लावून आणलेला भलाथोरला बॉक्स तिथेच सोडला, अन आल्यामार्गी परत फिरले, एकंदरीत बशीरने घेतलेले उरमुकीतल्या भावाचे बौद्धिक अन त्याचा गाझी आवेश पाहून सगळे त्याचे निस्सीम चाहते झाले होते. चीनमधून आल्या मार्गी ही मंडळी परतली, तेव्हा म्हातारे इमाम त्यांची वाटच पाहत होते. परत आल्या आल्या आन्हिके आटोपल्यावर त्यांनी बशीरला गाठले, अन घसा खाकरून ते म्हणाले,
“बेटे, तू उईघुरमध्ये जाऊन जे बळ तिथल्या उम्माहला दिलेस, ते स्पृहणीय आहेच. फक्त आता बघ, कसे आहे... आपले ऑपरेशन गाझी दोन दिवस पुढे ढकलले गेले आहे, त्यामुळे आपले पाक सरकारमधले मित्र जरा नाराज झालेत. त्याचसंबंधी चर्चा करायला त्यांचे दूत कमालमियाँ इकडे आले आहेत. त्यांना बाहेर ठेवले आहे एका ठिकाणी. ते दुपारी येतील, तेव्हा जरा त्यांच्याशी बोलून घे कसा.”
हे ऐकून बशीर रागाने तांबडालाल झाला, पण वरकरणी तो इमाम साहेबांना म्हणाला,
“ठीक आहे इमाम साहेब, येऊ दे त्यांना.”
दुपारी कमालमियॉ आले, तेच ह्या पोरांची कानउघडणी करायच्या विचारातच.
“पण मी म्हणतो, तुम्हाला चीनमध्ये जायची काही गरज होती का??”
बशीर त्वेषाने म्हणाला, “जनाब, एकटा हिंदुस्तान असता तर बरे होते. इथे पूर्ण जग इस्लामविरुद्ध उभे आहे अन तुम्ही निवडक दुष्मनी काढता आहात?? लाज वाटली पाहिजे तुम्हाला.” कमालमियाँ अर्धे तिथेच गार झाले. नंतर त्यांना काही समजुतीच्या गोष्टी सांगून बशीरने त्यांना ऑपरेशन गाझी अगदी सफल करायची ग्वाही दिली अन वाटेला लावले.
परत एकदा त्यांची अगोदरचीच दिनचर्या सुरू झाली अन एकदाचा रमजान संपला. एके दिवशी त्यांनी प्रस्थान करायची तयारी केली. चौघांनीही आपले केस कापले, काखांवर अन नाजूक अवयवांवर असलेले केसही साफ केले, आंघोळ करून अत्तर लावून सुरमा भरून ते लोक तयार झाले अन निघाले, तेव्हा म्हातारे इमाम संतोषाने आपली तस्बी जपत होते.

भाग ५ :- नारा ए तकबीर (युद्धघोष)

चित्रालहून निघून चौघे पहिल्याप्रमाणेच इस्लामाबादला पोहोचले. तिथे टोयोटा पिकअप त्यांनी एका निर्जन ठिकाणी उभा करून सोडून दिला अन तडक आयएसआयच्या ऑफिसमध्ये पोहोचले. तिथे सगळ्यांनी त्यांचे अभिनंदन अन कौतुक केले अन त्यांना शुभेच्छा दिल्या. एका वरिष्ठ अधिकार्‍याने त्यांना पुढील कार्यक्रम सांगितला अन भविष्यात करायच्या ऑपरेशनबद्दलही माहिती दिली. त्यांचा निरोप घेऊन चौघेही पाकव्याप्त काश्मिरात जायला निघाले. सरतेशेवटी ते हिंदुस्तानी लहू बरबाद करायला निघाले होते. पाच दिवस पाकव्याप्त कश्मीरमध्ये राहून त्यांनी एक जुम्मा मुक्रर केला अन त्या दिवशी ईशाची नमाज पढून ते नापाक भारतात घुसायला सज्ज झाले. पाकिस्तानी आर्मीच्या नॉर्दन लाईन इन्फंट्रीच्या गाडीने त्यांना सांबा सेक्टरमध्ये एल.ओ.सी.वर सोडून नॉर्दनची माणसे परतली, तेव्हा त्यांच्यापैकी एकाचेही हृदय धडधडत नव्हते. अतिशय तयारीचे असे ते चार दहशतवादी भारतावर हल्ला करून जखमी करायला सज्ज झाले होते. रात्री त्यांनी साधारण ९ वाजता पायी चालायला सुरुवात केली होती. १२च्या सुमारास ते नियंत्रण रेषा ओलांडून भारतात दाखल झाले, तेव्हा आजूबाजूला नुसता बर्फ होता अन स्मशानशांतता होती.

