धागे (मालवणी) (मराठी भाषा दिन २०१६)

यशोधरा's picture
यशोधरा in लेखमाला
20 Feb 2016 - 1:40 pm

खयचीही भाषा आणि ज्या मुलखात ती भाषा बोलतत, तो मुलूख, हेंचे आठवणी कशे विणलेल्या वस्त्रासारखे असतत बहुधा. धागे एकमेकांत कशे घट गुतलेले असतत! मालवणीत कायतरी लिही म्हणान सांगितला, तसा माका माझ्या आजोळाची याद झाली पयली. ह्या एक आसता. कोकणातल्या माणसांका कोणी कोकणातून भायेर काढीत, पण त्यांच्या मनातला कोकण कधी भायेर निघूचा नाय. भायल्या जगातल्या सगळया चकमकाटातही तेंच्या मनात कोकणातला आपला अंगण, अंगणाच्या कोपर्‍यातला चाफ्याचा झाड, दारासमोरची तुळस, ओवळी, गोड पाण्याची बावी, कौलारू घर, वाहणारे व्हाळ, चुलीपाशी बसलेला घरातला माजार... असा कायबाय जपून ठेवलेला असता. ते आठवणी सदाबहार आसतत. नशिबान ह्या आठवणींक कोणीच धक्को लावूक शकणत नाय.

लहानपणाक दर उन्हाळ्याच्या सूट्टीयेत कोकणात जाणा ह्या ठरलेलाच. माका आठवता तसा त्या वक्तां आजोळाक वीजही नव्हती. जसो दिस सरत येई, तसतसो आ़जूबाजूचो परिसर बघता बघता अंधारात बुडून जाय. रोज सकाळी फाणासांचे(कंदीलांचे) काचा घासून पुसून स्वच्छ करुन ठेवण्याचो आजीचो नेम होतो. तो तिने कधी मोडूक नाय. संध्या़काळी ह्या फाणासांचे(कंदीलांचे) वाती ती उजळी. भायेरच्या मिट्ट अंधाराफुढे ह्या ज्योतींचो प्रकाश जीवाक किती म्हणून धीर देई! त्या मंद, स्निग्ध प्रकाशात आम्ही सर्व पोरांटोरां न चुकता शुभं करोति कल्याणम् म्हणू. आमच्या फाटसून, देवघरातल्या दिवलीची तेलवात सारली आणि तुळशीफुढे तेलवात केली, काय मगे आज्जी तिच्या स्वरबद्ध आवाजात संथ, सुस्पष्ट लयीत तिची नेहमीची स्त्रोत्रां म्हणू लागी. सांजवेळीचो हो नेम आणि भल्या फाटेक उठून देवाफुढे, वास्तुपुरुषाच्या गडग्यार आणि पुढील दारी तुळशीसमोर सडोसारवण आणि रांगोळी चितारुचो एक नेमही कधीच चुकूक नाय. देवघरातल्या देवीक आणि शाळीग्रामांसाठी सोवळ्याचो निवेद ती वेळेत रांधून तयार ठेवी. घराभोवती फुलणारी जास्वंदा, चाफी, तुळशी, येखादा गुलाबाचा फूल, काकडयाची फुलां, अबोलीचे, बकुळीचे वळेसार फुल-परडीत भरुन देवपूजेची तयारी होई. ह्या फुलां गोळा करुचा काम आमच्याकडे होता. भरपूर धूमशानां घालत आम्ही तां पार पाडू. गुरुजी येत. संथ लयीत खर्जातल्या स्वरात मंत्रोच्चार करत अभिषेक वगैरे करुन साग्रसंगीत पूजा करुन जात. पूजेनंतर, चाय नि रव्याचो लाडू खाताना, दोन चार सुख दु:खाच्ये गजाली करीत, शहरातून गावी पोचलेल्या आमची चवकशी करीत, आणि कुलाचार व्यवस्थित सुरु आसां, तेव्हा देव देवता नेहमीच ह्या घराण्यावर प्रसन्न रवतले हेतूर शंका नाय, असा खणखणीत प्रशस्तीपत्रक देवन संतुष्ट मनाने निघून जात.

