श्रीगणेश लेखमाला १० : कंपनी सेक्रेटरी

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in जनातलं, मनातलं
27 Sep 2015 - 12:05 am

मी वाणिज्य शाखेत पदवी घेणार, हे मी आठवी-नववीत असताना मला कळून चुकले होते आणि सी.एस. करणार हे अकरावीमध्येच कळले होते; त्याचे कारण माझे नियोजन खूप सुबद्ध होते आणि ध्येय खूप उत्तुंग होते आणि त्याच्याकडे मी खूप आधीपासून वाटचाल सुरू केली होती, असे लिहिण्याचा मला खूप मोह होतो आहे. पण प्रत्यक्षात तसे काही नव्हते. खरी गोष्ट अशी आहे की आठवी-नववीतच माझ्या गणितातले भ्रमांचे भोपळे फुटायला लागले (म्हणजे उत्तर पत्रिकेवर भोपळ्यांची संख्या लक्षणीय असायची) आणि पट्टीच्या साहाय्यानेसुद्धा एक सरळ रेष काढताना नाकी नऊ यायचे. त्यामुळे गणिताची गरज असणारे इंजीनियरिंग आम्ही आयुष्यातून वजा केले. अमीबाच्या आकृतीवरदेखील 'नेटकी आकृती काढावी' अशा अभिप्रायासह पाचपैकी अडीच मार्क कमावल्यावर वैद्यकीय शाखा किंवा झाडपाल्याशी संबंधित काहीही आयुष्यात झेपणार नाही हे कळले. त्याच्याही आधी वैद्यकीय शाखेच्या पहिल्या वर्गातच बेडकाची आणि उंदराची चिरफाड करावी लागते हे कळल्याने शाळेतच या शाखेवर फुली मारली होती, ते वेगळे. मी डॉक्टर व्हावे अशी माझ्या आजोबांची फार इच्छा होती. (ते स्वत: डिसेक्शन टेबलवरची डेड बॉडी बघितल्यावर तडक घरी आले होते आणि त्यानंतर वाणिज्य शाखेचे पदवीधर झाले होते.) बालवाडीत असताना दिवाळीच्या सुट्ट्या लागल्यावर मी शिक्षण पूर्ण झाले या कल्पनेने मी डॉक्टर झालो हे सगळ्यांना सांगत सुटलो होतो. माझ्या डॉक्टरकीच्या कारकिर्दीच्या जवळपास जाणारा दुसरा कुठलाही क्षण नाही.

त्यामुळे कला आणि वाणिज्य शाखा हाच काय तो पर्याय होता. कला शाखेत जाऊन काय मास्तरकी करणार का? असा प्रश्न नेहमी विचारला जायचा. त्या वेळेस हो म्हटले असते तर फार बरे झाले असते, असे बर्‍याच वेळा वाटते. आणि आमच्यासारख्या मख्ख चेहर्‍याने बसणार्‍या दगडांसमोर उभे राहून शिकवणे किती अवघड असावे, हे समजून तो पेशा स्वीकारला नाही हे बरे वाटते. वास्तविक कला शाखेतही किती सुसंधी असतात. पण आपल्याकडे शालेय शिक्षणात या गोष्टी समजून घ्यायची सोयच नाही. वास्तविक आज समाजाला एका डॉक्टरची जितकी गरज आहे, तितकीच गरज एका वकिलाची, एका प्राध्यापकाची, एका कंपनी सचिवाची आणि इतर अनेक व्यावसायिकांचीदेखील आहे आणि कला, वाणिज्य, विज्ञान या प्रत्येक शाखेतून शिक्षण घेणार्‍या प्रत्येक व्यक्तीला व्यवसाय-धंद्याच्या अनेक सुसंधी उपलब्ध आहेत. पण आपल्याला त्यांची योग्य माहिती नसल्याने आपण त्या संदर्भात सारासार विचार करून निर्णय घेऊ शकत नाही आणि मग विज्ञान शाखा म्हणजे डॉक्टर / इंजीनियर, वाणिज्य शाखा म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट आणि कला शाखा म्हणजे प्राध्यापक असा सरधोपट विचार करून करियरच्या वाटा धुंडाळतो. या सरधोपट विचारांच्या पुढे जाऊन आपण इतर मार्गदेखील चोखाळले पाहिजेत. असाच एक मार्ग म्हणजे कंपनी सचिव किंवा कंपनी सेक्रेटरी.

कंपनी सेक्रेटरी नक्की काय करतो, हे समाजातल्या अनेक घटकांना अजूनही माहीत नाही. तो सी.ए.सारखाच एक कोर्स असतो असे सांगितले की या लोकांच्या डोक्यात थोडाफार प्रकाश पडतो. मग पुढचा प्रश्न लगेच विचारला जातो की "मग कुठल्या कॉलेजमधून करतो आहेस?" कंपनी सेक्रेटरी कोर्सबद्दल प्राथमिक माहिती देण्यासाठी आणि त्याबद्दल असलेले अज्ञान दूर करण्यासाठी म्हणून हा अनुभव-कम-लेखनप्रपंच.

तर मी सी.एस. करणार हे अकरावी-बारावीतच निश्चित झाले होते. त्याचेही मूळ मी आर्यभट्ट, रामानुजम आदी प्रभृतींवर सूड उगवून गणिताचे वेगळे नियम तयार करण्यात (आणि तेच ते प्रिय भोपळे पटकवण्यात) आहे. सी.ए. करण्यासाठी पूर्वी फाउंडेशन नावाचा एक अडसर दूर करायला लागायचा, ज्यात गणित अनिवार्य होते. त्याच्याशी माझा भोपळ्याचा आकडा. त्यामुळे सी.ए. माझ्या विशलिस्टमधून कटाप झाले. साधारण त्याच वेळेस सी.एस.चीदेखील माहिती मिळाली होती. थोडे हातपाय मारून आणखी माहिती मिळवली आणि मग सी.एस. फायनल केले, कारण गणितामधून पूर्ण सुट्टी मिळत होती. (नंतर स्टॅटिस्टिक्स आणी क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स करावे लागले, पण त्याचा मानसिक बागुलबुवा नव्हता, जो गणिताचा होता.)

अडचण फक्त एकच आली की सी.एस. करायला घेण्यापूर्वी फार कुणाचा सल्ला घेता आला नाही. मुळात जिथे सी.एस. म्हणजे काय हेच अजूनही लोकांना माहीत नसते, तर सतरा वर्षांपूर्वी काय कप्पाळ माहीत असणार? शिक्षकांना थोडीफार माहिती असायची. त्यांनीच प्राथमिक आणि जुजबी माहिती दिली होती. पण कोणी मातब्बर व्यक्ती मिळत नव्हती. शेवटी सी.ए. आणि सी.एस. असलेले एक गृहस्थ भेटले, त्यांनाच विचारले. ते म्हणाले, "मी दोन्ही केले आहे, पण प्रॅक्टिस मात्र सी.एस.ची करतो. याहून आणखी काय सांगू? बिनधास्त कर सी.एस." त्यानंतरच माझा सी.एस.चा प्रवास सुरू झाला. मात्र सी.एस. म्हणजे काय हे न जाणणारे इतके लोक आयुष्यात भेटले की सी.एस. अजूनही सर्वसाधारणपणे लोकांसाठी इंटेलिजन्स एजंट एवढाच गूढ आहे. काही अनुभव बघा, म्हणजे कळेलः

१. एका मैत्रिणीच्या घरी गप्पा मारत बसलेलो असताना आमच्याच (म्हणजे बी.एम.सी.सी.) कॉलेजमधून वाणिज्य शाखेची पदवी घेतलेली आणी इंटीरियर डिझायनिंग करणारी तिची आणखी एक मैत्रीण आली. सगळ्यांच्या ओळखीपाळखी झाल्या. अमका एमबीए, तमका सीए अशा ओळखी करून झाल्यावर त्या ललनेने अतिशय तुच्छतेने विचारले, "सेक्रेटरी होण्यासाठीसुद्धा कोर्स असतो? काय काय शिकवतात? टाइपराइटिंग आणि शॉर्टहँड?" तिचे अगाध ज्ञान बघून भर पंख्याखाली मला घाम फुटला.

२. एक मित्र कॉम्प्युटरचा कुठलासा कोर्स करत होता. त्याची एक असाइनमेंट सी.एस.शी निगडित होती. त्या कॉम्प्युटर सेंटरच्या मंद मालकिणीने त्याला ठासून सांगितले की सी.एस. लोक बॉसचे ट्रॅव्हल प्लॅन्स ठरवतात आणि त्याच्या फाइली सांभाळतात. माझा मित्र सी.एस. करतो आहे आणि तो तर काहीतरी वेगळेच सांगतो असे म्हटल्यावर बाई वदल्या, "जाऊ देत रे, त्याला लाज वाटत असेल खरे काय ते सांगायची." बाईंना पर्सनल सेक्रेटरी आणि कंपनी सेक्रेटरी यामधला फरक उभ्या जन्मात झेपला नव्हता बहुधा.

३. मी आयात-निर्यातीचा एक पदव्युत्तर डिप्लोमा करत होतो. आमच्या एचओडी एक अतिशय हुशार इकॉनॉमिस्ट होत्या. कोर्स संपत आलेला असताना त्यांनी सगळ्यांना पुढचे प्लॅन्स विचारले. बहुतेक सगळे जण संबंधित विषयात नोकरी शोधणार होते. मला विचारल्यावर संवाद थोडाफार असा झाला:

मॅडम : तू काय करणार रे? ---- कंपनीत इंटरव्ह्यू देऊन आलास का?
मी : नाही, आधी सी.एस. पूर्ण करावे म्हणतो.
मॅडम : (अतिशय तुच्छतापूर्ण स्वरात आणि रागाने) : ते काय असते?
मी (चाचरत) : सी.एस. म्हणजे कंपनी सेक्रेटरी.
मॅडम : हे असले काहीतरी करायचे होते, तर मग पीजीडीएफटी कशाला केले? टाइपिंग शिकायचे ना?
मी : ..........

हा माझ्यासाठी प्रचंड मोठा आघात होता. त्या मॅडम उच्चविद्याविभूषित होत्या. त्यांनाच जर सी.एस. काय ते माहीत नसेल, तर इतर कुणाला काय माहीत असणार!

