नाथांच्या रुक्मिणी स्वयंवरातील रुखवत

पैसा's picture
पैसा in रूची विशेषांक
15 Oct 2015 - 5:12 pm

एकनाथांच्या रुक्मिणी स्वयंवराची पोथी बर्‍याच वर्षांपूर्वी एका मुलीच्या हातात पाहिली होती. तिला विचारले की ही पोथी तुला कशी वाटली? तर ती म्हणाली की "ही पोथी वाचल्यामुळे लवकर लग्न जमते असं म्हणतात." हे ऐकून मग मी बरीच वर्षे त्या पुस्तकाच्या वाटेला गेले नाही. मला वाटले की काहीतरी लिहिले असेल. पण एकीकडे एकनाथ असे काहीतरी अमूक केल्याने ढमूक होईल वगैरे लिहितील असे वाटत नव्हतेच. नंतर कुठेतरी त्यातल्या जेवणावळीतल्या पदार्थांबद्दल ऐकले. मग धीर करून पुस्तक आणले आणि वाचले. ती झपाटल्यासारखी वाचतच गेले.

शके १४९३ (इ.स.१५७१) रामनवमीच्या दिवशी रुक्मिणी स्वयंवर आख्यान हा ग्रंथ सिद्ध झाला. एकनाथांची रसाळ वाणी आणि प्रसंग कृष्ण रुक्मिणी विवाहाचा. त्याकाळचे सगळे वैभव तिथे उभे ठाकले होते. सुरुवातीला भीमकाचा कृष्णाला रुक्मिणी देण्याचा निर्णय नंतर रुक्मीने त्याला विरोध करणे त्यानंतर रुक्मिणीची तगमग आणि मग तिने कृष्णाला तळमळून पाठवलेली सुरेख पत्रिका. रुक्मिणीच्या पत्रिकेचा रसाळ सुरेख भावानुवाद नाथांनी केला आहे. नंतर कृष्णाने वायुवेगाने कौंडिण्यपुराला जाणे, तिथले रोमहर्षक रुक्मिणीहरण, युद्ध आणि नंतर कृष्ण रुक्मिणीचा विवाह सोहळा या सगळ्याचे अतिशय मनोज्ञ वर्णन नाथांनी केले आहे.

अनेक ठिकाणी या सगळ्याचे अध्यात्मपर विवेचनही आहे. मात्र मी आता त्याचा अर्थ लावत नाहीये, मात्र कोणाचेही त्या काळचा म्हणजे सोळाव्या शतकातला वैभवशाली विवाह सोहळा कसा असेल याचे कुतुहल मात्र रुक्मिणी स्वयंवर वाचल्यावर नक्की शमेल!

लग्नसमारंभाच्या वर्णात सुरुवातीलाच सगळे देव वर्‍हाडी म्हणून कसे गडबडीने आले त्याचे गंमतीदार वर्णन यात आहे. त्यानंतर सीमांतपूजन वगैरे. आणि त्यानंतर रुखवताचे जेवण! काय सांगू त्याचे वर्णन!

साक्षात त्रिगुणाची अडणी मांडून त्यावर ताट ठेवली आहेत आणि नऊजणी (नवविधा भक्ति) वाढत आहेत. भाज्यांचे किती प्रकार होते?

एकें पचली गोडपणें । एकें सप्रेम सलवणें । एकें नुसतीं अलवणें । बरवेपणें मिरविती ॥ ५ ॥
एके सबाह्य आंबटें । एकें अर्धकाची तुरटें । एके बहुबीजें कडवटें । एकं तिखटें तोंडाळें ॥ ६ ॥
एकें हिरवीं करकरितें । एकें परिपक्वें निश्चितें । एके जारसे कचकचित्तें । एकं स्नेहदेठिंहूनी सुटलीं ॥ ७ ॥
वाळल्या आनुतापकाचरिया । वैराग्यतळणें अरुवारिया ॥ राजसा वाढिला कोशिंबिरिया । नाना कुसरी राइतीं

