पॉन सॅक्रिफाईस

चतुरंग's picture
चतुरंग in दिवाळी अंक
28 Oct 2015 - 7:15 pm

.
.
रॉबर्ट जेम्स फिशर.. तोच तो बॉबी फिशर! बुद्धिबळाची थोडीशीदेखील आवड असलेल्या प्रत्येकाला माहीत असलेले नाव. अमेरिकेत १६ सप्टेंबरला या बॉबीच्या जीवनावर चित्रपट प्रदर्शित झाला 'पॉन सॅक्रिफाइस'. फर्स्ट डे फर्स्ट शो बघायला आवडले असते, पण तसे शक्य नव्हते. नंतरच्या आठवड्यात जमवलेच.
टोबी मॅग्वायर (स्पायडरमॅन फेम) याने बॉबीची मुख्य भूमिका साकारली आहे. चित्रपट सुरू होतो तो रेकजाविक या आइसलंडमधल्या गावाजवळच्या एका मैदानात. जीपमधून बॉबी सामन्याच्या ठिकाणी जात असतो. बोरिस स्पास्कीविरुद्ध जगज्जेतेपदाचा सामना तिथे होणार असतो. आता दोघांचेही देश अमेरिका आणि रशिया सोडून भलत्याच ठिकाणी हा सामना का? तर त्यासाठी चित्रपटाची थोडी पार्श्वभूमी सांगायलाच हवी. अमेरिका आणि सोविएत रशिया यांच्या दरम्यान शीतयुद्धाचे ढग पराकोटीचे काळेकुट्ट झालेले असण्याच्या सुमारास, १९७२च्या दरम्यान, ही कथा घडते. शीतयुद्धादरम्यानच अमेरिकेने विएतनाममध्ये सपाटून मार खाल्लेला असतो. बुद्धिबळात सोविएत वर्चस्व हे कित्येक दशके वादातीत असते. एकमेकाचा पाणउतारा करण्याची एकही संधी अमेरिका-रशिया सोडत नसतात. अशा वेळी बुद्धिबळाच्या पटावर बॉबीचा उदय होतो.
नुकताच ब्रुक्लिन न्यूयॉर्क इथे राहायला आलेला सहा वर्षांचा लहानगा बॉबी आणि त्याची दहा वर्षांची बहीण यांचा सांभाळ आईनेच केलेला असतो. एकटेपणावर मात म्हणून बुद्धिबळ खेळायला सुरुवात करणारा बॉबी त्यात बघता बघता प्रावीण्य मिळवतो. खेळायला कोणी मिळते का याचा शोध घेताना त्याला एक कॅथॉलिक धर्मगुरू बिल लोंबार्डी बुद्धिबळ खेळतो, इतकेच नव्हे तर तो शिकवतो, हे समजते. बॉबी बिलकडे शिकायला लागतो. वयाच्या तेराव्या वर्षी ब्रुकलिनमधल्या मार्शल चेस क्लबमध्ये अमेरिकन चँपिअन डोनाल्ड बर्नला हरवताना बॉबीने खेळलेला डाव गेम ऑफ द सेंचुरी या नावाने प्रसिद्ध आहे. एका दिवसात बॉबी अमेरिकन बुद्धिबळ जगात प्रसिद्ध पावतो. हे प्रसंग चांगल्या पद्धतीने चित्रपटात आले आहेत, तरीही त्यातले काही आणखी थोड्या विस्ताराने यायला हवे होते असे वाटते.
१९४८पासून सातत्याने रशियन खेळाडूच जगज्जेतेपदावरती हक्क सांगून असतात. फिशरची थेट तक्रार असते की रशियन खेळाडू हे कँडिडेट्स टूर्नामेंटमध्ये डावाच्या मध्यातच संगनमताने बरोबरी करतात आणि अशा प्रकारे सामन्यांचा निकाल लावला जातो की बाहेरचा कुणी खेळाडू जिंकून त्यांना आव्हान देता कामा नये. एकप्रकारे संपूर्ण सोविएत सरकारच या यंत्रणेमागे आहे, अशी त्याची तक्रार असते. फिशरला याबाबतीत पॅरॅनॉइड ठरवले जाते.
याचा थोडा इतिहास असा - १९६६मध्ये तैग्रान पेट्रोस्यान याला हरवण्यात स्पास्की अपयशी ठरला आणि पेट्रोस्यान जगज्जेता ठरला. परंतु लगेचच दोन वर्षांनी १९६८ साली एफिम गेलर, बेंट लार्सन आणि विक्टर कोर्चनॉय या तीन दिग्गज ग्रँडमास्टर्सना कँडिडेट स्पर्धेत धूळ चारून स्पास्की पुन्हा एकदा पेट्रोस्यानसमोर शड्डू ठोकून उभा राहिला. या वेळी मात्र कोणतीही चूक न करता त्याने पेट्रोस्यानला १२.५ वि १०.५ गुणांनी हरवले आणि एकदाचा जगज्जेता झाला! अत्यंत आक्रमक खेळ करणार्‍या स्पास्कीचे हे यश अभूतपूर्व समजले गेले. अर्थात जिंकणारा आणि हरणारा दोघेही रशियन असल्याने पुन्हा एकदा जगज्जेतेपद रशियाकडेच राहिले!!
