बौद्धधर्मप्रसारक... भाग-२

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
27 Jul 2016 - 10:45 am

फो
बुद्धाचे चिनीभाषेतील नाव व चिनीलिपीतील त्याचे चिन्ह.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

बौद्धधर्मप्रसारक... भाग-१

धर्मरक्षाबद्दल आपल्याला माहिती मिळते ती त्याच्या चरित्रावरुन. हे चरित्र हे सहाव्या शतकाच्या सुरवातीस लिहिले गेले व अजुनही सेन्गीयु येथे जपून ठेवले आहे. त्याचे नाव आहे ‘‘झु फाहू झुआन’’ म्हणजेच ‘‘धर्मरक्षाचे चरित्र’’. हीच माहीती नंतर अनेक चिनी पुस्तकातून आपल्याला आढळते पण त्याचे मूळस्थान हेच पुस्तक आहे. धर्मरक्षाबद्दल अभ्यास करताना आपल्याला याच चरित्रात्मक पुस्तकापासून सुरवात करावी लागेल.

धर्मरक्षचे पुर्वज हे युची जमातीचे होते. हे घराणे अनेक पिढ्या मध्य एशियातील चीनच्या सीमेवर असलेल्या डुनहुआंग या शहरात रहात होते. काही तज्ञांचे म्हणणे असेही आहे की हाही मगधाचा एक ब्राह्मण होता. खरे खोटे माहीत नाही. तो कुठला होता हे महत्वाचे नसून त्याने काय काम केले हे मह्त्वाचे आहे. हे शहर म्हणजे चीनची अती पश्चिमेकडील सैन्याची वसाहत होती. (ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात). काहीच काळानंतर रेशीममार्गावरील (सिल्करुटवरील) ते एक महत्वाचे व्यापारी केंद्र झाले. येथे आठ वर्षांचा असतानाच धर्मरक्षाने आपले घरदार सोडले व एका तो मठात दाखल झाला. तेथे त्याने एका गाओझुओ नावाच्या विदेशी श्रमणाकडे आसरा घेतला व शेवटी त्यालाच आपले गुरु मानले. धर्मरक्षचा हा गुरु बहुदा भारतीय असावा. हे नाव भारतीय श्रमणाचे कसे ? तर त्याचे उत्तर हे आहे की त्या काळात भारतीय किंवा विदेशी नावांचे चीनीकरण करण्याची पद्धत सर्रास रुढ होती. या चीनी नावांमुळे खरी नवे शोधण्यास बऱ्याच इतिहासकारांना बरेच कष्ट करावे लागले हे मात्र खरे !. तर या श्रमणाकडे आसरा घेतल्यावर धर्मरक्षने खडतर मेहनत घेतली. असे म्हणतात त्या वयात तो दिवसाला दहाहजार शब्द असलेले श्लोक म्हणायचा. तो मुळचाच अत्यंत बुद्धिमान व एकपाठी होता. त्या काळात म्हणजे अंदाजे काश्यप मातंगाच्या काळात चीनच्या राजधानीत मठ, देवळे, बुद्धाची चित्रे, हिनयान पंथांचे ग्रंथ यांचा बराच बोलबाला होता पण महायान पंथाच्या सुत्रांचा अभ्यास मात्र पश्चिमी प्रदेशात होत असे. किंबहुना ही ‘‘वैपुल्य सुत्रे’’ राजधानीत माहीत असावीत की नाही अशी परिस्थिती होती. बौद्ध धर्माचे खरे तत्वज्ञान व मुक्तीचा खरा मार्ग याच पंथाच्या शिकवणीत दडलेला आहे याची खात्री असणारा धर्मरक्ष मग त्याच्या अभ्यासासाठी बाहेर पडला. त्याच्या गुरु बरोबर पश्चिमेकडील देशविदेशांच्या यात्रेस त्याने प्रारंभ केला. असे म्हणतात त्या प्रवासादरम्यान त्याने ३६ भाषांचा व लिप्यांचा अभ्यास केला व त्यात लिहिलेल्या महायान सुत्रांचा खोलवर अभ्यासही केला. (यातील अतिशयोक्ती सोडली तर त्याने किती कष्ट घेतले हे यावरुन कळते. त्या काळात एवढ्या भाषा त्या भागात बोलल्या जायच्या का नाहीत याची शंकाच आहे) हा त्यातील कुठल्याही श्र्लोकाचे उत्तमपणे विवेचन करु शकत असे.

