'लेह' वारी, अंतिम भाग

मनराव's picture
मनराव in भटकंती
10 Apr 2013 - 2:56 pm

'लेह' वारी, भाग १
'लेह' वारी, भाग २
'लेह' वारी, भाग ३
'लेह' वारी, भाग ४
'लेह' वारी, भाग ५
'लेह' वारी, भाग ६
'लेह' वारी, भाग ७


पुन्हा दलच्या कडेने चक्कर मारत हॉटेलवर आलो. चक्कर मारताना घरच्या रिपोर्टिंगच काम उरकून घेतलं. दिवस मजेत संपला. झालेल्या प्रवासाची गोळाबेरीज करत झोपी गेलो.......
अता पुढे......

सकाळी सगळं आवरून निघायला ९.०० वाजले. ज्यासाठी आलो होतो तो उद्देश पूर्ण झाला होता. अमरीत्सर पहायचा मानस होता पण वेळे अभावी तो रद्द केला. त्यामुळे आता लवकरात लवकर आणि सुखरूप घर घाठायचं होतं. श्रीनगर सोडलं आणि सुरु झाला परतीचा प्रवास. शहर सोडलं आणि पुढे एका पेट्रोल पंपावर थांबून गाडीची पेटपूजा उरकून घेतली. एकदा का तिची मेजवानी झाली कि दिवसभर ती कसलाही ताप देणार नाही याची आता पर्यंतच्या प्रवासात खात्री पटली होती. आज आम्ही पठाणकोटला मुक्काम करायचं ठरवलं होतं. श्रीनगर - पठाणकोट अंतर आहे साधारण ३५० km. पण मधला उधमपूर-सांबा मार्ग सोडून जम्मू मार्गे गेलं तर ५० km अंतर वाढतं. ५० km जास्त अंतर पडलं तरी चालेल पण रस्ता चांगला असेल म्हणून जम्मू मार्गे जायचं ठरवलं होतं. काय करणार खडकाळ भागातून गाडी चालवण्याचा कंटाळा आला होता. असो... तर आम्हाला एकूण ४०० km अंतर कापायचं होतं ज्यात सर्वात मोठा अडथळा होता या मार्गावर असलेला २५० km चा घाट, जो सतत वाहता असतो. श्रीनगरला जम्मूशी आणि इतर अख्या देशाशी जोडणारी लाईफ लाईनच म्हणा ना. आम्ही श्रीनगर सोडून ५०-६० km आलो असू आणि तोच सुरु झाला वळणा वळणाचा प्रवास. हळू हळू वर जात असताना दिसलं कि थोड्या थोड्या अंतराने CRPF चे जवान पहारा देत होते. दर १०० - २०० मीटर नंतर एखादा तरी जवान दिसत होताच. यावरून हा घाट किती महत्वाचा असेल याची कल्पना येते. आम्ही थोडे वर पोहोचलो तेव्हा मागे वळून पहिलं तर बोर्ड दिसला "First view of Kashmir valley". पण आमच्यासाठी तो "Last view of Kashmir valley" ठरला होता. लगेच तुषारला थांबण्यासाठी खुणावलं आणि गाड्या बाजूला घेतल्या. डोळेभरून ते दृश्य पाहिलं. मधे मधे त्या पॉईंटवर असलेला, तिथला टोप्यांचा व्यापारी आम्हाला काश्मिरी टोपी विकत घेण्यासाठी खूप त्रास देत होता. पण आम्हाला काय तो टोपी घालू शकला नाही. त्याच्या बोलण्याकडे सपशेल दुर्लक्ष करत आम्ही "The Kashmir valley"च डोळेभरून दर्शन घेतलं आणि तिथून निघालो.

१. लास्ट व्ह्यू ऑफ काश्मीर १
1

२. लास्ट व्ह्यू ऑफ काश्मीर २
2

जसे जसे पुढे गेलो तसा आम्हाला समोर दिसला जवाहर टनल. शेजारी शेजारी, कमी रुंदी असलेले, साधारण २ ते २.५ km लांब असलेले दोन भोगदे. रुंदी इतकी कमी कि भोग्द्यात कोणत्याही गाडीला ओवरटेक करता येत नाही. ते अंधारी भोगदे ओलांडले आणि खऱ्या अर्थाने आम्ही काश्मीरला मागे टाकले. अजून खूप अंतर जायचं होतं. वळणा वळणाच्या रस्त्यावर कुठेही दुभाजक नाही. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांचा (जास्त करून ट्रकांचा) अंदाज घेत एक एक गाडी ओलांडून पुढे जात होतो. एका नंतर एक डोंगर चढून उतरत होतो. हा खेळ दुपारी १.३० पर्यंत चालला होता. सकाळी निघाल्या पासून काही खाल्लं नव्हतं, शिवाय काश्मीरच दर्शन घेतल्या नंतर कुठेही थांबलो नव्हतो. अखंड २-२.५ तास गाडी चालवून झाल्यावर शरीर थांब थांब म्हणून ओरडायला लागलं म्हणून मग एक चांगला ढाबा बघितला आणि थांबलो. सणकून भूक लागली होती. मसुराची उसळ, भरपूर लोणी लावलेली रोटी, भात आणि डाळ. जोडीला कांदा आणि लोणचं. वाह!!! मस्त मेनू होता, पोटभर जेवलो. जेवण झाल्यावर तिथेच झोपावं अशी इच्छा झाली पण आमच्या मेंदूने ती कृतीत उतरू दिली नाही. अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा होता. घरी फोन करून हालहवाल कळवला गेला. साधारण तासभर तिथे थांबलो आणि पुन्हा प्रवास सुरु झाला. लेह मधल्या नुसत्याच मातीच्या आणि खडकाळ, भकास डोंगरांची जागा आता हिरवाईने नटलेल्या, जीवनाने ओथंबून वाहणाऱ्या डोंगरांनी घेतली होती. दरीत वाहणारी ती सरिता मात्र अजून बरोबर होती. तिच्या साथीने प्रवास करता करता एकदम ती गायब झाली.

