लावणी माझं जग आहे... सुरेखा पुणेकर.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in दिवाळी अंक
25 Oct 2015 - 3:14 pm

.
.
महाराष्ट्राची एक प्रसिद्ध लोककला - लावणी. महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून लावणीला एक प्रतिष्ठा देणार्‍या, 'कारभारी दमानं', 'पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा', 'दूर व्हा ना, सोडा जाऊ द्या', 'इचार काय हाय तुमचा' या आणि अशा कितीतरी लावण्या अतिशय सुंदर सादर करणार्‍या लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर या नुकत्याच औरंगाबाद जिल्ह्यातील एका तालुक्याच्या गावी नटरंगी नार या कार्यक्रमासाठी आल्या होत्या. मिसळपावसाठी गप्पाटप्पा मारण्यासाठी त्यांनी वेळ दिला आणि कार्यक्रम पूर्ण सादर झाल्यानंतर त्यांच्याशी मारलेल्या या गप्पा.
IMG_20151024_221647सुरेखा पुणेकरांची एक अदा

आतापर्यंतचा आपला जीवनप्रवास आणि आपण लावणीकडे केव्हा वळलात, सविस्तर सांगाल काय?

वयाच्या आठव्या वर्षीपासून मी स्टेजवर काम करते. शाळा नाही, शाळा शिकले नाही. आई-वडिलांचा तमाशाचा फड होता. वडील पुणे स्टेशनला हमाली करत होते. हमाली करत करत कार्यक्रम करायचो. त्यांचं सर्व्हिसकडे लक्ष नव्हतं. जास्त लक्ष तमाशात होतं. माझे वडील तमाशात नाच्या आणि सोंगाड्याचं काम करायचे. आईचे आई-वडीलसुद्धा कलावंत होते. वडिलांचे आई-वडील कलाकार नव्हते, पण वडील कलाकार होते. असं करत करत वयाच्या आठव्या वर्षीपासून बाहेरगावी आई-वडिलांबरोबर फिरत फिरत कला शिकलो, पण शाळा नै शिकलो. शाळेची पायरी कशी असते ते माहीत नाही. असं करत करत सुरेखा पुणेकर नावाने तमाशाचा स्वतंत्र फड काढला. १९८६चा काळ असेल. १९८६,८७,८८ असे तीन-चार वर्षं तमाशाचा फड चालवला. पुढे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या फडाचा कार्यक्रम होता. आमच्या तमाशाचे शंकर चोकुरे आणि उत्तम रतन हे दोन तमाशेवालेही होते. आमच्या तमाशाचा तंबू फुल्ल भरला होता आणि तेवढ्यात आमच्या गेटवर पोराला, ड्रायव्हरला आणि ढोलकीवाल्यांना आमच्या विरोधकांनी खूप मारलं. त्यातला एक बेशुद्ध पडला. आम्ही त्यांना घेऊन दवाखान्यात निघालो, तर आमची गाडी एका छोट्या दरीत दोनतीनशे फूट खोल पडली. गाडीने चारपाच पलट्या घेतल्या. कोणी दगावलं नाही, पण कोणाचा हात तुटला, पाय मोडले, पण बेशुद्ध पडलेला माणूस शुद्धीत आला. सर्वांना सटाण्याच्या दवाखान्यात अ‍ॅडमिट केलं आणि तिथेच ठरवलं - आता तमाशा करायचा नाही. पण आम्ही पडलो जवान. आम्ही कलाकार कोणाचं नीट ऐकत नाही. सामनेवाले (तमाशावाले एकमेकांचे विरोधक) त्रास द्यायचे. मग पुढे आम्ही आर्केष्ट्रा सुरू केला. नाटकं केली. 'कथा अकलेच्या कांद्याची' नाटक सुरू केलं. IMG-20151019-WA0015साधं असणं, साधं दिसणं.

लावणी जीवनाचा प्रवास असा सुरू झाला, तर म्हणजे एकदम तमाशा आर्केष्ट्रा सोडून थेट नाटक... आणि त्यात तुमची काय भूमिका असायची?

