विस्मरणशक्ती, तुमची-माझी!

मीराताई's picture
मीराताई in विशेष
11 Sep 2013 - 8:54 am
श्रीगणेश लेखमाला २०१३

विस्मरणशक्ती, तुमची-माझी!

एखादी महत्त्वाची वस्तू अत्यंत काळजीपूर्वक कोठेतरी ठेवलेली असते, कोणत्याही क्षणी तिची निकड लागू शकते म्हणून. पण नेमक्या वेळी बघावं तर ती इथे नाही, तिथे नाही, अन् त्या तिथे? मग कुठे बरं 'गेली'? असा विचार करीत शोधा-शोध सुरू होते. कपाटातल्या वस्तूंची उलथापालथ होते. पलंगावरच्या गाद्यांच्या कडा आणि कोपरे उचलून आशाळभूत नजर तिथून फिरत राहते. कपाटांच्या खाली, टेबला-खर्ुच्यांच्या खाली वाकून वाकून पाहून कंबर दुखू लागते. वस्तू जिथे ठेवणे अशक्य, अशी ठिकाणेसुध्दा धुंडाळली जातात. पण छे:! काही म्हणता काऽऽही आठवत नाही आणि हे केवळ तुमच्या-माझ्याच नव्हे तर कोणत्याही घरात केव्हा ना केव्हातरी दिसणारं दृश्य! आणि मग त्यापाठोपाठ विसरभोळेपणाबद्दल झडणारे ताशेरे, तेही घरोघरी, तसेच! ...आणि हे सगळं चांगलंच माहीत असूनही मी जर म्हटलं की विस्मरणशक्ती हे स्मरणशक्तीपेक्षाही मोठं वरदान आहे, तर? वेडयात काढाल ना मला? पण जरा थांबा. असे घाईघाईने शिक्के मारू नका.

असं पहा, तुम्ही जन्म घेतला, त्याला किती वर्षं झाली? त्या वर्षांना बाराने गुणा. जे उत्तर येईल त्याला तीस ने गुणा. झालं? आता जे उत्तर येईल त्याला ........ जाऊ दे! नसता शीण कशाला? मनुष्याचा जन्म झाल्यापासून प्रत्येक क्षणी काही नाही काही घटना घडतच असते. मग आजपर्यंत अशा किती घटना घडल्या असतील तुमच्या जीवनात? अगदी समज येईपर्यंतचा तीन-चार वर्षांचा काळ आणि झोपेत जाणारा आयुष्याचा उणापुरा एक तृतियांश काळ सोडून दिला तरी आजपर्यंत किती घटना घडल्या असतील तुमच्या आयुष्यात? त्या नित्याच्या अन् तशाच नैमित्तिक घटनांमधून आज काय काय आठवेल? नित्याच्या बिनमहत्त्वाच्या, दैनंदिन, पुनरावृत्तीच्या म्हणून सोडून देऊ. मग नैमित्तिकपैकी? किती पाहुणे आलेगेलेले आठवतात? त्यांनी आणलेले खाऊ-खेळणी आठवते? अन् सणवार किती आठवतात? त्या त्यावेळी आणलेले नवे कपडे आणि ते घालून मिरवणं? नाही ना? तर मग घरातल्या मोठयांनी घातलेले किती धपाटे आठवतात? ते पडणं-झडणं, ठेचा खाणं, कोपरं-ढोपरं फोडून घेणं, हे आठवतं? बरं, आतापर्यंतची किती आजारपणं आठवतात? त्यावेळी कोणी अन् किती खस्ता खाल्ल्या ते आठवतं? त्यावेळी किती औषधं रिचवावी लागली अन् ती रिचवताना हट्टीपणाने घरभार कसं डोक्यावर घेतलं होतं, हे तर नसेलच आठवत? आणि मग लहानपणाचे सगळे खेळ, ते 'रडीचा डाव' खेळणं, ती वेडी भांडणं आणि या साऱ्यांत रंग भरणारे सखे-सोबती-सवंगडी ते मात्र आठवत असतील नाही? शाळेतल्या गमती-जमती? शाळूसोबती आणि शिक्षकमंडळी? शेजारी-पाजारी? यातलं काय आणि कोण आठवतं? आजतागायत किती स्वप्न पडली असतील? ते असो, पण जागेपणी पाहिलेली स्वप्न? आणखी... असो, असो. उगीच ताण नको मेंदूला!

