अंधार क्षण भाग ५ - व्लादिमीर ओग्रिझ्को (लेख २५)

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
12 Jan 2015 - 12:50 am

अंधार क्षण - व्लादिमीर ओग्रिझ्को

जर मला आज कोणी विचारलं की १९३९ ते १९४५ हा जो दुस-या महायुद्धाचा संपूर्ण कालखंड आहे त्यातला सर्वात महत्वाचा आणि निर्णायक असा दिवस निवड, तर मी सर्वांना माहीत असलेले दिवस - उदाहरणार्थ ३ सप्टेंबर १९३९, जेव्हा ब्रिटन आणि फ्रान्स यांनी पोलंडवर जर्मनीने केलेल्या आक्रमणाच्या विरोधात जर्मनीविरूद्ध युद्ध पुकारलं; किंवा ७ डिसेंबर १९४१, जेव्हा जपानने पर्ल हार्बरवर आकस्मिक रीत्या बाँबहल्ला करुन युद्धाला ख-या अर्थाने जागतिक बनवलं; किंवा २२ जून १९४१, जेव्हा जर्मनीने सोविएत रशियावर जगातला सर्वात मोठा आक्रमक हल्ला चढवला - निवडणार नाही. हे दिवस महत्वाचे आहेतच पण या दिवशी ज्या घटना घडल्या त्या त्यांच्या कर्त्याकरवित्यांनी आधीच ठरवल्या होत्या. या दिवशी फक्त त्यांची अंमलबजावणी झाली.

माझ्यासाठी सर्वात महत्वपूर्ण दिवस आहे १६ आॅक्टोबर १९४१. या दिवशी गुरुवार होता आणि या दिवशी दुस-या महायुद्धाचं पारडं जर्मनीच्या विरोधात आणि दोस्तराष्ट्रांच्या बाजूने ख-या अर्थानं फिरलं असं मला वाटतं कारण हिटलर आणि स्टॅलिन या दोन हुकूमशहांमधल्या संघर्षातला आणि नाझी थर्ड राईशच्या पतनाच्या प्रवासातला सर्वात महत्वाचा क्षण हा या दिवशी आला आणि सर्वात महत्वाचा निर्णयही याच दिवशी घेतला गेला.

आज सर्वसामान्य लोकांना असं वाटतं की सोविएत रशियावर आक्रमण करण्याचा हिटलरचा निर्णय हा वेडेपणा, मूर्खपणा आणि आत्मघातकी अहंकार यांचा परिपाक होता. रशियाचा अवाढव्य भूभाग आपल्याला जिंकता येईल असं नाझींना वाटलंच कसं असाही प्रश्न लोक आज विचारतात. पण त्यावेळची वस्तुस्थिती काही वेगळीच होती. ब्रिटिश आणि अमेरिकन नेत्यांना अशी भीती वाटत होती की जर्मन गरुडाच्या तडाख्यापुढे सोविएत रशियाचा निभाव लागणार नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट यांना त्यांच्या नौदल सचिवांनी २३ जून १९४१ म्हणजे जर्मन आक्रमणाच्या दुस-या दिवशी असं पत्र पाठवलं होतं की - ६ आठवडे ते २ महिन्यांच्या आत नाझी सैन्य रशियाचा पाडाव करेल असं माझं मत आहे.
बीबीसीला ब्रिटिश युद्धकार्यालयातून अशी सक्त ताकीद मिळाली होती की ६ आठवड्यांपेक्षा जास्त काळ रशिया स्वतःचा बचाव करु शकणार नाही अशा स्वरूपाच्या बातम्या प्रसारित करु नयेत.

