आमचे गणपती-(बसतात..!)

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in विशेष
8 Sep 2014 - 8:10 am
श्रीगणेश लेखमाला २०१४

भली पहाट,

या शब्दाचा अर्थ मला माझ्या या पौरोहित्याच्या कामात अनेक अंगानी उमगलेला आहे.पण त्याची खरी किंमत कळली, ती या गणपतिच्या प्राणाला-प्रतिष्ठा देणार्‍या त्याच्या उत्सवाच्या,या पहिल्या दिवशीच!.. वेदपाठशाळेतून-सुटून,कामाला लागलेल्या गुरुजिपणाच्या पहिल्या ३ वर्षात (हाय..हाय..!) ही खरी चव चाखायला मिळते.

तर...आदले दिवशी संध्याकाळी..आमचा बाप,हा वाड्यात आपले कार्टे जिथे दिसेल तिथून हकलत असतो. "ए गद्द्य्या,भल्या पहाटे गणपति बसवायला जायचायस ना???,मग त्या मंडळाच्या मांडवात शिरू नकोस.इथे घरी येऊन लवकर पालथा पड.गेल्या वर्षी एकेक तास उशिरा गेलावतास एकेक घरी.काहि लक्षात आहे का!?" अशी हृदय द्रावक वाणी उच्चारून आंम्हास सायंकाळी ७/८ वाजताच (:D ) घरात हकलणेचे करतो. आंम्हीही मनामधे ,उद्या आपण जनतेच्या खूप(च) कामी येणार आहोत,अश्या लढाईपूर्व योद्ध्याच्या आवि-र्भावात घरी जाऊन टि.व्ही.वगैरे न पहायला मिळता झोपतो.

आणी मग ती भली पहाट उजाडते. तत्पूर्वी अं..गाई होता होता, त्या आधीच्या एक/दोन वर्षीच्या व्यवसायातल्या आठवणी ताज्या होतात.त्या अनुषंगानी उद्या कुठे कुठे नक्की काय काय "घडेल????" याची एक रम्य आणि काहिशी धस्तावलेली उजळणी मनात सुरु होते. मग गतवर्षी आपण पहिल्या ठिकाणी गेलेलो असताना,यजमान हतात दाढीचा ब्रश घेऊन दरवाजा उघडायला आलेला,आणि आपण कचकावून चिडून एकंदर आधी त्याचाच 'गणपती-बसवलेला' शीन फ्लॅश होतो. मग उद्या काय असेल? ते चित्र ही उभं रहात. तसच कुण्या एका ठिकाणी पूजा संपवून निघता निघता..एखाद्या आज्जीबाईनी:- "बसा थोडे..!!! हे वाटीभर पोहे आणि २ मोदक खा, काहि गणपती आणि त्याच्या पुढचा यजमान रागावत नाही! दिवसभर वेड्यासारखं हिंडायचं! (कित्ती खरं बोल्ली हो माऊली ती!) मग पोटात मधून मधून काहि पडायला नको का?" अशी प्रेमानी दिलेली धमकी आणि त्याची आSचरणात आणायला लावलेली कृती आठवते. तर कुठे (दक्षिणेच्या) मोठ्या पाकिटातून आलेली छोटी बि'दागी मनाला धास्तावून नेते.तर कुठे आरती म्हणता म्हणता काढलेल्या रांगोळीचं झालेलं कौतुक (आणि त्याचा दक्षिणेत लागलेला बोनस!) आठवतो.त्याचबरोबर आरतीनंतर गायलेल्या एखाद्या स्तोत्रामुळे प्रभावित झालेले काहि नाजुक आणि मोहक सूर ( :D ) आपल्याला इमारतीच्या दारापर्यंत................सोडायला आलेलेही आठवतात. या सगळ्या रम्य्य्य्य्य्य्य्य्य अं...गाईत झोप कधी लागते ते कळतही नाही.