३. खळखळाट
3

४.
4

आम्ही डोंगर माथ्यावर पुन्हा चढायला लागलो. बघता बघता पटनी टॉप आला (हिल स्टेशन) आणि मागे गेला. २ तास प्रवास केल्यावर एके ठिकाणी चहासाठी थांबलो. न थांबता, गाडी डोंगर दऱ्यातून पिळत होतो. त्यामुळे ती चांगलीच गरम झाली होती. १० - १५ मिनिटे थांबून ती शांत झाल्यावर तिथून निघालो. साधारण ४-४.३० वाजले तेव्हा आम्ही उधमपूर जवळ पोहोचलो. जम्मू अजून दृष्टीपथात पण नव्हतं. पठाणकोटचा मुक्काम हुकणार यावर शिक्कामोर्तब झालं. तरी जम्मू ओलांडून पुढे जमेल तिथ पर्यंत जाऊ असं ठरवलं. हळू हळू घाट रस्ता कमी होऊ लागला आणि आम्ही पठारावर यायला लागलो. परत तासा भाराने एके ठिकाणी चहाब्रेकसाठी थांबलो आणि जम्मूच्या बायपासची चौकशी केली. शिवाय राहण्यासाठी कुठे व्यवस्था होईल याची हि माहिती घेतली. ज्या ट्राफिक इंस्पेक्टरला विचारलं त्याने जम्मू पासून १७ मैलावर, "१७ miles" असं हॉटेल आहे त्याची माहिती दिली. तडक आम्ही त्या दिशेने निघालो. थोड्याच वेळात जम्मू बायपासला पोहोचलो. जम्मू ओलांडताना सूर्यदेव आपलं दिवसाचं काम आटोपतं घेऊ लागले होते. अंधार पडायला सुरुवात झाली होती. आम्हाला शोधायचं होतं "१७ miles". जम्मू पासून रस्ता एकदमच चकाचक होता. सुसाट निघालो आणि हॉटेल जवळ पोहोचलो. त्या हॉटेलचं बाहेरील रूप पाहूनच तुषार म्हणाला, "हे आपल्या कामाचं हॉटेल नाही". "बघू, चौकशी तर करू, हे नाही तर दुसरं", असं म्हणत मी गाडी लावली आणि आत गेलो. हॉटेल मधल्या सुंदरीने खोट्या हास्यवदनाने स्वागत केलं आणि माहिती द्यायला सुरुवात केली. तिचं पाहिलं वाक्य होतं. "एका खोलीच कमीत कमी भाडं ४५०० रुपडे फक्त" (फक्त, हे विशेषण फक्त हॉटेल मालकांसाठी आणि त्या मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी असतं). बास हे ऐकल्यावर माझ्या कानातले अदृश्य फिल्टर चालू झाले आणि पुढची तिची सगळी वाक्य गाळू लागले. त्यामुळे पुढे ती काय बोलली यातला एकही शब्द मला आठवत नाही. ती काही तरी बोलत होती एवढच काय ते आठवते. मी पण तिच्या सारखच तितक्याच हास्यवदनाने, ती जे काही बोलते आहे ते ऐकतो आहे, असा आव आणत होतो. डोक्यात वेगळेच विचार चालू होते. "च्यायला!!!, आम्ही १५०० ला सुद्धा टांग देतो आणि ४५०० तुझ्या डोम्बल्यावर कधी मारणार???", वगैरे वगैरे. ५ मिनिटांनी ती गप्प बसली आणि मी बाहेर पडलो. तुषार बाहेरच थांबला होता. त्याला जे झालं ते सांगितलं आणि आम्ही तिथून निघालो. अंधार पडला होता आणि आम्हाला लवकरात लवकर रूम शोधायची होती. रस्त्यावर चौफेर नजर फिरत होती. एके ठिकाणी आश्रमाची पाटी दिसली. पण रोड पासून २ km आत होतं म्हणून तुषार नको म्हणाला. असेच पुढे जात राहिलो पण हॉटेल काही मिळेना म्हणून मग सांबा पर्यंत जाऊ असे ठरले. सांबा आल्यावर हायवेलाच एक हॉटेल दिसलं. बाहेरून आणि आतून बरं वाटलं आणि मुख्य म्हणजे बजेट मध्ये होतं. ६०० रुपयात रूम मिळाली आणि आम्ही लगेचच आमच्या प्रायवेट विधानसभे मधे हॉटेलच बिल पास केलं. सगळं समान वर नेऊन टाकलं. फ्रेश झालो आणि जेवण्यासाठी बाहेर पडलो. मालकाने सांगितलेल्या जवळच्याच एका ढाब्यावर गेलो. जेवलो आणि रूम वर आलो. चार पाच दिवसांचा हिशोब राहिला होता तो केला आणि दिलं अंग झोकून. दिवसभर अखंड प्रवास करून क्षीण आला होता. बेडवर पडल्या पडल्या निद्रादेवीच्या आधीन झालो.
सकाळी लवकर उठलो आणि ७.०० - ७.३० लाच हॉटेल सोडलं. आज चंडीगडला लवकर पोहोचून गाडी सर्विसिंग करून घ्यायची होती. सांबा पासून चंडीगड होतं ३०० km आणि सगळा चकचकीत टार रोड. रस्त्याच्या दुतर्फा हिरीविगार पसरलेली शेती. काय मस्त वाटत होतं गाडी चालवताना. हवेतला गारवा मी म्हणत होता आणि आम्ही सुसाट पुढे निघालो होतो. मनात म्हणालो "हा आजू बाजूचा टवटवीत परिसर पुन्हा बघायला मिळणार नाही", तसे लगेच होतो तिथे तुषारला थांबायला सांगितलं. १०-१५ मिनिटे उगीचच थांबलो आणि मग पुढे निघालो. साधारण १० वाजता जेव्हा पोटात कावळे ओरडायला लागले तेव्हा नजर रस्त्यावर कमी आणि आजूबाजूच्या ठेल्यांवर जास्त जाऊ लागली. अचानक समोर MacD चा बोर्ड दिसला आणि गाड्या आपोआपच त्या दिशेने वळवल्या. खूप दिवसांनंतर MacDत जाऊन बर्गर खायला मिळणार होता. इतर MacD प्रमाणेच हे हि होतं, काहीही नाविन्य नाही. पंजाबात काय आणि पुण्यात काय, इथून तिथून सगळे MacD सारखेच. मस्त दोन दोन बर्गर हाणले आणि निघालो. पंजाबच्या रस्त्यावरून जोरात गाडी चालवत होतो. या वेळीहि आम्ही, एकही गाडी पुढे जाऊ दिली नाही. एक एक गाव मागे टाकत पुढे जात असताना एका पट्यात रस्त्याच्या दोनीही बाजूला संत्र्यामोसम्बाच्या बागा लागल्या. आपसूकच गाडीचे ब्रेक लागले गेले आणि एका बागे बाहेर असलेल्या रसवंतीगाडी जवळ आमची गाडी थांबली. दोन दोन ग्लास ताजा मोसंबी रस पिउन झाला आणि मग आम्ही निघालो.