मी नाटकात महत्त्वाच्या स्त्री भूमिका करायचे. माझ्याबरोबर जयमाला इनामदार, राम नगरकर., आणि खूप लहानमोठ्या कलाकारांसोबत काम केलं.

पैसे किती मिळायचे?

दोनशे रुपये मिळायचे. राम नगरकर यांच्याबरोबर काम करताना चांगलं वाटायचं. मधु वांगीकरबरोबरसुद्धा काम केलं. खुप कलावंतांबरोबर काम केलं. 'फक्कड बाजीराव' हे नाटक खूप दिवस केलं. खेडेगावातही खूप नाटकं केली. ढोलकी, तबलेवाला आणि पेटीवाला असला की आमचं नाटक सुरू व्हायचं. हौशी कलाकारांबरोबर आणि नाटक जसं मिळेल तसं काम केलं. चैत्र महिन्यात तमाशात करायचो. १९९८ला लावणी महोत्सव भरला होता...

अकलूजला?

अकलूजला नाही. मी कधीच अकलूजला गेले नाही. अकलूजच्या लावणी महोत्सवात गेले नाही.

इतका मोठा महोत्सव आणि आपण गेला नाहीत? काय कारण?

मी ते कारण सांगू शकणार नाही.

बरं, ठीक आहे. आपल्या जीवनात सतत संघर्षच दिसतो. आपण स्वत:चा फड उभा केला आणि तो प्रवास आता महाराष्ट्रात लावणीला एक मोठी प्रतिष्ठा देऊन गेला. आज लावणीकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलला आहे का?

दृष्टीकोन बदलला आहे. कलावंतांचीही चूक असते आणि अशा चुका पदरात घेऊ नये. आणि प्रेक्षकांनी त्याचं भांडवल करू नये. पूर्वी पारंपरिक लावणी असायची. आता चित्रपटातील गाण्यावर नृत्य करावं लागतं. लोकांना ते आवडतं. पूर्वी लावणीचं सौंदर्य दिसायचं. आता ते दिसत नाही, तेव्हा वाईट वाटतं.

सादरीकरणावर प्रेक्षकांच्या अपेक्षांचा परिणाम होतो का?

प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या नाहीत. पण प्रेक्षकांनी आम्हाला पारंपरिक लावणी मागितली पाहिजे. कलाकारांना चित्रपटातील लावण्या करायला सोप्या जातात. आजच्या कलाकारांना कष्ट करावे वाटत नाही. पैसा जास्त आणि कष्ट कमी. आणि मग त्यात कला कमी दिसते. आमच्या टायमाला कसं होतं.. कष्ट खूप होते.

थोडंसं वेगळं विचारतो. पारंपरिक लावण्यांबरोबर धार्मिक लावण्या कधी कराव्याशा वाटल्या का?

धार्मिक कार्यक्रम आहे ना. वाटलं होतं तुम्ही याल ना. या उत्पातांच्या लावणीवर माझा कार्यक्रम आहे. माझी त्याच्यावर कॆसेट आहे. दहाबारा लावण्या आहेत. अशा जाहीर कार्यक्रमात कोणी म्हणलं तर मी ते सादर करते.
IMG-20151019-WA0016सुरेखा पुणेकरांची अजून एक सुंदर अदा

महाराष्ट्र सरकार आपल्या सांस्कृतिक विभागातर्फे असे लावणीचे विविध कार्यक्रम घेत असतात. अशा कार्यक्रमांमधून आपल्याला प्रेरणा मिळते काय?

महाराष्ट्र सरकारचं लक्ष नाटकांवर असतं. लावणीबाबत शासन काही करत नाही. आणि प्रोत्साहन म्हणलं तर कार्यक्रम सर्व सारखेच वाटतात. लावणीला काही आर्थिक मदत होत नाही.

प्रेक्षकांच्या प्रतिसादाबद्दल काय सांगाल?

