मक्केतील उठाव १

हुप्प्या's picture
हुप्प्या in जनातलं, मनातलं
25 Sep 2016 - 2:00 am

११ सप्टेंबर २००१ या दिवशी अमेरिकेवर सगळ्यात मोठा अतिरेकी हल्ला झाला. त्याचे परिणाम सगळ्या जगावर झाले. तेव्हापासून अमेरिकेत एक वाक्प्रचार बनला आहे अमुक देशाचे ९/११. जसे २६/११ चा मुंबईवरील हल्ला हा भारताचे ९/११, स्पेनमध्ये माद्रिद येथे रेल्वे गाड्यांमध्ये अनेक स्फोट होऊन शेकडो लोक मेले त्याला स्पेनचे ९/११ म्हटले जाते. हाच नियम लावला तर मक्केतील १९७९ साली झालेला उठाव ह्याला सौदी अरेबियाचे ९/११ म्हणता येईल. ह्या घटनेने सौदी राजघराणे मुळापासून हादरले. बंडखोरांचा क्रूरपणे बिमोड केलाच. पण पुन्हा असे होऊ नये म्हणून त्यांनी आपली धोरणे पूर्णपणे बदलली. पश्चिमी संस्कृतीकडे होणारी आपली वाटचाल थांबवून अत्यंत कर्मठ आणि धार्मिक बनण्याच्या दिशेने पावले उचलली. ह्या प्रकारामुळे तमाम मुस्लिम जग मोठ्या प्रमाणात बदलले. जगभरातील मुस्लिम लोकांना खरा इस्लाम शिकवावा म्हणून सौदी अरेबियाने भरपूर पैसा धार्मिक उत्थानाकरता वापरायला घेतला.

ज्या घटनेमुळे हे सुरु झाले त्याचा हा मागोवा. फार लोकांना ही घटना माहीत नसते. असलीच तर त्याची चुकीची आवृत्ती माहीत असण्याची शक्यता जास्त. पण मला तरी ही इतिहासातली एक रोचक आणि महत्त्वपूर्ण घटना वाटते.

ज्याला आज सौदी अरेबिया म्हणतात तो देश हा पूर्वी एकसंध नव्हता. एक तर मक्का मदिना ही धार्मिक स्थळे सोडल्यास त्या भागात मुख्यतः: वाळवंट होते. त्यामुळे अरबी टोळ्या तिथे राहात होत्या. ऑटोमन तुर्क साम्राज्याने १६ व्या शतकात मक्का आणि मदिना ह्या शहरात आपला सेनापती नेमला आणि ह्या भागावर हक्क प्रस्थापित केला. अर्थात ही दोन शहरे सोडून बाकी भूभाग नावालाच ऑटोमन होता. स्थानिक टोळ्याच तिथे राज्य करत होत्या. बाकी भागात फार काही उत्पन्न नव्हते त्यामुळे ऑटोमन सुलतानाला त्यात फार स्वारस्यही नव्हते.
पहिल्या महायुद्धाच्या वेळी तुर्कांचे आणि दोस्त राष्ट्रांचे शत्रुत्व होते त्यामुळे ब्रिटन आणि फ्रान्सने सौदी अरेबियावर ताबा मिळवण्याकरता हालचाली सुरु केल्या. आधी त्यांनी मक्केच्या ऑटोमन प्रतिनिधीलाच फितवण्याचा प्रयत्न केला पण तो डोईजड झाला म्हणून त्यांनी सौदी नामक टोळीच्या प्रमुखाला हाताशी धरले. ह्या सरदाराने ऑटोमन सरकाराविरुद्ध उठाव केला. त्या वेळेस इखवान नावाची एक कडवी धार्मिक संघटना ह्या भागात प्रबळ बनत होती. इखवान म्हणजे (मुस्लिम) बांधव. तमाम मुस्लिम लोकांना एकत्र करून आपले साम्राज्य बनवण्याची त्यांची मनीषा होती. आजच्या आयसिसची ही आद्य आवृत्ती! सौदी सरदाराने (अब्दुल अझीझ बिन साऊद) ह्या लोकांना पटवले आणि त्यांच्या मदतीने ऑटोमन साम्राज्याला पराभूत केले. हा विजय मिळाल्यावर ब्रिटनने सौदी घराण्याला ह्या भूभागाचे स्वामित्व बहाल केले. परंतु इखवान संघटनेचे समाधान झालेले नव्हते. त्यांना इराक आणि कुवेत ह्या देशावर हल्ला करून तिथेही इस्लामी राज्य आणायचे होते. हे ब्रिटनच्या अधिपत्याखाली असणारे प्रदेश होते. सौदी राजाची ब्रिटनशी वाकडे वागण्याची इच्छा नव्हती त्यामुळे त्याने त्याला विरोध केला. पुढे इखवान मंडळींनी सौदीविरुद्ध उठाव केला. तो फसला. सौदी सैन्याने त्यांची मोठी कत्तल केली. अर्थात ही संघटना पूर्ण नष्ट झाली नाही. जरी इखवान हे तमाम मुस्लिमांना एकत्र आणू पाहात होते तरी त्यांचा सेनापती ओतेबी ह्या टोळीचा होता. ह्याच टोळीचा एक सदस्य हा १९७९ च्या उठावाचा प्रमुख होता. पण ते नंतर पाहू.

