दूरस्थ

मीराताई's picture
मीराताई in विशेष
4 Sep 2014 - 8:23 am
श्रीगणेश लेखमाला २०१४

प्रवासाला निघायचं म्हटलं की मन कसं हलकं-फुलकं होतं. तसं तर नेहमीच्या त्या रामरगाडयातून बाहेर पडायला मन सदैव उत्सुकच असतं. मनाच्या या उत्सुकतेचं निरीक्षण करताना जाणीव होते ती आदिमानवाची! आपल्या त्या पूर्वजाची! त्याच्यामधली ती भटकी प्रवृत्ती अजूनही आपल्यात जागी आहे अन् संधी मिळताच ती डोकं वर काढते याची जाणीव तीव्रतेने होते. ही संधी मग धंदा-व्यवसायासाठी करण्याच्या प्रवासाची असो की घरगुती भेटीगाठी किंवा कौटुंबिक सोहळे यांच्यासाठी असो! क्वचित प्रसंगी त्या विशिष्ट ठिकाणी पोचल्यावर या चार भिंतीतून त्या चार भिंतींमध्ये येऊन पडल्याची भावनाही निर्माण होईल. ते पुढचं पुढे! पण प्रवास, या ठिकाणाहून त्या ठिकाणी जाण्याचा प्रत्यक्ष काळ, हा मात्र अगदी निखालस निवांतपणाचा असतो. दैनंदिन जीवनातल्या रोजच्या जबाबदाऱ्या घराच्या चार भिंतीत सुरक्षित ठेवीसारख्या ठेवून आपण बाहेर पडलेले असतो. अशावेळी अगदी गरजेचं सामान घेऊन, वाटल्यास छानशी शिदोरी घेऊन निघावं. सोबतीला कोणी जिवाभावाचं असेल किंवा मित्रमंडळींचा घोळका असेल तर ती एक वेगळीच गंमत! गप्पा, हास्य-विनोद यांच्या मैफलीत अडथळा म्हणून काही नसतोच! अव्याहत गप्पा सुरूच असतात. नुसती धम्माल! पण एकटं असलं तरी तेही छानच! स्वत:च्या सोबतीत, स्वत:शीच संवाद करत, स्वत:च स्वत:चा शोध घेत, त्या 'स्व'ला योग्य मार्गावर पुढे नेण्यासाठी ही संधी उत्तम! हवं तर त्या संवादात बरोबरीने धावणाऱ्या निसर्गालाही सामील करून घ्यावं. त्याची बदलती रूपं न्याहाळावी, आपल्या जीवनातल्या प्रमेयांची उत्तरं त्याच्या संकेतात शोधावी. अन् मग त्याची ती सांकेतिक भाषा समजून घेताना आपल्याच मनातले अंधारे कोपरे उजळून निघावेत. अशी ही दिवाळी कोणीही, कधीही साजरी करावी. त्याला निर्बंध कसा तो नाहीच!
अशीच त्या दिवशी निघाले होते; एकटीच. प्रवास तसा छोटासाच, चार-पाच तासांचा अन् दोन दिवसांच्या मुक्कामाचा. त्यामुळे सामान-सुमान विशेष नव्हतं. एकूण सगळाच मामला मोकळा-ढाकळा आणि निवांतपणाचा. मनावरची ओझीही घरात ठेवून घर कुलूपबंद केलेलं, त्यामुळे मनही पाखरू झालेलं! बस चालू लागली अन् मी एक निश्वास टाकून सैलावले. पाय पसरून आरामात बसले. शहरातली सिमेंटची जंगलं आणि बाजारपेठांची दलदल हळूहळू मागे पडली. नंतर माणसांच्या आक्रमणाने गांजलेले जमिनींचे तुकडे दिसू लागले. हिरवीगार शेतं बळेबळेच उजाड करून कुंपणात जखडून टाकलेले ते उदासवाणे भूखंडही दिसेनासे झाले. तेव्हा कुठे जरा जिती-जागती शेतं आणि बहरलेले मळे दिसू लागले.
डोळे निवांतपणे ही बदलती दृश्यं टिपत होते. मन त्याची फक्त नोंद घेत होतं. निरभ्र आकाशात एखादाच भुरका ढग तरळत होता. अन् तसाच शांतावलेल्या मनातही एखादा विचार काही संदर्भाशिवायच, उपटसुंभासारखा उपस्थित होत होता. मन आणि विचार यांच्या अतूट नात्याची जाणीव देऊन जात होता. गमतीची गोष्ट म्हणजे मनाच्या शांतीला धक्का न लावता मन प्रक्षुब्ध न करता, तो आल्या वाटेने, चोरपावलाने निघूनही जात होता.