आणि मग भल्या पहाटे,मंजे खरतर मध्य रात्री ३:३०/४चा लावलेला गजर,युद्धाच्या रणशिंगासारखा ऐकू येतो. आणि मग काय??? कानात रणघोष दुमदुमतात...."हरहर महादेव!" मग एकच धावपळ. मी तर पहिल्याच वर्षी ,आपण पहाटे 'उठू की नाही?' या धस्तीत झोपलेला,गजर-ऐकू आल्यावर- कॉटवर असा गपकन उठून उभा राहिलो होतो,की... आईनी वरच्या फळीवर ठेवलेलं घरच्या गणपतिच्या पूजेचं कोरड्या तयारीचं ताट एका हदर्‍यात अंगावर-घेतलं होतं.(त्या प्र-पातामुळे जाग्या झालेल्या आईनी नंतर माझा मंत्र मारून-केलेला मोदक असा स्मरणात रहिला,की आता कॉटच्यावर १० फुटाचं छत असूहंही मी गजर ऐकल्यावर फक्त मानच-वर करतो.{ :D ) तर..., एकदाचे उठणे/आवरणे होते.निघता निघता ,आईनी,"अरे मेल्या..गंध तरी लावलय का कपाळाला.." अशी केलेली संभावना ऐकू येते.आणि आमची स्वारी एकदाची गाडीला किकवून रणमैदानातील पहिल्या चौकीकडे चाल करून जाते. गेल्यावर्षी 'केलेल्या-पूजेमुळे..यावेळी दाढीचा ब्रश सोवळं नेसून तयार अवस्थेत दार उघडायला आलेला पाहून आमचं नवभिक्षुक मन उचल खातं,आणि पुढच्या काहि वर्षात एनर्जी-सेव्हिंगचं मूल्य ध्यानात येणारं आमचं (ते..च!) अप्रगत मन तिथल्या पूजेला एक्स्ट्रॉ आवाज लाऊन जातं. पहिली सुपारी अगदी परफेक्ट वाजते,आणि आमची चौकी क्रमांक २ कडे कूच होते.तिथे जिना चढत असतानाची लगबग पाहून आमच्यासारखाच, परंतू रोजच भली पहाट पाहाणारा दूधवाला, "काय काका..लै लगबग चाल्लीया.किती-बसावले???" असा सूचक लाडू मारतो. त्याला चुकवून घर क्रमांक २* मधे आमची एंट्री होते.

(*हे या वर्षीचं "नवं घर" असतं) बघतो तर सोहळा असा,यजमानाची आई एका कोपर्‍यात निवांssssssssssत चहा पीत असते. आणि सुनेला,"ए राधा...ते गुर्जी आले बघ..त्यांना च्या..आण!" असा हुकुम सोडते! आम्ही, खोलीत चौरंग/पाट/गणपति इत्यादी काहिच न दिसल्यामुळे चांगलेच गांगरतो. तेव्ह्ढ्यात यजमान नवे कपडे/काळी टोपी आणि गंध लावलेल्या अवस्थेत-बाहेर येतो. "गुरुजी दो.......नच मिन्टं बसा,तयारी करा.आलोच मी गणपती घेऊन!" असा त्या दिवसातला महाभयानक बाँब टाकतो. नंतर कळतं की गणपती कालच आणलेला,परंतू खाली गाडीतच ठेवलेला आहे. आणि तो "आज" - वर आणायचा असल्यानी ही मग्गाचची दोन वाक्य पडलेली आहेत. परंतू अश्या ठिकाणी सर्वच काही निवांत असल्यानी दिलेल्या वेळेतली मोलाची १५/२० मिनिटं कुरतडली जातातच. मग 'पुढच्या वर्षी यांच्याकडे नको!' असा निर्णय घेऊन आमचं(तेच धास्तावणारं) मन त्यांचा जिना उतरतत. आणि मग समोर येतं घर क्रमांक-३...... इथे मात्र सर्व काही यथास्तित असतं.यजमान पूर्ण तयारीत आसनस्थ आणि अगदी विराजमान असतो. सर्वत्र अत्तर आणि उदबत्यांच्या सुवासानी वातावरण भारलेलं,अगदी गणपतीमय झालेलं असतं.लहान पोरं नवे कपडे घालून गळ्यात झांजा घेऊन तयार असतात. यजमान-सौभाग्यवतीही ''राहिलेलं' पंचामृत घेऊन लगोलग पाटावर येऊन बसतात.आणि आमचा मागच्या कामाचा शीण या वातावरणानी निघून जाऊन अगदी प्रसन्न पूजा होते. आणि तिथून आंम्ही चौकी क्रमांक चारकडे निर्धास्तपणे कधी गेलो??? हे कळत देखिल नाही.