लावणी सादर केल्यानंतर प्रेक्षकांनी शिट्ट्या आणि टाळ्या वाजवून सादरीकरणाला दाद दिली पाहिजे. कलाकारांना उत्साह येतो. धांगडधिंगा नको. बंद थेटरातले आणि उघड्यावर सादर होणारे कार्यक्रम यातला प्रेक्षक सारखाच. जास्त उत्स्फूर्तपणाही नसावा.

तमाशा आणि लावणी हे कलाप्रकार दीर्घकाळ टिकून राहिले पाहिजेत, यासाठी काय केलं पाहिजे?

प्रेक्षकांचा पुढाकार आणि सहभाग पाहिजे. तमाशा-लावणी यातील कलाकार आपली कला दाखविण्यासाठीच कला सादर करत असतात. अशा वेळी कलाकाराकडून कला मागावी. छ्क्कड, बैठकीच्या लावण्यांची मागणी झाली पाहिजे. जुने लोक सांगायचे - हे गाणं पाहिजे. आता ते दिसत नाही. परदेशात मराठी मंडळाच्या कार्यक्रमात पारंपरिक लावणीची मागणी झाली होती.

सादरीकरणासाठी लावण्यांमधला कोणता प्रकार आवडतो?

मला सर्वच लावण्या आवडतात. पारंपरिक लावण्या विशेष आवडतात.

लावणी हा कलाप्रकार कालबाह्य होत चालला आहे का?

लावणी हा कलाप्रकार कालबाह्य झालेला नाही. आज लावणीच्या दोन-अडीचशे कंपन्या आहेत. कार्यक्रम वाढले आहेत.

आपल्या या धावपळीच्या व्यग्र कार्यक्रमात कोणत्या गोष्टी करायला आवडतात?

मला शेतीची आवड आहे. पुरणपोळी आवडते. मला मटन आवडतं. मला मटन करायला आवडतं. घरी असल्यावर स्वयंपाक करायला आवडतं.

लावणीच्या संदर्भात भविष्यात काय केलं पाहिजे? काय करणार आहात?

लावणीची मला खूप आवड आहे. लावणीने मला पद, पैसा, मान दिला. लावणीने मला सर्व काही दिलं. कुटुंब स्थिर केलं. माझं कुटुंब असं होतं की मला घरच नव्हतं. दहा बाय दहाच्या खोलीत राहत होतो. आता सर्व बहिणींना बंगले बांधून दिले. त्यांची लग्न, त्यांच्या मुलांची लग्नं मीच करून दिली. लावणीने मला सर्व काही दिलं. याच्यापुढे माझी अशी इच्छा आहे की जी मुलगी जिला वाटतं की मला कार्यक्रमात यायचं..... माझ्या कार्यक्रमात मुली अशा आहेत की दोनचार जणींच्या आता परीक्षा आहेत, म्हणजे त्या शिकत असतात. त्यांची घरची परिस्थिती बरोबर नाही, तेव्हा शिक्षणासाठी प्रोत्साहन आणि त्यांची आर्थिक घडी व्यवस्थित बसावी यासाठी मी पूर्ण प्रयत्न करते. माझी इच्छा आहे की त्या मुलीला पूर्ण तयार करायचं की ती जरी गरीब घरातली असली, तरी तिला आपल्या पायावर पूर्ण उभी करायची. तिने तिचं कुटुंब सांभाळायचं. असं 'नटरंगी नार'च्या माध्यमातून करतो. दर वर्षी नवनवीन मुली येत असतात. चांगल्या तयार झाल्या की पिच्चर लाईनला जातात. काही नाटकात जातात....IMG-20151103-WA0000
एक मनमोहक अदा

म्हणजे तुम्ही त्यांच्या भविष्याची तरतूद करून ठेवता. कलेचं क्षेत्र असो की उदरनिर्वाहाची व्यवस्था असेल..

हो, तो माझा उपक्रमच आहे. इथून पुढेही तेच करेल आणि सध्याही करत आहे. ज्या मुलीला वाटतं की माझा उदरनिर्वाह होऊ शकत नाही, कुटुंब सांभाळू शकत नाही.. काही काही कुटुंबामध्ये वडील आजारी असतात, आई आजारी असते, बहीण-भावंडं आजारी असतात., तर अशा मुलींसाठी आम्ही पूर्ण मदत करतो. अशा मुलींना मी आणि माझ्या मुली शिकवतात.

