श्रीगणेश लेखमाला ३: योगशिक्षक

लाल टोपी's picture
लाल टोपी in जनातलं, मनातलं
20 Sep 2015 - 12:04 am

या लेखमालेतील इतर लेखकांच्या व्यवसायाला असणारे वलय कदाचित योग शिक्षकाला नसेल; आपण भविष्यात योग शिक्षक बनावे अशी स्वप्नेही मुले किंवा त्यांचे पालक पाहत असतील असे वाटत नाही. मात्र या क्षेत्रात जवळपास २८ वर्षांहून अधिक काळ व्यतीत केल्यानंतर या क्षेत्रामध्ये स्वत:चे आणि इतरांचेही भविष्य घडवण्याची ताकद आहे आणि केलेल्या कामाचे समाधानही आहे असे नक्कीच वाटते. या क्षेत्रात यावे अशी माझ्या मुलाने भविष्यात इच्छा व्यक्त केली, तर एक पालक म्हणून माझा त्याला भरघोस पाठिंबा असेल.

बाबा रामदेव यांनी विविध वाहिन्यांद्वारे सामान्यांपर्यंत योग विद्या पोहोचवली, त्याच्या बर्‍याच आधी १९८७च्या सुमारास मी एका जगप्रसिध्द योग संस्थेत दुय्यम योग प्रशिक्षक म्हणून काम सुरू केले. त्या वेळी योगाभ्यासाला आजच्यासारखी सर्वमान्यता नव्हती. आपले आरोग्य उत्तम राहावे, शरीर लवचीक राहावे, चित्तवृत्ती प्रसन्न राहाव्यात यासाठी योगमार्गाकडे वळणारे लोक हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच निघाले असते आणि काहीतरी आरोग्यविषयक समस्या आहेत, वाढत्या वयामुळे इतर व्यायाम प्रकार आता करता येत नाहीत म्हणून नाइलाजाने योग करणारे त्या वेळी बहुसंख्येने होते. मात्र गेल्या दशकांत हे चित्र झपाट्याने बदलले आहे.

१९८९पासून दिल्ली, जयपूर, कोलकाता, कोटा, गांधीनगर, पतियाला, भोपाळ यासह देशातील विविध शहरांत आमच्या संस्थेने आयोजित केलेल्या योग प्रशिक्षण शिबिरांच्या आयोजनात सहभागी होण्याची, तसेच देशभरात आणि त्यानंतर आशिया, युरोप, अमेरिका खंडातील वेगवेगळ्या देशांत योग शिकवण्याची संधी मिळाल्यामुळे योगाभ्यासींच्या बदलत्या मानसिकतेचे जवळून निरीक्षण करता आले.

सुरुवातीच्या दिवसांत एक तासाचा वर्ग घेण्याची वाटणारी भीती आजही आठवते. त्या दिवसांत आम्ही जयपूरला आयोजित योग शिबिरात शिकवत होतो. माझ्यासारखे आणखी दोन शिकाऊ प्रशिक्षक आणि आमचे वरिष्ठ असलेले अनुभवी प्रशिक्षक असा आमचा संघ होता. जयपूरच्या महाराजा महाविद्यालयात सकाळी आणि संध्याकाळी दोन दोन वर्ग चालवले जात होते. त्या वर्षी या वर्गांना जयपूरकरांचा मोठ्या प्रमाणात सहभाग लाभला होता. त्यामुळे महाराजा महाविद्यालयातील वर्गाबरोबरच आणखी एका ठिकाणी आमचे वरिष्ठ दुसर्‍या सहयोगी प्रशिक्षकाला घेऊन जात असत. दोन वर्गांच्या मध्ये प्रवासासाठी अर्ध्या तासाचे अंतर ठेवले होते. शक्यतो ते वर्गाच्या ठरलेल्या वेळेपर्यंत पोहोचत आणि नियमित वर्ग घेत असत. सहभागी विद्यार्थी काही चुका करीत असतील तर त्यात सुधारणा करणे, गरजेनुसार शिकवल्या जाणार्‍या आसनांचे प्रात्यक्षिक करून दाखवणे एवढेच आम्हा शिकाऊ लोकांना काम असे. परंतु जर आमचे अनुभवी शिक्षक वेळेत पोहोचले नाहीत, तर ठरलेल्या वेळेत वर्गाची सुरुवात करणे ही जबाबदारीही आमच्यावर होती. सकाळी सात वाजता वर्ग सुरू होत असे. जर सर वेळेत आले नाहीत तर आज आपल्याला वर्ग घ्यावा लागेल, या विचाराने जयपूरच्या डिसेंबर महिन्यातील कडाक्याच्या थंडीत ६.३०पासूनच फुटणारा घाम आठवून आज मात्र हसू येते. व्यासपीठावर जाऊन बोलायची सवय असणे वेगळे आणि नियोजित वेळेत वर्ग सुरू करून योग्य त्या क्रमाने ठरलेल्या योगिक क्रिया - म्हणजेच आसन, प्राणायाम, शुद्धिक्रिया, ध्यान पूर्ण करून ठरलेल्या वेळेत वर्गाची समाप्ती करणे, त्यासाठी कोणत्या अभ्यासाला किती वेळ देणे गरजेचे आहे, समोरच्या विद्यार्थ्याच्या आवश्यकतेनुसार कार्यक्रमाची आखणी करणे हाही शिक्षकाच्या कौशल्याचा भाग असतो. पण हे कौशल्य हळूहळू अनुभवातून येते, हे भान त्या वेळी नव्हते. संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झालेले आणि जेथे काम करतो तेथे अनेक विदेशी विद्यार्थी.. त्यांच्यासाठी इंग्रजी संभाषण सुधारण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याने आत्मविश्वास वाढला.