४. पंजाब मधील सकाळ
4

५.
5

६.
6

७.
7

८.
8

आम्ही निघालो ते थेट चंडीगड मधेच थांबलो. साधारण दुपारी १ ला आम्ही चंडीगडला पोहोचलो. ३०० km अंतर तीन वेळा थांबून ६ तासात कापलं. तिथे पोहोचलो आणि गाडी थेट सर्विस सेंटरला घेऊन गेलो. या वेळी शोधाशोध करायची भानगड नव्हती. गाड्या सर्विसिंगसाठी सोपवल्या आणि कृष्णाला, आम्ही पुन्हा छळायला आल्याची वर्दी दिली. गाडीचं काम होई पर्यंत ३-४ तास जाणार होते म्हणून मग तिथून बाहेर पडलो. दोन बर्गर वर तग धरण्याची ताकत नसलेले पोट पुन्हा भरण्यासाठी हॉटेल शोधू लागलो. पण त्या सेक्टर मध्ये एकही हॉटेल मिळेना. जिथे तिथे गाडीची सवय असलेले पाय किती वेळ चालणार हो!!! थोडे भटकून झाल्यावर शेवटी एके ठिकाणी रस्त्यावरच छोले-भटुरे विकणारा एक ठेला दिसला. तुषारला भूक नव्हती पण मला काही राहवेना. तिथेच फुटपाथ वर बसलो आणि ऑर्डर दिली. एका नंतर एक गरम गरम भटुरे पानात पडू लागले. छोले संपले कि तो कप्पा पण लगेच भरत होता. मस्त गरम गरम ७-८ भटुरे हाणले तेव्हा कुठे पोटोबा शांत झाले. शेजारीच असलेल्या ड्रम मधून पाणी घेतलं. थोडं हात धुवायला वापरलं आणि उरलेलं पिउन टाकलं. अहाहा !!! किती बरं वाटलं तेव्हा.. सुख सुख म्हणतात ते असं असतं. तिथून निघालो, ATM शोधलं, पैसे काढले आणि सर्विस सेंटरला स्वारी पुन्हा हजर झाली. एव्हाना ५ वाजले होते. आमची घोडी खरारा करून स्वच्छ अंघोळ घालून तयार झाली होती. आपली गाडी चकचकीत बघितली कि खूप छान वाटतं. तिथला सगळा हिशोब मिटवला आणि कृष्णाच्या घरी गेलो. परत आल्याचं पाहून त्याला खूप आनंद झाला. शिवाय एक दिवस त्याच्याकडे मुक्काम करण्याचं वचन आम्ही पूर्ण करणार म्हणून गडी आणखी खूष होता. निवांत गप्पा मारत संध्याकाळ गेली. हॉटेल मध्ये जाऊन 'बसण्यापेक्षा' घरीच 'बसायचं' ठरलं. मग घरी बसण्यापेक्षा घरा सारखीच त्याच्या एका मित्राची रूम होती. तिकडे मुक्काम करायचं ठरलं. उगाच त्याच्या घरच्यांना कशाला त्रास. त्या प्रमाणे सगळं जेवण रूमवर मागवून आरामात जेवण केलं. रात्री ३ - ४ वाजता कधी तरी झोप लागली.
आता एवढ्या उशिरा झोपल्यावर सकाळी कोणी लवकर उठतं का? आरामात १० ला उठलो. सगळं आवरून कृष्णाकडे जायला १२.०० वाजले. थोडा वेळ गप्पा मारल्या आणि वहिनीच्या हातचं मस्त जेवण करून आम्ही चौघे बाहेर पडलो. दोनीही बुलेटला सुट्टी देऊन त्यांच्या गाड्यांना थोडी तसदी दिली. चंडीगड मधे फेरफटका मारला. संध्याकाळी चंडीगड मधील एक दोन ठिकाणं बघायचं ठरवून, दुपारी मित्राच्या रूम वर आलो. पण नियतीने काही वेगळंच ठरवलेलं होतं. गेल्या १०-१२ दिवसात ज्याची आम्हाला आठवण सुद्धा आली नव्हती, त्याने त्याचं अस्तित्व दाखवायचं ठरवलं आणि त्या प्रमाणे दुपारी ३.०० नंतर अंधारून यायला सुरुवात झाली. थोड्याच वेळात तो मोठ मोठे टपोरे थेंब घेऊन कोसळायला लागला. चांगले २ - ३ तास त्याचा थयथयाट चालू होता. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट एवढेच काय ते आवाज ऐकू येत होते. फेरफटका तर लांबच राहिला पण घरा पासून ५ फुट बाहेर सुद्धा पडता आलं नाही. पूर्ण संध्याकाळ घरी बसून घालवावी लागली. अखेर तो उघडल्यावर पोटापाण्याच्या व्यवस्थेसाठी आम्ही बाहेर पडलो. जेवण करून घरी आलो आणि झोपलो. चंडीगड फिरायचं राहून गेलं.
वारीच्या परतीचा प्रवास अंतिम टप्यात आला होता. चार - पाच दिवसात घरी जाऊ असं लेह मधे असतानाच ठरवलं होतं. त्या प्रमाणे एक दिवस गेला होता आणि आणखी चार दिवस उरले होते. आज जयपूर पर्यंत जायचा बेत होता. त्या प्रमाणे सकाळी लवकर उठून आवरलं आणि ७ - ७.३० लाच आम्ही बाहेर पडलो. चंडीगडच्या वेशी पर्यंत कृष्णा सोडायला आला होता. तिथून पुढे तो कामाला गेला आणि आम्ही राजधानीकडे कूच केले. १५ दिवस आधीचा पावसाळी अनुभव लक्षात घेता हरयाणाच्या गावा-गावातून वाट काढत, खड्यांचे धक्के खात जाण्यापेक्षा दिल्ली मार्गे जायचा निर्णय घेतला होता. पानीपत पर्यंत रोड ओळखीचा होता त्यामुळे सुसाट निघालो होतो. पुन्हा ८०-९०-१०० ने गाडी हाकायला सुरुवात झाली. दोन काळ्या बुलेट दिसेल त्या गाडीला मागे टाकत पुढे मार्गक्रमण करत होत्या. आदल्या दिवशी धो-धो पडलेल्या पावसाने आज मात्र उघडीप घेतली होती त्यामुळे हायसं वाटत होतं. पानिपत ओलांडून पुढे आलो आणि नवीन परिसर चालू झाला. पाण्याने भरलेले ढग नाहीसे झाले पण पावसाळा चालू असल्यामुळे चहूकडे हिरवळ दिसत होती. अशा वातावरणात प्रसन्न मनाने सलग २-३ तास गाडी चालवल्या नंतर पोटोबा गप्प कसे बसतील. मग त्यांना शांत करण्यासाठी एका ढाब्यावर थांबलो. भरपेट नाष्टा केला. दुपारी २-३ वाजे पर्यंत तरी काही लागणार नाही एवढं खाल्ल्यावर तिथून लगेच निघालो. पुन्हा तोच अखंड प्रवास चालू झाला. कुठेहि कुणासाठी थांबण्याचा प्रश्नच नव्हता. काम फक्त एकच, "सपाट रस्त्यावर सुसाट गाडी चालवणे". बघता बघता दिल्ली आली आणि तिने आमचं स्वागत केलं.

९.
9

दिल्लीत पोहोचल्यावर रस्ता शोधणे सुरु झाले. दर दोन चौकात विचारपूस करून करून शेवटी एकदाचा NH८ सापडला आणि जीव भांड्यात पडला. चंडीगड पासून दिल्ली पर्यंत टोल रोड होता त्यामुळे रस्ता चकाचक आहे. तीच तऱ्हा NH ८ ची. पुन्हा वेगाने आमचं डोकं काबीज केलं आणि आम्ही वाऱ्या बरोबर उडू लागलो. सकाळी ७ ला निघाल्यावर १० ला नाष्ट्याला थांबलो होतो. तिथून ११ ला निघालो आणि दिल्ली ओलांडून पुढे कुठेही न थांबता दुपारी ३ वाजे पर्यंत गाडी चालवली. कुठेतरी जेवयचचं आहे म्हणून मग एक चांगलं हॉटेल बघितलं आणि थांबलो. चांगला तास भर आराम केला आणि पुन्हा प्रवास सुरु झाला. ठरल्या प्रमाणे जयपूरला पोहोचणारच होतो. संध्याकाळचे ५ - ५.३० वाजले असतील तेव्हा आम्ही जयपूर जवळ पोहोचलो. जयपूर मध्ये प्रवेश केला आहे असं वाटत असतानाच रस्त्यावरचे दगड वेगळीच कथा सांगू लागले.

