आर्थिक संकट आणि बचत.

रामशास्त्री's picture
रामशास्त्री in जनातलं, मनातलं
25 Nov 2008 - 2:06 am

आपल्या संस्कृतीने आणि संस्कारांनी लहानपणापासूनच बचतीचे महत्व आपल्या मनावर बिंबवले आहे. विविध सणांच्या निमित्ताने आपण जनावरांची, यंत्रसामुग्रीची, हिशेबाच्या वह्यांची पूजा करत असतो. खरी पूजा म्हणजे केवळ पोकळ विधी नव्हेत. एखाद्या रिक्षावाल्याने नुसता रिक्षाला हार घालणे पुरेसे नाही. त्या आपल्या उपजीविकेच्या साधनाचे महत्व समजून घेऊन त्याने आपल्या रिक्षाची नीट निगा राखायला हवी. सणवार एकवेळ सोडून देऊ, पण आपले संस्कारही हेच सांगतात. लहानपणी ताटात अन्न शिल्लक ठेवले म्हणून अनेकांनी मार खाल्ला असेल. कष्टाने श्रीमंत झालेल्या माझ्या ओळखीतील काही घरांमधे आजदेखील दुधाच्या पिशव्या स्वच्छ धुवून वाळवून ठेवल्या जातात, आणि रद्दीत दिल्या जातात. ह्यातून नगण्य पैसा मिळत असेल, पण ह्या एका कृतीकडे चिकटपणा म्हणून न पाहता बचत ही एक प्रवृत्ती म्हणून पहावे. जे लोक क्षुल्लक बचतीसाठी एवढी धडपड करतात, ते उद्योगधंद्यामधे काटकसर होण्यासाठी किती प्रयत्न करत असतील! "Reduce, reuse, recycle" इत्यादि मॅनेंजमेंटचे धडे हल्ली निघाले. ह्या सर्व गोष्टी सगळ्याच भारतीयांच्या रक्तातच आहेत!

"एक रूपयाची बचत म्हणजे एक रूपयाची कमाई" असे म्हटले जाते. माझा विचार मात्र वेगळा आहे. एक रूपयाची बचत ही खरी दहापंधरा रूपयांची कमाई असते. सगळ्या उद्योगजगतामधे करोत्तर नफा आणि विक्री, याचे गुणोत्तर काढले, तर किती असावे? पाच, दहा, वीस टक्के? माझ्या मते दहा टक्के सरासरी धरण्यास हरकत नाही. याचा अर्थ दहा रूपयाची वस्तू विकली, तर एकंदर उद्योगजगतास एक रूपयाचा नफा होईल. ह्याचाच व्यत्यास करून असे म्हणता येईल, की एक रूपयाची बचत केली, तर दहा रूपयांची कमाई होईल. त्यामुळे एक रूपयाची बचत ही एक नव्हे, तर दहा रूपयांची कमाई झाली.

वर उद्योगांचे उदाहरण दिले आहे. मात्र, हे नोकरदारांनाही लागू पडेल. आजकालच्या नोकर्‍यांमधे गलेलठ्ठ वार्षिक पगार दिसत असले, तरी महिन्याच्या एक तारखेला त्यापैकी थुंकी लावून मोजता येतील अशा किती नोटा हातात पडतात, हा एक संशोधनाचाच विषय ठरावा. नंतर काही आवश्यक, काही वायफळ खर्च होऊन थोडीफार बचत होते. सध्यापेक्षा दीडपट, दुप्पट बचत करणे अनेकांना शक्य असावे. ह्याचा परिणाम वेतन दीडपट, दुप्पट करण्यासारखा आहे - हे किती जणांना शक्य असेल? अनेकजण जेवढी बचत, तेवढे अतिरिक्त उत्पन्न असे मानतात, पण उत्पन्न तेवढे वाढले असे न म्हणता त्या प्रमाणात वाढले, असे म्हणावे लागेल.

अर्थात अर्थशास्त्रातला diminishing marginal utility चा नियम इथेही लागू पडेल. जे अगोदरच फार बचत करतात, त्यांच्यासाठी एक अधिक रूपयाची बचत करण्याची उपयुक्तता, अथवा फायदा, कमी असेल. पण बहुतेकजण पुरेशी बचत करत नाहीत, असे माझे वैयक्तिक मत आहे.

पाश्चात्य चंगळवादी संस्कृतीचे अंधानुकरण करणे आपण टाळले पाहिजे. क्रेडिट कार्डे, फालतू कारणासाठीची कर्जे, मॉल्स, मल्टिप्लेक्स या सगळ्या गोष्टींपासून आपल्या मध्यमवर्गाने शक्यतोवर दूर रहावे. आपल्या देशाची आर्थिक प्रगती झाली असली तरीही आजही आपण विदेशी गुंतवणूकीवर अवलंबून आहोत हे विसरून चालणार नाही. अमेरिकन अर्थव्यवस्थेसारखी आपली अर्थव्यवस्था कोसळणे आपल्याला परवडणार नाही. मोठी अर्थव्यवस्था, आणि तरीही पुरेशी देशी गुंतवणूक असे दिवस पहायचे असतील तर बचत अपरिहार्य आहे. वैयक्तिक पातळीवर सुद्धा सद्यस्थितीचा विचार केला असता बरीच बिकट परिस्थिती आहे. अनेकांच्या नोकर्‍यांवर टांगत्या तलवारी आहेत. काटकसरीने राहणे कायमच योग्य होते, पण आज ती काळाची गरज बनली आहे.

बचत सुरू करण्यास कधीही उशीर झालेला नसतो.

अर्थकारणमत

प्रतिक्रिया

सर्किट's picture

25 Nov 2008 - 2:30 am | सर्किट (not verified)

ह्याचाच व्यत्यास करून असे म्हणता येईल, की एक रूपयाची बचत केली, तर दहा रूपयांची कमाई होईल.

नाही, असे नाही म्हणता येणार.

कारण, "कमाई" म्हणजे रेव्हेन्यु नाही, कमाई म्हणजे प्रॉफिट !

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

चतुरंग's picture

25 Nov 2008 - 3:33 am | चतुरंग

व्यत्यास योग्य ठरत नाही इथे!
वाचवलेला १रु. हा तुम्ही करत असलेल्या खर्चात केलेली कपात असते तो तुम्ही आधीच मिळवलेला असतो, आता तो फक्त खर्चाच्या रकान्यात न जाता बचतीच्या रकान्यात जातोय!

बाकी ह्या सर्व गोष्टी सगळ्याच भारतीयांच्या रक्तातच आहेत!हे हल्लीच्या काळात फारच धाडसी विधान ठरावे! मागल्या वर्षी मॉल्समधे भटकलो होतो त्यावेळी नवीनच नोकरीला लागली असावीत अशी दिसणारी पोरे-पोरी ज्याप्रकारे सटासट कार्डावरुन खरेदी करत होती ते बघून, आपल्याकडेही अनावश्यक खरेदीची लाट मोठ्या प्रमाणावर आलेली आहे की काय असं वाटून मी खरंच बेचैन झालो होतो! त्यांची खरेदी कदाचित आवश्यक असेलही पण मला बेचैनी आली हे खरे!

चतुरंग

सर्किट's picture

25 Nov 2008 - 5:03 am | सर्किट (not verified)

क्रेडिट कार्ड वर केलेली खरेदी ही महागाईच्या काळात बचत घडवून आणते. जोवर तुम्ही महिन्याचे बिल त्या महिन्यातच भरत असाल, तर.