४. चौथा आघात जरा जास्त नाजूक होता. लग्नाच्या बाजारात उभे असताना एका सुस्वरूप मुलीचे स्थळ चालून आले. ती सॉफ्टवेयर इंजीनियर होती. माझे प्रोफाइल त्यांनी (बहुधा) वाचले असावे. त्यात मी बी.कॉम, पी.जी.डी.एफ.टी आणि लॉ केल्याचा उल्लेख होता. मी कंपनीत खूप मोठा कायदा सल्लागार असेन अशी त्यांची अपेक्षा होती. घरदार, पगार इत्यादी बाबतीत त्यांची खात्री पटल्यावर मुद्दा कंपनीतल्या हुद्द्यावर आला. मी शांतपणे डेप्युटी कंपनी सेक्रेटरी म्हणून सांगितले. बाईंच्या चेहर्‍यावरचे भाव इतक्या झरझर बदलले की काय सांगू तुम्हाला. नंतर बराच वेळ माझ्या बॉसबद्दल चर्चा चालली होती. (पर्सनले सेक्रेटरी आणि बॉस यांचे रिलेशन असे काहीसे बाईंच्या मनात घोळत असावे). मी पर्सनल सेक्रेटरी नाही हे तिला शेवटापर्यंत झेपणार नाही, हे झेपायला थोडा वेळ गेला. लॉ करून हा बाब्या सेक्रेटरीचे काम का करतो हा प्रश्न तिच्या चेहर्‍यावर साफ झळकत होता. शेवटी मी तिला झक्कत सांगितले की सी.एस. हासुद्धा सी.ए.सारखाच एक कोर्स असतो (सहजी कळावे म्हणून कुणालाही सांगण्याचे हे ब्रह्मवाक्य होते). त्यावर बाईंनी "सी.ए. म्हणजे काय?" हा प्रश्न विचारला. ती घराबाहेर पडल्या पडल्या मी जाहीर केले की मी आजन्म ब्रह्मचारी राहीन, पण हिच्याशी लग्न करणार नाही. सी.एस. म्हणजे काय हे सांगण्यातच माझे अर्धे आयुष्य जायचे.

५. हा एका वधुपित्याचा माझ्या आईबरोबर झालेला संवाद. पलीकडून फोन आला होता. पाव्हणे पंढरपूरचे होते. जुजबी माहिती विचारल्यावर (न झालेल्या) सासरेबुवांनी मी काय करतो म्हणून विचारले. तेव्हाचा हा संवाद :

न झालेले सासरेबुवा (न.झा.सा.) : मंग काय करतात तुमचे चिरंजीव?
आई (अभिमानाने) : तो सी.एस. आहे.
न.झा.सा. : म्हंजे?
आई : म्हणजे सी.एस. आहे. -------- मध्ये कामाला आहे.
नझासा : बरं बरं. पण मग काय शिकलेत?
आई : कंपनी सेक्रेटरी आहे हो.
नझासा : शेक्रेटरी आहे हो? पन शिकलेत काय? आमच्या मुलीला चांगला शिकलेला नवराच हवा.
आई (थोडा विचार करून) : लॉसुद्धा केले आहे त्याने, शिवाय एम.कॉम. केले आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमाही केला आहे फॉरेन ट्रेडमध्ये.
नझासा (थोडा विचार करून) : बरेच शिकलेत म्हणायचे की मग. पन मग शेक्रेटरीचे काम का करतात?
आई : ............. (काय बोलावे हे तिलाही कळेना)
नझासा : पगार किती?
आई : ............. पगार मिळतो महिन्याला.
नझासा : आजकाल शेक्रेटरीलाही बरा पगार मिळतो म्हणायचा की मग..

त्यानंतरचा संवाद इथे महत्त्वाचा नाही. पण मी ही मुलगी न बघताच या मुलीवर काट मारली. मुलीला माहीत असले असते तरी माझ्या नोकरीच्या न्यूनगंडातून माझे नझासा कधीच बाहेर पडू शकले नसते. त्यापेक्षा नकोच.

तर सी.एस.ची ही अशी कथा असते. तुम्ही सी.एस. केले, तर सी.एस. म्हणजे काय हे तुम्हाला भेटणार्‍या जवळजवळ प्रत्येक नॉन-कॉमर्स व्यक्तीला तुम्हाला समजावून सांगायला लागते. त्यामुळे सी.एस. करायचे असेल, तर सी.एस. म्हणजे काय ते नीट जाणून घ्या. तुम्हाला पदोपदी लोकांना ते समजावून सांगायला लागेल.

थोडक्यात सांगायचे, तर सी.एस. म्हणजेच कंपनी सेक्रेटरीशिप हा ३ वर्षाचा (आणि फार कमी वेळा ३ वर्षात पूर्ण होणारा) एक सर्टिफिकेट कॉर्स आहे. डिग्री नसून एक सर्टिफिकेट कोर्स आहे म्हणून त्याची महती कमी होत नाही, तर तो एक अतिशय प्रतिष्ठेचा आणि अवघड अभ्यासक्रम आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

सी.एस. म्हणजे काय आणि त्याची गरज का आहे, हे प्रथम समजून घेऊ या. जर तुम्हाला भारतात एखादा व्यवसाय करायचा असेल, तर तुम्ही काय कराल आणि कुठल्या प्रकारच्या कायदेशीर संस्थेच्या माध्यमातून कराल? एक तर तुम्ही प्रोप्रायटरशिप करू शकाल. ही प्रोप्रायटरशिप त्याच्या मालकापेक्षा वेगळी नसेल किंवा तुम्हा एल.एल.पी. किंवा भागीदारी सुरू करू शकाल. यातही भागीदारी = भागीदार असेच समीकरण असेल, कारण भागीदारीला भागीदारांव्यतिरिक्त वेगळे असे अस्तित्व नसते. किंवा तुम्ही एक कंपनी उघडू शकाल. ही कंपनी हे समीकरण पूर्ण वेगळे असते. इथे कंपनीलाच कायदेशीर दर्जा असतो. कंपनी वेगळी आणि त्याचे शेअरहोल्डर्स वेगळे. त्यामुळे कंपनीची समीकरणे बदलतात. इथे कुणीही - अगदी रूढार्थाने एकाधिकारी नसतो. कंपनीसाठी सगळे कायदेशीर अस्तित्वच बदलते. शिवाय कंपनी म्हटल्यावर जगभरचे कायदे पाळावे लागतात. कंपनीत नवीन सभासद येऊ शकतात, कंपनीच्या नावे कर्जे येतात, कंपनीच्या नावे करार केले जातात. थोडक्यात, समाजातल्या अनेक व्यक्तींचे हितसंबंध गुंतलेले असतात. अशा या कंपनीचे कामकाज कंपनी कायद्यान्वये योग्यरित्या चालावे आणि सर्व संबंधित घटकांचे हितसंबंध वैध मार्गे जपले जावेत, यासाठी एक वेगळी यंत्रणा राबवणे गरजेचे असते. या सर्व प्रकाराला आपण 'कॉर्पोरेट गव्हर्नन्स' या शब्दसमूहाने ओळखतो. कंपनी सेक्रेटरी या कॉर्पोरेट गव्हर्नन्स कम्प्लायन्सचा कणा असतो.

कंपनीचे मालक जरी शेयरहोल्डर्स असले, तरी कंपनी चालवतात 'बोर्ड ऑफ डायरेक्टर्स'. सामान्यत: कंपनीचे शेयरहोल्डर्सच डायरेक्टर्स निवडतात. काही क्वचित प्रसंगी मग हेच डायरेक्टर काही काळापुरते नवीन डायरेक्टर्स निवडू शकतात, तर काही प्रसंगी हे अधिकार ठरावीक प्रमाणात वित्तपुरवठा करणार्‍या बँकेकडे असू शकतात. अगदी असामान्य परिस्थितीत काही सरकारी संस्थासुद्धा त्यांच्या अधिकाराचा वापर करून डायरेक्टर निवडू शकतात. हे डायरेक्टर्स त्यांच्या कौशल्यानुसार कंपनी चालवतात. अर्थात त्यांच्या अधिकारांमुळे हुकूमशाही अथवा अनागोंदी माजू नये, म्हणून त्यांचे अधिकार कंपनी कायद्याच्या रूपाने मर्यादित केलेले असतात. तसेच कंपनीच्या 'मेमोरेंडम अँड आर्टिकल्स ऑफ असोसिएशन'अंतर्गतदेखील त्यांच्या अधिकारांवर आणि कंपनीच्या कार्यरेषेवर बंधने असू शकतात. कंपनी कायदा, लिस्टिंग अॅग्रीमेंट, फेमा (Foreign Exchange Management Act) इतर कॉर्पोरेट कायदे यांचे पालन आणि कंपनीचे आणि पर्यायाने इतर स्टेकहोल्डर्सचे इतर हितसंबंध जपण्यासाठी इतर अनेक तत्सम कायद्यांसंदर्भात या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सना मार्गदर्शन करणे, त्यांना सल्ला देणे आणि त्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना कायद्याच्या चौकटीचे पालन करणे आणी त्याचे उल्लंघन होऊ न देणे आणि त्या अनुषंगाने योग्य ती पावले उचलणे हे मुख्यत्वेकरून एका कंपनी सेक्रेटरीचे काम आहे.

मग तुम्ही म्हणाल की यातले बरेच काम तर कायद्याचा पदवीधरदेखील करू शकतो की! कंपनी सेक्रेटरी कशाला हवा? कायदेविषयक तज्ज्ञ आणि कंपनी सेक्रेटरी यांच्यामधला मुख्य फरक हा की कंपनी सेक्रेटरी कोर्स करत असताना कंपनी सेक्रेटरी केवळ कायद्याचा अभ्यास करत नाही, तर अकाउंटस, टॅक्स, कामगार कायदा आणि कल्याण, कॉर्पोरेट रीस्ट्रक्चरिंग, ह्युमन रिसोर्स, बँकिंग, विमा, आंतरराष्ट्रीय व्यवसाय संबंधित कायदे, कॉस्टिंग, बिझनेस एथिक्स इत्यादी विषयांचादेखील सखोल अभ्यास करतो. शिवाय वर सांगितल्याप्रमाणे कंपनी सेक्रेटरी कॉर्पोरेट गव्हर्नन्स कम्प्लायन्सचा कणा असतो.

तर असा हा कंपनी सेक्रेटरी तयार करण्याची जबाबदारी कायद्याने 'Institute of Company Secretaries of India' ('ICSI') या संस्थेवर आहे. ICSI ही कंपनी सेक्रेटरीज कायदा, १९८० अंतर्गत स्थापन केलेली एक सरकारी संस्था आहे, ज्याच्या मॅनेजिंग काउन्सिलवर मुख्यत्वेकरून या संस्थेतून पास आउट झालेले प्रोफेशनल कंपनी सेक्रेटरीच असतात. (सरकारी संस्था म्हटल्यावर डोळ्यासमोर जे चित्र उगाचच येते, तशी ही संस्था नाही हे ठसवण्यासाठी प्रोफेशनल कंपनी सेक्रेटरी याच्या मॅनेजिंग काउन्सिलवर मुख्यत्वेकरून असतात, हे मुद्दाम सांगितले.)