मधेच रस्ता चढणीला लागलेला जाणवू लागला. भोवताली अंधार दाटून येत होता. दूरवर दिवे मिणमिणू लागले अन् डोंगरांच्या छाया आपल्या निळया-हिरव्या शाली टाकून देऊन अंधार गुफटून स्पब्ध झाल्या. धावत्या गाडीमुळे हवेचे झोत अंगाला झोंबत होते तरी बाहेर झाडं मात्र स्तब्ध झालेली दिसत होती. सगळंच वातावरण असं शांत स्तब्ध होत असताना, अवचितच समोरच्या डोंगरामागून पूर्णचंद्राचे केशरी बिंब डोकावलं आणि एकदमच तटस्थ झालेल्या सृष्टीने सारी तटस्थता आणि मरगळ टाकली. वारा मंद मंद वाहू लागला. वृक्षांनी सळसळत उगवत्या चंद्राचं स्वागत केलं. वातावरणात अगदी सूक्ष्म तरी आल्हाददायक असा बदल घडत होता.वस्तुत: अब्जावधी वर्षांपासून नियमितपणे येणारी ही पौर्णिमा आणि ते पूर्ण चंद्र बिंब! पण तरी प्रत्येक पौर्णिमेची जादू ही अशीच प्रत्येक वेळी नवी भासणारी, वातावरणात आल्हादक उत्तेजना निर्माण करणारी आणि अथांग, अनंत अंधाराला प्रगाढ विश्वासाचं देणं देणारी!
बसने एक जोरदार वळण घेतलं. मी कलंडता कलंडता स्वत:ला सावरलं. बाहेर पाहते तो इतका वेळ समोर दिसणारं चंद्रबिंब आता उजवीकडच्या खिडकीतून हसू लागलं. काही क्षणातच ते डोंगरामागे लपलं. मग जराशाने दाट वृक्षराजीतून हळूच डोकावलं. तेवढयात बसने पुन्हा एक वळण घेतलं आणि चंद्राने आता डावीकडची खिडकी पकडली. पुन्हा वृक्षराजीतून लपतछपत, मधूनच मुखडा दाखवत तो बसबरोबर धावू लागला. घाटातली वळणं जबरदस्त होती आणि रस्ता चढा!बसचा वेग जरा मंदावला, पण चंद्राचा हा लपाछपीचा खेळ मात्र चांगलाच रंगला. हा गमतीचा खेळ माझ्याप्रमाणेच इतरांनीही पाहावा असं उगीचच वाटलं. मी पाहिलं, आजूबाजूचे प्रवासी एकतर पेंगत होते किंवा मग धंदा-पाणी, कौटुंबिक राग-लोभ अशाप्रकारच्या काही विषयावर तावातावाने बोलत होते. एक-दोघे तर आपल्या मोबाईल फोनवरून दूरच्या कोणाशीतरी मारे हातवारे करकरून आपलं म्हणणं पटवून देत होते. फोनवर बोलत असताना असे हातवारे केल्यानं काय साध्य होत असावं, हा प्रश्न मला पडत होता.
चंद्राने पुन्हा खुणावलं. बहुतेक तो सांगत असावा, 'जाऊ दे ना! तुला कशाला पडलीय्, त्यांची चिंता? आपण आपली लपाछपी खेळू या! चल, इकडे बघ.' त्याला त्याचा लिंबोणीच्या झाडामागे लपण्याचा खेळ अजूनही तेवढाच प्रिय होता. तो पुन:पुन्हा एकदा उजवीकडे तर एकदा डावीकडे येऊन मला वाकुल्या दाखवत होता. मधूनच झाडामागून खुणावत होता. कधी झिरझिरीत ढगांआड दडून डोळे मिचकावत होता तर कधी डोंगरामागे लपून जात होता. अन् मग त्या डोंगरामागून समोर आला की चांगला तोंडभर हसून दाखवत होता. माझ्याइतकाच त्या खेळाची गंमत तोही लुटतोय् असंच भासत होतं.
आमची बस घाट चढत होती, तसतसा तो चंद्रही आकाशाचा चढ चढत होता. घटमाथ्यावर एके ठिकाणी बस थांबली. खाली उतरलो, तेव्हा लक्षात आलं की आता हा लपाछपीचा खेळ थांबणार होता. तोही आता आकाशाच्या माथ्याशी होता आणि त्यामुळे मला चकवू शकणार नव्हता. 'आता कुठे जाशील रे लबाडा?' मी मनोमन त्याच्याशी बोलत होते आणि हसत होते. मला त्याची सांकेतिक भाषा उलगडली होती ना?
जीवनाच्या प्रवासातही असेच चढणीचे घाट लागतात. ते कठीण वळणांचे घाट पार करतानाही असंच घडत असतं. विमल, विशुध्द अशा आनंदाचं ते धवल चंद्रबिंब आपल्याला असंच चकवत असतं. डोळे मिचकावत हुलकावण्या देत असतं. कधी इथे तर कधी तिथे! सापडलं सापडलं म्हणेतो दिसेनासं होतं. अन् 'कुठे हरवलं?' म्हणून शोधू जावं तर अवचितच सामोरं येतं. एका ठिकाणी स्थिर असं ते कधीच नसतं. मात्र त्याच्यावरची दृष्टी ढळू न देता, आयुष्याचा कठीण चढ नेटाने चढत राहिलं की आपण अशा शिखरावर पोहोचतो की मग ते चंद्रबिंब हरवायला वावच नसतो. ते असतं तसं दूरच, पण त्यावेळी ते हुलकावण्या मात्र देत नाही. भोवतालचा कोलाहल अव्याहत चाललेलाच असतो. पण तरीही -
त्या चंद्रबिंबातून झरणाऱ्या आनंदप्रकाशाच्या कोषात आपण एका मस्तीत जगत असतो. तेव्हा मग पावलोपावली भेटणारी दु:खंसुध्दा दूरची आणि परकी वाटू लागतात, त्या दूरस्थ चंद्रापेक्षाही दूरची!