१९३८ च्या सुमारास पेट्रोलियमचे महत्त्व वाढले होते. आणि सौदी अरेबियात उत्कृष्ट गुणवत्तेचे तेलाचे प्रचंड साठे सापडले आणि त्यामुळे सौदी घराण्याला मोठी लॉटरीच लागली! ब्रिटन आणि अन्य पश्चिमी सत्तांनाही मोठा फायदा झाला कारण सौदी राजा त्यांचा मित्र होता. इथून ह्या देशाची अफाट भरभराट सुरु झाली. बापजन्मात पाहिला नसेल इतका पैसा ह्यांना मिळू लागला. आपण आपला धर्म निष्ठेने पाळला म्हणून अल्लाहने आपल्याला हे बक्षीस दिले आहे अशी सर्वसामान्य श्रद्धाळू अरबांची भावना झाली. पण दुर्दैवाने अशी सुबत्ता आल्यावर धर्माचे नियम धाब्यावर ठेवून लोक चैन करू लागले. सौदी घराण्याकडे राज्य असल्यामुळे त्या घराण्यातील लोकांची तर चंगळ झाली मग जुगार, बायका, कार, बोटी, दारू, खाणे पिणे सगळे राजविलास सुरु झाले. हे लोक युरोपात जाऊन आपली हौस पुरी करू लागले. अरब आणि त्यांची ऐयाषी हा विनोदाचा, टिंगलीचा विषय बनू लागला. भारतातही सत्तरीच्या दशकातले सिनेमे पाहिलेत तर त्यात बर्याचदा एखादा अरब मोडके तोडके हिंदी बोलत पचास लाख के हिरे वगैरे काहीबाही बोलताना दिसेल!

सौदी अरेबियातील लोक विशेषतः: बिगर सौदी घराण्यातील लोक हे सगळे पाहून संतापत होते. परंतु सौदी घराण्याची हुकूमशाही होती त्यामुळे कुठल्याही प्रकारचा विरोध, टीका करणे धोकादायक होते. कुठले निमित्त होऊन शिरच्छेद वा हातपाय कापण्याची वेळ येईल हे सांगणे कठीण. त्यामुळे ही धुसफूस आतल्या आत धुमसत होती. कुणालाही राजकीय प्रतिनिधित्व नव्हते. इकडे पश्चिमेच्या प्रभावामुळे सौदी राजाने टीव्ही, सिनेमे, ऑपेरा वगैरेही सुरु केले. टीव्हीवर चेहरा उघडा ठेवून बोलणार्या स्त्रिया पाहून अनेक धार्मिक अरबी लोकांचा तिळपापड होऊ लागला. सौदी राजघराणे धर्म बुडवत आहे अशी भावना मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये वाढीस लागली.

क्रमशः

इतिहासमाहिती

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

25 Sep 2016 - 2:29 am | चित्रगुप्त

अत्यंत रोचक माहिती. याप्रकारची माहिती प्रथमच वाचायला मिळत आहे. पुढील भाग लवकर यावा.
.
Caliph Harun al-Rashid receives Charlemagne's delegates
Painting by Julius Köckert (1864)
वरील चित्राचा सौदीच्या इतिहासाशी काही संबंध आहे का ?