पुढे संस्थेमध्ये योगोपचार विभाग, विद्यार्थी प्रशिक्षण विभाग, प्रात्यक्षिक आणि विविध विषयांचा शिक्षक म्हणून काम करता आले. पोलीस प्रशिक्षण केंद्र, नेव्हीचे प्रशिक्षण केंद्र, विविध नगरपालिका आणि महानगरपालिकांमधील, केंद्रीय विद्यालयातील शिक्षक यांना प्रशिक्षण देण्याच्या कामातही नियुक्ती झाली. या सर्व आस्थापनांमधून आज अनेक जण अनोळखी जागी अचानक भेटतात. काही चेहरे आठवतात, काही आठवत नाहीत. मात्र ते जेव्हा आवर्जून येऊन भेटतात, आपुलकी दाखवतात तेव्हा अगदी भरून येते. गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या आयोजनात भारतापासून दूर कॅरिबियन समुद्राजवळील हैती या देशात योग वर्ग घ्यायला गेलो असता तेथे कार्यरत असणार्‍या UNOच्या भारतीय शांतिसेनेत योगवर्ग घेतल्यानंतर तेथे अधिकारी असणारा महाराष्ट्रातील बीडचा एक विद्यार्थी भेटायला आला. १९९९मध्ये तो माझा विद्यार्थी होता

भारतीय खेळ प्राधिकरणाच्या (SAIच्या) गांधीनगर केंद्रावर योग प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम शिकवण्याची संधी मिळाली, त्या वेळीदेखील वेळेच्या नियोजनाची समस्या जाणवली. SAI दर वर्षी मे-जून महिन्यात हॉकी, व्हॉलीबॉल, क्रिकेट यासारख्या खेळांबरोबरच योगाचादेखील दीड महिन्याचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालवते. १९९२मध्ये गांधीनगरला हा अभ्यासक्रम शिकवताना जाणवले की इतर खेळांना प्रात्यक्षिक अभ्यासक्रम शिकवण्यासाठी जास्त वेळ लागतो, कारण त्या खेळाची विविध कौशल्ये शिकवणे, त्यांचा सराव करून घेणे यासाठी सकाळी ३ तास आणि संध्याकाली ३ तास प्रात्यक्षिक वर्ग असत. खरे तर इतर खेळांचे प्रात्यक्षिक शिकवण्याचे स्वरूप आणि योगाभ्यास शिकवण्याचे स्वरूप यामध्ये बराच फरक होता. योगाचा प्रात्यक्षिक वर्ग जास्तीत जास्त दीड तास सकाळी आणि दीड तास संध्याकाळी पुरेसा होतो. परंतु जे वेळापत्रक आहे ते पाळणे आवश्यक होते. त्यामुळे वेगवेगळे नवीन प्रयोग करून या वेळेचा सदुपयोग केला. १९९४मध्ये SAI, पतियाळा येथे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करताना त्याचा चांगला उपयोग झाला.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचा एक विभाग 'भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद' (इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स - ICCR) देशभरातील शिक्षकांतून निवड करून विविध देशांत भारतीय दूतावासांमध्ये (Indian Embassyमध्ये) स्थापन केलेल्या सांस्कृतिक केंद्रांमध्ये योग प्रशिक्षक म्हणून दोन ते तीन वर्षांसाठी पाठवते. या प्रशिक्षकांना भारतीय दूतावासामध्ये अधिकार्‍याचा दर्जा मिळतो. भारत सरकार सोयीसुविधा पुरवते. योग प्रशिक्षकाला मिळणार्‍या उत्तम संधींपैकी ही एक आहे. २००३मध्ये झालेल्या मुलाखतीमध्ये 'तुमची निवड झाली आहे, त्याबद्दल अभिनंदन' असे फोनही दिल्लीतील माझ्या काही परिचितांकडून आले, पण नक्की कुठे माशी शिंकली कोणास ठाऊक! निवडीचे पत्र मला आलेच नाही. निवड निश्चित झाली आहे असे भासल्यामुळे आणि त्या वेळी ही संधी गेली म्हणजे अगदी आकाश कोसळल्यासारखे वाटले होते. अशी संधी आता पुन्हा मिळणारच नाही असे वाटू लागले होते. योग प्रशिक्षकाला नेहमीच संयमित राहता आले पाहिजे, भावनांचा मनावर पगडा बसू देता कामा नये.. असे असले तरी प्रत्यक्षात फारच नैराश्य आले होते. परंतु तीनच वर्षांनी २००६ मध्ये ICCRची जाहिरात पुन्हा एकदा वाचनात आली. या वेळी झपाटून तयारी केली आणि मुलाखतीच्या गुणानुक्रमामध्ये प्रथम स्थान मिळाले. २००७च्या फेब्रुवारीमध्ये कौलालंपूर, मलेशियाला जाण्याची संधी मिळाली. मे २०१०पर्यंत या नितांतसुंदर देशाने योगाच्या आणि जगण्याच्या दृष्टीने अधिक अनुभवसंपन्न बनवले.

