स्नेहलतेचे समुपदेशन आणि बंडूची उपासमार

सस्नेह's picture
सस्नेह in दिवाळी अंक
26 Oct 2015 - 10:52 am

.
.
अपार्टमेंटच्या शेवटच्या तीन पायर्‍या एका दमात चढून बंडूने नानूच्या फ्लॅटच्या दारावर तीन वेळा ढाम ढाम ढाम केले. तीन मिनिटे झाली तरी दार उघडले नाही, तेव्हा पुन्हा तीन वेळा तो ढाम ढाम ढाम करणार, तोच विमलावहिनींनी दार उघडल्यामुळे ते ढाम ढाम ढाम त्याला विमलावहिनींच्या नाकावर करावे लागले असते. पण ती सूज्ञ गृहिणी चतुराईने वेळीच दोन पावले मागे सरकल्यामुळे तो अ(ति)-प्रसंग टळला.
"इश्श! बेल आहे हो दाराला, बंडूभावजी!" विमलावहिनी खुसखुसत उद्गारल्या अन नानूला बोलवायला आत गेल्या.
बंडू सोफ्यावर ऐसपैस पसरला. रिटायर झाल्यापासून त्याला जिने वगैरे चढल्यानंतर अंमळ विश्रांती लागे. त्याचे चार दीर्घ श्वास टाकून होतात न होतात तोच नानू बाहेर आला अन सोफ्याच्या उरल्यासुरल्या जागेत मावतील तितके अर्धेमुर्धे अवयव घुसवून बंडूच्या शेजारी बसला. इतक्यात बंडूच्या उजव्या हाताची भक्कम थाप त्याच्या खांद्यावर बसली. त्यामुळे नानूचे अर्धेमुर्धे अवयव पुन्हा सोफ्याबाहेर लटकू लागले.
"नानू, तुला समुपदेशन माहीत आहे का?" बंडूचा, हाताच्या थापेइतकाच वजनदार प्रश्न आला.
"आं..? काय?.. बंडू तुला भूक लागली आहे काय? अगं, कालचा पोह्यांचा चिवडा आणतेस का?" नानू काहीसा गोंधळला. शेवटचे वाक्य अर्थात विमलावहिनींना उद्देशून होते.
"मुळीच नाही." बंडू आवेशाने म्हणाला, "युसलेस! नालायक!! तुला अक्कल नाही."
"तुझे स्नेहलवहिनींशी भांडण झाले आहे का?" नानूने आता मुद्द्याला हात घातला.
"तिची काय टाप लागून गेलीय माझ्याशी भांडायची? मीच भांडलो तिच्याशी." इथे बंडूने तावातावाने विमलावहिनींनी समोर ठेवलेल्या बशीतल्या मटार करंजीचा लचका तोडला अन लगेच पोह्यांच्या चिवड्याचा बकाणा भरला.
"म्हणजे? कशासाठी भांडण झाले म्हणायचे?"
"नान्या, तुला माहीत नाही, मी रिटायर झाल्यापासून ती ना अगदी युसलेस झाली आहे! ती मला सकाळी इडल्या अन गोडाचा शिरा अन त्यावर गरम गरम चहा करून देत नाही. त्याऐवजी नुसते कपभर दूध अन मूठभर मक्याचे बेचव पोहे देते. दुपारच्या जेवणातपण दोन इवलेसे फुलके, भाजी अन दहीभात इतकेच देते. ते फुलकेपण बिनातेलातुपाचे आणि सर्वात कहर म्हणजे दुपारचा नाष्टा म्हणजे कांदाभजी, बटाटेवडा, मिसळपाव तिने बंद करून टाकला आहे."
"का, का, का?" कोणताही प्रश्न तीन वेळा रिपीट केला तरच तो परिणामकारक होतो, अशी नानूची ठाम श्रद्धा होती.
"तिचे म्हणणे असे, की आता या वयात इतके तेलकट अन चमचमीत खाणे बरे नव्हे."
"हो, मग खरे आहे ते.." नानूला कालचा, न पचलेला अन पोटात अजून ढुशा देणारा बटाटावडा आठवला.
"खरे? काय खरे आहे? नानू, नान्या, तू, तूच हे बोलतोस? अरे, चौपाटीवर गँगने जाऊन खाल्लेली पावभाजी अन भेळ, ऑफिसच्या मागच्या फुटपाथवर खाल्लेली पाणीपुरी, सत्तूदादाची खमंग कांदाभजी आणि शंकरभवनची तर्रीदार मिसळ तू इतक्यात विसरलास? शेम शेम!" बंडूचा सात्त्विक संताप अगदी अनावर झाला. नानू असा शत्रुपक्षाला जाऊन सामील व्हावा याचे त्याला अतीव दु:ख झाले आणि ते कमी करण्यासाठी त्याने एका मटार करंजीला आणि बचकभर बिस्किटांना आपलेसे केले.
तीन-चार करंज्या, बशीभर चिवडा आणि गरम चहात बुडवलेली चार मारी बिस्किटे, चहासह, इतके मोहरे खर्ची पडल्यावर बंडूची युयुत्सु झालेली वृत्ती काहीशी शांत झाली आणि तो शत्रूशी, म्हणजे नानूशी वाटाघाटी करण्याच्या पातळीवर उतरू शकला.