त्यानंतर ठाणे क्रमांक ४ किंवा ५ अथवा ६ असं कोणतं तरी एक आमचा दिवस-भराचा घाम काढणारं..असं नशिबात येतच. या घरांची टीपिकल सवय म्हणजे गुरुजी यायच्या वेळेलाच अंघोळ-करायला किंवा बाजारात थोडं आधी(म्हणजे फक्त १५ मिनिटं सुद्धा! :D ) पूजेचं साहित्य आणायला..गणपति आणायला जाणे. त्यांना, गुरुजींना आणि पुढल्या गुरुजिंच्या बाकिच्या यजमानांसाठि(ही), हा दिवस किती महत्वाचा आहे? वगैरे सरररर्व काहि माहित असतं. पण मंडळी अशी काहि थंड आणि निवांत असतात,की तो गणपती यांना नक्की बुद्धीच देतो,की अजुन काही!? असा प्रश्न आपल्याला पडावा.

बाहेरच्या हॉल मधे गणपतिची आरास वगैरे जोरदार असते...पण फक्त ती'च असते!!!! .............. मग जरा वेळानी,आत कुणाला तरी,बाहेर गुरुजी येऊन-बसलेत..अशी बातमी लागते. त्यात गावाकडून आलेली एखादी काकूबाई आमच्याकडे 'हा कोण नक्की???' अशी आमच्या..पेशा-निरपेक्ष नजर टाकून निघुन जाते.आणि साधारण आमच्या तिथून 'निघायच्या' वेळे अलिकडे १०/२० मिनिटं तो गणपतिच यजमानाला घेऊन घरात येतो. (येत असावा! :D ) आणि तरिही कुणाची कोपर्‍यात येऊन बसलेल्या, या "गुरुजी" नामक गणपतिकडे नजर जात नाही,ती नाहीच!...सारी मंडळी आपुल्याची तंद्रीत विसावलेली असतात.मग आमच्या मुद्रेवरून आम्म्ही आता 'जायला उठणार'..अशी त्या दिव्य यजमानाच्या अंतरात्म्यास भगवंत प्रचिती देतो. मग.. "गुर्जी, एकच मिन्टात तयारी करतो..थांबा!" असं म्हणून कुणाला तरी .."एssssssssss,त्या काकाला च्या द्या की(जरा!)" अशी हाक पडते.या वातावरणात तो - आत गेला की आंम्ही तिथून (कायमचे!) बाहेर निसटतो. आणि मग आज आपली एक 'सुपारी' पोकळ निघाल्याचा आनंद मनात पुरेपूर साठवत पुढच्या चौकिकडे कूच करतो.(नंतर हा किस्सा आंम्ही आमच्या-लोकात शेअर केला,की या अखिल जगतातल्या "तयार" नामक जमातीचा आमच्यातला कुणीतरी एक प्रतिनिधी एक डायलॉग हमखास मारतो:- "ह्हे.........! उगीच सोडला राव तू त्याला!" )

मग पुढे २/४ घरी अश्याच कमी अधिक फरकानी गणपतिची ( आणि आपली! ;) ) प्राण-प्रतिष्ठा होते.त्यात दुपारचे एक/दोन वाजत आलेले असतात.आणि मग, मधे जरा घरी जाऊन विश्रांती घेण्यासाठी ठेवलेला १२ ते ३ चा वेळ चांगला एकदीड तसानी शॉर्ट होऊन आपल्याला कट देऊन गेलेला आमच्या लक्षात येतो. पण अश्याही परिस्थितीत आम्हाला चांगली २ तासांची विश्रांती मिळते! आपल्यालाही प्रश्न पडला ना..कशी काय हो ती????? अहो ही किरपा होते,ती दुपारी ३ वाजल्यापासून ते संध्याकाळ पर्यंत(आंम्हीच)घेतलेल्या ३/४ गणेश मंडळां कडून!

आम्म्ही अगदी "मायला...या-यांच्यामुळे दुपारची खाण्याची आणि झोपेची येळ बोंबल्ली!" असा हिशोब मोजत घरी येतो. आणि भराभर काहितरी गिळून आडवे होतो. आईला "ए आई..मला ३:३० ला उठव,आणि आला कुणाचा फोन..तर येतायत..येतायत..असं सांग!"......... असं सांगून निद्रीस्त होतो. (मंडईतल्या हमालाची दुपारची २ तसाची झोप आंम्हाला मिळते,ती याच दिवशी!) आणि मग आई जेंव्हा उठ्वते,तेंव्हा दुपारचे चांगले चार वाजलेले असतात. मग आंम्ही उठल्या उठल्या लग्गेच आईवर..."काय गं...आता उशीर होणार ना १ तास सगळीकडे पुढे" असा नाराजीचा सूर काढताच मातोश्री उलट्या आहेर करतात, "ह्हूं... तुझे ते मंडळवाले..मग्गाशीच सांगून गेले.काकू..गुर्जींना जरा लेट पाठवा ५ पर्यंत.या बसलेल्या सुखद दणक्यानी झोप नीट झालेली असली..तरी रात्री ११ वाजेपर्यंत आमचे मंडळांचे गणपती कोणत्याही क्रमात..आमच्या कडून बसतात.हे मात्र चमत्कारीक रित्या घडून येतच. अगदी दर वर्षी!
==========================================