मला पूर्ण कल्पना आहे की वर ज्या ज्या गोष्टींची आठवण दिली आहे, त्यापैकी जेमतेम एखादा टक्का तुम्हाला फार तर आठवू शकतील. तुमची स्मरणशक्ती फारच चांगली असेल तर आणखी एखाद्-दुसरा टक्का गृहीत धरू. शरीर-विज्ञान सांगते की आपण रोज नवीन अशा फार तर नऊच गोष्टी स्मरणात जतन करू शकतो आणि सरासरी सत्तर वर्षांच्या आयुष्यात सुमारे 1,00,00,000 इतका तपशील स्मरणा साठवू शकतो. गंमत म्हणजे यासाठी मेंदूच्या क्षमतेपैकी केवळ आठवा भाग कार्यक्षमता आपण वापरतो. याचा अर्थ ज्या मानवी मेंदूचा आपण मोठा अभिमान बाळगतो, त्यापैकी सात अष्टमांश भागाचे ओझे आपण निष्कारणच वाहात असतो. अगदीच फुकट पोसत असतो त्याला! एक मात्र खरं, आपण त्याचा जेवढा अधिक उपयोग करू, स्मरणाचा, विचाराचा, तर्काचा, विश्लेषण, विवेचन यांचा जेवढा जास्त सराव त्याला देत राहू, तेवढी त्याची कार्यक्षमता वाढते. पण...

पण, हे सारं करणार कोण? मुळात आपली घोषवाक्यं आणि मार्गदर्शक तत्त्वं असतात, 'डोक्याला ताप नको', 'जबाबदारी (म्हणजेच नसती कटकट) नको' आणि महत्त्वाचं म्हणजे, 'बाबावाक्यं प्रमाणं'! तथाकथित बुध्दिमंत, विचारवंत, बुध्दीप्रामाण्यवादी समजले जाणारे जे काही म्हणतील ते खरे किंवा जे काही छापून येते ते खरे असे एकदा ठरवून टाकले, मान्य केले की बऱ्याच गोष्टी सोप्या होतात आणि मग स्वत: विचार करकरून, उलट-सुलट तर्क लढवून स्वत:ची मते बनवा, त्यानुसार सत्य अजमावून पहा हा काही प्रश्नच उरत नाही. स्वत:च्या मतांबद्दल आचार-विचाराबद्दल जबाबदारी स्वीकारण्याचाही प्रश्न निर्माण होत नाही. झाले की नाही जगणे सोपे आणि एकमार्गी? हा झाला माणसानेच, माणसासाठी निर्माण केलेला, स्वीकारलेला जगण्याचा सोपा मार्ग; पण निसर्गाने बहाल केलेला, माणसाला अनायासेच लाभलेला सुखी जीवनाचा सरळ मार्ग जातो विसमरणाच्या पायघडया पसरत!