"तर, मी काय सांगत होतो, नानू, की विमलावहिनी कधी कॉलेजात गेल्या नव्हत्या हे फारच छान झाले. त्यामुळे त्या अशा चोवीस तास तुझ्या दिमतीला असतात आणि तू गुबुगुबु गुबुगुबु मटार करंज्या आणि बटाटेवडे खाऊ शकतोस! तशी स्नेहलसुद्धा इतके दिवस हे सगळे करत असे. पण आताशी ती भलत्याच नादाला लागलीय रे! म्हणून माझी उपासमार चाललीय..."
"काय, सांगतोस काय? म्हणजे स्नेहलवहिनी भलत्याच नादाला लागल्यात...? या वयात??" नानूचे डोळे खोबणीतून बाहेर येऊन समोरच्या, मटार करंजीच्या रिकाम्या बशीत पडले.
"अरे, नादाला म्हणजे ‘तसल्या’ नव्हे रे!"
"तसल्या’ नव्हे? मग कसल्या?"
"अरे ती ना, समुपदेशन करते हल्ली!"
"समुप....देशन?"
"समुपदेशन!!!"
नानूला जरी फारसा बोध झाला नाही, तरी स्नेहलवहिनी भलत्यासलत्या नादाला लागल्या नसून कोणत्या तरी उपदेशाच्या भानगडीत पडल्या आहेत, एवढे समजल्यामुळे तो काहीसा स्थिरचित्त झाला आणि मटार करंजीच्या बशीतले आपले डोळे उचलून त्याने रीतसर खोबणीत घातले.
मग चिवड्याचा बकाणा भरून तो म्हणाला, "ऑरे, पण तुला उपॉशी र्हॉतयलॉ कॉय झॉले मोग?"
"अरे ती ना, सकाळी अकरा वाजेपर्यंत जमतील तितके जिन्नस करून ठेवते आणि महिला मंडळाच्या कार्यालयात जाते समुपदेशन करायला. आणि मग पाच वाजताच परत येते. तिने तिच्या हिशेबाने तीन वेळचे खाणे म्हणून केलेले खाणे एकाच वेळी संपते. मग इकडे आम्हाला भूक लागली तर आम्ही काय रिकामी भांडी खायची का? ऑ ऑ??"
बंडूने टीव्हीतल्या सलमान खानइतक्या आवेशाने हातवारे केले. त्यामुळे विमलावहिनींच्या स्वैपाकघरातली रिकामी भांडी फळीवरच थरथर कापू लागली. जेव्हा विमलावहिनींनी गरमगरम चहाचा कप आणि चार मारी बिस्किटे बशीत घालून बंडूसमोर आणून ठेवली, तेव्हाच बंडूचा राग आणि फळीवरच्या भांड्यांचा थरकाप शांत झाला.
"पण स्नेहलवहिनी कुणाला उपदेश करतात रे?" नानूची रास्त शंका.
"अरे, ती मी सोडून कोणालाही, अगदी ओबामामांनासुद्धा उपदेश करू शकते! पण सध्या ती उपदेश नव्हे, तर समुपदेशन करायला जाते."
"म्हणजे?"
"तेच तर तुला विचारतोय मी मघापासून!" बंडू म्हणाला,
"अरे नान्या, आधी की नाही, कॉलनीतल्या बायका त्यांच्या घरी भांडणे झाली, की स्नेहलकडे यायच्या. मग ती त्यांची बाजू ऐकून घ्यायची. मग त्यांच्या घरी जाऊन उभय पक्षात सन्माननीय तडजोड घडवून आणायची. मग हळूहळू त्या बायकांचे नातेवाईकसुद्धा आपसात भांडणे झाली, की ती सोडवायला स्नेहलकडे येऊ लागली. नवर्‍याशी भांडून आलेल्या मुलींना समजवायला त्यांच्या आया आपल्या मुलींना स्नेहलकडेच आणू लागल्या. आणि रुसून माहेरी गेलेल्या आपल्या नवपरिणितांना माघारी बोलावण्यासाठी नव-नवरे स्नेहलकडेच धाव घेऊ लागले. शाळा नको म्हणणार्‍या बालकांपासून ते मिस्रूड फुटल्याने डोईजड झालेल्या नव-तरुणांपर्यंत आणि वयात येऊ पाहणार्‍या किशोरींपासून मेनोपॉजग्रस्त प्रौढांपर्यंत सगळ्या समुपदेशनोत्सुक लोकांना स्नेहलच दिसू लागली.
मक्काय, स्नेहलने सोसायटीचा हॉल बुक केला अन रोज दुपारी समुपदेशन क्लिनिक सुरू केले. आता दिवसभर ती फक्त समुपदेशनच करत असते. आणि संध्याकाळी पर्स भरून पैसे घेऊन येते."