बॉबीची कीर्ती ऐकून पॉल मार्शल हा वकील त्याला गाठतो. बॉबीची बुद्धिबळातली प्रतिभा बघून पॉल त्याच्यामागे लागतो की जगज्जेतेपदासाठी तो का प्रयत्न करत नाहीये? त्यानिमित्ताने रशियन वर्चस्वाला शह दिला जाईल ही पॉलची त्यामागची अटकळ असते. वॉशिंग्टन डीसीमधल्या राजकारणी लॉबीशी पॉलचे संबंध असतात. जगज्जेतेपद मिळवणे हे बॉबीचेदेखील स्वप्न असतेच, परंतु अमेरिकन जनमानसात अजूनही बुद्धिबळाला एवढी प्रतिष्ठा नसते. शिवाय जगज्जेतेपदाची तयारी करायची म्हणजे लागणारा पैसा आणि मदत हे व्यावसायिक पद्धतीने उभे करणे, प्रायोजक मिळवणे या सगळ्या गोष्टी बॉबीला आवाक्याबाहेरच्या वाटत असतात आणि तशा त्या असतातही. पॉल म्हणतो, "मी तुला सगळी मदत करतो. तू फक्त स्पास्कीला हरवण्याचे स्वप्न मनात बाळग! अमेरिका कशी मोठी आहे हे आपण जगाला दाखवून देऊ या!"
तर अशा सगळ्या वातावरणात फिशर कँडिडेट्स मॅचेसमध्ये भाग घेतो आणि रशियन ग्रँडमास्टर मार्क तैमानोव आणि डॅनिश ग्रँडमास्टर बेंट लार्सन (हा पहिला पाश्चिमात्य खेळाडू, ज्याने रशियन वर्चस्वाला शह द्यायला सुरुवात केली) या दोघा दिग्गजांचा सरळसरळ ६-० असा पराभव करतो, इतकेच नव्हे, तर त्यानंतर पेट्रोस्यानलादेखील तो सलग चार डाव जिंकून चीतपट मारतो! हा एक अचाट पराक्रम असतो. इंटरझोनल स्पर्धेपासून सलग २० वीस डाव जिंकणे, उरलेले बरोबरीत आणि एकही हार नाही हे सगळे हादरवून टाकणारे असते. विशेषतः आजपर्यंत रशियन बुद्धिबळाला एवढ्या वाईट पद्धतीने कोणीही हरवलेले नसताना!! इथेच पुढच्या सगळ्या समराची बीजे रोवली जातात. बॉबी फिशर हे प्रकरण साधे नाही, हे सगळ्यांनाच कळून चुकते आणि अमेरिकन सरकार त्याचा उपयोग करून घ्यायला बघू लागते. रशियासाठीसुद्धा बोरिस स्पाकीचे जेतेपद टिकवणे हे राष्ट्रीय आव्हान होऊन बसते. या दोन खेळाडूंचा राजकीय पटावरती प्याद्यासारखा वापर केला जातो, म्हणून चित्रपटाचे नाव 'पॉन सॅक्रिफाइस'!
रशियाच्या वर्चस्वाला बुद्धिबळाद्वारे शह देण्यासाठी बॉबी फिशर पुढे येतो. इकडे बोरिस स्पास्कीसाठी संपूर्ण रशियन व्यवस्था पाठीमागे उभी असते. त्याला मिळणारा भत्ता, फिजिओथेरपिस्ट, मॅनेजर, ठेवली जाणारी बडदास्त यापैकी काहीही फिशरसाठी उपलब्ध होत नाही. त्याचा मॅनेजर म्हणून काम करणारा पॉल आणि ट्रेनर बिल लोंबार्डी या दोघांखेरीज कोणीच त्याच्या बाजूने नसते. चित्रपटात तो आणि त्याची बहीण जोन यांचे नाते प्रेमाचे दाखवले आहे. आपण गुणवत्तेने सर्वोच्च खेळाडू आहोत आणि तरीही आपल्याला ते सिद्ध करण्यासाठी परिस्थिती मुद्दाम अडथळ्यांची बनवली जाते आहे, असे त्याच्या मनाने घेतलेले असते. त्यात तथ्याचा अंश असला, तरी त्याचे रूपांतर हळूहळू पॅरॅनॉइयामध्ये होत जाते. तारुण्यापासूनच फिशर अधिकाधिक संशयी होत जातो. त्याला त्याची बहीण समजून घेऊ शकत असते, परंतु तिच्याही हातात त्याला प्रत्यक्ष मदत करू शकण्यासारखी परिस्थिती नसते.
या संशयामागे फिशरचे लहानपणीचे अनुभव काही प्रमाणात जबाबदार आहेत, हे दाखवण्याचा दुबळा प्रयत्न दिग्दर्शक एडवर्ड झ्विकने केलेला आहे. बॉबीची आई रेगीना फिशर ही एक नर्स असते. काही काळ रशियात व्यतीत करून ती तिचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून डॉक्टर होते. तिथे हान्स गेरार्ड-फिशर याच्याशी तिचा संबंध येतो. त्याच्या आग्रहास्तव ती तिथे राहते, दोघे लग्न करतात. त्यानंतर रशियातल्या कडव्या राजवटीला कंटाळून ती अमेरिकेत परतते. तिथे येताना मात्र रशियन शासन तिचे वैद्यकीय प्रमाणपत्र काढून घेते. त्यामुळे तिला अमेरिकेत डॉक्टर म्हणून काम करता येत नाही. त्यानंतर हान्स गेरार्ड अमेरिकेत येण्यासाठी प्रयत्न करतो, परंतु कम्युनिस्ट सरकारशी जवळचे संबंध असल्याने त्याला अमेरिकन