भुत्याचे मनोगत

कविता१९७८'s picture
कविता१९७८ in विशेष
8 Mar 2015 - 2:08 am
महिला दिन

अहो शुक शुक.... अ...हो... शु...क शु....क, अहो घाबरताय काय असे? मी भुत्या ... मी इथे वर आहे..अहो वर.. वर म्हणजे या पिंपळाच्या झाडावर. काय? मी दिसत नाही असं म्हणता? पण मला तर तुम्ही दिसता ! अगदी रोज या रस्त्यावरुन येता जाता, कधी तुमच्या बायको बरोबर तर कधी मुलांबरोबर.. क्काय तुम्ही मला कधी पाहीलेच नाही???? अरे बरोबर... कसे पाहणार नाही का? गेली २० वर्षे मी या पारावर भूत बनुन राहतोय मग कुणाला कसा दिसेन? अरे अरे! घाबरु नका, पळु नका हो, मी हानिकारक भूत नाहीये हो ! ऐका माझं , ऐका म्हणतोय ना मी नाहीतर तुमच्या मानगुटीवर बसेन बरं का !!!

हा बसा या पारावर काही होत नाही , मी काही खात बित नाही हो, खायला दात आहेतच कुठे मला, माझा फक्त आत्मा इथे आहे शरीर तर मेल्या मेल्याच जाळलं हो नातेवाईकांनी , दुष्ट कुठले. त्यांचीही काय चुक म्हणा. अहो, या पारासमोर मी चालत होतो अगदी रस्त्याच्या कडेला प्रत्येक वाहनाला जपुनच ! पण काय करणार ...एक ट्रकवाला पिउन ट्रक चालवत होता त्यानेच घात केला हो, माझ्या अंगावरुन ट्रक नेला त्याने अन् पळुनही गेला !!! दोन क्षण काय झालं ते मला कळेचना नंतर डोळ्यासमोर अंधार पसरला.

थोड्या वेळाने शुद्धीवर आलो तर काय समोर ही गर्दी जमली होती माझे आईवडील, बहीण भाउ मला अॅम्ब्युलन्स मधुन हॉस्पिटल मधे घेउन चाललेले आणि मला धक्काच बसला, मी समोर कसा दिसतोय ? अरे! मी मेलो?? पण अॅम्ब्युलन्स
मधे तर मला ऑक्सिजन लावला होता मग मी बाहेर कसा , थोड्या वेळाने हॉस्पिटल मधे पोहोचल्यावर डॉक्टरांनी जाहीर केले की मी मेलो नाहीये कोमात गेलोय पण बरेच दिवस शुद्धीवर न आल्याने नातेवाईकांना वाटले आता काय मी कोमातुन बाहेर येत नाही म्हणुन वाट पाहुन डॉक्टरांनी मला वेंटीलेटरवरुन काढुन टाकले व घरच्यांनी माझे अंतिमसंस्कार करुन टाकले.
गेलो स्वर्गात तर चित्रगुप्ताने तु़झं आयुष्य अजुन बाकी आहे तेव्हा तुला इथे जागा नाही असं सांगत खाली पिटाळलं .तेव्हापासुन मी इथेच राहतो कारण घरी आईवडीलांचे दु:खी चेहरे पाहवत नाहीत हो ! आता हेच माझे घर अन् मला खुप आवडते ही बरं का ! जाणार्‍या येणार्‍यांकडे पाहत माझा असा टाईमपास होतो ना की काय सांगु !

आता पहा मी तुम्हाला रोज इथनं जाता येता पाहतो. तुम्ही सकाळी इथे समोरच्या टपरीवर दुध घ्यायला येता , वर्तमानपत्र घेता, दुसर्‍या काकांबरोबर गप्पा टप्पांचा फड जमवता या पिंपळाच्या पारावर... एकमेकांची सुखदु:खे सांगत चहाचे घोट घेता हे सर्व मी पाहतो , ऐकतो आणि तुमच्या बरोबर जगतो ही. ते रासने काका ... बिच्चारे काकू गेल्यापासुन खुप दु:खी असतात, लोकांना वाटतं ते खुप सुखी आहेत. मुलगा अमेरीकेला आहे, मुलगी ऑस्ट्रेलियाला ! त्यांना पैशाची काय कमतरता असेल? हो पैसे भरपुर आहेत हो त्यांच्या मुलांकडे पण रासनेकाकांसाठी त्यांच्या घरात जागा नाही हो ! रासनेकाकांनी इतकी मेहनत घेउन मुलांना वाढवलं आणि मुलं आताशा त्यांना विचारेनाशी झालीत.त्यांच पेन्शन येतंय म्हणुन बरंय निदान दोन वेळचं सन्मानाने खातात पितात.