तर अशा या ICSIने 'Corporate Governance'ची खूप सुंदर आणि सोप्पी व्याख्या दिली आहे:
“Corporate Governance is the application of best management practices, compliance of law in true letter and spirit and adherence to ethical standards for effective management and distribution of wealth and discharge of social responsibility for the sustainable development of all stakeholders.”

कंपनी सेक्रेटरी या Corporate Governanceचा कणा अथवा आधारस्तंभ असतो. बोर्ड ऑफ डायरेक्टर्स सर्व निर्णय घेते आणि हे निर्णय बोर्ड मीटिंगमध्ये घेतले जाणे अपेक्षित असतात. बोर्ड मीटिंगमध्ये कंपनी सेक्रेटरी असणे अपेक्षित असते. त्यामुळे कंपनी सेक्रेटरी (जो कंपनीचा एम्प्लॉयी किंवा एक प्रॅक्टिसिंग प्रोफेशनल असतो) हा कंपनीचे प्रशासक आणि कंपनीचे स्टेकहोल्डर्स यांच्यामधला एक महत्त्वाचा दुवा ठरतो आणि त्यामुळेच कंपनीत चालत असलेल्या कुठल्याही गैरव्यवहाराला चव्हाट्यावर आणण्यात तो महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. (अर्थात काही गोष्टी त्याला अंधारात ठेवून केल्या जाऊ शकतात, ज्याला त्याचा नाइलाज असतो.)

कंपनी सेक्रेटरी अथवा कंपनी सचिव घडवण्यासाठी ICSIने एक अभ्यासक्रम ठरवलेला आहे. हा अतिशय अवघड आणि कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्ही ICSIचे मेबर होऊ शकता आणि एक कंपनी सचिव म्हणून इंडिपेंडंट प्रॅक्टिस करू शकता (ज्यामध्ये सेक्रेटरियल ऑडिट, सर्टिफिकेशन्स, कॉर्पोरेट कन्सल्टन्सी इत्यादींचा समावेश असू शकतो) किंवा एखाद्या कंपनीचा कंपनी सेक्रेटरी म्हणून जॉब करू शकता. (याच्या कार्याचे विस्तृत वर्णन वरती आलेच आहे.). वर म्हटल्याप्रमाणे हा ३ वर्षांचा (आणि ३ वर्षात पूर्ण होण्यास अवघड असलेला) अभ्यासक्रम आहे. यात फाउंडेशन, एक्झिक्युटिव्ह (इंटरमिजिएट) आणि प्रोफेशनल (फायनल) अशा तीन सत्रांत परीक्षा होतात. प्रत्येक सत्रामध्ये साधारणपणे दोन ग्रुप्स असतात आणि प्रत्येक ग्रुपमध्ये तीन-चार विषय असतात. काळाच्या गरजेप्रमाणे अभ्यासक्रम अधूनमधून बदलत असतो. त्यामुळे एखाद्या सत्रात दोनऐवजी तीन किंवा चार ग्रुप्स असू शकतात आणि प्रत्येकी चारऐवजी दोन किंवा तीन विषयदेखील असू शकतात. या अभ्यासक्रमात सर्वात प्रमुख कंपनी कायदा असतो. याशिवाय इतर कॉर्पोरेट कायदे, अकाउंटस, टॅक्स, कामगार कायदा आणि कल्याण, कॉर्पोरेट रीस्ट्रक्चरिंग, ह्युमन रिसोर्स, बँकिंग इत्यादी विषयांचादेखील समावेश असतो. थोडक्यात कंपनी सेक्रेटरी हा एक कायदेतज्ज्ञ + बिझनेस मॅनेजर + कॉर्पोरेट कन्सल्टंट म्हणून घडवण्याकडे कल असतो. हे तिन्ही अडसर पार केले की (किंवा करत असताना) १५ ते २४ महिन्यांचे प्रॅक्टिकल ट्रेनिंग घ्यावे लागते. हे एखाद्या मान्यताप्राप्त (ICSIची परवानगी घेतलेल्या) कंपनीमध्ये किंवा प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीकडे घ्यावे लागते. याशिवाय १५ दिवसांचा एक मॅनेजमेट स्टुडंट ओरिएंटेशन प्रॉग्रॅमदेखील पूर्ण करावा लागतो. हा ICSIतर्फेच घेतला जातो. याशिवाय वेगवेगळ्या पर्यायांवर २ ते १५ दिवसांचे इतर प्रकारांचे ट्रेनिंग घ्यावे लागते, संगणक अर्हता सिद्ध करावी लागते, २५ तासांचे शैक्षणिक कार्यक्रम अटेंड करावे लागतात आणि मग कुठे तुम्ही ICSIचे मेंबर होता. या अग्निदिव्यातून तावून सुलाखून निघणारा माणूसच कॉर्पोरेट क्षेत्राच्या अपेक्षा पूर्ण करू शकतो.

मी जेव्हा सी.एस. करत होतो, तेव्हा निकाल साधारणा १०-१२% लागायचा, तेसुद्धा एका वेळेस एकाच ग्रुपची परीक्षा देणार्‍यांसाठी. एका वेळेस दोन्ही ग्रुप देणारे लोक प्रातःस्मरणीय होते. त्यांच्याकडे भक्तिभावाने पाहिले जायचे आणि त्यापैकी पास होणारे महाभाग इहलोकातले नाहीतच, याची आमच्यापैकी प्रत्येकाला खात्री असायची. नापास होणे ही लांच्छनास्पद गोष्ट नाही, हे मला सी.एस. करायला लागल्यावर कळले. त्या आधीच्या आयुष्यात नापास होऊन सत्र वाया जाणे म्हणजे काय आहे, ते आम्हाला माहीत नव्हते. आमच्या वृथा अहंकाराच्या भिंती पहिल्या दोन वर्षातच कोसळल्या. एका ग्रुपमध्ये (४ पेपर) पास होण्यासाठी २०० मार्क लागायचे आणि प्रत्येक विषयात किमान ४०. थोडक्यात अॅग्रिगेट पासिंग ३५% नसून ५०% होते आणि ५०% मिळवणारा राजा असायचा. ८०%ची सवय असलेला माणूस लवकरच ५०%चे महत्त्व ओळखायचा आणि नसत्या अपेक्षा सोडून द्यायचा. एक काळ असा होता की ५८% मिळालेला महामानव पहिल्या क्रमांकाने पास झालेला होता. इतरांची काय अवस्था असेल याचा विचार करा. १९० मार्क मिळाल्यावर आम्ही 'सन्माननीयरित्या नापास' झाल्याचे जाहीर करायचो. ही हुरूप वाढवणारी गोष्ट असायची, कारण त्यामुळे पुढच्या अ‍ॅटेंप्टला पास होण्याची शक्यता वाढल्याचा आभास निर्माण व्हायचा. (तो बर्‍याचदा पुढच्या अ‍ॅटेंप्टमध्येही नापास होइपर्यंत टिकायचा.) एक वेळ अशी यायची की बहुतांश लोकांचा पेशन्स संपायचा आणि ते अभ्यासक्रम अर्धवट सोडून द्यायचे. त्यातूनही आमच्यासारखे लोक केवळ चिकाटीच्या बळावर टिकले आणि पास झाले. (शेवटी इन्स्टिट्यूट कंटाळली बहुधा.) शंभरातले अखेर केवळ चार-पाच लोक अंतिम ध्येयापर्यंत पोहोचायचे. हा खेळ चिकाटीचा होता. जे शेवटपर्यंत टिकले ते जिंकले. ज्यांनी कोर्स अर्धवट सोडला, त्यांचे ध्येय वेगळे होते. ज्यांचे ध्येय निश्चित होते, ते पास झाले. सिंपल.

पास झाल्यावर कॉर्पोरेट क्षेत्रातली मुशाफिरी सुरू झाली. पण त्याआधी तब्बल ६ महिने योग्य त्या नोकरीच्या शोधात होतो. पाहिजे तो जॉब मिळेस्तोवर जे हातात होते ते केले. पण एक खूप मोठा अभ्यासक्रम पूर्ण केला म्हणजे कंपन्या तुमच्यामागे पळत येतात, हा भ्रमाचा भोपळा मात्र फुटला. एकदा रेसमध्ये शिरल्यावर पळतच राहावे लागते, परत परत स्वतःला सिद्ध करत राहावे लागते, हे अनुभवले. सी.एस. सुरू करण्यापूर्वी काही क्लासवाल्यांनी आम्हाला सी.एस. करण्यासाठी उद्युक्त करण्याच्या हेतूने सांगितले होते की सी.एस. झाल्या झाल्या तीन लाखाची नोकरी (हे १७ वर्षांपूर्वीचे ३ लाख, बरं का), शॉफर ड्रिव्हन कार आणि लोखंडवालामध्ये फ्लॅट दाराशी चालून येईल. पास झाल्यानंतर त्या दाव्यातला फोलपणा कळला. भारतातला एक अवघड अभ्यासक्रम पूर्ण केला, म्हणून कुणीही हे सगळे द्यायला तयार नव्हते. स्वतःचे खणखणीत नाणे सिद्ध करून दाखवल्यावर मग हे सगळे मिळतेही, पण इतक्या सहजासहजी नाही.

सी.एस. करताना पास-नापासचा खेळ खेळताना एक काळ आम्हाला सगळ्यांनाच इतके नैराश्य आले होते की जे चिकाटीने टिकून राहिले होते, त्यांनीही इतर अभ्यासक्रम धुंडाळायला सुरुवात केली होती. मी स्वतःही सी.एस. करत असताना एम.कॉम. आणि फॉरेन ट्रेडचा एक पॉस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमासुद्धा करत होतो. (सुदैवाने त्यात नापास न होता पास झालो). जर सी.एस. नाहीच झालो, तर काय? या प्रश्नाचे ते उत्तर होते. सुदैवाने झालो एकदाचा सी.एस. ३ वर्षांचा अभ्यासक्रम ५ वर्षांत पूर्ण करून.