खणलेल्या, खुडलेल्या, तोडलेल्या, सोललेल्या, त्रिगुणांनी परिपूर्ण भाज्या. त्याला फोडण्या घातल्या आहेत. एक भाजी गोड, एक मीठ घातलेली खारट, एक नुसतीच अळणी, एक आंबट, एक तुरट, एक कडवट, एक तिखट, एक करकरीत हिरवी (कच्ची), एक पिकलेली (पक्व), एक जरा कचकच लागणारी, एक देठासहित. अशा षड्रसांच्या भाज्या. वाळवलेल्या काचर्‍या, तळणीत हळुवार तळल्या आहेत. नाना तर्‍हेच्या कोशिंबिरी आणि रायती वाढली आहेत.

काही एवढ्या तिखट की नाकातोंडातून धूर निघेल!

एकें वाळोनि कोरडीं । तोंडीं घालिता कुडकुडी । त्यांची अनारिसी गोडी । बहु परवडी स्वादाची ॥ ११० ॥
वळवटाची नवलपरी । एकें पोपळें अभ्यंतरीं । एकें वर्तुळें साजिरीं । सुमनाकारीं पैं एक ॥ ११ ॥
परवडी दावी यादवराया । सूक्ष्म सेवेच्या शेवया । मोडों नेदि सगळिया । अतिसोज्वळिया सतारा ॥ १२ ॥
शेवया वळिल्या अतिकुसरी । असार केवळ सांडिलें दूरी । घोळिल्या क्षीरसाखरीं । चवी जेवणारीं जाणिजे ॥ १३ ॥

एक प्रकार इतका कडक की तोंडात घातला की कुडकुड करतो. त्यासोबत् अनारसे आहेत. वळवट, गव्हले (शेवयांसारखा एक प्रकार) आहेत. त्या नाना परीच्या. आतून पोकळ, गोल, फुलासारख्या आकाराच्या, शिवाय लांब बारीक शेवया आहेत. त्या न मोडता केल्या आहेत. आणि दूध साखर घालून चविष्ट बनवल्या आहेत.

अत्यंत लाडें वळिले लाडु । विवेकतिळवियाचे जोडु । सुरस रसें रसाळ गोडू । चवीनिवाडु हरि जाणे ॥ १४ ॥
पापड भाजिले वैराग्यआगीं । तेणें ते फुगले सर्वांगी । म्हणोनिया ठेविले मागिले भागीं । नखें सवेगीं पीठ होती ॥ १५ ॥
उकलतां नुकलती । आंतल्या आंत गुंडाळती । तापल्या तेलें तळिजेती । कुडी आइती कुरवडिया ॥ १६ ॥
भीमकी प्रिय व्हावी श्रीपती । सांडया न करीच शुद्धमती । जाणे वृद्धाचाररीती । परम प्रीति बोहरांची ॥ १७ ॥

अगदी लाडाने, नाजूक हाताने वळलेले तिळाचे लाडू आहेत! पापड भाजले आहेत. ते छान फुलले आहेत. तळलेल्या कुरड्या आहेत.


त्रिगुण त्रिकुटीं पचलीं पाहीं । भोकरें खारलीं ठायींच्या ठायीं । कृष्णरंगे रंगलीं पाहीं । आलें ठायीं ठेविलें ॥ १८ ॥
पुर्ण परिपूर्ण पुरिया ॥ सबाह्य गोड गुळवरिया । क्षीरसागरींच्या क्षीरधारिया । इडुरिया सुकुमारा ॥ १९ ॥
सफेद फेणिया पदरोपदरीं । शुद्ध शर्कारा भरली भरी । अमृतफळें ठेविली वरी । अभेद घारी वाढिल्या ॥ १२० ॥