हे भोवरे काका आयुष्यभर गावी राबराब राबलेत आणि आता इथे मुलाकडे येउनही राबतच आहेत, घरची सर्व कामे सुनबाई घरगड्यांसारखी करुन घेते, अहो घरचे काम करायला काही लाज नाही हो पण भोवरे काकांचं वय लक्षात घ्या ना. आत्ता पंच्च्याहत्तरी मधे त्यांना दोन मजले खाली असलेल्या नळातुन चाळीतल्या घरात पाणी ने आण करावं लागतं, भाजी , दुध
आणि खालुन काहीही आणायचं असलं तरीही भोवरेकाकांनाच जावं लागतं, सारखं वर खाली करुन करुन त्यांची कंबर दुखते त्याचं काय आणि तरणीबांड नातवंड लोळत बसलेली असतात टी.व्ही. समोर.

ते कामत काका बायकोच्या कटकटीने आयुष्यभर बेजार, बायको आणि कटकट दोन्ही ही त्यांना नकोश्या झाल्या आहेत. तुम्ही २-३ जण इथं जमता आणि एकमेकांना आधार देता ते पाहुन बरं वाटतं.

तुम्ही गेल्यावर इथे कॉलेजकट्टा जमतो बरं का ! काय जोश, काय सळसळतं गरम रक्त ! आज आपण हे करु, तिथे जाऊ, सुखाने भरलेलं जीवन, काहीतरी करण्याची जिद्द. बरोबर पोरी त्यांच्यासमोर तर आणखीनच चेव येतो हो मुलांना ! सारखं आपलं कर लो दुनिया मुठ्ठी मे चा घोषवारा लावलेला असतो.

आपला जीतु हो तोच तो शिर्के काकांचा नातु, एका मुलीच्या प्रेमात पडलाय. अहो पण हिम्मत नाही हो त्याच्यात तिला काही सांगायची मग आपल्या कॉलेज गँगने ठरवलंय त्याला मदत करायची. त्याचीच तयारी करणार आहेत ते इथे बसुन.

तो बाबर्‍यांचा नातु सर्वांना टोपी घालणार हो... मुलगी दिसली की ह्याचं मन सैरभैर होतं , प्रत्येकीकडे पहातच रहावंसं वाटतं याला, अहो आता परवाच एका पोरीने कानाखाली आवाज काढला हो याच्या... पण तरी हौस कमी होत नाही, काही लक्ष नाही हो त्याचं अभ्यासात, पुस्तकं तर आता वर्ष संपायला आलीत तरी एकदम कोरीकरकरीत आहेत ! घरचे फुशारकी मारतात हो , म्हणतात "आमचा जीतू खुप हुशार आणि टापटीप हो , पुस्तके इतकी जपुन वापरतो कि काय बोलाल ! असं वाटतं की आत्ताच दुकानातनं विकत घेतली आहेत". लोकं मनातच म्हणतात पुस्तकं कधी दप्तरातुन बाहेर निघतील तेव्हाच वापरली जातील ना ! असो पण काय करणार हो काका हे किशोर वय असंच असतं हो.

त्यानंतर साधारण १ वाजता इथे येतो जोगळेकरांचा महेश, सर्वांना टोप्या घालण्यात याचा हातखंडा. अहो काय सांगु महाराष्ट्र वीज मंडळाच्या ऑफीस मधे बीलवाटप करण्याचे छोटेसे काँट्रॅक्ट घेतो पण दाखवतो असे की खुप मोठा काँट्रॅक्टर आहे, खुप मोठ मोठ्या थापा मारतो. ८-१० वर्षापुर्वीचा किस्सा सांगतो...
त्याच्या शेजारी ती गरीब मजुरी करणारी बाई राहते ना तिला वाटले आपल्याला वेळ नाही आणि हा महेश वीज बिले वाटप करतो तर यालाच वीज बिल भरायला द्यावे आणि महेश ही अगदी हो हो द्या मी लगेचच भरुन देतो असेही म्हणाला, म्हणुन ती बिलाचे पैसे त्याच्याचकडे भरायला देउ लागली , जवळ जवळ एका वर्षाने तिचे विजेचे मीटर कट करुन घेउन गेले तेव्हा हिला कळलं की महेशने वर्षभर बिले भरलीच नाहीत आणि तिचे पैसे ही परत केले नाही. काय काय माणसे असतात म्हणुन सांगु तुम्हाला काका, व्यक्ती तितक्या प्रकृती हो. इथे ही रोज बसुन लाखाच्या गप्पा मारत असतो पण त्याला कळतच नाही लोकं त्यांच ऐकुन घेतात म्हणजे ती मुर्ख नसतात, लोकं थोडावेळ त्याच्याबरोबर बसुन आपली करमणुक करुन घेतात पण कुणी त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. ठेवणार ही कसा हो बाता कितीही मोठ्या मारल्या तरी कुणी पैशाचं सोंग घेऊ शकत नाही हेच खरं ! तो लाख सांगेल की तो करोडपती आहे पण त्याच्या घरची अवस्थाच आणि राहणीमान सगळं सांगुन जाते.

