मुलाखत - श्री. विवेक मेहेत्रे (जागतिक पुस्तक दिन लेखमाला)

किलमाऊस्की's picture
किलमाऊस्की in लेखमाला
18 Apr 2016 - 10:58 pm

Header

नमस्कार मंडळी, पुस्तक दिन विशेष लेखमालिकेच्या निमित्ताने आपल्या भेटीला आलेले आहेत प्रसिद्ध हास्यचित्रकार 'श्री. विवेक मेहेत्रे'. व्यंगचित्रकार म्हणून आपण विवेक मेहेत्रे यांना ओळखातोच. अभियांत्रिकी शाखेतून उच्चशिक्षण घेतल्यावर श्री. विवेक मेहेत्रे यांनी लेखन, कविता, व्यंगचित्रे, एकपात्री प्रयोग, संपादक, प्रकाशक, व्याख्याता अशी अनेक क्षेत्रात यशस्वी वाटचाल केलेली आहे. चला तर मग, जाणून घेऊया या अष्टपैलू व हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाबद्दल.

नमस्कार विवेकसर, मिसळपाव.कॉम या मराठी संस्थळावर आपले स्वागत आहे. मला आठवतंय त्याप्रमाणे हास्यचित्रांशी माझी पहिली ओळख 'किशोर'मधल्या तुमच्याच एका हास्यचित्राने झाली. तुमची व्यंगचित्रांशी पहिली ओळख केव्हा झाली?

माझ्या लहान वयात माननीय बाळासाहेब ठाकरे, हरिश्चंद्र लचके, ज्ञानेश सोनार, शाम जोशी, वसंत हबळे यासारख्या दिग्गज व्यंगचित्रकारांच्या चित्रांचा मोठा प्रभाव माझ्यावर होता. त्यांची व्यंगचित्रं पहाता- पहाता आणि अभ्यासता-अभ्यासता मी व्यंगचित्रं काढू लागलो. त्यात मी इतका समरस झालो की साधारण अकरावीत असतांना व्यंगचित्र काढून नियतकालिकांना पाठवू लागलो. सुरवातीला फक्त आवड म्हणून व्यंगचित्र काढून मासिकांना पाठवायचो. मसिकांकडून मिळणार्‍या प्रतिसादाने उत्साह वाढून अधिकाधिक व्यंगचित्रांचं रेखाटन करु लागलो. यानिमित्ताने चित्रकलेचा छंद जोपासता येतोय याचा आनंद होता.

तुम्ही अगदी लहान वयातच व्यंगचित्रकलेला सुरवात केलीत. या क्षेत्रात जेव्हा यायचं तुम्ही ठरवलंत तेव्हा कोणाला आदर्श मानत होतात?

'किशोर' या लहान मुलांच्या लोकप्रिय मासिकात नाटककार श्री. वसंत सबनीस हे कार्यकारी संपादक होते. मी व्ही.जे.टी.आय. मधून इंजिनीयरींग केलं. तिथे विनोदी लेखक श्री. वि.आ.बुवा हे स्टोअरकिपरचं काम करीत असत. या दोघांनीही माझ्या हास्यचित्र छंदाला प्रोत्साहन दिलं त्यांच्या आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभाशीर्वादाने त्याच काळात साप्ताहीक लोकप्रभामधे माझी हास्यचित्रं प्रसिद्ध होऊ लागली. त्यामुळे सहाजिक मी त्यांना सदैव आदर्श मानीत आलो आहे.

तुमच्या घरी चित्रकलेची पार्श्वभूमी होती का? तुम्ही चित्रकलेचे खास प्रशिक्षण घेतले आहे का?
अजिबात नाही. मी चित्रकार व्हावं, जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समधे शिकावं असा कोणी विचारच करु शकत नव्हतं.कारण शिक्षण - नोकरी - विवाह या वैचारीक धाटणीचं आमचंं कुटुंब. त्यामुळे चित्रकार व्हावं हा विचारच कुटुंबात कोणाला आवडणारा नव्हता. याच कारणामुळे मी चित्रकलेसंबंधी कोणतेही शिक्षण घेऊ शकलो नाही. अकरावीपासून व्यंगचित्रं रेखाटत असलो तरी बारावीत उत्तम गुण मिळाल्यामुळे मुंबईतील नामवंत व्हि.जे.टी.आय. मधे सहज प्रवेश मिळाला. तिथून इंजिनिअरिंग (सिव्हिल) पूर्ण केलं. त्यानंतर एम.ई. व एम.बी.ए. केलं.

