वाचू आनंदे (जागतिक पुस्तक दिन लेखमाला)

मितान's picture
मितान in लेखमाला
18 Apr 2016 - 11:14 pm

Header

मित्रमंडळींच्या घोळक्यात एक दिवस असे लक्षात आले की खूप जण पुस्तकावर प्रेम करणारे आहेत. वाचतात. जमेल तशी पुस्तक खरेदी करतात. खूप जणांना स्वतःची पुस्तकं असावी असे वाटते. पण पुस्तकांच्या दुकानात गेल्यावर एकदम खूप सारी पुस्तकं खरेदी करायला मध्यमवर्गीय खिसा नको म्हणायचा. वाचनाची ओढ तर स्वस्थ बसू देत नाही. घरात हवे ते पुस्तक हवे तेव्हा हाताशी असणे हे सूख पण वेगळेच ! मग एका सुपिक डोक्यातून एक कल्पना उगवली पुस्तक भिशी.

मराठवाड्यात , पुण्यातही असे गट चालतात असे ऐकून माहीत होते. सुवर्ण भिशी, साड्यांची , भांड्यांची सुद्धा भिशी असते हे पण माहीत होते. आम्ही पुस्तक भिशी सुरू केली.

सुरुवातीला केवळ ६ लोक एकत्र आलो. प्रत्येकी १०० रु. जमा करायचे. मग नावांच्या चिठ्ठ्या करायच्या. एक चिठ्ठी उचलायची. त्यात ज्याचे नाव निघेल त्याने सगळ्या पैशांची फक्त पुस्तकं घ्यायची. स्वतःला हवी ती ! पुस्तकांची मालकी त्याची असली तरी प्रत्येक सदस्याला ती वाचायला मिळावी.
अट एकच, ही पुस्तकं कुठल्याही अभ्यासक्रमाची नकोत. ( कारण ती आपोआप गरज म्हणून घेतली जातात. )

हळूहळू इतर मित्रांनाही यात रस वाटू लागला. भिशीची संख्या वाढली. जमा होणारे पैसे वाढले. एकदम दीड दोन हजारांची पुस्तकं घेणं शक्य होऊ लागलं. प्रत्येकाच्या संग्रहातली पुस्तकं वाढली. आनंद वाढला. कित्येक दिवस मनाच्या कोपर्‍यात ढकललेल्या पुस्तकांच्या याद्या बाहेर आल्या.

वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारा, वेगवेगळ्या आवडीनिवडी असणारा असा हा गट. त्यामुळे प्रत्येकाच्या आवडीची पुस्तकं जमा होऊ लागली. मग ठरवलं की प्रत्येक वेळी ज्याने पुस्तकं घेतली त्याने किमान एक तरी पुस्तकाचा परिचय करून द्यायचा. त्याचा सर्वांना अजून फायदा झाला. साहित्यातले आपल्याला आवडतात त्यापेक्षा वेगळे प्रकार वाचून बघण्याची मनाची तयारी झाली. वाचनानुभव समृद्ध व्हायला लागला. पुस्तकं अधिक डोळसपणे वाचली जावू लागली. जवळचा पुस्तकसंग्रह अधिक रंगीबेरंगी व्हायला लागला. काही दिवसांनी 'संग्रहात पाहिजेच' अशा स्वतःच्या पुस्तकांची यादी संपली. अगदी नवी, माहीत नसलेली पुस्तके घेण्याचा, प्रयोग म्हणून अगदीच नव्या लेखकाचे पुस्तक घेण्याचा धीर होऊ लागला. अर्थात सगळीकडची पुस्तक परीक्षणं नजरेखाली घालून खरेदी होऊ लागली.