भारतीय हद्दीत घुसल्यावर मात्र ते चौघे अर्धा तास कानोसा घेत बसून राहिले. कुठेच काहीच हालचाल होईना, तसे ते दबकत पुढे सरकू लागले. इतक्यातच, अगदी जवळून अतिशय जोरात एक युद्धघोष ऐकू आला 'राजा रामचंद्र की जय' अन अंदाधुंद गोळीबार सुरू झाला. दुर्दैवाने पहिल्याच फटक्यात बशीरला गोळी लागली अन बशीर खाली पडला. जवळपास पाऊण तास गोळीबार झाल्यावर एकदम शांतता पसरली अन युद्धघोष देणारी पार्टी पुढे सरकू लागली. ते भारतीय थळसेनेचे बहादुर ग्रेनेडियर्स रेजिमेंटचे जवान होते, अन त्यांच्या त्या दस्त्याचा प्रमुख होता तारुण्याने मुसमुसलेला आडदांड शरीरयष्टीचा एक बुंदेलखंडी अधिकारी, मेजर शौकत शफी. जवानांनी चारही बॉडी तपासल्या. बशीरला फक्त गोळी चाटून गेली होती, त्याचा खांदा दुखावला होता अन रक्तस्राव सुरू होता. उरलेल्या तिघांपैकी तौफिक अन मोहसीन भारतीय गोळ्यांना बळी पडले होते, अन भारतीय सैन्याच्या हाती सापडायला नको आपण म्हणून हमजाने एक ग्रेनेड वापरून स्वतःलाच उडवून घेतले होते. त्याच्या अवशेषांच्या १० फुटाच्या परिघात नुसता रक्ताचा सडा सांडला होता.
“साबजी, यो तो जिंदा से, के करणा से इसका??” रतनसिंग जाट नामक नायकाने शौकतला विचारले, तसे शौकत मंद हसत म्हणाला,
“उठा के मेरे जिप्सी मे डालो भडवे को” अन स्वतः झपझप चालत निघाला. लोकांनी बशीर, तौफिक अन मोहसीनला उचलले अन बशीरला शौकतच्या गाडीत टाकले. बाकी दोन मढी त्यांच्या दुसर्‍या गाडीत टाकून जप्त केलेले गोळाबारूद नीट रचून ठेवले अन ते परत बेसकॅम्पला निघाले. परत येताना रस्त्यात अशाच एका घाटावाटाच्या वळणावर शौकत जिप्सी चालवण्यावर लक्ष केंद्रित करत असतानाच बशीरला शुद्ध आली, तरीही तो किलकिल्या डोळ्यांनी पाहत तसाच पडून राहिला. रस्त्यात एक छोटा पूल आला तसा बशीर सावध झाला, अन चक्क उठून बसला. त्याच्या तशा बसण्याने शौकत एकदम गडबडला अन त्याने करकचून ब्रेक मारत जिप्सी थांबवली, तेव्हा बशीरने आपली लपवलेली पिस्तूल काढली होती. पिस्तूल कानावर ठेवून तो शौकतला म्हणाला,
“गाडी रोको.” तसे शौकत शांतपणे त्याच्याकडे पाहून म्हणाला,
“आप होश मे आ गये भाईजान. जल्दी किजीये, वरना सब गुडगोबर हो जायेगा.”
त्याच्याकडे पाहत त्याच्या नेहमीच्या शैलीत मंद हसत बशीर म्हणाला “शुक्रिया भाईजान, अपना ख्याल रखना.”
असे म्हणत तो जिप्सीखाली उतरला, अन पुलाच्या एका कठड्याकडे सरकू लागला तेव्हा मागच्या गाड्यातले जवान खाली उतरून धावत त्याच्याकडेच येत होते. तेवढ्यात विद्युतवेगाने शौकत खाली उतरला अन त्याने बशीरच्या दिशेने एक गोळी झाडली. “अल्ला हु अकबर” अशी आरोळी ठोकत बशीर जवळपास ४० फूट खाली नदीच्या पात्रात पडला. मागून आलेले जवान शौकतला विचारू लागले,
“साब आप ठीक तो हो न?”
“हा यार, मै ठीक हूं. साला भाग राहा था. उडा डाला मैने. रिपोर्ट मे लिखना की लाईन पर चार बंदे मर गये और दो ही बॉडी रिकव्हर हुई.”
“ठीक है सर, अब साले की बॉडी पाकिस्तान मेही जाएगी बहके.” त्यावर नुसते हूं करून शौकत अन त्याची पार्टी परत कॅम्पकडे कूच करती झाली.
इकडे नदीत पडलेला बशीर पोहत एका काठाला लागला होता. तिथे त्याने विशिष्ट खूण असलेली एक झाडी हुडकली अन तिथे ठेवेलेला कोरडा पठाणी ड्रेस अन बूट परत परिधान केले. तेव्हा त्याचा चेहरा शांत होता.

भाग ६ :- शेवट.