कारण महागाईच्या काळात आजच्या रुपयाचे मूल्य महिन्याभराने घसरते.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

आनंद घारे's picture

25 Nov 2008 - 3:44 am | आनंद घारे

काटकसरीने राहणे कायमच योग्य होते
या मुख्य मुद्द्याशी मी शंभर टक्के सहमत आहे. मात्र खर्च आणि गुंतवणूक यातला फरक समजून घेणे आवश्यक आहे. नुसतेच वाचवून ठेवलेले धन भविष्यात उपयोगी पडेलच असे नाही.
"कमाई" म्हणजे रेव्हेन्यु नाही, कमाई म्हणजे प्रॉफिट !
सहमत आहे. मात्र स्वयंरोजगार करणारे बहुतेक लोक ( शेतकरी, शिंपी, आचारी यासारखे) या दोन्हीत फरक करत नाहीत.
सध्यापेक्षा दीडपट, दुप्पट बचत करणे अनेकांना शक्य असावे. ह्याचा परिणाम वेतन दीडपट, दुप्पट करण्यासारखा आहे -
हे तितकेसे बरोबर वाटत नाही. बढती मिळून किंवा नवी नोकरी मिळून दुप्पट पगार झाला तर लगेच खर्च बरोबर दुप्पट होऊन दुप्पटच बचत होईल असे नाही. कदाचित पूर्वीचा पगार पुरतसुद्धा नसेल आणि राहणीमानात फरक केला नाही तर नव्या पगारात चांगली घसघशीत बचत करणे शक्य होईल. थोडा अवास्तव खर्च टाळून अनेक लोकांना सध्याच्या वेतनातूनसुद्धा सध्यापेक्षा दीडपट, दुप्पट बचत करणे अनेकांना शक्य असावे. हाच उद्देश या वाक्यामागे असावा.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/

सर्किट's picture

25 Nov 2008 - 5:00 am | सर्किट (not verified)

मात्र स्वयंरोजगार करणारे बहुतेक लोक ( शेतकरी, शिंपी, आचारी यासारखे) या दोन्हीत फरक करत नाहीत.

असे कसे ? ह्या सर्वांना कच्च्या मालावर खर्च करायला लागणारा पैसा, ते त्यांच्या कमाईमध्ये कसा धरू शकतील ? बी बियाणे, खते , सुई दोरा, झारा, पळी हे रेव्हेन्युतून वजा करावे लागतीलच ना ?

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

रामशास्त्री's picture

25 Nov 2008 - 5:18 am | रामशास्त्री

ह्या सर्वांना कच्च्या मालावर खर्च करायला लागणारा पैसा, ते त्यांच्या कमाईमध्ये कसा धरू शकतील

कारण त्यांना कमाई म्हणजे प्रॉफिट हे माहित नसावे

भाग्यश्री's picture

25 Nov 2008 - 3:59 am | भाग्यश्री

रामशास्त्री काका,

लेख आवडला.. बचतीचं महत्व तर तेव्हढं आहेच..
बाकी, चतुरंगंशी सुद्धा सहमत.
आपल्या रक्तात बचत आहे वगैरे वाक्यं म्हणणं जरा अवघडंच आहे आता.. पूर्वीच्या लोकांसारखं काटकसरीने राहण्याचे दिवस गेलेत.. क्रेडीट कार्ड्सने तर रानच मोकळं झालंय! :|

http://bhagyashreee.blogspot.com/

धनंजय's picture

25 Nov 2008 - 4:24 am | धनंजय

वैयक्तिक बचतीबाबत सहमत. काटकसरीची प्रवृत्ती संस्कृतीत मिळाली आहे.

समाजातील सर्व लोकांनी बचत करून मात्र चालणार नाही. (सगळेच बचत करतात, तर कर्ज कोण घेणार? = बचतीची गुंतवणूक कुठे करणार?) अच्छा, समजा गुंतवणूक नव्या कारखान्यांमध्ये करायची आहे - समाजात उद्योजकांना तेवढ्यापुरते कर्ज घेण्याची आपण मुभा देऊया. पण जर चंगळवाद आणि नवीन खर्च टाळायचे असतील, तर या नवीन कारखान्यातून निघणारा नवीन माल कोण विकत घेणार? मग या उद्योजकांचा फायदा होणार नाही, आणि आपण बचतदारांनी दिलेली कर्जे ते बुडवतील. (जोवर बेसुमार निर्यात शक्य आहे, तोवर माल परदेशात विकता येईल. पण सध्याच्या जागतिक मंदीत ते शक्य नाही.)

मला वाटते, काटकसर हा वैयक्तिक सद्गुण असला तरी सामाजिक दुर्गुण आहे, असे बाजाराधिष्ठित अर्थकारणाचे विश्लेषण आहे. सर्वांनी बचत करायची असेल तर आधी बाजाराधिष्ठित अर्थकारण मोडीत काढून दुसरे कुठले अर्थकारण लागू करणे अपरिहार्य आहे.

(मी खुद्द बचत करतो, आप्तांना बचत करण्याचाच सल्ला देतो, हे सांगणे नलगे. पण तिर्‍हाईत लोक चंगळ करण्यासाठी माझ्याकडून कर्ज घेतील, आणि माझ्या बचतीवर मला थोडेतरी व्याज मिळेल अशी आशा राखतो.)

मुक्तसुनीत's picture

25 Nov 2008 - 4:36 am | मुक्तसुनीत

असे असल्यास या सार्‍यामधे कुठे विसंगती नाही काय ?
"मला" बचत करायची आहे ; पण "सर्वांनीच" बचत केली तर सर्व यंत्रणा आर्थिक घडामोडींच्या अभावामुळे गोठून जाईल. "कुणीतरी" चंगळ करणे आणि त्याकरता कर्ज घेणे आवश्यक आहे. म्हणजे कुणीतरी त्या कर्जाच्या व्याजाखाली दबले नाही तर व्यवस्था चालायची नाही.

मी वर लावलेला तर्क चुकीचा/अपुरा असेल तर तसे सांगावे. अन्यथा हे एक क्रूर असे वास्तव म्हणून स्वीकारायला हवे.

सर्किट's picture

25 Nov 2008 - 4:40 am | सर्किट (not verified)

पाणी वाहते राहणे, हे महत्वाचे. पाणी वाहण्यासाठी उतार हवा असतो. जेथे सर्वांची पातळी सारखी असते, तेथे पाणी वाहत नाही.

कम्युनिस्ट रशियात बटाट्यांच्या दुकानांसमोरच्या रांगा ह्याची साक्ष पटवतील.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

धनंजय's picture

25 Nov 2008 - 5:17 am | धनंजय

"समान पातळीवर पाणी वाहात नाही" आणि "रशियातील बटाट्यांसाठी रांगा" बहुधा वेगळे मुद्दे असावेत.

पाणी वाहाणे :

आता हे खरे आहे, की जिथे प्रत्येक व्यक्ती पूर्ण स्वावलंबी आहे, तिथे कुठलीच देवाणघेवाण होणार नाही. जिथे लोक पूरक विशेष-प्रावीण्य मिळवतात (कॉम्प्लेमेंटरी स्पेशलायझेशन), तिथे देवाणघेवाण होतेच - शेतकरी चांभाराला धान्य देतो, चांभार शेतकर्‍याला जोडे देतो. कोण वर-खाली असे स्पष्ट दिसत नाही.

बहुतेक प्रकारचा माल स्वतः वापरता येतो, किंवा त्याची देवाणघेवाण करता येते. त्यामुळे स्थिर असलेल्या मालाला (तो सडेपर्यंत!) स्वाभाविक किंमत असते.

प्रतिभूत चलन (पैसा) मात्र एक अपवादात्मक माल आहे. त्याचे मूल्य केवळ देवाणघेवाणीतच असते. त्याचा दुसरा कुठला वापर करता येत नाही. पैसा सदैव वाहावाच लागतो. (कॉम्युनिस्ट रशियातले रूबल का असेनात. वाहावेच लागतात.)