या कार्यक्रमाने अजून एक अमूल्य आनंद दिला. यानिमित्ताने महिन्यातून एकदा सगळे एकत्र भेटू लागलो. रोजच्या कामापेक्षा वेगळ्या विषयांवर बोलू लागलो. चेष्टा मस्करीत विचारांची, बातम्यांची देवाण घेवाण होऊ लागली. सणावाराला एक संदेश किंवा मेल पाठवतानाच आठवण व्हायची.. ते लोक आता प्रत्यक्ष संवादू लागले. अडचणींवर उपाय - मदत हे ओघाने आले. आणि अजून एक म्हणजे एकत्र खादाडी !!!! :D

खरंच खूप भरभरून दिलं आम्हाला या पुस्तक भिशी ने ! या महिन्यात आम्ही हा उपक्रम सुरू करून चक्क ५ वर्षे झालीत. पण अजूनही त्यातला ताजेपणा तसाच आहे. भरभरून मिळणारा आनंद वाढतोच आहे...

तुम्ही पण सुरु करा ना असा मासिक आनंदोत्सव... :)
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

हा ब्लॉग मी ६ वर्षांपूर्वी लिहिला होता. अजूनही पुस्तकभिशी सुरू आहे.
दरम्यान बर्‍याच गमतीजमती झाल्या. आमच्या ग्रुपमधल्या उरलेल्या सगळ्यांची लग्न झाली. लग्न झालेल्यांना मुलेबाळे झाली. काही काळ या व्यस्ततेत भिशी चं स्वरूप बदललं. पुस्तकं विकत का घ्यायची बाई ? ! वेस्ट ऑफ मनी आणि वेस्ट ऑफ घरातली जागा ! असं म्हणणार्‍या नव्या सभासदांना हळुहळू यातली गंमत कळू लागली. त्यावेळी लहान असणारी मुलेबाळे आता बालसाहित्य वाचण्याच्या वयात आली. आपल्याकडे कधी करूया पुस्तक भिशी असे आईबापांना विचारू लागली. आता या बालगोपाळांची वेगळी भिशी सुरू करावी लागेल अशी लक्षणं दिसताहेत !

आम्ही जिथे जिथे जातो तिथे आपोआप पुस्तकभिशी ची माहिती जाते. मी ज्या गंथालयाची सभासद आहे तिथल्या काही जणांना ही कल्पना आवडून त्यांनीही पुस्तक भिशी सुरू केली आहे. आमच्या शाळेतल्या आई पालकांचा मोठा ग्रुप आहे. त्या ग्रुप मध्येही या महिन्यात नवीन पुस्तक भिशी सुरू झाली आहे. त्यात सध्या २४ सभासद आहेत. ही संख्या वाढेल असं दिसतंय.

वर गमतीत म्हटल्याप्रमाणे मुलांसाठी पुस्तक भिशी या कल्पनेचा गांभीर्याने विचार करतेय. पुस्तकं छान असतात. पुस्तकं वाचताना मजा येते. पुस्तकं शेअर करणं यातही मजा आहे. आपल्या घरात आपल्याला हवं तेव्हा आपल्याला हवं ते पुस्तक हाताशी असणं यात सुख आहे. हे पुढच्या पिढीला उमगण्याचा हा खूप चांगला मार्ग आहे असे वाटते.

जागतिक पुस्तकदिनाच्या निमित्ताने हे सगळं तुमच्याशी शेअर करताना खूप आनंद होतोय.
वाचू आनंदे ! वाचू आनंदे !!!

Footer

प्रतिक्रिया

अजया's picture

24 Apr 2016 - 8:39 am | अजया

छान कल्पना आहे.
खरंच वाचू आनंदे!

जेपी's picture

24 Apr 2016 - 10:37 am | जेपी

+११
बाकी लेख आवडला

सानिकास्वप्निल's picture

24 Apr 2016 - 9:14 am | सानिकास्वप्निल

पुस्तक भिशीबद्दल छान सांगितले आहेस, लेख आवडला.

कविता१९७८'s picture

24 Apr 2016 - 10:21 am | कविता१९७८

मस्त कल्पना. छान लेख

पियुशा's picture

24 Apr 2016 - 12:54 pm | पियुशा

मस्त उपक्रम आहे हा :)

इशा१२३'s picture

24 Apr 2016 - 1:08 pm | इशा१२३

कल्पना उत्तमच !! मुलांमधे वाचनाची आवड वाढावी यासाठी बालभिशिची कल्पना आवडली .