खारात घातलेली भोकरें आहेत. गोल पुर्‍या आहेत, गुरोळ्या (तांदूळ, रवा आणि साखर मिसळून केलेल्या पुर्‍या) आहेत. क्षीरधारी दुधळ्या (नाचणीच्या सत्वाच्या मुलायम वड्या) आहेत. आणि नाजूक इडल्या पण आहेत! पांढर्‍या शुभ्र फेण्या आहेत. मात्र या आता आपण करतो त्या तांदुळाच्या फेण्या वाटत नाहीत, तर फेणोर्‍या हा कोंकणी पदार्थ वाटतो आहे. कारण पांढर्‍या शुभ्र, पदर सुटलेल्या आणि साखर घातलेल्या हे वर्णन त्याला व्यवस्थित लागू पडते. अमृतफळे म्हणजे एकतर मोरावळा असेल किंवा नावाने याच्या जवळ जाणारा एक पदार्थ अमृत रस्सा (चक्का, खवा, धणे, कांदा लसूण यांच्या रश्श्यात कोफ्ते सोडलेले) रुचिरामधे आहे तो असू शकेल. घार्‍या (गोड पुर्‍या) ही आहेत.

नुसधी गोडियेची घडली । तैसी खांडवी वाढिली । गगनगर्भीची काढिली । घडी मांडिली मांडियाची ॥ १२१ ॥
स्नेहदेठींहुनि सुटलीं । अत्यंत परिपाकें उतटलीं । वनिताहातींहून निष्टलीं । फळें घातिलीं शिखरिणी ॥ २२ ॥/em>

खांडवी आहे, मांडे आहेत, फळे घातलेली शिखरिणी आहे. शिखरिणी म्हणजे श्रीखंड असा उल्लेख सापडतो, पण ही शिकरण ही असू शकेल.

अत्यंत सूक्षं आणियाळें । तांदुळा वेळिलें सोज्वळें । सोहंभावाचें ओगराळें । भावबळें भरियेलें ॥ २३ ॥
खालीं न पडतां शीत । न माखतां वृत्तीचा हात । ओगराळां भरिला भात । न फुटत वाढिला ॥ २४ ॥
अन्नावरिष्ठ वरान्न । विवेकें कोंडा काढिला कांडोन । अवघ्यावरी वाढिले जण । वरी वरान्न स्वादिष्ट ॥ २५ ॥

ओगराळे भरून बारीक तांदुळाच्या भाताची मूद वाढली आहे.


लेह्य पेय चोष्य खाद्य । भक्ष्यभोज्य जी प्रसिद्ध । षड्रसांचे हे स्वाद । केले विविध उपचार ॥ २६ ॥
जिव्हा चाटून जें घेइजे । लेह्य त्या नांव म्हणिजे । घटघटोनि प्राशन कीजे । पेय बोलिजे तयासी ॥ २७ ॥
रस चोखून घेइजे । बाकस थुंकोनि सांडिजे । चोष्य त्या नाव बोलिजे । खूण जाणिजे रसाची॥ २८ ॥
अग्नि उदक लवणेंविण । जें खावया योग्य जाण। खाद्य म्हणती विचक्षण । केलें लक्षण सूपशास्त्रीं ॥ २९ ॥
क्षीरभात या नांव अन्न । भोज्य यातें म्हणती जाण । रोटी पोळी आणी पक्वान्न । भक्ष्य जाण यां नांव ॥ १३० ॥

जेवणातले षड्र्स कोणते आणि त्यांना खाण्याच्या प्रकारावरून कशी नावे दिली आहेत ते लिहून ठेवले आहे.

यानंतर कृष्णरुक्मिणी विवाह प्रसंग, रुक्मिणी कशी सौंदर्याची खाण दिसत होती, काय ल्यायली होती त्याचे सुरेख वर्णन, दागिने आणि कपडे यांचे वर्णन

नेसली क्षीरोदक पाटोळा| त्यावरी रत्नांची मेखळा||सुनीळ कांचोळी वेल्हाळा|लेईली माळा मोतिलग||

यानंतर तेलवणाचे वर्णन आहे त्यात पुन्हा तर्‍हेतर्‍हेच्या लाडूंचे वर्णन आहे.