"काय सांगतोस काय? पर्स भरून पैसे??" इथे केवळ नानूचे गटाणे डोळे नुसते खोबणीच्या बाहेरच आले नाहीत, तर ते विमानात बसून आकाशात उड्डाण करू लागले. शिवाय विमलावहिनींनीपण एवढा मोठ्ठा आ वासला की त्यातून आख्खे विमान वर्ल्ड ट्रेड सेंटरपेक्षा सहजपणे पास झाले असते!
आता बंडूच्या गहन व्यथेचे गांभीर्य नानू आणि विमलावहिनी दोघांच्याही चांगलेच लक्षात आले. मग चहाच्या गरम वाफेवर स्नेहलताला समुपदेशनापासून दूर करण्याचा कट शिजला. या कटात विनू आणि जगूलाही सामील करून घेऊन एक जंगी विरोध कृती-समिती स्थापन करण्याचा ठराव झाला आणि मग ती वादळी बैठक विसर्जित झाली. बंडू नावाचे वादळ काही वेळापुरते थंड झाले.
त्या बेताप्रमाणे दुसर्‍या दिवशी नूतनस्थापित समितीचे सदस्य नानू, विमलावहिनी, विनू आणि जगू स्नेहलताचे मन वळवण्यासाठी बंडूच्या घरी गेले. ठरल्याप्रमाणे बंडू आधीच घराबाहेर पडून कोपर्‍यावरच्या अन्नपूर्णा भवनात चहा आणि भज्यांचा समाचार घेत बसला होता. भज्यांचा यथास्थित समाचार घेऊन झाल्यावर अजून वेळ शिल्लक राहिल्यामुळे त्याने कांदेपोहे मागवले. पोह्यांची पोटात पखरण झाल्यावर नाकात शिरलेल्या वैशिष्ट्यपूर्ण खमंग दरवळाने त्याच्या लक्षात आणून दिले की आपण अजुनी बटाटावड्याची खबरबात घेतलेली नाही. असा अन्याय त्याच्या न्यायी मनाला सहन होणे शक्य नसल्यामुळे दोन बटाटेवड्यांना त्याने उदारपणे न्यायदान केले. मग यावर पुन्हा एक चहाचा लेप चढवणे क्रमप्राप्त होते. एवढे झाल्यावर जड पोटाने आणि हलक्या खिशाने त्याने अन्नपूर्णेचे आभार खिशातून चुकते केले आणि तो नानूच्या घरी गेला.
तिथे नानू, जगू, विनू त्याची वाट पाहात सोफ्यावर बसून विमलावहिनींच्या शिर्‍याचा समाचार घेत बसले होते. मग मित्रांच्या आग्रहावरून बंडूला शिर्‍याची एक डिश पोटात घालणे भाग पडले. यांनतर स्नेहलताला दिलेल्या भेटीत काय निष्पन्न झाले यावर एक उद्बोधक चर्चेची फेरी झडली. तीत असे निष्पन्न झाले की बिनीच्या फेरीत कृती-कमिटीला स्नेहलताला समुपदेशनापासून परावृत्त करण्यात सपशेल अपयश आले आहे.
स्नेहलताचे म्हणणे, "यांचा प्रपंच मी सुरळीतपणे पार पाडला आणि आता मला माझी दिशा सापडली आहे, तर मी ती का घेऊ नये?" हे वाजवी असल्याचे अमान्य करणे कमिटीच्या मेंबरना शक्यच नव्हते. त्यामुळे प्राथमिक फेरीत माघार घेऊन सर्व सदस्य नानूच्या घरी परतले. दुसरा हल्ला आणखी दोन दिवसांनी करण्याचा बेत ठरला.
..पण त्याआधीच शत्रुपक्षाचे विमान जमिनीच्या वर हजार फुटावर पोहोचलेसुद्धा! ते असे..
कृती-कमिटीच्या दुसर्‍या आघाडीतील शिलेदार म्हणजे जगू, विनू आणि मोरू, म्हणजे विनूचा लाडका कुत्रा, जेव्हा स्नेहलताकडे गेले तेव्हा स्वैपाकघरात सामसूम असून जेवणाच्या टेबलावर दोन रिकामे पिझ्झाबॉक्स ‘आ’ वासून पसरले होते. स्नेहलता सोफ्यावर बसून कौतुकाने हातातल्या जाडजूड लिफाफ्याकडे पाहात होती आणि विनूची बायको व स्नेहलताची मैत्रीण सौदामिनी सोफ्याजवळच्या खुर्चीत बसून कौतुकाने स्नेहलतेकडे पहात होती.
"अहोs, पाहिलंत का? स्नेहलवहिनी चालल्या अमेरिकेला!" विनू आत येतो न येतो तोच सौदामिनीने कृती-कमिटीवर ग्रेनेड टाकला.
"अमेरिका.... ???" जगू आणि विनू एकदमच किंचाळले. त्यांच्या आश्चर्यप्रदर्शनाला मोरूनेही ‘भौ: भु:क’ करून आपल्या परीने ‘तोंडभार’ लावला.
"हो ss! तो क्काय पासपोर्ट! आता व्हिसा मिळाला की झालं! तोपण, शिखाचा नवरा आठ दिवसात काढून देणारे!"
"कोण शिखा?"
"अहो असं काय करता? शिखा म्हणजे शिरीनची मावसबहीण! सीमावहिनींची भाची!"
