निरागस बालक व्हा

विश्वजीत दीपक गुडधे's picture
विश्वजीत दीपक गुडधे in दिवाळी अंक
20 Oct 2014 - 4:24 pm

निरागस बालक व्हा.....निराशेला पळवा

मानवी भावना म्हटले की त्यामध्ये आनंद, राग, लोभ, मत्सर, द्वेष, भीती, निराशा या मनोवस्थांचा अंतर्भाव होतो. भावना म्हणजे मनाची निर्मिती. आपल्या परिसरात घडणार्‍या घटनांवर आपलं मन कसं प्रतिसाद देतंयावर ही भावना अवलंबून असते. खरं म्हणजे मनाला कोणत्याच सीमा मान्य नसतात. कधी मन उनाडपाखराप्रमाणे सैरावैरा उडत राहतं, कधी गटांगळ्या खातं, कधी अश्रूंच्या आड लपतं तर कधी क्षणार्धात दूरवर जाऊन येतं. अशीच एक मनोवस्था म्हणजे निराशा.

निराशा येणे ही एक नैसर्गिक बाब आहे. दैनंदिन जीवनात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा एखादी गोष्ट आपल्या अपेक्षेला खरी उतरत नाही. आपल्या मनाने आधीच अंदाज बांधलेले असतात आणि भलतेच घडते.म्हणजेच अपेक्षाभंग होतो. यातून निराशेची उत्पत्ती होते. निराशेचा स्त्रोत आपण स्वतः असतो. कारण निराशा आतून येते. निराशेचे आणखी एक मुख्य कारण म्हणजे नकारात्मक विचार. आपल्या मनाला जर नकारात्मक विचार सतत वेढा घालून राहत असतील तर क्षुल्लक कारणानेही आपण निराशेच्या गर्तेत जात राहणार.

निराशा अधिक काळ कायम राहिली तर ती माणसाला पोखरुन काढते. किंवा कधी अख्खे आयुष्य उध्वस्त करून टाकते. निराशेने माणूस एकलकोंडा होतो. त्याला इतरांचा सहवास नावडायला लागतो. त्याचे कशात लक्ष लागत नाही. कुठल्याही प्रसंगात तो केवळ शरीराने उपस्थित असतो अन त्याचे मन दुसर्‍याच गोष्टीत गुंतलेले असते. त्याच्या चेहर्‍यावर एक कृत्रिम हास्य असते. तो आपले दुःख इतरांपासून लपवू पाहतो. समाजात मुखवटा घालून वावरायला लागतो. निराशेची बाधा जशी मनाला होते तशीच ती शरीरालाही होते. निराशेमुळे भूक न लागणे, झोप न येणे, थकवा, पचनक्रियेसंबंधित समस्या उद्भवतात. शरीरातील ऊर्जा संपून जाते. काम करण्याचीइच्छाच शिल्लक राहत नाही.

काहीजणांच्या बाबतीत जसजशी निराशा वाढत जाते तसतसा माणूस व्यसनांच्या आहारी जावू लागतो. ही व्यसने वेगवेगळ्या प्रकारची असू शकतात. सिगारेट, दारूच्या नशेत तो आपले दुःख घालवू पाहतो पण त्याचे दुःख उलट वाढतच जाते. काही जणांची पावले जुगाराकडे वळतात. "आता सगळं काही संपलं, मरणावाचून गत्यंतर नाही" अशी त्याची धारणा होऊन जाते. नशिबाला सातत्याने दोष दिला जातो. त्याला या सर्वातून सुटका करणारा चमत्कार हवा असतो. अशा वेळी अनेक जण फसव्या जाहिरातींच्या जाळ्यात अडकतात. अमुक कवच घातले की आपले दुःख दूर होईल असे त्यांना वाटते. अनेक ढोंगी तांत्रिक आणि तथाकथित महाराज त्यांच्याकडून पैसे उकळतात.निराशेच्या वाटेवरचा प्रवास माणसाला विनाशाच्या दाराशी आणून ठेवतो. निराशेची तीव्रता वाढून आत्महत्या करण्याची किंवा मनोरुग्ण होण्याची शक्यता वाढत जाते.

निराशेच्या निराकरणाचा सर्वात सोपा उपाय म्हणजे मोकळेपणाने व्यक्त होणे. "वाटल्याने दुःख कमी होते", असे म्हणतात ना ते खरेच आहे. अपयश किंवा इतर कारणाने मनात निराशेचे मळभ दाटून आल्यास ती गोष्ट आपल्या मनातच ठेवू नये. जवळच्या मित्रांशी किंवा नातेवाईकांशी विचारविनिमय केल्यास बरीच मदत होते. समस्येवर तोडगा निघू शकतो. घरातील ज्येष्ठ व्यक्तींना मोकळेपणाने सर्व काही सांगावे. त्यांच्याकडे अनुभवाची अमुल्य शिदोरी असते. कित्येक खाचखळगे पार करत त्यांनी आयुष्य काढलेले असते. त्यामुळे त्यांचे अनुभवाचे बोल आपल्याला नक्कीच उपयोगी पडतात. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालविल्यास निराशा दूर होण्यास मदत होते. घराच्या गच्चीवर किंवा एखाद्या बागेत शांत चित्ताने थोडा वेळ घालविला तरी जगण्याची नवी प्रेरणा मिळते. निसर्ग हा मानवाचा सर्वात जवळचा मित्र तसेच गुरु आहे. ऊन-वारा सोसत वर्षानुवर्षे निरपेक्षपणे मानवाची अखंड सेवा करणारी झाडे बघितली की त्यासमोर आपले दुःख खुजे वाटते. आपण उगाच आपल्या दुःखाचे अवडंबर करत राहतो.