नव्याने या क्षेत्रात येणार्‍यांसाठी आता अनेक संधी उपलब्ध आहेत. नुकत्याच साजरा झालेल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसामुळे योगाभ्यासाच्या फायद्यांकडे संपूर्ण जगाचे लक्ष वळले आहे. एका सर्वेक्षणाप्रमाणे योग दिवसाच्या आयोजनामुळे आधीच मोठी असलेली योगाची बाजारपेठ कैक पटींनी वाढणार आहे. अनेक शाळा, महाविद्यालये, विविध उद्योग संस्था, सरकारी आणि निमसरकारी संस्था, विद्यापीठे या सर्वच ठिकाणी योग शिक्षकांची गरज मोठ्या प्रमाणात भासणार आहे. पूर्वी हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच संस्था मोजकेच अभ्यासवर्ग चालवीत असत. आता मात्र तसे नाही. नावाजलेल्या अनेक संस्था योगाचे प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर, अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर वेगवेगळे अभ्यासक्रम सध्या शिकवतात. लोणावळ्याची कैवल्यधाम, नाशिकची योग विद्याधाम, मुंगेर (बिहार)ची बिहार स्कूल ऑफ योग, बंगलोरची एस. व्यासा, दिल्लीची मोरारजी देसाई अशा अनेक नामवंत आणि दर्जेदार संस्थांमधून व पुणे, भोपाळ, कराईकुडी, इंदूर यासारख्या विद्यापीठांमधूनही योग प्रशिक्षण दिले जाते.

आज मिपाच्या व्यासपीठावरून मागे वळून पाहताना योग प्रशिक्षक म्हणून काम करताना या क्षेत्राच्या बाहेरही विविध अनुभव भरभरून मिळाल्याच्या आठवणी ताज्या झाल्या. मी कोणीतरी विशेष महत्त्वाची व्यक्ती आहे अशा समजातून हे येथे नमूद करतो आहे असे नाही, तर केवळ मी या क्षेत्रात काम करीत आहे म्हणूनच माझ्यासारख्या एका सामान्य व्यक्तीला अशा प्रकारची संधी मिळाली. आज आपल्यापैकी कोणालाही येथे येऊन काम करायची संधी मिळाली, तर त्यांनाही निश्चितच अशा संधी प्राप्त होतील असे वाटते. अगदी पहिल्यांदा दिल्लीला योग शिबिर घ्यायला गेलो, त्या वेळी दिल्लीत आरक्षणविरोधी आंदोलन अतिशय तापले होते. रोज अनेक वाहनांची डोळ्यासमोर जाळपोळ होत होती. सकाळी- संध्याकाळी वर्गावर जाण्यासाठी आम्हाला जीपने २०-२५ कि.मी. प्रवास करावा लागत असे. दोनतीन वेळा आमचे वाहन आंदोलकांच्या तावडीत सापडले, पण नशिबाने सुखरूप सुटलो होतो. याच दरम्यान लोकसभेचे सचिव आमच्या वर्गात प्रशिक्षणासाठी येत होते. त्यांनीच आम्हाला लोकसभेची कार्यवाही पाहण्याचे खास पास दिले होते, त्यामुळे लोकसभेचे कामकाज पाहायला मिळाले. तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांचे भाषण प्रत्यक्ष ऐकायला मिळाले. दिल्लीहून लोणावळ्याला परत येताना राजधानी एक्स्प्रेसचे तिकीट रद्द करून जीपने आलो, तो प्रवास आज सुमारे २५ वर्षे झाली तरी आठवतो. त्या प्रवासात योगायोगाने आम्ही आडवाणींच्या रथयात्रेच्या काही कि.मी. मागे राहून बरेच अंतर पार केले होते. राष्ट्रपतिपदावरून पायउतार झाल्यानंतर मलेशिया भेटीवर आलेल्या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याबरोबरचे दूतावासामधील अधिकार्‍यांबरोबरचे सहभोजन, २०१०मध्ये पं. बिरजू महाराज मलेशियाला आले असता त्यांना आवडतो तसा दोनतीन दिवस रोज स्वत: बनवून दिलेला चहा, २००८चा मलेशियातील १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वविजेत्या संघाचा कर्णधार विराट कोहली, प्रशिक्षक डेव्ह व्हॅटमोर, खेळाडू रोहित शर्मा यांच्याबरोबर मारलेल्या गप्पा, पेराक, मलेशिया येथे प्रत्यक्ष सुलतान अझलन शाह यांच्या मागे बसून पाहिलेला सुलतान अझलन शाह करंडकाचा भारताचा हॉकी सामना, मॉस्कोत सोनू निगम, मिका सिंग या गायकांच्या झालेल्या भेटी, जगप्रसिद्ध रशियन सर्कसच्या कलाकारांबरोबर पाहायला मिळालेली सर्कस, जगप्रसिद्ध व्हायोलिन वादक डॉ. एल. सुब्रह्मण्यम (गायिका कविता कृष्णमूर्ती यांचे पती) यांच्याबरोबर कौलालंपूर विमानतळावर उतरल्यापासून ते परत जाईपर्यंत सतत तीन दिवस मिळालेला सहवास, महाराजा करणसिंग यांची झालेली भेट.. हे आणि आयुष्यभर जपून ठेवावे असे अनेक क्षण मी या क्षेत्रात काम करीत असल्यामुळे मला जगता आले.