व्हिसा नाकारला जातो. अर्थात हा कोणताच भाग चित्रपटात येत नाही. त्यामुळे ही पार्श्वभूमी माहीत नसेल, तर दुवा निखळल्यासारखी दर्शकांची अवस्था होते. चित्रपटात फक्त रेगीना फिशर ही तिच्या घरी चालू असलेल्या पार्टीत रशियन बोलताना दाखवली आहे आणि एफबीआय एजंट गाडीत बसून बॉबीच्या घराची टेहळणी करताना दाखवलाय. त्यातही थेट एफबीआय असा उल्लेख न येता बॉबी म्हणतो की "मॉम, तो माणूस आपल्या घराकडे बघतोय!" तेव्हा आई सांगते, "मी तुला किती वेळा सांगितलंय की तसल्या लोकांकडे लक्ष देत जाऊ नकोस म्हणून!" आणि त्याच्या बहिणीला बॉबीला घेऊन जायला सांगते.
बॉबीच्या जन्माची कथा हीच एक चित्रपट बनू शकेल इतकी सुरस आणि चमत्कारिक आहे! बॉबीचा जन्म शिकागोतला. त्याच्या जन्मदाखल्यावर हान्स गेरार्डचे नाव बाप म्हणून आहे ते रेगिनाच्या सांगण्यावरूनच. रेगीनाचे कम्युनिस्ट पार्टीशी जवळचे संबंध आहेत या संशयावरून सतत तिच्या पाळतीवर असलेल्या एफबीआयला संशय असतो की बॉबीचा जन्म होण्याआधी हान्स गेरार्डला अमेरिकेत येता आलेले नाही आणि रेगीना अमेरिकेबाहेर कित्येक वर्षात गेलेली नाही तर हान्स-गेरार्ड त्याचा बाप कसा असू शकेल? एफबीआय त्याबाबतीत जंग जंग पछाडून शेवटी अशा निर्णयाप्रत येते की हंगेरिअन भौतिकशास्त्रज्ञ डॉ.पॉल नेमेन्यि हाच माणूस फिशरचा जीवशास्त्रीय बाप असला पाहिजे. वंशाने ज्यू असलेला पॉल नेमेन्यी हा अत्यंत हुशार हंगेरिअन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ असतो. मध्य युरोपातल्या जाचक परिस्थितीला कंटाळून तो जर्मनीत स्थलांतरित होतो. तिथे ज्यूंचे शिरकाण सुरू झाल्यावर तो ब्रिटनमध्ये आणि पुढे अमेरिकेत येतो. प्रिन्स्टन विद्यापीठात असलेल्या अल्बर्ट आइन्स्टाईनच्या शिफारशीवरून तो आयोवा विद्यापीठात आइन्स्टाईनच्या मुलाबरोबर हायड्रॉलिक्सवर संशोधन करत असतो. इकडे वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याने पैसे मिळवण्याचे विविध मार्ग चोखाळणारी रेगीना कोलोरॅडो विद्यापीठात काही व्यावसायिक अभ्यासक्रम करून बरी नोकरी मिळवता येईल का, या धडपडीत असते. आयोवाहून डॉ. नेमेन्यी कोलोरॅडो विद्यापीठात गणित शिकवायला येतो. तिथे त्यांचे सूत जमते. परंतु ते लग्न करत नाहीत, कारण अजूनही कागदोपत्री हान्स गेरार्ड हाच रेगीनाचा पती असतो. पुढे १९४३मध्ये रेगीना शिकागोला येते आणि तिथे बॉबीचा जन्म होतो! त्याच्यापासून त्याच्या जन्मदात्याचे नाव लपवून ठेवणे तत्कालीन परिस्थितीमुळे रेगीनाला करावे लागले असे दिसते. कारण एकट्या आईने दोन मुले वादग्रस्त परिस्थितीत वाढवावीत असा तो काळ नसावा.
चित्रपटात फक्त एकदाच एक व्यक्ती (पॉल नेमेन्यी?) ब्रुक्लिनला रेगीनाच्या अपार्टमेंटमध्ये आलेली आणि त्यांचे संबंध आहेत हे सूचित केले आहे आणि तिथे बॉबी तिरस्काराने त्याच्याशी बोलतो आणि "माझ्या घरातून निघून जा" असे सांगतो इतकेच दाखवले आहे. एफबीआयच्या शोधात पॉल बॉबीसाठी पोटगी पाठवत असल्याचेही पुरावे मिळाले आहेत. फिशरने पुढे कधीतरी एका ठिकाणी पॉल नेमेन्यी आमच्या अपार्टमेंटवर येत असे आणि मला घेऊन रेस्तराँमध्ये किंवा बागेत जात असे असा पुसट उल्लेखही केलेला आहे. परंतु हेदेखील चित्रपटात नाहीच. अशा तर्‍हेने ताणाचे बालपण अनुभवलेल्या फिशरच्या मनात संशय बळावण्याची विकृती मूळ धरते, असे दिसते.
