खिडकी आणि समुद्र..

गवि's picture
गवि in विशेष
22 Sep 2012 - 10:43 am
श्रीगणेश लेखमाला २०१२

जरा का जोडून सुट्टी आली की आमच्या, आमच्या कशाला, माझ्याच मेट्रोसेंट्रिक मनात पहिला विचार येतो की शहर सोडून दोन दिवस पळ काढावा. मुंबईसारख्या शहराचं असं आहे की पीडाही होते आणि सोडवतही नाही. पण तो वेगळा विषय झाला.

वीकेंडला किंवा चार दिवस सुटी काढून आपण शहराबाहेर का पळतो यामागची तात्विक चर्चा करावी का प्रत्यक्ष अशा भटकंती करु इच्छिणार्‍यांना "नो नॉन्सेन्स" माहिती द्यावी अशा दुबेळक्यात मी सापडलो होतो. लेख तर दोन्हीवरही अत्यंत उत्साहाने लिहिता येतील. पण मग काहीतरी मनांतर्गत भानगड होऊन दुसरा पर्याय जिंकला.

बँकॉक किंवा मलेशियाच्या वीकेंड टूर्स असतात. मामाचा गाव, आजी आजोबांची वाडी किंवा त्यासारख्या अपीलने पोरांना गावाकडे नेऊन टेकवून आणण्याच्या जाहिराती येतात. "फक्त दोघां"साठी रोमँटिक महाबळेश्वर म्हणा किंवा आत्यामावशीसुद्धा सार्‍या कुटुंबासाठी फटाफट अष्टविनायकही सुरु आहे.

पसंद अपनी अपनी..पण माझा पिंड हा तब्ब्येतीत फिरण्यामधे रमतो. अधिकाधिक साईटसीईंग हा भाग मला मानवत नाही. त्यापेक्षा एखाद्या सुंदर ठिकाणी जाऊन दोनचार दिवस रहावं. इच्छा झालीच तर आसपासच्या जागा फिरुन पहाव्या किंवा सरळ हाटेलच्या रूममधे आराम करावा. सुट्टी म्हणजे सगळ्यापासून सुट्टी.. घेतलेल्या रजेत जास्तीतजास्त रिलॅक्स झालंच पाहिजे, किमान पाचेक ठिकाणं पाहिलीच पाहिजेत या बंधनातूनही सुट्टी..

अशावेळी प्रत्येकाची एखादी आवडती थीम असते. माझी थीम आहे समुद्राची. समुद्राकाठीच वाढलो आणि समुद्रातच पोहायला शिकलो. लहानपणी समुद्र दोस्तासारखा वाटायचा. अजूनही वाटतो. पण मी मोठा झाल्याने तसं बालिश विधान करत नाही इतकंच.

ओके.. कट द क्रॅप.. कम टू द पॉईंट.

आपल्या हॉटेलच्या किंवा रिसॉर्टच्या खोलीत बसल्याबसल्या खिडकीतून समुद्र दिसतो आहे किंवा बाहेर आलो की समोरच समुद्र पसरलेला आहे, आपण संध्याकाळी व्हरांड्यात बियर किंवा तत्सम काही घुटकत आणि सोबत एखाद्या सुरमईच्या तुकडीला सद्गती देतो आहोत.. अशी आणि इतपत माझी स्वप्नं असतात. आणि हे सगळं मला जिथे करता आलं अश्या ठिकाणांनी मला पुष्कळ शांतता आणि समाधान दिलं.

कोंकण लायनीवर अशी बरीच ठिकाणं आहेत हे भटकबहाद्दरांना वेगळं सांगायला नको. गणपतीपुळे आणि तारकर्ली ही बरीच प्रसिद्ध ठिकाणं आहेत. मी त्यांविषयी नवीन काही लिहीत नाही.

कोंकणात नुसतं ड्रायव्हिंग करण्याचा विचारही मला सुखावून जातो.

kon

विशेषतः मुख्य हायवेने न जाता समुद्राकाठच्या रस्त्याने जायचं. एकदम अचानक कुठून समुद्र दिसेल सांगता येत नाही. कधी खाडी, कधी नदी आणि बर्‍याचदा तो निळाहिरवा समुद्र.. डोळ्यांना खूप सुख मिळतं. वळणावळणाच्या ड्रायव्हिंगचा कंटाळा येत नाही.

Konrasta

kok

konk

N

N

रस्तेही वेगवेगळ्या पर्सनॅलिटीचे..

एखाद्या ठिकाणी फेरीबोटीत कार घालून खाडी पार करावी लागते तेव्हा बोटीची वाट पाहता पाहता तिथल्या धक्क्यावर असलेल्या हाटेलीत मी चहा आणि बॉबी खातो. आपल्याला आवडते.. लाज वाटण्याचं काम नाय.

B

किंवा अशाच ठिकाणी मिळणारी एखादी सरबरवणारी झणझणीत मिसळप्लेट..

mis

धोका... पुन्हा एकदा खादाडीकडे वळण्याचा धोका.. तो टाळला पाहिजे आणि मूळ विषयाला धरुन लिहीलं पाहिजे..

हां.. तर समुद्राकाठच्या राहण्याच्या जागा..

