कॉफी आणि बरंच काही

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in रूची विशेषांक
15 Oct 2015 - 5:57 pm

कॉफी ही आपल्या आयुष्याशी चहाइतकीच जोडली गेलेली आहे. एखाद्या पावसाळी संध्याकाळी, खिडकीत बसून गरम कॉफीचे घोट घेताना त्या निसर्गसौंदर्याची, मोहक वातावरणाची मनावर होणारी जादू किंवा तो आणि ती जेव्हा पहिल्यांदा डेट ला जातात त्यावेळी त्या प्रेमळ क्षणांची साथ द्यायला सोबत असते ती कॉफी किंवा मग रात्रीच्या निरव शांततेत, मंद गाण्याच्या सोबतीने वाफाळत्या कॉफीचा आस्वाद घेताना मिळणारी कमालीची स्वस्थता किंवा पुस्तक वाचताना कॉफीची सोबत असली तर वाचनाचा आनंद द्विगुणीत होतो किंवा एखद्या सुंदर दिवसाची सुरुवात व्हावी ती गरमा-गरम कॉफी आणि चविष्ट केक स्लाईससोबत तर क्या बात है!

कॉफी = विचार, निवांतपणा, संगीत, दरवळणारा सुगंध, तरतरी, हसु, गप्पा, वाचन, पाऊस, तो - ती, आनंद, मैत्र, लिखाण, मी-टाईम.

कॉफी = क्रियेटिव्ह ज्युस, अशी ही कॉफी आणि तिच्याबद्दल बरंच काही सांगणारा हा लेख :)

.

कॉफीचा इतिहास

कॉफी ही कॉफीया झाडाच्या बेरीज / फळापासून मिळणार्‍या बियांपासून बनवली जाते. कॉफीचा जन्म असे म्हणतात की नवव्या शतकात इथिओपिआमध्ये झाला. काल्डि नामक मेंढपाळ होता त्याच्या असे लक्षात आले की त्याचा बकर्‍या कसल्याश्या झाडाच्या बेरीज खाऊन इतक्या प्रफुल्लित व्हायच्या की त्या रात्रीच्या झोपायच्याच नाही. जेव्हा काल्डीने स्वतः त्या बेरीज खाल्ल्या तेव्हा तो ही प्रफुल्लित झाला. एका भिख्खूने काल्डिला आनंदाने नाचताना पाहिले, त्याला विचारताच काल्डिने त्याला बेरीज दाखवल्या. त्या भिख्खूने त्या बेरीजपासून पेय बनवून प्राशन केले, त्यानंतर त्याला असे जाणवले की या पेयाने त्याला बराच वेळ जागते ठेवले. अर्थात हे असे मानले जाते. इथिओपिआमध्ये त्याकाळी कॉफीची पाने पाण्यात उकळवून मिश्रण तयार केले जाई, त्याच्या औषधी गुणधर्मामुळे ते प्राशन केले जाई. कॉफीची प्रसिद्धी हळू-हळू अनेक ठिकाणी पोहोचली.

.

*छायाचित्र आंतरजालावरुन साभार

पंधराव्या शतकात अरब लोकांनी कॉफीचा शोध लावला येमेनमध्ये. त्यांनी नुसता शोधचं नाही तर कॉफीचा व्यापार ही केला. १५५५ साली सुल्तान सुलेमानच्या राज्यात इस्तंबुलमधे कॉफीची ओळख सरवांना Özdemir Pasha ने करवून दिली. तो येमेनचा ऑट्टोमन राज्यपाल होता. ऑट्टोमन राजवाड्यात कॉफी बनवण्याची नवीन पद्धत सुरु झाली होती, ती पद्धत आज जगात सर्वत्र प्रसिद्ध आहे. कॉफीच्या बिया आधी भाजून घेतल्या जाई आणि मग त्याची पूड करुन पाण्यात अगदी मंदाग्नीवर उकळले जाई जेणेकरुन कॉफीचा अर्क त्यात उतरत असे. या ब्रुईंग पद्धतीमुळे कॉफीची किर्ती दूरवर पसरली. कॉफीच्या बिया इथिओपिआमधून येमेनला व्यापारी निर्यात करत असे. सोळाव्या शतकापर्यंत पर्शिया, इजिप्त, सिरीयात कॉफी पोहोचली होती. कॉफीला "वाईन ऑफ अरेबी" असे म्हटले जायचे. अरबस्थानात कॉफीला काहवा म्हणून ओळखले जाते. काहवा म्हणजे बलवर्धक.

१६१५ मध्ये इस्तंबुलमध्ये कॉफीशी व्हेनेशियन व्यापारी परिचित झाले आणि ते आपल्यासोबत कॉफीच्या बिया व्हेनिसला घेऊन आले. पूर्वी रस्त्यावर लेमोनेडची विक्री करणारे दुकानदार कॉफी विकायचे. कॉफीच्या वाढत्या विक्रीमुळे १६४५ साली इटलीमध्ये पहिले कॉफी-हाऊस सुरु झाले. कॉफीची ख्याती पॅरिस, MARSEILLES पर्यंत पोहोचली होती. १६७० साली बाबा बुडान जो मक्का यात्रेकरु व तस्कर होता त्याने प्रथम कॉफीची तस्करी भारतात केली होती. असे म्हणतात त्यापूर्वी कॉफीच्या बिया उकळून किंवा त्यांचे प्रभावलोपन करुन निर्यात केले जायचे. बाबा बुडानने त्या बिया आपल्या पोटाशी बांधून भारतात आणल्या व कॉफीच्या पहिल्या रोपाची लागवड मैसूरमध्ये केली.

.

बाबा बुडान - *छायाचित्र आंतरजालावरुन साभार

१६५० च्या दशकात इंग्लंडमध्ये कॉफीचे महत्त्व आणि खप दोन्ही वाढत होते. इथे १६५२ साली पहिले कॉफी-हाऊस ऑक्सफर्ड येथे जेकब नावाच्या ज्युईश इसमाने सुरु केले. आज त्याच जागी बांधलेल्या मोठ्या इमारतीत कॉफी-हाऊस आहे "दी ग्रँड कॅफे" म्हणून. १६५४ साली ऑक्सफर्ड मध्ये "ऑक्सफर्ड्स क्वीन्स लेन कॉफी हाऊस" ची स्थापना झाली ते आज ही तेथे "क्युएल" ह्या नावाने बघायला मिळते.

१६८३ च्या बॅटल ऑफ व्हियेन्ना मध्ये तुर्कींवर मात करुन व्हियेन्नीज लोकांनी त्यांचा अनेक माल जप्त केला होता त्यात काही कॉफीच्या गोणी ही होत्या. Kolschitzky नामक ऑस्ट्रिअन गुप्तहेर जो काही काळ तुर्की लोकांसोबत राहिला त्याने त्यातल्या काही गोणी घेतल्या. तो त्या टर्किश कॉफीचे छोटे प्याले दारो-दारी जाऊन विकत असे. अशा प्रकारे व्हियेन्नीज लोकांना कॉफीची ओळख Kolschitzky मुळे झाली.

.

Kolschitzky- *छायाचित्र आंतरजालावरुन साभार

हॉलंड मध्ये कॉफी येमेनमधून सतराव्या शतकात पोहोचली होती. डच लोकांनी त्यांच्या वसाहतीत / डच कॉलोनीजमध्ये कॉफीचे उत्पन्न सुरु केले होते. १६९९ साली कॉफीच्या बियांचे रोपण जावा बेटावर म्हणजे इंडोनेशियामध्ये केले गेले. १७११ मध्ये पहिल्या जावनीज कॉफी बिया / इंडोनेशिअन कॉफी अॅमस्टर्डॅमच्या बाजारात विक्रीसाठी उपल्ब्ध झाल्या असे म्हणतात. डच लोकांनी स्कँडेनेव्हियामध्ये कॉफीची ओळख करुन दिली आणि आज इथे सर्वात जास्त कॉफीचा खप आहे.