खरां सांगूचा तर पूजा सुरु असताना आमका ती जवळून बघूक मिळात काय असा खूप वाटी. नाय म्हटला तरी देवाच्या लांब रुंद खोलीचा अप्रूपच विलक्षण होता! ही लांबच्या लांब आणि ऐसपैस पसरलेली थोडीशी अंधारी खोली, त्याच अंधारात देवघरातल्या समईचो आणि दिवलीचो मिणमिण प्रकाश मिळून तयार झालेलो, न झालेलो असो उजेड, खर्ज स्वरातला मंत्रपठण.. एक प्रकारचा गारुड झाल्यासारख्या होई. पण देवाच्या खोलीत हळूहळू देवघराकडे आम्ही सरकू लागलो, काय, "चला, चला दूर रवात आणि लांबून काय ती पूजा बघा! समाजल्यात? हात जोडल्यात काय थयसर की नुसतीच धुमशानां घालतल्यात रे?" ही त्यांची दटावणी कानार येई! सोवळ्या ओवळ्याचे बोवाळच कडक! मगे पूजा सरली काय हे सोवळ्यातले भटजी बिनसोवळी चाय कशी काय चालौन घेतत, हो आमका नित्य नियमान पडणारो प्रश्न होतो!

पूजेवेळी सोवळ्याओवळ्याच्या नियमांनी बांधून वागणारे हेच गुरुजी मात्र परतताना आवर्जून "शाळा शिकतंस मां नीट? आवशीक त्रास नाय मां दिणस? खूप अभ्यास कर, बरां मोठ्ठा हो, हुशार हो, मोठा होवन आपल्या गावाक विसरां नको हां...समाजलय मां.." सांगत आमच्या माथ्यार मायेन, अपूर्बायेन हात फिरवून जात. अशे एकेक आठवणी. एकदा येवक सुरु झाले काय थांबूचा नाव घेणत नाय! चित्तरपट सुरु.

आमची कोकण भूमीच वेगळी हां! खुद्द परशूरामान वसवलेली, सांगतत. भूमीचा स्वत:चाच असा एक, अनेक घटकांनी बनलेला अजब रसायन आसा. स्वत:चे कायदेकानून आसत, अंगभूत अशी एक मस्ती आसा. कोकणातल्या विश्वाक स्वत:ची अशी एक लय, तंद्री आसा. ह्या मातीतलो निसर्गही आखीव रेखीव नाय, त्याची अगणित रुपां ह्या भूमीवर यत्र, तत्र सर्वत्र अशी उधळलेली आसत. ह्या विश्वच वेगळा. हया लाल मातीतले रस्ते, घरांच्या कुंपणांवर फुललेले जास्वंदी, माडां पोफळ्यांची बना, आमराई, मागील दारी लावलेली, घरची आंब्या फणसांची झाडां, एखाद दुसरी सोनकेळ, तिच्या पानांमधून डोकावून बघणारा सुरेखसा केळफूल, कोणाच्या बागेच्या एका कोपर्‍यात उभो असलेलो नीरफणस आणि ह्यां सगळ्यांमधून डोकावणारी कौलारु घरां... सगळां कसां एखाद्या चित्रात शोभीत, असां.