हुप्प्या's picture

25 Sep 2016 - 3:17 am | हुप्प्या

हे खूपच प्राचीन काळातले आहे. हा राजा बगदादमधे होता. मला वाटते आजचे सौदी अरेबिया हे त्याकाळी अत्यंत ओसाड, रुक्ष प्रदेश असल्यामुळे त्याला राजकीय महत्व नव्हते. अरबी राजे बगदाद, सिरिया आणि अशा सुपीक भागात राज्ये बसवत.

चित्रगुप्त's picture

25 Sep 2016 - 3:23 am | चित्रगुप्त

मुळात 'अरबी' म्हणजे कोणते लोक ? इस्लामच्या उदयापूर्वी ते होते किंवा कसे ? असल्यास धर्म कोणता होता? अरबस्थान म्हणजे आताचे कोणकोणते देश ?

हुप्प्या's picture

25 Sep 2016 - 4:25 am | हुप्प्या

अरबी ही भाषा मोरक्कोपासून ते इराकपर्यंत बोलली जाते त्यामुळे त्याअर्थाने हे सगळे अरबच. पण सांस्कृतिक दृष्ट्या आज अरबी संस्कृतीचे केंद्रस्थान सौदी अरेबिया आहे. धार्मिक प्रभावामुळे आणि सौदीकडे असणार्‍या अफाट संपत्तीमुळे हे झालेले आहे. पण पूर्वी बगदाद जिथे दोन मोठ्या नद्या आहेत ते तिथल्या मुबलक पाण्यामुळे आणि सुपीक जमिनीमुळे अरबी साम्राज्याचे मोठे स्थान होते. कारण अनेक प्रसिद्ध अरबी राजे बगदादशी संबंधित आहेत. अरेबियन नाईट्स ह्या गोष्टीतही जेद्दा किंवा रियाधपेक्षा बगदादचे नाव वाचायला मिळते. प्रेषित महंमदाच्या मृत्यूनंतर दहाएक वर्षात इस्लामचे राजकीय केंद्र हे मक्केपासून पूर्वेकडे सरकले. पर्शियन साम्राज्य, बैझंटिन साम्राज्य ह्यांच्यावर विजय मिळाल्यामुळे इस्लामचे उत्तराधिकारी बगदाद वा सिरियातील दमास्कसच्या दिशेने गेले कारण ते प्रदेश जास्त समृद्ध होते.

अरेबियन पेनिन्सुला भागात रहाणारे मूळचे अरब असे मला वाटते. कारण इथल्याच भौगोलिक जागांना अरबी अमुक, अरबी तमुक अशी नावे आहेत. माझ्या माहितीनुसार इजिप्त वा मोरक्को वा अल्जिरियात अशी नावे नाहीत.
इस्लाम स्थापन व्हायच्या आधी अरब लोक ज्यू, ख्रिस्ती वा पेगन मूर्तीपूजक, अनेक ईश्वर मानणारे असावेत अशी माझी माहिती आहे.

अरबी भाषादेखील वेगवेगळ्या भागात वेगळ्या प्रकारे बोलली जाते. बर्‍याचदा एका भागात बोलली जाणारी अरबी दुसर्‍या भागातील माणसाला पटकन कळतही नाही असे वाचले आहे. असेही ऐकले आहे की जसे पुणेरी मराठीला त्यातल्या त्यात प्रमाण मानतात तशी सौदी अरेबियातील अरबीला प्रमाण मानतात. (कुराण वगैरे वाचायला जी अरबी शिकावी लागते ती सगळीकडे प्रमाण आहे. धार्मिक धुरीणांनी ती काळजीपूर्वक जपलेली आहे. ती जुनी ऐतिहासिक अरबी आहे आणि कुठल्याही बोली अरबी भाषेपेक्षा ती खूपच वेगळी आहे.)

प्रचेतस's picture

25 Sep 2016 - 10:43 am | प्रचेतस

बगदाद हे तसे खऱ्या अर्थाने अरबस्तानात नाही मात्र अरबस्तानाच्या सीमेवर म्हणता येईल. अतिप्राचीन काळातील babylon ह्या प्रसिद्ध शहराजवळ हे ठिकाण होते.