VivekMehetre

व्यंगचित्रांसोबतच तुम्ही अ‍ॅक्रॅलिक व ऑईल पेंटींगही करता. चित्रकलेतलं कोणतं माध्यम तुम्हाला भावतं?

हो, मी ऑईल पेंटींग तसंच अ‍ॅक्रॅलिक पेटींग केलेली आहेत. त्यांची प्रदर्शनेही झालेली आहेत. पण कलेला आवड-निवड नसते. एकदा का त्यात गुंतलो की जगाचे भान रहात नाही, हेच खरं! या दोन्ही पद्धतीने पेंटींग करायला बराच वेळ खर्ची पडतो. मग माझ्या इतर आवडीला मुरड घालावी लागते. त्यामुळे आजकाल फार कमी प्रमाणात पेंटींग करत असलो तरीही माझा स्वतःचा कल ऑईल पेंटींगपेक्षा अ‍ॅक्रॅलिककडे अधिक झुकतो.

आताच तुम्ही इतर आवडीला मुरड घालावी लागते म्हणालात, तुमच्या इतर आवडींनिवडींबद्दल सांगू शकाल का?

पहिली आवड अर्थातच व्यंगचित्रकला. आजवर मी साठ हजाराहून अधिक हास्यचित्रं काढलेली आहेत. ऐंशीच्या दशकात, 'चित्ररंग' हे इंडियन एक्सप्रेसतर्फे प्रसिद्ध होणारं सिनेसाप्ताहीक खूपच लोकप्रिय होतं. यशवंत रांजणगावकर आणि विद्याधर गोखले त्याचं संपादन करीत. १९८०ते १९८३ या काळात 'चित्ररंग' व सिनेनाट्य विषयक 'चित्तानंद' नावाच्या सदरात माझी अनेक व्यंगचित्रं प्रकाशित झाली अहेत. १९८३ ते १९८७ या काळात 'आवाज', 'जत्रा', 'मार्मिक', 'अबब', 'आक्रोश', 'शतायुषी', 'श्री' यासारख्या सुप्रसिद्ध दिवाळी अंकांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात मी घरोघरी पोचलो. लोकसत्ता, मुंबई सकाळ या दैनिकातील हास्यचित्रे, साप्ताहिक 'श्री' मधील 'कबाब कॉर्नर' हे व्यंगचित्र सदर कमालीचं लोकप्रिय ठरलं. त्याच काळात मी 'कार्टून सर्विस' ही संस्था स्थापन केली. त्यामार्फत चित्रकथा, कोडी, कॉमिक्स देशातील विविध भाषेत प्रसिद्ध होऊ लागली. गेली ३४ वर्षं दैनिकात पॉकेट कार्टून पाठवित आहे. मला कविता आवडतात. सायंदैनिक महानगरात माझी दररोज एक कविता 'चारोळी कोडे' स्वरुपात प्रसिद्ध होत असे. या लोकप्रिय उपक्रमातूनच त्यातील निवडक कवितांचे 'आले ओठांवर ...' या कवितासंग्रहाची निर्मिती झाली. आनंद या गोष्टीचा आहे की याची प्रस्तावना वंदना विटणकर यांनी लिहीलेली आहे. मी जर फक्त पेंटींगला वेळ दिला असता तर या सर्व गोष्टीसाठी मला वेळ मिळाला नसता.

VivekMehetre

व्यंगचित्र, लेखन, कविता, एकपात्री प्रयोग अशा अनेक क्षेत्रात एकाच वेळी तुमची मुशाफिरी चालते. प्रत्येक विषयाचा आवाका वेगळा. हे सगळं एकाच वेळी कसं काय साध्य करता?