कॉम्युनिस्ट रशियातील बटाट्यांच्या रांगा :

हा वेगळाच काही प्रकार आहे. बटाट्यांचे उत्पादन मागणीपेक्षा कमी होते. यात केंद्राच्या योजनांची अकार्यक्षमता दिसते. माझ्या वाटेतल्या चर्चच्या धर्मादाय भटारखान्यासमोर (सूप किचन समोर) बेघर लोकांची रांग दिसते. आमच्या येथे अन्नाचा पुरवठा (उत्पादन म्हटले नाही, हे लक्षात असावे) मागणीपेक्षा कमी आहे. मी खुद्द प्रतिबंधक चाचण्यांसाठी (हेल्थ चेक अपसाठी) डॉक्टराच्या तारखेसाठी अनेक महिन्यांच्या रांगेत उभा आहे. येथेसुद्धा आरोग्यवाटप योजनांची अकार्यक्षमता दिसते. डॉलरच्या द्रव असण्याशी संबंध नसावा. पाणी वाहाण्याच्या पातळीपेक्षा हा वेगळाच मुद्दा असावा असे मला वाटते.

सर्किट's picture

25 Nov 2008 - 5:26 am | सर्किट (not verified)

बटट्यांचे उत्पादन मागणीपेक्षा कमी का होते, ह्याचे कारण हेच की, बटाट्याचे भाव रुबलच्या मूल्याशी निगडीत नव्हते. म्हणजे रशियाबाहेर रूबल कितीही खाली वर झाला, तरीही प्रत्येक कुटुंबाला दिवसाला एकच किलो बटाटे, एकाच किंमतीत मिळण्याची योजना होती. त्यामुळे बटाटा उत्पादकांना इन्सेंटिव्ह काय ? त्यांचे पाणी एकाच ठिकाणी होते. (तुम्ही हेल्थ चाचण्यांसाठी रांगेत उभे असण्याचे कारण हेच, की इन्श्युरन्स कंपनीने डॉक्टरांना चाचणीसाठी भाव ठरवून दिले आहेत, प्रत्यक्ष मागणीशी त्याचा संबंध नाही - एच एम ओ आहे ना तुमची ?) तुम्ही डॉक्टरांना सांगा, की तुम्ही त्यांना ते मागतील एवढे पैसे द्यायला तयार आहात. मग तुम्ही त्या रांगेतून पुढे याल. पहिला नंबर.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

धनंजय's picture

25 Nov 2008 - 6:03 am | धनंजय

मला रांगेत पहिले स्थान मिळाले तरी उरलेली रांग तशीच राहील ना? म्हणूनच तर सूप किचनचेही उदाहरण दिले होते. बॉल्टिमोरमध्ये ज्यांना दुकानात जाऊन अन्न विकत घेता येते, ते जातात (म्हणजे बेघर लोकांच्या रांगेच्या खूपच पुढे जातात.) पण बेघर लोकांची रांग राहातेच.

सोव्हिएत संघराज्यांत काळाबाजार मोठ्या प्रमाणात चाले. त्यामुळे रोज पैसे टाकून हवे तेवढे बटाटे मिळवणारे होतेच. (पैसे देऊन डॉक्टराकडे तारीख घेण्यासारखे.)

रूबलच्या आंतरराष्ट्रीय भावाशी बटाट्यासाठी रांगेचा संबंध लावणे मला तरी ओढूनताणून वाटते. अन्न हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठांतच घेतले पाहिजे, या विचाराबाबत अमेरिका आणि युरोपातील देश बरेच दुटप्पी आहेत. ही सरकारे अवाच्या सवा किमती देऊन (सबसिडी) शेतकर्‍यांकडून भरपूर अन्न उत्पादन करून घेतात. सबसिडी आणि टॅरिफ यांच्या मिलाफानंतर आंतरराष्ट्रीय बाजारातील डॉलरच्या किमतीचा येथील बटाट्याच्या किमतीशी तितका थेट संबंध राहात नाही.

सोव्हिएत रशियातील बटाट्याच्या उपलब्धतेचे आंतरराष्ट्रीय चलन-बाजारातील रूबलच्या किमतीला बाजूला ठेवून बर्‍यापैकी आर्थिक विश्लेषण करता यावे असे मला वाटते.

(इतकेच काय - "इन्सेंटिव्ह काय" या तर्कासाठी लहान 'बंद' बाजाराचे उदाहरणही देता येईल. म्हणून "सामाजिक बचत" या मुद्द्यापेक्षा हा मुद्दा मला वेगळा वाटतो.)

"सगळेच अर्थकारण एकच मोठा गुंता असतो" या अर्थी सगळ्या मुद्द्यांचाच एकमेकांशी संबंध आहे म्हणा. कॅलिफोर्नियातील संत्र्यांचा भाव बेंगळूरातील घरभाड्याशी संबंधित आहे. पण त्यातल्या त्यात जवळचे संबंध असलेले दुवे असल्यास समजण्यासाठी बरे असते.

सर्किट's picture

25 Nov 2008 - 8:59 am | सर्किट (not verified)

धनंजय,

एकदा मागणीनुसार पुरवठ्याचे मूल्य वाढले, की त्या बाजारात विक्रेत्यांचे प्रमाण वाढेल, ह्याकडे तुम्ही पूर्ण दुर्लक्ष केलेले आहे. एकदा बटाट्यांच्या उत्पादनाला मागणीनुसार वाढता भाव मिळायला लागला, की बटाट्याचे उत्पादन वाढेल, ही गोष्ट तुम्ही पार नजरे आड केलेली आहे.आआणि उत्पादन वाढले की विक्रेते वाढतील, आणि विक्रेते वाढले, की ग्राहकांच्या रांगा कमी होतील.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

मी "इन्सेंटिव्ह असते" याविषयी कुठलीच असहमती सांगत नाही. किंमत वाढली की उत्पादक अन्य माल बनवण्याऐवजी तो महागाचा माल बनवतात, वगैरे, हे सगळे ठीकच आहे. याकडे मी दुर्लक्ष करत नाही, पण या चर्चाविषयाच्या संदर्भात ही बाब मी मनात विषेशकरून का आणावी?

बटाट्यांसाठी रांगेचा "आर्थिक संकट आणि बचत"->"पूर्ण समाज बचत करू शकत नाही, कोणालातरी कर्ज घ्यावे लागते" या विचारधारेशी थेट संबंध नाही, असे मी म्हणत आहे.

धनंजय's picture

25 Nov 2008 - 4:50 am | धनंजय

बरोबर अर्थ लावलेला आहे.

अन्यथा हे एक क्रूर असे वास्तव म्हणून स्वीकारायला हवे.

स्वीकारायलाच हवे असे नाही. आपल्या आदल्या पिढीला कर्ज देऊन (म्हणजे त्यांना म्हातारपणात सांभाळून) त्याची फेडणी पुढच्या पिढीकडून घेता येते (आपल्या निवृत्तीनंतर पुढच्या पिढीकडून स्वतःला सांभाळून घेणे). हे सामाजिक सुरक्षा योजनांचे (सोशल सेक्यूरिटी स्कीम)चे अर्थकारण असते. (अनेक कुटुंबाचे घरगुती अर्थकारण पूर्वी असेच होते.) पण हे बाजाराधिष्ठित अर्थकारणापेक्षा वेगळे असते. असे अन्य पर्यायही असू शकतील. युद्धाचे अर्थकारणही असेच वेगळे असू शकते. युद्ध करूनही ही कोंडी फोडली जाऊ शकते. (एका देशाच्या बचतीची किंमत वाचते, दुसर्‍या देशातली बचत बेचिराख होते, अशा रीतीने नवा डाव मांडता येतो.)

बाजाराधिष्ठित अर्थकारणच हवे असल्यास हे क्रूर वास्तव म्हणून स्वीकारावे लागेल.