अब्बासी खिलाफ़तीचे हे प्रमुख केंद्र. ही खिलाफत बरीच सुसंसकृत होती. सांस्कृतिक दृष्टया अरबांचा विकास ह्याच काळात झाला. हरुन अल रशीद हा सुप्रसिद्ध खलिफ़ा. अरेबियन नाईट्सची रचना ह्याच खिलाफ़तीत झाली.

अमितदादा's picture

25 Sep 2016 - 10:57 am | अमितदादा

माहितीपूर्ण लेख आणि प्रतिसाद. बगदाद मध्ये दुसरी कुठली नदी आहे तिग्रीस सोडून ?

बगदाद मधे बहुधा तैग्रीसच आहे. पण तिथून जवळपास असणारी दुसरी मोठी नदी म्हणजे युफ़्रेटिस.
ह्या दोन नद्यांच्या मधला भाग म्हणजे मेसोपोटेमिया. हा भाग अत्यंत सुपीक होता. साहजिकच वाळवंटी अरबांची इकडे नजर पडल्यास नवल नाही.

अमितदादा's picture

25 Sep 2016 - 11:18 am | अमितदादा

धन्यवाद. आता नकाशात पाहिलं दुसरी नदी बरीच लांब आहे. असो बगदाद च्या आसपास चा भाग (मेसोपोटेमिया) दोन नद्या मध्ये वसला आहे असे आपण म्हणू.

बोका-ए-आझम's picture

25 Sep 2016 - 2:04 pm | बोका-ए-आझम

हे नावही याच भागाला उद्देशून आहे. एशिया मायनर हेही नाव ऐकलेलं आहे. माणसाने शेतीची सुरुवात इथे केली असं मानववंशशास्त्रज्ञांना वाटतं हाही तर्क वाचलेला आहे. बगदाद आणि दमास्कस ही जगातल्या पुरातन शहरांपैकी आहेत. दमास्कस ही तर जगातली सर्वात पुरातन राजधानी आहे.

प्रचेतस's picture

25 Sep 2016 - 2:34 pm | प्रचेतस

बॅबिलाॅन हे ह्या भागाचं प्राचीन नाव. बगदाद मात्र पुरातन शहर नाही. मला वाटतं उमय्या खिलाफ़तीमधील एका खलिफाने हे हे शहर वसवले.
दमास्कस, बसरा ही मात्र प्राचीन वैभवशाली शहरे होती.

विशाखा पाटील's picture

25 Sep 2016 - 11:34 am | विशाखा पाटील

माझ्या माहितीप्रमाणे इजिप्तशियन अरबीला प्रमाण अरबी म्हणतात. सौदी अरेबिया आणि इतर आखाती देशांमध्ये बोलली जाते ती खलीजी अरबी.

हुप्प्या's picture

26 Sep 2016 - 5:58 am | हुप्प्या

मी एका अरबी (लेबनीज) सहकार्‍याला विचारले होते तेव्हा त्याच्या मते सौदी अरेबियाचे अरबी हे प्रमाण. उदा. अल जझिरा हे निदान पूर्वेच्या अरबी जगातील सगळ्यात मोठी वार्तावाहिनी आहे तिथे बोलली जाणारी अरबी ही सौदी अरेबियाप्रमाणे असते. इजिप्त नाही. इजिप्त हे अरबी बुद्धीजीवी लोकांचे केंद्र राहिले आहे. अनेक विद्यापीठे, विचारवंत, लेखक, कवी, गायक हे इजिप्तचे असल्यामुळे त्यांना आपण प्रमाण आहोत असे वाटणे स्वाभाविक आहे. त्यामानाने सौदी आणि अन्य देश मागासलेले होते.