हे सगळे ग्रंथ घेऊन मग तो चीनला पोहोचला. ‘‘डुनहुआंग’’ ते टँगची राजधानी ‘‘चँग-ॲन’’ या प्रवासात त्याने या ग्रंथांचे चीनी भाषेत भाषांतर करण्याचे काम सुरु केले. त्याने ज्या संस्कृत/पाली सुत्रांचे चिनी भाषेत भाषांतर केले त्याची यादी पाहिल्यास मन थक्क होते. भद्रकल्पिका, तथागतमहाकरुणानिर्देश, सद्‌धर्मपुंडरिक, ललितविस्तार, बुद्धचरितसुत्र, दशभुमीक्लेषचेदिकासुत्र, धर्मसमुद्रकोषसुत्र हे त्यातील काही ग्रंथ. एकूण ग्रंथ होते १४९. शिवाय त्याने अजुन एक महत्वाचे काम केले ते म्हणजे बुद्धाच्या जातक कथांचे चीनी भाषेत भाषांतर केले. बरं हे नुसते लिहून तो थांबला नाही तर गावोगावी, त्याच्या मठात त्याने या सुत्रांवर सतत प्रवचने दिली व धम्माचा प्रसार केला. चीनमधे जो काही बौद्धधर्म प्रारंभीच्या काळात पसरला त्याचे बरचसे श्रेय धर्मरक्षालाच जाते.

अखेरच्या काळात धर्मरक्षाने वानप्रस्थाश्रम स्वीकारला व तो निर्जन जंगलात एकांतवासात रहाण्यास गेला. त्याच्या ज्ञानलालसेबद्दल एक दंतकथा याच काळात निर्माण झाली. तो ज्या नदीकिनारी रहात असे त्या नदीचे पाणी एक दिवस अचानक आटले. (एका माणसाने ते दुषीत केले असेही म्हणतात) ते पाहून धर्मरक्ष त्या जंगलात विलाप करीत भटकू लागला, ‘‘ही नदी अशी आटली तर मला जे काही थोडेफार पाणी लागते तेही मिळणे मुष्कील आहे.’’ हा आक्रोश ऐकताच ती नदी परत दुथडी भरुन वाहू लागली. अर्थात ही एक बोधकथा आहे म्हणून आपण त्यातून काही बोध घ्यायचा असेल तर घेऊ व सोडून देऊ.

नंतरच्या काळात त्याने टँगची राजधानी चँग-ॲनच्या ‘निल‘ वेशीबाहेर एक मठ स्थापन केला व तेथे महायानाचा अभ्यास करीत आपले आयुष्य व्यतीत करु लागला. त्याच्या शिष्यांची संख्या आता न मोजता येईल एवढी झाली होती. पण त्याच काळात धर्मरक्ष सामान्यजनांमधे लोकप्रिय झाला तो एका घटनेमुळे...

त्याच्या विद्यार्थ्यांमधे एक श्रमण दाखल झाला होता. तो आठव्यावर्षीच श्रमण झाला होता याचाच अर्थ तो ज्ञानी असावा. ही घटना घडली तेव्हा त्याचे वय तेरा होते. त्याचे नाव होते झु-फाशेंग. चँग-ॲनमधे एक अत्यंत श्रीमंत व प्रतिष्ठीत गृहस्थ रहात असे. एक दिवस तो धर्मरक्षाच्या मठात आला. त्याची गाठ या झुशी पडली. त्या माणसाने धर्मरक्षाकडे दोन लाख नाणी मागितली. त्या मागणीला धर्मरक्ष उत्तर देणार तेवढ्यात त्या लहान मुलाने उत्तर दिले, ‘‘ तुम्हाला ते पैसे मिळतील !’’ ते ऐकून तो माणूस उद्या येतो असे म्हणून निघून गेला. फा-शेंग म्हणाला, ‘‘ त्या माणसाला ते पैसे खरेच पाहिजे होते यावर माझा विश्वास बसला नाही. मला वाटते तो आपली परिक्षा घेण्यासाठी आला असावा.’’ धर्मरक्षाने त्यालाही असेच वाटले असे उत्तर दिले. दुसऱ्या दिवशी तो माणुस आला व त्याने त्याच्या कुटुंबियांसमवेत धर्माची दिक्षा घेतली.