गणेश मंडळ..ही आता महा राष्ट्रात जागोजागी दिसत असली,तरी यांची वर्तवणूकीची मुहुर्तमेढ पुण्यात सुरु झालेल्या गणपतीच्या उत्सवाबरोबरच रोवली गेली असणार,या बद्दल माझ्या मनात पक्की खात्री आहे.कारण पुणं जर का दिव्य असेल,तर इथली मंडळं, ही महा-दिव्य आहेत हे मी(आता) खात्रीनी सांगू शकतो. अगदी गणपती परवडला,पण मंडळ आवर! अशीच अवस्था.

होतं काय,की ती दुपारची मिळालेली झोप वगैरे होऊन आंम्ही पहिल्या मंडळाच्या मांडवात येतो.पण तिथे कुणीच नसतं.किंवा असलच कोणी तर आपल्याला दुरुन येताना बघत असतं नुसतं! आमच्या व्यवसायातल्या नवेपणाच्या नववर्षांमधे ह्या मंडळांचा तडाखा ज्यानी खाल्ला,तो या इहलोकातल्या कुठल्याही सार्व-जनिक उत्सवातलं काहिही पचवू शकतो.अहो, पचनशक्तीच सुधारते हो तशी!
आपण मांडवाच्या कडेला गाडी(सॉरी ..टू व्हीलर! Biggrin ..) सोडतो.आणि जवळ जाऊन तिथे असलेल्या माणसाशी 'सुरु' होतो.
(* >>> येथून पुढील सदर लेखनातले खुणावलेले शब्द हे खास "पुणे" गोटातच (उच्चारी) ऐकायला मिळतात. आम्ही ह्या धंद्यात प्राचीन तमाशाच्या फडाप्रमाणे अखिल{कित्ती दिवसानी लागला हा शब्द हाताता..व्वा!!! Biggrin } महाराष्ट्र हिंडला असल्यामुळे ही माहिती अत्यंत सत्य समजावी! )

आपणः- अहो..आपण कार्यकर्ते का?
तो:- "............." (एक निव्वळ कटाक्ष!)

आपणः- मंडळाचे कार्यकर्ते कुठायत?
तो:- (मांडवाच्या खांबाला धरून..वरूनच एक पानाची पींक येते...) प्पिइथ्थूऊऊ... (हातातली हातोडी सांभाळत) त्ये आमाला काय म्हैत नाय! आमी मांडव जोडणारे हाओत. (आणी यानंतरची एक कचकाऊन मारलेली हाक ,शेजारच्या वाड्याकडे जाते..) ओ..रनपिशे साएब..त्ये (?) बामन* आलेत बगा!

मग १० मिनिटानी रनपिशे साएब येतो.
रनपिशे साएब:- काका..... (पॉज..)
आपणः- (?????)

रनपिशे साएब:-तुमी जरा येळानी चक्कर टाका!
आपणः- आहो पण तुंम्हीच बरोब्बर ४:३० ला या म्हणाला होतात ना!? आता ५:१५ वाजत आले.

रनपिशे साएब:- खरं ए* आपलं म्हन्नं,पन आमची मिरवनूक आडलीहे.. गुलाल संपला,कार्टी नाचायची थांबलीत,त्येच्यामुळं ल्येट होनार...तुम्मीच सांगा काय करु?
आपणः- ...........(निरुत्तर होऊन पुढच्या मंडळाकडे कूच! )