१०.
10

इतका वेळ दर चार दोन किमी ने आम्हाला सगळ्या दगडांवर NH८ लिहिलेलं दिसत होतं ते अचानक NH ११ दिसू लागलं. ४-५ किमी पुढे गेल्यावर माझी ट्यूब पेटली. जोरात गाडी चालवण्याच्या नादात कधी NH८ सुटला आणि NH ११ लागला कळलंच नाही. मी तुषारला रस्ता चुकलो आहोत हे खुणावलं. लगेच थांबलो आणि किशनगड रस्त्याची चौकशी सुरु झाली. रस्ता विचारण्यासाठी १०० वेळा थांबून, गल्ली बोळातून मार्ग काढण्यात बराच वेळ गेला. ते अख्खं गुलाबी शहर ओलांडताना ६.०० वाजून गेले. पुन्हा जेव्हा NH ८ असलेला दगड दिसला तेव्हा बरं वाटलं. अंधार पडायला सुरुवात झाली होती. किशनगड आणखी १०० km होता. आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितलं आणि दोघांच्या डोक्यात एकच विचार आला. "किशनगडला जायचं का ?" ( याला म्हणतात टेलीपथी). दोघांचेहि डोळे चकाकले आणि गाड्या किशनगडकडे धावू लागल्या. किशनगडला पोहोचायला आणखी किमान सव्वा ते दीड तास लागणार होता. पण त्यात दोन फायदे होते. एक म्हणजे दुसऱ्या दिवशी १०० km कमी गाडी चालवायची आणि दुसरं म्हणजे हॉटेल शोधायची भानगड नाही, 'लेह'ला जाताना ज्या हॉटेल मध्ये थांबलो होतो त्याच हॉटेल मध्ये पुन्हा थांबायचं होतं. सूर्य मावळला होता पण गाडी चालवायचा उत्साह मात्र मावळला नव्हता. रात्रीच्या अंधारात आजूबाजूला नुसतेच ट्रक धावत असताना दोन बुलेट त्यांच्या मधून सरशी साधून पुढे झेपावत होत्या. कधी त्याला वाट दिसण्यासाठी किंवा वाहन ओलांडण्यासाठी मी लाईट दाखवून मदत करायचो, कधी तो मला मदत करायचा. सुमारे तासभर हा खेळ चालू राहिला आणि मग आम्ही दिवसाअखेर साधारण ६२५ km गाडी चालवून हॉटेलला पोहोचलो. रूम बुक केली. या वेळी रूम मधे कुठेही किडे नव्हते. ते बघून झोप शांत लागणार याची शाश्वती मिळाली. मस्त पंजाबी जेवण घेतलं, रूमवर येउन हिशोब केला आणि झोपलो.
सकाळी लवकर उठलो आणि आदल्या दिवशी सारखच ७.०० - ७.३० ला निघालो. आजचा मुक्काम होता हलोलला. जिथे आम्ही 'लेह'ला जाताना राहिलो होतो ते गाव. आधीच्या त्याच "हॉटेल राजधानी" मध्ये रहायचं ठरवलं होतं. एवढी भूक नव्हती म्हणून नाष्टा न करताच निघालो. रोड माहितीचाच होता. रमत गमत जाण्यात मला काही तथ्य वाटलं नाही आणि त्यालाही तसा फारसा इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे आपसूकच इकडे तिकडे न बघता दोघेही जोरात निघालो होतो. मनमुराद गाडी चालवण्याचा आनंद आम्ही दोघेही लुटत होतो. आत्ता पर्यंतच्या प्रवासात दोघांपैकी एकालाही गाडी चालवण्याचा कंटाळा आला नव्हता. अर्थात काही वेळा आला पण तो तात्पुरता त्या ५-१० मिनिटांपूरताच. पुन्हा तो धूम पळून जायचा आणि आम्ही गाडी पुढे रेटायला मोकळे असायचो. सलग ३-४ तास गाडी चालवल्यावर आम्ही एका ढाब्यावर विश्रांतीसाठी थांबलो. वारीला निघताना इतरांनी आणि घरच्यांनी भरपूर सूचना दिल्या होत्या. त्या पैकी "राजस्थान मधून जाणारच आहात तर "दाल-बाटी" नक्की खा असा प्रेमळ सल्ला वजा धमकी" बायकोने दिली होती. जाताना हा बेत काही जमला नव्हता म्हणून तो आत्ता साधायचा ठरवला आणि मी "दाल-बाटी"ची ऑर्डर दिली. तुषारला त्यात काही रस नव्हता म्हणून त्याने नेहमी सारखंच डाळ भात आणि रोटी आणायला सांगितलं. उभ्या जन्मात मी कधी दाल-बाटी खाल्लं नव्हतं, फक्त ऐकून होतो, त्यामुळे कुतुहूल होतच. एक पोऱ्या, ५-६ कणकीचे मोठे गोळे असलेली थाळी घेऊन आला आणि माझ्या समोर ठेवून गेला. मी आपला घुम्या सारखा हे काय आणून ठेवलं समोर, असं म्हणून याचं करायचं काय? हे खायचं कसं? याचा विचार करू लागलो. शिवाय त्यातला एक गोल हातात घेऊन खेळू लागलो. तुषारचा डाळभात येई पर्यंत हातातला गोळा अर्धा केला. एक त्याला दिला आणि एक स्वतः खाऊ लागलो. अर्धा खाल्ला म्हणून काय? सगळेच कोण असं खाणार होतं? मी ढाब्याच्या मालकाकडे प्रश्नार्थक नजरने पाहू लागलो. बहुदा माझी मनस्थिती त्याला कळली असावी. त्याने लगेच पोऱ्याला काहीतरी सांगितलं आणि दाल घेऊन पाठवलं. तो हिरो आला आणि थाळीतल्या गोळ्यांचा चुरा करून त्यात दाल घातली. "अभी मेरेको समझा, दाल-बाटी कशी खातात ते" असं मनात म्हणालो आणि केली सुरुवात हाणायला. मस्त चव होती. तो हिरो पुन्हा आला आणि कढी चाहिये क्या? म्हणून त्याने विचारलं. तिची पण चव बघावी म्हणून मी हो म्हणालो आणि पुढे काही म्हणायच्या आतच पठ्याने वाटी वगैरे मध्ये न देता सरळ, आहे त्या थाळी मध्ये एक डाव ओतला. आता अर्ध्या थाळीत दालबाटी आणि अर्ध्या थाळीत ती कढी. या दोनीही पदार्थांची एकरूप होण्यासाठी लगबग सुरु झाली आणि मी शक्य तोवर त्यांचा डाव हाणून पडायला लागलो. दालबाटी खायची आणि कढी ओर्पायची. जेव्हा थाळी रिकामी व्हायला लागली तेव्हा मालक म्हणाला "साब और चाहिये क्या, गरम गरम है? आणि भट्टीतली बाटी कडू लागला. ते बघून राहवलं नाही आणि मी उत्साहात दे म्हणालो. लगेच आणखी २-३ बाटी आमच्या पुढ्यात पेश झाल्या. अडवा हात मारला त्यावर आणि एकदाची काय ते दालबाटी खाऊन तृप्त झालो. त्याच ढाब्यावर मग थोडा आराम केला आणि पुढे निघालो.