जेव्हा क्सिओनू व क्सिॲन्बी टोळ्यांनी सम्राट हुईच्या राजधानीवर हल्ला केला त्या धामधुमीच्या काळात धर्मरक्षाने त्याच्या शिष्यांसह पूर्वेकडे पळ काढला. तेथे तो एका निसर्गरम्य कुन नावाच्या तळ्याकाठी पोहोचला. दुर्दैवाने झालेल्या दगदगीमुळे तो तेथे आजारी पडला व त्याने या जगाचा निरोप घेतला. त्यावेळी त्याचे वय होते ७८.

हुई आणि हुआई सम्राटांच्या मधल्या युद्धाच्या धामधुमीच्या काळातही हे भाषांतराचे काम अडखळत का होईना चालू होते. फा-जू नावाचा एक श्रमण होता त्याने लोकस्थान सुत्राचे भाषांतर केले. हा कुठून आला होता, त्याचे भारतीय नाव काय होते हे अज्ञात आहे. तसाच एक श्रमण होता त्याचे नाव होते फाल-ली याने जवळजवळ १०० श्लोकांचे भाषांतर केले. हे दोघे आणि त्यांचे काम काळाच्या उदरात गडप झाले ते झालेच.

ही तत्वज्ञान व माहितीची देवाणघेवाण बघता, पूर्व आणि पश्चिम कधीच भेटणार नाहीत हे प्रसिद्ध वाक्य खोटे ठरते. हे प्रदेश भेटले आणि मध्य एशियात भेटले. त्यांच्यात वैचारिक व आर्थिक देवाणघेवाणही होत होती....

या सुरवातीच्या काळात हे जे ग्रंथांचे भाषांतर झाले ते एवढे अचुक नसायचे. चीनी भाषा ही भारतीय पंडितांना एकदम नवीन व अनाकलनीय होती. त्यांचा बराच वेळ हा ती भाषा शिकण्यातच जायचा. भारतीय पंडीत खऱ्या अर्थाने चिनी भाषा शिकले ते हुएन-त्संगच्या काळात. पण आपण चिनी भिक्षुंबद्दल नंतर पाहणार आहोत. त्यामुळे हा विषय येथेच सोडून देऊ.

या दोन महत्वाच्या महंताबद्दल आपण वाचले पण एकदा राजाश्रय मिळाल्यावर भारतातून चीनमधे जाणाऱ्या बौद्ध महंतांची तुलनेने रीघच लागली. राजाने बांधून दिलेल्या श्र्वेताश्र्व मठात भाषांतराचे व धर्मप्रसाराचे काम मोठ्या नेटाने चालू झाले.

चिनी सम्राटांनी बौद्धधर्माला राजाश्रय दिल्यावर त्यांना भारतातून अजुन धर्मगुरुंची गरज भासू लागली व त्यांनी अनेक धर्मगुरुंना चीनला येण्याचे आमंत्रण दिले. त्यांची नावे काही तिबेटच्या ग्रंथात आढळतात ती अशी- आर्यकाल, स्थाविरचिलू, काक्ष, श्रमण सउविनय. हे पहिल्या तुकडीत होते तर नंतर आलेल्यांची नावे होती, पंडीत धर्मकाल व त्याच्या बरोबर गेलेले अनेक भिक्षू ज्यांची नावे आज आपल्याला माहीत नाहीत. पण काही जणांची चिनी इतिहासातून कळतात – महाबल, धर्मकाल, विघ्न, त्साऊ लुयेन, त्साऊ ता-ली व धर्मफळ. १७२-१८३ या काळात अजुन एक पंडीत आला त्याचे नाव होते त्साऊ फा-सो. हे अर्थात त्याचे चिनी नाव आहे. त्याचे भारतीय नाव माहीत नाही. त्याने दोन ग्रंथाचे भाषांतर केले पण ते ७३० साली नष्ट झाले असा चिनी इतिहासात उल्लेख आहे. महाबल यानेही त्याच मठात राहून एका ग्रंथाचे भाषांतर केले तो मात्र अजुनही चिनी त्रिपिटकामधे आहे. यात बोधिस्त्वाच्या कल्पनेबद्दल बरीच चर्चा केली आहे. त्यातच बुद्धाच्या आयुष्याबद्दल बरीच माहीती मिळते.