पुढे जावं तर मिरवणूक यथेच्च होऊन,गणपतीपण मांडवात आलेला असतो. पण ज्या सणमाणणीयं'च्या हस्ते बसवायचा,त्यांचे हात त्या दिवसाला बर्‍याच मंडळांखाली-अडकलेले असल्यामुळे गाडं अडलेलं असतं.मग, "ए....काका आले,काका* आले...चला पुजेची तयारी आना..काकांना चा द्या.." अश्या संयुक्त हाका अन्यत्र पडतात. तोपर्यंत आम्हाला अडकलेल्या हातांचा पत्ताही लागू दिला जात नाही. तयारी झाल्यानंतरंही १५/२० मिनिटं 'अशीच' गेल्यावर ,काही कार्यकर्त्यांना "हा बामन पळून गेला,तर दुसरा कुठनं आनायचा?(आज!)" अशी चिंता अंतरमनात भेडसावते. आणि मग त्यांच्यातलाच एक कुणीतरी मंडळाच्या मुक्क्य*-कार्यकर्त्यांण्णा बाजूला घेऊन समजावतो. "पूजा बामनाकडून करुण घेऊ. आनी आरती दादांच्या हातूण!...ते आल्याव्!* " हा तोडगा सगळ्यांना पटतो,आणि आंम्ही पहिल्याच्या जागी-दुसराच गणपती बसवून तिसरीकडे जातो.

हा सोसायटी'तला गणपती असतो.पण इथेही चित्र फारसं वेगळं नसतं.गणपती मांडवात असतो. पण त्याचं थर्माकोलचं डेकोरेशन सारखं-पडत असल्यामुळे ,कार्यकर्त्यांचं एकमेकावर रेशन* घेणं सुरु असतं.आंम्ही आल्याची वर्दी-लागलेली नसतेच. आंम्ही इमारतीच्या बेसमेंटमधे मांडवा बाजूला त्यातल्या एका थर्माकोलच्या खांबासारखेच वेळेची टाचणी टोचवून (घेऊन) फिक्स्स जाहलेलो असतो. आणि इकडे हा संवाद चालू असतो..

पांग्या:- ए..गां*&@ तो खांब धर की नीट..
रंग्या:- सांगत होतो काल..फॅवीकॉल* जास्त टाक.तवा ऐकलं नाय भाड्यानी माजं!..उरलेला डबा काय.. तुज्या...&^%$ सा#*$ होता काय?????????
पांग्या:- मी टाकलवतं की..पन ह्या लुंग्यानी ते कमी-केलं.म्हन्ला,,, काडताना त्रास हुइल!!!
लुंग्या:- मं..ग*???...बराबर हे ना आपलं..ग्येला येळचे चारी खांब 'कट' करायला लागले
रंग्या:- हम्म्म..म ह्या येळचे 'मोकळे' घे आता सा&*%# !
लुंग्या/पांग्या:- (एकदम खांब टाकून देतात..) ह्ह्ह्हे! आपुन नाय राव काम करनार, तु लय घेतो आपल्याला!

मग लुंग्या/पांग्या मांडवाखाली उडी मारतात,आणि आंम्हाला बघितलं न बघितल्यासारखे करून पळून जातात.मग तो रंग्या येतो..आणि आमच्याकडे दचकून बघुन एकदमः- "अर्ये................आयच्या गावा.........त,काका'ला बोलावलवतं.. णाय का!!!!!!!!?????" "काका*..पाचच मिन्टं थांबा..आलोच!" असं म्हणून तो जो जातो, तो अर्ध्या तासानी तांब्या/ताम्हण/पळीभांड(त्यातच साखरफुटाणे),दुसर्‍या हातात गनपतीला वहायचा-दूर्वा* घेऊन येतो. मागून उरलेले दोघे पंचाम्रुत'चं*-धही आणि इतर तत्सम वस्तू घेऊन येतात. आणि मग तो गणपती(एकदाचा) - बसतो! हे होता होता रात्रीचे आठ साडे आठ होत आलेले असतात. आंम्ही तिथून बाहेर पडत असतानाच,पहिली गुलालामुळे अडलेली मिरवणूक तिथे "काका...चला की..लय शोधलं राव तुम्माला.." करत येते. मग तिकडे जाणेचे होते. आणि तो(ही) बाप्पा बसतो.

आणि सगळ्यात शेवटी एका मोठ्ठ्या चौकातला गणपती उरतो. आपण तिकडे उशीर झाला म्हणून,घबरत..घाबरत..मांडवाशी जातो. तोच काही कार्य-कर्ते आपापसात कुजबुजत आपल्या जवळ येतात.

कार्य-कर्ते:- काका...
आपणः- (????)