पण इतक्यान काय झाला म्हाराजा? हयसरचे वाहते व्हाळ, झाडांपाडांतून चलणारे पाणंदी, शांत, सुंदर, साधी आणि शुचिर्भूत देवळां, दर्शनाक येणार्‍या प्रत्येकाचे कथा, व्यथा मनापासून ऐकून घेणारे आणि बोललेल्या नवसांका पावणारे, सामक्षा देणारे, नीटस सजलेले देवी-देवता, तरंग, देवळीसमोरचे दीपमाळी, जिवंत झरे पोटात घेवन कडक उन्हाळ्यातही नितळ पाण्याने झुळझुळणारे आणि पंचक्रोशीचीच नाय, तर येत्या जात्या प्रत्येक तहानलेल्याची तहान भागवणारे बावी, तींमधे सुखान नांदती कासवां आणि बेडकी. बावीच्या थंडपणाक येवन पडलेला येखादा सोनसळी कांतीचा सरपटता जनावर! बावींच्या अवतीभोवती ओलसर वातावरणात उगवलेली नेची आणि मखमली शेवाळी, रस्त्यांच्या, शेतांच्या काठाकाठानं पसरत उमललेली लाजाळू, दोन गावांक जोडणारी मेटां, पावसाळ्यात पडणारे लहान मोठे धबधबे, कोणा भाग्यवंताच्या घराकडे असणारी गोरवांचा धन, तेंच्या गळ्यांतले लयीत वाजणारे घंटा, ओवळीची झाडां, भातशेती आणि त्यातून सूर मारणारी पाखरां. एखाद्या टिकलीएवढ्या छोट्याश्या गावातली कमळांनी फुललेली तळी, काजीच्या झाडांचे कोवळे लसलसते सोनेरी कोंब, रायवळांचे आणि हापूस - पायर्‍यांचे गंध, बरक्या, काप्या फणसगर्‍यांचे दरवळ, जांभळां, करवंदी, जांबासारखी फळां, समुद्रकिनारे, सुरुची आणि ताडामाडांची बनां... काय आणि किती... लहानपणापासून ह्या जरी सतत बगलेला आसा, तरी आजय ह्या सगळ्या मोहपाशांनी माझ्या मनाक तितक्याच बांधून घातलेला आसा!! ह्या मातीतल्या न सरत्या भुतांखेतांच्या गजालींसकट, ह्या सगळा गारुड माझ्या मनात कायमच वस्तीक येवन रवलासा.

आणि कोकणातलो पावस कधी अनुभवल्यात काय कोणी? तो एक सोहळोच! येणार्‍या पावसाच्या चाहुलीवांगडा उन्हाळ्याची सुट्टी सरत येई. रवलेल्या उन्हाळ्याची तलखी सुरु असतानाच कधीतरी आभाळात गरजूक सुरुवात होई, माती उडूक सुरुवात होई आणि सोबतीन गार वारो वाहूक लागी. ताड माड जोरजोरात हेलकावे घेत. आजूबाजूचे वृक्ष वल्ली आपापलो पर्णसंभार सर्रर्र सर्रर्र आवाज करत जोरजोरात घुसळत. हवेत गारवो येई आणि लाल लाल मखमालीचे किडे दिसूक सुरुवात होई! की समजूचा की आता कधीही कोसळूक लागतलो रे बाबा! त्याअगोदर कौलां परतून घेत, पडवीत, मागील दारी झावळी/ चुडतां बांधीत, पूर्वी चुली होते तेव्हा लाकडांची बेगमी करुन ठेवत.. आणि मगे एक दिवस पावस ओतूक सुरुवात होई! भर दिवसां अंधारल्यासारख्या होई, वीज नव्हती तेव्हा काही प्रश्नच नव्हतो पण नंतर कधीतरी आलेली वीजही पावसाकाळी बरोब्बर निरोप घेई! लाल मातीच्या रस्त्यांमधून पाणी वाहूक लागी. घरातली कुत्री मांजरी घरात धावन येत आणि एखाद्या कोपर्‍यात मुटकुळी करुन पडून र्‍हात. मांजरी चुलीकडे मुक्काम हलवी. अंगण धुतल्यासारख्या साफ होई. स्वयंपाक घरातल्या चुलीची धग सुख देई. पावसाळ्यात रात्रीवेळी रातकिड्यांचे आणि बेडकींचे आवाज अधिकच तीव्र वाटत. संध्याकाळी पायाखाली कोणी सरपटणारा जनावर आला पावसापाण्याचा तर काय करा, ह्या विचारान आज्जी भायेर जावक मनाई करी. वातावरणात ओलशी धरुन राही.