तिसऱ्या शतकात धर्मपाल चीनला गेला. जाताना त्याने त्याच्याबरोबर कपिलावस्तूमधून काही संस्कृत ग्रंथ नेले. यानेही त्याच मठात आश्रय घेऊन त्या ग्रंथाचे भाषांतर केले. त्यात त्याला मदत झाली एका तिबेटी श्रमणाची. हा तिबेटी असला तरी त्याचे वास्तव्य अनेक वर्षे मध्य भारतात होते. याचे नाव आहे खान मानसिआन कदाचित खान हे त्या काळात आडनाव नसून पद होते हे लक्षात घेतल्यास ते खान मानसिंह असेही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याने भाषांतर केलेल्या ग्रंथाचे नाव होते मध्यमासुत्र. हा दीर्घआगमामधील काही सुत्रे घेऊन रचला गेला.

या काळामधे हे सगळे पंडीत त्यांच्या कामात सतत सुधारणा करीत धर्मप्रसार करीत होते. उदा. धर्मकाल जेव्हा चीनमधे आला तेव्हा त्याला उमगले की चीनमधे विनयसुत्राबद्दल विशेष माहीती नाही. त्यात लिहिलेल्या नियम माहीत नसल्यामुळे बरेच प्रश्न उद्‌भवत होते. संघ नीट चालण्यासाठी अशा नियमांची आवश्यकता होती. प्रतिमोक्षसुत्रामधे हे सगळे नियम बुद्धानंतर सम्राट अशोकाने भरविलेल्या महापरिषदेने घालून दिलेले आपल्याला आढळतात. धर्मकालाने या नियमांचे भाषांतर करण्याचे काम प्रथम हाती घेतले व तडीस नेले. काळ होता इ.स. २५० हाच चिनी भाषेतील ग्रंथ विनयपिटीका. दुर्दैवाने हाही ग्रंथ ७३० साली नष्ट झाला अशी नोंद आढळते.

अंदाजे २२४ साली अजुन दोन पंडीत भारतातून चीनमधे आले. एक होता विघ्न आणि दुसरा होता लु-येन. हे एकमेकांचे मित्र होते. या पंडितांनी बरोबर धर्मपादसुत्र आणले व त्याचे भाषांतर केले – थान-पोक-किन. त्यांनी हे काम सुरु केले तेव्हा त्यांना चिनी भाषेचा विशेष गंध नव्हता पण त्याने डगमगून न जाता मोडक्यातोडक्या चिनी भाषेत त्यांनी हे काम नेटाने पुढे चालू ठेवले. पण त्यामुळे एक नुकसान झाले ते म्हणजे या भाषांतरात मूळ भाव उतरला नाही. हा ग्रंथ अजुनही चीनमधे काओ-सान-क्वान (प्रसिद्ध धर्मगुरुंच्या आठवणी) या ग्रंथात जपून ठेवलेला आहे. पंडीत विघ्नाच्या मृत्युनंतरही लु-येन याने हे काम चालू ठेवले व आणखी तीन ग्रंथाचे भाषांतर केले ज्यात बुद्धाने जी सुत्रे सांगितली ती लिहिली आहेत.