सर्किट's picture

25 Nov 2008 - 4:58 am | सर्किट (not verified)

१० % महागाईच्या काळात एक रुपयाची बचत म्हणजे ९० पैशांची कमाई. कारण आज एक रुपयात दहा बटाटे मिळत असतील, तर वर्षाभराने त्याच रुपयात ९ बटाटे मिळतील.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

रामशास्त्री's picture

25 Nov 2008 - 5:02 am | रामशास्त्री

जर तुम्ही १ रूपया कपाटात बंद करून ठेवलात तर...अन्यथा नाही. दहा का, अकराही मिळतील!

सर्किट's picture

25 Nov 2008 - 5:06 am | सर्किट (not verified)

परंतु, समजा तो तुम्ही बँकेत ठेवला, आणि सर्वांनी बचत करून कुणीही बँकेकडून कर्ज घेतले नाही, तर तुम्हाला मिळणारा व्याजदर शून्य होईल (खरे तर तो दर ऋण मध्ये जाईल, कारण बँकेला तुमचा रुपया सांभाळायला लागणारा खर्च त्यातूनच वजा होईल.) अशा परिस्थितीत तुमचा रुपया कपाटात ठेवल्यासारखेच झाले.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

रामशास्त्री's picture

25 Nov 2008 - 5:14 am | रामशास्त्री

तुमचा गैरसमज झाला आहे. मी फक्त कुटुंबांनी अधिक बचत करावी असे म्हटले आहे. उद्योगांनी नव्हे.
कुटुंबांकडचे अतिरिक्त भांडवल उद्योगांकडे जावे हाच बचतीचा उद्देश आहे.

यापुढे तुम्ही विचाराल की मग उत्पादने कोण विकत घेणार? सध्या तीव्र गतीने प्रगती करणारे बहुतेक देश निर्यातप्रधान आहेत.

सर्किट's picture

25 Nov 2008 - 5:19 am | सर्किट (not verified)

समजा, आयातीपेक्षा निर्यात वाढली, तर ज्या देशाला निर्यात करतो आहोत, त्या देशाच्या मुद्रेचे भाव निर्यातप्रधान देशाच्या तुलनेत खूपच पडतील. म्हणजे समजा भारताची अमेरिकेला निर्यात खूप वाढली आहे, आणि आयात शून्य झाली आहे, तर रुपयाचे भाव डॉलरच्या तुलनेत खूप वाढतील. मग भारतातून निर्यात झालेल्या वस्तू अमेरिकेला परवडणार नाहीत. आणि ही निर्यात बंद पडेल. मग ?

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

रामशास्त्री's picture

25 Nov 2008 - 5:23 am | रामशास्त्री

तेव्हा आपण अमेरिकेत गुंतवणूक चालू करू.

सर्किट's picture

25 Nov 2008 - 5:41 am | सर्किट (not verified)

अहो, पण निर्यात बंद पडली तेव्हा तुमचे उद्योगधंदे पण बंद पडले ना ! सगळे लोक नोकर्‍या गेल्यांवर / उद्योग बंद पडल्यावर बाहेरच्या देशांत गुंतवणूक कशी करतील ??

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

रामशास्त्री's picture

25 Nov 2008 - 5:54 am | रामशास्त्री

असा कोणताही बदल अचानक होत नसतो.
निर्यात हळूहळू कमी होऊ लागेल तेव्हाच पावले उचलली जातील.

कृपया विषय भरकटवू नका. सद्य परिस्थितीबद्दल बोला.

रामशास्त्री's picture

25 Nov 2008 - 6:09 am | रामशास्त्री

दोन वेळा दिसत असल्याने काढला.

रामशास्त्री's picture

25 Nov 2008 - 6:07 am | रामशास्त्री

१० % महागाईच्या काळात एक रुपयाची बचत म्हणजे ९० पैशांची कमाई. कारण आज एक रुपयात दहा बटाटे मिळत असतील, तर वर्षाभराने त्याच रुपयात ९ बटाटे मिळतील.

असे तुम्ही आधी म्हणाला होतात.


परंतु, समजा तो तुम्ही बँकेत ठेवला, आणि सर्वांनी बचत करून कुणीही बँकेकडून कर्ज घेतले नाही, तर तुम्हाला मिळणारा व्याजदर शून्य होईल (खरे तर तो दर ऋण मध्ये जाईल, कारण बँकेला तुमचा रुपया सांभाळायला लागणारा खर्च त्यातूनच वजा होईल.) अशा परिस्थितीत तुमचा रुपया कपाटात ठेवल्यासारखेच झाले.

असे त्यामागे गृहित धरले आहे हे नंतर सांगितलेत.

मला असे वाटते आहे की उगीच विषयास फाटे फोडावेत आणि येनकेनप्रकारेण आपलेच शेवटचे म्हणणे असावे असे तुम्हाला वाटते. तुमचा हेका माझ्या सहनशक्तीस हरवेल असे वाटते आहे. त्यामुळे उगीच दोघांचाही वेळ वाया न घालवता मी गप्प बसतो.

याखाली प्रतिक्रिया लिहा, आणि आनंदात रहा.

सर्किट's picture

25 Nov 2008 - 6:22 am | सर्किट (not verified)

चर्चेचा सारांश एवढाच, गुंतागुंतीच्या अशा विषयात कधीही ब्लॅक-अँड-व्हाईट नसते. करड्या रंगांच्या विविध शेड्स दिसतात.

बचतीचा दर भारतात कमी कमी होत असताना, भारताची आर्थिक स्थिती वाढतच होती.

http://investing.fentonreport.com/labels/trends.html

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

मुक्तसुनीत's picture

25 Nov 2008 - 5:14 am | मुक्तसुनीत

माझा एक सहकारी आहे. त्याच्याशी केव्हातरी बोलताना हा विषय निघाला होता. त्याच्या घराची किंमत १ लाख डॉलर्सनी खाली आलेली आहे. काही वर्षांपूर्वी घराची किंमत आताच्या बाजारच्या किमतीपेक्षा दिडेक लाख डॉलर्स जास्त होती तेव्हा त्याने पन्नास हजाराचे अधिक कर्ज (होम इक्विटी लाईन ऑफ क्रेडीट) घेतले होते ; ते सारे खर्च झाले. आज त्याच्या घराच्या कर्जाचे व्याज तो केवळ भरतो. मुद्दलातला एकहीपैसा फेडलेला नाही.

मी त्याला विचारले की कुठे गेले ५० हजार डॉलर्स ? तर तो म्हणाला : आम्ही हवाई , डिस्ने वगैरे वगैरे ला गेलो. नवी बी एम डब्लू घेतली वगैरे वगैरे.

अजून तो बुडलेला नाही ; पण आता ट्रिपा थांबलेल्या आहेत.

हे सारे आता सांगायचे कारण म्हणजे , "ऋणम् कृत्वा घृतम् पिबेत्" चा याहून मोठा प्रकार मी आजवर कुठेही पाहिला नाही. त्याला मी एकदा (माझ्या ६ वर्षे जुन्या खटारा मोटारीमधे) रात्री उशीरा घरी सोडले होते. तेव्हा त्याचे टोलेजंग घर पाहून (खोटे कशाला बोला !) अंमळ असूया वाटली होती. आज त्या घराची माझ्या मनातली कल्पना "हस्तिदंती मनोरा" अशी कायशीशी बनली आहे.

मुक्तसुनीत's picture

25 Nov 2008 - 5:20 am | मुक्तसुनीत

वरील मुद्द्याचा थोडा पुढचा भाग सांगायचा तर एकदा तोच मला म्हणाला होता : काय होईल ? कदाचित सर्व काही बुडेल. तुम्ही लोक (म्हणजे इंडियन्स !) कसे रहाता ! त्याच त्या गाड्या , सुटीला जाणार कुठे तर इंडिया ला ! मला कदाचित उद्या ब्यांकरप्शी घोषित करावी लागेल , पण मी निदान हवाईचा क्रूझ तर घेतलाय ! फार फार तर काय ? माझ्या मुलांना लोन्स घेऊन शिकावे लागेल ! बस्स !