‘सीमावहिनी ?’
"इश्श, जगूभावजी, तुम्हीच नै का परवा सीमावहिनींची ओळख करून दिलीत, तुमच्या प्रमोशनच्या पार्टीत!" स्नेहलताने मान तुकवली अन भुवया उंच केल्या.
"पण वहिनी, तुम्ही अमेरिकेला कशाला निघालाय आणि सीमावहिनींचा तुमच्या अमेरिकेला जाण्याशी काय संबंध?" जगू आणि विनू चांगलेच बुचकळ्यात पडले. मोरूही त्याच बुचकळ्यात तोंड घालणार, इतक्यात विनूने त्याला मागे खेचले.
आता सौदामिनी पुढे सरसावली आणि आपल्या मंदमती नवर्‍याचा आणि त्याच्या मित्राचा गृहपाठ घेऊ लागली,
"अहो, किनई, सीमावहिनींची शिरीन अमेरिकेत आहे ना, तिने पाठवला स्नेहलताईंचा व्हिसा, आणि तिकीटसुद्धा! त्या किनई, तिथे जाऊन समुपदेशन करणार आहेत, तिथल्या भारतीय समाजाचं! गेल्या महिन्यात शिरीन इथे आली होती ना, तर तिच्या बारा वर्षाच्या बिघडलेल्या मुलीला स्नेहलताईंनी समुपदेशन दिलं आणि आता ना ती आपल्या आईवडिलांशी अगदी रोज बोलते! शिवाय शाळेत जाताना ‘बाय’पण करते!!"
"त्यात काय विशेष? माझी नात मला रोज बाय तर करतेच, शिवाय माझा गालगुच्चापण घेते... ’नॉटी ग्रँपा’..म्हणून!" जगू आढ्यतेने म्हणाला.
"पण म्हणून काही तुम्हाला कुणी अमेरिकेला बोलावतं का, अं?"
हे मात्र खरं. जगूचा अमेरिकेतला मुलगा त्याला कधी अमेरिकेला बोलावत नसे, पण आजारपण आणि बायकोच्या बाळंतपणात आपल्या आईचे तिकीट तेवढे पाठवीत असे. अर्थात जगू हे उघडपणे मान्य करणे शक्यच नव्हते.
मग तिथे सर्वांचे स्पीकर्स एकसमयावच्छेदेकरून वाजू लागले,
"पण दोन वर्षापूर्वी अथर्वने मला तिकीट पाठवले होते.."
"शिरीनच्या मैत्रिणीचा मुलगा ना, स्कूलमध्ये एकदा..."
"मी खूप नाही म्हटले हो,..."
"पण तिथे काय काम आहे,..."
काही वेळाने हा गोंधळ जरा कमी झाला आणि काही मिनिटांच्या शांततामय सुसंवादानंतर निष्पन्न झाले ते असे - शिरीनच्या मुलीचा प्रॉब्लेम स्नेहलताने झटक्यात सोडवल्यामुळे शिरीनने अमेरिकेतल्या आपल्या सर्व परिचित आणि मित्रमैत्रिणींमध्ये स्नेहलताच्या ‘समुपदेशना’ची जाहिरात ताबडतोब केली. तिथल्या समुपदेशनाच्या ‘फी’पेक्षा स्नेहलताचे जाण्या-येण्याचे तिकीट आणि फी हे अगदीच किरकोळ असल्याने स्नेहलताचे अमेरिकेस अपहरण करण्याचा घाट शिरीन आणि कंपनीने घातला आणि त्वरित तशी व्यवस्था करण्यात आली.
हा सर्व खुलासा ऐकल्यानंतर कृती-कमिटीचे अर्थातच धाबे दणाणले. ताबडतोब पीडितास - म्हणजे बंडूस पाचारण करण्यात आले. बंडूला ही बातमी नवीच होती. यानंतर स्नेहलता आणि बंडू यांचा एक प्रेमळ परिसंवाद झाला, ज्यामध्ये, "तुमच्या प्रपंचापायी राबले", "अगं पण मी कुठं काय", "माझं मेलीचं सगळं चूक", "पण म्हणून काय..", "आमचा मेला जन्मच मुळी", "अगं, तसं नाही", "इथेच मरायचं आता" इ. इ. हृदयद्रावक ध्रुवपदे, ‘सूंक सूंक’च्या पार्श्वसंगीतासोबत कानावर पडत होती. मग कृती कमिटीची समजावणी, मोरूची ‘भूभू:कार’युक्त प्रेमळ मध्यस्थी अशा दीर्घ घडामोडीनंतर तह फायनल झाला. त्यामध्ये ठरलेले मुद्दे असे -
१. स्नेहलताने एक महिन्यासाठी अमेरिकेस जाऊन समुपदेशन करण्यास हरकत नाही.
२. सदर कालावधीत बंडूला जेवण-भत्ता मिळावा.
३. नाष्टा आणि इतर किरकोळ खाणे नानू, विनू, जगू इ. मित्रांनी घ्यावी.
४. एक महिन्यानंतर स्नेहलता अमेरिकेहून परत आल्यावर पुन्हा कृती समिती व विरोधी समितीची बैठक घेऊन समुपदेशनाविषयी पुढील धोरण ठरवावे.