शाळा-कॉलेजातून शिकवले जाणारे बहुतेक सर्व विषय आपण त्यावेळी (नाइलाजाने) शिकतो. परीक्षेसाठी महत्त्वाचे तेवढेच घोकून घोकून बेजार होतो. त्यातूनही ऐनवेळी आठवेल तेवढेच लिहून मोकळे होतो. इतके 'मोकळे' की त्यानंतर चार-आठ दिवसांनी किंवा फार तर महिनाभराने जर कोणी तीच प्रश्नपत्रिका अचानक सोडवायला दिली तर? ...आलं ना लक्षात? आणि आज ते सर्व विषय, ते 'ज्ञान' पूर्णपणे विसरल्यामुळे आपलं मन कसं निवान्त झालेलं असतं. नाही का? औपचारिक शिक्षणाबद्दल पूर्वी 'किती बुकं शिकलास?' असं विचारलं जाई. त्याऐवजी 'किती बुकं वाचून विसरलास?' असं विचारणंच वस्तुस्थितीला धरून होईल. अवांतर वाचनाचं तरी काय? आपण जे मोठं आवडीचं म्हणून वाचतो त्यापैकी काय आणि किती लक्षात राहतं? लेखनाचं नाव, पुस्तकाचं नाव, कथा, पात्रे, प्रसंग किंवा त्यातलं तत्त्वज्ञान, निरीक्षण, विचार? मला वाटतं माझी 'विस्मरणशक्ती' जरा अधिक दांडगी असावी. कित्येक वेळा यापैकी बहुतेक बऱ्याच गोष्टी विसरल्या जातात अन् संपूर्ण पुस्तकातून एखादंच वाक्य, एखाद्या पात्राच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा, त्याची धारणा, एखादाच प्रसंग येवढंच लक्षात राहतं. तीस-पस्तीस वर्षांपूर्वी वाचलेल्या एका विज्ञानाधारित इंग्रजी कादंबरीतील एका पात्राच्या तोंडचं एक वाक्य `I am more me, when I am alone!', हे एवढंच माझ्या मनात रूतून बसलय्, बाकी सगळं पुसट. आपलं हे वाचन त्या त्या वेळी मन रमवतं इतकंच. कदाचित त्यापैकी काही तपशील काही काळ लक्षात राहतो. कालांतराने 'अमूक एक पुस्तक फार छान होतं हं!' अशा स्वरुपाचं ते स्मरण राहून जातं. येवढंच!

तीच कथा पूर्ववयातल्या मैत्रीची, रूसव्या-फुगव्याची, गैरसमजांची आणि अशाच अनेक भावनिक चढउतारांची! तेव्हा अगदी मानापमानाचे, अटीतटीचे वाटणारे प्रश्न, मनाला कुरतडणारे विषय, बरंच काही विस्मृतीच्या खोल डोहात तळाशी बसलं आहे. त्या काळात जी व्यक्ती डोळयांसमोर आली की मनात 'असंसदीय' विचार अन् उद्गार उमटत, तीच आज समोर आली आणि ओळख पटलीच तरी राग येत नाही. एक आश्चर्ययुक्त आनंद मनात जागतो. त्या वयातले रागलोभ हा सारा खेळाचा, गमतीचा भाग वाटतो. स्मृतिकोषात पडल्या पडल्या त्यांचं स्वरूपही पालटून गेलेलं असतं की काय? सुरवंटाचं फुलपाखरू व्हावं तसं? आणि मग गप्पा सुरू झाल्या की एकमेकांना आठवणी देता देता विसरलेल्या घटना, धुक्यातून जवळ येणाऱ्या व्यक्तिसारख्या हळूहळू स्पष्ट होऊ लागतात आणि काही घटना मात्र काही केल्या आठवत नाहीत; यांची संख्या मात्र पुन्हा भरपूर!

फार कशाला? गेल्या चार-आठ दिवसांत काय काय घडलं? कोण भेटलं? काय बोलणं झालं? कोणत्या पदार्थांची रूची जिभेवर घोळवत आपण त्यांचा आनंद मनसोक्त घेतला? कुठे कुठे गेलो? किती वाजता झोपलो? कशाचा किंवा कोणाचा विचार करत झोपलो? कशाने जागे झालो? कोणावर रागावलो? कोणाला शब्दांनी बोचकारलं? यातलं काय काय आठवेल आता? शंकाच आहे. प्रत्येक नव्या क्षणाला सामोरे जाताना जुना क्षण आपण मागे टाकत असतो. मागे म्हणजे कुठे? अगदी विस्मृतीच्या खोल डोहात बुडवून टाकतो?