खरं आहे तुमचं म्हणणं. १९९३ मधे मी आणि माझी पत्नी सौ. वैशाली मेहेत्रे, आम्ही दोघांनी मिळून 'उद्वेली बुक्स' या संस्थेची स्थापना केली. अभियंता म्हणून जबाबदारीची नोकरी करतांना एकपात्री प्रयोग, लेखन, व्यंगचित्रं,पुस्तकं, दिवाळी अंक याबाबत कामं करतांना दोघांचीही तारांबळ उडे. त्यात प्रकाशनाचा नविन भार डोक्यावर येऊन पडला होता. एकीकडे सुरक्षित व वेळच्या वेळी हातात पैसा देणारी नोकरी तर दुसरीकडे चित्रकलेचं वेड, लेखन-प्रकाशन यातली हवीहवीशी वाटणारी आव्हानं खुणावत होती. हि घालमेल फार काळ टिकली नाही. नोकरीचा राजीनामा देऊन पूर्णवेळ याच आवडीच्या क्षेत्रात उतरायचं ठरवलं. पत्नी वैशालीचीही तितकीच मोलाची साथ लाभली. आवड असली की सवड मिळतेच नाही का? :-)

अर्थातच! खूपच धाडसी निर्णय आहे हा. आता, तुमच्या लेखनाविषयी थोडं बोलूया. लेखनाची सुरवात कधी झाली? संगणक आणि इंटरनेट या विषयांवर लिहावसं का वाटलं?
मला कविता आवडतात हे आधी सांगितलं आहेच. 'चारोळी कोडे' नावाने लेखन करतांना डोळ्यासमोर विविध विषय घोळू लागले. मग विविध दैनिकांत राजकीय, सामाजिक घडामोडींवर थोडं-थोडं लिहू लागलो तेव्हा लोकांच्या बौद्धिक गरजा लक्षात येऊ लागल्या. भारतात नुकताच संगणक आला होता. आपल्या देशामध्ये संगणक आला, तेव्हा त्याला बराच विरोध झाला होता. त्यावेळी लोकांच्या मनात संगणाकाबाबत अनेक संभ्रम होते, गैरसमज-प्रश्न होते. संगणाकाविषयी बरंचस इंग्रजी भाषेमधून लिहिलं जायचं. मराठीत संगाणाकाची ओळख व त्याबाबत उद्भवणाऱ्या प्रश्नांची उत्तरं सोप्या भाषेत मांडण्यासाठी 'तुमचा नवा दोस्त कॉम्प्युटर' हे पुस्तक प्रकाशित केलं. या पुस्तकाला राज्यशासनाचा मराठी वाड्मय पुरस्कार मिळाला. भारतात पुढे १९९८ मधे इंटरनेट आलं. इंटरनेट म्हणजे अलिबाबाची गुहा. इंटरनेट्च्या उपयोगाची लोकांना माहिती मिळावी म्हणून 'तुमचा नवा दोस्त - इंटरनेट' आणि 'चला वापरु इंटरनेट' या दोन पुस्तकांचं लेखन केलं. याच पुस्तकाचं इंग्रजी भाषांतर 'Lets Enjoy Internet' आणि गुजरातीत 'चालो इंटरनेटनो आनंद लईये' या नावाने लोकप्रिय झालं. या पुस्तकवर आधारीत 'इंटरनेटची कमाल' हा एकपात्री कार्यक्रम मी तब्बल पाच वर्ष सादर केला.

हो, 'तुमचा नवा दोस्त कॉम्प्युटर' लहानपणी मी वाचलेलं पहीलं कॉम्प्युटर विषयक पुस्तक आहे. :-) त्याकाळी तसंच आताही 'संगणक' या विषयात फार कमी पुस्तकं मराठीत लिहीली जातात. या विषयाशी संबंधित तुम्ही बरंच लेखन करता. संगणकाविषयी तुमची पुस्तकं समजायला सोपी आणि सुंदर मांडणी यामुळे प्रसिद्ध आहेत. एखादा तांत्रिक भाग मराठीत लिहीतांना काही अडचणी येतात का?