कसलेकसले लाडू होते?

शेवया, तीळ, चारोळ्या, खसखस, कमळबीज, फणसाच्या आठ्या, बोरांच्या बियाचा आतला भाग, यांचे लाडू, कडाकण्या, कानवले असे नाना तर्‍हेचे तेलवण शुद्धमतीने आणलेले.

साक्षात अष्टसिद्धी नाचत होत्या. विडे वाटले जात होते. असा अवघा आनंदीआनंद!

मग वरात, मधुपर्क, हळद, आंबा शिंपणे, धेंडा नाचवणे अशा खूप विधींचे वर्णन करत रुक्मिणी स्वयंवराख्यान संपूर्ण होते. हे सगळे विधी नाथांच्या काळात केले जात होते हे नक्की! यातल्या रुखवताच्या जेवणावळीतले पदार्थ आणि आणि इतर वर्णन वाचून सोळाव्या शतकातल्या संपन्न लोकांच्या लग्नातील विधी आणि जेवणाच्या मुख्य पदार्थांची नीट कल्पना येते. हे पुस्तक मुळातून जरूर वाचा. अगदी सरल सोपी भाषा आहे. बर्‍याच गोष्टींचा अर्थ संदर्भाने तरी लागतो. शेवट भागवतातील मूळ संस्कृत रुक्मिणी पत्रिका इथे देते आहे. हे जगातलं पहिलं प्रेमपत्र असावं!

श्रुत्वा गुणान् भुवनसुंदर शृण्वतां ते निर्विश्य कर्णविवरैः हरतोऽङ्ग तापम् ।
रूपं दृशां दृशिमतां अखिलार्थलाभं त्वय्यच्युताविशति चित्तमपत्रपम् मे ॥१॥

का त्वा मुकुन्द महतीकुलशीलरूप विद्यावयोद्रविणधामभिरात्मतुल्यम् ।
धीरा पतिं कुलवती न वृणीत कन्या काले नृसिंह नरलोकमनोभिरामम् ॥२॥

तन्मे भवान् खलु वृतः पतिरङ्ग जायामात्मार्पितश्च भवतोऽत्र विभो विधेहि।
मा वीरभागमभिमर्शतु चैद्य आरात् गोमायुवन्मृगपतेः बलिमम्बुजाक्ष ॥३॥

पूर्तेष्टदत्तनियमव्रतदेवविप्र गुर्वर्चनादिभिरलं भगवान् परेशः
आराधितो यदि गदाग्रज एत्य पाणिं गृह्णातु मे न दमघोषसुतादयोन्ये ॥४॥

श्वोभाविनि त्वमजितोद्वहने विदर्भान्गुप्तस्समेत्य पृतनापतिभिः परीतः।
निर्मथ्य चैद्यमगधेन्द्रबलं प्रसह्य मां राक्षसेन विधिनोद्वह वीर्यशुल्काम् ॥५॥

अन्तः पुरान्तरचरीमनिहत्यबन्धून् त्वामुद्वहे कथमिति प्रवदाम्युपायम्।
पूर्वेद्युरस्ति महती कुलदेवियात्रा यस्यां बहिर्नववधूर्गिरिजामुपेयात् ॥६॥

यस्याङ्घ्रिपङ्कजरजः स्नपनं महान्तो वाञ्छन्त्युमापतिरिव आत्मतमोपहत्यै।
यर्ह्यम्बुजाक्ष न लभेय भवत्प्रसादं जह्यामसून् व्रतकृशान् शतजन्मभिः स्यात् ॥७॥

थोडक्यात भावार्थः

हे भुवनसुंदरा, जेव्हापासून मी तुझे गुण ऐकले आहेत, तेव्हापासून मी तुझ्या प्रेमात पडले आहे. आणि तुला समर्पित झाले आहे. तू माझे हरण करून घेऊन जा. तुझ्यासारख्या सिंहाचा भाग शिशुपालरूपी कोल्हा नेतो आहे असे कदापि होऊ नये.