यानंतर बंडू आणि स्नेहलता यांचे पुढचे पंधरा दिवस नूतनपरिणित जोडप्याप्रमाणे आनंदात गेले. पुढच्या एक महिन्याच्या विरहाची भरपाई आगाऊ वसूल करायची असल्याने एकमेकांवरच्या प्रेमाला उधाण आले. बंडूला रोज पोहे, भजी इ. कडबा यथास्थित चघळायला मिळू लागला आणि स्नेहलतेच्या वेणीत रोज गजरा दिसू लागला. घरातल्या कामांच्या झालेल्या काटेकोर विभागणीचा काटा अंमळ ढिला पडला आणि सगळी कामे बिनबोभाट होऊ लागली. एरवी ठणठण करणारी घरातली भांडी एकमेकांशी गुलुगुलू बोलू लागली आणि केरसुणीपासून छतावरच्या पंख्यापर्यंत सगळे प्रीतिगीत गाऊ लागले.
अशा रितीने पंधरा दिवस गुण्यागोविंदाने गेले आणि स्नेहलताच्या प्रयाणाचा दिवस उजाडला. दिवस म्हणण्यापेक्षा रात्र. कारण फ्लाईट पहाटे साडेतीन वाजता होती. पंच पंच उष:काली माफक प्रेम करून झाल्यावर बंडूने उदार मनाने स्नेहलताला आंघोळ करण्याची परवानगी दिली. मग तिचे आवरल्यावर कृती समितीचे सदस्य व बंडू यांनी स्नेहलताला विमानतळावर सोडले आणि कर्ण्यावर विलंबाच्या आणि क्षमायाचनेच्या बर्‍याच घोषणा झाल्यावर निर्धारित वेळेनंतर सुमारे चार तासांनी विमानाने उड्डाणही केले.
अमेरिकेस अर्थातच शिरीन न्यायला येणार होती. स्नेहलताचा पोहोचल्याचा फोन आल्यावर बंडू निवांत झाला आणि अन्नपूर्णा ते नाक्यावरचा इराणी अशा त्याच्या चकरा सुरू झाल्या. शिवाय मधून मधून नानू, विनू आणि जगू यांची घरे त्याला कडबा पुरवठा करण्यास सिद्ध होतीच. सकाळी इराण्याकडे चमचमीत नाष्टा, दुपारी अन्नपूर्णामध्ये भरपेट जेवण, संध्याकाळी मित्रमंडळींकडे खमंग खादाडी इतके असूनही बंडूला स्नेहलताची उणीव चांगलीच टोचू लागली.
दोघांच्या औरसचौरस बेडवर नऊ वाजेपर्यंत लोळताना, स्नेहलता असताना, तिची भांड्यांच्या ठणठणीच्या तालावर येणारी "अहो, उठलात का?" ही आरोळी, पार्लरात जाऊन आल्यावर कानात गेलेल्या केसांसारखी त्याच्या कानात उगाचच गुदगुल्या करत राही. भरपूर साखर घालून केलेला मसालेदार चहा घुटक्याघुटक्याने पिताना ‘साखर वाढेल हं’ हा इशारा करणारे तिचे मोठ्ठे मोठ्ठे डोळे समोर येत. कामवालीकडून काम आवरत असताना स्नेहलताच्या सूचनांच्या पार्श्वसंगीताची उणीव जाणवे. अन्नपूर्णामध्ये तटावर आडवा हात मारताना तिचा दटावणारा मुखचंद्र डोळ्यापुढे उभा राही. आणि रात्री उशिरापर्यंत टीव्ही बघून जडावलेल्या डोळ्यांना तिची आठवण, ढकलून निद्रादेवीच्या राज्यात पाठवे.