बशीरला भारतात तसे पाहता धोकाच नव्हता. त्याचा फोटो कुठल्याही एजन्सीकडे नव्हता, अगदी आर्मीकडेसुद्धा नाही. आपण काय केलेय ह्याचे शौकतला भानही नसावे. अशात बशीर उजळ माथ्याने जम्मूतावीला पोहोचला अन विनातिकिटच जम्मूतावी-भोपाळ गाडीत बसला. बसल्यावर तो जो झोपी गेला, ते थेट नवी दिल्ली स्थानक आल्यावरच उठला. बाहेरची गर्दी पाहून त्याने समाधानाने सुस्कारा सोडला अन टंगळमंगळ करत तो निघाला ते दिल्लीतल्या मयूर विहारकडे, तेव्हा त्याने खिशातले पिस्तूल चाचपले अन परत एकदा नीट ठेवले. मयूर विहारात पोहोचताच त्याची नजर शोधक होती, पण त्याची पावले सराईत होती. तो कोणाच्याही खास दृष्टीस न पडता युनिट नंबर २०२समोर पोहोचला. त्याने दाराबाहेरून कानोसा घेतला ते घरात सिंक अन भांड्यांचा आवाज येत होता. त्याने आपल्या पठाणीच्या कफलिंकमधून एक पिन काढली अन अतिशय सावधपणे लॅच लॉक सोडवत दार उघडले अन मांजराच्या पावलाने तो भांड्यांच्या आवाजाकडे सरकू लागला. किचनमध्ये पोहोचताच त्याने आपले पिस्तूल काढले अन हळूच ते फ्रीजवर ठेवत पाठमोर्‍या उभ्या त्या आकृतीवर त्याने झडप घातली अन एकदम ओरडला,
“अस्मे, सरप्राइज.............!!!”
एकदम दचकलेली अस्मिता आधी तर बशीरच्या वेषातल्या राजेशला पाहून विलक्षण दचकली, धडपडून मागे सरकली अन एकदम ओरडली,
“मूर्खा, हा काय अवतार करून घेतलाय? कोणीतरी मानेल का तुला एक अधिकारी म्हणून...” अन लगेच ओलावत्या डोळ्यांनी ती त्याच्या गळ्यात पडली अन एकदमच तिने प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. तिला थोपवत तो म्हणाला,
“तूला मी काही उत्तरे नाही देऊ शकत ह्याची तुला कल्पना आहे न अस्मे??”
“...........” क्षणभर व्यग्र चेहरा करून अस्मिता त्याच्या जवळ आली, हलकेच त्याच्या ओठांवर ओठ टेकले अन मग मागे सरकून म्हणाली,
“ड्युटी ऑलवेज फर्स्ट, माय ऑफिसर.” मग तिने त्याला जेवायला वाढले अन स्वतः ऑफिसला जायच्या तयारीला लागली. ती ऑफिसला जायला निघाली, तेव्हा तिने त्याला विचारले,
“आता इतक्यात नाही न शिलंगण नवे कुठले??”
नकारात्मक मान हलवून फक्त त्याने त्याचे सिग्नेचर हलके स्मित केले अन म्हणाला,
“सध्यातरी नाहीये काही हाताशी आलेले, तोवर इकडेच दिल्लीत.”
“डिनर, टुनाइट अ‍ॅट २०:०० अवर्स, आयटीसी मौर्य शेरेटन, चाणक्यपुरी. कम ड्रेस्ड लाईक माय बोल्ड ऑफिसर, मे बी यू विल इव्हन गेट लकी टुनाईट माय लवली टेररिस्ट..” असे म्हणून डोळा मारत ती ऑफिसला निघून गेली, तसे राजेश थोडा सैलावला. थोड्या वेळात तो बाथरूमला गेला. किट काढून चेहरा पूर्ण स्वच्छ केला. छानसे डेव्हिडॉफचे आफ्टरशेव लावले. नंतर त्याने वॉर्डरोब उघडला, फ्रीजवरचे पिस्तूल त्यातल्या एका गुप्त खणात ठेवले. त्यातून काढूनच भारत सरकारचे अधिकृत ब्लेझर उर्फ नेव्ही ब्लू ब्लेझर अन त्याला जुळती ट्राउझर घातली. केस नीट सेट केले, अन पार्किंगमधून त्याची आवडती स्कॉर्पिओ काढून तो लोधी रोडकडे निघाला.
भाग ७:- डीब्रीफिंग.