खूपशा गोष्टी आपण विसरलो तरी काही घटना अगदी कोरल्यागत मनात स्पष्ट राहतात, वर्षानुवर्षे! मग ते सौंदर्याचा भव्योदान अनुभव देणारे काही असो वा मनाला हादरवून टाकणारे भयानक दृश्य असो. त्या स्मृति मनात पुन्हा तोच अनुभव जागा करतात. एखाद्याचे कठोर शब्द मनातली जखम पुन्हा ओली करतात. तर मनाचा एक कोपरा अडवून बसलेल्या

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनि ऊन पडे

अशा नितांतसुंदर काव्यपंक्ती आठवताना एक मजेदार संवेदना, एक अबोध आनंद जागा होतो; मोत्याचा सर ओघळलेला बघताना जाणवते ना, तशीच काहीशी ही संवेदना असते. कमी जास्त संपर्कात आलेल्या कोणी व्यक्ती अचानकच कधी स्मतीत डोकावून जातात. कधी चेहरा अस्पष्ट असतो, पण त्यावरच्या भावांचं प्रतिबिंब मात्र मनावर स्पष्टपणे उमटलेलं आणि टिकलेलंही असतं. काही गोष्टी आठवण्यासाठी विस्मृतींचे पदर दूर सारावे लागतात तर काही स्मृती मात्र अगदी पाठलाग करतात, लुब्य्रा मांजरासारख्या अंग घासत भोवती घोटाळत राहतात.

का होतं असं? हा काय चाळा आहे? खेळ आहे? आपलं काहीही नियंत्रण नसलेला अपघाती किंवा दैवयोगांसारखा प्रकार आहे? अहं! नियंत्रण असतं, आपलंच असतं, काही अशी कळतं, काही अंशी नकळत. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रातली, कधीही घडलेली एखादी क्षुल्लकशी घटना घेतली तरी त्यामागे केवढीतरी कारणपरंपरा दिसते; किती घटनांचे, सर्व दिशांनी येणारे ताण आणि दबाव तिथे कार्यरत असतात. तेच इथेही घडत असतं. मनाचा जाणिवेतला, जागेपणीचा सर्व व्यवहार त्यामागच्या अनेक घटकांवर अवलंबून असतो. त्या त्या मनुष्याचा स्वभाव आणि त्यावर झालेले आणि घडवले गेलेले संस्कार यांचा एक जाड, भक्कम थर. त्यावर भोवतालची सामाजिक, आर्थिक परिस्थिती आणि त्यानुसार त्याचे हितसंबंध, त्यांना ताणून धरणारे कौटुंबिक ताण-तणाव यांचा पुन्हा एक थर. त्याशिवाय त्याची बौध्दिक कुवत आणि धारणा, त्याची या आयुष्यातली ध्येय-धोरणं, त्याचे राग-लोभ-सूड, आशा-आकांक्षा यांचं एक अजब रसायन या थरांमधून झिरपत असतं आणि पुन्हा या सर्वांच्या नेणिवेत, त्यांच्या आतबाहेर, अवती-भवती लपेटून राहिलेले त्याच्या पूर्वजन्मीचे संस्कार, तेव्हाच्या नात्या-गोत्यांचे, देण्या-घेण्याचे हिशेब आणि भाव-भावनांचे रेशीमगोफ! अरे बापरे, केवढी ही गुंतागुंत!