पहिलं ठिकाण, म्हणजे त्याचं असं झालं की वेंगुर्ल्यात मुक्कामाचा अजिबात प्लॅन नसतानाही केवळ गोव्यातून निघायला उशीर झाला, वाटेत रात्र झाली आणि रत्नागिरी गाठण्याचा कंटाळा आला म्हणून वेंगुर्ल्यात गाडी वळवली. गावात काही राहण्यासारखी नेटकी जागा दिसेना म्हणून नकळत गाव क्रॉस करुन दुसर्‍या टोकाने बाहेर पडलो आणि दूर एका वळणावर उंच ठिकाणी एक हॉटेल दिसलं. आता केवळ रात्र इथे काढायची आणि सकाळी चालू पडायचं अशा बेताने हॉटेल म्यानेजरशी बोलणी केली.

"गजाली" हॉटेलचा हा असा अनप्लॅन्ड शोध.

खोलीत शिरलो सवयीने ए.सी लावला, टीव्ही लावला आणि बेडवर मस्त ताणून दिली.

पहाटे पहाटे एकदम डोळ्यात हलका हलका उजेड शिरला. डोळे चोळत किलकिले केले. बघतो तर काय, समोर आपला हा पसरलेला..

gaj1

मग पडदा बाजूला करणं आलं.

veng
आँ? समोर सूर्य? तोही सकाळी सकाळी समुद्रात? माझं काळाचं भान सुटलं का? की मी आदल्या रात्रीपासून दुसर्‍या दिवशीच्या सूर्यास्तापर्यंत भांग खाल्ल्यागत झोपलोच होतो?

मग लक्षात आलं, की तो सूर्योदयच होता.. त्या जागेच्या भौगोलिक की काय त्या रचनेमुळे सूर्य समुद्रातच उगवताना दिसत होता.

मग त्याला वर येताना तसाच पाहात राहिलो.

gajmng2

gajmng3

बराच वेळ समुद्राकडे पाहात लोळत पडल्यावर मी विचार केला की रूम सर्व्हिस न घेता एक जिना चढून वरती रेस्टॉरंटात ब्रेकफास्ट करावा. म्हणून वर गेलो तर ब्रेकफास्टची जागाच एकदम आवडून गेली..

gajbrk

मग काय? रात्रीपुरता झोपायला आलेला मी पुरे दोन दिवस मुक्काम वाढवून तिथेच राहिलो. रात्री गजालीच्या खानसाम्याने काहीतरी झकास द्या म्हटल्यावर, मोरीचं कालवण, सुरमई तुकडी आणि बियर असा जो काही बेत चारला म्हणताय..

असंच दुसरं ठिकाण म्हणजे गणपतीपुळे एम आय डी सी,. एकदम व्हरांड्यासमोर समुद्र. योग्य कॉटेज निवडलंत तर अगदी बेडवर पडल्यापडल्या समुद्राचं पॅनोरमिक दर्शन.. वीसतीस पायर्‍या खाली उतरुन गेलात की समुद्रातच..

पण मी गणपतीपुळ्यापासून एकदोन किलोमीटर अंतरावरच असलेल्या भंडारपुळ्यातलं एक ठिकाण इथे सांगतो. अभिषेक बीच रिसॉर्ट.. या हॉटेलची गंमत अशी की सर्वच खोल्या सी फेसिंग,

जास्तीत जास्त उंचावरची खोली घेतलीत तर आणखी मजा.

रूमच्या पूर्णाकृती काचेच्या खिडकीतून दिसणारं दृश्य.. इथेच प्रशस्त बाल्कनीही आहे.. कट्ट्यावर बसून समुद्र पहात राहायचं असेल तर..

abh

या ठिकाणीही मी असाच फिरत फिरत गेलो आणि समुद्राकडे पाहून बाकीचे सर्व बेत रद्द करुन त्याच गॅलरीत बसून त्याच त्या समुद्राची वेगवेगळी रुपं बघत दिवस काढला..

ab

नुसता सूर्यास्त पाहण्यात मजा नाही. सूर्यास्ताचे फोटो काढण्यात तर अजिबात मजा नाही. सूर्यास्तानंतर जो गूढ राखाडी प्रकाश पसरतो तो बघायला हवा. त्याच्या बदलत्या शेड्स बघायला हव्यात. साला त्या क्षणी तरी एकटेपणा रिकामेपणा हवाहवासा वाटायला लावणारे रंग सगळे..

अगदी रात्री रुद्रभीषण दिसणार्‍या समुद्राकडेही डोळे फाडफाडून बघत बसलो होतो. बियरच काय पण अभिषेकच्या किचनमधली फँटॅस्टिक सोलकढी सिप करत या बाल्कनीत बसण्यातली गंमत लाजवाब आहे.

बाय द वे.. या रिसॉर्टचं किचन टेसदार आहे एकदम..

.........................

रत्नागिरी हे तर माझं बालपण. तिथल्या भाट्याच्या सुरुबनात सायकली मारत जायचो तेव्हा लाटेने किनार्‍याला आलेल्यातले मासे पंजा मारुन पकडणारं एखादं चुकार कुत्र्यांचं टोळकं सोडलं तर तिथे नुसता सूं... असा आवाज भरलेला असायचा. आताशा एका गर्द रात्री त्या साईडने ड्राईव्ह करताना तिथे सुरुबनातच चक्क "रत्नसागर" नावाचा रिसॉर्ट झालेला दिसला. इथेच टाकावा तंबू असं म्हणत पुन्हा एकदा केवळ रात्रीसाठी मुक्काम म्हणून आत शिरलो आणि सकाळी उठूनच बाहेर पाहिलं.