लोधी रोडच्या त्या बिल्डींगच्या पार्किंग लॉटमध्ये राजेशने सराईतपणे रोजच्या सवयीने स्कॉर्पिओ उभी केली अन खिशातून एक आयडी काढून हाती घेतला. गेटवर तो आयडी स्वाईप करून तो आत गेला अन सहज चालत चालत पाचव्या मजल्यावर, 'कॉन्फरन्स रूम' असे लिहिलेल्या खोलीबाहेर पोहोचला. दारावर टकटक करून तो आत गेला. तिथे रॉचे मुख्य असणारे सेक्रेटरी (आर) विजय खोवाल निवांत बसले होते. त्यांना रीतसर जयहिंद करून राजेशने अर्धवर्तुळाकार आकारात बसलेल्या डीब्रीफिंग कमिटीमधल्या सगळ्या सदस्यांना अभिवादन केले अन त्या अर्धवर्तुळ कमिटीच्या मधोमध असलेल्या एका रिकाम्या खुर्चीवर निवांत बसला. थोडे स्थानापन्न झाल्यावर कमिटी प्रमुख असलेल्या खोवाल सरांनी त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली.
"तुझं नाव??"
"राजेश शिवराम देशकर."
"हुद्दा?"
"डेप्युटी फील्ड ऑफिसर, यू सेक्शन."
"डीब्रीफ प्लीज."
"सर, ह्या ऑपची सुरुवात झाली ती रमजानच्या दोन महिने अगोदर. बशीर हा लोन वूल्फ होता, द घोस्ट हू बाँब्स अशी त्याची ख्याती होती. तसा तो सापडणे कठीण होते, पण त्याने एक घोडचूक केली होती. मागे झवेरी बाजार ब्लास्ट झाले, तेव्हा तिथे स्फोटकांची पिशवी ठेवणारा बशीरच होता. त्या प्रसंगीसुद्धा त्याने आपले तोंड झाकले होते. फक्त बाँब ठेवून परत फिरताना अगदी सेकंदभराकरता त्याच्या चेहर्‍यावरचा दुपट्टा सरकला होता. अर्थात ज्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याने त्याची ती प्रतिमा पकडली, तो काही फार उच्च नव्हताच, त्यामुळे तो व्हिडिओ पाहूनही मुंबई पोलिसांना त्याचा काही खास फायदा झाला नव्हता, इंटेलिजन्स ब्युरोला मात्र त्यात रुची होती. त्यांनी तो व्हिडिओ मिळवला अन त्यांच्या खास इमेज प्रोसेसिंग सेंटरला पाठवला. अत्युच्च दर्जाचं रेंडरिंग सॉफ्टवेअर वापरून तिथल्या तज्ज्ञ मंडळींनी त्याचा चेहरा जवळपास ८३% बरोबर रेंडर केला होता. परत तो फोटो अजून फुलप्रूफ करायला ९२च्या दंगलीच्या वेळी तो ज्या शाळेत होता, तिथल्या रेकॉर्डवरून त्याचे वेगवेगळ्या फॉर्मवर असलेले पासपोर्ट साईझ फोटो आयबीने मिळवले अन त्यांना परत एकदा बेसला ठेवून एज प्रोजेक्शन इम्पोज केले, तेव्हा त्याचा चेहरा जवळपास ९१% बरोबर रेंडर झाला. तो फोटो मुंबई पोलिसांना परत न देता वापरायचे आयबी अन रॉचे आपापसात ठरले अन त्यांनी मुंबई पोलीस कमिशनर ह्यांना विश्वासात घेऊन सगळे स्पष्ट केले. सर, आपण त्यांचे आभार मानायला हवेत, कारण प्रेस ते सोशल मीडिया बदनामी सहन करून मुंबई पोलिसांनी ती फाईल बंद केली बळेच अन ती पूर्ण फाईल आपल्याकडे आली. बशीरच्या आधीच्या बाँबिंग पॅटर्नला त्या फाइलसोबत ताडण्यात आले अन बशीरची पूर्ण व्यक्तिरेखा हाती आली. त्या व्यक्तिरेखेवरून आयबीची काउंटर इंटेलिजन्स टीम त्याच्यामागे हात धुवून लागली अन जवळपास रमजानच्या १५ दिवस आधीच त्याला इंटरसेप्ट करून त्यांनी इंदोरजवळ एन्काउंटर केले. अर्थात, तो लोन वूल्फ असल्यामुळे कुठलीही दहशतवादी संघटना त्याच्यामुळे अ‍ॅलर्ट होणार नाही, हे आमचे मूळ गृहीतक होते, जे पुढे बरोबर ठरले. असा हा लोन वूल्फ भयानक माणूस जर इस्लामची सेवा करायला चार लोकांत मिसळतो म्हणाला, तर पहिले म्हणजे प्रस्थापित नेटवर्क एक्साइट होतील हासुद्धा आमचा