एकतर संगणक हा माझा आवडता विषय. तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्यासाठी मी सतत प्रयत्न करीत असतो. संगणक विषयक पुस्तक लिहीतांना सर्वात जास्त भर भाषेवर दिला जातो. पुस्तकाची भाषा सोपी व संवादात्मक ठेवून त्यात भरपूर चित्रं व व्यंगचित्रांचा समावेश करायचा प्रयत्न करतो. 'A picture is worth a thousand words!'. पुस्तकातील तांत्रिक संज्ञा समजावून सांगतांना चित्राची साथ मोलाची ठरते. पुस्तकं किचकट होऊ नयेत म्हणून नेहमीचे प्रचलित इंग्रजी शब्द जसेच्या तसे वापरण्यावर मी भर देतो. उदाहरण द्यायचं झालं तर, कॉंप्युटर, मोबाईल वैगेरे शब्दांना मराठी प्रतिशब्द शोधण्याऐवजी हे शब्द जसेच्या तसे ठेवले तर वाचकांना जवळचे वाटतात, असं मला वाटतं. सांगायला आनंद वाटतो की, माझ्या 'इ-कॉमर्स' या पुस्तकाला श्री. विजय भाटकर आणि 'फेसबुक सर्वांसाठी' या पुस्तकाला संगणकतज्ञ श्री. अच्युत गोडबोले यांची प्रस्तावना लाभली. वाचकांचाही या पुस्तकांना उदंड प्रतिसाद मिळाला.

एखाद्या व्यंगचित्राला किंवा पुस्तकाला मिळालेली खास दाद किंवा लक्षात रहाण्यासारखा प्रसंग सांगता येईल का?

'हास्यकॉर्नर' पुस्तकासाठी अशिर्वादाचे पहिले पान माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी लिहून देतानाचा प्रसंग आणि श्री. वि.आ.बुवा व वसंत सबनीस यांनी प्रत्येक वेळचे प्रोत्साहन मी कधीही विसरु शकत नाही. माझ्या व्यंगचित्राच्या प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम 'हास्यकॉर्नर' १९८७ साली जो सुरू झाला तो आजतागायत सुरु आहे. आजवर या कार्यक्रमाचे १२०० च्या वर प्रयोग झाले. व्यंगचित्र संग्रह १९८८ साली प्रकाशित झाला. त्याला कै. माधव गडकरी आणि श्री. वि.आ. बुवा यांच्या प्रस्तावना लाभल्या. माझ्यामते ही मोलाची गोष्ट आहे. त्याचबरोबर या पुस्तकाचे पहिले पान हास्यचित्रसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाचे आहे. हा अनुभव नक्कीच स्वर्गिय होता. कलेची उपासना करणार्‍या बाळासाहेबांना कलेची कदर होती. त्यांच्या कौतुकाच्या थापेबरोबर मधाळ वाणी आणि प्रेमळ शब्द यामुळे आत्मविश्वास वृद्धिंगत झाला.

1
तुम्ही तयार केलेल्या'हास्यानंद' दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठाला शं.वा. किर्लोस्कर पुरस्कार मिळाला तो अनुभव सांगू शकाल का? एखाद्या मासिकाचे मुखपृष्ठ तयार करतांना नक्की काय विचार केला जातो?