आपल्याशी गप्पा करून छान वाटलं. मिसळपाव डॉट कॉमच्या वतीने मी आपले मन:पूर्वक..

अरे हो, मला मिसळपाव खूप आवडते. मला कधी वाटलं तर मी मिसळपाव करते घरी. कधीकधी आवडीने पाव मागवणार, मिसळ करणार....

पुन्हा एकदा आपले मन:पूर्वक आभार मानतो. एक फोटो घेऊ का?

आता मेकप नसल्यावर मला लोक ओळखणार तरी का? पाहताय ना माझा अवतार? नका घेऊ फोटो. अगं जयश्री, यांना वाट्सपवर फोटो पाठव बरं जरा..

आभार....!
.

दिवाळी अंक २०१५

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

10 Nov 2015 - 7:56 am | अत्रुप्त आत्मा

छान मुलाखत.. नटरंगी नार कार्यक्रम पाहिलेला आहे. ही बाई ज्या तडफेनि आणि मनापासून कार्यक्रम करते..,त्याला सलाम या मुलाखति निमित्ताने.

सुधीर's picture

10 Nov 2015 - 9:46 am | सुधीर

मुलाखत आवडली!

मुलाखत आवडली. "लावणी आणि पठ्ठे बापुराव" या विषयावर विश्वास पाटलांचा एका दिवाळी अंकात लेख वाचला आहे त्याची आठवण आली.

धन्यवाद प्रा.डॉ..!!!

तुषार काळभोर's picture

10 Nov 2015 - 11:48 am | तुषार काळभोर

मुलाखत आवडली!

अकलूजला नाही. मी कधीच अकलूजला गेले नाही. अकलूजच्या लावणी महोत्सवात गेले नाही.

ऑ!!! ऐकावे ते नवलंच!!

निवेदिता-ताई's picture

10 Nov 2015 - 2:10 pm | निवेदिता-ताई

मुलाखत आवडली..

पद्मावति's picture

10 Nov 2015 - 4:49 pm | पद्मावति

खूप मस्तं मुलाखत. धन्यवाद.
फोटोही छान आहेत. साध्या साडीत मेक अप शिवायही गोड दिसतात.

बॅटमॅन's picture

10 Nov 2015 - 4:55 pm | बॅटमॅन

मुलाखत आवडली! सुरेखा पुणेकरांबद्दल खूप ऐकून होतो पण बाकी डीटेल्स माहिती नव्हते. ते प्रकाशात आणल्याबद्दल अनेक आभार!

प्रचेतस's picture

10 Nov 2015 - 6:12 pm | प्रचेतस

ऑफबीट मुलाखत.

ह्या वेळचा दिवाळी अंक ३ वेगवेगळ्या क्षेत्रांतील कलंदरांच्या मुलाखतींमुळे अधिकच खुलून आलाय.

प्रीत-मोहर's picture

10 Nov 2015 - 7:04 pm | प्रीत-मोहर

Sundar mulakhat

वा! सुरेखाताईंची मुलाखत आवडली. आणि मिपासाठी त्यांची मुलाखत घेतल्याबद्दल आपलेही आभार!

मित्रहो's picture

11 Nov 2015 - 9:32 am | मित्रहो

सुरेखाबाईंनी लावणीला प्रतिष्ठा मिळवून दिली. लावणीच्या सादरीकरणाचे नवे परीमाण तयार केले. आज सिने अभिनेत्रीसुद्धा मला सुरेखाबाईंसारखी लावणी सादर करायची आहे असे म्हणतात.
लोककलाकर फार कठीण जीवन जगून लोककला जिवंत ठेवतात. सुरेखाबाई आणि अशा लोककलाकारांना सलाम. त्यांची मुलाखत घेउन ओळख करुन दिल्याबद्दल डॉक्टरांचे धन्यवाद.