१९४१ चा शरदऋतू सुरु होताना हा सगळा निराशावादी दृष्टिकोन एकदम बरोबर वाटत होता. आॅक्टोबरमध्ये व्याझमाची लढाई जिंकून जर्मन सैन्य रशियाची आणि संपूर्ण सोविएत युनियनची राजधानी माॅस्कोपासून फक्त १५० किलोमीटर्स एवढ्या अंतरावर पोचलं होतं. त्यावेळी माॅस्कोच्या संरक्षणासाठी फक्त ९०,००० सैनिक होते. १९९१ मध्ये सोविएत युनियनच्या पतनानंतर अनेक गुप्त कागदपत्रं इतिहासकार आणि संशोधकांसाठी खुली झाली. त्यांच्यानुसार स्टॅलिन स्वतः माॅस्को सोडून ६५० किलोमीटर्स दूर पूर्वेकडे कुबिशेव इथे जाण्याचा विचार करत होता. १५ आॅक्टोबर १९४१ या तारखेची नोंद असलेला एक दस्तऐवज आहे ज्याच्यावर स्टॅलिनच्या युद्धमंडळाचा किंवा स्टाव्हकाचा शिक्का आहे. यानुसार सुप्रीम सोविएत प्रेसिडियम (जिथे सोविएत संघराज्यांचे प्रतिनिधी बसत असत - एकप्रकारे सोविएत युनियनची संसद किंवा विधिमंडळ) आणि इतर सरकारी इमारती रिकाम्या करुन सरकारच्या सर्व सदस्यांना सुरक्षित रीत्या माॅस्कोच्या बाहेर हलवण्याच्या योजनेचा उल्लेख आहे. त्यात असंही म्हटलेलं आहे की काॅम्रेड स्टॅलिन परिस्थिती पाहून उद्या किंवा नंतर माॅस्कोमधून निघतील.

दुस-या दिवशी म्हणजे १६ आॅक्टोबर या दिवशी एक शस्त्रसज्ज आगगाडी माॅस्कोच्या मध्यवर्ती स्थानकात स्टॅलिनला कुबिशेव इथे घेऊन जाण्यासाठी उभी होती. स्टॅलिनच्या सचिवालयातल्या कर्मचा-यांनी दळणवळणाची सर्व उपकरणं क्रेमलिनमधून काढून गाडीत ठेवून दिली होती. त्याच रात्री स्टॅलिनचे सर्व व्यक्तिगत सहाय्यक या गाडीत बसले होते. स्टॅलिनचे संदेश तारायंत्राने सोविएत युनियनच्या
कानाकोप-यात पाठवणारा निकोलाय पोनोमारिओव्ह हासुद्धा त्यांच्यात होता. सर्वजण स्टॅलिनची वाट पाहात होते. आता निर्णय स्टॅलिनला घ्यायचा होता - गाडीत बसून सुरक्षित ठिकाणी निघून जावं की माॅस्कोत राहून शत्रूच्या हातात सापडण्याचा धोका पत्करावा? संपूर्ण पूर्व आघाडीचंच नव्हे तर महायुद्धाचं भविष्य ठरवणारा हा क्षण होता. जर स्टॅलिन त्या रात्री गाडीत बसून माॅस्को सोडून निघून गेला असता तर युद्ध लवकरच संपुष्टात आलं असतं आणि सोविएत युनियनला लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं असतं याबद्दल माझ्या मनात शंका नाही.

अर्थात असं करणारा स्टॅलिन हा पहिला रशियन नेता ठरला असता असंही नाही. यापूर्वीही रशियन नेत्यांनी माघार घेण्याचा पर्याय स्वीकारला होता. पहिल्या महायुद्धात झार निकोलसने रशियाची परिस्थिती नसताना ब्रिटनच्या भरीस पडून युद्धात उडी घेतली होती पण कैसर विल्हेल्मच्या जर्मन सैन्याने रशियन सैन्याची अक्षरशः लांडगेतोड केली. जेव्हा रशियात कम्युनिस्ट क्रांती होऊन लेनिनच्या हातात सत्ता आली तेव्हा पहिली गोष्ट जर त्याने केली असेल तर ती म्हणजे जर्मनीबरोबर ब्रेस्ट लिटोव्हस्क इथे तह केला आणि रशियापुरतं युद्ध संपवलं. मार्च १९१८ मध्ये झालेल्या या तहामुळे रशियाला युक्रेन, पोलंड, बेलारुस, बाल्टिक देश आणि तुर्कस्तानकडून हिसकावून घेतलेले आर्मेनिया, रूमानिया, बल्गेरिया इत्यादी देश एवढ्या मोठ्या भूभागावर पाणी सोडावं लागलं. जर लेनिनने पहिल्या महायुद्धातून रशियाला असं बाहेर काढलं तर आत्ता स्टॅलिनही तसंच करु शकत होता.