अप्रतिम! आयुष्यात असे क्षण पुन्हा पुन्हा यावेत असा वाटणारा अभूतपूर्व दिवस वाटला. कारण उत्कृष्ठ व्यंगचित्रांसाठी असलेला मानाचा शं.वा.किर्लोस्कर पुरस्कार मला दोन वेळा मिळाला. एक 'आक्रोश' दिवाळी अंकातील व्यंगचित्रासाठी तर दुसरा 'हास्यानंद' दिवाळी मुखपृष्ठासाठी. नोकरी सोडून पूर्णवेळ या क्षेत्रात आल्याचं मला फार समाधान वाटत आहे. मासिकाच्या मुखपृष्ठाविषयी सांगयचं झाल तर, एखाद्या मासिकाचं अथवा अंकाचं मुखपृष्ठ म्हणजे त्या पुस्तकाचा चेहरा! मुखपृष्ठ वाचकांशी पहिला सुसंवाद साधतं. त्यामुळे ते अधिकाधिक आकर्षक बनवण्याचा नेहमीच प्रयत्न मी करीत असतो. पुस्तक मग ते मासिक असो कवितासंग्रह असो वा कथासंग्रह, पुस्तकांतील मजकूराचा संदर्भ लक्षात घेऊन त्याला अनुरुप असं मुखपृष्ठाचं चित्र तयार केलं जातं. मुखपृष्ठाची आकारणी, रंगसंगती पुस्तकातल्या मजकूराप्रमाणे ठरवली जाते. पुस्तक विनोदी असेल तर मुखपृष्ठावर व्यंगचित्र काढण्यावर माझा भर असतो. मुख्य म्हणजे पुस्तक नजरेस पडल्याबरोबर हाती घेऊन वाचण्याची उत्सुकता निर्माण होईल अशी आकर्षक मुखपृष्ठाची रचना करावी लागते. मुखपृष्ठ बनवण्याआधी त्यातून काय संदेश लोकांपर्यंत पोचवायचा आहे ते ठरवलं जातं. त्यानुसार चित्र काढलं जातं.

प्रकाशन क्षेत्रातील अनुभव सांगू शकाल का?

होय, नक्कीच, प्रकाशन क्षेत्रात बरेवाईट दोन्ही प्रकारचे अनुभव वाट्यास येतात. अनेकदा अडचणीच्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं. सत्तर-ऐंशी वयाचे लेखक जेव्हा स्वतःचं पुस्तक काढयचं म्हणून येतात तेव्हा बरेचदा त्यांना आर्थिक चणचणीमुळे शक्य होत नाही. अशावेळी कमीतकमी खर्चात पुस्तक प्रकाशन, विक्री यासाठी सहकार्य करावं लागतं. मग नफ्याची बाजू गौण ठेऊन त्यांच्या चेहर्‍यावरील समाधान हेच 'प्रॉफिट' मानावं लागतं. पेन्शनर वयोगटातील लेखकही असतात. वयपरत्वे छपाईची घाई करतात अशावेळी अंगतोड मेहनत करावी लागते. काही वेळेला पदरचे पैसे टाकून वेळ निभावून न्यायला लागते. बरेच अनुभव आहेत सगळं सांगितलं तर जागा पुरणार नाही. :-) आता तुम्ही विचाराल एवढा त्रास आहे तर का करतो हे सगळं? प्रकाशन क्षेत्रातली आव्हानं आवडतात. नविन काहीतरी करायचा उत्साह यातून नक्कीच खूप आनंद मिळतो.

ग्राफिक रेखाटनं आपल्याकडे बरेचदा लहान मुलांच्या पुस्तकात किंवा कॉमिक्स बुक्समधे वापरली जातात. परंतु परदेशात मोठ्यांसाठीही ग्राफिक्स बुक्स तयार केली जातात. ग्राफिक्स बुक्स सारखा चित्रकला व लेखन यांची सांगड घालून काही प्रयोग करायला आवडेल का?

पूर्णपणे ग्राफिक रेखाटन अर्थात कॉमिक बुक माध्यमात श्री. ब्रिजेश मोगरे याने रेखाटले आहे. आमच्या 'उद्वेली बुक्स' या प्रकाशन संस्थेतर्फे त्याच प्रकाशन झालं आहे. हे पुस्तक विस्तृत असल्याने त्याचा पहिला भाग 'शिवाजी-द-रियल हिरो' या नावाने प्रसिद्ध केला आहे. यासाठी बाबासाहेब पुरंदरे यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे. याचं प्रकाशन लंडन येथील संसदेच्या सभागृहात १ मे २०१४ रोजी श्री. बाबासाहेब पुरंदरे व श्री. सु.ग.शेवडे यांच्या उपस्थितीत झाले. महाराष्ट्रातून ८० चाहते या समारंभासाठी माझ्यासोबत आले होते. या पुस्तकाचे पुढील दोन भाग लवकरच प्रकाशित होतील. याप्रकारचे प्रयोग मराठीतही करायला नक्कीच आवडतील.

v1

तुम्हाला कोणत्या प्रकारची पुस्तकं वाचायला आवडतात? तुमचे आवडते लेखक कोण?