आज जर कोणी मला विचारले योग प्रशिक्षक बनू का? तर सांगेन, जरूर बना, अनुभवाची एक एक पायरी चढत चढत सर्वोच्च स्थानी पोहोचा, मेहनत करायची तयारी असेल तर आर्थिक स्थैर्य, मान सन्मान तुमच्याकडे चालत येतील. सर्वात महत्वाचे म्हणजे उपजीविकेच्या साधानाबरोबरच योगिक अष्टांग मार्गात सांगीतल्याप्रमाणे वागून स्वत:ला आणि या शिकवणीचा प्रसार करून इतरांना समाजाचा जबाबदार घटक बनण्यासाठी शरीराने, मनाने आणि वर्तवणुकीने एक सुसंस्कृत आणि संपन्न जीवन जगाता येईल. , पु.लं नी एका ठिकाणी म्हंटल्या प्रमाणे "उपजीविकेसाठी आवश्यक असणा-या विषयाचे शिक्षण जरूर घ्या, पोटापाण्याचा उद्योग जिद्दीने करा, पण एवढ्यावरच थांबू नका साहित्य, शिल्प, नाट्य, संगीत, खेळ, ह्यांतल्या एका तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्हाला का जगायचं हे सागून जाईल"

शेवटी काय तर, 'हे जग मी सुंदर करून जाईन' या उक्तीला सार्थ करण्यापेक्षा आणखी आपणास तरी आपल्या 'करीयर' कडून काय हवे!

समाजजीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

रुस्तम's picture

20 Sep 2015 - 12:38 am | रुस्तम

तुम्हाला सलाम.

प्रभाकर पेठकर's picture

20 Sep 2015 - 12:47 am | प्रभाकर पेठकर

लेख आवडला. तुमचे अनुभव आणि तुम्हाला मिळालेल्या संधी सामान्य वाचकाला हेवा वाटाव्यात अशाच आहेत. दुर्दैवाने योगा संबधी लिखाण (जे अपेक्षित होते) ते वाचावयास मिळाले नाही त्यामुळे मन जरा हिरमुसले.
आपल्या लेखातून योगा प्रसार व्हावा, माझ्या सारख्या सामान्य माणसाला निदान 'पाहूया तरी एकदा करून' अशी प्रेरणा मिळावी असे वाटते.
प्राथमिक योगा कसे करावेत, कुठल्या वयात करावेत, ६० नंतर सांधे 'बोलू' लागले, तर कुठले योगा करावेत (मुळात करावेत का नाही?) इत्यादी विषयांना स्पर्श केला असता तर बरे झाले असते. कुर्च्या फाटल्यामुळे ऑर्थो, मांडी घालून बसायला मनाई करतात. पण वज्रासनात बसायला हरकत नाही असे सांगतात. वज्रासनात पाच सेकंदही बसता येत नाही. काय करावे? म्हणून प्राथमिक योगाची माहिती अपेक्षित होती. नेटवर किंवा रामदेव बाबांच्या सीडीमधून माहिती मिळेलही पण तुमच्या लेखातून अपेक्षा होती एव्हढेच सांगायचे आहे.

ही लेखमाला 'करिअर' संबंधी असल्याने त्यांनी एक योगशिक्षक म्हणून त्यांच्या करिअरसंबंधी माहिती दिली आहे. योगविषयक माहिती द्यायची झाल्यास ते त्यावर वेगळी लेखमाला लिहू शकतील. आणि अर्थात् यानिमित्ताने तशी श्री. लाल टोपी यांना विनंतीही करीत आहे. योग या विषयावर लिहा.

प्रभाकर पेठकर's picture

20 Sep 2015 - 11:08 am | प्रभाकर पेठकर

मुद्दा १०० टक्के पटला आहे.

लाल टोपी's picture

20 Sep 2015 - 1:16 am | लाल टोपी

काका, या लेखमालेसाठी करीयरच्या दृष्टीने योगक्षेत्रासंबंधी लिहावयाचे होते. म्हणुन तुम्ही म्हणता त्या मुद्द्यांना कदाचीत डावलले गेले. या विषयावर सविस्तर लिहायचे आहे पण सध्या काही व्यापात अडकलो आहे. तरीही सविस्तर व्यनि उद्या करतो.

प्रभाकर पेठकर's picture

20 Sep 2015 - 11:12 am | प्रभाकर पेठकर

सहमत आहे. आपणास वेळ मिळेल तेंव्हा 'योग' ह्या विषयावर जरूर जरूर लिहा. इथे अनेक उत्सुक वाचक आहेत.

नाखु's picture

21 Sep 2015 - 9:48 am | नाखु

तो "योग" लवकर यावा ही श्री चरणी प्रार्थना.