साधना, संस्कार, प्रीती, भक्ती इत्यादि धन घेऊन मी येईन. मी सतत तुझी पूजा करून काही पुण्यकृत्ये केली आहेत, आणि मनाने तुला वरले आहे. आता प्रत्यक्षात माझा स्वीकार कर.

अंबेच्या देवळात मी गौरीपूजेसाठी जाईन, तेव्हा तू माझे मंदिरातून हरण कर. आणि पराक्रमाने शिशुपालादिकांना हरवून राक्षसविधीने माझे पाणिग्रहण कर.

तू आला नाहीस तर मी समजेन की माझ्या साधनेत काही कमतरता राहिली असेल. तू मला या जन्मी लाभला नाहीस तर मी प्राणत्याग करीन, पण जन्मोजन्मी तुझी वाट पाहीन, आणि अंती तुझीच होईन!!

----श्रीकृष्णार्पणमस्तु-----

प्रतिक्रिया

प्रीत-मोहर's picture

16 Oct 2015 - 9:23 am | प्रीत-मोहर

आई आई ग. रुच आली तोंडाला . चला थोडे श्रीखंड चाखुन येते. तर जरा बर वाटेल

दमामि's picture

16 Oct 2015 - 9:31 am | दमामि

वा!

अनन्न्या's picture

16 Oct 2015 - 9:38 am | अनन्न्या

पैसाताई, सगळे पदार्थ डोळ्यासमोर आले. रुक्मिणी स्वयंवर वाचलेच नाहीय, तुझ्यामुळे हे वर्णन कळले.

आता कुणीतरी हाच मेनू करून जेवायला वाढा बरं :)

जबरदस्त आहे नाथांनी मांडलेलं रूखवत.

पदम's picture

16 Oct 2015 - 12:02 pm | पदम

मस्तच. पदार्थांचे वर्णन वाचुन भुक लागली.

केवढी ही विविधता वर्णन केली आहे मराठी पदार्थांत. या पोथीचं एका वेगळ्याच कोनातून दर्शन घडलं. जो कोन माहिती आहे तो पहिल्या दोन वाक्यात आला आहे. लेखन आवडलं.

स्वाती दिनेश's picture

16 Oct 2015 - 1:36 pm | स्वाती दिनेश

पोथ्यांमध्ये असंही काही असेल ह्याची कल्पना केली नव्हती.
नाथांच्या रसाळ लेखणीतून उतरलेले हे रुखवत आवडले.
स्वाती

रुख्मिणी स्वयंवरातील रुखवताचे जेवण आवडले. कशाचीही कमतरता ठेवली नाही. शिवाय जगातील पहिले प्रेमपत्र गोड आहे.

छान लिहीलं आहेस पैसा ताई...अबबब...केवढे पदार्थ....वाचूनच पोट भरलं..

मधुरा देशपांडे's picture

16 Oct 2015 - 6:19 pm | मधुरा देशपांडे

वेगळ्या विषयावरचा सुरेख लेख.

टक्कू's picture

16 Oct 2015 - 7:27 pm | टक्कू

नाविन्यपूर्ण माहिती.

सानिकास्वप्निल's picture

16 Oct 2015 - 7:51 pm | सानिकास्वप्निल

पैताई किती सुरेख लिहिले आहे, खूप आवडले.
नाथांच्या रुक्मिणी स्वयंवरातील रुखवत अप्रतिम आहे!!