पॅरिसमध्ये Louis XIV ला १७१४ साली डचकडून कॉफीचे रोप भेट म्हणून मिळाले होते. ते त्यांनी पॅरिसच्या वनस्पतिशास्त्रविषयक / बॉटनिकल बागेत म्हणजेच Jardin des Plantes मध्ये लावले. बर्‍याच वर्षांनी गॅब्रियल मॅथ्यु दी क्लियू जो Martinique- कॅरिबियनमधली फ्रेंच वसाहत, तेथे नौसेनेचा अधिकारी होता, तो त्यावेळी पॅरिसमध्ये सुट्टीसाठी आला होता. त्याने त्या बागेतल्या कॉफीचे रोप मागितले , त्याला नकार देण्यात आला, म्हणून गॅब्रियल मॅथ्यु दी क्लियूने त्या बागेत जाऊन मोड आलेले कॉफीचे इवले रोप चोरून तो परत जायला निघाला. बोटीच्या या लांबच्या प्रवासात, अनेक अडचणींचा सामना त्याने केला. अगदी ठराविक लिटर पिण्याचे पाणी बोटीवर उपलब्ध असे, गॅब्रियल मॅथ्यु दी क्लियू त्यातूनही अर्धे स्वतः व अर्ध सोबत आणलेल्या कॉफीच्या रोपाला घालत असे. ह्या प्रवासात कॉफीचे रोप छान पोसले गेले. Martinique ला येताच गॅब्रियल मॅथ्यु दी क्लियूने ह्या रोपाची लागवड केली आणि कॉफीची माहिती इतर कॅरेबिअन भेटं आणि अमेरीकेपर्यंत पोहोचली.

१७२७ मध्ये de Mello Palheta , पोर्तुगीज खलाश्याने French Guyana मधून कॉफीचे रोपटे ब्राझिलमध्ये आणले. आज ब्राझिलमध्ये जगातील सर्वात जास्त कॉफीचे उत्पादन होते.

एकोणीसाव्या शतकापर्यंत कॉफी जगभरात पोहोचली.

.

*छायाचित्र आंतरजालावरुन साभार

कॉफीचे प्रकार, लागवड आणि प्रक्रिया

कॉफीचे उत्पादन उष्ण प्रदेशात होते. कॉफीचे साधारण छोटे झाड किंवा झुडुप असतं. कॉफीचे दोन प्रकार असतात एक कॉफी अरेबिका आणि दुसरी कॉफी रोबस्टा. कॉफीच्या झुडपाची तिरपी पाने असतात आणि त्याला येणारी चेरीसारखी फळं लाल-जांभळ्या रंगाची, क्वचित पिवळ्या रंगाची असतात त्याला कॉफी चेरी असे ही म्हटले जाते.

.

कॉफी चे फूल - *छायाचित्र आंतरजालावरुन साभार

.

कॉफी चेरी - *छायाचित्र आंतरजालावरुन साभार

कॉफी अरेबिका ही बारीक, सुगंधीत कॉफी असते. त्याची लागवड समुद्रसपाटी पासून ९०० ते २०००.मी. उंचीवर करावी लागते. अरेबिकाला थंड वातावरण लागतं पण फ्रॉस्ट सहन करु शकत नाही. तिला "कॉफी ऑफ अरेबिया" किंवा "माऊंटन कॉफी" असे ही म्हटले जाते. ह्याचे झाड ९ ते १२ मीटर उंचीचे असते व साधारण सात वर्ष लागतात हे झाड पूर्ण तयार व्हायला व फळं धरायला. झाड लावल्यापासून २-४ वर्षात पांढरी, सुगंधित फुलं यायला लागतात आणि मग छोट्या चेरीसारखी फळं धरायला लागतात. इथिओपिआसकट आज अरेबिकाचे ब्राझिल, क्युबा, कोल्मबिया, टांझानिया, वेनेनज्व्युएला, केनिया, मेक्सिको, कॉस्टा रीका, भारतात, डॉमिनिकन रीपब्लिकमध्ये उत्पादन होते.

.

कॉफी अरेबिकाचे झाड - *छायाचित्र आंतरजालावरुन साभार

कॉफी रोबस्टा ही सुपीक, स्ट्राँग, जास्तं कडू चवीची असते. ह्याचे झाड / झुडुप १० मीटरच्या उंचीचे असते. हे Rubiaceae जातीतले बहरणारं झाड आहे. कॉफी रोबस्टाला Coffea canephora ह्या नावाने ही ओळखले जाते. ह्यात दोन प्रकार असतात रोबस्ट आणि ngand. या कॉफीचे उत्पन्न अरेबिकापेक्षा जास्तं प्रमाणात होतं आणि ह्यात कॅफेनचे प्रमाण ही अरेबिका पेक्षा जास्तं असतं. अॅफ्रिका, भारत, फिलिपीन्स, इंडोनेशिया, थायलंड, मॅदागॅस्कर मध्ये ह्याचे उत्पादन होते.

.

कॉफी रोबस्टाचे झाड - *छायाचित्र आंतरजालावरुन साभार

भारतात कॉफी अरेबिका आणि कॉफी रोबस्टा कर्नाटकात - कोदग्गु, चिक्कामंग्ळूरू, हस्सन मध्ये उगवली जाते, केरळमध्ये मलाबार येथे तर तामिळनाडूत नीलगीरी, कोडाईकनाल येथे.

पूर्वी कॉफीमध्ये गोडव्यासाठी साखरेऐवजी गुळाचा किंवा मधाचा वापर दक्षिण भारतात केला जाई.

.

कॉफी अरेबिका आणि कॉफी रोब्स्टाच्या बिया - *छायाचित्र आंतरजालावरुन साभार

कॉफीच्या चेरीज ९ महिने घेतात पूर्ण तयार व्हायला. ह्या चेरीज लालबुंद असतात. बर्‍याच देशात कापणीच्या दोन पद्धती आहेत, एक सिलेक्टिव पिकिंग आणि दुसरे स्ट्राईप्ड पिकिंग.

सिलेक्टिव्ह पिकिंगमध्ये दर ८-१० दिवसांनी पिकर्स फिरून ज्या चेरीज पूर्ण पिकलेल्या असतात त्या हाताने तोडून घेतात.

.

*छायाचित्र आंतरजालावरुन साभार

स्ट्राईप्ड पिकिंगमध्ये अख्खे पीक एकदाच मशीनच्या सहायताने कापले जाते.

.

*छायाचित्र आंतरजालावरुन साभार

पुढची पायरी असते प्रकियेची, कॉफीच्या बिया काढल्यानंतर त्या खराब होऊ नये म्हणून त्यावर लगेच प्रक्रिया करावी लागते. ह्याच्या पण दोन पद्धती आहेत एक ड्राय मेथड ज्यात कॉफी चेरीजना काही आठवडे उन्हात वाळवणासारखे सुकवले जाते. जेव्हा त्यातला ओलावा ११ % उरतो तेव्हा त्यांना भांडार-घरात साठवले जाते.

.

ड्राय मेथड - *छायाचित्र आंतरजालावरुन साभार

दुसरी पद्धत म्हणजे दी वेट मेथड - ह्यात चेरीचा गर आणि साल मशिनमधून काढले जाते मग त्या गराला पाण्याने स्वच्छ धुतले जाते. ह्या गराला वाळवून मल्श म्हणून वापरता येतं. कॉफीच्या बिया त्याच्या बाहेरच्या आवरणासकट मोठ्या पाण्याच्या टाकीत सोडल्या जातात, तेथे त्या १२ ते ४८ तास बुडवून ठेवलेल्या असतात, ह्याला फर्मेंटेशन प्रोसेस असे म्हटले जाते.

.

*छायाचित्र आंतरजालावरुन साभार

असे केल्याने कॉफीच्या आवरणाला जो mucilage चा थर असतो तो निघतो. जेव्हा फर्मेंटेशनची प्रक्रिया पूर्ण होते तेव्हा कॉफीची बी ही रखरहीत लागते, त्यांना पुन्हा एकदा पाण्याच्या पाटातून काढले जाते व वाळवले जाते. वाळवण्याची तिच पद्धत ११ % ओलावा उरेल इथपर्यंत ते वाळवले जाते, काहीवेळेला मशिनद्वारे ही ह्या बिया सुकवल्या जातात. ह्या कोफीला पार्चमेंट कॉफी असे ही म्हटले जाते.

.

*छायाचित्र आंतरजालावरुन साभार

कॉफीच्या बिया पूर्ण वाळल्या नंतर मशिनद्वारे बियांचे टरफल / फोलपट ( the exocarp, mesocarp & endocarp ) सोलले जाते. त्यानंतर बियांबर जे रुपेरी आवरण असतं ते पॉलिश मशीनमधे घालून काढले जाते. ह्यानंतर बियांचे वजन, प्रत, प्रकार बघून त्यांना सॉर्ट केले जाते.