कार्य-कर्ते:- जेवन झालं का तुम्चं?
आपणः- (अत्ता.. हा प्रश्न का आला?,या वि-वंचनेत..) असं का हो विचारता?

कार्य-कर्ते:-(बक्कळ हसून!) आओ तुमी लै थकलेले दिसता.जरा जेवा आमच्या एकाकडे.मंजे आरतीला बी जोर-चढेल(???)
आपणः- (वि-वंचना मोडमधेच!) अहो तसं काही नाही. १ चहा द्या फक्त आणि जाऊ लगेच मांडवात.

कार्य-कर्ते:- (खरं कारण सांगत..) ण्हाई मंजे हे ना ,आमच्या जुन्या द्येव्ळातला बामन म्हण्तो," आत्ताचा येक तास खराब हाय
आपणः- (तक्रारीच्या स्वरात..!) आख्खा दिवस शुभ असताना एकच तास कसा "खराब" असेल???

कार्य-कर्ते:-(मनात नाराज होऊन) हा.... चला मांडवात
आपणः- हो..चला (येणेपर्यंत रात्रौ'चे १० वाजून गेलेले असतात)

आणि नंतर तो गणपती बसवताना (तिथल्या काही कानोकानी वरूनच) समजतं,की नेहमीच्या-त्या बामनाला हा गणपती बसवायला-द्यायचा असल्या कारणानी,आंम्हाला कंटाळवून-फुटवायचा प्लॅन होता. तो प्लॅनही काही आंम्ही ओळखून उधळलेला नसतो. पण पलिकडची मंडळी गेम टाकण्यात कमी-पडल्यामुळे आमची अचानक सरशी झालेली असते. होता होता हे सर्व पार पडतं. आणि दिवसभराचे थकलेले आंम्ही शेवटी एकदाचे घरला येतो...चांगले ११ वाजून गेलेले असल्यानी, आई आर्धी कडी ठेऊन झोपी गेलेली असते. या मंडळ-योजनेत मिळणार्‍या पैश्यापेक्षा डोक्यावर झालेला त्रासाचा भार अधिक झालेला असल्यामुळे आंम्ही घरात जाऊन डायरेक जे निद्रीस्त होतो, ते दुसर्‍या दिवशीच्या सकाळी कामाला जाईपर्यंत......... म्हणूनच!
======================================

प्रतिक्रिया

इनिगोय's picture

8 Sep 2014 - 8:45 am | इनिगोय

आयाई गं!
गाडीत गणपती?? ते वाचून यंदा सीटबेल्ट लावून कारमध्ये विराजमान झालेल्या गणपतीचं ढकलचित्र आलं होतं, ते आठवलं.

मी अमेरिकेत असताना आणलेले गणराय असेच गाडीत बसून आले होते.. शेजारच्या सीट्वर.

यसवायजी's picture

11 Sep 2014 - 1:35 pm | यसवायजी

तिकडे विसर्जन कुठे करतात? टबात?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Sep 2014 - 8:50 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

आवडला. आता लग्न कार्यातल्या गुर्जींबद्दल येऊंद्या. :)

आहो त्यांची आक्खी लेखमाला चालू आहे ना त्यावर.. गुरुजींचे भावं विश्व म्हणून. यातल्या भाव वर ते ं का आहे ते मला काही अजून कळलेले नाही बोवा.

एस's picture

8 Sep 2014 - 8:55 am | एस

तुम्ही बर्‍याच नाजूक आणि मोहक सुरांना प्रभावित करत असता असे एकंदरीत दिसतेय तर. अजून थोऽऽऽऽऽऽऽऽडासा प्रयत्न केल्यास एखादा सूर सोसायटीच्या दारापर्यंतच काय, तुमच्या दारापर्यंत येऊन मापपण ओलांडायला तयार होईल. बघा, प्रयत्नांती काय काय...

;-)

लेख एकदम आत्मुष्टाईल..

अत्रुप्त आत्मा's picture

9 Sep 2014 - 9:40 am | अत्रुप्त आत्मा

@ अजून थोऽऽऽऽऽऽऽऽडासा प्रयत्न केल्यास एखादा सूर सोसायटीच्या दारापर्यंतच काय, तुमच्या दारापर्यंत येऊन मापपण ओलांडायला तयार होईल. बघा, प्रयत्नांती काय काय...>>> :-D ... :-D ... :-D

समांतर.... असलच कै तरी केल पायजे आता! :-\

किसन शिंदे's picture

8 Sep 2014 - 9:17 am | किसन शिंदे

हाहाहाहा!! लय भारी लेखन बुवा. गणपती बसण्याच्या पहिल्या दिवशी पुरोहितांचा एक एक मिनिट किती मोलाचा हे कळालं. :)

मस्त ओ बुवा. येकदम आत्मूस्टैल.