त्यानंतरच्या आठ दिवसात बंडूने सर्व मित्रांना स्नेहलताच्या अंगचे सद्गुण ऐकवून हैराण करून सोडले. बंडूला एकाएकी हा साक्षात्कार कसा झाला हेच नानू, विनू, जगू प्रभृती मंडळींना, कळेना! इतके दिवस स्नेहलताच्या तक्रारी सांगणारा बंडू तो हाच काय असा कूटप्रश्न त्यांना पडला. अन्नपूर्णाच्या थाळीतल्या उथळ आमटीच्या वाटीतील तुरीची डाळ अन डाळ एकमेकीला, स्नेहलताच्या कुळथाच्या पिठल्याचे कवतिक सांगून वाटीतील पाणीदार आमटीत जीव देऊ लागली. आणि रामाच्या गाडीवरची कांदाभजी स्नेहलताच्या हातच्या घोसाळ्याच्या भजीची याद येऊन काळीठिक्कर पडली. स्नेहलतेच्या गोडाच्या शिर्‍याच्या आठवणीने इराण्याकडचा गुलाबजंबू कडू झाला आणि तिच्या हाताच्या लिंबाच्या सरबताची सय येऊन न्यूवन्स मॉलमधल्या काचेच्या कपाटातल्या बाटलीतले स्प्राईट गहिवरले!
असे आठ दिवस गेले आणि नवव्या दिवशी भल्या पहाटे आठ वाजता बंडूला स्वप्न पडले की स्नेहलता त्याला हाका मारते आहे, "अहो, उठा उठा!!" नेहमीप्रमाणे बंडूने डास वारावा तसे हातवारे करून कानातल्या त्या हाकेला पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. पण हाकमारीच्या डासाने हातवार्‍यांना न जुमानता आणखीनच टिपेचा सूर लावला. भरीला बंडूच्या दाराची बेल कर्कश्शपणे किंचाळू लागली आणि दरवाजाची कडीही ठणाठणा वाजू लागली. जोडीला उशाशी ठेवलेला बंडूचा मोबाईलसुद्धा वेड लागल्यासारखा दणाणू लागला!
इतके झाल्यावर मात्र बंडूची झोप खाडकन उडाली आणि तो ताडकन उठून बसला. इतक्यात, "अहो, उठताय की दार फोडू?" अशी निर्वाणीची नोटीस आल्याने बंडूने एका ढांगेत दार गाठले आणि ते उघडून पाहतो, तर साक्षात स्नेहलता दारात उभी आहे असे त्याच्या निदर्शनास आले. बंडूने स्वत:ला चिमटा काढला. पण समोरच्या स्नेहलतेमध्ये इतकाच बदल झाला, की आधीच रागावलेली तिची मुद्रा अधिकच क्रुद्ध दिसू लागली.
तेव्हा बंडूने टुणकन उडी मारली आणि दारातून बाजूला सरून स्नेहलतेला आत येण्यास मदत केली.
"अहो, माझ्या बॅगा..." स्नेहलता ओरडली .
मग बंडूने तिच्या दोन्ही बॅगा आणि पर्सही उचलून आत आणल्या.
"अगं, पण तू अमेरिकेहून केव्हा आलीस?" आत्ता कुठे बंडूला वाचा फुटली.
"ही काय आत्ताच!"
"पण फोन नाही काही नाही? आणि अजून महिना कुठं झालाय?"
"मी नाही बै राहायची त्या अमेरिकेत, तुम्हाला इथे सोडून!"
"आणि ते समुपदेशन?"
"रडो ते समुपदेशन! मेल्या या भारतीय पोरींना आपल्या अमेरिकन कार्ट्यांना चांगली वळणे लावता येत नाहीत, आणि मग म्हणे समुपदेशन करा!!" स्नेहलताचा त्रागा नेमका कशासाठी होता हे काही बंडूला कळले नाही.
"अगं, पण इथे तू तेच करीत होतीस ना?" बंडू बुचकळ्यात पडून म्हणाला.
"इथ्थे वेगळं अन तिथ्थे वेगळं!" स्नेहलताने आपली टोकदार हनुवटी जोरदारपणे एकदा इकडे अन एकदा तिकडे तुकवली.
मग वेगळे काय हे बंडूने विचारायच्या आधीच ती दक्ष गृहिणी पदर खोचून चहाच्या तयारीसाठी स्वैपाकघरात अंतर्धान पावली. चांगला दोन कप चहा आणि अमेरिकन कुकीजचा अर्धा पुडा पोटात गेल्यावर आणि आठ दिवसांच्या विरहाची यथास्थित प्रेमळ भरपाई करून झाल्यावर वातावरण काहीसे स्थिरस्थावर झाले आणि दोघांच्या संभाषणास मागील पानावरून पुढे चालना मिळाली.
"हं, म्हणजे अमेरिकेतलं समुपदेशन इथल्यापेक्षा वेगळं म्हणजे कसलं सांग बघू आता.. आणि तू अशी एकाएकी कशी परत आलीस? तिकीट?"
"अहो, मेली दहा अन बारा वर्षाची मुलं अन मुली, काय सांगून त्यांच्या आयांनी माझ्याकडे पाठवलंन कुणास ठाऊक, मला म्हणतात, ‘ग्रॅनी, यू गॉन्ना टीच अस अ लेसन ऑन सेक्स?' लाज कसली ती नाही मेल्यांना. आणि यांच्या आया जरा तरी वळण लावतील की नाही? माझ्या समोर बसून माझ्या तोंडावर धूर सोडतात मेली कार्टी!
...कसलं आलंय बाल-समुपदेशन? त्यांच्या आयांना बेबी-सिटिंग करायला स्वस्तात दाई हवी नं काय! पोरांना नाही, त्यांच्या आयांनाच गरज आहे समुपदेशनाची!
....बघितली एकेक थेरं अन शिरीनला म्हटलं, राहू दे माझी फी. मला ताबडतोब परतीचं तिकीट तेवढं काढून दे, झालं. भुकेल्या नवर्‍याला एकटा टाकून मला नाही जमत समुपदेशन!"
...आणि मग काय, स्नेहलतेने अगदी अटीतटीने ‘अमेरिकेतील भारतीय आया अन त्यांची मुले’ या विषयावर बंडूचे समुपदेशन सुरू केले!!