मांत्रिक's picture

11 Nov 2015 - 7:10 pm | मांत्रिक

सहमत
+१११

जबरदस्त हो सर. सुरेख मुलाखत घेतलीत.
गावातल्या प्रतिष्ठित रंगमंचावर, प्रतिष्ठित सहकुटुंब प्रेक्षकांसमोर लावणीला पेश करणार्‍या कलावतीला सलाम.
उत्पातांच्या काही जुन्या लावण्या पुन:जीवीत करण्याचे कार्य पण घडलेय असे ऐकतो.

नाखु's picture

20 Nov 2015 - 5:17 pm | नाखु

फार सुंदर आणि सुरेख मुलाखत घेतली आहे.
दोहोंनाही सलाम

स्वाती दिनेश's picture

11 Nov 2015 - 12:09 pm | स्वाती दिनेश

सुरेखा पुणेकरांबद्दल एक उत्सुकता कायमच मनात आहे. टीव्ही वरच्या त्यांचा खुपते तिथे गुप्ते मधील भाग पाहिला होता तेव्हा त्यांच्या अदाकारीची आणि कलाकारीची झलक पाहिली होती.
मुलाखत उत्तम!
स्वाती

मुलाखत आवडली. फोटोही सुरेख आहेत!

दिवाकर कुलकर्णी's picture

11 Nov 2015 - 5:03 pm | दिवाकर कुलकर्णी

सुरेखा ताईनी लावणीच्या कार्यक्रमातून आर्थिक स्तर उंचावल्याचा जो उल्लेख
केला आहे, त्यास त्या पात्रच आहेत . पण त्याजबरोबर कितीतरी कंत्राटदारानी
पण उदंड नोटा छापलेल्या आहेत. पुण्या मुंबई बाहेर नाटके पडेचनात तेव्हां अन्यत्रची थिएटरं,
कंत्राटदार जगविले लावणीनं,
यात वग नाट्य मात्र कुठतरी हरवली.
वग नाट्यातील मिश्कील , मस्त हास्य ,लावणी एके लावणीनं झाकोळंलं गेलं,
वगातल्या उत्स्फुर्त पणाला, द्वयथर्ी संवादाला प्रेक्षक पारखे झाले.

सुचेता's picture

13 Nov 2015 - 9:55 am | सुचेता

प्र्त्यक्ष भेटलेय मी एकदा त्यान चिचवड येथे ग.दि.माच्या स्मृती प्रित्यर्थ असलेल्या काव्यवाचनात, खुप सुरेख बोलल्या होत्या त्या.

मदनबाण's picture

13 Nov 2015 - 9:14 pm | मदनबाण

वाह्ह... मुलाखत आवडली !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आ के तेरी बाहों में, हर शाम लगे सिंदूरी... :- Vansh

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Nov 2015 - 11:30 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्व वाचक आणि कौतुकाने प्रतिसाद लिहिणार्‍यांचे मनःपूर्वक आभार.

-दिलीप बिरुटे

बबन ताम्बे's picture

20 Nov 2015 - 6:56 pm | बबन ताम्बे

त्यांचे मनोगत टी.व्ही. वर पण पाहीले होते. निगर्वी वाटल्या. त्यांच्याकडच्या मुलींची लग्ने सुद्धा त्या स्वखर्चाने लावून देतात असे त्यांनी सांगीतले होते.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Nov 2015 - 12:49 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मुलाखत आवडली. आभार. शक्य असेल तर त्यांच्याकडून त्यांची आवडती एखादी पाककृती मागाल का?

तरीही हावरटपणा संपत नाही. सुरेखाबाईंचे आणखी फोटो, काही व्हीडीओ असते तर आणखी आवडलं असतं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Nov 2015 - 8:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसादाबद्दल आभार हं !

पुढच्या वेळी त्यांची भेट झाली की लावणी वगैरे सोडून त्यांची आवडती पाककृती कोणती? त्या पाककृतीत घरचा मसाला वापरतात का ? की तयार मसाला वापरतात हे नक्की विचारीन हं..!

-दिलीप बिरुटे

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Nov 2015 - 4:01 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

जरूर विचारा.

