बौद्धधर्मप्रसारक... भाग-३

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
9 Aug 2016 - 8:35 pm

‘‘ फो ’’
बुद्धाचे चिनीभाषेतील नाव व चिनीलिपीतील त्याचे चिन्ह.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

बौद्धधर्मप्रसारक... भाग-१
बौद्धधर्मप्रसारक... भाग-२

कुमारजीव.
चीनमधील कुचा येथील कुमारजीवाचा सुंदर पुतळा.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

कुमारजिवाचे काम खरोखरच आपल्याला आचंबित करणारे आहे. त्यांनी जवळजवळ १०० संस्कृत ग्रंथांचे चीनी भाषेत भाषांतर केले आणि एवढ्यावरच न थांबता त्यांनी सुरु केलेल्या या कामात सामील होण्यासाठी दुसरी फळी उभारली. या त्यांच्या शिष्यांनीही त्यांचे काम मोठ्या जोमाने पुढे चालू ठेवले. हे त्यांचे यश फार मोठे म्हणावे लागेल. त्यांचे शिष्य नुसते हे काम करुन थांबले नाहीत तर सुप्रसिद्ध फा-इन सारख्यांनी बौद्ध धर्माचा प्रसारही चीनमधे केला.

या काळातील काही बौद्ध धर्मगुरुंची ही नावे पहा –
धर्मरक्ष, गौतम संघदेव, बुद्धभद्र, धर्मप्रिय, विमलाक्ष व पुण्यत्राता. या सर्वांचे काम आपण थोडक्यात बघणार आहोत.

धर्मरक्ष ३८१ साली चीनेमधे आला व त्याने त्या अवघड भाषेचा अभ्यास करुन अनेक ग्रंथाचे भाषांतर केले. उदा. १) मायाकाराभद्ररिद्धीमंत्र सूत्र २) नरकसूत्र, ज्यात बुद्धाने नरक या संकल्पनेवर भाष्य केले आहे. ३ शिलगुणगंध सूत्र ४) श्रामण्यफळसूत्र.

याच्यानंतर आला गौतम संघदेव. हा एक काश्मीरचा श्रमण होता. याने ३८८ साली त्यावेळच्या चीनी राजधानीत, म्हणजे खान आन या शहरात पाऊल टाकले. त्यावेळी तेथे फु राजघराणे राज्य करीत होते. त्याने जवळजवळ ७ ग्रंथांचे भाषांतर केले. त्याने भाषांतर केलेल्या काही महत्वाच्या ग्रंथांची नावे आहेत – मध्यमागम सूत्र, हा एक हिनयान पंथाचा ग्रंथ आहे. दुसरा आहे अभिधर्मह्र्दयशास्त्र. ३९१ साली त्याने त्रिधर्मसूत्राचे भाषांतर केले.

३९८ साली चीनमधे आला बुद्धभद्र. हा शाक्य होता. साधारणत: त्याच काळात कुमारजीवाला पकडून चीनमधे आणण्यात आले. कुमारजीवाने याच बुद्धभद्राचा अनेक वेळा त्याच्या कामात सल्ला घेतला असे म्हणतात. या बुद्धभद्राला कुमारजीवाबरोबर काम करण्याची संधी मिळाली. याचाच सहाध्यायी होता जगप्रसिद्ध फा-ईन. कुमारजीवाच्या मृत्युनंतर जेव्हा फा-ईन भारताचा प्रवास करुन चीनमधे परतला तेव्हा याने त्याच्याबरोबर संघासाठी नियमावली असणारा ग्रंथ लिहिला. तो म्हणजे विनयपिटिका. २५० साली नियमावली नसल्यामुळे आपण पाहिले आहे की धर्मकालाने पहिला प्रतिमोक्ष हा ग्रंथ लिहिला होता. बुद्धभद्राने त्यातील काही भाग उचलून त्यावर सविस्तर भाष्य केले आणि एक नवीन ग्रंथ रचला ज्याचे नाव त्याने ठेवले – प्रतिमोक्षसंघिकामूल. संघ वाढत असल्यामुळे त्यात शिस्त आणण्यासाठी विनयग्रंथाची त्याकाळात फारच जरुरी भासल्यामुळे हे काम तत्परतेने उरकण्यात आले. बुद्धभद्राने चीनमधे ३१ वर्षे काम केले. तो भारतात परत आला नाही. त्याने चीनमधेच आपला प्राण ठेवला तेव्हा त्याचे वय होते ७१. त्याचे सात ग्रंथ आजही चीनमधे जपून ठेवले आहेत ते खालीलप्रमाणे – (तीन ग्रंथांची नावे आधी येऊन गेलेली आहेत)