1
(चित्रः नीलमोहर)
-------------------------------------*--------------------------------*-------------------------------------

(विख्यात दिवंगत साहित्यिक श्री गंगाधर गाडगीळांच्या बंडू-कथांवर आधारित छोटासा प्रयत्न.)
.

प्रतिक्रिया

पीके's picture

10 Nov 2015 - 9:50 am | पीके

मस्तच !!!

पीके's picture

10 Nov 2015 - 9:53 am | पीके

पयला....
हे र्‍हायलंतं!!

Maharani's picture

10 Nov 2015 - 2:59 pm | Maharani

हा हा..मस्त

हाहाहा! बाकी तुम्ही भलत्याच खाद्यप्रेमी दिसता. तुमच्या कथांमधील पात्रे अन्नावर तुटून पडतात नेहमी! ;-)

पद्मावति's picture

10 Nov 2015 - 8:47 pm | पद्मावति

ही ही ही...मस्तं, मजेदार कथा. आवडली.

मी-सौरभ's picture

10 Nov 2015 - 11:26 pm | मी-सौरभ

आवडली

मांत्रिक's picture

11 Nov 2015 - 8:08 am | मांत्रिक

झकास!!! अगदी खुसखुशीत विनोदी...

प्रीत-मोहर's picture

11 Nov 2015 - 8:14 am | प्रीत-मोहर

Ha ha ha

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

11 Nov 2015 - 8:17 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

ही ही ही ही!!! जब्राट लिहिलय.

नाखु's picture

14 Nov 2015 - 9:05 am | नाखु

पन पण वाचन खुणेची सोय का नाही दिवाळी अंकाला (बंडू आणि कंपनीला सांगावे काय?)

गाडगीळ बंडूकथांचा पंखा नाखु

बस क्या ताई ! हमारे समुपदेशन के तो बाराच वाजवे आपने =))

मुक्त विहारि's picture

11 Nov 2015 - 8:44 am | मुक्त विहारि

आवडला....

असंका's picture

11 Nov 2015 - 8:51 am | असंका

सुरेख जमलंय! मजा आली!

धन्यवाद!

कपिलमुनी's picture

11 Nov 2015 - 9:31 am | कपिलमुनी

खुसखुशीत चकली लेख

टवाळ कार्टा's picture

11 Nov 2015 - 11:01 am | टवाळ कार्टा

खिक्क

प्रभाकर पेठकर's picture

11 Nov 2015 - 5:49 pm | प्रभाकर पेठकर

तो क्काय व्हिसा! आता पासपोर्ट मिळाला की झालं!

आधी अमेरीकेचा व्हिसा आणि नंतर पासपोर्ट?
हे काहीतरी, माझ्यासाठी, नविन आहे. असो.

कथा मस्तंच आहे. खुसखुशीत, हलकी-फुलकी नर्म विनोदी. क्वचित अतिशयोक्तीकडे झु़कणारी. पण आवडली.

राही's picture

14 Nov 2015 - 5:29 pm | राही

कथा खूप आवडली. ते विसा-पासपोर्ट प्रकरणही आवडले.
मुख्य म्हणजे गाडगीळांची शैली तंतोतंत उचलली आहे. 'खुसखुसत' काय, 'गुबूगुबू' काय, 'टुण्णकन उडी' काय मस्तच.
जालावर गंगाधर गाडगीळांना (अखेर) न्याय मिळाला तर.
एकेकाळी बंडूच्या गोष्टी अत्यंत आवडत्या होत्या. लायब्ररीतून गाडगीळांची जुनी पिवळ्या पडलेल्या पानांची आणि वारंवार बाइंडिंग केल्याने समास हरवून बसलेली पुस्तके वेचून वेचून वाचली होती.
धन्यवाद.

कथा आवडली. दिवाळी अंक आवाजची परत आठवण झाली, परत ज्ञानेश सोनार किंवा पत्कींची कधी खलील खान यांची कमी जाणवली. आज आवाज असते तर अशीच असती म्हणा चित्रे. पण ज्ञानेश सोनारांच्या चित्रात जो सेक्सी गोडवा/गोड सेक्सीपणा असायचा तो जबरद्स्त.

सस्नेह's picture

14 Nov 2015 - 6:54 pm | सस्नेह

शि द फडणीसना विसरू नको. मोस्टली बंडू कथांना शिदंचीच चित्रे असत.

हो. फडणीस असायचेच. त्यांच्या ग्राफीक स्टाईलचा तर दिवाना मी. बंडू कथेला त्यांची चित्रे आवडायची नाहीत. कम्प्युटराइज्ड वाटायची. सोनारांची कॅरेक्टर लाईव्ह अन टोटली प्रेमात पाडणारी असायची. हाय.. :( गेल्या त्या खिडक्या गेल्या.
हिराचंद वाचनालयात आवाजचे जुनेजुने अंक वर्षनुवर्शे मिळायचे. हवे ते पुस्तक मिळाले नाही की आवाज न्यायचे हाच शिरस्ता.

चौथा कोनाडा's picture

4 Dec 2015 - 12:27 pm | चौथा कोनाडा

हे सगळेच कथाचित्रकार आवडायचे, पण ज्ञानेश सोनारांच्या कलाकारी अफलातून असायची ! त्यांच्या चित्रातला मादक टंचपणा लाडिक श्रृंगाराची येथेच्छ उधळण करत असा यचा. जत्रा, आवाज, गांवकरी इ. दिवाळी अंक अन सोनारांची चित्रे "बघितली " नाहित तर नुसताच गोग्गोड लाडू, करंजी खाऊन चमचमीत मसालेदार चिवडा, चकली न मिळाल्यासारखी दिवाळी अळणी बेचव जायची !
सोनारांच्या सिनेमा विडंबन चित्रमालिकांनी ( छोले, घाला पत्थर इ. ) धमाल आनंद दिल्याचे आठवतेय !

सॅल्यूट टू दॅट गोल्डन इरा !