धन्या's picture

8 Sep 2014 - 10:13 am | धन्या

भारीच ओ बुवा.
बामनाला काय काय झेलावं लागतं ते आज कळलं :)

अ आ कित्ती कित्ती त्रास असतो हो तुम्हाला,
लेख वाचताना पु.लं ची आठवण मात्र का झाली कोण जाणे
लेखनशैलीमुळे का?

ज्ञानोबाचे पैजार's picture

8 Sep 2014 - 10:17 am | ज्ञानोबाचे पैजार

गुरुजींवरचा वरचा ताण कमी व्हावा म्हणुन आम्ही स्वतःच गणपतीची प्राण प्रतिष्ठापना करतो.

नंतर गुरुजी त्यांच्या सवडीने मंत्रजागर करायला येतात.

पैजारबुवा,

खटपट्या's picture

8 Sep 2014 - 10:41 am | खटपट्या

मस्त लिवलंय !!!
आमच्याकड येनाऱ्या (ऱ्या बरोबर आहे) गुर्जीना आम्ही कधी ताटकळत ठेवत न्हाई. सगळी तयारी येवस्तीत असते. गुर्जी खुश असतेत आमच्यावर

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Sep 2014 - 10:42 am | डॉ सुहास म्हात्रे

मस्त ! एकेकाची सुखदु:खे !! =))

प्रसाद गोडबोले's picture

8 Sep 2014 - 11:51 am | प्रसाद गोडबोले

सुंदर लिहिलय बुवा !!

स्पंदना's picture

8 Sep 2014 - 12:57 pm | स्पंदना

बापरे!! बराच खेळ खंडोबा घडतो तुमच्याकडे.....आम्हाला क्ल्पनाच नव्हती.

गजर-ऐकू आल्यावर- कॉटवर असा गपकन उठून उभा राहिलो होतो,की... आईनी वरच्या फळीवर ठेवलेलं घरच्या गणपतिच्या पूजेचं कोरड्या तयारीचं ताट एका हदर्‍यात अंगावर-घेतलं होतं.(त्या प्र-पातामुळे जाग्या झालेल्या आईनी नंतर माझा मंत्र मारून-केलेला मोदक असा स्मरणात रहिला,की आता कॉटच्यावर १० फुटाचं छत असूहंही मी गजर ऐकल्यावर फक्त मानच-वर करतो.{ Biggrin )

जबरीच =)))))

नेहमीच्या हातखंडा स्टाईलनं गणपतीच्या पहिल्या दिवसाची रनिंग कॉमेण्ट्री करण्यात आलेली आहे.

आमच्या गावातले 'गुरुजी/काका' आठवले. श्रावणात एका एका दिवशी २२-२५ पूजा.
गणपतीला तर आक्ख्या गावाचे अधिक ह्या पार्टीबरोबरच त्या पार्टीच्या मंडळाचे गणपती 'बसवतात'

अर्ध्या मिन्टात अथर्वशीर्ष, सात मिन्टात साधूवाणी जहाजासकट बंदरात, ३.५-४ आरत्या, दोन घोट बदाम काजू घातलेलं दूध नि ह्यावेळी मिळालेली 'कमी' दक्षिणा ह्याप्रकारे गुर्जी दुसर्‍या घरी रवाना!
अशीच सालाबाद आपली कामं करत असतात.

मध्ये मध्ये आमच्या काकाकडं (तो ह्यांचा वर्गमित्र) भक्त प्रल्हाद वगैरे सिनेमे बघायला जायचे ते आठवतंच. मूल नाही म्हणून पहिल्या बायकोच्या संमतीनं दुसरं लग्नही झालंय. नंतर काही २ मुलं वगैरे झालीत बहुतेक. एकंदर बरं चालू असतं. :)

अत्रुप्त आत्मा's picture

8 Sep 2014 - 2:25 pm | अत्रुप्त आत्मा

@सात मिन्टात साधूवाणी जहाजासकट बंदरात,>>>> =))

आमच्या एका महाखट्याळ य्ज्मानाकडल्या कथेत:- साधुवाणी "पाणबुडी" वापरतो! =))

मुक्त विहारि's picture

14 Sep 2014 - 12:35 am | मुक्त विहारि

साधू हा वाणी होवू शकत नाही आणि वाणी हा साधू होवू शकत नाही, इति आमचे गुरू...