वर उल्लेख केलेला खान सान नी ही मुळचा तिबेटी पण भारतात स्थायीक झाला होता. तिबेटच्या पंतप्रधानाचा (खान्-कू) हा मुलगा. २४१ साली याने चीनचा रस्ता धरला व तो त्यावेळची राजधानी नानकिंग येथे पोहोचला. त्यावेळी तेथे वू घराण्याचे राज्य होते. सम्राट सन खुएनची या धर्मगुरुवर विशेष मर्जी बसली. त्याने त्यास नवीन मठ बांधण्याचा आदेश दिला. त्याने तो लगेच आमलात आणून त्या मठाला नाव दिले किएन-कू मठ. ज्या गावात हा मठ बांधला गेला त्या गावाचेही नाव ठेवण्यात आले बुद्धग्राम. याचे उद्‌घाटन खुद्द सम्राटांच्या हस्ते करण्यात आले. याही महंताने एकूण १४ ग्रंथांचे चिनी भाषेत भाषांतर केले. त्यातील एक महत्वाचा होता शत परमिता सन्निपातसुत्र. हा म्हणजे आपल्या जातक कथा आहेत. दुसरा ग्रंथ होता संयुक्तावादनसुत्र. हा एक महायान पंथाचा ग्रंथ आहे. काळ होता २५१.

एक लक्षात येते की भारतातील धर्मगुरु हे सरळ चीनला अफगाणिस्थानमार्गे जात नसत. ते अगोदर मध्य एशियात जात व तेथून रेशीममार्गाने एखाद्या व्यापारी तांड्याबरोबर चीनला जात.

याखेरीज अजुनही काही धर्मप्रसारक भारतातून चीनला गेले त्यांची नावे –
कल्याणरुण, कल्याण, आणि गोरक्ष. यातील गोरक्षक हे नाव नाथपंथियांच्या साधूचे वाटते. याबाबतीत संशोधनाची गरज आहे. गोरक्षकनाथांचा काळ हा अकराव्या शतकाचा मानला जातो आणि हा पंडीत गेला दुसऱ्या शतकात. काही नाथपंथीयांनी बौद्धधर्माची दिक्षा घेतली होती का यावर संशोधन होणे जरुरी आहे....

पुढच्या भागात एका थोर धर्मप्रसारकाविषयी आपण वाचणार आहोत.
त्याचे नाव कुमारजिव....
क्रमश:
जयंत कुलकर्णी.

धर्मइतिहासलेख

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

27 Jul 2016 - 12:44 pm | मुक्त विहारि

पुभाप्र.

प्रचेतस's picture

27 Jul 2016 - 9:30 pm | प्रचेतस

उत्कृष्ट लेख.

धर्मरक्ष, बुद्धरक्षित अशा प्रकारची बरीच नावं बौद्ध साहित्य तसेच बौद्ध शिलालेखांमध्ये नेहमीच दिसतात.

यशोधरा's picture

27 Jul 2016 - 9:47 pm | यशोधरा

वाचते आहे...

अमितदादा's picture

27 Jul 2016 - 10:13 pm | अमितदादा

उत्तम लेख. चिनी नावामुळे समजून घेण्यात थोडी अडचण होतीय पण ठीक आहे. जेंव्हा बुद्ध धर्माचा प्रसार चीन मध्ये झाला तेव्हा तिबेट आणि चीन एक साम्राज्य होते का कारण आज बुद्ध धर्म फक्त तिबेट पर्यंत मर्यादित दिसतो. आणि बुद्ध ग्रंथांचे तिबेटी भाषेत का रूपांतर झाले नाही की चिनीझ हीच तिबेटची भाषा होती याची माहिती घ्यावी लागेल.

जयंत कुलकर्णी's picture

28 Jul 2016 - 7:25 am | जयंत कुलकर्णी

त्या काळी तिबेट वेगळेच होते व ती जमात एक युद्धखोर जमात म्हणून प्रसिद्ध होती. त्यांची भासा वेगळी व त्याही भाषेत बर्‍याच बौद्धग्रंथांचे भासांतर झाले आहे. त्यातील काही अजुनही प्रकाशात आलेले नाहीत असे म्हणतात.

धर्मरक्ष, धर्मपाल, धर्मकाल इ. नावांमुळे गोंधळ उडाला. कृपया एका सारणीमध्ये नावे, कालखंड, कार्य इ. सारांश द्याल का? दुसरे, धर्मरक्ष वानप्रस्थाश्रमास निघून गेला व त्याखाली एक मठ स्थापन करून ७८ व्या वर्षी मरण पावला असाही उल्लेख आहे. माझे आकलन चुकते आहे का हे समजत नाही.

वाखुसाआ.