माझ्या ऐकिव माहितीप्रमाणे --
पूर्वी पारशी लोकांचे पर्शियन साम्राज्य आजच्या ऑल्मोस्ट आख्खा इराण , इराक, सिरियाचा बहुतांश भाग, व सौदी अरेबियाच्या पूर्वेकडची किनारपट्टी , उत्तरेला ताजिक , उझ्बेक वगैरे जवळचा steppe चा गवताळ प्रदेश , पूर्वेकडे पश्चिम अफगाणिस्तानातला काही हिस्सा , व अगदि "हिंद" मधला बलुचिस्तानातला काही भाग ह्या अधे मधे वसले होते. ( ह्यातले काही काही भूभाग अधून मधून साम्राज्यात असत )साम्राज्य जोरावर असले की काठावरचा [प्रदेश आत घेत. कमजोर झाले की तो सुटून जाइ. उदा -- अफगण, बलुच, सिंध.) . काही काही भाग मात्र सातत्याने पारशी अंमलाखाली होता.
.
.
इस्लामच्या उदयानंतर काही वर्षातच अरबांनी पर्शियन साम्राज्य ताब्यात घेतले. त्यावेळी Ctesiphon ही पारशांची राजधानी होती. अरबांच्या ताब्यात आल्यावर काही वर्षांनी ती अस्तित्वात राहिली नाही. (भारतात कसे विजय नगर नावाचे बलाढ्य , वैभवी साम्रज्य होते, तसेच. तीन चार शाह्यांनी एकत्रितपणे विजयनगर संपवल्यावर विजयनगर एकदमच संपले. तिथे वस्ती शिल्लक उरली नाही. आज हम्पी जवळ त्याचे भग्न अवशेष तेवढे आज दिसतात. )
अरबांनी त्याच्या जवळच वीसेक मैलांवर नवीन राजधानी वसवली. तिचे नाव बगदाद.
.
.

पूर्वी खूपदा काय होइ, की एखादं आधीचं शहर जिंकलं, संपवलं; तर त्याच्या जवळच विजेता स्वतःचं नवीन शहर उभं करी.
म्हणजे असं बघा... आज दिल्ली म्हणतो तीसुद्धा विविध सहाएक विविध वेळेस वसवली गेलेली आहे.
प्राचीन/ पौराणिक इंद्रप्रस्थ, खांडववन वगैरेंचा उल्लेख सोडून दिले तरीही!
आजच्या दिल्लीत किला -ए -राय -पिठोरा हा जो एरिया आहे ना ( तुटका जुनाट किल्ला) ती पृथ्वीराज चौहानाच्या काळातली दिल्ली. महम्मद घोरीनं पृथ्वीराजाकडून राज्य ताब्यात घेतल्यावर इथली वस्ती ऑल्मोस्ट संपली.
त्या नंतर काही दशकातच खिल्जीनं नवी राजधानी वसवली जवळच्याच "सिरी" किल्ल्यावर.
खिल्जी नंतर मुहम्मद तुघलकानं सिरी किलाही सोडून दिला नि राजधानी केली स्वतःची नवी तुघलकाबाद.
मुहम्मदाच्या वंशजानं ...फिरोझशहा तुघलकानं नवी राजधानी वसवली फिरोझाबाद नावाची.
नंतर शेरगढ़ नावाची वस्ती शेर शाह सूरीनं वसवली (हुमायुनला हाकलून)
सर्वात शेवटी आजचा लाल किल्ला, चांदनी चौक वाली दिल्ली शहजहानाबाद नावानं सहहाजहानं ह्या मुघल बादशहानं वसवली.
तुघलकानं जवळच नवी राज्धानी वसवली. तिचं नाव तुघलकाबाद. हा एरियासुद्धा आजच्या दिल्लीत आहे.
.
.