जर्मनांनी आपली सर्वात जास्त ताकद, आपलं सर्वात जास्त सेनासामर्थ्य हे रशियाविरूद्ध एकवटलं होतं. जर रशियाने अशी माघार घेतली असती तर हिटलरला ही सगळी ताकद पश्चिम आघाडीवर केंद्रित करता आली असती आणि मग युद्धाचं सगळं चित्रच बदललं असतं. १९४४ मध्ये ब्रिटन आणि अमेरिका यांनी पश्चिमेला फ्रान्स आणि दक्षिणेला इटलीमध्ये जर्मनीविरूद्ध आघाडी उघडली. त्यावेळेला तीन आघाड्यांवर एका वेळी लढूनदेखील जर्मनांनी दोस्तांच्या सैन्याला १० महिने झुंजत ठेवलं. जर पूर्व आघाडीवरचं जर्मन सैन्य रशियाच्या माघारीमुळे पश्चिम आणि दक्षिण आघाडीवर आलं असतं तर ब्रिटन आणि अमेरिकेने फ्रान्स आणि इटलीत सैन्य उतरवून जर्मनीला पराभूत करणं ही जवळजवळ अशक्यप्राय गोष्ट होती.

आज आपल्याला हे माहीत आहे की स्टॅलिन माॅस्कोमध्येच राहिला. दळणवळणाची सर्व उपकरणं परत क्रेमलिनमध्ये बसवण्यात आली. सर्व सहाय्यकही आपापल्या कामावर गेले. अशा प्रसंगी आपण माॅस्को सोडण्याचा कचखाऊ निर्णय घेऊ शकत नाही याची स्टॅलिनला जाणीव झाली. पण अर्थातच तो एकटा हे शहर शत्रूपासून वाचवू शकत नव्हता. त्यावेळी त्याची मदत करणा-या हजारो लोकांपैकी एक होता व्लादिमीर ओग्रिझ्को.

माॅस्कोच्या मध्यवर्ती भागात ओग्रिझ्कोचा फ्लॅट होता. तिथेच तो आम्हाला भेटला. त्यावेळी त्याचं वय ८० वर्षांपेक्षा जास्त होतं पण त्याच्याकडे पाहून कोणालाही तसं वाटलं नसतं. एखाद्या क्लबच्या बाऊन्सरची असावी अशी शरीरयष्टी आणि लोखंडाच्या कांबीप्रमाणे ताठ कणा असणारा ओग्रिझ्को तोपर्यंत मला भेटलेल्या सर्व ' वृद्ध ' लोकांपेक्षा वेगळा होता - शारीरिक दृष्ट्याच नव्हे तर मानसिकदृष्ट्या सुद्धा! १९४१ मध्ये तो एन्.के.व्ही.डी.या गुप्तचर आणि अंतर्गत सुरक्षा संस्थेच्या एका तुकडीचा प्रमुख होता. रशियामध्ये अशा अंतर्गत सुरक्षा संघटनांची मोठी परंपरा होती. झारच्या काळात या संघटनेचं नाव होतं ' ओखराना.'
पुढे कम्युनिस्ट क्रांती झाल्यावर स्टॅलिनने ' चेका ' नावाची नवी संघटना तयार केली. जेव्हा त्याने आपल्या पक्षांतर्गत विरोधकांना मार्गातून हटवलं तेव्हा याच संघटनेचा वापर केला होता पण त्यावेळी तिचं नाव होतं एन्.के.व्ही.डी. पुढे महायुद्ध संपल्यावर तिचं नवीन नामकरण झालं - के.जी.बी. आपल्या कडवेपणाबद्दल प्रसिद्ध अशा या संघटनेकडे महायुद्धाच्या काळात एकच जबाबदारी होती - रशियनांचं मनोबल वाढवणे आणि ते कुठल्याही मार्गाने वाढवण्याची मुभा या संघटनेला देण्यात आली होती.

" १४ आॅक्टोबरला जर्मन रणगाडे माॅस्कोच्या जवळच असणा-या खिमकी तलावाजवळ पोचले होते. इथून माॅस्कोची सीमा अगदीच जवळ होती. या रणगाड्यांना क्रेमलिनचे मनोरे दिसू शकत होते. आम्हालाही हे रणगाडे आमच्या दुर्बिणीतून दिसत होते. हे रणगाडे आल्याची बातमी जशी शहरात पसरली तशी लोकांमध्ये एक प्रकारची घबराट पसरली. तशीही युद्ध सुरु झाल्यापासून लोकांमध्ये भीतीची भावना होतीच. ब-याच ठिकाणी ही भीती शत्रूच्या हेरांनी आणि पंचमस्तंभीयांनी पसरवली होती. अनेक ठिकाणी लूटमार झाली होती कारण लोक घाबरून आपलं घर तसंच सोडून गेले होते. अशा परिस्थितीचा फायदा घेणा-या हलकट गुन्हेगारांचं फावलं होतं. "