माझा पहिला जॉब सुरू केल्यावर (जो मी आज गेली ११ वर्षे करतो आहे) 'घी देखा, लेकिन बडगा नही देखा' म्हणजे काय, हे मला कळले. तुमचा एम्प्लॉयर कशा अवघड टाइम लाइन्स सेट करतो, ते कळले. ६ महिन्यांचे काम ४ महिन्यांत पूर्ण केल्यास त्याचे बक्षीस म्हणजे पुढच्या वेळेस तेच काम ३ महिन्यांत पूर्ण करण्याच्या इन्स्ट्रक्शन्स मिळतात. “The Reward for Good work is more work” हे कळले. एक महायोगी सांगून गेला आहे - 'Poverty is just a state of mind'.. त्याच धर्तीवर 'Time is just a state of mind' हे कळायला लागले, कारण वेळ-काळ विसरून कामे करावी लागली. एकदा सलग ४८ तास (झोप न घेता) काम करावे लागले. (नंतर एकदा ५० तास काम करून हा रेकॉर्ड मोडला. तो मात्र अजून अबाधित आहे.) नंतर सी.एस.च्या सर्टिफिकेटच्या जोरावर कंपनीने 'फायनान्स' बघण्याचे काम दिले. जगातली कुठलीही कंपनी पैशाच्या बाबतीत जराही सबुरी दाखवत नाही, त्यामुळे घड्याळ्याच्या काट्यावरच चालावे लागते. पैशांच्या बाबतीत एका दिवसाचा विलंब रामायण-महाभारत दोन्ही एका दिवसात घडवू शकतो. ही एक गोष्ट आहे जिथे कुठलाही प्रमोटर अगदी डोळ्यात तेल घालूनच बघत असतो. त्यामुळे कामातली दिरंगाई सहन होण्याचा प्रश्नच नाही.

आणि हे सगळे करताना एक सी.एस. म्हणून कॉर्पोरेट कायदे पाळणेही तितकेच महत्त्वाचे. कंपनी कायदा असो किंवा फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अ‍ॅक्ट किंवा इतर कॉर्पोरेट कायदे, यांच्यात सतत बदल होत असतात. रोज नवीन सर्क्युलर, रोज थोडा बदल. हे बदल समजून घेऊन मॅनेजमेंटला अपडेट करत राहण्याची आणि कालचा निर्णय आज का बदलावा लागत आहे हे सांगण्याची कसरतही कधीकधी करावी लागते. या सततच्या बदलांमुळे 'शिक्षणाची' फेज अजून संपलेली नाही, कारण रोज नवीन शिकावे लागते आणि मग ते इम्प्लिमेंट करावे लागते. त्यामुळेच मग मी नोकरी करत असतानाच कायद्याची पदवीदेखील संपादन केली. त्याचा अजून उपयोग होतो.

आज या प्रोफेशनमध्ये जवळजवळ एक तपाचा कालखंड पूर्ण केला आहे, पण तपश्चर्या काही अजून पूर्ण झालेली नाही. ती रोजच नव्याने सुरू करायला लागते. नव्याने गोष्टी शिकाव्या लागतात. रोज नवीन क्षितिजे खुणावत असतात. १२ वर्षांपूर्वी सी.एस. पास आउट होण्याच्या उंबरठ्यावर असताना सगळे सोडून एखाद्या बीपीओमध्ये जॉब घ्यावा असे वाटत होते. आज जाणवते की तो निर्णय घेतला नाही ते बरेच झाले. तिथेही करियर झालेच असते. पण आज कायदा आणि वित्ताच्या क्षेत्रात जी मुशाफिरी करतो आहे, तीच तर मला करायची होती.

समाजजीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

27 Sep 2015 - 12:40 am | जव्हेरगंज

क्या बात है!
लेख प्रचंड आवडला!!!!

उगा काहितरीच's picture

27 Sep 2015 - 1:05 am | उगा काहितरीच

प्रचंड सहमत! रच्याकने ११-१२ वाणिज्य शाखेतुन केल्यामुळे (ऐकून) माहीत आहे सी.एस. होण्यासाठी किती मेहनत करावी लागते ते.

आदूबाळ's picture

27 Sep 2015 - 12:42 am | आदूबाळ

एक नंबर लेख. सविस्तर प्रतिक्रिया नंतर देतो.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Sep 2015 - 12:44 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

_/\_

सी.ए./सी.एस. पुर्ण करणार्‍यांबद्दल जबरा आदर आहे. आमच्या सी.ए. करणार्‍या मित्रांचे काळवंडलेले डोळे अजुनही डोळ्यासमोर येतात. रच्याकने माझे ३ मित्र आणि दोन मैत्रिणी सी.ए. करत होत्या त्यातल्या दोन मैत्रिणी आणि एक मित्र सी.ए. झाला. बाकीच्या दोघांनी गपगुमान कोर्स सोडुन दिला. :/

अनिरुद्ध.वैद्य's picture

29 Sep 2015 - 1:53 pm | अनिरुद्ध.वैद्य

+१,

तुफान तोडफोड करतात हे कोर्सेस! हाडाचे फायटर लागतात ब्वा इथे. ४ ५ मित्र CA CS झालेत काहींचे सुरु आहे अजूनही, तेव्हा जिद्दीला सलाम म्हणावा वाटतो.

बोका-ए-आझम's picture

27 Sep 2015 - 1:07 am | बोका-ए-आझम

उत्कृष्ट विवेचन आणि स्पष्टीकरण. कंपनी सेक्रेटरी कोर्स करणाऱ्यांबद्दल हे गैरसमज विनोदी आहेत आणि त्याचबरोबर सेक्रेटरी (स्वीय सहाय्यक) या पेशाला आपला समाज किती कमी लेखतो त्याचे निदर्शकही आहेत. स्वीय सहाय्यक हाही एक जबाबदारी असलेला आणि महत्वाचा पेशा किंवा व्यवसाय आहे. पण आपल्या डॉक्टर-इंजीनिअर-सी.ए.(आता) या त्रिकोणापलीकडे न पाहणाऱ्या पालकांविषयी काय बोलावे?
रच्याकने तुम्हाला नाकारणाऱ्या वधुपित्यांना एक दिवसापुरतं मिपाचं सदस्यत्व देऊन तुमचा लेख वाचायला दिला तर त्यांना त्यांनी फालतू अज्ञानापायी काय गमावलं हे समजेल. संमं इकडे लक्ष देईल काय? ;)

एस's picture

27 Sep 2015 - 2:04 am | एस

अहो संमं कुठेकुठे लक्ष देणार! आता त्या वधुपित्यांना चांगले मोठमोठे नातूबितू असतील. तरीपण त्या समस्त लोकांना येत्या पुणे कट्ट्याला बोलवून ह्या लेखाचे त्यांच्यासमोर जाहीर वाचन केले पाहिजे अशी सूचना देतो. ;-)

मृत्युन्जय's picture

27 Sep 2015 - 12:12 pm | मृत्युन्जय

त्याचबरोबर सेक्रेटरी (स्वीय सहाय्यक) या पेशाला आपला समाज किती कमी लेखतो त्याचे निदर्शकही आहेत

खरे आहे. अगदी पर्सनल सेक्रेटरी असेल तर कामाचे स्स्वरुप वेगळे असु शकते पण चेयरमनचा "एक्झिक्ञुटिव्ह असिस्टंट" किंवा त्याचे सेक्रेटरिएट काही ठिकाणी काय दर्जाचे बुद्धिमान असतात ते बघितले आहे. काही बँकांमध्ये तर चेयरमनच्या सेक्रेटरिएट मध्ये डीजीएम दर्जाचे लोक असु शकतात (आणि हे लोक बँकिंग कोळुन प्यायलेले असतात). त्यामुळे सेक्रेटरिएट (कंपनी सचिव नसलेला) म्हणजे काही आलतु फालतु गोष्ट आहे असे अजिबात नाही.

बर्‍याच मोठ्या कंपन्यांमध्ये देखील चेयरमनचा स्वीय सह्हाय्यक चेयरमनपुढे कागद ठेवण्यापुर्वी त्यावरच्या टिप्पणे काढुन त्याला देतो. हे अतिशय जबाबदारीचे आणि स्किलचे काम आहे. त्यामुळे स्वीय सहाय्यक म्हणजे देखील काही दर्जाहीन काम करतो असे नाही.

एस's picture

27 Sep 2015 - 2:05 am | एस

मस्त लेख!

प्रभाकर पेठकर's picture

27 Sep 2015 - 2:53 am | प्रभाकर पेठकर

बापरे! बी.कॉम करूनही सीएस म्हणजे काय ह्याचे तपशिलवार ज्ञान नव्हते, अजूनही नाही. कंपनी सेक्रेटरीला कंपनीच्या शेअर कॅपिटल संबंधीत काम असते अशी कांहीशी कल्पना होती. कंपनीचे शेअर कॅपिटल वाढविण्यासाठी नविन शेअर्स, डिबेंचर्स फ्लोट करणे, नविन कंपनी सुरु करणे, (किंवा बंद करणे) ह्या सारख्या महत्त्वाच्या घटनांमध्ये कंपनी सेक्रेटरीची गरज भासते असा कांहीसा मर्यादित समज होता माझा. असो.
अत्यंत खडतर मेहनत करून तुम्ही पदार्पण केलेल्या व्यवसायात तुम्हाला तणावविरहीत जीवनानुभव मिळावा अशी शुभेच्छा व्यक्त करतो.

मृत्युंजय कर्णाला जसं वंचित जीवन जगावं लागलं तसंच आमच्या या मृत्युंजय ला कर्तृत्व असूनही कं से चं वंचित नसूनही वंचित आयुष्य जगावं लागत आहे असं दिसतंय.

इथून पुढल्या दैदीप्यमान प्रवासासाठी (तो तसा व्हावा म्हणून) हार्दिक शुभेच्छा!

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Sep 2015 - 7:34 am | कैलासवासी सोन्याबापु

भाऊ मला तर UPSC चा सिलेबस पाहुनही कधी इतका लोड आला नव्हता!! काय सिलेबस आहे का गंमत आहे ही!! साला तपश्चर्या आहे खरेच ! इतके काही कष्ट केलेले लोक पाहिले की आपण आयुष्यात अपुर्ण असल्याची जाणीव अजुन पक्की होते !

मृत्युन्जय's picture

28 Sep 2015 - 11:36 am | मृत्युन्जय

माझ्या मते तरी UPSC नक्कीच थोडे अजुन अवघड आहे. UPSC क्लीयर करण्यासाठी स्किल सेट्सही थोडे वेगळे लागतात. त्यातले काही स्किल्स सी एस पास करताना तरी नक्कीच लागत नाहित.

एस's picture

28 Sep 2015 - 12:18 pm | एस

यूपीएससी ही कुठली परीक्षा नसून केंद्र सरकारच्या अनेक पदांसाठी परीक्षा वगैरे घेऊन ती पदे भरणारी एक स्वायत्त संस्था आहे.

ढोबळमानाने जिला यूपीएससी म्हणतात त्या परीक्षेचे खरे नाव 'सीएसई' किंवा सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन असे आहे. यात प्रिलिम, मेन आणि मुलाखत असे तीन टप्पे असायचे आधी (आत्ता बहुतेक पॅटर्न बदलला आहे.) यात उत्तीर्ण होणारे आयएएस (भाप्रसे), आयपीएस (भापोसे), आयएफएस (भापसे), आयआरएस (भामसे), आयओएफएस इत्यादी अनेक प्रकारच्या केंद्रिय सेवापदांचा समावेश होतो. भाप्रसे म्हणजेच आपले ते जिल्हाधिकारी, आयुक्त असतात ते.