११. पुन्हा उदयपूरच्या वेशीवर...
11

दुपारचे १२ वाजून गेले होते. प्रवास सुरु झाला. पावसाळा चालू आहे याचा मागमूस सुद्धा नव्हता. गरम वारा अंगावर घेत गाडी चालवत होतो. कुठे दोन दिवसा पूर्वी धो-धो पाऊस पडताना बघितलेला आणि कुठे हे जीव घेणे उन. समोर दिसत असलेल्या काळ्या पट्ट्या वरून सनाट निघालो. उन्हामुळे रस्ता चांगलाच तापला होता आणि त्यात जड वाहने जाऊन जाऊन, डांबर वितळून रस्त्यावर दोन ट्रॅकच तयार झाले होते. थोडक्यात लांबच लांब असेलेले दोन खड्डे. एकदा एक ट्रॅक पकडला कि जो पर्यंत एखादा ट्रक ओलांडायची वेळ येत नाही तो पर्यंत ट्रॅक सोडायचा नाही. वाहनांना ओवरटेक करताना जाम पंचाईत व्हायची. धडपडण्याची भीती वाटायची. पण नशिबाने तसं काही झालं नाही. रखरखीत उन्हात कुठेहि न थांबता एका मागून एक गावे मागे टाकत आम्ही हलोल कडे सरकत होतो. डोक्यावरचा सुर्य हळू हळू पश्चिमेकडे कलू लागला होता. दुपारी २ - २.३० ला पुन्हा एके ठिकाणी चहासाठी थांबलो. ५-१० मिनिटे गाडीला पण थंड होऊ दिले आणि निघालो. NH८ वर असलेले सामलाजी (एक गाव) ओलांडताच तो ओळखीचा फाटा दिसला, NH८ सोडला आणि लगेच वळलो. समोर पाटी दिसली, "वडोदरा २१२ km". मुक्कामाचं ठिकाण आपल्या टप्यात आहे याची जाणीव झाली. राजस्थान मागे राहिलं होतं आणि गुजरात स्वागत करत होतं. मागल्या वेळे प्रमाणेच अहमदाबादला फाट्यावर मारून थेट बडोद्याला जायचं होतं आणि बडोद्याच्या ३५ km अलीकडे, वाटेत हलोलला मुक्काम ठरला होता. उन्हं उतरायला लागली होती. कुठेतरी थांबावं असं वाटत होतं पण नेमकं ठिकाण (खाण्या पिण्याची सोय असलेले) सापडत नव्हतं. इथे नको पुढे बघू असं करत करत बरेच अंतर कापले आणि शेवटी एका गावात भेल-पकोडीची गाडी बघून थांबलो. त्या लहानश्या गावात, खालपासून वर पर्यंत जवळ पास काळ्या रंगाचे किंवा तत्सम गडद रंगाचे कपडे घातलेले आम्ही दोघे आणि तशाच काळ्या कुट्ट आमच्या गाड्या दिसल्यावर लोकं आश्चर्याने बघत होती. एव्हाना आम्हाला याची सवय झाली होती. आम्ही आपलं नॉर्मल राहून भेळेचा स्वाद घेतला आणि निघालो. जेव्हा निघालो तेव्हा पश्चिमेला तांबड पसरलं होतं, सुर्य अस्ताला चालला होता. अंधार पडायला लागला होता पण रस्त्याची काळजी अजिबात नव्हती. एकदम चकाचक रस्ता आणि रस्त्यावर भरपूर पाट्या असल्यामुळे चुकण्याचं काही कारण नव्हतं. जेव्हा गोधरा जवळ पोहोचलो तेव्हा सुर्य मावळा होता. हलोल आणखी ५०-५५ km लांब होतं. अंधार मी म्हणायला लागला आणि एक नवीन त्रास सुरु झाला. रस्त्याच्या दोनीही बाजूला शेती आणि झाडी असल्यामुळे चिलटांचा आणि इतर किड्यांचा सुळसुळाट होता. हेल्मेटची काच खाली केली तर समोरच अंधुक दिसायचं आणि वर केली कि किडे डोळ्यात जाण्याची भीती. गोधरा ओलांडून पुढे जाऊ लागलो तेव्हा समोर आभाळ भरून आलेलं दिसलं. शिवाय हवेतही गारवा जाणवायला लागला. हलोलला पोहोचे पर्यंत पाऊस पडू नये म्हणून मी धावा करू लागलो. हेल्मेटची काच खाली ठेऊन वेळप्रसंगीच फक्त उघडून त्या परिस्थितही गाडीचा वेग काही कमी केला नाही. कारण थांबला तो संपलाच्या धर्तीवर वेग कमी केला तो भिजला असं वाटत होतं. तुषार पुढेच होता आणि मी मागे. जोरात गाडी चालवत होतो आणि माझ्या समोर झपकन काही तरी रस्ता क्रॉस करून गेले. थोडा वेग कमी करून निट पहायलं तर कोल्हा दिसला. असो... त्याला त्याच्या नशिबावर सोडून मी आमच्या नशिबाकडे पुन्हा लक्ष केंद्रित केले. ढगांचा गडगडाट ऐकू येत होता. काहीही झालं तरी पाऊस सुरु व्हायच्या आत हलोलला पोहोचणे गरजेचे होते म्हणून जोरात गाडी दामटत होतो. जर पाऊस सुरु झाला तर कुठेतरी थांबून रेनकोट घालण्याचे सोपस्कार करावे लागणार होते, ज्यात आणखी वेळ जाणार होता. शिवाय गाडीचा वेगही कमी ठेवावा लागला असता. पण नशिबाने आमची साथ दिली आणि आम्ही हलोल मध्ये पोहोचलो. गाडी हॉटेलच्या पार्किंग मध्ये लावत असतानाच, धो-धो करत तो आलाच. आम्ही इच्छित स्थळी पोहोचलो होतो. तसेच भिजत भिजत पटकन सगळं समान काढून गाडीला भिजायला मोकळी केली आणि आम्ही हॉटेल मध्ये गेलो. हॉटेलवाल्याने आम्हाला ओळखलं होतं. रूम घेतली, फ्रेश झालो आणि हॉटेलच्या खानावळी मध्ये जेवायला हजर. १५ दिवसा पूर्वीची इथली चव अजूनही जिभेवर होती. भरपेट उत्तम जेवण केलं आणि रूम वर आलो. "आम्ही आणखी दोन दिवसांनी येऊ", अस घरी फोन करून सांगितलं आणि झोपलो. ६३०-६३५ km चा मस्त प्रवास करून तो दिवसही सार्थकी लागला होता.

१२. कपाळमोक्ष
12.

दोन दिवसात घरी जायचं होतं, त्या प्रमाणे सकाळी आरामात उठलो. आवरून हॉटेल मधेच नाष्टा केला आणि ९.०० ला निघालो. साधारण ३०० km वर असलेल्या दमन मधे मुक्काम करायचं ठरवलं होतं. बडोदा आलं आणि पुन्हा NH८ आम्हाला भेटला. आता मुंबापुरी पर्यंत तोच साथीला राहणार होता. बडोदा ओलांडून थोडेच पुढे गेलो असू आणि समोर क्षितिजा पर्यंत काळे ढग दाटून आलेले दिसले. आता पुढे कितीवेळ पाऊस लागेल हे सांगता येणार नव्हते. चंडीगड मधून निघाल्या पासून दोन दिवस हुलकावणी दिलेला पाऊस आज आमच्या समोर येउन ठाकला होता. मी अजून आहे, मी अजून आहे!!! असं आम्हाला सांगत होता. लेहला जाताना आम्हाला एवढं झोडपलं होतं याने कि आता आम्ही बेफिकीर होतो. जसं जसं पुढे जाऊ लागलो तसं तसं अंधारून यायला लागलं. घड्याळ, सकाळचे ९ वाजल्याचे सांगत होते आणि वातावरण संध्याकाळचे ७.०० वाजल्याचे खुणावत होते. समोर रस्ता ओला झालेला दिसत होता. आम्ही पावसाच्या टप्यात आलो आणि टन!!! टन!!! हेल्मेटवर मोठ्ठे मोठ्ठे थेंब आदळायला सुरुवात झाली. दोघांनीही गाडी थांबवून रेनकोट चढवला आणि लढायला तयार झालो. थेट दमनला थांबण्याचा निश्चय करून तिथून निघालो. पाऊस धो-धो कोसळत होता आणि आम्ही त्याचा प्रतिकार करत शक्य तितक्या जोरात गाडी पळवत होतो. पावसाचा जोर वाढला होता त्यामुळे रस्त्यावरील दुचाक्यांची आधीच कमी असेलेली गर्दी जवळपास नाहीशी झाली होती. आमच्या मधी मधी करणारे कोणीच नव्हते. उलट आम्हीच ट्रक वाल्यांच्या मधी मधी करून त्यांना मागे टाकून पुढे जात होतो. नंतर नंतर तर तो इतका जोरात पडू लागला कि हेल्मेटच्या काचेतून पुढचं अगदीच धुसर दिसू लागलं. उगाच कुठे धडपडायला नको म्हणून हेल्मेटची काच वर केली. चेहऱ्यावर पडणारे पावसाचे थेंब आणि शेजारून गेलेल्या वाहनांचे शिंतोडे सहन करत गाडी चालवत होतो. बराच वेळ पावसात गाडी चालवली. ४० - ५० km गाडी चालवून झाली, पावसाचा जोर कमी जास्त व्हायचा पण तो कधी थांबला नव्हता. समोर दिसणारा काळा ढग कधीही न संपणारा वाटत होता. रेनकोट घालून सुद्धा आम्ही पूर्ण भिजलो होतो. साला!!! कसल्याही मटेरीयलचा रेनकोट आणला असता तरी भिजलोच असतो असा त्या पावसाचा आवेग होता. अखेर भरूचला नर्मदा ओलांडल्यावर त्याने विश्रांती घेतली. नर्मदेचा पूल क्रॉस करून थोडंच पुढे आलो असेन तेव्हा माझ्या गाडीतून खाड!!! खडक!!! खाड!!! खडक!!! असला काहीतरी आवाज यायला लागला. तसा तो १-२ तास आधी पासूनच येत होता पण आता त्याची तीव्रता वाढली होती. गाडी चालवताना जाणवलं कि जेव्हा ती थरथराट जास्त करायची तेव्हा जास्त आवाज करायची. गाडी बाजूला घेतली आणि निरीक्षण केलं पण काहीच सापडायला तयार नव्हतं. शेवटी, बघू पुढे असं म्हणून निघालो. पावसाने उघडीप घेल्यामुळे छान वाटतं होतं. वेग थोडा कमी करून!!! म्हणजे ९० चा ७० - ८० करून आरामात पुढे जात राहिलो. कारण त्या वेगाला गाडीचं थरथरण्याचं प्रमाण कमी होतं. सुरत आणखी २५ -३० km लांब होतं आणि आम्हाला करमणुकीच एक साधन गवसलं. का कुणास ठाऊक? पण एक हिरो TVS Access घेऊन आमच्याशी शर्यत करू लागला. तो आम्हाला मागे टाकून पुढे जायचा आणि पुन्हा आपोआप कधीतरी मागे पडायचा. आम्ही काही वेळेला त्याला पुढे जाऊन देत होतो. काही वेळा जाणून बाजून त्याला मागे टाकत होतो आणि पुढे जाऊच देत नव्हतो. काही वेळेला त्याच्या थोडेच पुढे राहत होतो जेणे करून त्याला वाटावं आता ओवरटेक करणार पण त्याला तसं करता येत नव्हतं. सुरत येई पर्यंत हा खेळ चालू राहिला. शेवटी तो सुरतकडे निघून गेला आणि आम्ही सरळ दमनकडे.