मला विशेषतः व्यक्तिमत्व विकास व विनोदी लेखन आवडते. व्यंगचित्र पहायला आवडतात. अनेक मराठी तसंच इंग्रजी लेखकांचं लेखन मला आवडतं. माझ्या संग्रहात तीन हजाराहून अधिक वाचनीय पुस्तकं आहेत.

तुमचे आगामी प्रकल्प कोणते?

सध्या ई-बुक्सचा जमाना आहे. नजिकच्या काळात तरुण पिढी व परदेशस्थ भारतीय वाचक पुस्तकं मोबाईल, टॅब, संगणाक, इ-रिडर यावर मोठ्या प्रमाणात वाचतील. हे लक्षात घेऊन आम्ही आमची पुस्तकं ई-बुक्स स्वरुपात उपलब्ध करुन द्यायला सुरवात केली आहे. सध्या संगणकविषयक दोन पुस्तकांचं लिखाण सुरू आहे.

आंतरजालावर मराठीतून अभिव्यक्तीसाठी मिसळपाव.कॉम सारख्या संस्थळाला काही सांगू शकता का?

मी लोकसत्ता व नवाकाळ या दैनिकात मिसळपाव.कॉमवर दोन लेख लिहीलेले. आपलं कार्य स्त्युत्य आहे. या संस्थळाद्वारे विविध उपक्रम सादर करुन मराठी भाषेचा दिवा तेवत ठेवत आहात ही फार मोलाची गोष्ट आहे. मिसळपाव वरील अनेक लेख वाचनीय आहेत. मिसळपाव.कॉमला माझ्यातर्फे पुढील वाटचालीस अनेकानेक शुभेच्छा!

rajbhavan

धन्यवाद! :-) मिसळपाव.कॉम परीवारातर्फे तुमचेही या मुलाखतीसाठी आभार व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

(वाचक आपला अभिप्राय mehetre2011@gmail.com या पत्त्यावर कळवू शकतील.)

************

ही मुलाखत प्रकाशित करायला परवानगी दिल्याबद्दल श्री. विवेक मेहेत्रे यांचे आभार. त्यांच्याशी ऑनलाईन भेट घडवून देणं, मुलाखतीसाठी सर्वतोपरी मदत करणं यासाठी माझ्या आईचेही आभार. तिच्या मदतीशिवाय हि मुलाखत लिहीणं शक्य नव्हतं. मुलाखतीसाठी प्रश्न तयार करतांना पैसाताईची खूप मदत झालेली आहे.

Footer

प्रतिक्रिया

फार छान आहे मुलाखत.मिसळपाववर त्यांनी लिहिलेले लेख शोधले पाहिजेत.

सानिकास्वप्निल's picture

24 Apr 2016 - 9:22 am | सानिकास्वप्निल

खूप छान झालिये मुलाखत, उत्तम माहिती.
किलमाऊसकी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी तुझ्या आईचे ही अनेक आभार :)

कविता१९७८'s picture

24 Apr 2016 - 10:45 am | कविता१९७८

छान मुलाखत

चौथा कोनाडा's picture

24 Apr 2016 - 3:04 pm | चौथा कोनाडा

अतिशय सुंदर मुकाखत !
विवेक मेहेत्रे माझे आवडते व्यंगचित्रकार ! यामुलाखतीच्या निमित्ताने त्यांच्या बाबत तपशिलवार माहितीमिळाली. मजा आली, मुलाखत वाचायल !

धन्यवाद, किलमाउस्की हा सुंदर योग आणल्या बद्दल !

उल्का's picture

24 Apr 2016 - 11:04 pm | उल्का

बहुदा हा मी वचलेला ह्या लेख मालेतील शेवटचा लेख.
तेव्हा तुम्हा सर्व लेखिकांचे अभिनंदन - खूप सुन्दर मालिका लिहिल्याबद्दल.
मनापसुन आवडली.