अदमास खरा ठरला, अन त्याच्याशी जुळती चेहरेपट्टी अन शरीर असलेला मी बशीरच्या व्यक्तिमत्त्वात मर्ज झालो. आयबीच्याच बिहार युनिटकडून आम्ही पाक उच्चायुक्त नेपाळसोबत कोण रेग्युलर टचमध्ये आहे हे जाणून घेतले अन मग आयबीने सायकॉलॉजिकल युद्धाची एक अप्रतिम खेळी करत, प्रेसमधल्या आपल्या काही खबरी लोकांना हाती धरून बशीर बिहारकडे जाण्याची 'शक्यता' वर्तवली. अर्थात हा रिपोर्ट प्रेसकडे देणार्‍या अधिकार्‍याने 'नाव उघड न करण्याच्या बोलीवरच' दिला होता. तेव्हा बिहारमधल्या कट्टर मुस्लीम वर्तुळात एक आनंदाची लाट पसरली. अशातच आम्ही नेपाळमधल्या पाक एम्बसीच्या सर्वात जवळ असणार्‍या हुजूरचक गावच्या अल रसूल मदरशाला निवडले अन त्यांच्या अतिविश्वासाचा नैसर्गिक फायदा घेऊन पाकच्या कुरियर सर्किटमध्ये प्रवेश मिळवला. अर्थात त्यानंतर इस्लामाबादला पोहोचणे मला काही खास कठीण जाणार नव्हतेच. इस्लामाबादहून चित्रालला गेल्यावर मला हे नेटवर्क आणखी सखोलरित्या अभ्यासता आले. त्यांची भारतातली स्लीपर सेल्स वगैरे कळली. ती पूर्ण लिस्ट मी माझ्या रिपोर्टच्या परिशिष्ट 'क'मध्ये संलग्न केली आहेच. परत येताना माझ्यासोबत तीन दहशतवादी होतेच. इथून निघायच्या अगोदरच ठरलेल्या आमच्या प्लॅननुसार मी त्यांना बरोबर ग्रेनेडियर्सच्या गस्तीच्या वाटेवर नेले, अन तिथेच खलास करवले. इथेच आम्ही मिलिटरी इंटेलिजन्सला मदतीला घेऊन त्यांचाच अधिकारी असलेल्या शौकतला सोबत मिळवले. आमच्या विनंतीनुसार त्याने नियंत्रण रेषेकडून परतीच्या रस्त्यावर मला पुलावर गोळी घालायचे नाटक नीट वठवले, अन मी परत सर्किटबाहेर निघालो. आता पाक सर्किट समजते आहे की मी उर्फ बशीर शहीद झालाय, पण सत्य हे आहे की आयबीने तो ३ महिने अगोदरच खलास केला होता. आर्मीने मिलिटरी इंटेलिजन्सच्या विनंतीला मान देऊन, शौकतवर नाममात्र कारवाई करून - म्हणजेच एक रेप्रीमाइंड नोटिस देऊन त्याला परत सर्व्हिसवर बहाल केले आहे. ह्या सगळ्यामुळे भारतातील स्लीपर सेल्ससुद्धा निर्धास्त आहेत, कारण एकही दहशतवादी परत जिवंत पकडला गेला नव्हता, म्हणजे त्यांची माहिती त्यांच्या लेखी सेफ होती. नदीत उडी मारल्यावर मी थेट दिल्ली गाठले, तरी एक सेफ्टी मेजर म्हणून मी थेट हेडक्वार्टरला न येता आधी अर्धी दिल्ली फिरून घरी गेलो, तिथे माझा अवतार ठीक केला, अन आज इकडे आलोय. ह्या सगळ्यात माझे कोऑर्डिनेटर सध्या कमिटीत बसलेले माननीय सी रामाराव सर हे होते.
धन्यवाद”.
आता सगळ्यांच्या नजरा रामाराव सरांकडे वळल्या, तेव्हा ते म्हणाले,
“ह्याला लेव्हल ५ डेल्टा क्लियरन्स होता, म्हणून हे ऑप फक्त प्रधानमंत्री कार्यालय अन माझे ऑफिस इतकेच मर्यादित होते, हे मी ऑन रेकोर्ड देऊ इच्छितो आता.”
सेक्रेटरी सर त्यावर मिश्कील हसले अन म्हणाले,
“That concludes the debriefing meeting, unless the honorable members have some questions.”
त्यांची परवानगी घेऊन कमिटी मेंबर असलेल्या मेघनेत्रा दास, अतिरिक्त सेक्रेटरी बोलल्या,
“राजेश, आता माझ्या समोर आलेली माहिती अन ऑपरेशनची टाईमलाईन पाहता, तू तुझ्या शेड्यूलवर २ दिवस लेट होतास असे समजते, तेव्हा तू ते जस्टिफाय करायला हवेस, तेही ऑन रेकॉर्ड, कारण तू बिहाईंड एनिमी लाईन्स होतास. Do you have any answer for the same?”