पारावर दोन तीन भिकारी येउन जेउन झोपतात. मला त्यांचं कौतुक वाटतं हो काका जे मिळेल त्यात समाधानी असतात, त्यांना फक्त दोन वेळच्या जेवणाची चितां, रात्री याच पारावर झोपुन जातात, नाहीतर आपल्या माणसांचा हव्यास कधी संपतच नाही, चांगला पगार, राहायला चांगले घर , फिरायला गाडी, घरात ऐषोआरामाच्या वस्तु हव्या असतात, मौजमजा करायला , फिरायला आवडतं, दिवसाला ५००-१००० रु काही माणसं पत्त्यासारखे उडवतात तर ह्या भिकार्‍यांचे महिन्याला जमतात, दिवस भरात दुपारी आणि रात्री एकेक वडापाव मिळाला तरी बास. आणि पोलीस तरी किती हैराण करतात हो त्यांना, सतत गरीबीमुळे यांना दारुचे व्यसन लागते मग दारुसाठी भीक मागत सुटतात. काय करणार त्यांचे जीवनच तसे, दिवसभर वणवण भटका तेव्हा खायला मिळणार, माणसं एकवेळ कुत्र्याला प्रेमाने खायला घालतील पण भिकार्यांना मात्र कुत्र्यासारखं हाकलतील. भिकार्‍याच्या अंगाला वास येतो म्हणुन नाक धरतील पण परसात फुलझाडांना पाणी घालताना जे जास्तीचे पाणी वाया जाते, ते कधी एक बादलीही भिकार्‍यांना आंघोळीसाठी मिळत नाही याचा कधी विचारही करत नाहीत.

काका तो समोर बंगला दिसतोयना दाभोळकर काकांचा; त्यांच्या हायफाय सुनबाई समाज कार्य करतात म्हणे. ज्यांच्या साठी अगोदर पासुन संस्था आहेत , देशभरातुन तसेच विदेशातुनही मदत मिळतो अशा ठिकाणी नेहमी सर्वच मदत करतात पण रस्त्यावर रहाणार्‍या या भिकार्‍यांसाठी कुणी नाही हो , निदान घरातलं उरलं सुरलं तरी त्यांनी या पारावरच्या भिकार्‍यांना दिलं तर काय होईल? त्या बंगल्यातनं एक नळ कुंपणाच्या बाहेर काढुन दिला तर भिकार्‍यांच्या पिण्याच्या पाण्याची आणि आंघोळीचीही सोय होईल की ! पाणी बिल तरी किती हो येईल ? जितकं हे यांचा पाळलेल्या कुत्र्याचे केस धुण्यासाठी जो महागडा शांपू वापरतात त्याच्या किमती इतकंही नाही. पण कायेना, या जगात जनावरांना किंमत आहे पण माणसांना जनावरांइतकीही किंमत नाही !

साधारण ४ वाजता भिकारी आराम करुन आवरुन निघुन जातात मग इथे संध्याकाळी सर्व फिरायला यायला सुरुवात होते. कुणी मुलांबरोबर तर कुणी आपल्या प्रियजनांबरोबर, कॉलेज वीर , नोकरी करणारे सर्वच कुणा ना कुणाबरोबर तरी येतात. अहो काका तुमचा नातू वल्लभ ही येतो बरं , अरे असे आश्चर्यचकीत काय होता? अहो काका तुम्हाला तुमच्या नातवावर विश्वास आहे हे मान्य. अहो पण प्रेम करणं हे चुक आहे का? हो लहान वयात, चित्रपट पाहुन प्रेम करणं हे चुकीचं आहे, ज्या वयात कमवायची अक्कल नसते त्या वयातलं प्रेम हे आंधळं असतं हे तुमचं म्हणणं मान्य ! अहो वल्लभ ला चांगली नोकरी लागलीये की आणि तुमची होणारी नातसूनही चक्क इंजिनियर आहे हो, आणि आजकाल जातपात पाहतंय कोण ? तिच्या घरचेही सगळे सुशिक्षित आहेत. हो हो काका सर्वांचा मान ठेवणारी आणि मुख्य म्हणजे नोकरी करणारी आहे. बाकी काय , त्यांचं त्यांना पाहु देत हो...! इतके सुजाण तर दोघंही आहेत. बरं कधी ठेवताय या पारावर लाडू त्यांच्या लग्नाचा??