आणि मग एकदम कधीतरी परतून येवचो दिवस येई. आदले दोन रात्री घरातली बायल माणसां दिवसभराची कामाधामां आटोपून परत शहरात भेट धाडूक व्हयी कारणान लाडू, चकल्ये, करंजी वगैरे जिन्नस करुक बसत. अजून कोकमां, काजू, सुकयलेले फणसाचे गरे, आंबा फणसाची साटां, शेंगदाण्याचे लाडू, खाजी ह्याही बांधत. जावचे दिवशी आई, मावशी, आजी, आजूबाजूच्या शेजारी बायलमनशांचे डोळे भरत. वर्षानुवर्षांची घरच्यासारखीच - खरां तर घरचीच गडी माणसां, मामा लोक वगीच खाकरत. वगी इकडे तिकडे करत, चला, चला करत...एक प्रकारची अस्वस्थ शांतता वातावरण भारुन टाकी. घराच्या देवासमोर नारळ ठेवून आज्जी गार्‍हाणा घाली. तुळशीवृंदावनापुढे नमस्कार करुन आणि वयान मोठ्या लोकांच्या पाया पडून आम्ही एसटी स्टेशनाकडे चलूक सुरुवात करु. मामा लोक पोचवूक येत. म्हणता म्हणता कोकण मागे पडी आणि एसटी शहराकडे धावी.

आता मात्र दर उन्हाळी सुट्ट्यांत, कोकणात आजोळी - पणजोळी जावची चैन कधीचीच सरुन गेलेली आसा. मे महिन्यातल्या ऐन दुपारी, बावीकाठच्या आंब्यांच्या सावलीत बसून, जिवाक शांतवणारो वारो खात, गजाली करुचे, दिसही सरले. ज्या मायेच्या माणसांकडून कौतुका करुन घेवक थय जात होतो, कुशीत बसून आणि वांगडा निजून गजाली गोष्टी ऐकवत आणि ऐकी होतो, हक्कान कौतुकां करुन घेत होतो, ती वडिलधारीही आता नाय आसत. घरही मायेच्या माणसांचो राबतो नसल्या कारणान बावल्यासारखां दिसता....

तरीही ह्या मातीची, भाषेची, घराची ओढ़ सरण्यासारखी नाय.

पण आपल्यापैकी प्रत्येकाचा असाच तर असता मां? प्रत्येकाचो प्रांत, भाषा, माणसां वेगळी असतीत पण अनुभव तर अशेच, ओढही तीच. आणि अजून सांगू तरी काय..!

***

ढिश्क्लेमर: मालवणी माझ्या आवशीकडची भाषा. घराकडे काय रोज बोलणत नाय, तेव्हा माका काय उत्तम अशी बोलूक नाय येणा. आजवर जशी कानार पडली आणि आजोळाकडे जाणा झाला की अजून जशी आणि जितकी कानार पडता, त्या जोरार हयसर लिहिण्याचा धाडस केलय. काय चुकून शब्दं इकडे तिकडे गेलो असात तर, माफी मागून ठेवतय

प्रतिक्रिया

बरा वाटला आपली भाषा वाचूक गावली :D

शान्तिप्रिय's picture

22 Feb 2016 - 5:26 pm | शान्तिप्रिय

व्वा यशोधरा!
कोकणच्या मातीचा आणि सुगन्ध दरवळ्तोय तुमच्या लेखनातून. सुन्दर लेख.
वाचनखुणा साठवल्या आहेत.

वाचनखूण कशी साठवली? या लेखाला तरी तसा पर्याय दिसत नाहीये मला.

सौंदाळा's picture

22 Feb 2016 - 5:49 pm | सौंदाळा

अत्यंत सुंदर लिहिलय

सुमीत भातखंडे's picture

22 Feb 2016 - 6:55 pm | सुमीत भातखंडे

मजा आली!

आतिवास's picture

22 Feb 2016 - 7:49 pm | आतिवास

वाचताना मालवणी समजत गेली.
म्हणजे असं मला वाटलं तरी.
लेखन आवडलं.

जुइ's picture

22 Feb 2016 - 8:34 pm | जुइ

मालवणी भाषेत एक प्रकारचा गोडवा आहे.