नेहमीप्रमाणेच मी गप राहिलो. आपले आपल्यापाशी शेवटी ! मी मुलांना घेऊन हवाईला गेलो नाही ; पण रोज त्यांच्याबरोबर वेळ घालवतो. वीकेंडला सगळ्यात जास्त. शेवटी "झुरळाने का पतंगावे ! " :))

सर्किट's picture

25 Nov 2008 - 5:43 am | सर्किट (not verified)

मुक्तसुनीत,

उद्या तुमच्या मित्राने ब्यांकरप्शी घोषित केली, तर त्याच्या कर्जाचा बोजा तुम्हालाच अप्रत्यक्षपणे सांभाळावा लागेल. तेव्हा माझं ऐकाच, एकदा जाऊन याच हवाईला :-)

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

सहज's picture

25 Nov 2008 - 6:42 am | सहज

अहो बुवा जर का बचत ही सतत अवमुल्यन होणार्‍या चलनात असेल. बँकेत व तश्या गुंतवणुकीत मिळणारे व्याज्-अवमुल्यन-महागाई/लिव्हिंग कॉस्ट ह्याचा ताळमेळ नीट होत नसेल तर काय करावे त्या काटकसर [बरेचदा नीरस आयुष्य जगुन ;-) ] करुन केलेल्या बचतीचे?

मग धोका पत्करुन गुंतवणुक केली पाहीजे की नाही? अन्यथा गाडी कायम उतारावर? व त्याकरता आज गाठीशी पैसा आहे तर कर्ज न काढता, बचतीपेक्षा पाहीजे तसे आयुष्य [रिटेल थेरपी ] जगल्यास वाईट ते काय किंवा योग्य वाटतील अश्या धोकादायक गुंतवणुकी का करु नये?

मग परत ती गुंतवणुक ही तुम्ही उल्लेख केलेल्या वेगवेगळ्या चंगळवादात जाणार. एक तर आजकाल नोकर्‍यांमधे "गलेलठ्ठ वार्षिक पगार" आलेच कसे? :-)

अवांतर - क्रमशः दिसले नाही. बचत ही पहीली पायरी झाली हो. यापुढच्या पायर्‍या [शिकवण्या] येणार असतील तर माझा वरचा प्रतिसाद उडवुन लावेन. तुमच्या पुढच्या शिकवणीच्या अपेक्षेत :-)

कपिल काळे's picture

25 Nov 2008 - 6:47 am | कपिल काळे

वरची चर्चा फारच हाय फाय पातळीवर झाली आहे. ती समजून घेण्यासाठी अर्थशास्त्राचे चांगले ज्ञान हवे. पण अती जास्त कन्झ्युमेरिझम किंवा अती जास्त बचत हे दोन्ही टाळले पाहिजे.

तरीपण माझ्यासारख्या इयत्ता तिसरी- अर्थशास्त्र मध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांनी खालील दुव्या वरील आर्.बी आय चे "मनी कुमार" हे अर्थशास्त्रविषयक
कॉमिक वाचावे. ते वाचल्यावर मग वरची चर्चा वाचली तर ती डिकोड होइल.

http://www.esnips.com/doc/cb66707c-64c5-48ec-86b8-52cc3157fe45/MoneyKuma...

मीनल's picture

25 Nov 2008 - 7:57 am | मीनल

रेव्हीन्यु म्हणजे उत्पादन विकून मिळालेला पैसा.हा बिझिनेस करणा-यासाठी.
कॉस्ट म्हणजे उत्पादन करतानाचा खर्च.
प्रीफिट म्हणजे सरप्लस रेव्हीन्यु ओव्हर कॉस्ट.( रेव्हीन्यु हा कॉस्ट पेक्षा जास्त असेल तरच) .
उलट असेल तर तो तोटा= लॉस.
बिझिनेसमनच इन्कम म्हणजे प्रीफिट म्हणता येईल.
सामान्य माणसांसाठी कमा॑ई म्हणजे इन्कम.काम करून मिळालेला अथवा गुंतवणुकीतून मिळालेला पैसा.

एक्सपेंडिचर म्हणजे खर्च.
सर्व प्रकारचे एक्सपेंडिचर कॉस्ट होत नाही.कारण समान्य माणस एक्सपेंडिचर करतात. तो खर्च कॉस्ट नाही.
जर कमा॑ई एक्सपेंडिचर पेक्षा जास्त असेल तरच बचतं.
अथवा २ -३मार्ग.----- कमाई वाढवणे,खर्च कमी करणे नाहीतर कर्ज घेणे.

वैय्यक्तिक कमाई वाढवण्यासाठी अधिक काम करता येते. पण शारिरीक दृष्ट्या शक्य होत नाही. नोकरीत कधीतरी पगार वाढतात पण ते ती वाढ वाढत्या महागाईच्या तुलनेत नगण्यच असते.
कुटुंबाची कमाई वाढवणे म्हणजे अजून कुणीतरी काम .बिझिनेस करणे.

खर्च कमी करणे नेहमी शक्य असते असे नाही.कुटुंबाचे आकारमान, घरातले आजारपण,लहान बालके,वृध्द नातेवाईक,शिक्षणाचा,लग्नाचा खर्च असेच अनेक कारण असू शकतात.ही झाली घरातली कारण.घराबाहेरचे मुख्य कारण म्हणजे महागाई.पगार बरा असूनही महागाई मुळे आवश्यक खर्च ही करत येत नाही.
त्यावेळी कर्ज घ्यावे लागते.मग त्याचे हप्ते.मग हातात मिळणारे पगारातले पैसे कमी.मग पुन्हा कर्ज.
व्हिशिअस सर्कल सुरू होते.
हे सर्व झाले माइक्रो लेव्हल वर.मायक्रो इकॉनॉमिक्स.

मॅक्रो लेव्हलवर (मॅक्रो एकॉनोमिक्स) देशाकरता पाहता हाच प्रश्न फक्त मोठ्या प्रमाणावर.आणि अधिक गुंतागुंतीचा.

सोडवण्यासाठी अनेक इकॉनॉमिक सिस्टिम्स आहेत.त्या कधी ,कुठे ,कश्या लागू पडतात .किंवा पडल्या आणि त्या आपल्याला लागू पडतील का नाही,नसतील तर का नाही ही वेगळी चर्चा झाली.

न पाहिलेल्या किंवा भविष्यात सहजी न दिसणा-या संकटावर (अनसीन काँटिंजन्सीज)मात करण्यासाठी बचत हा एक तोडगा असू शकेल.
पण संकट केवढ असेल आणि बचत किती हवी याच अचूक गणित आधिच कस मांडणार?साधारण तयारी करू शकतो.संकट मोठ असेल आणि वाढत्या महागाईतली बचत मामूली असेल तर ती थोडीशीच कामी येईल किंवा येणारही नाही.
पण म्हणून बचत करूच नये हे साफ चूकीचे आहे. बचतीची भारतीय प्रवृती फारच चांगली आहें. नवी पिढी कदाचित नसेल मानत.पण त्याचे फायदे जाणून घेऊन तसे वागणे हिताचे आहे.
अमेरिकेत ही `उद्याची कोण चिंता करतय?` हीच टेंडंन्सी आहे.ती घातक आहेच.

यातही अजून बरेच मुद्दे मांडण्यासारखे आहेत.आणि वर दिलेले मुद्दे ही प्रत्येकच वेळी लागू पडतील असे नाही .
इकॉनॉमिक्स मधे ब-याचदा जनरलायझेशन्स असतात.प्रत्येक वेळी ते तसेच असतील असे नाही.बट इन जनरल इट इज ट्रु.
इन परटीक्युलर ,मॅटर मे डिफर.आणि अपवाद हे असतातच.

मीनल.