उत्तरादाखल राजेशने बाजूच्याच टेबलवर ठेवलेले, आपल्यासोबत आणलेले इंडियन एक्स्प्रेसच्या जुन्या अंकातले अंतरराष्ट्रीय घडामोडींचे पान उघडले अन सेक्रेटरी साहेबांना दिले. त्यात एक ठळक बातमी होती, ‘Ethnic and religious strife between uighur muslims and han natives of china resulted into a riot, causing death of 45 chinese ethnic han people including 15 police personnel and 25 uighur muslims, with a loss of property amounting in tune of $30 millions, in Urmuqi which is the capital of uighur dominated Xin Xiang province. (Reuters)”
ती बातमी वाचून पूर्ण कमिटी सर्दच झाली, क्षणभर शांततेत गेल्यावर सेक्रेटरी करड्या आवाजात म्हणाले,
“राजेश तू एक अनसँक्शन्ड ऑप कसे केलेस?? you have to answer it right away young man, because this could had been a serious issue for diplomatic brigade in North Block.”
“Surely sir, I am answering this. पहिले म्हणजे मी राष्ट्रीयत्व न मानणारा एक कट्टर मुस्लीम आहे हे मला पाकिस्तानी सर्किटमध्ये समजवता आले. दुसरे म्हणजे एवीतेवी चीन कुरापती काढतच असतो, कोण्या दुसर्‍याच्या खांद्यावर बंदुकी ठेवून मला त्यांना एक गोळी घालता आली, तर त्यात चूक ते काय?? इथे रॉ किंवा भारत सीनमध्येच नाहीये, तर मी उरमुकीमध्ये ज्याला भेटलो, त्याला एकांतात मी पाकिस्तानी असल्याचेच सांगितले होते. चिन्यांना थोडा असंगी संगाचा प्रसाद दिला. अन हो, प्रोसिजर तोडायचा गुन्हा मी केलाय, पण राष्ट्रीय हितात केलाय, मी त्याची पूर्ण जबाबदारी एकटा घेतो. धन्यवाद.”
हे उत्तर ऐकून कमिटी विचारमग्न झाली अन त्यांनी राजेशला ५ मिनिटे बाहेर जायला सांगितले. तो बाहेर गेल्यावर कमिटी आपापसात चर्चा करू लागली.
“पोरगा डेरिंगबाज आहे, मानावे लागेल.” सेक्रेटरी.
“पण असा पायंडा पडायला नको. इंटेलचा धंदा तसाही ५०% नशिबावर चालतो. ह्या वेळी त्याचे नशीब जोरात होते. पुढे एखाद्याचे नसेल, त्याने खूप प्रॉब्लेम होऊ शकतात. आपले एजंट्स शहीद होऊ शकतात. तेव्हा काहीतरी करणे गरजेचे आहेच.” मेघनेत्रा दास मॅडम.
“एक काम करू या. त्याला ५ महिने डेस्क ड्युटी देऊ या. मी त्याला ट्रेन केले आहे, त्याला ५ महिने म्हणजे नरकवासाची शिक्षा होईल असले ते पोरगे फील्डमध्ये आहे.” राव सर.
“त्याशिवाय तो चीनमध्ये इन्फिल्ट्रेट करून आलाय. त्याला एकदा परत मानसिक स्वास्थ्य चाचणी क्लिअर करावी लागेल, कारण तो कम्युनिस्ट देश आहे अन तिकडे जाऊन कोणीही इम्प्रेस होऊ शकते.” सेक्रेटरी म्हणाले. ह्यावर राव साहेबांनी थोडी नाराजी दर्शवली, पण शेवटी त्यांनी ते मान्य केले.
त्यांनी परत आत बोलवून राजेशला त्याची शिक्षा सांगितली, तेव्हा तो थोडा नाराज झाला. त्याला सेक्रेटरी विचारते झाले,
“तू नाराज का आहेस राजेश? मानसिक चाचणी द्यावीच लागेल बेटा तुला.”
“ते ठीक आहे सर, पण ५ महिने फाइल्सच्या ढिगात का गाडता आहात मला?”
त्याने हा प्रश्न विचारला, तेव्हा राव सर मिश्कील हसत होते. हो-नाही करता करता त्याला लगेच तिथेच टेस्ट द्यायला सांगण्यात आले. लगेच प्यून्सने बसायची संरचना बदलली. तिथे आता एक टेबल, मंद लाल दिवा अन समोरासमोर दोन खुर्च्या लावण्यात आल्या. तातडीचा निरोप पाहून एम्समधील मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर आले अन तासाभरात राजेश त्यांच्यासमोर बसला होता.
डॉ. समर पासवान त्याला म्हणाले,
“राजेश, लोड घेऊ नकोस. आपण वर्ड असोसिएशन गेम खेळणार आहोत.” त्याला राजेशने मान डोलावल्यावर ते पुढे म्हणाले, "मी एक शब्द देईन, त्याला संलग्न पहिला शब्द जो तुझ्या मनात येईल, तो तू लगेच मला सांगायचास." प्रश्नोत्तरे सुरू झाली.
“रंग?”
“पिवळा.”
“काम?”
“पूजा.”
“जेवण?”
“पुरणपोळी.”
“संगिनी?”
“पिस्तूल.”
“प्रेम?”
“अस्मिता.”
हे सुरू असतानाच पलीकडल्या खोलीत कमिटी हे सगळे पाहत अन ऐकत होती. राव सर आपल्या बेस्ट बॉयकडे कौतुकाने पाहत होते, तेव्हाच मेघनेत्रा मॅडम अन सेक्रेटरी साहेबांची नेत्रपल्लवी झाली अन रावांच्या खांद्यावर हात ठेवून ते म्हणाले,
“त्याच्या रेप्रीमाइंड अँड डिसिप्लिनरी मेमोमधून ५ महिने ऑफिस ड्युटी काढून टाक, बरं का राव” अन ती जोडगोळी तिथून निघून गेली, तेव्हा ओलसर डोळ्यांनी राव स्क्रीनकडे पाहत होते. इकडे पासवान प्रश्न विचारते झाले,
“राजेश, देश?”
“फक्त माझा भारत”
राव सरांनी संतोषाने स्क्रीन ऑफ केला अन दार बंद करून ते निघून गेले.
1
(लेखनसीमा)
(कथा पूर्णतः काल्पनिक, कुठल्याही जिवंत अथवा मृत व्यक्ती, प्रसंगाशी साधर्म्य आढळल्यास तो फक्त एक योगायोग असेल.)