अहो गंमत केली हो ! बरं अंधार व्हायला लागलाय , उशीर होतोय असं म्हणताय, चला आज मी येतो तुम्हाला घरापर्यंत सोडायला. वाटेत बोलत बोलत जाऊयात .. क्काय? चला मग..., हं तर कुठे होतो मी हं तर बघा अशी नाना तर्‍हेची माणसं मी रोज बघतो हो काका, कधी कुणाबद्द्ल दया येते , कुणाबद्दल राग, कुणाची कीव करावीशी वाटते तर कुणाचा संताप. कधी माणुसकीचं जिवंत उदाहरण दिसतं तर कधी माणूसकी पार लांब गेलेली आढळते, कधी दयेचा पूर दिसतो तर कधी दयेचा लवलेशही दिसत नाही. अहो हो काका बरोबर बोलताय तुम्ही इतक्या वर्षात तुम्ही हे अनुभवलंय, तुमचे काळ्याचे पांढरे असेच नाही झाले हे मान्य पण काका मीही २० वर्षांपासुन पिंपळाच्या झाडावर राहुन हे सर्व पाहतोय मान्य माझे कधीच काळ्याचे पांढरे होणार नाहीत पण रोजच्या रोज अनुभवात भर पडतेच आहे.

अरेच्च्या आलंच की तुमचं घर, पण काय हो काका तुमच्या घरातले तुमच्याकडे अश्या विचित्र नजरेने काय पाहतायत? अरे! यांना दचकायला झालंय काय? काय? त्यांना तुम्ही एकटेच बडबडताय असं वाटतंय, तुम्हाला भुताटकीने झपाटलंय असा यांचा समज झालाय? मांत्रिकाला बोलावताहेत ???? अर्रे बापरे पळा ...... !!!!!!

प्रतिक्रिया

आयुर्हित's picture

8 Mar 2015 - 4:25 pm | आयुर्हित

हायफाय सुनबाईंचे समाज कार्य एक EYE OPENER आहे.
जबरा लिखाण आहे.

सविता००१'s picture

8 Mar 2015 - 4:32 pm | सविता००१

भारी लिहिलं आहेस
आवडलं.

मस्त गं, आवडलं खूप. कल्पनाच लय भारी आहे. माझ्या कद्धी डोक्यात आलं नसतं भूताच्या डोक्यात डोकवावं म्हणून. आणि हरतर्‍हेच्या लोकांचा , स्वभाव विशेषाचा कोलाज पण आवडला. फक्त भिकार्‍यांना मदत करायला मला ही नाही आवडत हां. हातीपायी धड असणार्‍यांनी थोडी तरी कामाची तयारी दाखवावी. आणि हल्लीच्या भिकार्‍यांबद्दल बर्‍याच गोष्टी अशापण ऐकायला मिळतात ज्याने त्यांना गरज आहे यावरचा विश्वास उडत चाललाय.

काल्पनिक मनोगतच शक्य आहे ;) कविता भाईसमोर भूतही टिकणे कठीण!! छान लिहिलं आहेस.

स्पंदना's picture

9 Mar 2015 - 8:10 am | स्पंदना

सृजाने परफेक्ट टर्म वापरली आहे. स्वभावविषेशणांचा कोलाज!!
मस्त लिखाण्ण. भुताला माझ्यातर्फे एक प्यार की झप्पी दे ग कविता!!

पिशी अबोली's picture

9 Mar 2015 - 11:31 am | पिशी अबोली

जोरदार!
भुत्याचा नंबर दे गं मला.. गप्पिष्ट दिसतंय एक नंबरचं.. अर्थात, तुझ्या गप्पिष्टपणाची सर नाही हां.. ;)

मधुरा देशपांडे's picture

10 Mar 2015 - 2:36 am | मधुरा देशपांडे

भुत्याचे मनोगत परफेक्ट जमलेय. रोज घडणार्‍याच गोष्टी वेगळ्या नजरेने. आवडले. अर्थात वर स्रुजा म्हणाली तसे भिकार्‍यांच्या बाबतीत सहमत. मला पण नाही आवडत अशा धडधाकट लोकांनी उगाच भीक मागणे.