हां तर कुठं होतो मी. ही अशी आपल्या जवळची, आपलीच दिल्ली. सहा वेळेस वसली. ही सहाही ठिकाणी आज वीस तीस किलोमीटारच्या अंतरात आहेत. एन सी आर मध्येच येतात मोस्टली. आधीच्या सत्तधीशांच्या नंतर आलेल्यांनी नवीन वस्ती करायची जवळच; पण आधीच्या वस्तीची ठिकाणं पुसून टाकायची ; हा पायंडा असावा.
.
.
पारशी लोकांचे Ctesiphon हे वैभवी, प्राचीन, श्रीमंत, गडगंज, सुखवस्तू, सुसभ्य, सुसंस्कृत शहर अरबांचय ताब्यात आल्यावर पुसले गेले. अरबांनी जवळच नवीन बगदाद शहर वसवले.
.
.
.
नंतरच्या काळात बगदाद हे अभ्यास- संस्कृती, विज्ञान,-गणीत- तत्वज्ञानचे केंद्र बनले. तुलनेनं सहिष्णूता दिसू लागली. विविध धर्मशास्त्रं, तत्वज्ञानं ह्यांचा अभ्यास सुरु झाला. महाभारत, पंचतंत्र, ग्रीक मायथॉलॉजी ह्यांची भाषांतरं झाली. अल्जिब्राचा पाया घातला गेला. भूमिती मध्ये प्रगती झाली. अगदि पृथ्वीचा व्यास व त्रिज्या किती, हे कोपर्निकसच्या तीन चार्शे वर्षं आधीच अभ्यासलं जाउ लागलं. ० हा आकडा, गणनपद्धत्ती उपयुक्त असल्याचं दिसल्यानं खुल्या मनानं "हिं" कडून स्वीकारली गेली. ज्यू व्यापारी सहज व्यवसाय करु शकत होते. इजिप्त- सिरिया-जॉर्डनमध्ये बरेचसे ख्रिश्चनही होते. अब्बासिद सत्तेचा हा सुवर्ण काळ मानला जातो इस आठशे च्या आसपास व नंतर. व "वैभवशाली , प्रोग्रेसिव्ह इस्लामी परंपरा" सांगण्यासाठी हे दाकह्ले दिले जातात.
पण हे सगळं "इस्लामी संस्कृतीच्या परिघावर"च घडत होतं. इस्लामपूर्वीही तिथे ह्या गोष्टी, थोड्याफार प्रमाणात होत्याच.
अगदि उत्तर आफ्रिका, स्पेन इथेही अरब -इस्लामी साम्राज्य पसरलं. ते बर्‍यापैकी खुलं होतं विचारानं. पण ती सुद्धा "परीघ भूमी"च.

मुख्य "इस्लामी भावनांचं केंद्र" आजचा अरबस्थान... तो ह्या सगळ्यापासून तेव्हाही दूर होता. "खुले विचार " सुरु झाले ते परिघावरच्या राज्यात. जिथे ऑलरेडी इस्लामपूर्वेही संस्कृती , सभ्यता होती; अभ्यास वगैरे सुरु होते.
.
.
.
अर्र र्र ...
किती ते अवांतर . सोरी.
तर सांगायचा मुद्दा म्हणजे....
पारशांची प्राचीन राजधानी Ctesiphon हे बगदादपासून वीसेक मैलांवर आहे.
.
.
स्वगत -- इतकुस्सं सांगायला इतकं लांबण ?

शाम भागवत's picture

26 Sep 2016 - 7:34 pm | शाम भागवत

आवडल.
अजिबात कंटाळवाणे वाटले नाही.
कारण प्रत्येक वाक्यात माहिती ठासून भरलेली होती.

लोथार मथायस's picture

25 Sep 2016 - 2:47 am | लोथार मथायस

खूप वेगळ्या विषयावरचा लेख.पुभाप्र
वाचतो आहे. पुढचा भाग लवकर येऊदे

अत्रुप्त आत्मा's picture

25 Sep 2016 - 7:22 am | अत्रुप्त आत्मा

मस्त...
वाचत आहे..
पु भा प्र.

यशोधरा's picture

25 Sep 2016 - 10:24 am | यशोधरा

वाचते आहे..

जव्हेरगंज's picture

25 Sep 2016 - 10:30 am | जव्हेरगंज

वा! मस्त माहिती !

वाचतोय!

वाचूका's picture

25 Sep 2016 - 10:40 am | वाचूका

मध्य-पूर्वेच्या इतिहसाबद्द्ल आम्हाला खुप कमी माहिती आहे. अशी माहितई दिल्याबद्द्ल आभारी....