सुट्यासुट्या आणि लांबलांब अंतरावर असलेल्या एसी कॉटेजेसनी ही जागा फार सुंदर केली आहे. सर्व घरं लाकडाची.

ratn

सगळी घरं थेट बीचवरच्या वाळूतच असल्याने समुद्र याहून जवळ असूच शकत नाही. बाहेर पडा, की समोर समुद्रच पसरलेला...

rat

ratn

या ठिकाणचं रेस्टॉरंट हे एकदम खास ठिकाणी आहे. संध्याकाळी इथे येऊन बसावं. आधी समोरच्या अथांग समुद्रात किंवा त्याच्याही अलीकडल्या पूलमधे दमेपर्यंत डुंबून घ्यावं..

ratn

मग सूर्यास्ताला या रेस्टॉरंटचं एखादं मस्तपैकी समुद्रकाठचं टेबल पकडून समुद्राकडे नजर लावून बसावं ते तासाला एक ऑर्डर देत एकदम मध्यरात्रीच जड उदराने उठून डुलत डुलत आपल्या लाकडी घरापर्यंत जावं.. सुख सुख म्हणजे काय वेगळं ते?

नीडलेस टू से.. पुन्हा एकदा एका रात्रीपुरता आत शिरलेला मी तीन दिवसांनी तिथून बाहेर पडलो... हो तर... कितीही मोठं असलं तरी एका दिवसात किती प्रकारचे समुद्रजीव त्या पोटात सामावणार, ....साला फिशकरी राईसमधेच माझा एक दिवस जातो.

दोस्तलोक्स.. कोंकणावर बोलायला लागलो की माझं तोंड फिजिकली दाबून बंद करण्याची वेळ येते. तेव्हा तुम्हाला विस्तारभय देत नाही. इथेच थांबतो. या ठिकाणांची केवळ नावं आणि मला तिथे मिळालेला अचानक आनंद तुमच्याशी वाटून घ्यायचा होता. तिथली बुकिंग्ज, दर आणि अन्य सगळी माहिती मिळवणं प.पू. गूगलबाबा कृपेने सर्वांनाच सहजसाध्य आहे. तो माझा आजचा विषय नव्हे.. मिसळपावच्या वर्धापनाच्या लेखमालिकेचं निमित्त आहे. माझ्या मनातलं तुमच्यासमोर बोलण्यासाठी. खाणं, भटकणं आणि आनंद वाटणं हा मिसळपावचा आत्मा आहे.. लेखनकामाठी किंवा साहित्यिक जडत्व नव्हे..त्यामुळे इथे आपल्या वाटेचे वाटसरु खूप भेटतात.

आनंद, निवांतपणा सगळा आपल्या आत असतो.. गजाली, अभिषेक किंवा रत्नसागरमधे नव्हे.. पण आपल्या आत तो आनंद घेऊन अशा ठिकाणी गेलं की तो नशा चढावी तसा चढतो..

अशा ठिकाणी जाऊन आलं की आपण आपल्या रूटीनमधे येण्यासाठी रिफ्रेश होतो अशी चुकीची समजूत आहे. अशा ठिकाणी गेलो की परत रुटीनमधे येताना काय पीडा होते ते काय वर्णावं..

पण ते तीनचार दिवस काहीही न करता, अगदी तोंडात माशी शिरण्याचीसुद्धा पर्वा न करता आ वासून समुद्राकडे बघत लोळत पडायचं असेल तर.. वेळेची जाणीव नष्ट व्हायची असेल तर..... अशा सुशेगादपणात, काही म्हणजे काहीही न करण्यात सर्वोच्च आनंद आहे असं आपल्याला वाटत असेल तर? म्हणजेच तुम्ही माझ्यासारखेच असाल तर? मग हीच आपली तीर्थक्षेत्रं...

be

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

22 Sep 2012 - 11:05 am | शिल्पा ब

आधी फोटो पाहीले. मस्त आहेत. बर्‍याच वर्षांनी बॉबी पाहीली. :) लेख आरामात वाचेन.

शैलेन्द्र's picture

23 Sep 2012 - 10:38 am | शैलेन्द्र

आअह्हाआहा..
बॉबीला आम्ही पोंगा पंडीत म्हणतो.. हे प्रकरण अस एक दोन पोंग्यात संपत नाही.. हाताच्या चार बोटात चार पोंगे टाकुन, अंगठ्याने एकेकाला सदगती द्यायची, ते संपले की डाव्या हातातल्या पिशवीतुन परत चार बोटं भरायचे..

काय ती चव.. काय ती मजा.. :)

मृत्युन्जय's picture

22 Sep 2012 - 11:06 am | मृत्युन्जय

लेखकाचे नाव न बघता लेख उघडलाय आणि इथे तरी कुठे दिसत नाही आहे. पण १००% सांगतो हे त्या गव्याचे काम असणार. एवढा फंटूश लेख अजुन कोण लिहिणार नाहितर. दुसर्‍या कोणी लिहिले असेल तर जाहीर माफी आजपासून तुम्ही गवि नं २ :)

संजय क्षीरसागर's picture

22 Sep 2012 - 11:12 am | संजय क्षीरसागर

>आनंद, निवांतपणा सगळा आपल्या आत असतो.. गजाली, अभिषेक किंवा रत्नसागरमधे नव्हे.. पण आपल्या आत तो आनंद घेऊन अशा ठिकाणी गेलं की तो नशा चढावी तसा चढतो..

= क्या बात है!

