Skip to main content

म्हणणं, प्रोत्साहन, सल्ला, प्रेरणा, इशारे, अनुभव वा शंका इ. इ.

लेखक कौन्तेय यांनी गुरुवार, 22/03/2012 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
मी जन्मसिद्ध पार्लेकर. आम्हाला गावच नाही. आई-वडील तसे वऱ्हाडातले, पण आता तिथे कुणाचंच काही आणि कोणी शिल्लक नाही. त्यामुळे आमचं सगळं मुंबई एके मुंबईच. 'सब भूमी गोपाल की' हे तत्व प्रथमपासून पाळल्यामुळे याचं कधी दुःख जरी वाटलं नाही तरी एक शल्य सतत मनात होतं. मग आपल्या मुलांना नि त्यांच्याही मुलांना कुंकवापुरतं का होईना पण एक गाव असावं, गावी जायला घर असावं, खेळाबागडायला अंगण असावं, आपले झाडं लावायचे, शांततेत बसायचे शौक (हो, आता शांतता हा मोठा ऐषारामी शौकच म्हटला पाहिजे) पुरवावेत इ. इ. म्हणून एका टुमदार गावात रिकामा गावठाण भूखंड शोधून, रीतसर कायदेशीर बाबी पूर्ण करून तिथे घर बांधायचं काढलं. किल्ल्याच्या पायथ्याचा गाव. मग काय सोन्याहून पिवळं. सेकंड होम, सप्ताह-अखेर बंगले योजना, रो हाउसेस (नावाची खुराडी) अशा लोकप्रिय योजनांत मुद्दामून न जाता प्रत्यक्ष गावात, एकुटवाणं घर बांधायचं, ज्यात जमीनीचा सात-बाराही स्वतःच्या नावावर असेल म्हणजे जमीनीच्या त्या तुकड्यावर खरीखुरी मालकी असेल म्हणून ही उठाठेव केली. एकही नवा पैसा जास्तीचा न देता, वाट्टेल तिथे वाट्टेल तितक्या वेळी अत्यंत ताप-त्रासदायक चकरा मारून का होईना पण सातबारा नावावर झाला या समाधानात जेव्हा ग्रामपंचायतीकडे घरबांधणीची परवानगी घ्यायला गेलो तेव्हा दाताखाली पहिला दगड आला. पंचायत समिती सदश्श्यांनी सहा जणांचे म्हणून लंपसम्‌ २०००० रु. मागितले. काही दिवस चाल ढकल करून ते दिले. आयुष्यात लाचखोरी करण्याचा हा पहिला प्रसंग. आणि शेवटचाच अशी मनाशी घट्ट गाठ बांधून घरबांधणी सुरू केली. सदस्यांनी दिलेल्या प्रेमळ सूचनावजा आदेशांप्रमाणे बांधणीचं कंत्राट गावातल्याच उपसरपंचाला (हाही विनोदच. यांची बायको खरी उपसरपंच. पण हे भाऊ सगळीकडे स्वतःची ओळख उपसरपंच म्हणून देत फ़िरतात. महिला सक्षमीकरण की जय!). मध्यंतरी अण्णा हजाऱ्यांचं वगैरे आंदोलन होऊन गेलं. एकदा भाऊंना फ़ोन लावला तर म्हणे आता एक आठवडाभर खूप बिझी आहे, गावात भ्रष्टाचार विरोधी रॅली काढायचीए ना! पण आता आमचं बांधकाम पूर्णत्वाकडे जाताना घरपट्टी लागू करण्यासाठी आवेदन केलं तर सगळ्यांसाठी त्याचे पंधरा हजार मागत आहेत. 'नाय हो, आम्ही गावात कुणालाच नाय सोडला' हे स्पष्टीकरण. पैसे द्यायचे नाहीत हे ठरलेलंच आहे पण मला वाटतं की ते देऊन टाकून थोडी मनःशांती विकत घेण्याचा मोह कधीही होऊ शकतो. गावातल्यांना नि पंचायत समितीला नडायला माझी ना नाही. पण या कारणांमुळे मनात शंका निर्माण होतात -
  1. अशाने आपली तत्वपूर्ती साधली तरी पुढच्या मोठ्या काळासाठी सगळ्यांशी वाकड्यात जाणं हा वेडेपणा ठरेल अशी भीती वाटते.
  2. पुन्हा 'आहेरे-नाहीरे' वर्ग, शहरचे-गावचे, कदाचित ब्राह्मण-इतर यां अशा भिन्नतांपोटी गावकऱ्यांचा आपल्याबद्दल नेमका काय ग्रह असेल / होईल हेही सांगता येत नाही.
  3. मोक्याच्या ठिकाणीं बसलेल्या व्यक्तींनी असे पैसे मागणे हा त्यांचा हक्क प्रस्थापित झालेला आहे. त्याकडे दुर्लक्ष करून केवळ शासकीय फ़िया भरून आपलं काम होईल असं मानणं म्हणजे मूर्खांच्या नंदनवनात राहण्यासारखं आहे हे वास्तव आहे.
  4. आनंदाचे चार क्षण अनुभवता यावेत म्हणून बांधलेल्या घराच्या रूपाने नवीन विकतची दुखणी नि मनस्ताप येऊ नयेत!
... तर मंडळी, या मुद्द्यांवर कुणाचं काही म्हणणं, प्रोत्साहन, सल्ला, प्रेरणा, इशारे, अनुभव वा शंका इ. इ. असल्यास अवश्य इथे मांडाव्यात.