१ महावैपुल्य सूत्र ज्यात खुद्ध बुद्धाची भाषणे दिली आहेत.
२ बुद्धध्यानसमाधीसागर सूत्र
३ मंजुश्री प्रणिधानपद सूत्र
४ धर्मताराध्यान सूत्र

बुद्धभद्राच्या थोडे आधी अजुन एक धर्मगुरु काबूलवरुन चीनमधे येऊन गेला त्याचे नाव होते संघभट. पण त्याच्याबद्दल आजतरी काहीच माहिती उपलब्ध नाही. अजून किती पंडीत चीनमधे या कामासाठी दाखल झाले असतील याची आज आपल्याला कल्पना नाही. कित्येक ग्रंथ कम्युनिस्ट राजवटीत नष्ट करण्यात आले असावेत किंवा कुठल्यातरी सरकारी ग्रंथालयात धूळ खात पडले असतील. ते जेव्हा केव्हा बाहेर येतील तेव्हा अजून बरीच माहिती उपलब्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच काळात अजून एक महत्वाच्या कामास सुरुवात झाली ती म्हणजे चीनी धर्मगुरुंनी संस्कृत शिकण्यास सुरुवात केली. ही कल्पना कुमारजीव यांच्या एका शिष्याची, फा-ईनची.

३८८ साली संघभटाने कात्यायनीपुत्र रचित विभासशास्त्राचे चीनी भाषेत भाषांतर केले जे चीनमधे पि-फो-शालून या नावाने ओळखले जाते. या ग्रंथाचे एकुण १८ भाग आहेत. त्याच वर्षी त्याने आर्य वसुमित्र बोधिसत्व संगितीशास्त्र या ग्रंथाचे भाषांतर केले. ३८४ साली त्याने बुद्धचरितसूत्राचे भाषांतर केले. हा मूळ ग्रंथ संघरक्षाने रचिला होता.

३८२ साली अजून एका धर्मप्रिय नावाच्या श्रमणाने एका महत्वाच्या ग्रंथाचे भाषांतर केले ज्याचे नाव होते महाप्राज्ञपरिमित सूत्र. हे प्रसिद्ध दशसहस्रिका प्राज्ञ परिमिता या ग्रंथाचा काही भाग आहे.

थोडक्यात काय, भारतातून चीनकडे जाणाऱ्या पंडितांचा ओघ सारखा वाढत होता व त्यांनी तेथे अचाट काम केले. नवीन धर्माचा प्रसार करताना नवबौद्धांना संदर्भासाठी ग्रंथ लागतील हे ओळखून त्यांनी ग्रंथाच्या भाषांतराचे काम प्रथम हाती घेतले आणि अतोनात कष्टाने तडीस नेले. हे करताना त्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार करण्याचे थांबविले नव्हते. त्यासाठी त्यांनी राजाच्या आश्रयाने मठ बांधले. तेथे संघांना आसरा दिला. त्यांच्यासाठी चीनी भाषेत नियमावली लिहिल्या.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

या सर्व कामात भारताच्या मध्य भागातून अनेक पंडीत चीनला गेले पण काश्मीरातूनही अनेकजण गेले हे विसरुन चालणार नाही. हे वाचल्यावर एक विचार मनात येतो काश्मीरमधील सध्याच्या युवकांना हा इतिहास माहिती असेल का ? तो जर त्यांना सांगितला तर काही फरक पडेल का ?

(शक्यता कमीच आहे पण मधे एका पाकिस्तानी कार्यक्रमात एका बाईने एका अतिरेक्याला सडेतोड उत्तर दिले होते...ती म्हणाली, आमचा अरबस्तानाशी कसलाही संबंध नाही. अरब हे आमच्या भूमिवरील आक्रमक होते. हिंदूशाहीचा राजा दाहीर हाच आमचा हिरो असायला हवा. आम्ही प्रथम हिंदू होतो, नंतर बौद्ध झालो व त्यानंतर ख्रिश्चन व मुसलमान हे आम्ही विसरु शकत नाही... असे उत्तर देणारी पिढी जेव्हा काश्मीरात तयार होईल तो दिवस भारताच्या व काश्मीर खोऱ्याच्या भाग्याचा.) असो.