सर्किट's picture

25 Nov 2008 - 8:44 am | सर्किट (not verified)

अमेरिकेत ही `उद्याची कोण चिंता करतय?` हीच टेंडंन्सी आहे.ती घातक आहेच.

मीनलताई,

आम्ही वर दिलेला दुवा बघितल्यास, उद्याची काळजी कोण करतंय, ह्याचा काही विवक्षित देशांत असणारी विचारसरणी परस्परांना कंपेअर कशी करता येत नाही हे आपल्या लक्षात येईलच.

आज आम्ही अमेरिकेत राहणारे अनिवासी भारतीय आमच्या उत्पन्नाच्या साधारणतः १५ टक्के ४०१(क) मध्ये टाकतो (ट्याक्स प्फ्री), १५% (नोकरी करत असल्यास) आमच्या कंपन्यांच्या ष्टाकात घालतो (ई एस पी पी) त्यावर आम्हाला १५% इन्स्टंट नफा मिळतो. उरलेल्या उत्पन्नातून सुमारे १० टक्के हे सोशल सेक्युरिटीत टाकतो, म्हणजे ४० टक्के हे आमचे सेव्हिंग असते.

आता समजा इतर लोक ४०१(क) मध्ये पैसा गुंतवत नसतील, ई एस पी पी चा १५% इन्स्टंट नफा कमवण्याविरुद्ध असतील, तरी १० टक्के सोशल सेक्युरिटी मध्ये टाकणे हे आवश्यकच आहे.

ही गुंतवणूक नॅशनल सेव्हिंग्ज रेट मध्ये गृहीत धरत नाहीत.

भारतात, माझ्या माहितीप्रमाणे तरी, सोशल सेक्युरिटी ह्या प्रकारचे काहीही नाही. त्यामुळे २८% हा जो बचत दर आहे, तो आला १८% वर.

माझ्या ओळखीचे सर्व (भारतीय, आणि अभारतीय) अमेरिकन मध्यमवर्गीय ह्यापेक्षाही अधिक बचत करतात, हे नक्की.

त्यामुळे, "उद्याची काळजी कशाला" ही वृत्ती अमेरिकेतही फारच कमी लोकांमध्ये आहे, हे मी नक्की सांगू शकतो.

एखाद दुसर्‍या उदाहरणातून नव्हे, तर सर्व आकड्यांतून. कारण ष्टाक मार्केटात टाकलेले पैसे, येथील कुणीही बचत म्हणून गणत नाही. गुंतवणूक म्हणून गणतो.

रामशास्त्र्यांनाही मला वाटते, की बचत वाढवा, असे न म्हणता, गुंतवणूक वाढवा असे म्हणायचे असावे.

कारण गादीखाली पैसे ठेवून आजवर कुणाचे भले झाले आहे ?

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

मीनल's picture

25 Nov 2008 - 5:42 pm | मीनल

तुमच बरोबर आहे.देशांत असणारी विचारसरणी परस्परांना कंपेअर करता येत नाही कारण इकॉनॉमिक सिस्टिम वेगळ्या॑ आहेत.
त्यामुळे पॉलिसिज वेगळ्या.फायदे तोटे वेगळे.त्यामुळे जनतेच्या टेंडंन्सीज वेगळ्या.
त्यातली तुलना खरतर प्रवृती त नसून एकॉनॉमिक पॉलिसिजवर डायरेक्टेड होती.

आपण अनिवासी भारतीय अमेरिकेत काय कुठेही गेलो तरी बचत करण्याची आपली प्रवृत्ती असतेच.ती चांगलीच आहे.
मला इथल्या अमेरिकन लोकांची तशी नाही हे म्हणायच आहे.
इथे आपण जो टॅक्स देतो त्याचा मोबदलाही ब-यापैकी मिळतो आहे.
उलट भारतात तेवढा मिळत नाही हे सर्वमान्य आहे.कारण अनेक------
कदाचित म्हणूनच ती प्रवृती असेल.आणि तेच शहाणपण आहे.

आपण अमेरिकेत दिलेला टॅक्स हे बचत नाही तर राष्ट्रीय रेव्हेन्यु.पण पण इथला पर्सनल सेव्हींग्ज रेट कमीच.

स्टॉक मार्केट मधले पैसे ही गुंतवणूकच.भारतात काय आणि अमेरिकेत काय.फक्त ही फयदेशीर ठरली की नाही ते मार्कॅट ठरवत.
त्यामुळे सुरक्षित नाही.

मीनल.

भास्कर केन्डे's picture

26 Nov 2008 - 4:33 am | भास्कर केन्डे

मीनल ताई,

आपले मुद्दे चांगले आहेत. पण...
देशांत असणारी विचारसरणी परस्परांना कंपेअर करता येत नाही कारण इकॉनॉमिक सिस्टिम वेगळ्या॑ आहेत. त्यामुळे पॉलिसिज वेगळ्या.
मराठीत येवढे विंग्रजी वचताना भाकरी-वांग्याच्या भरताला कोक तोंडी लावल्यासारखे होते बघा. जरा मराठीतून लिहायचा प्रयत्न करा ना बॉ.

भाषा काँटेजिअस ;) असते म्हणतात याचा एक प्रत्यय... सर्किटराव सुद्धा कंपेअर करु लागलेत. ;)

आपला,
(चोखंदळ वाचक) भास्कर
आम्ही येथे वसतो.

याचा खरा फायदा फक्त सिटीझन्सना मिळतो असं ऐकिवात आहे.

मी जर ४०१ मधे किंवा ईसपीपी मधे पैसे घातले नाहीत तरिही १०% माझी बचत होते (सो. सिक्युरिटी) असं मला म्हणता येत नाही. म्नाझ्यालेखी ते अमेरिकेत रहाण्याचं दिलेलं एक प्रकारचं भाडं असचं आहे.
(गेले ८ वर्षे यात पैसे घालतो आहे.. त्याचे रिटर्न्स मला मिळू शकतीलच याची खात्री नाही त्यामुळे याला मी बचत म्हणू शकत नाही. फुकट जात आहेत ते पैसे.)

तसच ई एस पी पी चा १५% इन्स्टंट नफा हा मिळतोच असंही नाही. (आमच्या कंपनी मधे माझ्या आजुबाजुलाच उदाहरणं आहेत)

सर्किट's picture

26 Nov 2008 - 5:26 am | सर्किट (not verified)

एक,

नागरीक झाले तरच सोशल सेक्युरिटीचा फायदा मिळतो, हे खरे. त्यामुळे नागरीक हो, म्हणजे सामाजिक सुरक्षा तसेच निवृत्तीनंतर वैद्यकीय खर्च (मेडिकेअर, मेडिकेड) वगैरे सर्व मिळते. तुम्ही त्यासाठी अमेरिकेतच असायला हवे असे नाही.

ई एस पी पी सध्याच्या आर्थिक वातावरणात लगेच विकावा. ठेवू नये. म्हणजे १५% चा नफा सुरक्षित. (आमच्या कंपनीत गेल्या दोन वर्षांतील सर्वात कमी किंमतीत ष्टाक मिळतात. त्यामुळे गेली काही वर्षे ४०% चा नफा इन्स्टंट मिळायचा. आता नवीन नीचांक गाठल्याने फक्त १५ टक्के सुरक्षित नफा मिळतो.)

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

मीनल's picture

25 Nov 2008 - 8:39 am | मीनल

गुंतवणूक--याबद्द्ल लिहायच राहिल.

बचतीचा उपयोग कसा करणार?
कपाटात लिक्विड कॅश ठेऊन्.पण त्यात काहीही वाढ नाही.उलट चोरी मारीची भिती.
की खर्च करून.मजे साठी खर्च,शिक्षणासाठी ,आजारपणासाठी अथवा अन्य प्रकारे.
की गुंतवणूक म्हणजे इनव्हेस्ट्मेंट करून?