पद्मावति's picture

16 Oct 2015 - 8:55 pm | पद्मावति

किती रसाळ, सुरेख वर्णन. अप्रतिम आहे.
मस्तं, मस्तं पदार्थ.

कविता१९७८'s picture

16 Oct 2015 - 9:14 pm | कविता१९७८

खुप रसाळ वर्णन , आहाहा

रसाळ वाणी. अशा पोथ्यांमध्ये केवढा मोठा खजिना दडलाय ! इतक्या निगुतीने आणि तुझ्या ओघवत्या शैलीत आमच्यासमोर आणलंस, निव्वळ अप्रतिम !! ते प्रेमपत्र पण कित्ती गोड आहे. काय राजेशाही रुखवत आहे !!

चतुरंग's picture

17 Oct 2015 - 6:58 am | चतुरंग

केवढे मोठे समृद्ध भांडार भरले आहे या जुन्या पुस्तकांमधून असे वाटायला लागले आहे. काय ती भाषा, केवढा गोडवा, किती निगुतीने केलेली पदार्थांची वर्णने चाट पडलो!
हे सगळं मी पहिल्यांदाच वाचतोय कित्येक पदार्थांची नावेही माहीत नव्हती तर कित्येक इतके जुने आहेत हे प्रथमच समजले.
शेवटले पत्र किती हृदयापासून लिहिले आहे. वाचून अत्यंत आनंद झाला.
या सगळ्याची इतक्या आत्मियतेने ओळख करुन दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद पैसाताई.

जुइ's picture

17 Oct 2015 - 7:32 am | जुइ

रूक्मिणी स्वयंवरातील रुखवताचे जेवणाचे वर्णन खासच! पैसातै तुझ्या सहज सुदंर शैलीत वाचायला चांगले वाटले.

इशा१२३'s picture

17 Oct 2015 - 3:29 pm | इशा१२३

किती तो थाट!केवढे पदार्थ!मस्त वर्णन केले आहेस.प्रेमपत्र तर गोडच.

प्रश्नलंका's picture

17 Oct 2015 - 3:38 pm | प्रश्नलंका

जबरदस्त वर्णन पैसाताई!! _/\_

भावना कल्लोळ's picture

17 Oct 2015 - 5:06 pm | भावना कल्लोळ

पै ताई, तुझ्यामुळे किती सुंदर आणि नाविन्यपुर्ण वाचायला मिळते … मस्त वर्णन केले आहेस.

नूतन सावंत's picture

17 Oct 2015 - 6:33 pm | नूतन सावंत

पैताई,खूप सुरेख लेख.रुखवताची परंपरेबाबतची छान माहिती.

विशाखा पाटील's picture

18 Oct 2015 - 9:54 am | विशाखा पाटील

साडेचारशे वर्षांपूर्वीची काय ती समृद्ध खाद्यसंस्कृती! छान ओळख...

हे लिहिणारे एकनाथ महाराज किती रसिक असले पाहिजेत.सदा सर्वदा धार्मिकतेतील फक्त कर्मठतेचाच उग्र चष्मा घालणार्यांनी संतांचे हे साहित्य रूपडे अनुभवावेच!
अप्रतिम लेख.या लेखाने अंक समृध्द झाला आहे.