असो. यानिमित्ताने बॉबीच्या जन्माचा इतिहास लिहिला गेला. तर सांगायची बाब अशी की याचे धागेदोरे तुम्हाला एक दर्शक म्हणून माहीत नसतील, तर चित्रपटातल्या दृश्यांचे संबंध लावताना अडचण येऊ शकते. दिग्दर्शकाने यासंबंधाने थोडी अधिक काळजी घ्यायला हवी होती आणि हे धागे काही प्रमाणात का होईना, लोकांसमोर आणायचे कौशल्य दाखवायला हवे होते असे वाटते. असो. हा सगळा भाग विस्ताराने सांगायचे कारण फिशरच्या मानसिकतेवर याने काही प्रकाश पडू शकतो.
१९७२च्या जुलैमध्ये जगज्जेतेपदाचा सामना रेकजाविक इथे ठरतो. तोपर्यंत बॉबीच्या असुरक्षित मानसिकतेने गंभीर स्वरूप धारण करायला सुरुवात केलेली असते. तो अटी बदलत राहतो. आधी ठरलेली $१२५,०००ची रक्कम ही विजेत्यासाठी पुरेशी नाही, ती दुप्पट व्हावी आणि चित्रीकरणाच्या आणि दूरदर्शन प्रसारणाच्या हक्कातले ३०% मानधन म्हणून मिळावे असा त्याचा आग्रह असतो. अन्यथा मी खेळणार नाही म्हणून तो हटून बसतो. बुद्धिबळाचा पटदेखील लंडनच्या एका विशिष्ट कंपनीचाच हवा म्हणताना फिशरच्या अटीप्रमाणे तो बदलून घेतला जातो. या विचित्र वागण्याचे कारण म्हणजे तो स्पास्कीशी खेळायला घाबरतोय असा सोयीस्कर समज रशियन माध्यमे आणि त्यामुळे इतर माध्यमे पसरवतात. त्यामुळे फिशर आणखीनच भडकतो!
फिशरला प्रसिद्धीमाध्यमांचा तिटकारा असतो. रेकजाविकला जाण्यासाठी तो न्यूयॉर्कच्या केनेडी विमानतळावर येताच कॅमेरे आणि वार्ताहरांचे मोहोळ त्याला गराडा घालते, तेव्हा तो बिथरतो आणि तिथून निसटून पुन्हा घरी जातो. ती फ्लाईट चुकतेच. अचानक एक ब्रिटिश बुद्धिबळप्रेमी आणि अर्थसाहाय्यक जेम्स स्लेटर $१२५,००० देणगी देऊन सामना होण्याचा मार्ग खुला करतो. (चित्रपटात जेम्स स्लेटरचे नाव मात्र आलेले नाही. पॉल फक्त "बॉबी, सगळी व्यवस्था झाली! स्पॉन्सर मिळाला!" एवढेच बोलताना दाखवलाय). कसेबसे बॉबीचे मन वळवून पॉल आणि बिल लोंबार्डी त्याला पुढच्या विमानात बसवतात, परंतु तो स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला हजर नसतोच! अखेर उद्घाटनाच्या दुसर्‍या दिवशी बॉबी रेकजाविकला पोहोचतो.
2
2 लगार्डशोल स्पोर्ट्स एरीनामध्ये ११ जुलै १९७२ रोजी पहिला सामना सुरू होतो.
34
पहिल्याच डावात स्पास्की पांढर्‍या मोहर्‍यांनी खेळत असतो. घड्याळ सुरू होते. बोरिस पहिली खेळी करतो डी४. फिशरचा पत्ताच नाही. तो तब्बल सात मिनिटे उशिराने येतो. २९व्या खेळीला जवळपास बरोबरी असताना बॉबी उंटाने एच२वरचे विषारी प्यादे मारतो आणि स्वत:चा उंट अडकवून घेतो. दुसर्‍या दिवशी डाव सुरू होतो. संपूर्ण शांततेत स्टेजवरचे कॅमेरे आवाज करत असतात, पुढल्या रांगेत बसलेले प्रेक्षक कुजबुजत असतात त्याचा फिशरला त्रास होतो. कसाबसा ५६ खेळ्यांपर्यंत डाव तगवून फिशर डाव सोडतो. १-०. बोरिस स्पास्कीची आगेकूच! सगळीकडे जल्लोश होतो. रशियन माध्यमे जोशात बातम्या देतात की भांडवलशाहीचा पराभव सुरू झालाय! :)
पुढच्या डावाआधी फिशर अटी घालतो की स्टेजवरून कॅमेरे हटवा आणि पुढल्या काही रांगात प्रेक्षक नकोत. प्रायोजक कॅमेरे हटवायला नकार देतात. फिशर खेळायला येत नाही. एक तासानंतर डाव स्पास्कीला एकतर्फी बहाल केला जातो. २-० स्पास्कीची बढत.
एकूण रागरंग बघता पुढे खेळ होईल की नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ लागते. अधिकाधिक संशयग्रस्त झालेला बॉबी त्याच्या राहण्याच्या ठिकाणी खोलीतले सगळे फोन, दिवे, फोटोफ्रेम्स उचकटून कुठे छुपे माईक्स आणि कॅमेरे बसवलेले नाहीत ना, फोन टॅप तर होत नाहीयेत ना आणि आपल्यावर पाळत ठेवली जात नाहीये ना हे तपासत असतो! कुठल्याही क्षणी तो रेकजाविक सोडून अमेरिकेला परत जाईल अशी भीती निर्माण होते. आता मात्र अमेरिकन सरकारला यात मध्यस्थी करणे भाग पडते. अमेरिकन राजकारणात आणि पर्यायाने