१३. एका पेट्रोलपंपावर थांबलेले असताना याने दर्शन दिले.
13

सुरतच्या फाटा मागे टाकून थोडेच पुढे आलो होतो तेव्हाच पावसाने पुन्हा एकदा आम्हाला गाठलं. आताशी कुठे आम्ही थोडेसे वाळलो होतो तर पुन्हा हा भिजवायला हजर झाला होता. पुन्हा तेच सगळं रिपीट. राष्ट्रीय मार्ग ८ (NH८) खूपच मस्त बांधला आहे. प्रवास करणाऱ्याला कुठेही आडकाठी होऊ नये म्हणून छोट्या छोट्या गावांना वळसा घालून केलेले बायपास किंवा त्या गावातून जाणाऱ्या मार्गावरच बांधलेले छोटे छोटे पूल केले आहेत. चकचकीत खाली वर करत जाणारा रस्ता आणि त्यावर जाणारे आम्ही दोघे. झक्कास एकदम!!! पाउस चालू होता आणि गाडी पळवणेहि चालूच होते. बघता बघता दमन आलं पण आम्ही दमनच्या फाट्यावर वळलोच नाही. कारण तिथल्या तिथेच थेट घरी जायचे ठरवले गेले. पावसात तसेच पुढे प्रवास करत राहिलो. आता घरी जायचे ठरल्यामुळे गाडीचा वेग पुन्हा वाढला. पाऊस कोसळत होता आणि आम्ही दनादन गाडी चालवत होतो. एक एक गाव, एक एक शहर मागे टाकत पुढे पुढे सरकत होतो. जेव्हा महाराष्ट गुजरात सीमेवरचा भला मोठा टोलनाका आला तेव्हा लेहला जाताना इथे थांबलो होतो तो दिवस आठवला. बरोबर १९ दिवसांनी आम्ही पुन्हा त्याच टोलवर आलो होतो. जाताना 'लेह' वारी एक स्वप्न होतं आणि आज येताना ते स्वप्न सत्यात उतरलं होतं. टोल नाक्यावर न थांबता तसेच भिजत पुढचा प्रवास चालू ठेवला तो पार अगदी विरार पर्यंत. विरार आल्यावर पुन्हा एकदा गाडी आवाज करू लागली. तेव्हा मात्र आवाज ऐकून माझ्या डोक्याला मुंग्या आल्या. वारी संपत आली आणि अन अगदी शेवटला हि का उगाच त्रास देऊ लागली? म्हणून मी कासावीस झालो होतो. आडोसा वगैरे बघून थांबायची शुद्धच नव्हती. जिथे जाणवलं तिथेच गाडी कडेला थांबवली आणि नीट बघू लागलो. वरून पाऊस पडत होता आणि आम्ही दोघे अगदीच नवखे डॉक्टर रस्त्याच्या कडेला थांबून पेशंट्ला बघत होतो. त्यालाही कळत नव्हतं काय भानगड आहे ते. कोणता तरी भाग सैल झाला आहे आणि गाडी रेझ केली कि वाजतो आहे एवढच समजत होतं. गाडी रेझ करत करत जमेल तिथे सगळी कडे हात लावून बघत होतो. तेव्हा समजलं प्रवासात कधीतरी बॅटरीचं कुलूप तुटून पडलं होतं आणि झाकण अधांतरीच आहे. म्हणून मग झाकण गच्च दाबून धरलं आणि पुन्हा रेझ करून पाहिलं तर आवाज काही थांबला नव्हता. मुख्य समस्येचं निदान अजून बाकी होतं. पुन्हा नीट एक एक भाग बघायला सुरुवात केली. अनवधानाने एकदा पेट्रोलच्या टाकीवर जोर पडला आणि आवाज बंद झाला. दोनदा तीनदा चेक करून पाहिलं आणि खरी गोची कळली. पेट्रोलच्या टाकीचा नट सैल झाला होता.त्यामुळे ती थरथर कापून आवाज करत होती. लगेच तो घट्ट पिळला आणि आवाज बंद झाला. आता गाडी कितीही रेझ केली तरी उगाच कशीपण आवाज काढत नव्हती. भलं मोठं वाटणारं ऑपरेशन छोटसच निघालं. थोडक्यावर निभावलं म्हणून देवाचे आभार मानले आणि आम्ही पुढे निघालो. धो-धो पडणारा पाऊस, जोरात गाडी चालवायची मस्ती आणि लवकर घरी पोहोचणे या सगळ्याच्या नादात सकाळ पासून काहीच खाल्लं नव्हतं. भूक भरपूर लागली होती. पण आमच्या साहेबांनी ढाब्यावर जेवण्याची फर्माईश केली. वसई मागे पडलं पण हवा तसा चांगला ढाबा सापडला नाही. मग साहेबांना सांगितल, "आणखी थोडी कळ काढा, आता पनवेल नंतरच चांगला ढाबा मिळेल. ठाण्यामधे सगळी हाटेलच असतील". साहेब तयार झाले. घोडबंदर रोडला लागलो तसा पाऊस गायब झाला. पुढे मुंब्र्या मार्गे पनवेलला आलो आणि पनवेल ओलांडताच एका ढाब्यावर जेवायला थांबलो. एव्हाना ५.०० वाजले होते. घरच्यांना जोर का झटका धीरसे देण्यासाठी फोन करून सांगितलं, "आम्ही आजच दोन तासात घरी येत आहोत". बऱ्याच वेळा प्रवासात आम्ही थांबू तिथे सवडीने घरी फोन करून बित्तम्बात्मी देत होतो पण आज तसं काहीच केलं नव्हतं. सकाळ पासून ना फोन, ना मेसेज. त्यामुळे घरी मी येणार हे कळल्यावर लैच आनंदी आनंद झाला. असो… तर ढाब्यावर जेवलो आणि मग निघालो. वसई नंतर पाऊस बंद झाला होता. पूर्ण वाळलो होतो, तेव्हाच खंडाळ्यात पुन्हा आमचं पावसाने स्वागत केलं. मस्त बरसत होता. ओळखीच्या रस्त्यावरून भिजत येताना दोघांनाही कधी एकदा घरी पोहोचतोय असं झालं होतं. भर भर वाऱ्याला कापत एकदाचे आम्ही देहूरोडला (पुण्याचा बाह्यवळण मार्ग सुरु होतो तिथे)पोहोचलो. इथून पुढे आमचे रस्ते वेगळे होणार होते. तो त्याच्या घरी भोसरीला आणि मी चिंचवडला जाणार होतो. आम्ही थांबलो. वारी यशस्वीपणे आणि सुखरूप पूर्ण झाल्याचे एकमेकांना अभिनंदन केले आणि पुन्हा अशीच लांबची वारी करण्याचं मनात ठरवून आम्ही एकमेकांचा त्या दिवसाचा निरोप घेतला. मी चिंचवडकडे प्रस्थान केले. घराच्या ओढीने पुन्हा जवळपास ६०० km गाडी चालवली गेली. चंडीगडवरून निघाल्या पासून तिसऱ्या दिवशी घरी पोहोचणार होतो.
रात्री ८.३० ला गेटच्या आत शिरलो आणि पार्किंगमध्ये धडधड!!!! धडधड!!! बुलेटचा आवाज घुमायला लागला. गेले १९ दिवस तो आवाज, सतत, दिवसभर आमच्या कानात घुमत होता. आवाज ऐकून आई जवळ आली. घरी फोन करून "मी येतोय" असं आधीच सांगितलं असल्यामुळे ती आधीच खाली येऊन उभी राहिली होती. मी घरी आलो होतो. पाऊस रिपरिप चालूच होता. बुलेट स्टँडला चढवली (हो बुलेट हि स्टँडला लावता येत नाही, ती चढवावी लागते) आणि आई कडे वळलो. तिला कडकडून मिठी मारायची होती पण दोन-दोन जर्कीन घालून सुद्धा पार भिजलो होतो. वर पासून खाल पर्यंत सगळी कडून टप-टप पाणी गळत होतं. आपला लेक सुखरूप आणि धडधाकट घरी परत आलेला पाहताना तिच्या चेहऱ्यावरच समाधान आणि तिला झालेला आनंद मला अजूनही आठवतो. हळू हळू त्या धुडावरचा सगळा बोजा मी उतरवला आणि तिला (बुलेटला) रिकामं केलं. आता तिलाही कंटाळा आला असेल, किती दिवस तिने ते समान काहीही न तक्रार करता वागवलं होतं. असो... तिला आराम करायला सोडून, सगळा पसारा उचलला आणि घरात गेलो. बाबा आणि शुभदा वाट बघतच होते. सगळा प्रवास उत्तम होऊन मी घरी परत आल्याचा त्यांनाही खूप आनंद झाला होता. झालं, थोडा वेळ शांत बसलो आणि एक एक बॅग उघडायला सुरुवात केली. सगळं समान बाहेर काढलं आणि आधी होता तो पसारा आणखी वाढवला. मग हळू हळू परत सगळं आवरता आवरता भरपूर गप्पा झाल्या. मस्त गरम गरम जेवलो आणि झोपायला गेलो. आयुष्यभर लक्षात राहील असा एक प्रवास संपला होता.