>अशा ठिकाणी जाऊन आलं की आपण आपल्या रूटीनमधे येण्यासाठी रिफ्रेश होतो अशी चुकीची समजूत आहे. अशा ठिकाणी गेलो की परत रुटीनमधे येताना काय पीडा होते ते काय वर्णावं..

= तो मूड घेऊन जगण्याची आयडिया जमली की प्रत्येक दिवस सहल आणि प्रत्येक ठिकाण समुद्राचा निवांतपणा!

बाय द वे, रत्नसागरच्या माहितीबद्दल आभार,... जायला हवं एकदा

सहज's picture

22 Sep 2012 - 11:16 am | सहज

अगदी मनातले...

आनंद, निवांतपणा सगळा आपल्या आत असतो.. गजाली, अभिषेक किंवा रत्नसागरमधे नव्हे.. पण आपल्या आत तो आनंद घेऊन अशा ठिकाणी गेलं की तो नशा चढावी तसा चढतो..

अत्रुप्त आत्मा's picture

22 Sep 2012 - 11:21 am | अत्रुप्त आत्मा

ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआआआआआआआआआआआआ.............! अहो गवि काय हो ,,,असे फोटू टाकायचे असतात काय? अता इथे घरात बसवत नाहिय्ये मला... अता वाचा या प्रतिक्रीया...!
@फोटो क्र-१>>>http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-clap.gif मेलो...मेलो................!

@ फोटो क्र-५>>> http://www.sherv.net/cm/emo/happy/happy.gif हाय....हाय...........! त्या लाल मातीचा अंगारा,माझ्या कप्पाळी लागल का.......?

@फोटो क्र-७/८ >>> कधी कधी जाऊ तिथे मी आता??? http://www.sherv.net/cm/emo/happy/bliss-smiley-emoticon.gif

@उरलेले सर्व फोटो- http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-in-the-sun-smiley-emoticon.gif

@ हाटेलीत मी चहा आणि बॉबी खातो. आपल्याला आवडते.. लाज वाटण्याचं काम नाय.>>> यहीच...यहीच बोल्ता है साला....!

@या ठिकाणचं रेस्टॉरंट हे एकदम खास ठिकाणी आहे. संध्याकाळी इथे येऊन बसावं. आधी समोरच्या अथांग समुद्रात किंवा त्याच्याही अलीकडल्या पूलमधे दमेपर्यंत डुंबून घ्यावं.. मग सूर्यास्ताला या रेस्टॉरंटचं एखादं मस्तपैकी समुद्रकाठचं टेबल पकडून समुद्राकडे नजर लावून बसावं ते तासाला एक ऑर्डर देत एकदम मध्यरात्रीच जड उदराने उठून डुलत डुलत आपल्या लाकडी घरापर्यंत जावं.. सुख सुख म्हणजे काय वेगळं ते? >>> http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-dancing.gif

बास बास ग.वि. १ तुंम्ही म्हणाल तिथली ट्रीप प्लॅन झाली आम्च्या मनात,कधी निघायचं बोला...??? http://www.sherv.net/cm/emo/happy/jumping-happy-smiley-emoticon.gif

प्रचेतस's picture

22 Sep 2012 - 11:49 am | प्रचेतस

प्रतिसाद आवडला.
स्मायल्या तर बेहद्द. :)

मन१'s picture

22 Sep 2012 - 10:41 pm | मन१

जबराट स्मायल्या.
कहर आहेत.

मन१'s picture

22 Sep 2012 - 11:24 am | मन१

(नुसते वाचणे सुद्धा )नितांत सुंदर अनुभव.
"नुसता सूर्यास्त पाहण्यात मजा नाही. सूर्यास्ताचे फोटो काढण्यात तर अजिबात मजा नाही. सूर्यास्तानंतर जो गूढ राखाडी प्रकाश पसरतो तो बघायला हवा. त्याच्या बदलत्या शेड्स बघायला हव्यात. साला त्या क्षणी तरी एकटेपणा रिकामेपणा हवाहवासा वाटायला लावणारे रंग सगळे.."
राखाडी तर आहेच हो. पण क्वचित काय होतं, की हल्केसे ढग, अगदि पुसटसे असे काही जमतात आकाशात की सूर्यास्त/सायंकाळ अगदि स्म्सरणीय होउन जाते.
सूर्यास्त झाल्यानंतर सगळीकडेच एक हल्किशी लाली पसरते, कधी कधी नारिंगी,पिवळट वातावरण पसरतं, अगदि सूर्याच्या आल्हाददायक लालीत तरंगल्याअचा भास व्हावा इतपत.
पण अर्थात, ह्याचा अनुभव घेण्यासाठी संध्याकाळी फ्री हवं; लोकलच्या गर्दीत किंवा हापिसाच्या खुर्चीत संध्याकाळी मान गुंतलेली असेल तर हे जाणवणार कधी?
असो. मला स्वतःला खूप भटकण्यापेक्षा अल्लाद अल्लाद फिरायलाच अधिक आवडतं.(गड किल्ले चढणं वगैरे कामं आव्हानात्मक, रोमांचक आहेतच, पण कष्टाचीही आहेत.) आरामात स्वच्छ समुद्रकिनारी फिरणं हा अनुभव खासच.

भीडस्त's picture

22 Sep 2012 - 11:29 am | भीडस्त

गविराजांच्या चष्म्यातून कोकण बघण्याचा खुमार काही आगळाच.