त्याच महिन्यात स्टॅलिनने माॅस्कोमध्ये युद्धजन्य आणीबाणी घोषित केली. त्यानुसार रशियन नागरिकांना माॅस्को सोडून जाण्यास मनाई करण्यात आली. ह्या मनाईहुकुमाचं पालन होतं आहे की नाही हे बघायची जबाबदारी ओग्रिझ्कोच्या तुकडीवर सोपवण्यात आली, " लोक इतके घाबरले होते की ते रस्त्यांवरून सैरावैरा पळत होते. आम्हाला जेव्हा ही जबाबदारी मिळाली तेव्हा अशा लोकांनी भरलेले रस्ते सैन्याच्या वाहतुकीसाठी वापरण्यायोग्य करणं हे आमचं पहिलं काम होतं. आता, रशियन लोक तसे ' समंजस ' आहेत. एकाला आम्ही ' समजावून ' सांगितल्यावर इतरांनाही ते समजलं. अशी समज देण्याचे संपूर्ण अधिकार माझ्या तुकडीला देण्यात आले होते आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की आम्ही एकालाही आमचा वेढा तोडून माॅस्कोबाहेर जाऊ दिलं नाही. जे गोंधळलेले होते, मार्गावरून भरकटलेले होते त्यांना आम्ही परतवलं आणि मार्गावर आणलं. ज्यांनी विरोध केला, ते मारले गेले. हे टोकाचे उपाय होते पण त्यावेळी त्यांची गरज होती. आज जर कोणी म्हणालं की हे उपाय मानवी हक्कांच्या विरोधात आहेत तर ते चुकीचं आहे कारण जर आम्ही युद्ध हरलो असतो तर सगळ्यांचेच मानवी हक्क पायदळी तुडवले गेले असते. देशावर कोणती वेळ आलेली आहे याचा विचार न करता पळून जाणा-या भेकड लोकांना मारणं अजिबात चुकीचं नाही. "

आपण जे केलं ते बरोबरच केलं यावर ओग्रिझ्कोचा ठाम विश्वास होता, " तेव्हा युद्ध चालू होतं. त्यामुळे एखाद्यावर बंदूक नुसती रोखून ' थांब, नाहीतर मी गोळी घालीन ' असं नुसतं म्हणल्यामुळे कोणी थांबलं असतं असं मला वाटत नाही. तुम्ही हजारो वेळा तसं म्हणालात तरी लोक थांबणार नाहीत. अशा वेळी गोळ्या घालाव्याच लागतात. असे लोक हे देशाचे शत्रू आहेत ही आम्हाला जाणीव होती आणि आम्ही आमच्या शत्रूला नष्ट करत होतो. "

नंतर या एन्.के.व्ही.डी. तुकड्यांवर अजून एक मोठी जबाबदारी टाकण्यात आली - रशियन सैनिकांना युद्धातून पळून जाण्यापासून रोखणे. जर्मन आक्रमण सुरु झाल्यानंतर पुढचे ४ महिने रशियन सैन्य फक्त माघार घेत होतं. शेवटी स्टॅलिनने माॅस्कोच्या पश्चिमेला रशियन सैन्यासाठी एक हद्द निश्चित केली. रशियन सैनिकांना या रेषेपासून मागे येण्याची मनाई करण्यात आली. जर कुणी माघार घेतली तर एन.के.व्ही.डी. तुकड्यांना अशा सैनिकाला सरळ गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले.
" ही हद्द आणि सैन्य यांच्यामध्ये मी आणि माझी तुकडी उभे होतो. आमच्यावर रशियन सैन्याचं मनोधैर्य कायम ठेवण्याची जबाबदारी होती. आमच्या उपस्थितीमुळे सैन्याला योग्य तो संदेश मिळाला की काहीही झालं तरी माॅस्कोच्या संरक्षणासाठी उभारलेल्या प्रतिकार रेषेच्या मागे यायचं नाही. युद्धात माघार घेणं म्हणजे निव्वळ पलायन नव्हे तर तो देशद्रोह आहे. असे आदेशच आम्हाला दिले गेले होते की माॅस्को आमच्या पाठी आहे आणि आमच्या नजरा समोर आहेत, आणि अशीच परिस्थिती राहायला पाहिजे. "