.

*छायाचित्र आंतरजालावरुन साभार

ही ग्रीन कॉफी पुढे टेस्टिंगसाठी पाठवली जाते, या क्रियेला "कप्पिंग" असे म्हटले जाते. जो कॉफी टेस्ट करणारा असतो त्याला "कपर" म्हटले जाते, कपर कॉफीची बी घेऊन लॅबमध्ये ती भाजून त्याची पूड करुन पाण्यात उकळवतो, उकळवून झाल्यावर त्या ब्रूड कॉफीचा सुवास तो नाकाने घेतो. थोड्यावेळ कॉफीला तसेच ठवून तो पुन्हा कॉफीचे काही कण असतील तर ते चमच्याने मोडून पुन्हा त्याचा सुवास घेतो.

.

*छायाचित्र आंतरजालावरुन साभार

या नंतर कॉफी रोस्टिंग होतं. ग्रीन कॉफीला रोस्टिंग मशीनमध्ये, ज्याचे तापमान ५५० डिग्री फॅ. असते त्यात घालून सतत फिरतं ठेवतात. एकदा बिया ४०० डिग्री फॅ.ला भाजल्या गेल्या की त्यांचा रंग बदलतो व बियांमधले तेल (caffeol) निघू लागते. बिया छान भाजल्या गेल्या की त्यांना बाहेर काढून गार केले जाते. कॉफी ग्रांईंडिंग ही कॉफीची पावडर कितपत जाड-बारीक हवे त्याप्रमाणे केले जाते. जी कॉफी ब्र्यु केली जाती ती बारीक ग्राईंड केलेली असते.

.

*छायाचित्र आंतरजालावरुन साभार

कॉफी रोस्टींग - कॉफी रोस्टींगचे ही काही प्रकार आहेत.

लाईट रोस्ट : लाईट रोस्ट म्हणजे अगदी हलकी भाजून दळलेली कॉफी ज्यात कॉफीचे तेल बाहेर येत नाही त्यामुळे ही कॉफी चवीला ही लाईट असते. लाईट रोस्ट, सिनॅम्मन रोस्ट, हाफ सिटि रोस्ट, न्यु इंग्लंड असे लाईट रोस्टसची नावे आहेत. ह्यात कॉफीच्या बिया जेव्हा भाजल्या जातात तेव्हा काही मिनिटांत बिया फुटून एक चीर पडते ह्याला फर्स्ट क्रॅक असे म्हणतात.

मिडियम रोस्ट : सिटि, अमेरिकन, ब्रेकफास्ट रोस्ट्स अशी नावे आहेत. ह्यात फर्स्ट क्रॅक नंतर त्यातील साखरेचे प्रमाण कॅरेमलाईज्ड होतं आणि भाजका स्वाद तयार होतो.

डार्क रोस्ट्स : हाय, काँटिनेंटल, न्यु ऑर्लिन्स, युरोपिअन, इटालियन, व्हियेन्नीज, फ्रेंच, एस्प्रेसो, फुल सिटी, ह्यात फर्स्ट क्रॅकनंतर अजून भाजल्यावर बियांतून तेल सुटु लागते ह्याला सेकंड क्रॅक असे म्हणतात. ह्या बिया चमकदार, कडवट, अधिक सुवासिक कॉफी असते.

.

*छायाचित्र आंतरजालावरुन साभार

कॉफी-मेकर आणि कॉफी ब्रुईंग

ब्र्यूड कॉफी बनवण्यासाठी आधी कॉफीच्या बिया भाजून घ्याव्या लागतात, मग त्यांची पुड करावी लागते, मग गरम पाण्यात घालून ब्रु केले जाते आणि मग ब्र्यूड कॉफी गाळून घेतली जाते.

कॉफी ब्रुईंगच्या चार पायर्‍या आहेत : पहिले डिकॉक्शन (काढा) तयार करणे, दुसरे इन्फ्युजन, तिसरे पर्कोलेटर / ड्रिप ब्रुईंग आणि चौथे प्रेशराईज्ड पर्कोलेशन. बर्‍याच ठिकाणी कॉफी मेकरचा वापर करुन ही ब्र्यूड कॉफी बनवली जाते.

कॉफीची पावडर करण्यासाठी कॉफी-ग्राईंडर, बर्र मिल्स, रोलर ग्राईंडर, पाऊंडिंगसाठी खल-बत्त्याचा वापर ही केला जातो. कॉफी उकळणे किंवा डिकॉकशन तयार करणे कॉफी ब्र्युईंगची मुख्य पद्धत आहे. इंडोनेशियामध्ये आज ही कॉफीची पावडर कपमध्ये घालून त्यावर उकळते पाणे घालून काही वेळ ठेवतात म्हणजे कॉफीचे जे कण आहेत ते कपाच्या तळाशी जाऊन बसतात व ही कॉफी पिण्यासाठी तयार होते. कपाच्या तळाशी बसलेल्या कॉफीच्या गाळाला "मड कॉफी" असे मध्यपूर्वे देशात म्हटले जाते.

ज्या भांड्यात कॉफी बनवायची आहेत ते भांडे स्वछ असले पाहिजे. ताजी दळलेली कॉफी असेल तर कॉफीचा स्वाद अधिक खूलून येतो. कॉफीचे आणि पाण्याचे प्रमाण हे पक्कं जमलं पाहिजे. पाण्याचे तापमान १९५ - २०५ डिग्री. फॅ. उष्मं हवे जेणेकरुन कॉफीचा अर्क व्यवस्थित उतरेल. जर मॅन्युअली कॉफी ब्र्यु करत असाल तर पाण्याला उकळी काढा आणि गॅस बंद करुन पाण्याला एका मिनिटासाठी तसेच ठेवुन द्या, एका मिनिटानंतर कॉफीवर ओता. जर का पाणी कोमटसर असले तर कॉफीची चव बिघडते. ब्र्यूड कॉफीचे सेवन लगेच करावे लागते, जशी-जशी ती गार होते तशी तिची चव बदलते व पिण्यास चांगली लागत नाही. एकदा ब्रु केलेली कॉफी पुन्हा-पुन्हा गरम करुन पिता येत नाही नाहीतर तिची चव अधिक कडसर व करपट लागते.

काही ठिकाणी पारंपारीक कॉफी-मेकरचा वापर ही केला जातो. वेगवेगळ्या प्रकाराचे कॉफी-मेकर उपल्ब्ध आहेत जसे एस्प्रेसो मशीन, व्हॅक्युम कॉफी-मेकर, फ्रेंच प्रेस, मोका पॉट किंवा एस्प्रेसो-मेकर, इंडियन कॉफी फिल्टर, इलेक्ट्रिक पर्कोलेटर, Vietnamese Coffee Filter, इथिओपिअन Jebena, Dallah . ह्यांची थोडक्यात माहिती खाली देत आहे.

एस्प्रेसो मशीन- या मशीनमध्ये कॉफी प्रेशराईज्ड ब्रुईंग पद्धतीने बनवली जाते. एस्प्रेसो ही जराशी दाटसर कॉफी असते. एस्प्रेसो कॉफी ही अनेक प्रकारच्या कॉफीचा बेस आहे उदा: कॅपुचिनो, कॅफे लाते, कॅफे मकिआतो, कॅफे अमेरिकानो, कॅफे मोका. ह्या मशीनमध्ये गरम पाण्याला उच्च दबावाखाली कॉफी पावडरमध्ये पास केलं जातं, अशामुळे दाटसर, सिरपी कॉफी तयार होते, ह्या कॉफीवर क्रेमा (फेस) तयार होतो. एस्प्रेसो मशीनचे अनेक प्रकार आहेत जसे स्टिम ड्रिव्हन, पिस्टन ड्रिव्हन, पम्प ड्रिव्हन, एयर पप्म ड्रिव्हन, ह्याबद्दल अधिक माहिती इथे वाचायला मिळेल. स्ट्व्ह टॉप एस्प्रेसो मेकर म्हणजेच मोका पॉट त्याबद्दल आपण खाली माहिती वाचणार आहोत.

.