मन१'s picture

22 Sep 2012 - 11:32 am | मन१

महाराष्ट्राच्या/कोकणाच्या ढोबळमानाने पश्चिमेस समुद्र आहे. बहुतांश ठिकाणी त्यामुळे समुद्रावर सूर्य कधी दिसतो? तर सूर्यास्ताच्या वेळेस. पण काही काही ठिकाणी वेगळीच गंमत घडते म्हणे कोकणात.
पावस च्या पुढे गेल्यावर वाट जितेह संपते, मुचकुंदी नदी जिथे समुद्रास मिळते तिथे पूर्णगड आहे. तिथं काय होतं की जमिनीचा तो भाग चिंचोळा होत समुद्रात घुसलाय.(जसं खाडी म्हणजे जमिनीच्या भागात चिंचोळा होत घुसलेला समुद्र, तसच समुद्राच्या भागात जमिनीचा भाग घुसला तर काय होइल? तीन बाजूंनी समुद्र, आणि त्या टोकावर यायला एक छोटासा रस्ता.बस्स.) तर तीन बाजूंनी समुद्र असलेल्या भागात जर तुम्ही पोचलात, तर सूर्योदय हा तुम्ही कोकणात राहूनही पूर्वेकडपाहहोत असलेला तुम्हाला दिसणार!
पूर्णगडाबद्दलची माझी माहिती ऐकिव आहे.
अशीच इतरही ठिकाणे पब्लिकला माहिती असतील तर त्यांनी जरा प्रकाश टाकावा.

जाई.'s picture

22 Sep 2012 - 11:37 am | जाई.

मस्त लिहीलय

अमोल केळकर's picture

22 Sep 2012 - 11:42 am | अमोल केळकर

क्या बात है ! मस्तच :)

अमोल केळकर

इरसाल's picture

22 Sep 2012 - 11:43 am | इरसाल

फोटोत हात जोडले गेले आहेत _/\_.
अप्रतिम एवढेच म्हणेन.

प्रभाकर पेठकर's picture

22 Sep 2012 - 11:47 am | प्रभाकर पेठकर

>>>>>>समोरच समुद्र पसरलेला आहे, आपण संध्याकाळी व्हरांड्यात बियर किंवा तत्सम काही घुटकत आणि सोबत एखाद्या सुरमईच्या तुकडीला सद्गती देतो आहोत..<<<

ह्या वाक्यालाच आनंदतिशाने बेशुद्ध पडलो आहे.

वाचनखुण साठविलेली आहे. भारतात यायला जमले की अगदी अस्स्स्साच भटकणार आहे.

नुसता सूर्यास्त पाहण्यात मजा नाही. सूर्यास्ताचे फोटो काढण्यात तर अजिबात मजा नाही. सूर्यास्तानंतर जो गूढ राखाडी प्रकाश पसरतो तो बघायला हवा. त्याच्या बदलत्या शेड्स बघायला हव्यात. साला त्या क्षणी तरी एकटेपणा रिकामेपणा हवाहवासा वाटायला लावणारे रंग सगळे..

खासच. मला मात्र मात्र समुद्राकाठी सूर्यास्तानंतरच्या संध्याप्रकाशात का कोण जाणे पण भयंकर उदास वाटतं. पण रात्र झाली की चांदण्यात लाटांना एक रूपेरी किनार लाभते. मग तासन् तास समुद्राची गूढ गूढ गाज ऐकत किनारा अनुभवायची मौज औरच.

प्रास's picture

22 Sep 2012 - 12:07 pm | प्रास

स्साला, गविच्या या असल्या लिखाणामुळे आमच्या सारख्यांनी कोकण या विषयावर लिहूच नये या मतावर येऊन पोहोचलो. यार गवि, काय लिहिलंय, काय लिहिलंय...!
किती किती वाक्यांचा कोट देणार?
गवि म्हणजे दिवाळीतल्या फटाक्यांच्या हजारोंच्या कोटांसारखा दणदणीत लिहितो ब्वॉ!
अप्रतिम फोटो आणि त्यावरच्या पंचलाईन्सही.....
पुढची सडाफटिंग टूर आपण कोकणातच टाकूयात, ठीक?

किसन शिंदे's picture

22 Sep 2012 - 12:45 pm | किसन शिंदे

पुढची सडाफटिंग टूर आपण कोकणातच टाकूयात, ठीक?

अखिल महाराष्ट्रीय भटक्या मंडळातर्फे तुमच्या वरील वक्तव्याचा मी जाहिर निषेध करतो. ;)

गविंचा लेख अनं वल्लीचा प्रतिसाद दोन्ही खूप आवडले.

नंदन's picture

22 Sep 2012 - 12:21 pm | नंदन

वेंगुर्लेकर असूनही हे गजाली हाटिल माहीत नव्हतं. आता पुढच्या फेरीत हे तीर्थक्षेत्र शोधायला हवं. बाकी तिथल्या सागर बंगल्याइतकी मोक्याची जागा नाही. एका बाजूला पलीकडे अर्धचंद्राकृती वेळ, खाली काळ्या दगडांवर लाटा आपटून येणारी गाज आणि समोर पश्चिमेकडे समुद्राचा विस्तार.

बाकी लेखाबद्दल काय लिहावे! वाचनखुणेची सोय पुन्हा उपलब्ध करून द्या हो, मालक. हा लेख खुणेच्या पानासारखा पुन्हा पुन्हा वाचायला लागणार.