विशाखा पाटील's picture

25 Sep 2016 - 11:27 am | विशाखा पाटील

चांगली माहिती, पण

ऑटोमन तुर्क साम्राज्याने १६ व्या शतकात मक्का आणि मदिना ह्या शहरात आपला सेनापती नेमला आणि ह्या भागावर हक्क प्रस्थापित केला

याविषयी थोडी वेगळी माहिती - अरबस्तानावर जरी ऑटोमन सम्राटाचे राज्य असले तरी सुरुवातीपासूनच ऑटोमन सम्राटांनी मक्का आणि मदिना या शहरांचे धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन त्यांचा ताबा अरबस्तानातल्या हाशीम घराण्याकडेच ठेवला होता. हे घराणे मूळ मक्कानिवासी, ते तुर्क नव्हते. पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान या घराण्यातल्याच शरीफ हुसेनला अरबस्तानाचे राज्य देण्याचे ब्रिटिशांनी कबूल केले होते. टी. ई. लॉरेन्स (लॉरेन्स ऑफ अरेबिया) हा त्या करारामागचा शिल्पकार होता. पुढे जेत्यांनी शरीफ हुसेनच्या एका मुलाला जोर्डनच्या राजपदी आणि दुसऱ्या मुलाला इराकच्या राजपदी बसवले. (जोर्डनमध्ये अजून ती राजेशाही टिकून आहे.)

पहिल्या महायुद्धाच्या वेळी तुर्कांचे आणि दोस्त राष्ट्रांचे शत्रुत्व होते त्यामुळे ब्रिटन आणि फ्रान्सने सौदी अरेबियावर ताबा मिळवण्याकरता हालचाली सुरु केल्या. आधी त्यांनी मक्केच्या ऑटोमन प्रतिनिधीलाच फितवण्याचा प्रयत्न केला पण तो डोईजड झाला म्हणून त्यांनी सौदी नामक टोळीच्या प्रमुखाला हाताशी धरले. ह्या सरदाराने ऑटोमन सरकाराविरुद्ध उठाव केला

पहिल्या महायुद्धात अल सौदांचा ऑटोमन सम्राटाविरुद्धच्या उठावात सहभाग नव्हता. सहभाग होता तो शरीफ हुसेन यांचा. शरीफ हुसेन यांच्या तिसऱ्या मुलाला अरबस्तानाचे राज्य मिळण्याची प्रतीक्षा असतानाच अल सौद टोळीने मक्केवर हल्ला केला आणि शरीफ हुसेन मुलासह तिथून पळाले. मक्केला काबीज केल्यावर इथल्या तीन मुख्य प्रांतांचे मिळून सौदी अरेबिया (सौदांचे अरेबिया) हे राज्य स्थापन झाले.

मारवा's picture

25 Sep 2016 - 1:11 pm | मारवा

टी. ई. लॉरेन्स (लॉरेन्स ऑफ अरेबिया) हा त्या करारामागचा शिल्पकार होता.
सेव्हन पिलर्स ऑफ विजडम चा लेखक.

हुप्प्या's picture

26 Sep 2016 - 6:03 am | हुप्प्या

तुमची माहिती जास्त अचूक आहे. लेख फार मोठा होईल म्हणून मी इतिहासाचे बारकावे अभ्यासले नव्हते. इखवान ह्या संघटनेचे सौदी राजघराण्याशी असणारे जुने संबंध अधोरेखित करणे इतकाच त्या इतिहासाचा उल्लेख करण्यामागचे कारण. मलाही असे वाटले नाही की सौदी सैन्याने पहिल्या महायुद्धात भाग घेतला. पण इंग्रज व पश्चिमी मित्रराष्ट्रांचे ऑटोमन साम्राज्याशी असणारे शत्रुत्व हे जास्त ठळक व्हायला पहिल्या महायुद्धाची पार्श्वभूमी आहे. खुद्द चर्चिलने तुर्कस्थानविरुद्धच्या नाविक युद्धात भाग घेतला पण त्यात इंग्लंड हरले. असो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Sep 2016 - 12:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

रोचक इतिहास ! पुभाप्र.

बोका-ए-आझम's picture

25 Sep 2016 - 2:07 pm | बोका-ए-आझम

तुम्ही पुढील भागांमध्ये माहिती द्यालच पण १९७९ मध्येच इराणमध्ये क्रांती झाली आणि आयातुल्ला खोमेनीची राजवट सुरु झाली. इराण म्हणजे १००% शिया आणि अरब म्हणजे प्रामुख्याने सुन्नी. हाही पैलू इथे आहे का?

मारवा's picture

25 Sep 2016 - 2:22 pm | मारवा

आयातुल्ला खोमेनी
हे खोमेनी वेगवेगळे आहेत का ? म्हणजे वंशावळ वगैरे आहे का ? एकाच खोमेनी नावाची
तो सलमान रश्दीला फतवा काढणारा खोमेनी हाच होता का ?