*छायाचित्र आंतरजालावरुन साभार

व्हॅक्युम कॉफे- या कॉफी-मेकरला सिफन कॉफी मेकर असे ही म्हटले जाते. ह्याचा शोध १८३० मध्ये लोएफ ऑफ बर्लिन ह्यांनी लावला. या उपकरणाचा वापार हल्ली मोठ-मोठे शेफ्स हॉट कॉकटेल्स व ब्रॉथ बनवण्यासाठी वापरतात.

.

*छायाचित्र आंतरजालावरुन साभार

फ्रेंच प्रेस - फ्रेंच प्रेस किंवा कॉफी प्लंजर ह्याची रचना इटालियन डिझाईनर Attilio Calimani ह्याने १९२९ मधे केली. या कॉफी प्लंजरच्या पॉट किंवा बीकरमध्ये भरडसर दळलेली कॉफी घालून त्यावर थोडे थोडे करुन उकळलेले पाणी घालत रहावे लागते, मध्ये ढवळून पुन्हा आवश्यकतेनुसार पाणी घालून कॉफीला काही मिनिटे त्यात मुरु द्यावे. कॉफी पूर्णपणे मुरण्यासाठी किंवा ब्रु होण्यासाठी फक्त ४ मिनिटे ठेवावी. पॉटचे प्लंजर पॉटच्या तळाशी बसवून कॉफी कपमध्ये ओतून सर्व्ह करावी. ह्या कॉफी प्लंजरला जगभरात विविध नावाने ओळखले जाते - न्युझिलंड, साऊथ अॅफ्रिका, ऑस्ट्रेलियामध्ये या कॉफी मेकरला कॉफी प्लंजर असे म्हटले जाते. इटलीत caffettiera a stantuffo, फ्रांसमध्ये cafetière à piston किंवा बोडम, युनायटेड किंग्डम, नेदरलँड्स मध्ये cafetière आणि युनायटेड स्टेट्स, कॅनडामध्ये फ्रेंच प्रेस किंवा कॉफी प्रेस.

.

*छायाचित्र आंतरजालावरुन साभार

मोका पॉट किंवा एस्प्रेसो-मेकर - मोका पॉट इटलीमध्ये सहज वापरला जातो आणि आता जगभरात ही. या पॉटची निर्मीती Luigi De Ponti's ने १९३३ साली केली, Alfonso Bialetti नी ह्याचे पेटेंट घेतले व मोका एक्स्प्रेस ह्या नावावे उत्पादन सुरु केले. मोका पॉट हे पारंपारिक ब्रिक्काचे सुधारीत कॉफी पात्र आहे. काही स्टील, मेटल किंवा अॅल्युमिनियमचे, ईलेक्ट्रिक, स्टव्ह टॉप (गॅसवर ठेवता येण्याजोगे) असे हे पॉट्स असतात. या किटलीत जे बॉयलर असतं त्याला वापरण्यासाठी एक वॉल्व असतो. त्या वॉल्वच्या खाली पाणी घालयचे. त्यावर फनेल सारखे मेटलचे फिल्टर असते ज्यात दळलेली कॉफी भरायची. मग किटलीचा वरचा भाग ज्याच्या तळाशी अजून एक फिल्टर असते ते व छोटे गास्केट लावून घट्ट फिरवून घ्यायचे. ही किटली गॅसवर मध्यम आचेवर ठेवायची. जेव्हा पाण्याला उकळी येते तेव्हा आत वाफेच्या दबावाने कॉफी किटलीच्या वरच्या भागात उतू लागते. ही कॉफी मग कपमध्ये ओतून सर्व्ह केली जाते व ओतून झाल्यावर त्यावर येणार्‍या फेसाला क्रेमा असे म्हटले जाते जे एस्प्रेसो कॉफीसारखे दिसते. ह्यात अजून एक पद्धत म्हणजे मुक्का एक्स्प्रेस पॉट जो मोका पॉटचे सुधारीत कॉफी पात्र आहे. ह्यामध्ये फ्रॉथ्ड मिल्क (फेसाळलेले दूध) घालून कॉफी ब्रु केली जाते. (मोका पॉट कॉफीची सविस्तर, सचित्र पाककृती लेखात खाली देणार आहे)

.

Cezve - Cezve हे टर्किश किंवा ग्रीक कॉफी पॉट असतं. या भांड्याला मोठाले लाकडी किंवा धातूचे हँडल असते व पॉट तांब्याचा किंवा पितळेचा असतो. काहीवेळेला स्टील, अॅल्युमिनियमचे ही पात्र असतात. ग्रीक भाषेत ह्या भंड्याला Briki असे म्हटले जाते. ह्यात कॉफी बनवण्याची पद्धत म्हणजे भांड्यात थंड पाणी घेऊन त्यात कॉफी व आवडीप्रमाणे साखर घालायची. चमच्याने नीट मिक्स करुन भांडे गॅसवर मध्यम आचेवर ठेवावे. कॉफीला उकळी येण्यापूर्वी Briki मध्ये हलका फेस येईल, या फेसाला ग्रीक भाषेत "काईमाहकी" असे म्हणतात, जितका जास्तं रिच फोम तितकी कॉफी चविष्ट असे ग्रीक मानतात. ग्रीक लोकं ही कॉफी मग कपात ओतून पाण्याच्या ग्लासासोबत आणि आवडत्या कुकीज सोबत सर्व्ह करतात. ही कॉफी अजिबात गाळायची नसते, फेसाळलेली कॉफी व कॉफीचे कण कपाच्या तळाशी बसलेले असतात, मड कॉफीचाच प्रकार. (Cezve कॉफीची सविस्तर, सचित्र पाककृती लेखात खाली देणार आहे)

.

व्हियेत्नामिज कॉफी फिल्टर (Phin) - या कॉफी फिल्टरचे चार भाग असतात, कॉफी चेंबर, स्क्रू डाऊन फिल्टर किंवा ग्रॅव्हिटी फिल्टर, कॉफी स्ट्रेनर, आणि झाकण म्हणजे हॅट. हे फिल्टर कपाच्या, मगच्या किंवा ग्लासच्या साईजनुसार उपलब्ध असतात. व्हियेत्नामिज कॉफी किंवा Ca phe sua da बनवण्याची पद्धत म्हणजे, कप किंवा ग्लासमध्ये १/३ इन्च कंडेन्सड मिल्क घालून घ्यायचे. त्यावर कॉफी स्ट्रेनर व कॉफी चेंबर ठेवायचे. त्यात कॉफी पावडर घालायची व वरून स्क्रू डाऊन फिल्टर किंवा ग्रॅव्हिटी फिल्टर बसवून घ्यायचे, फिल्टर फार घट्ट न बसवता नीटनेटका, जरासा सैलसर बसवावा. त्यात आता थोडे गरम पाणी घालून २० सेकंद थांबायचे म्हणजे कॉफी गरम पाणी शोषून घेईल. मग पुन्हा गरम पाणी घालून चेंबर भरायचे व वरून हॅट लावून झाकायचे. कॉफी ही खाली असलेल्या ग्लास किंवा मगमध्ये झिरपत राहिल. ४-५ मिनिटांनी कॉफी-मेकर काढून बाजूला ठेवावे व स्टररने ढवळून कॉफी सर्व्ह करावी. ही तयार कॉफी बर्फाच्या क्युब्स वर घालून सर्व्ह करता येते किंवा जर गरम हवे असेल तर ज्या मग / ग्लासमध्ये कॉफी ड्रिप होत आहे तो मग कॉफी-मेकर सकट कोमट पाण्यात ठेवावा.

ह्यातही प्रकार आहे कंडेन्सड मिल्क न घालता नुसती ब्लॅक कॉफी (Ca Phe Den) हवे तर त्यात थोडी साखर घालून सर्व्ह करावी. जर आईस्ड कॉफी हवे असेल तर ब्लॅक कॉफीत बर्फाचे क्युब्स घालावे, ह्याला Ca Phe Den Da असे म्हटले जाते.

.

.