आणि त्या साऱ्यात गुरफटलेला असतो तो 'मी'! हा 'मी' काही गोष्टींना फारसे महत्व देत नाही, त्यामुळे त्या विसरल्या जातात. माझंच पहा ना, सहसा मी आवश्यक तेवढीच खरेदी करते, मग ती स्वत:साठी, घरासाठी किंवा कोणासाठी असो. त्या क्षणी जे बरं वाटलं, ते घेतलं, वापरलं किंवा दिल की संपला विषय. मग दुसऱ्याच क्षणी त्यासाठी किती 'टक्के' मोजले ते मी साफ विसरून जाते. ते सगळं लक्षात ठेवणंच मला मोठं तापदायक वाटतं आणि मग कोणी किमतीची वगैरे बारीक चौकशी केली की माझा चेहरा अगदी बावळटाहून बावळट होतो. मात्र एखादी चतुर, साक्षेपी, व्यवहारदक्ष व्यक्ती कोणती वस्तू कधी, कोठे, केवढयाला, कोणासाठी घेतली हे सगळं सांगू लागते तेव्हा मला त्यांचं फार कौतुक वाटतं. मला मात्र हे या जन्मी साधणे नाही, हे निश्चित! हे असंच असतं. एखादी व्यक्ती घरगुती निरोप सांगणे नित्यनेमाने विसरते, पण जगभराचे सामान्यज्ञान मात्र त्याच्या जिभेवर थयथय नाचत असते नुसते! साधारणपणे जे महत्त्वाचं वाटतं ते आपण लक्षात ठेवतो, जे कमी महत्त्वाचं ते विसरतो हा एक प्राथमिक नियम!

त्याशिवाय आणखी एक गंमत आहे. जे अप्रिय आहे, गैरसोयीचं आहे ते आपण टाळू पाहतो, म्हणून विसरू पाहतो. जे प्रिय आहे ते मनात घोळवत राहतो. मनोभंग करणारे एखाद्याचे शब्द वा मानहानीचे प्रसंग नकोसे वाटतात. आपल्या हातून घडलेल्या चुका 'झालं गेलं, गंगेला मिळालं' असे उदार उद्गार काढून आपण दुर्लक्षित करतो. तर कोडकौतुकाचे शब्द, प्रेमाचे शब्द, सत्काराचे प्रसंग मात्र इतरांना पुन:पुन्हा सांगताना मनात आठवून त्यांचा आनंदानुभव चाखताना त्या घटना मेंदूत पक्क्या कोरल्या जातात आणि हेही बरेच आहे म्हणायचे! कारण जी माणसं अप्रिय घटना विसरू शकत नाहीत, ती वारंवार त्या अप्रियाने मन ढवळून निघाल्याने, गढूळल्याने स्वत:चेच जीवन यातनामय करतात. क्षणभराची वेदना, कायम भळभळणाऱ्या जखमेसारखी दीर्घकाल बोगत राहतात. अशावेळी स्मृती ही वरदान न ठरता शापच ठरते.

काळ हा स्मृति-विस्मृतीच्या संबंधातला एक महत्त्वाचा घटक. वाहत्या जलौघात जसं बरचसं वाहून जातं तसं कालौघात वाहून जाणारं जास्त आणि 'मातीत मुरून उरणारं' थोडं! येवढं लांबलचक आयुष्य पार केल्यानंतर काही आठवायला बसावं तर मोजक्याच ओंजळींपलीकडे जास्त काही हाती लागत नाही. बालपणापासूनच्या आठवणींनी सुरुवात करून तपशीलवार सर्व सांगत 'आत्मचरित्र' लिहिणारी माणसं म्हणजे मला एक कोडंच वाटतं. (बरेच वेळा त्यातील तपशीलाबद्दल, त्याच्या विश्वसनीयतेबद्दल काही खोडसाळ व चिकित्सक मंडळी वाद उपस्थित करतात तो भाग वेगळा!) कदाचित एखादा अनुभव आपण मनात खोलवर झिरपू देत अनुभवतो की तो वरच्यावर झेलून उडवून लावतो यावरही तो स्मरणात राहतो की विस्मरणात गडप होतो हे अवलंबून असावे.