असं असलं तरी ओग्रिझ्को आणि त्याच्या सैनिकांना कधीकधी अशा ' पळपुट्या ' लोकांसमोर उभं राहावं लागलं. " जेव्हा माणसाच्या मनात घबराटीची भावना येते तेव्हा तो सैनिक असो किंवा अधिकारी असो - त्याचा स्वतःवर ताबा राहात नाही. अशा वेळी अशा लोकांना थांबवावं लागतं. कदाचित त्यांना दोन-तीन बुक्के किंवा थपडा माराव्या लागतात, गदागदा हलवून भानावर आणायला लागतं, त्यांच्या मनावरचा ताण कमी करायला लागतो आणि सैनिक म्हणून त्यांचं जे कर्तव्य आहे त्याची जाणीव करुन द्यावी लागते. हे काम सोपं नाही. जर असं करूनही तो सैनिक किंवा अधिकारी भानावर येत नसेल तर मग त्यांना ' बाजूला ' सारणं हे एकच काम आम्ही करु शकतो. "
माझ्या मनात या वेळी विचार आला की सैनिकांच्या मनावरचा ताण कमी करण्याचा हा असला प्रकार जगात कुठेही घडला नसेल आणि व्लादिमीर ओग्रिझ्कोसारखा मानसोपचारतज्ज्ञही कुणाला भेटला नसेल!

थोडक्यात सांगायचं तर न्यायाधीश, ज्युरी आणि जल्लाद - या तीनही भूमिका व्लादिमीर ओग्रिझ्को आणि त्याच्या युनिटमधल्या इतर सहका-यांनी पार पाडल्या आणि त्याच्या मनात या गोष्टीविषयी कुठल्याही प्रकारची अपराधी भावना वगैरे नव्हती. जेव्हा मी त्याला आपल्याच देशबांधवांना गोळ्या घालणं हे अनैतिक नाही का असं विचारलं तेव्हा त्याने मला उडवून लावलं, " प्रत्येक देशात जसे देशभक्त असतात तसेच देशद्रोहीसुद्धा असतात. जेव्हा तुम्ही फक्त गोळी घालण्याची धमकी देता तेव्हा अशा देशद्रोही लोकांना संधी मिळते. ती त्यांना देऊन तुम्ही इतर देशभक्त सैनिकांचे प्राण धोक्यात घालता. कशासाठी? जगात जगण्यासाठी काही नियम आहेत. सैन्यात तर आहेतच आणि युद्धात तर हे नियम न पाळण्याचा पर्यायच तुमच्यासमोर नसतो. जेव्हा एखादा पळपुटा देशद्रोही माघार घेऊ पाहतो तेव्हा तो स्वतःपुरतं पाहात असतो आणि सैन्यात असा विचार करणा-यांसाठी कोणतीही जागा नसते!"

ओग्रिझ्कोच्या या उद्गारांनी आणि त्याच्या पोलादी व्यक्तिमत्त्वाने आमची मुलाखत ज्या खोलीत चालली होती ती संपूर्ण खोली भारल्यासारखी झाली होती. त्याच्यासारख्या माणसांकडून काम करवून घेणारा स्टॅलिनही अशाच पोलादी व्यक्तिमत्त्वाचा होता - आयोसिफ व्हिस्सारियोव्हिच जुगाशव्हिली या कम्युनिस्ट क्रांतिकारकाचं आणि नेत्याचं ' स्टॅलिन ' हे टोपणनाव होतं. या शब्दाचा अर्थही तोच आहे - पोलाद.
" स्टॅलिनने युद्धाचं नेतृत्व खंबीरपणे केलं असं त्याचे शत्रूदेखील म्हणतील. त्याच्यात आणि त्याच्या राजवटीत अनेक चुकीच्या गोष्टी होत्या हे मान्य आहे पण रशियामध्ये ज्या पद्धतीचा समर्थ नेता त्यावेळी हवा होता तसा स्टॅलिन होता यात शंका नाही. लोकांची भीती घालवण्यासाठी त्याने भीतीचाच वापर केला पण त्यावेळी त्याची गरज होती. "