*छायाचित्र आंतरजालावरून साभार

इथिओपिअन jebena - इथिओपिआमध्ये कॉफी सोहळा होतो ज्यात कॉफी बनवली जाते व सगळे मिळून कॉफीचा आस्वाद घेतात. इथिओपिअन कॉफी बनवण्यासाठी मातीचे सुरईवजा भांडे ज्याला जेबेना असे म्हटले जाते त्याचा वापर केला जातो. कोळश्याच्या शेगडीवर कॉफीच्या ग्रीन बीन्स आधी भाजल्या जातात मग त्या बियांची पारंपारीक लाकडी खल-बत्त्यात कुटून पावडर केली जाते. मग जेबेनात पाणी व कॉफी घालून उकळी काढली जाते. जेबेनातून ही कॉफी दुसर्‍या भांड्यात काढली जाते व थोड्यावेळ गार केली जाते. पुन्हा हे कॉफीचे मिश्रण जेबेनात ओतून उकळले जाते. जेबेनाच्या तोटीला कॉफी गाळण्यासाठी पूर्वी घोड्याच्या केसांपासून बनवलेली जाळी बसवली जायची , हल्ली कांदे किंवा फळांना गुंडाळलेली भारीक भोकांची जाळी असते तिचा वापर केला जातो. कॉफी गाळून पारंपारीक लहान कप sini or finjal मध्ये ओतून पॉपकॉर्न किंवा शेंगदाण्यांसकट सर्व्ह केली जाते.

.

*छायाचित्र आंतरजालावरून साभार

Dallah - Qahwa (कॉफी) बनवण्यासाठी हे पारंपारिक अरेबियन कॉफी पॉट वापरले जाते. डलाह पितळ, चांदी, स्टिलचे असते. डलाहमध्ये पाणी भरुन गॅसवर उकळी येण्यासाठी ठेवावे. उकळी आली की गॅसवरुन उतरवून ३० सेकंद थंड होऊ द्यावे. मग त्यात कॉफी पावडर घालून, मिक्स करुन पुन्हा गॅसवर मंद आचेवर ठेवावे. कॉफी हलकी उकळली गेली की लगेच गॅसवरून उतरवून fenjan मध्ये ओतून सर्व्ह करावी. काही ठिकाणी ह्यात केशर, हिरवे वेलदोडे, लवंग, दालचिनी असे मसाले ही घातले जातात, साखर ऐच्छिक. ही कॉफी खजुर व पाकवलेल्या फळांसोबत सर्व्ह केली जाते. Fenjan हे छोटे प्याले असतात ज्यात कॉफी सर्व्ह केली जाते. ह्या प्याल्यांना कान नसतात.

.

*छायाचित्र आंतरजालावरून साभार

भारतीय / मद्रास कॉफी फिल्टर - मद्रास कॉफी फिल्टरचे व्हियेत्नामिज कॉफी फिल्टरप्रमाणे चार भाग असतात, दोन स्टीलचे उभ्या डब्यासारखे कप्स असतात. खालच्या कपात कॉफी झिरपून गोळा होते, वरच्या कपाच्या तळाशी बारीक भोकं असतात, त्यावर छोटे हँडल असलेली जाळी व झाकण असते. वरचा कप ज्याच्या तळाशी भोकं आहेत तो हलका गॅसवर गरम करुन घ्यावा. त्यात दळलेली कॉफी भरून हलकी दाबावी व वरून हँडल असलेली जाळी लावावी. त्यात उकळलेले पाणी घालून झाकण लावून १५ मिनिटे थांबावे. कॉफी झिरपून खालच्या कपमध्ये भरेल, हे आहे डिकॉक्शन. पारंपारिकरित्या टम्बलरमध्ये गरम दूध + साखर मिक्स करुन घेतात, त्यात हे डिकॉक्शन घालून डवारा / ड्बड्यात ओतून पुन्हा टम्बलरमध्ये ओतली जाते. असे केल्याने कॉफी वर छान फेस तयार होतो. ही होते तयार मद्रास कापी / मायलापोर कॉफी.

.

कॉफी फिल्टर आणि टम्बलर-डवारा

ह्या कॉफी पावडरमध्ये बर्‍याचदा ७० % कॉफी व ३०% चिकोरी एकत्र केलेले असते. (मद्रास कॉफी आणि फिल्टरबद्दल सविस्तर, सचित्र माहिती लेखात खाली देणार आहे)

केमेक्स कॉफी मेकर - Peter Schlumbohm ने १९१४ मध्ये ह्या कॉफी पॉटचा शोध लावला. हा पॉट निमुळत्या मानेचा, काचेचा गोलाकार फ्लास्क असतो. ह्यात कागदी फिल्टरचा वापर कॉफी गाळण्यासाठी केला जातो. कागदी फिल्टरचा शोध Melitta Bentz ने १९०८ साली लावला होता. कॉफी ड्रिप करण्याची पद्धत म्हणजे ह्यात, पॉटमध्ये आधी मानेजवळ कागदी फिल्टर बसवला जातो. त्यात दुसर्‍या भांड्यात उकळलेले पाणी घेऊन फिल्टरवर ओतले जाते जेणेकरुन कॉफी हळू-हळू झिरपून त्या फ्लास्कमध्ये जमा होईल.

.

.

*छायाचित्र आंतरजालावरून साभार

चिकोरी

आपल्या दक्षिण भारतीय फिल्टर कापी / कॉफी पावडर ही ७०%-८०% कॉफी + २०%-३०% चिकोरी पावडर मिश्रित असते. चिकोरी हे नीळे-जांभळे फूल डँडेलियन फुलाच्या जातीतले आहे. ह्यात "क" जीवनसत्व भरपूर असतं. ह्याच्या मुळाची चव कॉफीप्रमाणे असते पण ह्यात कॅफेन नसते. पूर्वी ज्या ठिकाणी कॉफी उपल्ब्ध नव्हती तिथे चिकोरीचा वापर केला जायचा. ह्याची वाढ इजिप्तमध्ये, नाईल नदीजवळ हजारो वर्षांपासून होत आली. १८ व्या शतकात युरोपमधून चिकोरीला उत्तर अमेरीकेत आणले गेले आणि हळू-हळू जगभरात ती पसरली गेली. ह्या झाडाचे मुळ कॉफीसाठी वापरले जाते. मुळाचे छोटे तुकडे करुन, भाजून त्याची पूड केली जाते.

.

चिकोरीचे मुळ - *छायाचित्र आंतरजालावरून साभार

इंसटंट कॉफी

इंसटंट कॉफी ही पटकन विरघळणारी कॉफी असते. ह्यात कॉफीच्या भाजलेल्या बियांची पावडर करुन गरम पाण्यात घालून त्याचे एक्स्ट्रॅक्ट / अर्क काढले जाते आणि हे एक्स्ट्रॅक्ट स्प्रे ड्रायिंग किंवा फ्रीज ड्रायिंग पद्धतीने आटवले जाते.

फ्रीज ड्रायिंग मध्ये कॉफीचे मिश्रण -४० डिग्री सेल्शियस वर गोठवले जाते. गोठवलेल्या कणांना एका खास चेंबरमध्ये कमी तापमानात / दबावाखाली सुकवले जाते. शेवटी जी कॉफी तयार होते ती इंस्टंट कॉफी पॅकेट किंवा बरणीत सील बंद केली जाते.

स्प्रे ड्रायिंग मध्ये कॉफीचे मिश्रण गरम हवेच्या उंच टॉवरवर स्प्रे केले जाते जेणेकरून पाण्याचे थेंब खाली पडून त्याची पावडर तयार होते. ही पावडर टेक्सच्युराईज्ड करून कॉफी ग्रॅन्युअल्स तयार केले जातात.

.

*छायाचित्र आंतरजालावरून साभार

विविध प्रकारच्या कॉफी - आज जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी, कॅफेजमध्ये मिळणार्‍या कॉफीचे बरेच प्रकार प्रसिद्ध आहेत, सगळ्यांच्या आवडीचे ही आहेत, त्याबद्दल थोडक्यात माहिती.

एस्प्रेसो व्हेरिएश्नस :

कॅफे अमेरिकानो - या कॉफीमध्ये एस्प्रेसोचा सिंगल शॉट किंवा डबल शॉट गरम पाण्यात घालून मिक्स करतात.

कॅफे क्युबानो किंवा क्युबन कॉफी- ही कॉफी एस्प्रेसो मशीनमध्ये साखर व कॉफी घालून कॉफी ब्रु केली जाते.

कॅफे लाते - ही कॉफी सिंगल एस्प्रेसो शॉट व स्टीम्ड/फोम्ड मिल्क घालून बनवली जाते. ह्यात साखर ही घातली जाते.