गुंतवणूक कशातून करणार?बचतीतून की कर्ज घेऊन ?
तसेच गुंतवणूक कशात करणार? हे ही महत्वाचे.रिअल इस्टेट्/गोल्ड्/शेअर्स/ फिक्स्ड डोपॉझिट्स/म्युचल फंड की उद्दोगधंदा?

बचतीतून गुंतवणूक करण दोन्हीच्या आकडेवारीवर अवलंबून आहे.
बिझिनेसमन कर्ज घेऊन आणि /किंवा बचतीतून गुंतवणूक करेल.ती फायदेशीर आहे की नाही हे त्याचे प्रॉफिट ठरवेल.

सामान्य माणूसही रिअल इस्टेट मधे गुंतवताना कर्ज घेइल.
पण गोल्ड,शेअर्स्,बँक फिक्स्ड डोपॉझिट्स यासरखी गुंतवणूक कर्ज घेऊन करणार नाही.निदान करू नये.
शेअर्स बाजार पार डूब खात्यात आहे.
सोन्याचा भाव वाढतो आहे.तो भविष्यात फायदेशीर ठरेल.म्हणून कर्ज घेऊन गोल्ड मधे गुंतवणूक करण्यासारख काही वाटत नाही.अर्थात लग्ना कार्यात दिले घेतले जातेच.पण ते कारण वेगळे.
फिक्स्ड डोपॉझिट्स चा इंटरेस्ट रेट कर्जावरच्या इंटरेस्ट रेटपेक्षा कमी.मग काय शहाणपणा?
त्यामुळे गोल्ड,शेअर्स्,बँक फिक्स्ड डोपॉझिट्स ही गुंतवणूक बचतीवर अवलंबून.
रिअल एस्टेट /गोल्ड ही गुंतवणूक होईल जेव्हा ती तुम्ही विकाल,नाही तर ती इस्टेट्/ऍसेट राहिल.
अमेरिकेत आधी केलेली रिअल एस्टेट मधली गुंतवणूक म्हणजे आता तोटा आहे.कारण सध्या मंदी आहे.
भारतात मात्र आधी केलेली रिअल एस्टेट मधली गुंतवणूक म्हणजे नफा आहे.अजूनही नफाच आहे.

गुंतवणूक ही सुरक्षित असावी तरच ती फायदेशीर.
नाहीतर सर्वच मुसळ केरात.

मीनल.

सर्किट's picture

25 Nov 2008 - 8:52 am | सर्किट (not verified)

भारतात मात्र आधी केलेली रिअल एस्टेट मधली गुंतवणूक म्हणजे नफा आहे.अजूनही नफाच आहे.

ह्याला थोडा सहमत आहे. कारण भारतात विकसित जमीन तशी लोकसंख्येच्या मानाने अद्यापही कमी आहे.

परंतु, एकदा एन-ए घोषित केलेली जमीन, वैयक्तिक वैमनस्यामुळे पुन्हा ऍग्रिकल्चरल करणे हे भारतातील राजकारण्यांच्या हाती आहे. (नागपूरला काय सुरू आहे, ते आपण बघताहातच. नाही बघत ? सर्वसामान्य लोकांनी नागपूरच्या आउटर रिंग रोड च्या जवळ घेतलेल्या जागा आता पुन्हा ऍरिकल्चरल झालेल्या आहेत. पण गडकरींनी आउटर रिंग रोड पासून अर्ध्या किलोमीटर च्या दुरीवरची सगळी जागा मात्र अद्याप नॉन ऍग्रीकल्चरल आहे. रस्त्यांच्या॑ आजूबाजूला शेती होते, आणि तेथून अर्धा किलोमीटर दूर मात्र रहवास असतो, असे निर्णय घेण्याची क्षमता महानगरपालिकेमधील् बाबूंना सोपवण्यात आली आहे.)

त्यामुळे भारतात स्थावर मालमत्ता घ्यायची झाली तर ती पुण्यात शरद पवार, नवी मुंबईत नारायण राणे ह्यांनी घेतलेल्या जमीनींच्या बाजूला, अथवा शहरात म्हणजे पुण्यात मनोहर जोशी, राज ठाकरे, ह्यांनी घेतलेल्या जमीनीवर फ्लॅट विकत घेऊन.

नागपुरात घ्यायची झाल्यास नितीन गडकरीने विकत घेतलेल्या जमिनींच्या लगोलग, बुटीबोरीत.

बाकी, कठीण आहे.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

मीनल's picture

25 Nov 2008 - 5:48 pm | मीनल

रिअल इस्टेट खरच इस्टेट ठरेल जेव्हा ती पुणा /मुंबई /अथवा शहरी विभागात असेल.
नाहीतर डेड इनव्हेस्टमेंट.
ती सुध्दा भविष्यातली कदाचित तोटा देणारी.
तुमच्याशी पूर्णपणे सहमत.

रामशास्त्रींना `आर्थिक संकाटाला सामोर जाण्यासाठी बचत करून सुरक्षित गुंतवणूक करा` अस म्हणायच असाव.
तेच आपण सर्वांनी मांडलय.

मीनल.

भास्कर केन्डे's picture

26 Nov 2008 - 4:36 am | भास्कर केन्डे

मीनल ताई,

कृपया साधे सोपे लिहावे ही नम्र विनंती...

आपला,
(विंग्रजीतला ढ) भास्कर
आम्ही येथे वसतो.

शितल's picture

25 Nov 2008 - 8:59 am | शितल

>>बचत सुरू करण्यास कधीही उशीर झालेला नसतो.
सुंदर वाक्य :)
लेख आवडला.:)

अभिजीत's picture

25 Nov 2008 - 9:18 am | अभिजीत

वैयक्तिक बचत केली पाहिजे याच्याशी सहमत.

उत्पन्न आणि गरजा याचा मेळ बसवता आला तर बचत शक्य आहे.

सध्याच्या कशाला पण कोणत्याही काळात केवळ बचत करुन पैशाच्या सर्व गरजा (आकस्मिक खर्च, भविष्यकालिन तरतुदी, गुंतवणूक वगैरे ) भागवता येतील असे वाटत नाही. तसेच, फक्त बेसुमार पगारवाढ, भरमसाठ उत्पन्नवाढ किंवा गरजांना अतिप्रमाणात आळा ही त्यावरची उत्तरे नव्हेत.

पताधारित व्यवस्थेचा विकास यातूनच झाला.
'उत्पन्नाच्या प्रमाणात पत' हे सुत्र आर्थिक व्यवहारात मानले तर उत्पन्न आणि गरजा याचा बराचसा मेळ घालत येतो. अर्थात, हे सुत्रच खुंटीला टांगुन घातल्यामुळे सध्याची आर्थिक दुरावस्था ओढवली आहे. तेव्हा सध्याच्या काळात अनावश्यक खर्च टाळणे हे नक्कीच गरजेचे आहे.

असो.
सरसकट सगळ्यांनी बचत केली तर आपली अर्थव्यवस्था मोठी होइल या विधानामागच्या भावना खूप चांगल्या आहेत पण सुचवलेला उपाय शास्त्रिय नसावा असे वाटते.