जागतिक राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे हेन्री किसिंजर हे वादग्रस्त व्यक्तिमत्त्व. किसिंजर स्वतः बॉबीला फोन करतात आणि त्याचे मन वळवतात की त्याचे खेळणे अमेरिकेसाठी किती महत्त्वाचे आहे. हा प्रसंगदेखील दूरदर्शनवरच्या बातम्यांद्वारे दिग्दर्शकाने पोहोचवला आहे. परंतु या ठिकाणी किसिंजर आणि फिशर यांच्यातला संवाद दाखवला असता, तर ते जास्त परिणामकारक झाले असते असे वाटते. अमेरिकेचे त्या वेळचे अध्यक्ष रीचर्ड निक्सन हेदेखील बॉबीशी संपर्क साधतात अशी वदंता आहे. परंतु त्यासाठी कोणतेही पुरावे समोर आलेले नाहीत. शिवाय जगभरातून फिशरच्या अनेक चाहत्यांची पत्रे आणि तारा त्याला येतात की तू पुढे खेळ, आम्हाला तू जिंकलेला हवा आहेस. काही का असेना, अखेर फिशर खेळायला तयार होतो!
तिसरा डाव एका बंदिस्त जागेत सुरू होतो. दिनांक १६ जुलै १९७२. या सामन्याआधी खेळल्या गेलेल्या पाच डावांपैकी दोन बरोबरीत सुटलेले असतात आणि उरलेले तीन बोरिसने जिंकलेले असतात. त्यामुळे फिशरने आत्तापर्यंत एकही डाव स्पास्कीविरुद्ध जिंकलेला नसतो. तिसर्‍या डावात मात्र पहिल्या खेळीपासूनच बॉबी धक्क्यावर धक्के द्यायला सुरुवात करतो. बेनॉनी ओपनिंगने सुरुवात झालेला डाव. ४१व्या खेळीला बीडी३+ असा फिशर सील करतो. "I have sealed a crusher!!" असेही तो पत्रकारांना सांगतो. (त्या वेळी पहिल्या दिवसाच्या खेळानंतर डाव सील करता यायची सोय होती. खेळाडू आपली खेळी पाकिटात बंद करून ठेवून जाई. दुसर्‍या दिवशी त्या खेळीपासून डाव सुरू होत असे. आता तशी सोय नाहीये. डाव त्याच दिवशी संपवावा लागतो. नियम बदलले आहेत.) दुसर्‍या दिवशी डाव सुरू होतो. पाकीट उघडून फिशरने सील केलेली खेळी पटावर होते. बोरिस पाच मिनिटे विचार करून फिशर येण्याआधीच डाव सोडून निघून जातो. २-१.. फिशरचा स्पास्कीवरील पहिला विजय!! रशियन लोक हादरतात. आत्तापर्यंत बोरिसचा पराभव अमेरिकनांकडून झालेला नसतो. चौथा सामना बरोबरीत सुटतो. पाचव्यात निम्झो-इंडियनने सुरुवात होते. २७व्या खेळीला बोरिस ब्लंडर करतो आणि डाव संपतोच. बरोबरी - २.५-२.५.
"सहाव्या डावात मी आश्चर्याचा धक्का देणार आहे" बॉबी बिल लोंबार्डीला सांगतो. आतापर्यंत बॉबीने राजासमोरचे प्यादे हलवूनच डावाला सुरुवात केलेली असते. तो वेगळे ओपनिंग खेळेल का या प्रश्नाला बोरिसने गर्विष्ठपणे उत्तर दिलेले असते "खेळून खेळून काय खेळेल? डी४ किंवा सी४. मी तार्ताकोर डिफेन्स करेन!" या डिफेन्सने स्पास्की कधीच हरलेला नसतो. त्यामुळे तो असे बोलायला धजावतो. बॉबीने सहावा डाव सुरू केला सी४ प्याद्याने! सातव्या खेळीअखेर डाव गेला क्वीन्स गँबिट डिक्लाईन्ड व्हेरिएशनमध्ये. चोविसाव्या खेळीला फिशर त्याचा वजीर वजिराच्या बाजूकडून अचानक राजाच्या बाजूला आणून चढाईला सुरुवात करतो आणि बोरिस गडबडतो. ३२व्या खेळीला बोरिसचा डाव पूर्णपणे पंगू झालेला असतो. ३८व्या खेळीला घोड्याविरुद्ध हत्तीचे बलिदान देत बॉबी डाव संपत आल्याची जाणीव करून देतो आणि शेवटी ४१व्या खेळीला क्यूएफ४ अशी घणाघाती खेळी करून विजयावर शिक्कामोर्तब करतो! हा डाव बॉबी इतका सुंदर खेळतो की दर्शक तर उभे राहून टाळ्या वाजवतातच, परंतु स्वतः बोरिस स्पास्की उभे राहून टाळ्या बाजवून बॉबीचे अभिनंदन करतो! हा प्रसंग चित्रपटात अगदी व्यवस्थित घेतलाय. हा डाव दोन कारणांनी सामन्याला कलाटणी देणारा ठरतो. एकतर फिशरने हे ओपनिंग इतक्या मोठ्या सामन्यात पहिल्यांदाच खेळले आणि तेही अत्यंत अचूक, आणि दुसरे त्याने ३.५-२.५ अशी आघाडी घेतली, जी शेवटाकडे वाढवतच नेली. पुढचे डाव चित्रपटात दाखवलेले नाहीत, जे योग्य आहे. हा सामना फिशर १२.५-८.५ अशा गुणफरकाने जिंकतो आणि बोरिस स्पास्कीला हरवून तो जगज्जेता होतो!!
जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव स्वीकारत बॉबी अमेरिकेला परततो. त्याला जवळपास ५० लाख डॉलर्सची बक्षिसे जाहीर होतात. ती सगळी तो नाकारतो. काहीही घेत नाही. १९७५ साली कार्पोव त्याचा आव्हानवीर म्हणून उदयाला येतो. त्या स्पर्धेसाठी बॉबीने घातलेल्या अटी जागतिक बुद्धिबळ महासंघाला मान्य न झाल्याने ते तसे कळवतात. "तीन अटींपैकी कोणतीही अट मी शिथिल करणार नाही" असे सांगत बॉबी सामना नाकारतो. बरेच प्रयत्न होऊनही काही होऊ शकत नाही. अखेर कार्पोवला तसेच विजयी घोषित करण्यात येते. या घटनेबद्दल बोलताना कार्पोव म्हणाला होता, "फिशरशी खेळण्याची संधी न मिळताच मी जगज्जेता ठरलो याचे तर मला वाईट वाटतेच आहे, परंतु त्यापेक्षा माझे चेस आणखीन प्रगत होण्याची एक मौल्यवान संधी माझ्याकडून हिरावून घेतली गेल्याचे जास्त दु:ख मला आहे!" यातले कोणतेच प्रसंग चित्रपटात नाहीयेत. खर्‍या फिशरची काही व्हिडिओ क्लिपिंग्ज, त्याचे आइसलँडमधले रेफ्यूज असलेले काही फोटो आणि शेवटी एखाददोन क्षण त्याचे आइसलँडमधील थडगे दाखवून चित्रपट संपतो. शेवटी शेवटी जरा गुंडाळल्यासारखाच वाटतो चित्रपट. मला तरी हा चित्रपट अपुरा वाटला. १९७२च्या विजेतेपदानंतर बॉबीची होणारी घुसमट, त्याचे अज्ञातवासात जाणे, मग अमेरिकेतून जपानला, तिथून आणखी कुठे असे जगभर भटकत "कोणी घर देता का घर" असे जणू विचारत जाणे यातला कुठलाच भाग यात आलेला नाही, जो माझ्या मते त्याच्या विजयाइतकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे बॉबीच्या व्यक्तिमत्त्वाविषयी प्रेक्षकांच्या मनावर खोलवर परिणाम करू शकेल असे माध्यम हाताशी असतानाही ती संधी दवडल्यासारखी वाटते. सर्व कलाकारांनी कामे चांगली केली आहेत. बॉबीच्या भूमिकेतले आवाहन टोबी मॅग्वायरने चांगले पेलले आहे. बुद्धिबळवेड्यांनी एकदा जरूर बघावा असा नक्कीच आहे.
डिक कॅवेट शोमध्ये १९७१ साली बॉबीची मुलाखत घेतली होती. चित्रपटात डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करून फिशरच्या जागी टोबी मॅग्वायरला 'बसवण्यात' तंत्रज्ञ यशस्वी झाले आहेत ते मनोरंजक आहे. मूळ मुलाखत इथे बघता येईल -
https://www.youtube.com/watch?v=MPlXC3M8hbg
माझ्या मते बॉबीला रशियन लोकांना हरवून त्यांचे वर्चस्व मोडीत काढायचे होते. त्याव्यतिरिक्त त्याला बुद्धिबळाकडून किंवा जगाकडून बाकी काही नको होते. त्याला समजून घ्यायला त्याच्या आईसकट सगळेच कमी पडले. "शाळा तुम्हाला काही शिकवू शकत नाही" असे म्हणून १६व्या वर्षी हायस्कुलातून ड्रॉप झालेला हा शापित यक्ष आयुष्यभर प्रेमाच्या आणि आपुलकीच्या शोधात तहानलेलाच राहिला, भटकत राहिला. शीतयुद्धाच्या अतिरेकी वेडापायी अमेरिकेत त्याच्यावर संशय घेऊन त्याला तेथूनही बाहेर जाण्यास भाग पाडले गेले. जगज्जेतेपदाचे आपले स्वप्न जिथे साकार झाले, त्याच आइसलँडमध्ये या यक्षाने आपला अखेरचा श्वास घ्यावा ही नियतीने त्याला दिलेली कारुण्यपूर्ण मानवंदना तर नसावी? आपले वडील कोण? इथपासून सुरू झालेली वादग्रस्तता वेगवेगळ्या कारणांनी त्याच्या मरणापर्यंत पाठ सोडत नाही, हे बॉबी फिशरचे दुर्दैव! एखाद्या उल्केप्रमाणे चमकून जात आपल्या तेजस्वी खेळाने बुद्धिबळाचे सगळे आडाखेच बदलून टाकणार्‍या या महान खेळाडूला माझा सलाम!! _/\_
5सर्व छायाचित्रे आंतरजालावरून साभार.
.