पडद्यावर किंवा रंगमंचावर किंवा लेखनातून दिसणारी व्यक्ती आणि प्रत्यक्षात असणारी व्यक्ती यांच्यातलं अंतर कमी व्हायला त्यातून मदत होते. उदाहरणार्थ आशा भोसले किंवा लालन सारंग यांना स्वयंपाक करून लोकांना खाऊ घालायला आवडतं. त्यातून सेलिब्रेटीमागचा माणूस दिसायला लागतो.

सुरेखा पुणेकरांना खायला काय आवडतं (मटन, मिसळपाव) यातून त्यांचा माणूसपणा समोर येतो. तो मला भावला. किंवा मेकपशिवाय फोटो काढू न देणं, हेपण निरागस, गोड वाटलं. (भले, मला त्यांचा मेकपरहित फोटो बघायला आवडला असता.)

दुसऱ्या बाजूने फक्त पाककृती काय, गूगलूनही मिळतात. पण उदाहणार्थ, दिवाळी अंकातली श्रीखंडाच्या वड्यांची पाककृती काही पार्श्वभूमीसकट येते. अशा गंमतीशीर गोष्टी वाचताना मजा येते. पाककृतीशिवाय अधिकचा बोनस मिळाला असं वाटत राहतं.

प्रश्न अत्यंत व्यवस्थित निवडक विचारलेत
मुलाखत आवडली
या क्षेत्रात होत असलेली कलावंतांची दैना विशेषतः स्त्री कलावंतांची फार वेदना देऊन जाते.
मागे एक इतकं भेदक टायटल होत एका पुस्तकाच
तमाशा- विठाबाईच्या आयुष्याचा
नुसतं नाव वाचलं तरी अंगावर काटा येतो एक पट नजरेसमोर उलगडतो.

चौथा कोनाडा's picture

3 Oct 2019 - 12:11 pm | चौथा कोनाडा

चाळता चाळता ही मुलाखत सापडली. आवडली. खूपच समर्पक !
मी त्यांचे काही कार्यक्रम पाहिलेत ! त्यांच्या अदाकारीला तोड नाही.

पण, त्यांचे बिग बॉस मध्ये सहभागी होणे रुचले नाही.
मजबुरीका दुसरा नाम, बिग्ग ब्बॉस !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Oct 2019 - 4:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

त्यांचे बिग बॉस मध्ये सहभागी होणे रुचले नाही

अगदी सहमत... त्या बिगबॉसच्या कार्यक्रमाला मीही खुप फॉलो केलं, त्यांना तिथे वावरायला जमलं नाही. किशोरी शहाणे आणि त्या, त्यांची ओढ़ातान झालेली दिसली त्या शो ला. अर्थात ते सर्व स्क्रिप्टेड असतं पासून ते, काय काय ऐकत असतो त्यामुळे तो सर्व टीआरपीचा भाग असला तरी सुरेखा पुणेकर यांना तो खेळ जमला नाही असेच वाटले.

चौथा कोनाडा's picture

5 Oct 2019 - 5:32 pm | चौथा कोनाडा

बरोबर डॉ.साहेब,
या रियालिटी शोज मध्ये आपल्या अवडत्या कलाकाराचे निगेटिव्ह बाजू जास्तच उजळल्या गेल्याकी आपल्याला वाईट वाटतं
किंवा त्या कलाकाराची प्रतिमाही डागाळते. दुरून डोंगर साजरे मधले साजरेपणच काळवंडत !

उपेक्षित's picture

3 Oct 2019 - 2:00 pm | उपेक्षित

हायला हे कस मिसल काय माहित, मस्त मुलाखत हो बिरुटे सर.

लहानपणी पुण्यात कर्वेनगर मध्ये राहायचो (हिंगणे होम कॉलनी) तिथे आमच्या चाळीच्या मागेच यांचा बंगला+ पुणेकर चाळ होती, तिथे एक ब्लाक चेरीचे का लिचीचे (हो बहुतेक) झाड होते.

मुलाखत आवडली... लोककला जपल्या गेल्या पाहिजेत