एस्प्रेसो रोमानो - ही कॉफी एस्प्रेसो शॉट, लिंबाच्या फोडीसोबत सर्व्ह केली जाते. लिंबाची फोड कपाच्या कडेला चोळून ही कॉफी प्यायली जाते.

कॅपुचिनो - ही कॉफी एस्प्रेसो, गरम दूध व मिल्क फ्रॉथ सम प्रमाणात घेऊन बनवली जाते.

Caf au Lait - ही फ्रेंच कॉफी कॅफे लाते सारखीच बनवली जाते फक्त ह्यात एस्प्रेसोऐवजी ब्रुड कॉफी व स्टीम्ड मिल्कचा वापर केला जातो.

कॅफ मोका (Mochachino) - ही कॉफी कॅपुचीनो किंवा कॅफे लाते प्रमाणेच बनवली जाते फक्त यात चॉकलेट सिरप किंवा कोको पावडर वरुन घातले जाते.

कॅरेमल मकिआतो - ही कॉफी एस्प्रेसो, कॅरेमल, स्टिम्ड किंवा फ्रॉथ्ड मिल्क, व्हॅनिला एसेन्स एकत्र करुन बनवली जाते.

लाते मकिआतो - मकिआतो म्हणजे स्टेन्ड. ही कॉफी एस्प्रेसो व हलके फोम्ड मिल्क घालून बनवली जाते.

Galão - ही पोर्तुगीज कॉफी एस्प्रेसो व फोम्ड मिल्क घालून बनवली जाते.

ग्रीक फ्रॅप्पे - ही कॉफी कॉकटेल शेकर वापरुन बनवली जाते. ह्यात इंस्टंट कोफी, साखर, आणि थोडेच पाणी घालून ब्लेंड केले जाते. ही फेसाळलेली कॉफी मग उंच ग्लासमध्ये ओतून त्यावर थंड पाई किंवा बर्फ घालून सर्व्ह केली जाते.

Einspanner किंवा व्हियेन्ना कॉफी- ही कोफी एस्प्रेसो आणि व्हिप्ड क्रीम घालून त्यावर चॉकलेट, दालचिनी भुरभूरून सर्व्ह केली जाते.

Eiskaffee - ही कॉफी म्हणजे जर्मनीची आईसक्रिम कॉफी. ही कॉफी थंड दुध, कॉफी, व्हॅनिला आईसक्रिम, साखर आणि व्हिप्ड क्रिम घालून बनवली जाते.

लिक्युअर कॉफीबद्दल माहिती - ही कॉफी २५ मिली. लिक्युअर शॉट घालून ब्रु केली जाते. आवडीच्या कुठल्या ही लिक्युअरचा शॉट साखरेसोबत ग्लासमध्ये मिक्स केलं जातं, त्यावर ब्र्यूड कॉफी ओतली जाते व वरुन लाईटली व्हिप्ड क्रीम घालून सर्व्ह केली जाते. काही प्रसिद्ध कॉफी लिक्युअर आहेत जसे व्हिस्की असलेली आयरिश कॉफी, जिन असलेली इंग्लिश कॉफी, व्होडका असलेली रशियन कॉफी, मेक्सिकन लिक्युअर Kahlúa , ब्रँडी कॉफी .इ.

.

*छायाचित्र आंतरजालावरून साभार

टॉडी कॉफी किंबा कोल्ड ब्र्यूड कॉफी - टॉडी कॉफीची पद्धत म्हणजे ह्यात भरडसर वाटलेल्या कॉफीच्या बिया १२ तास किंवा जास्त, साध्या पाण्यात भिजवून ठेवल्या जातात. मग या भिजलेल्या भरडसर बिया गाळणी किंवा पेपर फिल्टरमधुन गाळून घेतल्या जाता. ही गाळलेली कॉफी मग पाणी, दुधाबरोबर मिक्स करुन किंवा बर्फ, चॉकलेटसोबत ब्लेंड करुन सर्व्ह केली जाते. कोल्ड ब्र्यूड प्रोसेसमुळे या कॉफीची चव गोडूस लागते.

कॉफी फ्रॉथर / फोमर:

लाते किंवा कॅपुचिनो बनवताना त्यावर स्टीम्ड दूधाच्या फेसाचा वापर केला जातो. या फेसाला फोम किंवा फ्रॉथ असे म्हटले जाते. लाते मध्ये सहसा मायक्रोफोम किंवा वेट फोमचा वापर केला जातो. ह्यात दूधाला स्टीम करुन मग त्यात एस्प्रेसो मशीनमधल्या स्टीम वाँडला दूधाच्या पिचरमध्ये सोडले जाते. असे केल्याने दूधात हवा जाऊन ते पसरू / स्ट्रेच होऊ लागते. हे करतेवेळी दूधाचे तापमान ६० ते ६५ डिग्री सेल्शियस दरम्यान हवे. एकदा हवा जाऊन दूध स्ट्रेच होऊ लागले की मिक्सिंगची प्रक्रिया सुरू होते. मिक्सिंगसाठी वाँडच्या टिप ला दुधात खोलवर सोडून फिरवले जाते, अशामुळे तयार झालेला फोमचा थर वर येऊ लागतो. हा फोम मुलायम असतो, त्यात हवेचे बुडबुडे अजिबात दिसत नाही. कपात एस्प्रेसो कॉफी किंवा कॉफी ग्रॅन्युअल्स + गरम पाणी मिक्स करुन ठेवावे. दूधाच्या पिचरला मग हलके टॅप / आपटून जागीच वर्तूळाकार फिरवले जाते. आता हे फोम्ड दूध कॉफीच्या कपात थोड्या वरुन ओतले जाते, लाते ही पॅटर्न-बेस्ड कॉफी आहे, हवी तशी डिझाईन तुम्ही ह्या फोम्ड दूधाने ओतताना काढू शकता.

अलिकडे घरच्या घरी फोम्ड / फ्रॉथ्ड कॉफी तयार करण्यासाठी कॉफी फ्रॉथर मिळतं किंवा मेसन जारचा (बरणी) वापर करुन मायक्रोवेव्हमध्ये ही फ्रॉथ्ड मिल्क तयार करता येतं. खाली कॉफी फ्रॉथर वापरुन घरच्या घरी तयार केलेल्या कॅपुचिनोचा फोटो देतेय.

* कॉफी फ्रॉथर

.

.

.

.

कॉफीचे अतिरिक्त सेवन व त्याचे दुष्परिणाम -

कॉफीचे अतिरिक्त सेवन केल्यामुळे, त्यातील कॅफेनमुळे आरोग्यावर दुष्परिणाम होतात. कॉफीच्या अतीसेवनाने शरीरातील लोहाचे प्रमाण कमी होऊन एखाद्या व्यक्तिला अॅनेमिया होऊ शकतो तसेच कॅफेनमुळे अँक्झायटी डिसऑर्डर, क्लिनिकल डिप्रेशन, डोकेदुखी, ऑडीट्री हॅल्युसिनेशन्स असे त्रास होतात. एखाद्या व्यक्तिला मायग्रेन असेल तर कॉफी कॅफेनमुळे तो अॅग्रव्हेट होऊ शकतो. ब्ल्डप्रेशर ही वाढू शकतं. कॅफेन वुईथड्रॉअलमुळे थकवा, मुड-स्विंग्स असे जाणवत. अती सेवनाने दांतावर ही डाग पडतात, शरीरातले पाण्याचे प्रमाण कमी होऊन डीहायड्रेशन होऊ शकतं. ह्यावर उपाय म्हणजे एकतर कॉफीचे सेवन कमी प्रमाणात करावे किंवा हल्ली डिकॅफ कॉफी मिळते ती घ्यावी.

डिकॅफिनेटेड कॉफी- डिकॅफेनेटेड कॉफी बनवण्याच्या चार पायर्‍या आहेत. माहिती विकि:

वॉटर मेथड - ज्यात कॉफीच्या बिया पाण्यत भिजवून ठेवल्या जाता.
ethyl acetate मेथड - ज्यात कॉफीच्या बिया ethyl acetate सोल्युशन आणि पाणाच्या मिश्रणात भिजवल्या जातात.
carbon dioxide मेथड - ज्यात लिक्विड किंवा सुपरक्रिटिकल carbon dioxide उच्च दबावाखाली बियांवर लावले जाते.
dichloromethane मेथड - ज्यात dichloromethane कॅफेन विरघळण्यासाठी वापरले जाते.