प्रभाकर पेठकर's picture

14 Sep 2014 - 12:47 am | प्रभाकर पेठकर

तो 'वाणी' म्हणजेच व्यापारी असल्याकारणाने 'संधीसाधू' असावा.

वाणी हा संधीसाधूच असावा पण संधीसाधू हा वाणी असेलच असे नाही....

सही घ्यावी काय?

आम्ही कुठल्याही धाग्याचे काश्मीरच नाही तर, मंगळ पण करू शकतो.

(धागा शतकोत्तर झाला, की मंगळ झाले, असे पण समजायला हरकत्त नसावी.)

हाण तेजायला. जबराटच हो आत्मूस!

सस्नेह's picture

8 Sep 2014 - 2:45 pm | सस्नेह

वा बुवा,लै गणपती बशिवलेत वाटतं !

सूड's picture

9 Sep 2014 - 6:16 pm | सूड

ह्म्म !!

अनुप ढेरे's picture

9 Sep 2014 - 6:42 pm | अनुप ढेरे

लय आवल्डं!

पैसा's picture

9 Sep 2014 - 6:45 pm | पैसा

लै भारी लिवलंय!

किती आनंदाने बसवता हो गणपती!

सौंदाळा's picture

11 Sep 2014 - 12:29 pm | सौंदाळा

खासच

प्रभाकर पेठकर's picture

11 Sep 2014 - 1:38 pm | प्रभाकर पेठकर

मानाच्या गणपतींप्रमाणे, गणपती मौसमात वधारलेल्या, मानाच्या गुरुजींवर, प्रसंगी हृदयद्रावक वगैरे प्रसंगांना तोंड देण्याची वेळ येते हे वर्णन अगदी परिणामकारकतेने वर्णिले आहे. आवडले.

>>>>>एखाद्या स्तोत्रामुळे प्रभावित झालेले काहि नाजुक आणि मोहक सूर ...

गुरुजी, नुसत्या दक्षिणेवर समाधानी राहू नका. देणार्‍याने देत जावे, घेणार्‍याने देणार्‍याचे हातची घ्यावे. मिले सुर मेरा तुम्हारा, तोssss सुर बने हमारा. आमच्या अनेकानेक शुभेच्छा..!
(लग्नाला बोलवायला विसरू नका.)

>>>>मंडळी अशी काहि थंड आणि निवांत असतात,की तो गणपती यांना नक्की बुद्धीच देतो,की अजून काही!?

'गणपती नक्की ह्यांना बुद्धी देतो की आहे ती पण काढून घेतो.. काही कळत नाही.' असे ते वाक्य असायला पाहिजे होते.

अत्रुप्त आत्मा's picture

11 Sep 2014 - 2:07 pm | अत्रुप्त आत्मा

@'गणपती नक्की ह्यांना बुद्धी देतो की आहे ती पण काढून घेतो.. >>> =))

अणुभव कथन आवडले ! आचमन करताने गोंविंदाय नमः म्हंटले तरी सपा सपा तोंडाने पाणी ओढत बसणारे नग ही भारीच असतात. ते उगाच आठवले ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बोलक्या पोपटांचे राजकारण

पैसा's picture

11 Sep 2014 - 2:07 pm | पैसा

उगाचच "बशिवला टेंपोत!" हा "जगप्रसिद्ध" वाक्प्रचार आठवला!

नाखु's picture

11 Sep 2014 - 2:33 pm | नाखु

वा !! बु वा !!

उलट सुलट कसेही वाचा
लेख फर्मास

vikramaditya's picture

11 Sep 2014 - 4:06 pm | vikramaditya

लिहिलेत. मजेशीर अनुभव....

मुक्त विहारि's picture

14 Sep 2014 - 12:32 am | मुक्त विहारि

आवडला.

जे एस सर्वेश्वर's picture

24 Nov 2014 - 6:39 pm | जे एस सर्वेश्वर

मी हि २-३ वर्षांपासून गणपती बसवायला लागलो.
त्यामुळे वाचताना आपल्या अनुभवांचा साथीदारच अनुभव सांगतोय असे वाटले.