१४. हक्काच्या जागी....
16

१५. लेह मधे करून घेतलेले दोन टी शर्ट्स
14.

१६. नकाशा पुन्हा एकदा....
15.

समाप्त....

प्रतिक्रिया

चौकटराजा's picture

10 Apr 2013 - 4:08 pm | चौकटराजा

आम्हाला लेहवारी झाली फुकटात पण काही वेळेस वाचताना शहारे आले अंगावर. तू तो कशमीरच्या शेवटच्या दर्शनाचा फोटो काढला आहेस तो अपर मुंडा हे गाव मागे टाकून पुढे नेहरू टनेलच्या सर्वात शेवटच्या वळणावरून काढलेला असावा असा अंदाज आहे. मी तिथून असाच फोटो काढल्याचे स्मरतेय. बाकी चंदीगड मधील रोज गार्डन,रॉक गार्डन मात्र हुकलेली दिसतेय. असो. गाडी कितीही भारी असली तर पाठीच्या कण्याचा विचार करता हे साहस फार अलौकिकच आहे. पुन्हा एकदा दंडवत मित्रा !

कपिलमुनी's picture

10 Apr 2013 - 4:19 pm | कपिलमुनी

थक्क करायला लावणार !! ...

"काश्मिरचा शेवटचा फोटो" हे वाचूनच एक छान पर्व सम्पल्याची प्रकर्षाने जाणीव झाली..
थराथक, उत्कंठावर्धक प्रवास जसाच्यातसा आमच्यापर्यंत पोचवायचं तितक्याचं चिकाटीच्या कामाबद्दल शतशः आभार!

झकासराव's picture

10 Apr 2013 - 4:39 pm | झकासराव

अप्रतिम, अप्रतिम, अप्रतिम :)

शिद's picture

10 Apr 2013 - 5:10 pm | शिद

अरेरे... उत्कृष्ट आणि अप्रतिम अशी लेखमाला संपली.

आयुष्यात असे साहस एकदातरी अनुभवण्याची ईच्छा आहे.

तुमच्या पुढिल वाटचालीसाठी खुप शुभेच्छा...

चेतन माने's picture

10 Apr 2013 - 5:26 pm | चेतन माने

_/\_
खूप मज्जा आली पूर्ण वारी वाचताना. लेह वारी चा अप्रतिम आणि काही वेळेस थरारक अनुभव दिल्याबद्दल धन्यवाद.
पुलेशु :):):)

आधीचे भाग वाचले नव्हते.. आता सगळे एका दमात वाचून काढले. मस्त मजा आली वाचताना. जणु मी तुमच्यासोबत प्रवास करुन आलो इतकं जिवंत चित्र उभं केलत. :)

कुलभूषण's picture

10 Apr 2013 - 6:32 pm | कुलभूषण

अप्रतिम प्रवासवर्णन.

रेवती's picture

10 Apr 2013 - 7:35 pm | रेवती

अगदी भारी झाली लेहवारी! प्रत्येक भागाचे लेखन मनापासून झाले आहे. फोटू तर अप्रतीम आलेत. भारतातल्या इतक्या गावा, शहरांची नावे वाचून छान वाटले. किती वर्षात भारतातल्या राज्यांची, शहरांची नावे उच्चारलेलीही नाहीत असे जाणवले. वारी संपली आणि कसेसेच झाले. मला प्रवासाची आवड नसतानाही तुमच्या लेखनाद्वारे फिरवून आणल्याबद्दल धन्यवाद.

इंग्रजी नववर्षापूर्वी नाही तरी हिंदू नववर्षापूर्वी झाली लेखमाला लिहून...!
सयाजी ला भेट होईलच. ;)
लेखमाला संपवलीस ह्याचा आनंद आहे मात्र एक रोमांचकारी सफर संपली ह्याचं दु:ख वाटत आहे.
लेखमाला उत्तम झाली आहेच.
(सविस्तर वाचली नाहीये अजून ;) )

तिमा's picture

10 Apr 2013 - 8:18 pm | तिमा

साहसी वीर सुखरुप परत आले. तुमच्या जिद्दीला आणि भूकेला पण सलाम. मला कधी एक दाल बाटीही एका वेळेला संपवता आली नाही.
तेवढं ते बोगद्याला भोगदा म्हटलेले खटकले. लेखमाला वाचनखुणांत.

मला कधी एक दाल बाटीही एका वेळेला संपवता आली नाही.
हेच म्हणते. तो प्रकार फार आवडतो पण लाडूएवढी एक बाटी आणि दाल संपवली आणि मैत्रिणीने अर्धी बाटी आग्रहाने पानात वाढली. त्यानंतर आठ तास स्वयंपाकघराकडे फिरकायलाही नकोसे झाले होते. त्या बाटीमध्ये बटाट्याचे सारण भरलेले होते. आता आठवण करून दिलीत तर लवकरच दालबाटी करणार.