- अभिजीत

विजुभाऊ's picture

25 Nov 2008 - 9:46 am | विजुभाऊ

शन्तनुराव किर्लोस्कर म्हणायचे की सर्वानीच जर साधी रहाणी ठेवायचे ठरवले तर विणकराने विणलेली भारी साडी विकली जाणार नाही. परिणामी तो विणकर बेकार होईल. त्याला रोजगार मिळण्यासाठी तरी कोणितरी ती साडी विकत घेतली पाहिजे. प्रत्येकाने गरजा कमी करुन बचत करायचे ठरवले तर अर्थकारण शुन्यावर येते
अर्थशास्त्र हे परस्पर सहकार्य आणि परस्परउपभोग या तत्वावर चालत असते

मुम्बैच्या उकाड्यातही अंगावर शिरशिरी आणणार्‍या थंडीची आठवण येऊन तुमचे गाल आरक्त होत असतील तर याचे आश्चर्य बाळगु नका. त्या उकाड्यातही अंगावर शिरशिरी आणणारी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

सर्किट's picture

25 Nov 2008 - 9:50 am | सर्किट (not verified)

शंतनुराव किर्लोस्करांशी सहमत आहे. खूप मोठा माणूस !! (उच्च विचारसरणीने आजवर कबीराखेरीज कुठल्याही विणकराचे पोट भरलेले नाही. आणि त्यालाही राम सहमत होता, रामशास्त्री नाही :-))

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

विजुभाऊ's picture

25 Nov 2008 - 9:55 am | विजुभाऊ

.

कलंत्री's picture

25 Nov 2008 - 8:27 pm | कलंत्री

विषय कसा भरकटत न्यावा अशी जर मिपा वर स्पर्धा झाली तर या लेखाला पारितोषिक द्यावे अशी मी शिफारस करतो.

आता मूळ विषयाला धरून,

बचत करा आणि मूलभुत वस्तुवरच खर्च करा. ( अन्न, वस्त्र आणि निवारा). यानंतरही काही पैसा राहिल्यास समाजात विधायक कामावर खर्च करा.

१९६२ च्या सुमारास एका विधवा बाईने आपल्या तिन मुलांचा सांभाळ शिवणकामाचे काम करत आयुष्याच्या अखेरीस १.२५ कोटी (रुपयाचे+ जमिनीचे) दानकेले असे नागपूरच्या माहेश्वरी अंकात वाचल्याचे मला आजही स्मरते. ( २००५ च्या सुमाराचा अंक असावा).

आपल्या कमाईचा १०% खर्च आपण समाजौपयोगी कामात करा अशी विनंती.

लिखाळ's picture

25 Nov 2008 - 9:00 pm | लिखाळ

वरील चर्चा समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. चर्चा चांगली वाटली.

>> विषय कसा भरकटत न्यावा अशी जर मिपा वर स्पर्धा झाली तर या लेखाला पारितोषिक द्यावे अशी मी शिफारस करतो. <<
चर्चा विषय भरकटण्याचा आणि प्रतिसादांत वापरल्या जाणार्‍या इमॉटिकॉन्सचा काही संबंध असावा असे माझे मत आहे. विरामचिन्हांचा वाढता वापर आणि भावमुद्रांचा वाढता वापर हे भरकटण्याचे निदर्शक असावे..
१) गंभिरपणे अनवधानाबे भरकटणे आणि
२)मजा-हास्य विनोद करत असंबद्धपणे भलतेच लिहित राहणे असे दोन प्रकार असावेत.
वरील चर्चा भरकटली असल्यास ती अनवधानाने पण गुणवत्ता राखून भरकटली असावी.
तसेच
अ) आपसूक भरकटणे
आ)मुद्दाम भरकटवणे असेही प्रकार गृहित धरायचे असल्यास
त्यातही गुणवत्ता पूर्ण अवांतर आणि बाष्कळ अवांतर असे निकष ठेवा..
स्पर्धा जाहिर झाली तर माझे मुद्दे विचारात घ्यावेत ही विनंती.
हे सर्व निकष विचारात घेता या चर्चेला असे बक्षिस मिळेलसे दिसत नाही :)
-- लिखाळ.
ता. क. - ह. घ्या.
-- लिखाळ.

सर्किट's picture

25 Nov 2008 - 10:56 pm | सर्किट (not verified)

१९६२ च्या दानाची बातमी २००५ च्या अंकात आली, ह्यावरूनच अशा दानधर्माला लोक किती महत्व देतात हे लक्षात येते.

दरम्यान, दान कुणाला केले ? त्या दानाचा काय उपयोग झाला ? ह्या दानाने देशाची आर्थिक स्थिती कशी सुधारली, हे सर्व लिहा. म्हणजे बचतीचे फायदे आम्हाला सर्वांनाच कळतील.

भरकटत गेलेला विषय पुन्हा मूळपदावर आणल्याबद्दल धन्यवाद.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

कलंत्री's picture

26 Nov 2008 - 7:57 am | कलंत्री

१९६२ मध्ये त्या स्त्रीने शिवणकाम करुन आपल्या मुलांचा सांभाळ करायला सुरवात केली. त्यानंतर आपल्या मुलांना संसारास लावण्याचा काळ कमी केला तर ( २५/३० वर्ष) म्हणजे ती १९९२ ला आपल्या वैयक्तिक जबाबदारीतुन मुक्त झाली असे समजु या. ( ८७ ते ९२).

त्यानंतर तिने जमिनाचा तुकडा अथवा जे काही असेल ते दान केले. ( कोठे, का आणि कश्यासाठी या साठी मूळ अंक वाचावा, मला आठवत नाही).

आता असे जे लोक असतात त्यांना सर्वसाधारण प्रसिद्धीची आवड / हाव नसते. त्यामूळे २००५ ला का होईना लेख आला हे महत्त्वाचे.

आता याचा फायदा काय झाला हे सांगणे अवघड आहे. पण चाकोरीतच जगणार्‍यासाठी प्रत्येक गोष्ट बाजारी मुल्याच्या चौकटीतच पाहणार्‍यांना माझ्यासारख्यांना जगात जगण्याचा वेगळाही मार्ग असु शकतो हे समजले.

वस्तुनिष्ठ प्रश्न विचारुन विषय मूळ पदावर आणण्याचे आपले कौशल्य वादातित आहे. मित्रा, आभार आणि अभिनंदन. बाकी व्यनित.

चर्चा . सदर चर्चेतुन मला एका म्हणीचा अर्थ नक्की कळाला.. आग रामेश्वरी आणि बंम्ब सोमेश्वरी.
चालु द्या चर्चा
वेताळ

मीनल's picture

25 Nov 2008 - 11:33 pm | मीनल

माझी कुठलीही वाक्य विषयांतर करत असतील तर ती वाक्यच नाही तर ती प्रतिक्रियाच उडवून द्यावी.
कुणाचाही वेळ फालतु दवडायची मला इच्छा नाही.

मीनल.

नंदन's picture

25 Nov 2008 - 11:39 pm | नंदन

अर्थतज्ञ एम. आर. वेंकटेश यांचा या विषयावरचा एक व्हिडिओ येथे पाहता येईल. ५७ मिनिटांचा असल्याने निवांत पहावा लागेल. आशियाई देशांतील जनतेने केलेली बचत ही डॉलरच्या गंगाजळीतच साठवली गेली असल्याने, डॉलर कोसळला तर त्याचा परिणाम काय होईल हे त्यांनी स्पष्ट केले आहे. यात व्यक्त केलेली काही मते टोकाची आहेत (काही कॉन्सिपरसी थिअरीजही आहेत), पण एकंदरीत अमेरिकेचे तुटीचे बजेट, चीनकडे असणारी उधारी आणि नवीन पैसा उभारताना सोने तारण ठेवण्याची मोडीत काढलेली पद्धत याबद्दलची माहिती सोप्या भाषेत दिली आहे.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

रामशास्त्री's picture

26 Nov 2008 - 2:54 am | रामशास्त्री

प्रतिक्रिया देणार्‍या सर्वांना धन्यवाद.

माझ्या मते तरी मूळ लेखाबद्दलच चर्चा झाली नसली तरी एकंदर विषयाला धरूनच सारे प्रतिसाद होते. त्यामुळे विषय भरकटला असे म्हणू नये.

फॉर द रेकॉर्ड, बचत म्हणजे गुंतवणूक असेच मला म्हणायचे होते. वर मी दिलेल्या एका प्रतिसादातूनच ते स्पष्ट व्हावे.

असो. पुन्हा एकदा धन्यवाद.

-रामशास्त्री