उमा @ मिपा's picture

10 Mar 2015 - 10:58 am | उमा @ मिपा

फक्कड जमलंय गं! आवडलं.
तूच एक अशी हिमतीची जिच्याकडे भूत गुजगोष्टी करू शकेल.
माणूस माणसाला समजून घेईना झालाय, भूतांनाही दया येऊ लागलीय.

इशा१२३'s picture

10 Mar 2015 - 12:53 pm | इशा१२३

मस्त लिहिले आहेस.भूताच्या गप्पागोष्टीतुन छान सगळ उभ केलेस.तुलाच जमु शकत भूताच्या डो़क्यात शिरायला.मस्तच!

आरोही's picture

10 Mar 2015 - 4:19 pm | आरोही

+१ असेच म्हणते ...लेख मस्त जमलाय ..भूत्याच्या डोक्यात शिरायला लय भारी डोस्क लागतंय !!

भूत हया शब्दाचीच भीती वाटते मला तरीही वाचल बै ;) न आवड्ल पण :)

कविता१९७८'s picture

10 Mar 2015 - 2:24 pm | कविता१९७८

सर्वांचे धन्यवाद, लिखाण द्यायची वेळ निघुन गेली होती पण अजयाने सांगितले अजुन २-३ दिवस आहेत जवळ मग बसले आणि लिखाणाला सुरुवात केली . ४५ मिनिटे ते १ तासात जे जे लिहिताना सुचलं तसं तसं टायपुन काढलं, लेखनाचा जास्त अनुभव नाही त्यामुळे कितपत जमेल याची भीती वाटत होती पण संपादक अजयाला ई-मेल पाठवल्या पाठवल्या तिचा प्रतिसाद आला की छान जमलंय हे ऐकुनच जीव भांड्यात पडला.

सस्नेह's picture

10 Mar 2015 - 5:24 pm | सस्नेह

वेगळेच व्ह्यूज पाहायला मिळाले भूताकडून !

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Mar 2015 - 8:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

भुताची सुंदर बडबड !

एक थोडीशी सूचना. तुम्हाला बहुतेक भूत म्हणजे... "भुताचे मनोगत" म्हणायचे आहे.

भुत्या उर्फ भोप्या म्हणजे भवानी देवीचा कवड्यांच्या माळा घालून नाचणारा एक प्रकारचा भक्त.

कविता१९७८'s picture

12 Mar 2015 - 2:14 pm | कविता१९७८

भुत्या उर्फ भोप्या म्हणजे भवानी देवीचा कवड्यांच्या माळा घालून नाचणारा एक प्रकारचा भक्त.

हे माहीत नव्हते , मीच या भुताचे नाव भुत्या ठेवलेय.

सानिकास्वप्निल's picture

12 Mar 2015 - 1:55 pm | सानिकास्वप्निल

भुत्याचे मनोगत आवडले , झक्कास लिहिले आहेस :)

मस्त लिहिले आहेस. कल्पनाही छान आहे :-)

मितान's picture

13 Mar 2015 - 5:05 pm | मितान

भुत्याचे मनोगत आवडले.
पण हा भुत्या तर माणसांइतकाच चोंबडा दिसतोय ! करायच्या काय त्याला लोकांच्या भानगडी ! उगा लटकत रहावं, अमावास्येला दिलेला दहीभात गिळावा, वेळ घालवायला पियुषाच्या गॅलरीत उगाच फेरी मारावी...बाकी पोट्ट्यासोट्ट्यांना घाबरवून मजा बघावी ! कधी या संसारातून रिटायर्ड होणार कोण जाणे !
जाते मी आता माझ्या झाडावर परत :))

विशाखा पाटील's picture

13 Mar 2015 - 8:21 pm | विशाखा पाटील

कल्पना भारी आहे. मस्तय भुत्या!

स्वाती दिनेश's picture

13 Mar 2015 - 9:57 pm | स्वाती दिनेश

मनोगत आवडले,
स्वाती

वा वा... भुत्याचे मनोगत अगदी मस्तच. पण असे जर खरे झाले तर त्या पहिल्या शुक शुक मधेच मी वरती पोहोचली असेल, त्याला कंपनी द्यायला. :P

एस's picture

19 Mar 2015 - 12:16 pm | एस

दे टाळी! :-)

श्रीरंग_जोशी's picture

23 Mar 2015 - 5:11 am | श्रीरंग_जोशी

भूताच्या नजरेतून केलेले विविध लोकांचे स्वभावचित्रण खूप आवडले.