आता आपण कुमारजीव या महान ग्रंथकर्त्याकडे वळू. कुमारजीवाचे पिता हे भारतीय होते अर्थात त्याचवेळेचा भारत ज्यात अफगाणिस्तानही मोडत होते. कुमारजीवाचे वडील ‘कुमारयाना’, काश्मिरमधे एका राज्याच्या पंतप्रधानपदी कार्यरत होते. त्यांच्यावर बौद्धधर्माचा एवढा प्रभाव पडला की पामीरच्या डोंगर रांगा पार करुन ते कुचाला गेले. तेथे ते आल्याची कुणकुण लागल्यावर तेथील राजाने त्यांची त्वरित राजगुरुपदी नेमणूक केली. त्याकाळी गुणवंतांची कदर अशा प्रकारे व्हायची. विद्वान पंडितांसाठी त्याकाळी युद्धं होत असत असा तो काळ. तर कुचाला हा राजगुरु असताना कुचाची राजकन्या, जिवाका त्याच्या प्रेमात पडली व तिने त्याच्याशीच विवाह करण्याचा हट्ट धरला. अर्थातच तो पुरा करण्यात आला. यांना जो पुत्र झाला त्याच्या नावात मातापित्यांचे नाव गुंफण्यासाठी त्याचे नाव ठेवण्यात आले कुमार + जिवाका. म्हणजेच कुमारजीवा. कुमारजीवाचे जन्म साधारणत: ३३४ त ३४४ या काळात झाला असावा. तो सात वर्षांचा असताना त्याची आई एका भिक्षुणीसंघात दाखल झाली. असे म्हणतात (जरा अतिशयोक्ती वाटते) की तो सात वर्षांचा असतानाच त्याची अनेक सूत्रे तोंडपाठ होती. तो नऊ वर्षांचा झाल्यावर त्याच्या आईने त्याला काश्मिरला नेले व शिक्षणासाठी शिक्षकांचा जो शिक्षक बंधुदत्त त्याच्याकडे सोपविले. या प्रवासादरम्यान त्यांना एक अरहत भेटला ज्याने कुमारजीवाचे भविष्य सांगितले असे म्हणतात. आजवर कुमारजीवाचा अभ्यास हिनयानाच्या सर्वास्तिवादी तत्वज्ञानाच्या अभ्यासापुरता मर्यादित होता. येथे त्याला वेदांचा व तंत्रविद्या, खगोलशास्त्र या विषयांचा अभ्यास करण्यास मिळाला व याचवेळी त्याची महायानाच्या तत्वज्ञानाशी ओळख झाली. या शिक्षणाचा अजून एक फायदा त्याला झाला आणि तो म्हणजे त्याची ओळख अतिविशाल हिंदू ग्रंथविश्र्वाशी झाली. थोड्याच काळात तो त्यात पारंगतही झाला. महायानाची ओळख झाल्यावर तर त्याने एका ठिकाणी म्हटले आहे की मी इतके दिवस दगडाला सोने समजत होतो. आता मात्र माझी ओळख खऱ्या सोन्याशी झाली आहे. (मला मात्र हे काही विशेष पटले नाही. खरे तर हिनयानपंथाचे तत्वज्ञान जास्त मूलभूत स्वरुपाचे आहे. मला तरी वाटते महायानात हिंदू तत्वज्ञान भरपूर घुसडलेले आहे. उदा. बोधिसत्वाची कल्पना. हे चूक असू शकेल !) गंमत म्हणजे त्याला या अभ्यासात यारकंदचा राजपुत्र सत्यसोमाची खूपच मदत झाली. गुगलअर्थवर यारकंद कुठे आहे हे जरुर पहावे.