ही परीक्षा दर वर्षी साधारणतः दीड ते दोन लाख जण देतात. त्यातून अंतिम टप्पा पार करू शकणारे फारफारतर तीनशे-चारशे असतात. त्यातही आयएएस किंवा आयएफएस बनू शकणारे तीसचाळीसजण असावेत. :-) बघा, काठिण्यपातळी काय असते ते!

(नोंद - विदा ढोबळमानाने दिला आहे. प्रत्यक्ष यूपीएससीच्या संस्थळावरून खात्री करून घेणे.)

चांदणे संदीप's picture

27 Sep 2015 - 8:23 am | चांदणे संदीप

अचाट आहे हे क्षेत्र!
मागे एकदा फेबुवर माझ्या मित्रयादी मधल्या एका मुलीचा CS ची संबधीत एक गृप पाहिला होता. तिथून ती बरेचदा "आम्ही cs वाले अमुक अफाट अभ्यास करतो" नि "तमुक कठीण परीक्षा देतो" अशा अर्थाचे मेसेज, फोटोज शेअर करायची, तेव्हा ते कधीच कळाल नाही की ती नेमक काय करते आहे पण आज लख्ख उजेड पडला!
असेही कुठलल्याही अनोळखी क्षेत्राला (किंवा कोणत्याच) कमी लेखत नाही पण अनोळखी क्षेत्राबद्दल उत्सुकता कायम असते!

धन्यवाद मृत्युन्जयजी माझ्या ज्ञानात अमोल भर पाडल्याबद्दल!
Sandy

अनुप ढेरे's picture

27 Sep 2015 - 9:04 am | अनुप ढेरे

आवडलं!

नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट लेखन.

पिशी अबोली's picture

27 Sep 2015 - 9:48 am | पिशी अबोली

हा कसला भयानक अभ्यासक्रम असतो त्याची कल्पना आहे. आम्ही फक्त कल्पनाच करतो. तुमच्या मेहनतीला __/\__

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Sep 2015 - 9:55 am | ज्ञानोबाचे पैजार

लेखातले प्रत्येक वाक्य अतिशय विचारपुर्वक लिहिले आहे हे वाचल्यावर लगेच समजते आहे कळते आहे.

पण वातावरण निर्मिती करण्यासाठी जे पहिले अनुभव दिले आहेत ते थोडे अतिशयोक्त वाटले.
सी एस बद्दल इतके अगाध अज्ञान आजूबाजूला असेल असे वाटत नाही. (अर्थात तुमचे अनुभव वेगळे असू शकतात हे पुर्णपणे मान्य आहे )

लेखातली अनेक वाक्ये सत्याचे यथार्थ दर्शन घडवतात जसे की :-
- कंपनी सेक्रेटरी या कॉर्पोरेट गव्हर्नन्स कम्प्लायन्सचा कणा असतो
- १९० मार्क मिळाल्यावर आम्ही 'सन्माननीयरित्या नापास' झाल्याचे जाहीर करायचो.
- ६ महिन्यांचे काम ४ महिन्यांत पूर्ण केल्यास त्याचे बक्षीस म्हणजे पुढच्या वेळेस तेच काम ३ महिन्यांत पूर्ण करण्याच्या इन्स्ट्रक्शन्स मिळतात.
- जगातली कुठलीही कंपनी पैशाच्या बाबतीत जराही सबुरी दाखवत नाही,
- पण तपश्चर्या काही अजून पूर्ण झालेली नाही. ती रोजच नव्याने सुरू करायला लागते. नव्याने गोष्टी शिकाव्या लागतात. रोज नवीन क्षितिजे खुणावत असतात.

कंपनी कायदा २०१३ आल्या पासुन सी. एस. चे काम बरेच वाढले आहे. (आमच्या कंपनीचे सी एस पण हल्ली बरेच बिझी झालेले दिसतात. (आधी उगाच चकाट्या पिटत फिरत असायचे असे आपले माझे मत आहे )) या नव्या कायद्यात जुन्या कायाद्यापेक्षा बरेच बदल करण्यात आले आहेत. कंपनीच्या व त्या अनुशंगाने कंपनी सेक्रेटरीच्या जबाबदार्या बर्याच वाढल्या आहेत . त्या बद्दलही एकदा विस्तृत लेख लिहिलात तर वाचायला आवडेल.

पैजारबुवा,

मृत्युन्जय's picture

27 Sep 2015 - 12:06 pm | मृत्युन्जय

सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

दुर्दवाने एकही किस्सा अतिशयोक्त नाही. नझासाचा किस्सा आईनेच रंगवुन सांगितला. बाकी किस्से प्रत्यक्षात माझ्या समोरच घडले.

(आमच्या कंपनीचे सी एस पण हल्ली बरेच बिझी झालेले दिसतात. (आधी उगाच चकाट्या पिटत फिरत असायचे असे आपले माझे मत आहे )

:). तुमच्या कंपनीत जॉब शिल्लक असेल तर सांगा. इतका सुखाचा जॉब मी पण घेइन म्हणतो ;)

पण कदाचित असे झाले असेल की कंपनी कायदा, १९५६ मध्ये त्या लोकांची इतकी मास्टरी झाली असेल की ते डोळे झाकुनही काम करु शकत असतील. त्यामुळे काम लवकर संपत असेल. कंपनी कायदा २०१३ आल्यावर मात्र इतके बदल झाले आहेत की झाडुन सगळे सी एस वैतागले आहेत शिवाय कायद्यात प्रचंड चुका आहेत. ड्राफ्टिंग साठी बहुधा लॉ इंटर्न्स बसवले असावेत इतके खराब ड्राफ्टिंग आहे. काही प्रथितयश कंपनी सेक्रेटरी तर उघडपणे म्हणतात की २०१३ चा संपुर्ण कायदा स्क्रॅप करुन नव्याने लिहावा. मिनिस्ट्रीला आणि मंत्र्यांपुढे अनेक निवेदने करुन झाली आहेत. मिनिस्ट्री तर दररोज दोनचार पत्रके अथवा फॉर्म्स आणी अमेंडमेंट्स करते आहे किंवा क्लॅरिफिकेशन्स देते आहे. सध्या एकुणात फार गोंधळ आहे आणि अनेक कलमे गोंधळात टाकणारी आणी विचित्र असणारी, तसेच अव्यवाहरिक असल्याने (आणि काही ऑपरेशनल हिस्टरी नसल्याने) सगळेच कंपनी सेक्रेटरी डोके खाजवत बसलेली दिसतात. मजा येते ;)

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Sep 2015 - 1:12 pm | ज्ञानोबाचे पैजार

पण कदाचित असे झाले असेल की कंपनी कायदा, १९५६ मध्ये त्या लोकांची इतकी मास्टरी झाली असेल की ते डोळे झाकुनही काम करु शकत असतील.

हेच जास्त खरे असण्याची शक्यता आहे

दुसरे म्हणजे माझ्या मताला अकाउंट्स विरुध्द सेक्रेटरीयल अशा तुलनेची (आणि थोडी असुयेचीही) झाक आली असण्याचीही शक्यता आहे.

नव्या कंपनी कायद्याच्या ड्राफ्ट बद्दल माझे मत तुमच्या पेक्षा फारसे वेगळे नाही. बर्याच त्रुटी आहेत त्या मध्ये. आता सर्क्युलर आणि क्लेरिफिकेशनची रीघ लागेल आणि त्या नंतर लिटीगेशनची आणि तो कायदा स्थिरस्थावर होता नाही तो पर्यंत त्यात काहीतरी नवे बदल केले जातील नाहि तर त्या जागी नवाच कायदा आणला जाईल.

नव्याने येऊ घातलेल्या जी एस टी मध्ये पण असे बरेच विवादास्पद मुद्दे आहेत असे तज्ञ लोकांचे म्हणणे आहे.

इंग्रजांनंतर बनवलेले सगळे नवे कायदे याच मार्गाने चालतात.

पैजारबुवा,

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Sep 2015 - 12:07 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

पण वातावरण निर्मिती करण्यासाठी जे पहिले अनुभव दिले आहेत ते थोडे अतिशयोक्त वाटले.
सी एस बद्दल इतके अगाध अज्ञान आजूबाजूला असेल असे वाटत नाही. (अर्थात तुमचे अनुभव वेगळे असू शकतात हे पुर्णपणे मान्य आहे )

असहमत. आमच्या ओळखीच्यांमधुन एक मॅडम अर्थशास्त्रामधुन पुणे विद्यापीठाची पी.एच.डी. डॉक्टरेटधारक आहेत. त्यांना कंपनी सेक्रेटरीविषयी माहिती नव्हती. माझा एक मित्र खानदानी सी.ए. (दोन काका, चुलतभाउ, वडील सी.ए. आहेत) आहे त्याला सी.एस. (बाकीच्यांना माहिती होती की नव्हती ते माहिती नाही) ची माहिती खुप उशिरा समजली. आता त्याची धाकटी बहिण सी.एस. करते आहे.

मित्रहो's picture

27 Sep 2015 - 10:06 am | मित्रहो

वेगळेच क्षेत्र आहे. कंपनी कशी चालते याची व्यवस्थित माहीत हवी.
सी. एस. कठीण आहे हे माहीत होते पण नक्की काय होते ते माहीत नव्हते. बऱ्याच वर्षीपूर्वीचा एक संवाद आठवला.
"आपल्याकडे लोक फक्त डॉक्टर इंजीनियरसाठीच प्रयत्न करतात.मुंबई पुण्याकडे वेगवेगळे कोर्सेस करतात"
"कोणते?"
"सी. एस. वगेरे"
"हे काय असत?"
"एक सी. ए. सारखाच कोर्स असतो."
"सी. ए. सारखाच असतो तर मग सी. ए. का करीत नाही?"

मुक्त विहारि's picture

27 Sep 2015 - 10:09 am | मुक्त विहारि

बाकी भेटी अंती बोलूच, तरी पण काही वाक्ये मनापासून लक्षांत राहिली....

१. “The Reward for Good work is more work” ====> प्रचंड सहमत.

२. " 'Time is just a state of mind." ====> + १

३. "सततच्या बदलांमुळे 'शिक्षणाची' फेज अजून संपलेली नाही, कारण रोज नवीन शिकावे लागते आणि मग ते इम्प्लिमेंट करावे लागते." ====> सहमत. आणि हे प्रत्येक क्षेत्राला लागू पडते.ज्या व्यक्तीला हे वाक्य समजते आणि जी व्यक्ती हे वाक्य आचरणांत आणायचा प्रयत्न करते, ती नक्कीच यशस्वी होवू शकते.