गवि's picture

22 Sep 2012 - 1:12 pm | गवि

हा घ्या सागर बंगला.. गजालीमधूनच फोटो काढला आहे. त्यावरुन गजाली कुठे आहे याचा अंदाज येईलच. सागर बंगल्यात लहानपणच्या खूप छान आठवणी आहेत. आईसोबत आणि चाळीतल्या बालमित्रांसोबत गेलेलो असतानच्या.

sag

.... आणि इथे पहा सागर बंगल्याचं दाभोलकरांनी केलेलं पेंटिंग, रत्नसागर रिसॉर्टच्या माझ्या रूममधे लावलेलं होत्तं.

painting

नंदन's picture

22 Sep 2012 - 2:32 pm | नंदन

धन्यवाद, नेमकं ठिकाण आहे म्हणजे गजालीचं.

व्वा व्वा व्वा क्या बात है गवि लई भारी बघा एकदम झक्कासच आवडेश :)

गणपा's picture

22 Sep 2012 - 12:29 pm | गणपा

सर्वांग सुंदर लेख.
श्री गनेणलेख माला सुरेख चालली आहे. एकन एक पुष्प जपुण ठेवण्या सारखं झालय.

समुद्राकाठीच वाढलो आणि समुद्रातच पोहायला शिकलो. लहानपणी समुद्र दोस्तासारखा वाटायचा. अजूनही वाटतो. पण मी मोठा झाल्याने तसं बालिश विधान करत नाही इतकंच.

एकदम मनकवडा आहेस यार तु.

तिमा's picture

22 Sep 2012 - 12:42 pm | तिमा

कोकणात अजून नाही गेलो, कधी भटकायला! तुमचं हे वर्णन आणि फोटो! आता मात्र जायलाच हवं.

अस्मी's picture

22 Sep 2012 - 1:12 pm | अस्मी

लेख आणि पूर्ण वर्णन एकदम खासच!!!
चिपळूणची असूनसुद्धा मला रत्नागिरीमध्ये रत्नसागर इतकं छान रिसॉर्ट असल्याचं माहीत नव्हतं.
खूप मस्त माहिती आणि फोटो. पहिला फोटो राई-भातगांव पूलाचा आहे ना?

कवितानागेश's picture

22 Sep 2012 - 1:35 pm | कवितानागेश

लेखन नेहमीप्रमाणेच मनाला भिडणारं.
आता मी त्या लाकडी कॉटेजच्या प्रेमात पडलेय.. :(

मला भारताचा पूर्व किनारापण आवडलाय. त्या समुद्राचा हिरवा रंग नुसता डोळ्यांनी घटाघटा पित रहावासा वाटतो. त्या हिरव्या शेड्स मी कधीच विसरु शकणार नाही.
पण इथल्यासारखी तिथे कुठेही समुद्रात फार आत जायची सोय नाही. किनारा पटकन खोल होतो. शिवाय लाटापण खूप उन्च , मोठ्या येतात. पाण्याबाहेर उभे राहिले तरी पट्कन एखादी लाट येउन 'आउट' करुन जाते. :)

मन१'s picture

22 Sep 2012 - 1:41 pm | मन१

पूर्व किनारा हा रौद्रभीषण आहे. मानवी वस्तीस तितकासा अनुकूल नाही; त्यातल्या त्यात ओरिसा वाला.
पश्चिम किनार्‍यावर दंतूर जागा अधिक आहेत. बंदर उभे करणे तुलनेने तिथे सोयीचे आहे.
.
पुस्तकी ज्ञान पाजळणारा

कवितानागेश's picture

22 Sep 2012 - 5:24 pm | कवितानागेश

पूर्व किनारा हा रौद्रभीषण आहे. मानवी वस्तीस तितकासा अनुकूल नाही>>
कधाचित त्यामुळेच मला आवडला असेल! ;)

पूर्व किनारा हा पश्चिम किनार्‍याच्या तुलनेत कैच नै. कमीतकमी दीघा, मंदारमणी वैग्रे बंगालमधले बीचेस पाहिल्यावर तर "** प्लीज" म्हणावे वाटते.

मन१'s picture

22 Sep 2012 - 1:59 pm | मन१

चांगली आणी गचाळ ठिकाणे दोन्हीकडे असतीलही.
प्रमाणाचा फरक आहे.
वाट लागलेले किनारे(काही टिपिकल मुंबैच्या आसपासचे) पश्चिम किनार्‍यावरही आहेत. कित्येक सुशेगात(हा शब्द असाच लिहितात ना? की सुशेगाद असा लिहितात?) ठिकाणेही पश्चिम किनार्‍यावर आहेत. गुजरातपासून ते केरलपर्यंत समुद्राच्या दीर्घबाहू पसरलेल्या आहेत. कोळ्यांसारखे पारंपरिक रितीने राहणारे समाज त्या बाहूंमध्ये अलगद विसावलेले आहेत.

अक्षया's picture

22 Sep 2012 - 1:57 pm | अक्षया

लेख, वर्णन आणि फोटो सगळेच छान.. नुकतेच जुलै महिन्यात राई-भातगाव पुलावर जाउन धमाल केली आणि फोटोग्राफी केली त्याची आठवण झाली..

अद्द्या's picture

22 Sep 2012 - 2:00 pm | अद्द्या

कितीही मोठं असलं तरी एका दिवसात किती प्रकारचे समुद्रजीव त्या पोटात सामावणार, ....साला फिशकरी राईसमधेच माझा एक दिवस जातो.