दिवाळी अंक २०१५

प्रतिक्रिया

लालगरूड's picture

10 Nov 2015 - 3:24 pm | लालगरूड

छान लिहले आहे.... आवडले

प्रचेतस's picture

11 Nov 2015 - 1:02 pm | प्रचेतस

तुफ्फान लेख झालाय रंगाशेठ.

ह्या चित्रपटाबद्दल आधी एकलेले होतेच. पण तुमच्या लेखामुळे चित्रपटाची आणि बॉबी फ़िशरचीही अधिक तपशीलवर ओळख झाली.

अभ्या..'s picture

11 Nov 2015 - 1:07 pm | अभ्या..

मस्त लेख बहुगुणी साहेब.

बुद्धिबळात सोविएत वर्चस्व हे कित्येक दशके वादातीत असते

ह्याची काही थिअरी आहे का? कशामुळे?

अभ्या..'s picture

11 Nov 2015 - 1:09 pm | अभ्या..

सॉरी सॉरी. रंगाकाकांना बहुगुणी केले.
चेस म्हणजे रंगाकाकाच हे लक्षात यायला हवे होते. सॉरी

चतुरंग's picture

11 Nov 2015 - 5:56 pm | चतुरंग

परंतु बुद्धीबळाचा उगम भारतात चतुरंग या नावाने झाला. नंतर बगदादला मध्यपूर्वेत तो शतरंज या नावाने पोचला तिथून नवव्या शतकात कास्पिअन-वोल्गा ट्रेडरूट्ने तो रशियात गेला. मग तिथे त्या खेळाची लोकप्रियता वाढीस लागली. स्वतः लेनिन कसलेला बुद्धीबळपटू होता त्यामुळे बोल्शेविक क्रांतीनंतर सरकारने अधिकृतरीत्या चेस हा लोकप्रिय खेळ असेल असे प्रयत्न केले आणि पुढे सातत्याने रशियन लोक त्यात वेगवेगळे डावपेच आणि थिअरीज शोधून काढत राहिले. सहाजिकच त्यांचे या खेळावर वर्चस्व राहिले. शिवाय पोलादी पडद्यामागून या थिअरीज सहजासहजी बाहेरच्या लोकांना उपलब्ध होणे शक्य नव्हते हे सुद्धा एक कारण आहेच..

इथे तुला त्याचा कालानुक्रमे इतिहास बघता येईल.
http://www.chess.com/article/view/russian-chess-history

-रंगा

चेस ला बुद्धीबळ म्हणतात एवढीच माहिती होती , चतुरंग नावाचा उगम आता कळला. तुमच्या आयडीचा अर्थ काय असावा याचा विचार नेहमी यायचा मनात. चतुरस्त्र च्या जवळ जाणारा शब्द वाटला होता आधी, आता त्याचा खरा अर्थ समजला. तुम्ही हाच आयडी का घेतला हे देखील आता समजलं.

लेख कमाल झालाय ! बॉबी फिशर चं फक्त नाव च ऐकुन आहे. शापित यक्षाची ही चटका लावणारी कथा फार आवडली. शेवटपर्यंत लेखाने गुंगवुन ठेवलं.

अभ्या..'s picture

13 Nov 2015 - 7:11 pm | अभ्या..

पाह्यला इतिहास रंगाकाका.
मंदोदरीने रावणाची युध्दाची खुमखुमी जिरवायला चतुरंग खेळाचा शोध लावला असे वाचनात आलेले. चतुरंग नावापासून पुढचा झालेला इतिहास रोचकच आहे. कास्पारोव्ह, कार्पोव्ह ह्या सतत ऐकलेल्या पोव्हमुळे रशियात शोध लागलाय की काय वाटायचे.
धन्यवाद.

एस's picture

11 Nov 2015 - 2:57 pm | एस

बॉबी फिशर हा बुद्धिबळातला माझा विश्वनाथन आनंद इतकाच आवडता खेळाडू. त्याचा 'बळींचा महायज्ञ' नावाचा एक सामना फारच आवडला होता! त्याचे व्यक्तिगत आयुष्य असे वादळी आणि दु:खद जावे हे वाईटच!

लेख फारच छान आहे हेवेसांनल... हा चित्रपट आवर्जून पाहिला जाईल.