काशघरला एक वर्ष काढल्यावर कुमारजीव कुचाला परतला. कुचामधे राजदरबाराच्या पाठिंब्याने त्याचे भव्य स्वागत करण्यात आले. यानंतर मात्र तो जवळजवळ वीस वर्षे कुचामधे राहिला. हा काळ त्याने महायानाचे तत्व समजून घेण्यात व्यतीत केले. ते तत्वज्ञान पटल्यावर त्याने महायानपंथाचा स्वीकार केला. एवढ्यावरच न थांबता त्याने त्याच्या गुरुंनाही हे तत्वज्ञान समजावून सांगण्याचे ठरविले. त्याला अशी आशा होती की गुरुंना पटल्यावर तेही या पंथाचा स्वीकार करतील. त्याने बंधुदत्तांना कुचास येण्याचे आमंत्रण दिले. आपल्या गुरुला महायानाची थोरवी सांगताना कुमारजीवाने त्यांच्या समोर शून्यतेची कल्पना व तत्व मांडले. ते सगळे शांतपणे ऐकल्यावर बंधुदत्तांनी सगळे शून्य आहे, किंवा सगळे विश्र्व शेवटी मिथ्या आहे हे म्हणणे म्हणजे फुकाची बडबड आहे असे म्हणणे मांडले. ते सिद्ध करण्यासाठी त्यांनी एक कथा कथन केली –

एका विणकराकडे एक वेडसर माणूस आला व त्याने त्याला सगळ्यात तलम धागा विणण्यास सांगितला. तो पाहिल्यावर त्याने तो जाड असल्याचे त्या विणकराला सांगितले.

‘‘पैशाची काळजी करु नकोस. मला तलमात तलम धागा विणून दाखव !’’

विणकराने त्याला दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी तो धागा पाहिल्यावर त्या माणसाने तो जाड असल्याचे सांगितले. विणकराला राग आला पण त्याने तो आवरला व त्याला परत दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. तिसऱ्या दिवशी विणलेला धागा पाहून त्या माणसाने तोही जरा जाडसर असल्याचे सांगितल्यावर विणकराला आला राग. हवेत बोट दाखवून तो म्हणाला,

‘‘तो बघ तुला पाहिजे तसा धागा तेथे आहे.’’ हवेत काहीच न दिसल्यामुळे त्याने विचारले, ‘‘ कुठे आहे तो धागा? मला तर दिसला नाही’’

‘‘तो इतका तलम झाला आहे की नुसत्या नजरेस दिसणे शक्यच नाही’’ विणकराने उत्तर दिले.

त्या उत्तराने त्या माणसाचे समाधान झाले.

‘‘या धाग्याचे एक वस्त्र विणून मला उद्या दे. ते मला राजाला भेट द्यायचे आहे’’ असे म्हणून त्या माणसाने त्याचे पैसे मोजले व तो तेथून निघून गेला.

आता हे स्पष्टच आहे की असा कोणताही धागा तेथे नव्हता व त्याचे पैसे मोजायचेही काही कारण नव्हते त्याचप्रमाणे महायानातील शून्यता या कल्पनेत/तत्वज्ञानात काहीच अर्थ नाही व त्यात वेळ घालविण्यात काही कारण नाही हे स्पष्ट आहे.’’

हे मात्र मला पटले पण कुमारजीवाला मात्र स्वत:च्या गुरुचे मतपरिवर्तन करण्यात नंतरच्या काळात यश मिळाले. त्याच्या म्हणण्यास मान्यता देऊन त्याच्या गुरुंनी महायानपंथाची शिकवण स्वीकारली.

३७९ साली एक सेंग-जुन नावाचा चीनी महंत कुचाला आला होता. त्याने कुमारजीवाची माहिती चीनच्या राजाला (सम्राट जिन. राजधानी : चँगॲन) एका अहवालात पाठविली. सम्राटाने तो अहवाल वाचून कुमारजीवाला चीनमधे आणण्याचे प्रयत्न सुरु केले. जवळजवळ दोन दशके प्रयत्न करुन तो निराश झाला. हे प्रयत्न विफल झाले त्याला कारण होते सम्राटाचाच एक सेनापती लु-कुआंग. या सेनापतीने कुमारजीवाचे महत्व न ओळखता आल्यामुळे त्याला अटक करुन सतरा वर्षे तुरुंगात टाकले. (हा बौद्धधर्मिय नव्हता. तो धर्माच्या विरुद्ध होता का नाही याबद्दल माहिती उपलब्ध नाही. काही जणांचे असेही म्हणणे आहे त्या काळात तो इतका ताकदवान झाला होता की त्याने जवळजवळ राजा विरुद्ध बंडच पुकारले होते.) राजदरबारातून कुमारजीवाला राजधानीत पाठविण्याचे सारखे आदेश निघत होते. इकडे कुमारजीवाने सर्वस्तीवादी विनयाचा अभ्यास सुरु केला होता. यावेळी त्याच्याबरोबर होता पंजाबमधील (किंवा उत्तर भारत म्हणूया) एक पंडीत ज्याचे नाव होते विमलाक्ष. (हा एक उत्तर भारतीय भिक्खू होता ज्याने कुचाच्या दिशेने प्रस्थान ठेवले होते. जेव्हा चिन्यांनी ३८३ मधे कुचावर हल्ला करुन ते काबीज केले तेव्हा याने तेथून पळ काढला. नंतर जेव्हा त्याला कुमारजीव चँगॲनमधे आहे हे कळले तेव्हा तोही चँगॲनला गेला. कुमारजीवाचा मृत्यु झाल्यावर याने तेथे बरेच काम केले. हा त्याच्या ७७व्या वर्षी तेथेच मृत्यु पावला)