याचा अर्थ धर्ममार्तंड किंवा पंडित. मला वाटतं खोमेनीचं नाव रुहोल्ला होतं. त्याच्या निधनानंतर अली हाशमी रफसंजानी हे इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते झाले आणि त्यांच्यानंतर सध्या असलेले खामेनेई.

अमितदादा's picture

25 Sep 2016 - 3:51 pm | अमितदादा

अली हाशमी रफसंजानी हे सर्वोच धार्मिक नेते झाले होते काय ?. खोमेनी आणि खामेनेई हे दोनच सर्वोच नेते इराण ला इस्लामिक क्रांती नंतर लाभलेत. दुवा

बोका-ए-आझम's picture

27 Sep 2016 - 3:10 pm | बोका-ए-आझम

आयातुल्ला खोमेनी हे सर्वोच्च धार्मिक नेते आणि राष्ट्राध्यक्ष या दोन्ही ओठांवर होते आणि त्यांच्या मृत्यूनंतर रफसंजानी राष्ट्राध्यक्ष आणि खामेनेई सर्वोच्च धार्मिक नेता बनले. त्यामुळे गोंधळ झाला.

बोका-ए-आझम's picture

27 Sep 2016 - 3:11 pm | बोका-ए-आझम

असे वाचावे.

विशाखा पाटील's picture

25 Sep 2016 - 2:55 pm | विशाखा पाटील

बोकांनी उत्तर दिलेच आहे. आयातुल्ला म्हणजे शिया पंथीयातले सर्वोच्च धार्मिक नेता. वंशावळीचा एक संदर्भ - खोमैनींचे पूर्वज आठव्या शतकापासून लखनौला राहत होते. आयातुल्ला खोमेनींचे आजोबा १९ व्या शतकात इराकला परतले.

पैसा's picture

25 Sep 2016 - 3:07 pm | पैसा

माहितीपूर्ण लेख आणि प्रतिसाद.

प्रसाद_१९८२'s picture

25 Sep 2016 - 3:55 pm | प्रसाद_१९८२

माहितीपूर्ण लेख

लेख माहितीपूर्ण आहेच.विशाखाचे प्रतिसाद आवडले.

असंका's picture

25 Sep 2016 - 10:53 pm | असंका

सुरेख...

पुभाप्र!!

sagarpdy's picture

25 Sep 2016 - 11:08 pm | sagarpdy

मस्त, पु भा प्र

इल्यूमिनाटस's picture

26 Sep 2016 - 11:42 am | इल्यूमिनाटस

वाचतोय

तुषार काळभोर's picture

26 Sep 2016 - 3:57 pm | तुषार काळभोर

लुकिंग अ‍ॅट द लेख अ‍ॅण्ड प्रतिसाद्स, धिस वन गॉना बी ए माईलस्टोन सीरीज ऑन मिसळपाव!!

झक्कास... पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

मराठमोळा's picture

27 Sep 2016 - 5:00 am | मराठमोळा

चांगली माहिती आणि उत्तम प्रतिसाद. वाचत आहे. पुभाप्र.

आनन्दा's picture

27 Sep 2016 - 11:11 am | आनन्दा

पु भा प्र.

रंगासेठ's picture

27 Sep 2016 - 11:59 am | रंगासेठ

छान सुरुवात झाली आहे. पु भा प्र.
विशाखा पाटील यांचे प्रतिसाद पण उत्तआनिणि माहितीपूर्ण.

नरेश माने's picture

27 Sep 2016 - 12:22 pm | नरेश माने

छान सुरवात आणि उत्तम प्रतिसाद. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.....

पुजारी's picture

27 Sep 2016 - 3:32 pm | पुजारी

पु . भा . उ .प्र.

ज्योति अळवणी's picture

3 Jan 2017 - 8:06 pm | ज्योति अळवणी

अप्रतिम माहिती. खूप गोष्टी माहित नव्हत्या. पुढचा भाग लवकर येऊ दे

sprashu@yahoo.com's picture

3 Jan 2017 - 11:08 pm | sprashu@yahoo.com

सर्व लीन्क एकच जागि दिसल्या तर बरे होएल