अत्रन्गि पाउस's picture

27 Sep 2015 - 6:48 pm | अत्रन्गि पाउस

अगदी हेच म्हणतो ....

पाषाणभेद's picture

27 Sep 2015 - 11:28 am | पाषाणभेद

एका सीएस ला जवळून पाहीले असल्याने सीएस बद्दल थोडे माहीत होते.
एक शंका आहे. निरसन कराल अशी आशा आहे.
प्रत्येक कंपनी कायद्याने अस्तित्वात आलेल्या 'कंपनीत' सीएस असणे कायद्याने बंधनकारक असते ना?

मृत्युन्जय's picture

27 Sep 2015 - 11:50 am | मृत्युन्जय

नाही प्रत्येक कंपनीला बंधनकारक नसते. त्यासाठी ठराविक भाग भांडवलाची मर्यादा असते. त्याहुन जास्त जर भाग भांडवल असेल तर सीएस गरजेचा असतो. लिस्टेड कंपन्यांना मात्र सी एस असणे कायद्याने बंधनकारक आहे मग त्यांचे भांडवल कितीका असेना

खुप सुरेख अन किस्सेही रोचक !

पाषाणभेद's picture

27 Sep 2015 - 11:31 am | पाषाणभेद

या अभ्यासक्रमाला आर्हता काय असते? तसेच प्रवेश संख्या किती असते?

मृत्युन्जय's picture

27 Sep 2015 - 11:52 am | मृत्युन्जय

अर्हता दोन प्रकारांची असु शकते:

१. १२ वी नंतर (कुठल्याही शाखेचा) फाउंडेशन कॉर्सला प्रवेश घेउन मग फाउंडेशन, एक्झिक्ञुटिव्ह, प्रोफेशनल, इतर ट्रेनिंग्स वगैरे टप्पे पार करुन सी एस होता येते किंवा

२. पदवी प्राप्त केल्यानंतर फाउंडेशन स्किप करुन बाकीचे टप्पे पार करता येतील.

शिवाय नौकरीतील अनुभव लक्षात घेउन कधीकधी ठराविक ट्रेनिंग्स मधुन एक्झेंप्शन मिळु शकते

तसेच प्रवेश संख्या किती असते?

प्रवेश संख्या वगैरे काही नसतं. सगळे परीक्षेसाठी रजिस्टर करू शकतात. अर्थात, पास होईल तोच पुढच्या परीक्षेसाठी पात्र असतो.

अतिशय सुंदर लेख. सध्या सिएस करत असल्याने जास्त भावला. बुक्स पाहिल्यावर मनात पहिला विचार आला, आपलं
आणि पुस्तकांच वजन सारखच असावं, असो आता काही गरज लागली तर तुम्हालाच विचारणार, चालेल ना?

मृत्युन्जय's picture

27 Sep 2015 - 11:53 am | मृत्युन्जय

जरुर. मला कधीही व्यनि केलात तरी चालेल. मी नंबर देइन त्यावर फोन केल्यासही हरकत नाही.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Sep 2015 - 12:13 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

रच्याकने एक शंका होती. सी.ए. जसं बी.कॉम. करता करता- करता येतं तसं सी.एस. पण येतं का? त्यासाठी कॉमर्स हि एकचं ब्रांच अनिवार्य आहे का दुसर्‍या ब्रांचांमधुनही करता येतं?

मृत्युन्जय's picture

27 Sep 2015 - 12:18 pm | मृत्युन्जय

सी एस पण जॉब करता करता - करता येइल मात्र त्यानंतरचे जे १५ / १८ / २४ महिन्यंचे ट्रेनिंग असते (आणि इतर छोटी मोठी ट्रेनिंग असतात त्यासाठी एक्झेंप्शन मिळाले नाही तर तेवढ्या काळासाठी जॉब सोडावा लागेल. अर्थात ट्रेनिंग मध्ये आता किमान ७५०० हजार रुपये स्टायपेंड मिळतो.

मृत्युन्जय's picture

27 Sep 2015 - 12:15 pm | मृत्युन्जय

सर्व वाचक, प्रतिसादकांना अनेक धन्यवाद

दिवाकर कुलकर्णी's picture

27 Sep 2015 - 12:22 pm | दिवाकर कुलकर्णी

दुर्दैवाने सेक्रेटरीला मराठीत चिकटलेला अर्थ सामान्य दर्जया दाखवितो,हे पदनाम,कंपनी लॉ अँड अँडमिनि.हेड
असे असावे

लाल टोपी's picture

27 Sep 2015 - 1:25 pm | लाल टोपी

वाणिज्य शाखेत द्विपदवीधर असल्याने सी.एस. म्हणजे काय माहित होते. त्याचे अंतरंग खुसखुशीत शब्दात उलडून दखवलेत. लेख खूपच सुंदर झाला आहे. आपला प्रवासही प्रेरणादायी आहे.

पैसा's picture

27 Sep 2015 - 3:08 pm | पैसा

मस्त खुसखुशीत लेख! सी एस होण्यासाठी किती मेहनत आहे हे माहीत आहे. त्यासाठी मेहनतीसाठी सांष्टांग नमस्कार! लेख नेहमीप्रमाणे मृत्युंजय स्टाईल! चढत्या भाजणीने रंगत गेलेल्या या वर्षीच्या श्रीगणेश लेखमालेचा शेवट साजेसाच झाला! इतक्या सुंदर लेखासाठी धन्यवाद!

मस्त लेख, मृत्युंजयराव....

मृत्युंजय यांनी लिहिलं नाहीये - ते ICSIच्या पुणे विभागाचे व्हाईस चेअरमन म्हणूनही कार्यरत आहेत.

तुषार काळभोर's picture

5 Oct 2015 - 4:34 pm | तुषार काळभोर

लेख व प्रतिक्रिया वाचून निर्माण झालेला आदर द्विगुणित झाला.

नाखु's picture

7 Oct 2015 - 12:21 pm | नाखु

मनःपूर्वक अभिनंदन

चा अ पश्चीम विभागाचे पुणे शाखेचे कामकाज मी जिथे काम करीत असे तिथून चालत असे (सन १९८२).
त्यामुळे या लश्करच्या भाकरी भाजताना आमचे सरांचे कष्ट (काटेरी मुकुट) पाहिले आहेत.

बोका-ए-आझम's picture

27 Sep 2015 - 4:28 pm | बोका-ए-आझम

जर प्राप्तिकर कायद्यात काही सुधारणा होणार असतील तर जसं सरकार ICAI चा सल्ला घेतं तसं कंपनी कायद्यासाठी ICSI चा सल्ला घेतला नव्हता का? कारण माझे दोन सी.एस. मित्र आणि खुद्द माझ्या कंपनीचे (मी काम करत असलेल्या) सी.एस. त्याच्यावर वैतागलेलेे आहेत. Draconian वगैरे शब्द ऐकायला मिळाले. म्हणून विचारतोय.

मृत्युंजय जी
माझा वाणिज्य शाखेशी दुरान्वयानेही संबंध नाही. मी ग्लास टेक्नॉलॉजी मध्ये शिक्षण घेतलेले आहे व त्यातच काम करतो. मात्र मला कंपनी सेक्रेटरी हा महत्वाचा माणुस असतो कॉरपोरेट लॉज चा एक्सपर्ट असतो कॉर्पोरेट कॉम्प्लायन्स सांभाळतो. बॅलन्स शीट वर सहि असते याची. शेअर्स इश्यु, कंपनी मर्जर, अ‍ॅमलगमेशन मध्ये अति विशीष्ट तज्ञ म्हणुन भुमिका बजावत असतो. एल एल एम करण म्हणजे सी एस झालेल्या व्यक्तीसाठी डाव्या हाताचा मळ असतो. सी.ए. पेक्षा अती दिर्घ असा थेअरॉटिकल सिलॅबस सी.एस. चा असतो. सी.एस. ची सी.ए सारखी इन्स्टिट्युट आहे व ती अत्यंत प्रतिष्ठीत आहे पुढे मग इंग्लंड च्या सी.एस. ची हि पदवी इथले सी.एस. पैकी काही जण मिळवत असतात इ.
सी.एस. पास होण हि खरोखर एक मोठी अ‍ॅचीव्हमेंट आहे.
आता मला सांगा ग्लास टेकनॉलॉजी विषयी तुम्हाला काय माहीती आहे. ग्लास टेक्नॉलॉजी मध्ये पी एच डी च सर्वोत्तम केंद्र जगात कुठल्या युनिव्हर्सिटीत आहे ?
हा हा हा अहो गंमतीने विचारल मला म्हणायचय अस होत कधी कधी सर्वांना सर्व माहीत नसत
छान अत्यंत माहीतीपुर्ण लेख

मृत्युन्जय's picture

28 Sep 2015 - 11:41 am | मृत्युन्जय

हाहाहा. मान्य.

पण ग्लास टेक्नोलॉजीबद्दल थोडे नक्कीच माहिती आहे. माझी कंपनी टीव्हीसाठी लागणारे पॅनेल्स आणी फनेल्स देखील बनवते. आमचा एक ग्लास शेल्स मॅन्युफॅक्चरिंगचा कारखाना आहे. त्यामुळे थोडी माहिती नक्कीच आहे. मुख्य म्हणजे " ग्लास टेक्नोलॉजी" हा कसा भारदस्त विषय वाटतो ऐकुनच. मला मायक्रोबायोलोजी बद्दल पण फार थोडी माहिती आहे पण कोणी एमएस्सी (मायक्रोबायोलॉजी) असे सांगितले की छाती कशी दडपते? ते सांगण्याचा उद्देश आहे.

वेल्लाभट's picture

28 Sep 2015 - 11:47 am | वेल्लाभट

ओह...

ग्लास टेक्लोनॉजी?? अच्छा..... म्हणजे काचकाम होय !!! ह्या!