३६६-४१६ या काळात त्सिन् घराण्याची सत्ता चँगॲनवर प्रस्थापित झाली. याचा एक राजा याओ त्सिंग हा बौद्धधर्माचा फार मोठा चाहता होता. त्याने या धर्माला उदार राजाश्रय दिला होता. असे म्हणतात त्याच्या काळात त्याने ३००० श्रमणांना सांभाळले होते. याच्या दरबारात प्रवेश मिळाल्यावर कुमारजीवाचे भाग्य उजळले. या राजाने त्याला त्याच्या राज्यात बौद्ध धर्माचा प्रसार करण्याची आज्ञा दिली व बौद्धधर्माचा चीनमधील मार्ग मोकळा झाला. एकदा राजाश्रय मिळाल्यावर कुमारजीवाने भाषांतराचे काम मोठ्या धडाडीने हाती घेतले. त्याने जवळजवळ ९८ ते १०० बौद्ध संस्कृत ग्रंथांचे चीनी भाषेत भाषांतर केले. त्यातील काहींची नावे आपण अगोदरच पाहिली आहेत. त्याने स्वत: काही ग्रंथ रचले का नाही याबद्दल आजतरी काही माहिती उपलब्ध नाही. बहुतेक त्यासाठी त्याला वेळच मिळाला नसावा. कुमारजीवाची मातृभाषा ना संस्कृत होती ना चीनी. तरीही त्याने हे भाषांतराचे काम पार पाडले याबद्दल त्याचे आभारच मानले पाहिजेत. कदाचित कुचामधे असताना त्याला चीनी भाषेची तोंडओळख झाल्याची शक्यता नाकारता येत नाही पण हे खरे मानले तरीही त्याने फार अवघड काम पार पाडले असेच म्हणावे लागेल.. संस्कृतमधून चीनी भाषेत भाषांतर करताना त्याने स्वत:ची एक स्वतंत्र शैली निर्माण केली त्यामुळे ती सगळी भाषांतरे ही चीनी भाषेतील मूळ लेखनच वाटते. असे म्हणतात की त्याची शैली ही ह्युएनत्संगपेक्षा श्रेष्ठ आहे. वरील ९८ ग्रंथाचे ४२५ भाग आहेत. यावरुन हे काम किती प्रचंड असेल याची कल्पना येते. यातील ४९ ग्रथांची नावे चीनी त्रिपिटिकात लिहून ठेवली आहेत त्याची नावे येथे विस्तारभयापोटी देत नाही. ही यादी आपण जर नीट पाहिली तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की यात तांत्रिकविद्येवरील एकही ग्रंथ नाही. ह्युएनत्संगच्या काळात मात्र या विषयावरील ग्रंथांचा चीनमधे बराच बोलबाला झाला. त्याने अश्र्वघोष व नागार्जुन यांची चरित्रं लिहिली, ती चीनमधे बरीच लोकप्रिय झाली. कुमारजीवाची लोकप्रियता इतकी वाढली की असे म्हणतात त्या काळात त्याच्याकडे १००० श्रमण शिकत होते. फा-ईन हा त्याचाच एक शिष्य. याने भारतात जाऊन बुद्धाच्या सर्व पवित्र ठिकाणांना भेटी दिल्या व कुमरजीवाच्या आज्ञेने त्याचे प्रवासवर्णन लिहिले. त्यानेही अनेक ग्रंथ भारतातून चीनमधे नेले. आपल्या शिष्याची किर्ती पाहण्यास कुमारजीवाचा गुरु विमलाक्ष चीनमधे आला पण दुर्दैवाने विमलाक्षाच्या आधी कुमारजीवाचा मृत्यु झाला. विमालाक्षाने आपल्या शिष्याचे काम पुढे नेले व ‘दशाध्याय विनय निदान’ नावाच्या ग्रंथाचे चीनी भाषेत भाषांतर केले. हेही वयाच्या ७७व्या वर्षी चीनमधे मरण पावले.
कुमारजीवाच्या काळात काश्मिरमधून अजून एक पंडीत चीनमधे आला. त्याचे नाव होते पुण्यत्रात. यानेही कुमारजीवाच्या प्रभावाखाली दशाध्यायविनय व सर्वस्तिवाद् विनय या दोन ग्रंथांचे भाषांतर केले.