सामान्य वाचक's picture

18 Oct 2015 - 10:54 am | सामान्य वाचक

वाचून दम लागला। खाऊन काय होत असेल

मांत्रिक's picture

18 Oct 2015 - 1:17 pm | मांत्रिक

अनेक ठिकाणी या सगळ्याचे अध्यात्मपर विवेचनही आहे. मात्र मी आता त्याचा अर्थ लावत नाहीये, मात्र कोणाचेही त्या काळचा म्हणजे सोळाव्या शतकातला वैभवशाली विवाह सोहळा कसा असेल याचे कुतुहल मात्र रुक्मिणी स्वयंवर वाचल्यावर नक्की शमेल! पैसाताई, लेख अतिशय उत्तम आहे. एका अगदी नवीन विषयाची ओळख करुन दिली. मूळ मराठी ओव्या सुद्धा वाचल्या मी. माझी खात्री आहे, की हे सर्व प्रतीकात्मक वर्णन आहे. जुन्या मराठीचा अर्थ फारसा लागत नाहीये. पण जे अर्थानुसंधान मनात निर्माण होतंय, ते सर्व अद्वैत विचारसरणी़कडे बोट दाखवतंय.
उदा. सोSहम चे ओगराळे, सोSहम म्हणजे मीच परमात्मा आहे अशी अखंड जाणीव

मांत्रिक's picture

18 Oct 2015 - 1:22 pm | मांत्रिक

शिखरिणी म्हणजे श्रीखंड असा उल्लेख सापडतो, पण ही शिकरण ही असू शकेल.

अनाहिता यांच्या संत एकनाथांच्या नैवेद्याचा धागा वाचल्यावर त्यात शिखरिणी केळांची वाढिली ताटी असा उल्लेख आहे, मग त्याचा अर्थ शिकरणच असेल.

अप्रतिम रुखवत. संतांचीच वाणी ती. प्रत्येक गोष्टीला रसाळपणा देणारी.

आवडलं. :)
>>> जे अर्थानुसंधान मनात निर्माण होतंय, ते सर्व अद्वैत विचारसरणी़कडे बोट दाखवतंय.
याच्याशी अर्थातच सहमत.

मनिमौ's picture

18 Oct 2015 - 6:32 pm | मनिमौ

मुळ नाथान्ची वाणी आणी तुझे विवेचन , दोन्ही जुळुन आले आहे. हे वर्णन वाचुन मला daasbodh आठवला.सखोल विवेचन. छान अणी माहीतीपुर्ण लेख.

समर्थ रामदासांच्या दासबोधावर नाथ महाराजांच्या भागवताचा प्रभाव आढळतोच.

दोघे एका भागातले आणि बहुधा नातेवाईक देखील होते. नाथ महाराजांच्या बायकोच्या बहिणीचा मुलगा म्हणजे नारायण ठोसर असं ऐकलं/ वाचलंय.

खूपच छान लेख. संतसाहित्य हे तत्कालीन समाजजीवनाचे प्रतिबिंब बनले ते संतकवींच्या जबरदस्त निरीक्षणक्षमतेमुळे. त्या काळात लिखित साहित्याची संख्या दुर्मिळ असे आणि विविध ग्रंथांच्या नकला सर्वांना उपलब्ध नसत. त्यामुळे मौखिक परंपरा हीच साहित्यिक वारसा पुढे चालवण्याचे सर्वात प्रचलित साधन होते. तरीही पूर्वसूरींचे साहित्य आणि त्यात मोलाची भर घालून मराठी भाषेचे वैभव समृद्ध करण्याची संतकवींची कामगिरी ही फार मोलाची ठरते.

उमा @ मिपा's picture

18 Oct 2015 - 8:24 pm | उमा @ मिपा

राजसी थाट आणि त्याचं वर्णन करताना वापरलेली भाषा देखील इतकी समृद्ध, संपन्न आहे. रुक्मिणी स्वयंवर वाचलेलं नाही पण आता ते नक्की वाचावंसं वाटतंय. लेख उत्तम लिहिलाय. रुखवताचा आणि भाषेचा हा थाट, हा साज आमच्यासमोर मांडल्याबद्दल पैसाताई धन्यवाद.

स्नेहानिकेत's picture

19 Oct 2015 - 8:43 pm | स्नेहानिकेत

किती छान वर्णन केलय नाथांनी रुखवताचे. पैताई तुझ्यामुळे अतिशय नविन्यपूर्ण माहिती मिळाली.खुपच मस्त झालाय लेख.