मी-सौरभ's picture

21 Sep 2015 - 7:23 pm | मी-सौरभ

नशीब जान्हवीचरणि नाही म्हणालात नायतर तो लेख कधी आला असता कुणास ठाऊक ;)

एस's picture

20 Sep 2015 - 12:54 am | एस

वा! अतिशय वेगळे क्षेत्र आणि त्यातही इतक्या संधी उपलब्ध असल्याचे प्रथमच कळाले. हा लेख वाचून अनेकांना योग या क्षेत्रात उतरून करिअर करण्याची स्फूर्ती मिळेल अशी आशा वाटते. बहुतेक इतर क्षेत्रांमध्ये शरीर व मन तंदुरुस्त राखण्यासाठी मुद्दाम वेगळे प्रयत्न करावे लागतात. योगाभ्यास वा इतरही फिटनेस प्रकारांमध्ये तुमचे करिअरच ते तुमच्याकडून करवून घेते हे विशेष.

कोणाला मिळो ना मिळो, मला तरी आळस झटकून व्यायाम व योगासने करण्याची प्रेरणा तुमचा लेख वाचून निश्चितच मिळाली आहे.

बोका-ए-आझम's picture

20 Sep 2015 - 1:03 am | बोका-ए-आझम

एका संपूर्णपणे अनवट क्षेत्राला वाहून घेणे - जेव्हा त्याला आजच्यासारखे महत्व आलेले नव्हते - आणि त्यात निरलसपणे काम करत शिखर गाठणे यासाठी प्रचंड आत्मविश्वास, चिकाटी आणि संयम पाहिजे. त्याबद्दल लालटोपींना हॅटस् आॅफ! _/\_

सुहास झेले's picture

21 Sep 2015 - 6:10 pm | सुहास झेले

अगदी अगदी हेच बोलतो..... सलाम !!!

आणखी थोड़ा विस्तृत लेख आवडला असता. आटोपता घेतल्या सारखा वाटला. योगा मुळे होणारे फायदे, योगामुळे आलेले काही अनुभव, शिकवताना किंवा शिकवताना जाणवलेलं वेगळेपण असं काही लेखाच्या ओघात सांगता आलं असतं.
अर्थात आलेला लेख उत्तम च आहे. प्रदीर्घ आणि विस्तृत अनुभव असल्यानं अपेक्षा वाढल्या आहेत.
योगाबद्दल आणखी लेख अपेक्सीत धरत आहे.

अवांतर: ज्याप्रकारे लेखमाला सुरु आहे ते पाहून मिपा च्या कार्यकारी मंडळाला या गणेश लेखमालेबद्दल आमच्याकडून मिसळपार्टीची घसघशीत वर्गणी जाहीर करत आहे.
जियो!

श्रीरंग_जोशी's picture

20 Sep 2015 - 1:43 am | श्रीरंग_जोशी

आपल्या व्यावसायिक प्रवासाबद्दल अगदी सहजशैलीत लिहिलेला हा लेख खूप आवडला.

योग शिकवताना आलेल्या अनुभवांवर अन प्रत्यक्षा योगाभ्यासाबद्दल वेळ मिळेल अधिक विस्तृतपणे लिहावे ही विनंती.

रेवती's picture

20 Sep 2015 - 4:59 am | रेवती

आरोग्यदायी लेख आवडला. योगप्रशिक्षक म्हणून करियर कसे कर्ता येते याबद्दल समजले.
माझ्या आईने अनेक दशकांपूर्वी नाशिकच्या योग विद्या धाममधून व्यावसायिक प्रशिक्षण घेतले होते ते आठवते. अगदी लहान असल्यापासून घरात योगासने, व्यायाम होताना पाहून मुलांच्या मनावर सकारात्मक परिणाम होतो हे अनुभवले आहे.
एका चांगल्या लेखनाबद्दल आभार.

कैलासवासी सोन्याबापु's picture

20 Sep 2015 - 7:19 am | कैलासवासी सोन्याबापु

मला योग प्रशिक्षक भारी वाटतात,

खुल्या आर्थिकनिती नंतर चीन ने आपले परंपरागत व्यायाम प्रकार जितक्या अग्ग्रेस्सिवली विकले त्याचे मार्केटिंग केले (उदा. शाओलिन कुंग फु किंवा चीनी ताई इची) तितके मार्केटिंग ह्या सगळ्याच्या मुळाशी असलेल्या योगाचे झालेले जाणवत नसे. तुमच्या लेखातून तुम्ही घेतलेल्या मेहनतीबद्दल किंवा तुमच्या "जमाती" बद्दल कळले ,खुप मस्त वाटले! एम्बेसी ची माहिती नवीनच आहे मला, आज योग दिवस साजरा करणारे सरकारचे जितके करायला हवे त्याच्या दसपट अभिनंदन मी तुमच्या सारख्या डेडिकेटेड लोकांचे करू इच्छितो!

_/\_

लाल टोपी's picture

21 Sep 2015 - 1:03 am | लाल टोपी

बापूसाहेब चीनच्या मर्केटींग बाबतचे आपले निरीक्षण बरोबरच आहे, ते योगाचेही मार्केटिंग तेवढ्याच आक्रमकतेने करतायंत.

मुक्त विहारि's picture

20 Sep 2015 - 7:28 am | मुक्त विहारि

तुमच्यामुळे एका वेगळ्या "करियरची" माहिती मिळाली.

धन्यवाद.

तुमच्या कडून "योग" ह्या विषयावर अजून काही वाचायला मिळेल अशा अपेक्षेत.

मुवि.