^^^^

=)))))

अद्द्या's picture

22 Sep 2012 - 2:01 pm | अद्द्या
यकु's picture

22 Sep 2012 - 2:16 pm | यकु

याचं नाव सूड घेणे ! ;-)

सुरुवातीचं निवेदन म्हणजे गविंच्या बैठकीत बसून समोरासमोर हे ऐकतोय एवढं दिलखुलास झालंय.

पैसा's picture

22 Sep 2012 - 2:48 pm | पैसा

वाचताना जीव कासावीस झाला. कित्येक वर्षात समुद्रात दंगामस्ती केली नाही की समुद्राचा आवाज ऐकत झोपले नाही याची आठवण झाली आणि रडू आलं. मरायच्या आधी एकदा कधीतरी बदामीला जाऊन रहाणार आहे आणि एकदा मनसोक्त समुद्रकिनारी रहाणार आहे. :(

पण काही म्हणा, रिसॉर्टमधे रहाणं मला तितकंसं आवडायच नाही. त्यापेक्षा थेट समुद्रकिनार्‍यावर पथारी पसरली तर? लहान असताना शांत रात्री आमच्या घरात समुद्राची गाज ऐकू यायची ती एकदम कानात जागी झाली. रत्नागिरीच्या भाट्याच्या मुद्दाम तयार केलेया सुरूबनापेक्षा मच्छीमार जेटीसाठी बळी दिलेला पांढरा समुद्र आठवून अजून काळजात कळ उठते. इतक्या सुंदर किनार्‍याची का अशी वाट लावली या लोकांनी? :(

श्रावण मोडक's picture

22 Sep 2012 - 3:00 pm | श्रावण मोडक

गप्पा केल्यासारखं लेखन आहे हे कळलं आणि मी आधी प्रतिमांकडं वळलो. त्यानंतर गप्पा ऐकण्याची गरज राहिली नाही. खाणं, हे असं वास्तव्य हा काही गप्पांचा विषय नाहीच! ;-)

लॉरी टांगटूंगकर's picture

22 Sep 2012 - 5:17 pm | लॉरी टांगटूंगकर

फोटो क्रमांक २ ,ब्रेकफास्टची जागा ,कॉटेजचे फोटो कातील,

आनंद, निवांतपणा सगळा आपल्या आत असतो.. गजाली, अभिषेक किंवा रत्नसागरमधे नव्हे.. पण आपल्या आत तो आनंद घेऊन अशा ठिकाणी गेलं की तो नशा चढावी तसा चढतो.
ते तीनचार दिवस काहीही न करता, अगदी तोंडात माशी शिरण्याचीसुद्धा पर्वा न करता आ वासून समुद्राकडे बघत लोळत पडायचं असेल तर.. वेळेची जाणीव नष्ट व्हायची असेल तर..... अशा सुशेगादपणात, काही म्हणजे काहीही न करण्यात सर्वोच्च आनंद आहे.
अगदी खरे आहे ..

५० फक्त's picture

22 Sep 2012 - 8:07 pm | ५० फक्त

फोटो क्र. ३, गवि, व्हिस्टा रॉक्स....... नो च्यालेंज फुकाच्या गप्पा नको तिथं, कोकणातले रस्ते, रस्ते कसल्या त्या पुर्वी १४ च्या पोरीला पावडर थोपुन १८ ची दाखवत तसं लाल मातीत थोडासा मिसळायचा प्रयत्न करणारा तो काळा डांबराचा तुकडा, आणि त्या तेवढ्या तुकड्यावर कोकणी शिव्या देत बिनधास्त फिरायला व्हिस्टा इस ,मस्ट.

माझा आणि कोकणातल्या रस्त्यांचा संबंध - पुणे - ताम्हिणी - माणगांव- म्हासळा मार्गे दिवेआगार - तिथुन समुद्राच्या बाजुने अलिबाग
पुणे - वरंधा मार्गे गुहागर - तिथुन हेदवी मार्गे गणपती पुणे त्या राईच्या पुलावरुन - पुळ्याहुन पुन्हा समुद्राच्या बाजुनं रत्नागिरी - आणि नंतर पणजी ते मालवण ते कोल्हापुर.

बाकी समुद्रकिनारा पाहात संध्याकाळी काढायला मालवण मधलं मयेकरांचं घर जाम भारी अगदी समुद्रात असल्यासारखंच. मोजुन १० फुटावर समुद्र, त्यानंतर शिदेबंधु लाटघर मध्ये दापोलीत.

आता जास्त लिहू नये हे बरं उगा जास्त शिव्या खाव्या लागतील...

फोटो क्र. १ आंजर्ले गावाकडे जाणारा पूल.

चाणक्य's picture

22 Sep 2012 - 11:35 pm | चाणक्य

फारच छान लिहिलंय.प्रत्येक ठिकाणी जाणार.

माझीही शॅम्पेन's picture

22 Sep 2012 - 11:52 pm | माझीही शॅम्पेन

गवि रॉक्स !

बॉबी काय प्रकार अजूनही कळल नाही

माझीही शॅम्पेन's picture

23 Sep 2012 - 8:09 am | माझीही शॅम्पेन

मागच्या वेळेला बॉबी चा फोटो दिसला नव्हता , हे तर नेहमीच्या विश-लिस्ट वरचा आयटम ,
पण खाली धनंजय लिहितात त्या-प्रमाणे लहानपाणि कधीच खाता नाही आला..