खटपट्या's picture

24 Apr 2016 - 11:10 pm | खटपट्या

मस्त

सुंदर लेखमालिका आणि मुलाखत. विवेकसरांची हास्यचित्रे प्रचंड आवडतात. त्यांची नोकरी सोडून प्रकाशन व्यवसायात उडी घेण्याची धडाडी फारच स्पृहणीय!

मितान's picture

25 Apr 2016 - 5:49 am | मितान

सुरेख मुलाखत !!!

सविता००१'s picture

25 Apr 2016 - 10:56 am | सविता००१

सुरेख मुलाखत

प्रीत-मोहर's picture

25 Apr 2016 - 10:58 am | प्रीत-मोहर

ह्यांची खूप व्यंगचित्रे/हास्यचित्रे पाहिलीत. मुलाखतीसाठी धन्यु ग किलमाउस्की

क्रेझी's picture

25 Apr 2016 - 11:25 am | क्रेझी

मुलाखत आवडली :)

पैसा's picture

25 Apr 2016 - 12:21 pm | पैसा

मस्त झाली सगळी मुलाखत! जबरदस्त माणूस आहेत हे मेहेत्रे!

मधुरा देशपांडे's picture

25 Apr 2016 - 2:23 pm | मधुरा देशपांडे

मुलाखत आवडली.

Mrunalini's picture

26 Apr 2016 - 7:39 pm | Mrunalini

सुंदर मुलाखत. आवडेश.

स्रुजा's picture

26 Apr 2016 - 7:41 pm | स्रुजा

सुरेख मुलाखत. त्यांचे मिसळपाव वर लेख आहेत?

विवेकपटाईत's picture

26 Apr 2016 - 7:44 pm | विवेकपटाईत

मुलाकात आवडली. हि व्यंगचित्रे पहिली होती पण व्यंगचित्रकाराचे नावाकडे कधी लक्ष गेले नव्हते. आता अशी चित्रे पाहताना नावाकडे हि लक्ष जाईल.

पैसा's picture

26 Apr 2016 - 9:28 pm | पैसा

http://www.misalpav.com/node/17935

श्री. मेहेत्रे यांनी लिहिलेला एक लेख सापडला.

स्रुजा's picture

26 Apr 2016 - 10:38 pm | स्रुजा

त्यांचे सगळे लेखः http://www.misalpav.com/user/651/authored

८ वर्षं आहेत ते मिपावर !

पैसा's picture

26 Apr 2016 - 10:44 pm | पैसा

कलंत्री यांनी फक्त लोकसत्तामधे आलेल्या लेखाची बातमी दिलीय.

कलंत्री वेगळे आणि हे वेगळे का? घोळ झाला माझा.

मित्रहो's picture

27 Apr 2016 - 10:53 am | मित्रहो

सुरेख मुलाखत

जुइ's picture

12 May 2016 - 7:42 am | जुइ

किशोरचा अंक आणि त्यातील व्यंगचित्रे अजूनही स्मरणात आहेत.

चौकटराजा's picture

12 May 2016 - 9:32 am | चौकटराजा

मला संगणकावर काम करावे लागत असे . पण मला आंतरजालाची प्राथमिक ओळख ही श्री विवेक मेहत्रे यांचा पुस्तकानेच करून दिली. आज इन्टरनेट हे माझ्या एखाद्या नातेवाईका पेक्षाही प्रिय व जवळचे आहे. याचे सारे श्रेय विवेकजींचे. बाकी मला चित्रकलेचीही ओढ असल्याने मी त्याना व्यंगचित्रकार म्हणून ओळखत होतोच त्याबतीत मात्र माझ्यावर प्रभाव बाळ ठाकरे, आर के लक्ष्मण व मारिओ मिरांडा यांचा अधिक .

आपण सादर केलेली मुलाखत माहितीपूर्ण .

पिशी अबोली's picture

12 May 2016 - 4:55 pm | पिशी अबोली

त्यांचं इंटरनेटवरचं पुस्तक वाचल्याचं आठवतं..

आटोपशीर, सुरेख आणि कल्पक विषयावरील मुलाखतीसाठी धन्यवाद किलमाऊस्की!