खेडूत's picture

20 Sep 2015 - 7:43 am | खेडूत

लेख आवडला.
योग प्रशिक्षण हे करियर म्हणून पटकन डोळ्यासमोर येत नाही.
अजून सविस्तर वाचायला आवडेल.
याशिवाय ऋषी प्रभाकर यांची SSY, श्री श्री रविशंकरजी, व अन्य अनेक पंथ यामुळे नव्याने करणाऱ्याचा काहीसा गोंधळ उडतो. हे केवळ वेगळ्या लोकांनी चालवलेले अभ्यासवर्ग आहेत आणि अभ्यासक्रम तोच आहे का? त्याबद्दल सविस्तर लिहीता येईल का?

लाल टोपी's picture

21 Sep 2015 - 11:57 am | लाल टोपी

या सर्वांचे अभ्यासक्रम एकसारखे नाहीत. पारंपारीक योग पध्दतीमध्ये आधुनिक काळातील गरजांशी सांगड घालून वेगवेगळे प्रयोग केले आहेत. पण योगाचा मूळ दुवा समान आहे. अशा ब-याच प्रकारच्या योग प्रकारांचा उपयोग सध्या केला जात आहे यात अमुक एक पध्दत चांगली किंवा वाईट असे आहे असं मला वाटत नाही. बदल हा निसर्गाचा नियमच आहे. ज्यामध्ये तुम्हाला स्वतःला अधिक सहज वाटते तो कोणताही प्रकार आत्मसात करा.

योगप्रशिक्षणासारख्या अगदी वेगळ्याच क्षेत्रात तुम्ही केलेले करिअर आवडले. मनाजोगते काम करिअर म्हणून करायला मिळणे आणि ते यशस्वीपणे सुरु ठेवणे या गोष्टीचा कौतुकमिश्रित हेवा वाटला! :) अधिक वाचायला नक्कीच आवडेल.
एका उत्तम लेखाबद्दल धन्यवाद!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Sep 2015 - 8:33 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

१९८७ सारख्या काळामधे सुद्धा प्रवाहामधे नसणारे क्षेत्र निवडुन त्यामधे यशस्वी झाल्याबद्दल तुमचं अभिनंदन :). खुप छान लेख.

अनुभवाची एक एक पायरी चढत चढत सर्वोच्च स्थानी पोहोचा, मेहनत करायची तयारी असेल तर आर्थिक स्थैर्य, मान सन्मान तुमच्याकडे चालत येतील.

३०००% सहमत. :)

एक एकटा एकटाच's picture

20 Sep 2015 - 9:00 am | एक एकटा एकटाच

मस्त लेख
आवडला

पैसा's picture

20 Sep 2015 - 9:14 am | पैसा

सुंदर लेख! योग शिक्षक ही करियर होऊ शकते हेच माहीत नव्हते! लोकांचे आयुष्य सुधारायला मदत करताना आपलेही आरोग्य उत्तम रीत्या सांभाळले जाते याहून अधिक काय हवे!

तुमच्या बिझी शेड्युलमधून वेळ मिळेल तेव्हा योग म्हणजे काय आहे याबद्दल जरूर लिहा. योगाबद्दल इतक्या प्रकारचे गैरसमज असतात की ते फक्त चांगला योग शिक्षक दूर करू शकतो.

मुक्त विहारि's picture

20 Sep 2015 - 10:22 am | मुक्त विहारि

वाक्या वाक्याशी सहमत.

रुस्तम's picture

20 Sep 2015 - 1:13 pm | रुस्तम

+१

अजया's picture

20 Sep 2015 - 9:36 am | अजया

योगशिक्षण हे करिअर म्हणून निवडणे तेही त्या काळात. खरंच धाडस म्हणावे लागेल. लेख खरंच प्रेरणादायी आहे.
योग या विषयावर आपल्या लेखमालिकेच्या प्रतीक्षेत.

लेख आवडला. तुमच्या कार्याबद्दल धन्यवाद! "योग" ह्या विषयावर दीर्घ लेखमाला येऊ द्या.

दा विन्ची's picture

20 Sep 2015 - 10:13 am | दा विन्ची

तुमच्यामुळे एका वेगळ्या "करियरची" माहिती मिळाली.मनाजोगते काम करिअर म्हणून करायला मिळणे आणि ते यशस्वीपणे सुरु ठेवणे या गोष्टीचा कौतुकमिश्रित हेवा वाटला!

धन्यवाद.

मदनबाण's picture

20 Sep 2015 - 10:24 am | मदनबाण

योग सारख्या वेगळ्याच क्षेत्रात "करियर" घडवता येउ शकते ही माहिती मिळाली.
लेखन आवडले... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मोरया... :- दगडी चाळ

तुषार काळभोर's picture

20 Sep 2015 - 11:21 am | तुषार काळभोर

तुमच्याकडून एका विस्तृत लेखमालेच्या प्रतिक्षेत आहोत.

पद्मावति's picture

20 Sep 2015 - 12:58 pm | पद्मावति

उत्तम लेख.
एका अगदी वेगळ्या क्षेत्राची ओळख. मस्तं.

मितान's picture

20 Sep 2015 - 1:12 pm | मितान

अतिशय सुंदर लेख !!!
वलय नसलेल्या क्षेत्रात असं पाय रोवून उभे राहिलेले लोकच पुढे त्या क्षेत्राला वलय प्राप्त करून देतात !