एक लक्षात येते की काश्मिर भागातून अनेक श्रमण चीनमधे येतजात होते व तेथे अगोदरच स्थायिक झालेल्या पंडितांच्या मार्गदर्शनाखाली कठोर परिश्रम करीत होते. आता त्यांच्यापैकी काहींची नावे व त्यांचे काम पाहुया.. पुढच्या भागात......

क्रमश:
जयंत कुलकर्णी.
मला कल्पना आहे हे जरा कंटाळवाणे झाले असेल. पण आता ते पूर्ण करावे लागेल. मला स्वत:ला या सगळ्या घटना इतक्या आश्चर्यजनक वाटतात की मी त्यात बुडून जातो व मी तेथे आहे अशी कल्पना करु लागतो :-)

इतिहासलेख

प्रतिक्रिया

हा भाग आवडला, पुढील भागाची वाट बघत आहे.

कपिलमुनी's picture

9 Aug 2016 - 9:35 pm | कपिलमुनी

मुळीच नाही ! अजून सविस्तर आवडले असते.
पुभाप्र !

एस's picture

10 Aug 2016 - 12:15 am | एस

अप्रतिम! तुमचे ह्या माहितीवरील भाष्य (इनसाइट) आवडले. हीनयान पंथानेच खरा धम्म जपून ठेवला हे माझेही मत आहे. नागार्जुनाने शून्यवाद आणून बौद्ध धम्म आणि वैदिक धर्म यांतील ठळक सीमारेषा इतकी पुसट केली की शंकराचार्यांच्या अद्वैत तत्त्वज्ञानाने पुढे बौद्ध धम्माचा जनमानसावरील प्रभाव पूर्ण पुसून टाकला.

पुभाप्र. कंटाळ्याला जरा सुट्टी द्या.

प्रचेतस's picture

11 Aug 2016 - 9:16 am | प्रचेतस

सहमत.
मूळच्या थेरवादी पंथाला कालांतराने महायानांनी हीनयान हे नाव तुच्छता दर्शवण्यासाठी दिलं.

लेखमाला उत्कृष्ट.

गामा पैलवान's picture

10 Aug 2016 - 12:24 am | गामा पैलवान

जयंतराव,

मालिका मस्तंच चाललीये. बौद्ध विद्वानांची कार्यं बघितली की आपण किती खुजे आहोत हे चटकन ध्यानी येतं. काय प्रेरणा असेल कोण जाणे पण ही कार्ये अतिप्रचंड आहेत हे मात्रं खरं. गौतम बुद्ध या भारताच्या सुपुत्राचा चीनवरचा प्रभाव ऐकून होतो, पण त्याची ओळख नव्हती. लेखन लांबलचक असलं तरी वाचायला आजिबात कंटाळवाणं नाहीये.

आ.न.,
-गा.पै.

जयंत कुलकर्णी's picture

10 Aug 2016 - 9:53 am | जयंत कुलकर्णी

सर्वांना धन्यवाद !

आनन्दा's picture

10 Aug 2016 - 10:43 am | आनन्दा

वाचत आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Aug 2016 - 1:25 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर आणि रोचक लेखमाला. पुभाप्र.

गणामास्तर's picture

12 Aug 2016 - 12:23 pm | गणामास्तर

अजिबात कंटाळवाणे वगैरे काही वाटले नाही. बरीचं नवीन माहिती मिळत आहे, तुम्ही लिहा अजून.