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

4 Sep 2014 - 9:17 am | प्रभाकर पेठकर

कवीकल्पना छान आहे. दु:खाच्या अंधारातून आनंदाचा चंद्र आपल्याला सुखावतो, आजूबाजूच्या निसर्गातूनही चैतन्य पसरवितो, म्हणजेच आपण आनंदात असलो की आपल्या आजूबाजूच्या घटना, व्यक्तीही आपल्याला आनंदच देतात वगैरे वगैरे रुपकाच्या स्वरूपातली मांडणी आवडली. पण 'दूरस्थ' ह्या शीर्षकामुळे, आपला आनंद नेहमीच 'दूर' पर्यायाने, 'अप्राप्य' असतो असा कांहीसा समज होतो आहे.

छान रुपकात्मक लेखन! आवडले.

स्पंदना's picture

4 Sep 2014 - 10:19 am | स्पंदना

सुरेख लेखन. वाचता वाचता मनाच्या खिडकितुन कधी चंद्र डोकावु लागला कळल नाही.
खर तर लगेच मलाही फोनवर बोलणार्‍या लोकांचा राग येतो लिहायच होतं, पण सारी मनाची पोकळी चंद्रबिंबाने व्यापली ना!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Sep 2014 - 7:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आम्हीही आपल्याबरोबर प्रवास केला. निसर्गाच्या सानिध्यात आपण चांगले रमलात.
भोवतालच्या कोलाहाल विसरायला लावणारे क्षण सुखाचे. लेखन आवडले.