( अभ्यादादा, चित्रकार म्हणुन यावर एखादा लेख घ्या लिहायला )

मज्जा आली मस्त मज्जा आली.
काय ते शब्द
हृदयद्रावक ध्रुवपदे, गुलाबजंबू
काय ती शैली
पंच पंच उष:काली माफक प्रेम करून झाल्यावर बंडूने उदार मनाने स्नेहलताला आंघोळ करण्याची परवानगी दिली.
अन्नपूर्णाच्या थाळीतल्या उथळ आमटीच्या वाटीतील तुरीची डाळ अन डाळ एकमेकीला, स्नेहलताच्या कुळथाच्या पिठल्याचे कवतिक सांगून वाटीतील पाणीदार आमटीत जीव देऊ लागली.
तिच्या हाताच्या लिंबाच्या सरबताची सय येऊन न्यूवन्स मॉलमधल्या काचेच्या कपाटातल्या बाटलीतले स्प्राईट गहिवरले!
हे वाचल्यावर तर मला का मन उधाण वार्याचे का होते बेभान कसे गहीवरते या गाण्याचा अर्थ कळतो की काय असे वाटु लागले
चकली आवडली.
मज

मित्रहो's picture

14 Nov 2015 - 7:50 pm | मित्रहो

मजा आली वाचताना.

त्यांच्या आश्चर्यप्रदर्शनाला मोरूनेही ‘भौ: भु:क’ करून आपल्या परीने ‘तोंडभार’ लावला.

तोंडभार नवीन शब्द मराठीला.
मजा आली.

तुमचा अभिषेक's picture

14 Nov 2015 - 7:59 pm | तुमचा अभिषेक

मस्त.. खुसखुशीत .. नेहमीप्रमाणेच :)

मनीषा's picture

15 Nov 2015 - 3:13 pm | मनीषा

इथ्थे ... आणि तिथ्थे .. :):)
छानच !

समुपदेशन अध्याय आवडला.

साती's picture

15 Nov 2015 - 4:56 pm | साती

छानच लिहीलंयस गं!
अगदी सहीसही गाडगीळांचे बंडू आणि स्नेहलता वाटतायत. तो आवाज अंक ती उंच साडी नेसून पाच निर्‍या समोर घेऊन उभी असणारी स्नेहलता, तो फुलाफुलांचा शर्ट घातलेला बंडू सगळे आठवले.
आणि बंडूच्या सगळ्या भावना खाण्यापिण्यातून व्यक्त होतात ते ही उत्तम वठवलेयस इथे.

तुला अगदी १०० पैकी १०० गुण!

सस्नेह's picture

16 Nov 2015 - 10:55 am | सस्नेह

सर्व प्रतिसादकांना प्रतिक्रियेसाठी धन्यवाद ! वाचकांचेही आभार.
सौदामिनीबाईंनी केलेल्या व्हिसा-पासपोर्ट गोंधळाला चालवून घेतल्याबद्दल पेठकरकाका राही, साती यांचे विशेष आभार =))
गाडगीळांसारख्या श्रेष्ठ साहित्यिकाचे अनुकरण करण्याच्या प्रयत्नाला सर्वांनी जी दाद दिली त्याबद्दल समाधान वाटले गेले आहे.

मोदक's picture

16 Nov 2015 - 1:34 pm | मोदक

मस्त.. खुसखुशीत..!!! :)

नीलमोहर's picture

16 Nov 2015 - 4:10 pm | नीलमोहर

खुसखुशीत विनोदी लेखन छान जमतं स्नेहाताई तुम्हाला..
बंडू आणि स्नेहलता नेहमी दिवाळी अंकात भेटत असतात इथेही भेटल्यावर मज्जा आली !!
चित्र तेवढं छान जमलं नाही :(

दिपक.कुवेत's picture

17 Nov 2015 - 1:55 pm | दिपक.कुवेत

कथा लगेच वाचली होती पण प्रतिसाद द्यायचा राहून गेला होता. अतीशय खुशखुशीत लेखन. जीयो.

सौन्दर्य's picture

27 Nov 2015 - 8:29 am | सौन्दर्य

खुसखुशीत कथा, दिवाळीच्या फराळा सारखी.

चौथा कोनाडा's picture

28 Nov 2015 - 10:40 am | चौथा कोनाडा

मस्त खुसखुशीत लेखन !

या दिवाळीला आम्हाला बंडु अन स्नेहलता भेटले. मग काय आमची मज्जा च मज्जा !

लेखन आवडले हेवेसानलगे !

नगरीनिरंजन's picture

2 Dec 2015 - 6:14 am | नगरीनिरंजन

मस्त! खुसखुशीत!

भिंगरी's picture

2 Dec 2015 - 2:34 pm | भिंगरी

छान !!!

जातवेद's picture

2 Dec 2015 - 2:59 pm | जातवेद

नेहमीसारखंच खुसखुशित!
(कालच शंकरपाळ्या संपल्या आमच्या, म्हणलं तैंचा लेख वाचावा परत.)

कालच शंकरपाळ्या संपल्या >>>>
..हो, पण तवर चकल्या कडक झाल्या की =)

जातवेद's picture

3 Dec 2015 - 9:51 am | जातवेद

एखाद्या जिन्नसाबरोबर व्हायचेच असे. आपण दह्यात भिजवून खाव्या =)

गिरिजा देशपांडे's picture

18 Oct 2016 - 4:03 pm | गिरिजा देशपांडे

अरे काय लिहिलंय जबरदस्त, एकदम गंगाधर गाडगीळ स्टाईल ने, मस्तच जमलंय,खूप वर्षांनी बंडू आणि स्नेहलता वाचनात आले. खूप छान वाटलं :):)

सिरुसेरि's picture

19 Oct 2016 - 4:24 pm | सिरुसेरि

+१००