(हलकेच घ्या)

अभ्या..'s picture

27 Sep 2015 - 5:52 pm | अभ्या..

वेगळ्या आव्हानात्मक क्षेत्राचे उत्तम माहितीपूर्ण लेखन. धन्यवाद म्रुत्युंजया.
प्रचलित ग्लॅमरस शिक्षण घेतलेले लोक्स वेगळ्या शि़क्षणाला कसे लेखतात याची भरपूर उदाहरणे आहेत.
मिपावरच्या समस्त डॉक्टरवर्गाची क्षमा मागून एक किस्सा सांगायचा मोह आवरत नाही. मी नोकरी करीत असता एक डॉक्टर दांपत्य त्यांच्या नवीन हॉस्पिटलचे उद्घाटन समारंभाची पब्लिसिटीसाठी अन प्रिंटिंगसाठी आलेले होते. सहा दिवस त्यांचे डिझाइन रिजेक्ट करणे चाललेले होते. सौडॉक्टरांचा आग्रह होता की बिल्डिंग फेंट ग्रीन अन एमेराल्ड कलर्स मध्ये आहे. सर्व प्रिंटिंग तसेच कलरस्कीम मध्ये हवे. त्यांना सांगून ऐकत नव्हते की असे कलर्स प्रिंटला चांगले दिसत नाहीत. त्यांच्या मनात कसे डिझाइन आहे ते पण सांगत नव्हते. केवळ रिजेक्ट केलेल्या डिझाइनचा ढीग पडला होता. श्रीडॉक्टरांना मी केलेले पहिलेच डीझाइन आवडले होते पण सौंचा त्रागा चालूच होता. शेवटी मी विनम्रतासे सांगितले. मॅडम तुम्ही एमबीबीएस ला जेवढी वर्शे घालता तेवढीच वर्शे मी डिझाईन शिकण्यात घालवलीयत. पेशंट तुम्हाल रोग सांगतो. उपाययोजना नाही सांगत. तुम्ही देता ते घ्यावेच लागते. तसा मी इथे डिझाइनचा डॉक्टर आहे. वाटल्यास सेकंड ओपिनिअन घ्या पण माझ्या अभ्यासाची परिक्षा तुम्ही घ्यायची नाही. श्रीडोक्टरांनी नवरेपणाचा अधिकार बजावत डिझाईन फायनल केले. थोड्याच दिवसांनी त्यांच्या सगळ्या हॉस्पिटलचे प्रिंटिंग अन अ‍ॅडचे काम कायमचे माझ्याकडेच आलेले होते.
असो.
पुनः धन्यवाद म्रुत्युंजया.

मुक्त विहारि's picture

27 Sep 2015 - 9:14 pm | मुक्त विहारि

+ १

कधी-कधी रोख ठोक बोलल्याशिवाय कामे होत नाहीत.

प्रभाकर पेठकर's picture

28 Sep 2015 - 12:38 pm | प्रभाकर पेठकर

अशी चपखल, समजण्यास सोपी, निरुत्तर करणारी उदाहरणं तुमचे व्यवसाय कौशल्य सिद्ध करतात.

(माझ्या नव्या उपहारगृहांचे ब्रँडिंग आणि डिझाइनिंगची कामे तुमच्याकडे वर्ग करावीत अशा विचारात आहे.)

(माझ्या नव्या उपहारगृहांचे ब्रँडिंग आणि डिझाइनिंगची कामे तुमच्याकडे वर्ग करावीत अशा विचारात आहे.)(माझ्या नव्या उपहारगृहांचे ब्रँडिंग आणि डिझाइनिंगची कामे तुमच्याकडे वर्ग करावीत अशा विचारात आहे.)

श्री. पेठकरकाका,

तुम्ही ऑल्वेज वेल्कम. अगदी आनंदाने करीन.

प्रभाकर पेठकर's picture

29 Sep 2015 - 5:39 pm | प्रभाकर पेठकर

धन्यवाद अभ्या..

संपर्कात राहिनच.

खटपट्या's picture

27 Sep 2015 - 5:57 pm | खटपट्या

जबरद्स्त लेख. एक सी एस ग्रुहस्थ ओळखीचे असल्यामुळे बर्‍यापैकी माहीती होती. दीलेले अनुभव त्यांनादेखील आले आहेत. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Sep 2015 - 9:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

अत्यंत माहितीपूर्ण लेख. सीएस अभ्यासक्रम आणि व्यावसायिकांशी प्रत्यक्ष व्यावहारीक संबंध आलेला असल्याने त्यांच्या शिक्षणातला किचकटपणा माहिती आहे. असा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणार्‍यांच्या प्रति साधार आदर आहे. कंपनी कायद्याच्या परिघात चालविण्यासाठी त्यांची मदत अनिवार्य असते ! मात्र तो "सेक्रेटरी" हा शब्द आणि सीएस बद्दलचे सर्वसामान्यांच्यातले अज्ञान बर्‍याचदा विचित्र परिस्थिती निर्माण करतो हे सुद्धा तितकेच खरे.

एक उच्च्पदस्थ सीएस मिपाकर आहे ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे !

इशा१२३'s picture

27 Sep 2015 - 10:16 pm | इशा१२३

छान लेख.
वेगळ क्षेत्र निवडून जिद्दिने अभ्यास पुर्ण केलास. ञाच काय कोणत्याहि क्षेत्रात मेहनती वृत्तिमुळे असाच चमकला असतास हे नक्की.
गणिताशी फार सख्य न्हवत तरी छान म्हणावे इतपत गुण नक्किच असायचे कि रे.असो.

Jack_Bauer's picture

28 Sep 2015 - 1:56 am | Jack_Bauer

ह्या लेखाच्या निमित्ताने खूप नवीन माहिती मिळाली आणी आपल्याकडे एखाद्या व्यवसायाविषयी किती गैरसमज असू शकतात हे हि अनुभवायला मिळाल. धन्यवाद

लेखन आवडले. सी ए, सी एस वगैरे अभ्यासक्रमांबद्दल ऐकून माहित आहे कारण काही नातेवाईक या क्षेत्रात आहेत पण ते अवघड असते म्हणजे किती अवघड असते ते लेखामुळे समजले. आजच भारतात सी ए केलेल्या महिलेची ओळख झाली ती सी पी ए म्हणून नोकरी करत होती पण स्वयंपाकाच्या अतोनात आवडीमुळे एकदा धाडस करून नोकरी सोडली व आता एक उपहारगृह चालवते असे समजले. त्यावेळी हा लेख अर्धा वाचून झाला होता. त्यामुळे सी ए, सी एस याबद्दल मनात काही चालू होते. पेठकरकाका व तुमची आठवण झाली.

नाखु's picture

28 Sep 2015 - 8:54 am | नाखु

मी सन १९९०-९२ ला सी एस ला रीतसर प्रवेश घेऊन, अगदी सायंकालीन क्लास वगैरेही(इन्स्टीट्य्ट मध्येच) लावला होता. इन्स्टीट्य्ट कर्वेरोडला -मी रहायला चिंचवडला- हाफीस मार्केटयार्डात त्रिस्थळी यात्रा करीत थोडेफार लेक्चर उपस्थीत राहिलो.

आणि सी एस सोडावे लागले.

नेमक्या काही कारणांनी नोकरी मध्ये फिरतीचा कार्यक्रम सुरू झाला. कोकण वगळता उरलेला समस्त महराष्ट्र+गुजरात किमान तीनदा फिरून झाला. आणि दौराही सलग १५-२० दिवसांचा असे. मराठवाडा-विदर्भ-नासीक-सोलापूर-कोल्हापूर-जळगाव-सुरत-राजकोट-अहमदाबाद-बडोदा सगळीकडे.
भरीस भर म्हणून मुंबई ऑफीसची अतीरिक्त जबाबदारी दिली गेली. “The Reward for Good work is more work”. पुण्यातला शाखेचे २ वर्षांचे लेखापरीक्षण विलंबीत होते ते सुस्थीतीत आणून दिल्याचे बक्षीस म्हणून.त्यामुळे मुंबईत सलग ८ महीने रहावे लागले. (अंबरनाथ ते फोर्ट प्रवास)

त्या दिवसांमधील काम एक स्वतंत्र लेखाचा विषय+आवाका आहे. महाराष्ट्रातील ७२ डीलर-डिस्ट्रीब्युटर पुनर्गठन-पुनर्बांधणीचे (Restructure+Relocate)काम केले ३ वर्षात. आणि सीएस सोडावे लागले.

ह्यात कौटुंबीक जबाबदारी (घराचे नुकतेच सुरू झालेले हप्ते,धाकट्या बहिणीच्या विवाहाची तजवीज,धाकट्याचे शिक्षण) ही कारणे असली तरी माझी चिकाटी जिद्द कमी पडली हेच खरे कारण आहे हे आज २५ वर्षांनंतर तीव्रतेने (गणेश लेखमाला वाचल्यावर जरा जास्तच) जाणवते.त्याची बोच आजही कायम आहे.

ऐन पंचवीशीत स्वबळावर १ बी एच के फ्लॅट केला,पस्तीशीत स्वतंत्र छोटेखानी घर झाले तरीही सीएस सोडावे लागले याबद्दल खंत जरूर आहे

अंड्यातच सीएस भ्रूणहत्या झालेला नाखु

अति अवांतर:

वरील शाखा अनुभवामुळे अगदी तावून, सुलाखून निघालो त्याचा पुढे खूप उपयोग झाला हे निर्वीवाद सत्य.
मृत्युन्जय's picture

28 Sep 2015 - 10:43 am | मृत्युन्जय

माझी चिकाटी जिद्द कमी पडली हेच खरे कारण आहे

तुमचा प्रवास बघता तुमच्या बाबतीत असे अजिबातच म्हणता येणार नाही नाखुकाका. अगदी याच परिस्थितीत मी देखील सापडलो आणि मग सी डब्ल्यु ए नाही करु शकलो. सगळा वेळ प्रवासातच जायचा आणि ऐन परीक्षेच्या वेळेस काहितरी महत्वाचे काम यायचे त्यामुळे परीक्षाच देउ शकायचो नाही. असे २ -३ वेळा झाल्यावर मग नादच सोडला.

मी 'आपण पास होउ शकत नाही' या भावनेने कॉर्स अर्धवट सोडणार्‍यांबद्दल बोलत होतो. तुमच्या बाबतीत कामांचे प्रेशरच इतके होते की ते शक्य होउ शकले नाही.

सुबोध खरे's picture

28 Sep 2015 - 9:26 am | सुबोध खरे

मृत्युंजय राव
सी एस ला लोक ओळखत नाहीत याचे फार वाईट वाटून घेऊ नका.
तीन दिवसापूर्वीच माझ्या एका रुग्ण स्त्रीने विचारले कि तुम्ही हि सोनोग्राफी करता आहात तर त्याचे रिपोर्ट तुम्हाला कळतात का?आणी तुमची डिग्री काय? एक मिनिटभर मला समजले नाही. तिने परत खोदून तेच विचारले कारण तिला असे वाटत होते कि जसा इ सी जी किंवा एकस रे तंत्रज्ञ काढतो तशीच सोनोग्राफी पण तंत्रज्ञ करतो आणी मग ते डॉक्टरकडे निर्णयासाठी जातात. आणी मी तसा तंत्रज्ञ आहे.
हीच स्थिती पुण्यात एकदा रुग्णालयाच्या शेजारी असलेल्या केश कर्तनालयात गेलो असता तेथील कारागिराने माझे केस कापताना विचारले साहेब तुम्ही डॉक्टर कसले मी सांगितले कि रेडियोलॉजीस्ट आहे. ते म्हणजे काय? मी त्याला सांगितले कि एकस रे बेरियम सोनोग्राफी वगैरे करतात ते. त्याचे समाधान झाले. माझ्या शेजारी एक अस्थिव्यंग तज्ञ होता त्यालाही विचारले तेंव्हा तो म्हणाला हाडे मोडल्यावर प्लास्टर घालणे, शल्यक्रिया करणे वगैरे मी करतो.
त्याच्या शेजारी आमचे पोटाच्या विकाराचे(GASTRO ENTEROLOGIST) तज्ञ प्राध्यापक सर बसले होते. त्यांना पण त्याने विचारले साहेब तुम्ही काय करता? ते म्हणाले मी पोटाच्या रोगाचा तज्ञ आहे. त्याने विचारले म्हणजे तुम्ही ऑपरेशन करता का? ते म्हणाले नाही. त्याने विचारले मग तुम्ही काय करता? सर हसून माझ्याकडे वळून म्हणाले आता मी याला काय सांगू एवढी सुपर स्पेशालिटी करूनही मी काय करतो हे त्याला समजत नाही.