वर्णन वाचायला आवडले. माझी आई फळे, लोणि आणि श्रीखंड एकत्र करुन फ्रुट सॅलड करायची , शि़खरणीचं वर्णन वाचुन हा असाच काही पदार्थ असेल असे वाटले.

मितान's picture

20 Oct 2015 - 8:10 am | मितान

रसाळ, रुचिष्ट लेख !!!

पिलीयन रायडर's picture

20 Oct 2015 - 12:07 pm | पिलीयन रायडर

काय वर्णन आहे रे बाबा!!! मला खरंच हा अंक वाचुन मी नुसतीच "उदरभरण" करते असं वाटायला लागलय.. ही अशी रसिकता जेवणात हवी!

पिशी अबोली's picture

20 Oct 2015 - 1:16 pm | पिशी अबोली

सर्वसामान्यांसाठी रसाळ वर्णन आणि त्यातून तत्वज्ञानाचे दर्शन अशी किमया संतच करू जाणोत..
सुंदर लेख..

काय सुंदर वर्णन केले आहे एकनाथांनी. ते नुसते वाचुनच भुक लागली.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

21 Oct 2015 - 8:23 pm | भाग्यश्री कुलकर्णी

दंडवत माई....तुला आणी नाथांना....

पूर्वाविवेक's picture

21 Oct 2015 - 8:37 pm | पूर्वाविवेक

खूपच छान. आधीच नाथांची रसाळ वाणी आणि त्याला साजेसं अनुवाद. फार आवडला. तो प्रसंगच डोळ्यासमोर उभा राहिला.

पूर्वाविवेक's picture

21 Oct 2015 - 8:41 pm | पूर्वाविवेक

एक शंका मनात आहे. सगळे मराठमोळे पदार्थ, मग त्यात इडलीचा उल्लेख कसा काय केला आहे नाथांनी?

पैसा's picture

21 Oct 2015 - 9:49 pm | पैसा

नाथांची पत्नी गिरिजा ही बहुधा कर्नाटकातली किंवा तिचे घराणे मूळ कर्नाटकातले असे काहीतरी वाचलेले आठवते. शोधून सांगते.

भिंगरी's picture

22 Oct 2015 - 12:59 am | भिंगरी

पैसाताई,
खूपच छान लेख.

वाह पैताई...किती सुंदर माहिती. एकनाथांच्या रसाळ भाषेतील वर्णन खूपच छान!!!

भुमी's picture

24 Oct 2015 - 12:50 pm | भुमी

माझ्या लग्नाळू दिवसांत आईने ही पोथी वाचायला लावली होती . इंटर्नशिपसाठी अपडाऊन करायचे ,तेव्हा पहाटे पाच वाजता रुक्मिणी स्वयंवराचे अध्याय वाचून मी एस् टी पकडायचे . ते दिवस आठवले , फार सुंदर लयबद्ध रसाळ वर्णन.
ताई नॉस्टॅल्जिक केलंस मला :)

पैसा's picture

28 Oct 2015 - 9:38 am | पैसा

सर्व वाचक प्रतिसादकांना मनापासून धन्यवाद!

विशाल कुलकर्णी's picture

30 Oct 2015 - 12:53 pm | विशाल कुलकर्णी

केवढं सुंदर आणि रसाळ वर्णन आहे या ओव्यांमध्ये आणि तितकाच सुंदर तुझा लेख ! जियो _/\_

नितीनचंद्र's picture

17 Nov 2015 - 10:15 am | नितीनचंद्र

एकनाथांनी वर्णीलेले अन्नपदार्थ आणि त्याचे वर्णनाची हातोटी किती सुंदर आहे. श्रीकृष्ण म्हणजे राजवैभवी दैवत त्यातुन त्यांच्या लग्नाचा सोहळा म्हणजे अनुपम. अनेक पिढ्या खपल्या श्रीकृष्ण भक्ती करण्यात, रास लिलेचे वर्णन करण्यात तरी त्याभक्तीची गोडी अवीट.