अभ्या..'s picture

20 Sep 2015 - 1:13 pm | अभ्या..

अप्रतिम लिखाण.
फिटनेससंदर्भात काहेही सिरियसली करणार्‍यांचा अभिमान वाटतो.
शुभेच्छा आगामी कारकिर्दीसाठी.

बाबा योगिराज's picture

20 Sep 2015 - 1:55 pm | बाबा योगिराज

चांगल्या विषया वरचा चांगला लेख...
पुढील लेखनासाठी शुभेच्छा...

मित्रहो's picture

20 Sep 2015 - 2:25 pm | मित्रहो

योग शिक्षक हे करीअर होउ शकते असा कधीच विचार केला नव्हता.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Sep 2015 - 4:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

योग शिक्षणात इतक्या संधी आणि त्याही "योग" चा "योगा" होण्याअगोदरच्या काळापासून आहेत हे नवीनच समजले. या सर्वसामान्य रुळलेल्या चाकोरीबाहेरच्या तुमच्या करियरसंबंधी माहिती खूपच रोचक आहे. त्यासंबंधी अजून वाचायला नक्कीच आवडेल.

जयन्त बा शिम्पि's picture

20 Sep 2015 - 7:22 pm | जयन्त बा शिम्पि

योगशिक्षक होणे हे ध्येय नव्हते माझे , परंतू पाचवी सहावीत असतांना , वाचनाची उत्तम संवय लागल्यामुळे , मोठे पणी आपण शिक्षक अगर प्रोफेसर व्हावे असे वाटत असे. अकरावी ची परिक्षा दिल्यानंतर ( त्यावेळी १०+२+३ असा पर्याय नव्हता ) वडिलांनी डिप्लोमा
( विद्युत शाखा ) चा खुप आग्रह धरला होता, त्यामुळे डिप्लोमा पुर्ण करुन , व्यवसायाने राज्य विद्युत मंडळामध्ये , अभियंता म्हणून पद स्वीकारले. नंतर पुढे नाशिक योग विद्यापीठातुन , योग शिक्षकाचा कोर्स पुर्ण करुन, प्रमाणपत्र घेतांना , समारंभात , व्यक्त केलेल्या मनोगतात , मी म्हटले होते कि , " लहानपणी शिक्षक होण्याची इच्छा होती , किमान योग शिक्षक झाल्याने , वेगळ्या मार्गाने का होइना , इच्छा पुर्ण झाली." लेख प्रेरणादायी आहे, जमेल त्यांनी लाभ घ्यावा.

चाणक्य's picture

21 Sep 2015 - 8:05 am | चाणक्य

एका वेगळ्या वाटेवरील तुमच्या या वाटचाली बद्दल वाचून छान वाटले. नवीन मार्ग निवडायला एक प्रकारचे धाडस लागते.(व्य.नि. केला आहे.)

आगळ्या क्षेत्रातील वेगळे अनुभव वाचणे आवडले.
आता योग या विषयावर विस्तृत लेखन करावे ही विनंती.

सिरुसेरि's picture

21 Sep 2015 - 8:59 am | सिरुसेरि

छान अनुभव . त्याचबरोबर तुमचे योगासने शिकताना आलेले अनुभवही वाचायला आवडतील .

मृत्युन्जय's picture

21 Sep 2015 - 10:56 am | मृत्युन्जय

लेख आवडला. करीयरची एक वेगळी संधी म्हणुन योगाचे महत्व अधोरेखित करणारा म्हणुन तर अधिकच आवडला.

वेल्लाभट's picture

21 Sep 2015 - 1:48 pm | वेल्लाभट

अतिशय सुंदर लेख !

सानिकास्वप्निल's picture

21 Sep 2015 - 2:59 pm | सानिकास्वप्निल

लेख आवडला. वेगळ्या क्षेत्रातला उत्तम लेख.
लवकरच "योग" ह्या विषयावर ही लेखन जरुर करा.

पिशी अबोली's picture

21 Sep 2015 - 3:57 pm | पिशी अबोली

एक वेगळा मार्ग चोखाळताना तुम्ही त्या काळात दाखवलेला प्रचंड आत्मविश्वास प्रेरणा देऊन गेला.

समीरसूर's picture

21 Sep 2015 - 6:02 pm | समीरसूर

क्या बात है! अगदी वेगळे क्षेत्र निवडणे आणि त्यात कष्टाने यशस्वी होणे खरोखर कौतुकास्पद आहे. आपला हा प्रवास आवडला.

मी-सौरभ's picture

21 Sep 2015 - 7:25 pm | मी-सौरभ

प्रत्येक शब्दाशी सहमत.

विवेकपटाईत's picture

21 Sep 2015 - 8:08 pm | विवेकपटाईत

सुन्दर लेख, आजच योग बाबत लोकांची रुची वाढली आहे, जिम मध्येही योग शिकवला जाऊ लागला आहे. योग शिक्षिकांसाठी निश्चित अच्छे दिन आले आहे.

हरीहर's picture

22 Sep 2015 - 10:48 am | हरीहर

लेख आवडला अतिशय प्रेरणादयी लेख. योग प्रशिक्षक होण्यासाठी किती वर्षाचा कोर्स अस्तो?