-दिलीप बिरुटे

एस's picture

4 Sep 2014 - 8:12 pm | एस

त्या चंद्रबिंबातून झरणाऱ्या आनंदप्रकाशाच्या कोषात आपण एका मस्तीत जगत असतो. तेव्हा मग पावलोपावली भेटणारी दु:खंसुध्दा दूरची आणि परकी वाटू लागतात, त्या दूरस्थ चंद्रापेक्षाही दूरची!

आवडले! कधी कोलाहलात असा कुठला दूरस्थ आनंदप्रकाश झिरपत असतो तर कधी सुखाच्या सागरात दूर कुठेतरी ऐकू येत राहणारी हुरहूररूपी धून. दोन्ही तितक्याच खर्‍या. लेख अप्रतीम आहे हेवेसांनल.

राघवेंद्र's picture

4 Sep 2014 - 8:14 pm | राघवेंद्र

सुंदर लेख.

मूकवाचक's picture

4 Sep 2014 - 9:25 pm | मूकवाचक

+१

प्रचेतस's picture

4 Sep 2014 - 9:06 pm | प्रचेतस

अप्रतिम लेख.

पैसा's picture

4 Sep 2014 - 9:30 pm | पैसा

खूपच छान, तरल लिहिलंय. आपण आजूबाजूच्या लोकांतून मनाने उठून अचानक कोणत्यातरी प्रवासाला निघून जातो आणि क्षणात परत येतो हा अनुभव बर्‍याच जणांनी कधी ना कधी घेतलाच असेल. असाच एकदा मी केलेला प्रवास सहजच आठवला. अतिशय नितळ लेखनासाठी धन्यवाद!

रेवती's picture

4 Sep 2014 - 9:34 pm | रेवती

लेखन आवडले.

आवडलं, वाचता वाचता काही प्रवास डोकावून गेले मनात. :)

मधुरा देशपांडे's picture

4 Sep 2014 - 10:33 pm | मधुरा देशपांडे

काही प्रवास डोकावून गेले मनात. लेख आवडला.

अनुप ढेरे's picture

4 Sep 2014 - 10:21 pm | अनुप ढेरे

आवडलं खूप! छान वाटलं वाचून...

मुक्त विहारि's picture

4 Sep 2014 - 10:36 pm | मुक्त विहारि

खूपच तरल...

कुठेतरी आत मनांत भिडणारे...विषेशतः

"तेव्हा मग पावलोपावली भेटणारी दु:खंसुध्दा दूरची आणि परकी वाटू लागतात, त्या दूरस्थ चंद्रापेक्षाही दूरची!"

हे खासच...

प्यारे१'s picture

4 Sep 2014 - 10:48 pm | प्यारे१

लेखन आवडलं.
गद्य पद्यच जणू.

स्वतःचा स्वतःशी साधलेला सुरेख संवाद !

जीवनाच्या प्रवासातही असेच चढणीचे घाट लागतात. ते कठीण वळणांचे घाट पार करतानाही असंच घडत असतं. विमल, विशुध्द अशा आनंदाचं ते धवल चंद्रबिंब आपल्याला असंच चकवत असतं. डोळे मिचकावत हुलकावण्या देत असतं. कधी इथे तर कधी तिथे! सापडलं सापडलं म्हणेतो दिसेनासं होतं. अन् 'कुठे हरवलं?' म्हणून शोधू जावं तर अवचितच सामोरं येतं. एका ठिकाणी स्थिर असं ते कधीच नसतं. मात्र त्याच्यावरची दृष्टी ढळू न देता, आयुष्याचा कठीण चढ नेटाने चढत राहिलं की आपण अशा शिखरावर पोहोचतो की मग ते चंद्रबिंब हरवायला वावच नसतो. ते असतं तसं दूरच, पण त्यावेळी ते हुलकावण्या मात्र देत नाही.

अतिशय सुंदर लेख व मौलिक मार्गदर्शन!!
मनापासुन धन्यवाद.