चतुरंग's picture

12 Nov 2015 - 8:03 am | चतुरंग

हे कोणत्या शब्दाचे भाषांतर आहे का? कोणाविरुद्धचा डाव होता?
म्हणजे मी इथे अधिक माहिती देऊ शकेन.

-(फिशरप्रेमी) रंगा

टवाळ कार्टा's picture

11 Nov 2015 - 3:11 pm | टवाळ कार्टा

मस्तय

मार्मिक गोडसे's picture

11 Nov 2015 - 4:08 pm | मार्मिक गोडसे

लेख आवडला. बुद्धिबळातील खेळींप्रमाणेच बॉबी फिशरच्या स्वभावाचा अंदाज लागत नाही. लेखकाच्या मते बॉबीला रशियन लोकांना हरवून त्यांचे वर्चस्व मोडीत काढायचे होते. त्याव्यतिरिक्त त्याला बुद्धिबळाकडून किंवा जगाकडून बाकी काही नको होते, तर स्पर्धेच्या विजेतेपदाची दुप्पट रक्कम मागणे व ५० लाख डॉलर्सची बक्षिसे नाकारणे हे सगळेच विचित्र वाटते.

पैसा's picture

11 Nov 2015 - 4:59 pm | पैसा

एका प्रतिभावंत पण दुर्दैवी व्यतिमत्वाबद्दलच्या सुंदर सिनेमाची सुंदर ओळख! नक्कीच बघणार!

स्वाती दिनेश's picture

11 Nov 2015 - 5:33 pm | स्वाती दिनेश

लेख आवडला!
स्वाती

चाणक्य's picture

12 Nov 2015 - 7:05 am | चाणक्य

तुम्ही संदर्भ दिल्यामुळे चित्रपट समजायला सोपा जाईल. धन्यवाद.

सानिकास्वप्निल's picture

12 Nov 2015 - 6:25 pm | सानिकास्वप्निल

लेख आवडला, सुंदर ओळख करुन दिलीत, नक्की बघणार हा सिनेमा.

लेख आवडला.सिनेमा नक्कीच बघणार.

बुद्धिबळातलं काहिही कळतं नाही पण तुमचा लेख वाचला आणि आवडला. सिनेमा नेट्फ्लिक्सवर असेल तर बघणार.

पद्मावति's picture

12 Nov 2015 - 10:50 pm | पद्मावति

सुंदर ओळख. चित्रपट नक्की बघणार.

विशाल कुलकर्णी's picture

13 Nov 2015 - 8:16 am | विशाल कुलकर्णी

जबरदस्त !
छान ओळख करून दिलीत.

अप्रतिम!! काय अभ्यास का काय म्हणायचा हा!!

धन्यवाद!!

सुमीत भातखंडे's picture

13 Nov 2015 - 5:16 pm | सुमीत भातखंडे

लेख. बघायला पाहिजे चित्रपट.

बोका-ए-आझम's picture

15 Nov 2015 - 12:09 am | बोका-ए-आझम

खेळ अफाट, फिशर अफाट, तुमचा व्यासंग आणि अभ्यास तर त्याहून अफाट!

पण नाही हो माझा व्यासंग वगैरे नाहीये बुद्धीबळाची आवड आहे त्यामुळे लिहितो. हे खेळाडू आणि खेळ प्रचंड मोठे आहेत. कित्येक पुस्तकं एकेका खेळाडूवर लिहिली आहेत!

(वाळूचाकण्)रंगा

असाच लोभ राहू दे!

(समाधानी)रंगा

अभिजीत अवलिया's picture

15 Nov 2015 - 8:54 pm | अभिजीत अवलिया

लेख आवडला.

एक एकटा एकटाच's picture

16 Nov 2015 - 5:49 am | एक एकटा एकटाच

तुमचा लेख वाचुन

आता हा चित्रपट पहावासा वाटतोय

कैलासवासी सोन्याबापु's picture

16 Nov 2015 - 8:51 am | कैलासवासी सोन्याबापु

मला चेस खेळता येत नाही पण चेस आवडतो खुप जास्त म्हणजे सत्तेचे खेळ पाहिल्याची फीलिंग येते त्यात, जबरी मांडणी अन अभ्यास आहे तुमचा चेस चा. बॉबी ची कथा आवडली विशेष ! एखादी सीरीज करा चेस वर वेगवेगळे खेळाडू त्यांच्या गाजलेल्या खेळी नवीन शोधलेल्या चाली असे सगळे संकलित केलेली सीरीज, मजा येईल वाचायला.

ता.क. - चेस शिकायचा असला तर ऑनलाइन किंवा एंड्रॉइड ऍप वगैरे उपलब्ध असतात का काही ? मुख्य म्हणजे ते वापरुन चेस शिकला जावु शकतो का?

http://www.chess.com/learn-how-to-play-chess

ही वेबसाईट बघा. व्यवस्थित चेस शिकता येते. ऑनलाईन खेळताही येते संगणकासोबत किंवा जालावरील प्रतिस्पर्धी शोधून!
यांचीच अँड्रॉईड अ‍ॅप देखील आहेत.

चेसचे नियम आपण पूर्वी मिपावरच मराठीत भाषांतरित करुन गूगलडॉक्सवरती चढवलेले आहेत. :)

शिका आणि आनंद लुटा!! :)

-रंगा