नूतन सावंत's picture

24 Apr 2016 - 2:26 pm | नूतन सावंत

झकास कल्पना.बालभिशि तर हवीच.

एस's picture

24 Apr 2016 - 3:00 pm | एस

छानच!

उल्का's picture

24 Apr 2016 - 9:33 pm | उल्का

मी माझ्यपुरती पुस्तके घेत असते दरवर्षी. पण हा उपक्रम अगदी आवडला.

सस्नेह's picture

24 Apr 2016 - 10:07 pm | सस्नेह

फारच कल्पक !
आता पुस्तकप्रेमी शोधणे आले :)

मितान's picture

25 Apr 2016 - 6:00 am | मितान

धन्यवाद !

चला पुण्यातले पुस्तकवेडे मिपाकर, नवी पुस्तकभिशी सुरू करुया.

क्रेझी's picture

25 Apr 2016 - 9:12 am | क्रेझी

मी पण ह्यात सहभागी होणार :) बाकी लेख मस्त आणि भिशीची कल्पना १नंबर :)

मी तयार पुस्तक भिशिसाठी..
लेख मस्तच.

पिलीयन रायडर's picture

25 Apr 2016 - 9:52 am | पिलीयन रायडर

म्हणजे ११ वर्ष ही भिशी चालु आहे???!! बापरे!! ग्रेट!!

मलाही कल्पना फार आवडली. मागे तू म्हणाली होतीस. सध्या जमेल असं वाटत नाही पण एकदा जरा स्थिरावले की नक्कीच पहिलं काम हेच करणार!!

लेख आवडला.

नीलमोहर's picture

25 Apr 2016 - 10:26 am | नीलमोहर

लहान मुलं, मोठी माणसे सर्वांसाठी पुस्तक भिशी उपक्रम केले पाहिजेत, असे बरेच इथे पुण्यात आहेत खरे.
लहानपणी आजोळी आम्ही मुलं मुलं मिळून पुस्तक लायब्ररी उघडून बसायचो, मज्जा यायची, आताच्या मुलांनाही आवडेल असे वेगळे काही करायला.

प्रीत-मोहर's picture

25 Apr 2016 - 11:02 am | प्रीत-मोहर

तेव्हाही वाचल होतच. पण दुर्दैवाने इथे पुस्तक्भिशी पेक्षा बाकीच्या भिश्यांमधेच लोकांना जास्ती इंटरेस्ट असल्याने आम्ही आमच सरकारी कृष्णदास श्यामा वाचनालय आणि बुकगंगा डॉट कॉम वर आमची तहान भागवतो

पैसा's picture

25 Apr 2016 - 12:25 pm | पैसा

झक्कास!

मस्त उपक्रम आहे हा, आणी ६ वर्षे चालू ठेवला हे फारच झकास! :-)

आपल्या घरात आपल्याला हवं तेव्हा आपल्याला हवं ते पुस्तक हाताशी असणं यात सुख आहे.

हे तर फारच आवडले आणि मनापासून सहमत. :-)

खुप मस्त कल्पना आहे हि मितान ताई.

विवेकपटाईत's picture

26 Apr 2016 - 7:50 pm | विवेकपटाईत

कल्पना उत्तम. आवडली.

वैभव जाधव's picture

26 Apr 2016 - 7:56 pm | वैभव जाधव

मस्त आयडिया. आमच्या बहिणाबाईंची आहे एक भिशी अशी. दर महिन्याला थोडी थोडी पुस्तकं खरेदी करतात, शेअर करतात. मध्ये हसरी किडनी, मुसाफिर वगैरे पुस्तकं घेतली तिने.

जुइ's picture

9 May 2016 - 12:13 am | जुइ

पुस्तक भिशी उपक्रम आवडला.

कल्पना आवडली लेख पण आवडला. ह्या मालिकेतले १-२ लेख वाचले, उरलेले पण अजून लवकरच वाचेन.

पद्मावति's picture

9 May 2016 - 9:35 pm | पद्मावति

छान कल्पना आहे.