निराशेच्या क्षणांमध्ये शांत गाणी किंवा संगीत ऐकल्यास मनावरील ताण कमी होतो. संगीत ही एक उपचार पद्धती म्हणून आता सर्वत्र मान्यता पावली आहे. निराशा दूर पळविण्यासाठी छंदांना वेळ द्यावा. गायन, चित्रकला, नृत्य, लेखन, वाचन जे काही आवडत असेल त्यात स्वतःला पूर्णतः झोकून द्यावे. त्यावेळी इतर कोणत्याच गोष्टीचा विचार करू नये. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आयुष्यात काहीतरी करून दाखविणाऱ्या व्यक्तींची पुस्तके वाचल्यास प्रेरणा मिळते. संकटांना तोंड देण्याचे धैर्य मिळते. अनेकांना डायरी लिहण्याची सवय असते. आपल्या मनातील भावना कागदावर उतरवून ते मोकळे होतात. आलेल्या अपयशाचा कालसापेक्ष विचार करावा. इथून पुढे काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी हे अपयश इतके महत्वाचे राहील का? आपल्याला यावर काही उपाय काढता नाही येणार का ? यावर विचार करावा. भावनेच्या भरात चुकीचा निर्णय घेऊ नये. थोडा काळ लोटू द्यावा. काळाच्या ओघात सारे घाव भरून निघतात.

वारंवार निराशा येवू नये यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येतील. सर्वात मुख्य म्हणजे परिश्रमाची कास धरा. नियोजनबद्धरीत्या परिश्रम केल्यास यश हमखास मिळते. परिश्रमापेक्षा अवास्तव अपेक्षा ठेवली की निराशा येते. कणभर कष्ट करून मूठभर फळाची अपेक्षा केल्यास पदरी निराशाच पडते. यश पायरीपायरीने चढावे लागते. पहिल्या पायरीवरून पाचव्या पायरीवर जाण्याचा प्रयत्न केल्यास माणूस खाली पडणारच. शॉर्टकटने फळ कसे मिळणार ? फळासाठी वाट बघायला शिकणे गरजेचे आहे. अधीरता, उतावीळपणा शक्यतोवर टाळायला हवा.

कोणत्याही गोष्टीकडे बघण्याची सकारात्मक दृष्टी आपल्या मनाला निराशा शिवूच देत नाही. "हे मला जमणारच नाही", "हा असा, तो तसा" असे पूर्वग्रहदूषित विचार मनात असतील तर निराशा आपल्याला घेरणारच. पेला अर्धा भरलेला किंवा अर्धा रिकामा हे शेवटी प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. तो पेला पूर्ण भरण्याची जिद्द फक्त मनात असायला हवी. नेहमी खिलाडूवृत्तीने यशापयश स्वीकारण्याची तयारी असायला हवी. कोणीही परिपूर्ण नसतो. चुकांमधून धडा घ्यायला हवा. एखाद्याला परीक्षेत कमी गुण मिळाले तर ते का मिळले असतील, आपण कुठे कमी पडलो, याची मीमांसा करायला हवी. जमिनीवर आपटून पुन्हा उसळी घेण्याची चेंडूसारखी वृत्ती अंगी बाणवावी. आपण भूतकाळ बदलू शकत नाही. पण भविष्य घडविणे आपल्या हाती असते. सतत नवे मार्ग, संधी शोधत राहाव्या. कितीही बिकट परिस्थिती असली तरी आशा जिवंत ठेवावी. ही उमेदच आपल्याला वाट दाखविते आणि पूर्णत्वास नेते. नकारात्मक विचार केराच्या टोपलीत टाकून द्यावेत. एखादे लहान मूल कसे निरागसपणे प्रत्येक गोष्टीला सकारात्मक प्रतिसाद देते. नेहमी हसतमुख राहते. त्याच्यासारखे जगायला शिका. निराशा आपल्या आसपास फिरकणारही नाही.

-- विश्वजीत दीपक गुडधे,

दिवाळी अंक २०१४

प्रतिक्रिया

सस्नेह's picture

22 Oct 2014 - 10:29 pm | सस्नेह

लेख आवडला अन पटलाही.

आयुर्हित's picture

23 Oct 2014 - 12:29 am | आयुर्हित

सतत नवे मार्ग, संधी शोधत राहाव्या. कितीही बिकट परिस्थिती असली तरी आशा जिवंत ठेवावी. ही उमेदच आपल्याला वाट दाखविते आणि पूर्णत्वास नेते.

वाह व्वा! सुंदर माहितीपूर्ण लेख!

निरागस बालकाचे उदाहरणही आवडले.

पैसा's picture

23 Oct 2014 - 2:10 pm | पैसा

सकारात्मक विचारांनी खरेच खूप फरक पडतो!

स्पा's picture

24 Oct 2014 - 11:12 am | स्पा

छान लेख

वेल्लाभट's picture

31 Oct 2014 - 3:14 pm | वेल्लाभट

छान लेख.

आणखी एक महत्वाचं. सकारात्मकता स्वतःत शोधा, 'सेल्फ हेल्प' पुस्तकांपासून दूर रहा.