वेल्लाभट's picture

28 Sep 2015 - 11:03 am | वेल्लाभट

समजत नाही हे तरीही बरं आहे. अनेक चुकीचे समज असतात, तिथे स्पष्टीकरण देण्याची इच्छाही होत नाही.

एका मित्राला अनेक दिवसांनी भेटल्यावर जेंव्हा 'काय करतोस?' चं उत्तर 'सीए केलंय' असं दिलं तेंव्हा त्याचं प्रत्युत्तर होतं 'आयला म्हन्जे फुल झाल झोल ना मित्रा!'

काय बोलावं?

चिनार's picture

28 Sep 2015 - 9:48 am | चिनार

उत्तम लेख !!
अपरिचित क्षेत्राबद्दल माहिती पुरवल्याबद्दल धन्यवाद मृत्युंजय साहेब !
"सी एस " म्हणजे काहीतरी लय भारी असते ह्याची कल्पना होती… आज खात्री पटली

ब़जरबट्टू's picture

28 Sep 2015 - 10:15 am | ब़जरबट्टू

खुशखुशीत लेख...

एका माहित नसलेल्या क्षेत्राची मस्त ओळख करून दिली आहे.

तस्सा कंपनीत एक नविन ललना सिएस म्हणुनी आली असता, थोडी माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता.. :)

सुबोध खरे's picture

28 Sep 2015 - 10:33 am | सुबोध खरे

मृत्युन्जय साहेब
सी एस म्हणजे कंपनी सचिव असे सांगायचे.
म्हणजे काय असे विचारले तर सचिवालयात महत्त्वाचे कामकाज पाहायला जसे सचिव असतात तसेच कंपनीतही लागतात. आणि त्याला आय ए एस च्या तोडीची परीक्षा असते असे लोकांना सांगा. ज्यांना सी एस काय हे माहित आहे ते वाद घालणार नाहीत आणि ज्याना हे माहित नाही (किंवा माहित करून घेण्याची इच्छा नाही) त्यांना असे सांगितले तर काही फरकहि पडणार नाही.

मृत्युन्जय's picture

28 Sep 2015 - 10:43 am | मृत्युन्जय

ही आयडीया चांगली आहे. :)

वेल्लाभट's picture

28 Sep 2015 - 10:57 am | वेल्लाभट

मस्त !

काही बोलायाचे आहे, पण आत्ता बोलणार नाही. :)

तुमची वाटचाल स्तुत्यच आहे. आणि कायद्या कंप्लायन्स च्या अथांग सागरात तुम्ही लीलया संचार करताय हे अजूनच बेस्ट आहे. लिखाण आवडले. सुरेख.

बाकी काही वन लायनर्स जबरदस्त लिहिलीत. आणि ते सीएस माहित नसल्याचे किस्से तर अफाटच.

सौंदाळा's picture

28 Sep 2015 - 11:22 am | सौंदाळा

लेख आवडला.
३० वर्षापुर्वी नात्यातले काकाच सी.एस. होऊन मोठ्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर होते. अक्षरश: तुम्ही म्हटल्याप्रमाणे शोफर ड्रिव्हन कार, बंगला, फोन, फर्निचर अलाउन्स वगैरे ९० च्या दशकातच त्यांना मिळत होते.
सी.एस म्हणजे काय हे लहानपणापासुनच माहित होते.
१५-२० वर्षापुर्वी सायन्स, कॉमर्स, आर्ट्स हे बहुतांश वेळा दहावीच्या टक्केवारीच्या उतरत्या क्रमात ठरायचे. ७५%+ मिळाले की सायन्स, ६०-७५% मिळाले की कॉमर्स त्याखाली आर्टस. आता मात्र मुलांना / पालकांना नव-नविन संधीची जाणीव झाल्यामुळे किंवा निर्णयस्वातंत्र्य मिळाल्यामुळे ९०% वाले पण आर्ट्स, कॉमर्सला जाताना दिसतात. त्यामुळे भविष्यात १०-१२% निकालाचे प्रमाण अजुन वाढेल कदाचित आतासुद्धा वाढले असावे.

अन्या दातार's picture

28 Sep 2015 - 11:56 am | अन्या दातार

अप्रतिम लेख व अनुभव.

अनिता ठाकूर's picture

28 Sep 2015 - 1:02 pm | अनिता ठाकूर

सी.एस.च्या कामाचा अंदाज होता, पण तुमच्या लेखामुळे तपशीलवार माहिती मिळाली.धन्यवाद!

सानिकास्वप्निल's picture

28 Sep 2015 - 4:39 pm | सानिकास्वप्निल

घरात एक नातेवाईक सीएस असल्यामुळे ह्या अभ्यासक्रमाबद्दल थोडी माहिती होती. तुम्ही अगदी छान, माहितीपूर्ण लेख लिहिलाय. खूप आवडला, अनेक शुभेच्छा!!
गणेशलेखमालेमुळे हे १० दिवस वाचकांसाठी मेजवानीच होती, धन्यवाद __/\__

एका अज्ञात क्षेत्राची अनवट ओळख !
सीएस या व्यवसायाबद्दलचा आदर वाढला आहे.

अजया's picture

29 Sep 2015 - 12:34 pm | अजया

नातेवाईकांत एक गेली काही वर्ष तारीख पे तारीख करत सिएस करणारी मुलगी आहे.ती नक्की किती वर्ष सिएस करतेय तो ट्रॅक आता डोक्यातून गेलाय!पण ती चिकाटीनं करतेच आहे सिएस अजूनही.
तुमचा लेख वाचून तिची सर्व जण थट्टा करतात याचे प्रथमच वाईट वाटले:(
तुम्ही सांगितलेले किस्से मस्तच! !

अनिरुद्ध.वैद्य's picture

29 Sep 2015 - 2:09 pm | अनिरुद्ध.वैद्य

जबरी लेख!

काही मित्र मंडळींनी हा कोर्स केल्याने जुजबी माहिती होती! अफाट मेहनत लागते इथे! मुळात खाचाखोचा सांभाळत काम करावे लागेल, ह्या भीतीने CA/CS प्रयत्न नाही केला!

आपण प्रवास खुसखुशीतपणे मांडून अजून माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद ! :)

अजूनही कधी कधी वाटते आपण CA CS का नाही झालो :D

बाकी The Reward for Good work is more work हे मात्र अगदी खरे!

पगला गजोधर's picture

29 Sep 2015 - 3:45 pm | पगला गजोधर

लोकं नुसतं सेक्रेटरी या शब्दाकडे बघून एखाद्या पदाविषयी मनोग्रह बनवतात, हे पाहून वाईट वाटले.
मला वाटते अश्या लोकांच्या लेखी परराष्ट्र सचिव, वाणिज्य सचिव, गृहसचिव वैगरे सगळे 'सचिव' म्हणजे एकप्रकारचे PA असतील कदाचित.

प्रीत-मोहर's picture

29 Sep 2015 - 5:16 pm | प्रीत-मोहर

जबराट!!! काही मित्र मंडळींनी हा कोर्स केल्याने जुजबी माहिती होती! पण एवढ सगळ आत्ताच कळतय.
__/\__

तुमचा अभिषेक's picture

29 Sep 2015 - 6:19 pm | तुमचा अभिषेक

मस्त माहितीपुर्ण लेख, किस्स्यांनी आणि आपल्या लेखनशैलीने आणखी धमाल आणली :)

सुधीर कांदळकर's picture

30 Sep 2015 - 8:51 am | सुधीर कांदळकर

हे क्षेत्र फारसे अपरिचित नाही. काही महत्त्वाच्या अधिकारपत्रासोबत (पॉवर ऑफ अ‍ॅटर्नीसोबत) निर्णयाच्या उतार्‍याची (एक्सट्रॅक्टस ऑफ रेझोल्यूशन) प्रत द्यावी लागते. त्या शब्दांकनासाठी आम्हाला सीएसची मदत घ्यावी लागायची.

१९५६ चा कंपनी कायदा अखेर बदलला हे इथेच कळले. २००९ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतरच्या घडामोडी ठाऊक नव्हत्या.

धन्यवाद.

राही's picture

30 Sep 2015 - 10:32 am | राही

जुजबी माहिती होती, पण तपशील इथे कळले. सी.एस लोकांविषयीचा आदर दुणावला.
अनुभवसिद्ध खुसखुशीत माहिती. काही एकोळी ठोसे जबरदस्त.
लेख अतिशय आवडला.

साती's picture

5 Oct 2015 - 10:04 am | साती

वेगळ्याच क्षेत्राची माहिती मिळाली.
सी एस हा सी ए सारखाच एक कीचकट आणि कठिण अभ्यासक्रम असतो एवढंच माहिती होतं.
पण म्हणजे काय हे माहिती नव्हतं.

इतक्या सुंदर आणि माहितीपूर्ण लेखाबद्दल धन्यवाद!

लोटीया_पठाण's picture

5 Oct 2015 - 3:19 pm | लोटीया_पठाण

मस्त लेख. य क्शेत्रत काम करण्याचा फायदा म्हणजे थेट top management सोबत काम करता येतं.

सीए, सीएस, आयसीडब्ल्युए हे सर्वच वाणिज्य क्षेत्रातील अतिशय कठिण आणि वेळखाऊ अभ्यासक्रम आहेत, पण एकदा हे गड सर केले की तुम्ही राजेच.. अर्थात तरीही पुढेही अभ्यास कायम सुरू ठेवावाच लागतो.

उपयुक्त लेख आणि माहिती.

बेकार तरुण's picture

7 Oct 2015 - 9:52 am | बेकार तरुण

लेख आवडला
नवीन माहितिपण मिळाली काही
आभारी आहे