लाल टोपी's picture

22 Sep 2015 - 1:51 pm | लाल टोपी

वेगवेगळ्या संस्थाचे विविध कालखंदचे अभ्यासक्रम आहेत. परंतु कैवल्यधाम, योगविद्याधाम, एस.व्यासा, बिहार स्कुल ऑफ योग, मोरारजी देसाई नॅशनल ईंस्टीट्यूट ऑफ योग यासारख्या संस्थाचे अभ्यासक्रम जवळपास सर्वत्र मान्यताप्राप्त आहेत.

ज्ञानोबाचे पैजार's picture

22 Sep 2015 - 10:52 am | ज्ञानोबाचे पैजार

आजच्या काळात देखील करियर म्हणुन योग शिक्षक होण्याचा कोणी विचार करता असेल की नाही या बद्दल शंका आहे. तुमचे करावे तेवढे अभिनंदन थोडेच आहे.

- तुम्ही अशी वेगळी वाट निवडत असताना तुमच्या पालकांच्या प्रतिक्रीया कशा होत्या?
- आताच्या काळात ज्यांना हे करियर करायचे असेल त्यांनी काय काय केले पाहिजे?

या बद्दल काही लिहिलेत तर ते वाचायला नक्की आवडेल.

पैजारबुवा,

अन्या दातार's picture

22 Sep 2015 - 2:39 pm | अन्या दातार

एका अनवट क्षेत्रातली तुमची कामगिरी वाचून थक्क झालो. अजून काही अनुभव वाचायला आवडेल.

प्रास's picture

22 Sep 2015 - 10:48 pm | प्रास

अभ्यासाचा भाग म्हणून योगशास्त्र आणि योगशिक्षक यांच्याशी संपर्क झाला होता. काही काळ स्व-अभ्यासही केला पण आम्हाला काही योगाचा योग आला नाही. पण तेव्हा योग आणि योगशिक्षकांचा करिअर दृष्टीने आवाका चांगला लक्षात आला होता.

लेख जरा त्रोटक वाटला तरी चांगला आहे.

लाल टोपी's picture

23 Sep 2015 - 11:13 am | लाल टोपी

अगदीच ठरऊन या क्षेत्रात आलो असें नाही झालं. सुरुवातील योगाचा डिप्लोमा केला आणि लगेचच संधी मिळाली आणि खरं तर बाकीच्या गोष्टी आपोआप घ्डत गेल्या. घरच्यांनी कधीही हेच कर असे दडपण न आणता जे करयचे ते कर अशी मोकळीक दिली होती.

लाल टोपी's picture

24 Sep 2015 - 11:05 am | लाल टोपी

श्री पैजार् बुवा यांना आहे.

प्रतिसाद देऊन प्रोत्साहन देणा-या सर्वाचेच मनापासून आभार. अनेकांनी लिहिल्याप्रमाणे योग विषयावर लवकरच लिहायला घेणार आहे. मला खरोखरच या विषयात इतक्या लोकांना रुची असेल असे वाटले नव्हते.

सुधीर's picture

25 Sep 2015 - 8:25 am | सुधीर

शेवटी काय तर, 'हे जग मी सुंदर करून जाईन' या उक्तीला सार्थ करण्यापेक्षा आणखी आपणास तरी आपल्या 'करीयर' कडून काय हवे!

सुंदर!

सध्या योगासने फक्त व्यायाम म्हणून आणि काही प्रमाणात माईंड रिलॅक्सेशन म्हणून करतो. पण याही पलिकडे योगासनांचे महत्त्व आहे असे ऐकून माहीत आहे. तुमच्या अनुभवाची आणि ज्ञानाची शिदोरी वाचकांसाठी उघडी कराल अशी आशा करतो.

सुनील's picture

25 Sep 2015 - 3:00 pm | सुनील

लेख आवडला.

एक वेगळच करीयर निवडून त्यात यशस्वी झालात हे खूपच छान.

अवांतर - लाल टोपी हा आय्डी वाचून मला तुम्ही लायनक्स अ‍ॅड्मिन वैग्रे असाल असे वाटले होते!

मस्त लेख . आपल्याला शुभेच्छा . योगविद्या सर्वांपर्यंत पोचली पाहिजे . योग हि नुसती शिकण्याची किवा शिकवण्याची गोष्ट नसून दैनंदिन जीवनात उपयोगात आणली पाहिजे . रामदेवबाबा काही योगासनं शिकवतात म्हणजे योगविद्या शिकवतात असं नव्हे . हे तर हिमनगाच टोक सुधा नाही . परंतु योग्शास्त्राचा प्रसार करण्यात रामदेवबाबांचा फार मोठा वाटा आहे .

लाल टोपी's picture

29 Sep 2015 - 2:41 pm | लाल टोपी

तुम्ही म्हणता ते शब्दशः खरे आहे. रामदेव बाबांबद्दल कोणी काहीही म्हणाले तरी त्यांनी योग घरंघरात पोहोचवला ही वस्तुस्थिती कोणीच नाकारु शकणार नाही.

तुमचा अभिषेक's picture

29 Sep 2015 - 7:26 pm | तुमचा अभिषेक

उत्तम लेख !

<<इतर लेखकांच्या व्यवसायाला असणारे वलय कदाचित योग शिक्षकाला नसेल>>
भविष्यात अच्छे दिन येतील अशी आशा करूया :)

वेगळ्या करियर क्षेत्राची निवड त्यातही योगप्रक्षिशक होण्याचे धाडस त्याकाळी केले याला सलाम. आपले अनुभव जरूर वाचायला आवडतील.