कॉफीचा पाककृतीत झालेला वापर:

कॉफीचा वापर नुसता पेयपान म्हणून न होता अनेक खाद्यपदार्थांमध्ये ही होतो, कोल्ड कॉफी, केक्स, चीझकेक्स, पुडिंग, सॉस, आईसक्रिम, बिस्किट्स, आयसिंग, तिरामिसू, मुस, पाय, चॉकलेट्स, कॉफी ब्राऊनीज, कॉफी टेरीन इत्यादी.

कॉफीबद्दल इतकी माहिती दिलीच आहे तर कॉफी-मेकर वापरुन २-३ झटपट पाककृती ही आता देतेच :)

१. मद्रास फिल्टर कापी

साहित्यः

कॉफी फिल्टर
कॉफी पावडर
साखर
दूध

.

पाककृती:

सर्वात आधी पाणी गरम करायला ठेवावे.
कॉफी फिल्टरच्या तळाशी जाळी असलेल्या डब्यात २-३ चमचे कॉफी पावडर दाबून भरावी.

.

आता वरून हँडल असलेली जाळी लावावी.
त्यात उकळलेले पाणी घालून झाकण लावून १५ मिनिटे थांबावे.
कॉफी ड्रिप होऊन खालच्या कपमध्ये भरेल.

.

आता दूध गरम करायला ठेवावे.
पारंपारिकरित्या टम्बलरमध्ये गरम दूध + साखर मिक्स करुन घेतात, त्यात हे डिकॉक्शन घालून ड्बड्यात / डवारा ओतून पुन्हा टम्बलरमध्ये ओतली जाते. असे केल्याने कॉफी वर छान फेस तयार होतो.

.

ही तयार आहे मद्रास कापी / कॉफी.

.

२. अफोगातो - इटालियन डेझर्ट

इटलीत तिरामिसूनंतर अतिशय आवडलेला प्रकार म्हणजे अफोगातो. इटालियन भाषेत अफोगातो म्हणजे बुडणे. ही पाककृती बनवण्यास अतिशय सोपी आहे. एकदा तुमची एस्प्रेसो कॉफी / शॉट तयार असेल की ही डेझर्ट पाकृ तुम्ही काही मिनिटात बनवू शकता, चला तर मग पाककृती बघुया.

साहित्य एस्प्रेसो कॉफीसाठी:

मोका पॉट
कॉफी पावडर
पाणी

.

पाकृ:

बॉयलर म्हण्जे पॉटच्या तळाचा भाग त्यात वॉल्वच्या खाली पाणी घालायचे. त्यावर फनेल सारखे मेटलचे फिल्टर असते ज्यात दळलेली कॉफी हलकी दाबून भरायची. मग पॉटचा वरचा भाग ज्याच्या तळाशी अजून एक फिल्टर असते ते व छोटे गास्केट लावून घट्ट फिरवून घ्यायचे.

.

हा पॉट गॅसवर मध्यम आचेवर ठेवायची. जेव्हा पाण्याला उकळी येते तेव्हा आत वाफेच्या दबावाने कॉफी पॉटच्या वरच्या भागात उतू लागते.

.

ही झाली तुमची एस्प्रेसो कॉफी तयार. आपण बनवणार आहोत अफोगातो, त्यासाठी सर्व्हिंग बाऊल किंवा ग्लासमध्ये व्हॅनिला आईसक्रीम किंवा जिलेटोचे स्कूप्स काढून तयार ठेवा. त्यावर ही तयार केलेली कॉफी हवे तेवढी ओता, आईसक्रीम कॉफीत बुडाले म्हणजे अफोगातो तयार.

.

कुकीसोबत सर्व्ह करा. काही ठिकाणी ह्यात Amaretto चा शॉट व वरुन थोडे किसलेले चॉकलेट ही घालतात.

.

३. ग्रीक कॉफी

साहित्यः

ग्रीक ब्रीक्की / Cezve पॉट
कॉफी पावडर

पाकृ:

ब्रीक्कीत १५० मिली. पाणी भरुन घ्यायचे.
त्यात चवीप्रमाणे साखर व ३-४ टेस्पून कॉफी पावडर घालायची.
चांगले मिक्स करुन घ्यायचे. एकदा का भांडे गॅसवर ठेवले की मिक्स करायचे नाही.

.

भांडे गॅसवर मध्यम आचेवर ठेवावे. कॉफीला उकळी येण्यापूर्वी त्यावर हलका फेस येईल, गॅस बारीक करुन ठेवावा.
पुन्हा फेस वर येऊ लागेल तेव्हा गॅस बंद करावा. ह्या फेसाला ग्रीक भाषेत "काईमाहकी" असे म्हणतात.

.

ही कॉफी अजिबात गाळायची नाही.
ग्रीक लोकं ही कॉफी पाण्याचा ग्लास, एखाद्या कुकी किंवा केकसोबत सर्व्ह करतात.

.

.

तर अशी ही कॉफीची गाथा, कॉफी ही जगातली दुसरी बहुमूल्य वस्तु आहे जी जगभरात निर्यात केली जाते. ब्र्युड कॉफी असो, इंस्टंट असो, आईस्ड कॉफी असो किंवा एखाद्या खाद्यपदार्थात कॉफीचा वापर असो कॉफी-प्रेमींना तिचा लुफ्त घायला नेहमीच आवडतं. कॉफीबद्दल बरीच माहिती एकत्रित करुन ह्या लेखात देण्याचा हा छोटासा प्रयत्न केलाय. आशा आहे तुम्हाला ही ह्या कॉफीचा / लेखाचा आस्वाद घ्यायला नक्की आवडेल कारण एनी टाईम इज कॉफी टाईम :)

प्रतिक्रिया

लेख पूर्ण वाचला नाही. सवडीने वाचतो पण कॉफीबद्दल इतकी सगळी माहीती बघुन नक्कीच तरतरी आली :-)

बादवे - मार्केटींग मॅनेजमेंट शिकताना नेसकॅफे नी भारतात कसा शिरकाव केला व बाजारपेठ कशी काबीज केली याची केस स्टडी आठवली.

जिन्गल बेल's picture

16 Oct 2015 - 1:01 pm | जिन्गल बेल

खूप माहिती पूर्ण लेख ...सानिका Hatts off ....खूप मेहनतीने लिहिला आहेस....
तुझं आणि अजयाताइचं अभिनंदन आणि मनापासून आभार...:)

वैदेहिश्री's picture

16 Oct 2015 - 5:07 pm | वैदेहिश्री

कौतुक करावस वाटत तुमच. किती सुंदर सादरिकरण केल आहे. कलेक्शन पण खुप छान आहे.

पिशी अबोली's picture

16 Oct 2015 - 7:31 pm | पिशी अबोली

बापरे. केवढी मेहनत केलीस गं.. आता मस्त कॉफी करून परत एकदा वाचत पितेच.
बाकी शीर्षकामुळे एक 'दिल की धडकन' आठवली.. ;-)

प्रीत-मोहर's picture

16 Oct 2015 - 11:11 pm | प्रीत-मोहर

हा हा !! मी नागपूर ट्रीप करायची म्हणते येतेस का? का डायरेक मुंबय या?

सान लेख मस्तच आहे. माहितीपूर्ण एकदम

आदूबाळ's picture

18 Oct 2015 - 3:26 am | आदूबाळ

मस्तच.

डच आणि जावा कॉफीच्या संदर्भात फेअरट्रेड कॉफीचाही उल्लेख हवा होता.

आणि त्यावरून सुमात्रातली ही सर्वात महाग आणि सर्वात भयंकर कॉफीही आठवली ;)

https://en.m.wikipedia.org/wiki/Kopi_Luwak

पैसा's picture

18 Oct 2015 - 9:52 pm | पैसा

किती डिटेलमधे लिहिलंस! खूपच मेहनत घेऊन लिहिलंय! फोटोंबद्दल तर क्या कहने!!

अप्रतिम लेख.तुझे घर काॅफीने दरवळले असेल हे सर्व करुन बघताना! अफाट मेहनत घेतलीये लेखासाठी.तसाच उतरलाय लेख.सलाम!