प्रतिक्रिया

शिवोऽहम्'s picture

29 Oct 2016 - 2:14 am | शिवोऽहम्

राजेश देशकर ईज बॅक!

महासंग्राम's picture

29 Oct 2016 - 10:25 am | महासंग्राम

बापप्पूऊऊऊउ देवा कडक दंडवत घ्या.... जबरदस्त झालीये कथा !!!

बोका-ए-आझम's picture

29 Oct 2016 - 5:50 pm | बोका-ए-आझम

एकदम ईअन फ्लेमिंग स्टाईल.

टवाळ कार्टा's picture

29 Oct 2016 - 8:56 pm | टवाळ कार्टा

भारी

कथा आवडली, जराशी फिल्मी वाटली पण मस्तय!
खर्‍या आयुष्यात ह्याहूनही गुंतागुंतीची सैनिकी ऑपरेशन्स होत असतील आणि त्यामागचे शूर वीर नेहमीच अनाम राहत असतील...

कैलासवासी सोन्याबापु's picture

29 Oct 2016 - 9:33 pm | कैलासवासी सोन्याबापु

मुद्दाम फिल्मी केली आहे, एकतर दिवाळी, त्यात रहस्यकथा जास्त हिंसा किंवा बीभत्सरस न झिरपू देता बसवायचा मानस होता मग जे हाती आहे त्याचेच थोडे अँपलीफिकेशन केलेन!

खऱ्या आयुष्यातली ऑप्स खूप वेगळी असतात हे मात्र खरंय तुमचं

तुमच्या कथेवर सिनेमा बनू शकतो! बनलाच तर मला सिनेमा बघायला पास हवा! =))

आनंदराव's picture

29 Oct 2016 - 10:23 pm | आनंदराव

कडक

बॅटमॅन's picture

29 Oct 2016 - 11:07 pm | बॅटमॅन

एकदम कडक कथा. आवडलेच!

अमितदादा's picture

29 Oct 2016 - 11:42 pm | अमितदादा

उत्तम...

प्रचेतस's picture

30 Oct 2016 - 8:00 am | प्रचेतस

भन्नाट

स्पार्टाकस's picture

30 Oct 2016 - 10:11 am | स्पार्टाकस

लय भारी बापू!
सुरवातीलाच तो बायकोला बाय करुन गेला तेव्हा तो टेररीस्ट म्हणून आत शिरला असणार ही कल्पना आली होती
:)

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 Oct 2016 - 10:29 am | कैलासवासी सोन्याबापु

श्या!! आल्फ्रेडबाबा हीचकॉक ह्यांची आराधना अजून वाढवायला हवीये म्हणजे आम्हाला :P

प्रीत-मोहर's picture

31 Oct 2016 - 1:01 pm | प्रीत-मोहर

सहमत. पण राजेश देशकर ना परत आलेल बघून आम्ही लै खुश झालेलो आहोत

मित्रहो's picture

30 Oct 2016 - 1:29 pm | मित्रहो

जबरदस्त, सबका खातमा
काहीशी फिल्मी किंवा जेम्स बाँडच्या अंगाने जाणारी असली तरी वाचताना मजा आली. जेंव्हा गोळी बशीरला लागत नाही तिथे गोष्ट द्रोहकाल या सिनेमाच्या शेवटापासून सुरु झाली असावी अशी शंका यायला लागली.
मस्त कथा.

जॉनी's picture

30 Oct 2016 - 6:27 pm | जॉनी

खतरनाक.
नौशेरा एक ओटीए मध्ये स्क्वॉड्रन आहे असं ऐकलंय..

स्वीट टॉकर's picture

30 Oct 2016 - 6:32 pm | स्वीट टॉकर

तुमच्या लेखणीतून उतरलेल्या अशा गोष्टी वाचायला आणखीनच मजा येते!

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Oct 2016 - 8:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

भन्नाट कथानक आहे ! बारकावे वाढवून कादंबरी बनवता येईल !

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 Oct 2016 - 9:19 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

बापुसाब, जब्राट लिहलिये !!! :)!!!

मितान's picture

31 Oct 2016 - 11:29 am | मितान

जबरदस्त !!!

मितान's picture

31 Oct 2016 - 11:29 am | मितान

जबरदस्त !!!

नाखु's picture

31 Oct 2016 - 12:54 pm | नाखु

येणारये याच्यावर (घ्यायचा असेल तर अक्षयकुमारला घेणे)

थरारक

तुषार काळभोर's picture

31 Oct 2016 - 5:28 pm | तुषार काळभोर

.
.
.

भम्पक's picture

31 Oct 2016 - 5:42 pm | भम्पक

अफलातून आहे हि कथा......बाप्पू लय भारी.....