जयंत कुलकर्णी's picture

22 Feb 2016 - 8:59 pm | जयंत कुलकर्णी

१०० एकर हापूसच्या बागा आणि तेवढ्याच काजूच्या बागा बक्षिस....!
:-)

किसन शिंदे's picture

22 Feb 2016 - 9:21 pm | किसन शिंदे

माझ्या डिपार्टमेन्टला दोन इरसाल मालवणी इलेक्ट्रिशियन आहेत. जेव्हा ते दोघे एकमेकांशी बोलतात तेव्हा ते ऎकायला मजा येते. त्यांच्या इरसालपणाचा एक किस्सा नमूद करतो. एका सकाळी बोर्डरूममधून भर मिटिंगमध्ये सिनियर टेक्निकल हेडने इलेक्ट्रिकल रूममधे फोन केला. या दोघांपैकी एक तिथे उपस्थित होता आणि दुसरा कुठेतरी बाहेर होता. सिनियर हेडने स्पायडर फोनवरून लावल्याने आवाज बाकीच्यांनाही येत होता.

सि.हे : अरे विनायक, पांडूरंग कुठे आहे?
विनायक : हगुग ग्येलो!
सि.हे : ?????

एव्हाना सगळ्यांनी तो शब्द स्पष्ट ऎकला होता, पण तरीही ऎकण्यात काही गफलत झाली असावी म्हणून सिनियर हेडने पुन्हा प्रयत्न केला.

सि.हे : अरे विनायक, पांडूरंग कुठे आहे?
विनायक : हगुग ग्येलो, मुताक ग्येलो!! (समोर कोण बोलतंय हे जाणून न घेता विनायक दणादण सुरू)
सि. हे : अरे गाढवा, अरविंद चव्हाण बोलतोय बोर्डरूममधून. पांडू कुठे आहे??
विनायक: साॅरी..साॅरी सर! माका कळूचा नाय कोन बोलत ते.

इकडे ज्यांना मराठी कळत होते त्यांची हसून हसून पोट दुखायची पाळी आली.

किसन शिंदे's picture

22 Feb 2016 - 9:21 pm | किसन शिंदे

मपल्याला तुपला लेक लय आवल्डा.

खटपट्या's picture

22 Feb 2016 - 11:06 pm | खटपट्या

गो यशो, मस्त लीवलायस काय ता. माका माजो गाव आटवला.
असा कायतरी लीवत र्‍हा गो.

मीता's picture

23 Feb 2016 - 2:32 pm | मीता

खूप छान लिहिलंय ताई .

नूतन सावंत's picture

24 Feb 2016 - 10:52 pm | नूतन सावंत

यशो,आज बाग असती न तर तुका अर्धी मालकी दिली असती.लय आवडलो लेख.तुज्या धाग्यांनी मनावर भरतकाम केल्यानी गे बाय.

विशाखा राऊत's picture

25 Feb 2016 - 4:23 am | विशाखा राऊत

सुंदर लेख. मस्तच लिहिलेस

सुबक ठेंगणी's picture

25 Feb 2016 - 10:19 am | सुबक ठेंगणी

मालवणी म्हणी पेरत, तो एक विशिष्ट हेल काढत बोलणारे माझे आजोबा आठवले.

कोकणातल्या माणसांका कोणी कोकणातून भायेर काढीत, पण त्यांच्या मनातला कोकण कधी भायेर निघूचा नाय.

अगदी अगदी.

पद्मावति's picture

5 Mar 2016 - 2:18 pm | पद्मावति

आहा, काय सुरेख लिहिलंय. भाषा गोड. कोकणातलं आजोळ जसं च्या तसं डोळ्यासमोर उभं केलंत.

सुधीर कांदळकर's picture

6 Mar 2016 - 7:51 pm | सुधीर कांदळकर

गेलंय मी. आजोळपणजोळातलां निसर्गाचां वर्णन झकासच. मी तर स्पेलबौंडच होवान गेलंय. आयेकडान द्रीष्टच काडान घे माझे बाये!