जॅक डनियल्स's picture

19 Oct 2015 - 7:55 am | जॅक डनियल्स

खूप सुंदर लेख लिहिला आहे. लेखाच्या शेवटी मस्त माहिती दिली आहे. आता ग्रीक कॉफी चे भांड ओर्डेर नक्की करणार. तुम्ही कॉफी बिया आणून घरी दळता का ?
मी स्वतः सायफन कॉफी चा खूप मोठा चाहता आहे. "ब्रेकिंग ब्याड" (टीव्ही सिझन) मध्ये सायफन कॉफी मशीन दाखवले आहे, तसे पुढे घरी बनवायचा विचार आहे. कॉफीचे बृ तापमान खूप महत्वाचे असते.त्यात थोडा जरी बदल झाला तरी चव आणि वास बदलतो. या सायफन मध्ये कॉफी बरोबर १०० से. ला बृ होते.
खाली त्या मशीन चा फोटो देत आहे.

कॉफी मशीन

आदूबाळ's picture

19 Oct 2015 - 3:22 pm | आदूबाळ

सोप्पं आहे तसं बनवायला ;)

जॅक डनियल्स's picture

19 Oct 2015 - 11:44 pm | जॅक डनियल्स

ते चित्रात दाखवले आहे तसे बनवायला गेले तर अवघड आहे. ते उगाचच टीव्ही वर दाखवण्यासाठी क्लिष्ट बनवले आहे. जर फक्त ती कन्सेप्ट वापरली आणि प्रयोगशाळेतली काचपात्र वापरली तर (माझ्यासाठी) सोपे आहे. महत्वाचे म्हणजे पाणी कमी तापमानाला उकळले गेले पाहिजे त्यासाठी प्रेशर कमी करता आले म्हणजे झाले.

फार सुरेख लेख… आणि सानिका तुझं निरनिराळ्या किचन वेअरचं कलेक्शन बघून फार जळजळ झाली बघ . काय काय सुंदर सुंदर जमवलं आहेस गं !

अतिशय सुरेख लेख - मस्त झाला आहे हा अंक!

अभ्यासपुर्ण रोचक लेख.भरपुर मेहनत घेउन लिहिला आहेस.कॉफीचा इतिहास,प्रकार,रोस्टींग ,रेसिपीज दुश्ष्परीणाम,फोटॉ सगळच उत्कृष्ट मांडल आहेस.
आणि सगळी भांडी सुरेखच.

हाहा's picture

19 Oct 2015 - 3:31 pm | हाहा

खुप नवीन माहिती समजली.
कॉफी पॉट्स चं कलेक्षन पण मस्त आहे.

हा लेख म्हणजे कॉफीचा 'संपूर्ण इतिहास भूगोल नागरीकशास्त्र विथ सामान्यज्ञान' आहे.

हा लेख मुख्य बोर्डावर हवा.

मांत्रिक's picture

20 Oct 2015 - 6:26 pm | मांत्रिक

सहमत! अगदी बारकाईने व मेहनतीने हा धागा लिहिण्यास परिश्रम घेतलेले जाणवतात.
अवांतर कर्नाटकमधे बाबा बुदान टेकड्या आहेत त्यांची माहिती कुणास आहे का?

स्वाती दिनेश's picture

19 Oct 2015 - 11:17 pm | स्वाती दिनेश

काफे अतिशय आवडती असल्याने चवीचवीने लेख वाचला. झक्कास!
स्वाती

अप्रतिम !अभ्यासपूर्ण आणि जीव ओतून केलाएस हां लेख, कॉफीची महती खुप आवडली :):)

दमामि's picture

20 Oct 2015 - 7:29 am | दमामि

क्या बात!!!

विशाखा पाटील's picture

20 Oct 2015 - 2:15 pm | विशाखा पाटील

माहितीपूर्ण लेख... शेवटचे सानिकास्टाईल फोटो नेहेमीप्रमाणे अप्रतिम!

केवढी मेहनत घेतलीयस..खुप छान..

सुरख लेख आहे सानि. कॉफीची एवढी आवड नाही पण कॉफी म्हटले की मला सगळ्यात आधी आठवते ती आपली मद्रास फिल्टर कापी. अप्रतिम चव.
मला इथिओपिअन jebena, Cezve, Dallah, केमेक्स कॉफी मेकर हि ४ हि भांडी पाहिजेत. कसली गोड आहेत ती भांडी.

हा एवढा सुंदर लेख लिहून आम्हा काॅफीप्रेमींची जिज्ञासा पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद!रच्याकने जर्मन आणि इजिप्शियन काॅफीमध्येही चिकोरी असते ना?

पद्मावति's picture

24 Oct 2015 - 8:34 pm | पद्मावति

अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण लेख सानिका. शेवटच्या तीन कॉफीच्या रेसेपी तर केवळ अप्रतिम, खास सानिका टच.

मधुरा देशपांडे's picture

25 Oct 2015 - 2:29 am | मधुरा देशपांडे

सर्वप्रथम इतक्या अभ्यासपुर्ण माहितीने ओतप्रोत भरकेल्या आणि सोप्या भाषेतील लेखासाठी अनेक अनेक धन्यवाद. ही अशी सगळी एकत्रित माहिती तिही मराठीतुन हे खूप उपयुक्त आहे. हा लेख मोठा असल्याने सगळ्यात शेवटी वाचाय्ला ठेवला होता. तुझे कॉफी संबंधित सगळे कलेक्शन तर लईच भारी. यावेच लागणार तुझ्याकडे, पदार्थांच्या यादीत आता कॉफीची भर. ;) लिक्युअ र कॉफीचा बेलीज कॉफी हा मला आवडलेला प्रकार. साऊथ स्टाईल कापी आवडतेच, इकडे येऊन इतरही प्रकार ट्राय केले, त्यात जर्मन लोकांएवढी कडु पिणे शक्य नही पण बरेचसे प्रकार आवडलेही. ईटालियन कॉफी मशिन्स सर्वात जास्त आवडलीत आज्वर.
लेख फार छान झालाय.

पिलीयन रायडर's picture

26 Oct 2015 - 3:19 pm | पिलीयन रायडर

अगं तुझ्याकडे भांड्यांच काय कलेक्शन आहे!!!! एक नंबर!

अभ्यासपुर्ण लेख कसा असावा ह्याचा वस्तुपाठच आहे हा लेख!!

तुझ्याकडची भांडी पाहून जळजळ होते. लेख अत्त्युत्तम झालाय... अगदी अभ्यासपूर्ण!

कॉफीवरील लेख माहितीपूर्ण झालाय. माझ्याकडील कॉफीपावडर संपवण्याचा उद्योग लगेच चालू केलाय. तुझ्याकडील भांडी व कॉफी बनवण्याच्या पद्धती आवडल्या.

कविता१९७८'s picture

29 Oct 2015 - 5:08 pm | कविता१९७८

मस्त लेख गं साने, मला फिल्टर कॉफी आवडते.

अजो's picture

7 Nov 2015 - 4:26 am | अजो

माहिती पूर्ण लेख

नितीनचंद्र's picture

17 Nov 2015 - 10:42 am | नितीनचंद्र

लहानपणी मला आणि बहिणीला कॉफी दिली जायची. चहा पिणे वाईट अस समजुन ही प्रथा होती. ही कॉफी पुर्ण दुधात कॉफीचा चमचा ( म्हणजे साधारण फोडणीचे पदार्थ घालताना वापरला जातो त्या आकाराचा ) इतकीच कॉफी त्यात असायची. त्यामुळे ती कॉफी फिक्की असायची.

लग्न झाल्यावर प्रथम बायकोच्या माहेरी बळ्ळारीला ( कर्नाटकात ) गेल्यावर फिल्टर कॉफीचा स्वाद समजला आणि मी चहा इतकाच कॉफी बाज झालो.

कॉफी वर्णनात एक गोष्ट राहिलीच. कदाचित किळसवाणी म्हणुन टाळली आहे की काय ? हत्ती कॉफीच्या बेरीजचे सेवन केल्यानंतर त्यांच्या विष्ठेत ज्या बिया सापडतात त्या ( स्वच्छ करुन ) जी कॉफी बनवतात ती सर्वात महाग ( पाच हजार डॉल्रर्स /किलो ) असते असे डिस्कव्हरी वर पाहिल्याचे स्मरते.

जळो ती कॉफी.....