व्लादिमीर ओग्रिझ्को आणि त्याच्यासारख्या इतरांनी स्टॅलिनचं नेतृत्व स्वीकारलं कारण तो स्वत: धीरोदात्तपणे माॅस्कोमध्येच राहिला, पळून गेला नाही. हे सरळसरळ कार्यकारणभावाचं उदाहरण आहे. १६ आॅक्टोबर १९४१ या दिवशी स्टॅलिनने माॅस्को लढवायचा निर्णय घेतला आणि त्यातून ओग्रिझ्कोसारख्या लोकांना स्फूर्ती आणि विश्वास मिळाला. जर स्टॅलिनने वेगळा निर्णय घेतला असता तर हे घडूच शकलं नसतं!

क्रमशः

इतिहासभाषांतर

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

12 Jan 2015 - 1:37 am | मुक्त विहारि

"एनिमी अ‍ॅट द गेट्स" आठवला...

स्पार्टाकस's picture

12 Jan 2015 - 1:50 am | स्पार्टाकस

स्टॅलीनने मॉस्को लढवण्याचा निर्णय ज्या क्षणी घेतला तो क्षण दुसर्‍या महायुद्धाच्या इतिहासातला एक अत्यंत महत्वाचा क्षण असला तरी दुसर्‍या महायुद्धातला सर्वात महत्वाचा क्षण तो नव्हता असं माझं वैयक्तीक मत.

मग हा क्षण नेमका कोणता होता?

माझ्या मते ज्या दिवशी विन्स्टन चर्चिल इंग्लंडचा पंतप्रधान झाला, तो दिवस दुसर्‍या महायुद्धातला सर्वात महत्वपूर्ण क्षण ठरावा. हिटलरने सारा युरोप पादाक्रांत केल्यावर जर्मनीपुढे ठामपणे उभं राहीले ते केवळ इंग्लंड आणि चर्चिल! तेव्हा पर्ल हार्बर झालेलं नव्हतं आणि अमेरीका युद्धापासून दूरच होती. जर्मनीचा रशियाबरोबर असलेला अनाक्रमणाचा करार अद्यापही शाबूत होता. युरोपमध्ये केवळ एकच शत्रू जर्मनीपुढे होता तो म्हणजे इंग्लंड! जर्मनीच्या बाँबहल्ल्यांना आणि नाझी प्रचाराला कोणत्याही प्रकारे न जुमानता ब्रिटनने एकाकीपणे ही झुंज दिली आणि हिटलरला ऑपरेशन सी लायन पूर्णपणे मागे घ्यावं लागलं.

त्या वेळी इंग्लंडने जर्मनीशी तह केला असता तर रशियावरील हल्ला कितीतरी आधी झाला असता. मुख्य म्हणजे ऑपरेशन बार्बारोसाला जो उशीर मुसोलीनीच्या मूर्खपणामुळे झाला तो झाला नसता. ग्रीस आणि अल्बानियामध्ये मुसोलिनीच्या स्वारीचं जे ओमफस् झालं आणि इजिप्तमध्ये रोमेलला ब्रिटीश फौजांशी जी झुंज घ्यावी लागली ती इंग्लंडने तह केल्यास झाली नसती आणि रशियाच्या पराभवाची शक्यता कितीतरी पटीने वाढली असती कारण हिटलरला युरोपातील पश्चिम आघाडीची गरजच पडली नसती!

त्या दृष्टीने विचार केला तर चर्चिल इंग्लंडच्या पंतप्रधानपदी येणं ही सर्वात महत्वाची घटना वाटते. चर्चिलच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने जर्मन विमानदलाचे हल्ल्यावाचून हल्ले पचवले, अपरिमीत मनुष्यहानी आणि संपत्तीचा र्‍हास पत्करला, पण इंग्लंड आपल्यापुढे शरणागती पत्करेल हे हिटलरचं स्वप्न उधळून लावलं! केवळ चर्चिल होता म्हणूनच फ्रान्सच्या पराभवानंतर पश्चिम युरोपातलं युद्ध कधीच संपलं नाही!

Pain6's picture

15 Jan 2015 - 1:46 pm | Pain6

"युरोपमध्ये केवळ एकच शत्रू जर्मनीपुढे होता तो म्हणजे इंग्लंड! जर्मनीच्या बाँबहल्ल्यांना आणि नाझी प्रचाराला कोणत्याही प्रकारे न जुमानता ब्रिटनने एकाकीपणे ही झुंज दिली !"