धनंजय's picture

23 Sep 2012 - 3:43 am | धनंजय

येथे गवींच्या कॅमेरानयनातून आणि प्रवाही लेखणीतून अनुभवले, ते स्वतःच्या डोळ्यांनी आणि जिभेने अनुभवावेसे वाटत आहे.

(या नळ्यांना "बॉबी म्हणतात हे माहीत नव्हते. माझ्या लहानपणी "गोल्डफिंगर" का असे काहीसे म्हटल्याचे आठवते. "कोणी किती जुन्या तेलात तळले, कोणास ठाऊक" म्हणून आईबाबा या गोल कुरडया कधी खाऊ देत नसत...)

पिवळा डांबिस's picture

23 Sep 2012 - 8:34 am | पिवळा डांबिस

हितगुज कम प्रवासवर्णन आवडले.
ठिकाणांची नोंद करून घेतली आहे...
जायला कधी जमेल ते देव जाणे!!

प्रशांत's picture

23 Sep 2012 - 9:42 am | प्रशांत

फोटो आणि लेख जबरदस्त...!

प्रभाकर पेठकर's picture

23 Sep 2012 - 11:03 am | प्रभाकर पेठकर

हे बॉबी किंवा तथाकथित पोंगा पंडीत चांगल्या ठिकाणीही बनत असतीलच पण मी त्यांना कुर्ल्याच्या रेल्वेलगतच्या झोपडपट्टीतील एका झोपडीत जमिनीवरच भिंतीलागून ढीग रचून ठेवलेला, रेल्वेने जाता येता, अनेक वर्ष पाहिलेला आहे. समोर २-४ मुलं ते पिशवीत भरायचे काम करीत असायची. त्यामुळे ते खायला कधी मन झाले नाही.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

26 Sep 2012 - 12:42 am | निनाद मुक्काम प...

कुर्ल्याचा असल्याने काकांच्या विधानाशी सहमत
मात्र ह्याच परिस्थितीत बनत असलेला ढोकळा पांढरा आणि पिवळा जेव्हा रेल्वेत विकायला येतो तेव्हा त्याच्या चटणी साठी तो खाल्ला जातो.
बाकी आम्हाला युरोपात येथील बीच आणि जगभरातील बीच दाखवणारी भारतीय
करूणा लाइफ इज बीच माहीत होती.
मात्र कोकणातील बीच व रिसोर्ट ची सचित्र माहिती दाखवणारे गवी ग्रेट आहेत.
कोकणात ३ आठवडे ते एक महिना भाड्याने एखादा बंगला किंवा प्रशस्त घर समुद्र किनारी मिळू शकतो का ?
मुंबईत महिनाभर येऊन नातेवाईकांना भेटण्यापेक्षा कोकणात डेरा टाकावा, व मित्र व आप्तांना तेथेच बोलून घ्यावे असा विचार मनात आला.

मदनबाण's picture

23 Sep 2012 - 11:33 am | मदनबाण

आहाहा...मस्त ! समुद्राचं आकर्षण असचं वेड लावणार आहे खरं ! :)

सस्नेह's picture

23 Sep 2012 - 12:08 pm | सस्नेह

सुरेख सचित्र सफर वर्णन.

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Sep 2012 - 12:10 pm | बिपिन कार्यकर्ते

मस्त!!!!!!!!!

कोकणात एकदाच गेलोय. दापोलीला. पहिले दोन फोटो तिथलेच आहेत का? कड्यावरच्या गणपतीला जातानाचे बहुधा. कोकण ही विसरता न येण्यासरखी गोष्ट आहे हे छातीठोकपणे सांगू शकतो! :)

चाणक्य's picture

23 Sep 2012 - 1:53 pm | चाणक्य

गवि, तुमच्या कडे इंडिका आहे का हो ? डॆशबोर्ड वरुन वाटतंय

स्पंदना's picture

23 Sep 2012 - 4:07 pm | स्पंदना

वाचुन मान नुसती हलते आहे. उजवीकडुन डावीकडे अन डावीकडुन उजवीकडे, इथे समुद्र मिळेल पण आपल खाण?
जळवल्याबद्दल आभारी आहोत.

वेंगुर्ल्याच्या खाडीसमोरचं हाटेल का हे? तिथला सगळा माहौलच भारी आहे...

प्रेरणा पित्रे's picture

23 Sep 2012 - 6:53 pm | प्रेरणा पित्रे

फोटो आणि लेख जबरदस्त...

लवकरच कोंकण ट्रीप ठरवण्यात येईल... :)

पप्पुपेजर's picture

24 Sep 2012 - 3:21 pm | पप्पुपेजर

लेख १ नंबर झाला आहे सगळी फिरलेली ठीखाणे डोळ्या समोरून तरळून गेलीत.

स्पा's picture

24 Sep 2012 - 3:24 pm | स्पा

१ लंबर हो गवि

मी_आहे_ना's picture

24 Sep 2012 - 5:20 pm | मी_आहे_ना

गविंचेच शब्द आहेत असं वाक्या-वाक्यात जाणवत होतं, लेखकाचे नाव दिसत नव्हते (काय प्रॉब्लेम आहे कळत नाही) पण प्रतिक्रियांमधून कळले, गविंचाच लेख आहे... गवि... -^-

मोहनराव's picture

24 Sep 2012 - 5:33 pm | मोहनराव

मस्त मस्त आणी मस्त!
एकदम समुद्रकिनारी जाऊन आल्यासारखे वाटले.. सुरेख अनुभव!