पिलीयन रायडर's picture

31 Oct 2016 - 7:03 pm | पिलीयन रायडर

मस्तच हो बाप्पु!!!

अनिरुद्ध.वैद्य's picture

31 Oct 2016 - 8:51 pm | अनिरुद्ध.वैद्य

अफलातुन लिहीलंय बापु!

अभिदेश's picture

1 Nov 2016 - 11:24 pm | अभिदेश

बापू , अक्षय कुमार / नीरज पांडे ला पाठवा , तो सिनेमा बनवेल.

मोदक's picture

1 Nov 2016 - 11:26 pm | मोदक

भारी, थरारक

सोत्रि's picture

2 Nov 2016 - 5:30 am | सोत्रि

लढ बाप्पू!

-(काॅर्पोरेट स्पाय) सोकाजी

बाजीप्रभू's picture

2 Nov 2016 - 8:01 am | बाजीप्रभू

भन्नाट!! भर हापिसात काम बाजूला ठेवून वाचली.. मस्त! मस्त!

तुस्सी ग्रेट हो बाप्पु!

मद्रकन्या's picture

2 Nov 2016 - 1:03 pm | मद्रकन्या

__/\__ छानच. खूप आवडली कथा.

आदिजोशी's picture

2 Nov 2016 - 1:07 pm | आदिजोशी

एक नंबर आहे कथा. एका भागात संपवू नका आता. क्रमशः टाकून पुढचे भाग लिहायला घ्या :)

मद्रकन्या's picture

2 Nov 2016 - 1:08 pm | मद्रकन्या

__/\__ छानच. खूप आवडली कथा.

अभ्या..'s picture

2 Nov 2016 - 3:02 pm | अभ्या..

मस्तच जमलीय स्टोरी बापू.
सगळे रेफरन्सेस अन माहीती तुला फर्स्ट हँन्ड असल्याने एकदम परफेक्शन आलेय.
कथा लिहित जा ना रेग्युलरली.

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Nov 2016 - 3:28 pm | कैलासवासी सोन्याबापु

प्रयत्न तोच असेल भावा :)

सुमेधा पिट्कर's picture

2 Nov 2016 - 4:09 pm | सुमेधा पिट्कर

मस्तच जमलीय स्टोरी, अफलातुन लिहीलंय

सस्नेह's picture

2 Nov 2016 - 4:30 pm | सस्नेह

सॅल्यूट टु द स्पाय !

स्रुजा's picture

3 Nov 2016 - 3:13 am | स्रुजा

खतरनाक !!

प्रसन्न३००१'s picture

3 Nov 2016 - 11:53 am | प्रसन्न३००१

जबरदस्त.... मागे अशीच एक कथा तुम्ही लिहिली होतीत, तेव्हाच या कथेची सुरुवात वाचताना थोडाफार अंदाज आला होता... पण एक कडक सॅल्यूट तुम्हाला आणि तुमच्या लेखन कौशल्याला :)

आतिवास's picture

3 Nov 2016 - 12:07 pm | आतिवास

कथा चांगली झाली आहे.
पण वास्तवात पाकिस्तान, चीन, तालिबान वगैरे लोक इतके सहजासहजी मूर्ख बनवले जात नाहीत.
सगळं खरं तुम्हाला लिहिता येणार नाही (म्हणजे गोपनीयतेच्या कारणासाठी, हा तुमच्या क्षमतेवरचा अविश्वास नाही), आणि ते लिहिलं जाऊही नये.
तरीही तुमच्याकडून अधिक वास्तवदर्शी कथा वाचायला आवडेल.

ऋषिकेश's picture

3 Nov 2016 - 4:52 pm | ऋषिकेश

+१
कथा म्हणून खूप आवडली.

विशाल कुलकर्णी's picture

3 Nov 2016 - 1:59 pm | विशाल कुलकर्णी

लै भारी यार...
लिहीते व्हा आता :)

अभिजीत अवलिया's picture

3 Nov 2016 - 10:57 pm | अभिजीत अवलिया

कथा आवडली ...

निओ's picture

5 Nov 2016 - 1:55 am | निओ

भारी लिहिता बापू.

स्वाती दिनेश's picture

6 Nov 2016 - 12:54 pm | स्वाती दिनेश

कथा आवडली.
घाईघाईत न वाचता फुरसतीत वाचायला ठेवली होती, आज वाचली. मस्तच!
स्वाती

अमृत's picture

7 Nov 2016 - 4:11 pm | अमृत

मस्तच.

पैसा's picture

8 Nov 2016 - 10:23 am | पैसा

राजेश देशकरला मधे विसरला होतास काय!

बादवे, तुझे मीमराठीवरचे लिखाण कुठे ब्याकपात आहे का शिल्लक?

कैलासवासी सोन्याबापु's picture

9 Dec 2016 - 9:36 pm | कैलासवासी सोन्याबापु

नाय, गेलेन सगळे लिखाण मीम वरचे :/ :(

हकु's picture

10 Dec 2016 - 1:19 am | हकु

कडक!!