जयंत कुलकर्णी's picture

28 Jul 2016 - 7:26 am | जयंत कुलकर्णी

मला कल्पना आहे. पण मी जी पुस्तके वाचली त्यातच एवढा गोंधळ आहे जी मी ठामपणे सारणी लिहिण्याचे टाळत होतो. ती लिहायची म्हणजे तुलनात्मक अभ्यास करुन लिहावे लागेल. पण मी प्रयत्न करेन.

टवाळ कार्टा's picture

27 Jul 2016 - 10:30 pm | टवाळ कार्टा

रोचक

ज्योत्स्ना's picture

31 Jul 2016 - 7:31 pm | ज्योत्स्ना

ही सर्व माहिती नव्यानेच कळली. धन्यवाद!

पैसा's picture

1 Aug 2016 - 6:24 pm | पैसा

ज्या काळाच्या नोंदीसुद्धा नीट सापडत नाहीत, त्या काळात कोणत्या प्रेरणेने एवढे अफाट काम हे लोक करून गेले असतील! आपल्या देश प्रदेशाचा त्याग करून अगदी अपरिचित जगात जाऊन आयुष्य घालवणे म्हणजे आताही सोपी गोष्ट नाही.

अर्धवटराव's picture

1 Aug 2016 - 11:42 pm | अर्धवटराव

चीनी राज्यकर्त्यांनी बुद्धधर्माला एव्हढा उदार आश्रय देण्याचं कारण काय असावं ? भारतात वैदीक धर्माच्या कर्मकांडाला कंटाळुन आचरारायला आणि समजायला सोपा असा बौद्धधर्म लोकमानसात रुजला, हे कळण्यासारखं आहे. सम्राट अशोक युद्धातल्या हिंसेने पश्चात्ताप पावुन बुद्धाकडे वळला हे ही ठीक. पण चीनमधे काय झालं नेमकं ? तिथले स्थानीक धर्म/तत्वज्ञान इतके बोजड झाले होते कि त्यांना अक्षरशः परकीय भाषेतले धर्म आणावे लागले? बौद्ध भिक्कुंनी राजाची लाचार भाटगिरी निश्चीत केली नसणार. तरी पण, स्थानीक राजघराण्यांतील सघर्षावर उतारा म्हणुन, लोकांचं लक्ष्य दुसरीकदे वळवायला वगैरे असा परभूमीचा धर्म आयात करावा लागला चीनला? कदाचीत त्याकाळात असे विवीध धर्म ट्राय करणं नॉर्मल असावं?
काहि का असेना, लोकांची जीद्द, प्रयत्न थक्क करणारे आहेत.
धन्यवाद जयंत सर.

धर्म ही संकल्पना आज ज्या रूपात आपण पाहतो तशी ती पूर्वी नव्हती. आजचे धर्मा-धर्मांतले स्थितिकाठिण्य हे साधारणतः इस्लामच्या उदयानंतर आले असे मला वाटते. पण पूर्वी धर्म ही संकल्पना 'मत' या स्वरूपात होती. बौद्धमत किंवा बौद्धदर्शन स्वीकारणे म्हणजे त्या तत्त्वज्ञानाचा अंगिकार करणे. ही फार मोठी जाज्वल्य अशी घटना नसावी. (बौद्धमत हे केवळ उदाहरणासाठी). भारतातही सम्राट चंद्रगुप्ताने जैन धर्म स्वीकारला किंवा सम्राट अशोकाने बौद्धधर्म स्वीकारला ह्यावरून 'धर्म' संकल्पनेचे लवचिक स्वरूप आपल्याला समजून येईल. धर्म बदलल्याने आज जसा आणि जितका बदल एखाद्या सामान्य माणसाच्या आयुष्यात होऊ शकेल तितका तो पूर्वी होत नसावा. त्याच्या एक शतांश पटही नाही. त्यामुळेच इतक्या मोठ्या प्रमाणावर पूर्वी धर्मप्रसार होऊ शकले. तेही शांततेच्या मार्गाने.

प्रचेतस's picture

2 Aug 2016 - 8:30 am | प्रचेतस

सहमत.

अर्धवटराव's picture

4 Aug 2016 - 10:07 pm | अर्धवटराव

धन्यवाद स :)