यात इंग्लंड हे इतर युरोपीय राष्ट्रांप्रमाणे केवळ एक राष्ट्र नसून भारतीय उपखंड, चीन, आग्नेय आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांचा समूह धरला पाहिजे. वसाहतींमधून वाहणारा वित्त, साधनसामुग्री, मनुष्यबळाचा ओघ नसता तर ते बहुदा जर्मनीपुढे टिकले नसते. एकाकीपणे (बहुतांश) जगाशी झुंज दिली ती जर्मनीने.

त्या दृष्टीने विचार केला तर चर्चिल इंग्लंडच्या पंतप्रधानपदी येणं ही सर्वात महत्वाची घटना वाटते. चर्चिलच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने जर्मन विमानदलाचे हल्ल्यावाचून हल्ले पचवले, अपरिमीत मनुष्यहानी आणि संपत्तीचा र्‍हास पत्करला, पण इंग्लंड आपल्यापुढे शरणागती पत्करेल हे हिटलरचं स्वप्न उधळून लावलं! केवळ चर्चिल होता म्हणूनच फ्रान्सच्या पराभवानंतर पश्चिम युरोपातलं युद्ध कधीच संपलं नाही!

इतका सगळे करूनही युद्धानंतर त्याला लोकांनी निवडून दिले नाही. काय दुर्दैव! अर्थात भारतासाठी ते चांगलेच झाले.

बोका-ए-आझम's picture

12 Jan 2015 - 8:10 am | बोका-ए-आझम

हीच तर इतिहासाची गंमत आहे स्पार्टेशअण्णा! तुम्ही म्हणता तो दिवस म्हणजे १० मे १९४०, ज्या दिवशी चर्चिल ब्रिटनचे पंतप्रधान झाले. नक्कीच कलाटणी देणारा दिवस आहे, पण माझं वैयक्तिक मत विचाराल तर दोन्ही दिवस नाहीत. माझ्यासाठी असा कलाटणी देणारा दिवस म्हणजे ज्या दिवशी हिटलरने ग्रीस आणि युगोस्लाव्हिया यांच्यावर हल्ला चढवायचं ठरवलं तो दिवस. ग्रीसने इटालियन सैन्याला अल्बानियातून आणि ग्रीसमधूनही हुसकावून लावलं तसंच युगोस्लाव्हियाचा रीजंट प्रिन्स पाॅल याने हिटलरबरोबर केलेला करार सैन्यप्रमुख जनरल सिमोव्हिचने झुगारला. या कारणांमुळे हिटलरने जर्मन सैन्य या दोन्ही देशांमध्ये घुसवलं आणि हे दोन्ही देश पादाक्रांत केले. पण त्यामुळे त्याचं रशियावरील हल्ल्याचं वेळापत्रक पूर्णपणे कोलमडलं. एप्रिल १९४१ ऐवजी जून १९४१ मध्ये रशियावर जर्मनीने हल्ला केला. ४ महिन्यांत म्हणजे आॅक्टोबर १९४१ मध्ये जर्मन सैन्य माॅस्कोच्या दरवाजांवर धडका मारत होतं पण तिथून त्यांना माघार घ्यावी लागली आणि त्यात रशियन प्रतिकाराइतकाच रशियन हिवाळ्याचाही वाटा होता. पण जर हाच हल्ला एप्रिलमध्ये सुरु झाला असता तर जर्मन सैन्य आॅगस्टच्या सुमारास माॅस्कोपाशी पोचलं असतं आणि मग कदाचित वस्तुस्थिती वेगळी झाली असती.

Pain6's picture

15 Jan 2015 - 1:35 pm | Pain6

"त्यात रशियन प्रतिकाराइतकाच रशियन हिवाळ्याचाही वाटा होता."

कमांडर विंटर नावाचे एक खूप चांगले पुस्तक आहे यावर. मिळाले तर वाचा.

बोका-ए-आझम's picture

15 Jan 2015 - 3:38 pm | बोका-ए-आझम

जरुर. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

अरे वा! तुमच्या प्रतिसादातुन अजून छान माहिती मिळाली.
बोकाभौ, हाही भाग नेहेमीप्रमाणे उत्तम.पुभाप्र.