प्राध्यापक's picture

10 Apr 2013 - 8:31 pm | प्राध्यापक

सुंदर प्रवास वर्णन्,लवकरच पुस्तक रुपाने प्रसिध्द करा म्हणजे आणखी जास्त वाचकांपर्यंत पोहोचेल.

प्रचेतस's picture

10 Apr 2013 - 9:41 pm | प्रचेतस

अप्रतिम लेखमाला.
लेख मोठा असतानाही वाचताना अजिबात कंटाळा येत नाही.
परतीचा प्रवास सुरेखपणे मांडलास.

वाचताना 'द हॉबिट - देअर अ‍ॅन्ड बॅक अगेन' ची सारखी आठवण येत होती.

यशोधरा's picture

10 Apr 2013 - 9:49 pm | यशोधरा

संपली का सफर :)
हिमालयाच्या बाळपहाडांची, दर्‍या खोर्‍यांची आणि खालपरेंत येणार्‍या ढगांची, गंगेच्या अविरत नादाची, फुलांच्या दरीतल्या सतत बदलत जाणार्‍या ऋतूंची आता सतत आठवण येत राहील... :)

अत्रुप्त आत्मा's picture

11 Apr 2013 - 12:30 am | अत्रुप्त आत्मा

मनराव...मानलं राव तुम्हाला __/\__/\__/\__

पहिल्या पासुन हा अखेरचा भाग वाचेपर्यंत एकच आणी एकच गोष्ट जाणवत होती,ती म्हणजे तुमच्या फिरण्याच्या हौसे इतकिच अस्सल अशी तुमची रसिकता.प्रत्येक भाग वाचताना जणु काहि ही सफर आंम्हिच केली आहे ह्या भावनेनी कृतकृत्य झाल्याची भावना मनात दाटत होती.तिचि सांगता या भागाच्या शेवटच्या परिच्छेदामधुन पूर्ण झाली. तुंम्ही म्हणता तशी ही एक वारीच आहे. म्हणुनच आज आंम्हाला पांडुरंग भेटल्याच समाधान लाभतय. जितक्या चिकाटिनी ही वारी केलीत,तितक्याच चिकाटिनी ही लेखमालाही आज पूर्णत्वास पोहोचली...अता पुढच्या भेटित एक नमस्कार तुंम्हाला,आणी दुसरा तुमच्या गाडिला....

किसन शिंदे's picture

11 Apr 2013 - 12:53 am | किसन शिंदे

बुवांच्या प्रत्येक शब्दाला +१००

हॅट्स ऑफ टू यू मनराव!!

मी-सौरभ's picture

12 Apr 2013 - 7:00 pm | मी-सौरभ

बुवा माणूस बोलायाला एक नंबर आहे बघा...

मनरावः वाचन्खूण साठवली आहेच... पुढच्या दौर्‍यासाठी नोंदणी करावी म्हणतो...

मालोजीराव's picture

12 Apr 2013 - 2:10 pm | मालोजीराव

बुवा म्हनत्यात तसच !

श्रीरंग_जोशी's picture

11 Apr 2013 - 1:13 am | श्रीरंग_जोशी

या धडाडीला वंदन करतो. अन हा सर्व प्रवास या लेखमालिकेद्वारे उलगडून सांगितल्याबद्दल आभार मानतो.
शब्द सुचत नाहीयेत :-).

जीएस's picture

11 Apr 2013 - 6:56 am | जीएस

दर वेळेला नव्या भागाची वाट बघत होतो. सुरेख प्रवास सुरेख लेखमाला.

मनराव ही लेखमाला फार आवडली. :)
मागचा भाग वाचायचा राहिला आहे,सवड मिळताच तोही वाचीन !
अशाच थरारक पुढील मोहिमेस आत्ता पासुनच शुभेच्छा ! :)

अंतिम भाग वाचून थोडा हिरमुस झाला. रोज ऑफिस मध्ये येउन पहिले मी मिसळपाव वर लेह वारी हा भाग आला का पाहत होतो. आज आलो आणि जाम खुश झालो.

एक मस्त सुंदर प्रवास आणि ते पण रोयाल एन्फिल्ड वर मणजे गोड स्वप्नच.

तुमचा प्रवास मस्त झाला हे वाचून जायची इच्चा अजून वाढली आहे.

असेच अजून प्रवास होऊदेत तुमचे आणि आमाला वाचायला आणि जायला हि मिळूदे हीच सदइच्चा.

गणपती बाप्पा मोरय्या.

रोहन.

पप्पुपेजर's picture

11 Apr 2013 - 6:02 pm | पप्पुपेजर

पहिल्या भागा पासून वाचतो आहे !!!! मनराव जर कधी भेटणे झाले तर जरूर भेटू पुण्या मध्ये ….

सगळ्यांना मनापासुन धन्यवाद !!!

लई भारी रे,अजुन काही लिहायचं चान्सच नाही, फक्त लई भारी बास.

खुप खुप धन्यवाद.

बाळ सप्रे's picture

12 Apr 2013 - 11:42 am | बाळ सप्रे

जबरदस्त अनुभव!! फोटोही छान ! सगळे भाग एकदम खिळवून ठेवणारे होते.
लेह म्हणजे साहसी पर्यटनासाठी स्वर्ग.. आणि तोही बुलेटवरुन मग काय विचारता!!
बाकी कितीही नव्या बाइक्स बाजारात आल्या तरी बुलेटच एक खास स्थान आहे!! अजुन चालवायची इच्छा अपुरी आहे :-( ..

लेहवारीचा साक्षात अनुभव दिल्याबद्दल धन्यवाद.. मजा आली..

Mrunalini's picture

12 Apr 2013 - 1:31 pm | Mrunalini

वा... खुप छान लेखमाला... आम्हाला पण ले। चा प्रवास घडवल्या बद्दल धन्यवाद!! :)

अभ्या..'s picture

12 Apr 2013 - 1:55 pm | अभ्या..

मनराव लैच भारी ट्रीप केलीय तुम्ही. अगदी बरोबर साईडकारमध्ये बसवून फिरवलेत आम्हाला.
नेक्स्ट टाइम तुम्हच्या बरोबर यावं म्हणतोय ट्रीपला.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

12 Apr 2013 - 2:07 pm | निनाद मुक्काम प...

प्रवास म्हटला की एक अनावर उर्मी रोमारोमातून दाटून येते.पण असा प्रवास माझ्यासाठी तरी स्वप्न आहे.
एवढा मोठा पल्ला दुचाकीवर तेही विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर घेऊन शक्यच नाही,
तुमच्या जिद्दीला ,आमचा सादर प्रणाम.
Emoticono Worship 1
निवांतपणे संपूर्ण मालिका वाचतो ,
ही पहिली मालिका असेल जिचा शेवट मी आधी वाचला.
आता शेवटाकडून सुरवातीचे अश्या उलट्या क्रमाने वाचायला घेतो.

विलासराव's picture

21 Apr 2013 - 12:37 pm | विलासराव

नावनोंदणी करनार असाल तर आमचं नाव फायनल करुन टाका.
बाकी सफर तर झक्कासच.

राजेंद्र मेहेंदळे's picture

20 May 2015 - 3:14 pm | राजेंद्र मेहेंदळे

सर्व भाग वाचतो सावकाशीने. ह्या धाग्याची लिंक दिल्याबद्दल मोदकरावांचे आभार्स

जिन्गल बेल's picture

17 Jun 2016 - 3:15 pm | जिन्गल बेल

एका दमात सगळी वाचून काढली...आणि अजून मन तिथेच रेंगाळत आहे...
तुमच्या साहसाला _/\_
आणि आमच्या पर्यंत इतक्या छान शब्दात मांडल्या बद्दल खूप खूप धन्यवाद...

मोदक's picture

17 Jun 2016 - 3:37 pm | मोदक

+११११

मनरावची ही लेखमाला मैलाचा दगड आहे..!

खरोखरच थक्क करणारी लेखमाला होती...!

धन्यवाद!