जुन्या घरातून एक अडगळीची खोली असे. वापरात नसलेल्या कितीतरी वस्तू तिथे उगीच पडलेल्या असत. काही वस्तूंची गरज तर नाही, पण दर्शनी भागातही ठेवता येत नाहीत, अन् टाकूनही देववत नाहीत म्हणून. काही मोडक्या-तोडक्या पण त्यांना काही भावनांचा स्पर्श, संदर्भ असतो म्हणून. काही वस्तू त्यात स्वत:ला रस नसला तरी कोणाच्या इच्छेखातर ठेवलेल्या काही क्वचितच लागणाऱ्या, तर काही क्वचित लागतीलही म्हणून जपलेल्या अशा असंबध्द वस्तूंचं ते संग्रहालयच असतं. एका जुनाट, ओलसर, विचित्र, विशिष्ट गंधात लपेटलेल्या या खोलीसारखाच, स्मृतिविस्मृतींच्या अल्याड-पल्याड रेंगाळणाऱ्या असंबध्द स्मृतींचा एक पेटाराच असा हा मेंदू! या पेटाऱ्यांत त्या सगळया 'अडगळीतल्या स्मृति' बंद करून ठेवल्याने आपण मात्र आपलं दैनंदिन जीवन सुखाने जगत असतो, येवढं खरं! म्हणूनच विस्मरणाने दिलेले धोके पचवूनही मी म्हणेन, जेवढी तुमची 'विस्मरणशक्ती' दांडगी, तेवढे तुम्ही जास्त सुखी!

प्रतिक्रिया

सुस्थापित स्मृतीची प्रक्रिया : रिट्रायवल>रेकग्निशन>अँड अप्लिकेशन अशी आहे. आणि अशी स्मृती जगणं कमालीचं सोपं आणि सुखाचं करते.

विस्मरण जर हव्या त्या गोष्टींचं व्ह्यायला लागलं तर स्मृतीभ्रंश होतो.

त्यामुळे सुख हे नको त्या गोष्टी विसरणं आणि हवी ती नेमकी आठवणं यात आहे.

तुम्ही केलेलं सरसकटीकरण "जेवढी तुमची 'विस्मरणशक्ती' दांडगी, तेवढे तुम्ही जास्त सुखी!" तितकंस योग्य नाही.

पैसा's picture

11 Sep 2013 - 10:25 am | पैसा

तुमचे लेख नेहमीच रंजक असतात. आणि माहिती देणारे पण! लिखाण आवडलं. अप्रिय स्मृती विसरणे हाच अनेकदा आयुष्य सुसह्य होण्यासाठी आवश्यक घटक असतो.

प्रचेतस's picture

11 Sep 2013 - 11:50 am | प्रचेतस

लेख आवडला.

अग्निकोल्हा's picture

11 Sep 2013 - 12:01 pm | अग्निकोल्हा

त्याशिवाय आणखी एक गंमत आहे. जे अप्रिय आहे, गैरसोयीचं आहे ते आपण टाळू पाहतो, म्हणून विसरू पाहतो. जे प्रिय आहे ते मनात घोळवत राहतो. मनोभंग करणारे...............अशावेळी स्मृती ही वरदान न ठरता शापच ठरते.

अप्रिय स्मृतिचा तडाखा जवळुन अनुभवलेला असल्याने वरिल ओळिंशी तर विषेश सहमत.

प्रकाश घाटपांडे's picture

11 Sep 2013 - 5:12 pm | प्रकाश घाटपांडे

लेख आवडला. मेंदू हे एक अजब रसायन आहे. डॉ आनंद जोशी व सुबोध जावडेकरांचे मेंदुतला माणुस हे पुस्तक अप्रतिम आहे.

मुक्त विहारि's picture

11 Sep 2013 - 5:19 pm | मुक्त विहारि

छान लिहिले आहे..

दत्ता काळे's picture

11 Sep 2013 - 5:41 pm | दत्ता काळे

गडकरींच्या राजसंन्यास नाटकातला विसरभोळा 'गोकुळ' आठवला.

प्यारे१'s picture

11 Sep 2013 - 11:54 pm | प्यारे१

मस्त लिहीलंय.