वाचने 27765
प्रतिक्रिया 112

प्रतिक्रिया

In reply to by नेत्रेश

अगदी बरोबर.. शेतकी जमीनीवरही दणकुन घर बांधयचं.. नंतर वर्षाला ५००-७०० रुपये दंड होतो.. तो भरायचा..

|| भारतीय नववर्ष ५११४ सर्वांना सुखा समाधानाचे नि आनंदाचे जावो ||
आभार. शिल्पा, पिंगू, शापित, स्वच्छंदी, रेवती, सुधीर, खेडूत, नेत्रेश आदींच्या म्हणण्यातूनही भरपूर तथ्यांश सापडत आहे. सगळे प्रतिसाद पाहता प्रथमदर्शनी वाटत आहे की गावाच्या पंचायतीमधे उभा राहून कुणी (१) शहरी, (२) सुखवस्तू दिसणारा, (३) फ़ॉरेनवाला, (४) अनोळखी, नव्यानेच प्लॉट खरेदी केलेला माणूस - स्वतःवर शेकत आहे म्हणून सचोटीचे फ़ंडे देऊ लागला तर त्याचे लगेचचे नि दूरगामी परिणाम चांगले नसतील. कदाचित ब्राह्मण हाही पैलू माझ्या इच्छेविरुद्ध तिथे जोडला जाऊ शकतो. गावातल्या भ्रष्टाचाराविरुद्ध गावकऱ्यांपैकीच जर कुणी निशाण घेऊन बाहेर आला तर त्याला कुमक पुरवण्याचं काम आपण करू शकतो, पण लढा सुरू करण्याचं नाही हे सत्य कटू आहे. मला आता असं विचारवंसं वाटेल की शहरी वा ग्रामीण कुठल्याही प्रकारच्या घट्टपणे रुळलेल्या लाचखोरीला व्यक्तीगत विरोध केल्याचं कुणाचं स्वतःचं, बघण्यातलं उदाहरण कुणी देऊ शकेल का? मध्यंतरीच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनांमुळे लाच देणारे व घेणारे यां दोघांतही काही सकारात्मक बदल झालेले दिसतात का? मी सन २००१पासून भारताच्या नि पर्यायाने राजकीय / सामाजिक चळवळींच्या बाहेरच आहे. त्यामुळे तळाच्या वास्तविकतांचा फ़ार अंदाज नाही. येऊ देन्याची कृपाया ...

शहरातले लोक तरी खेड्यातून नव्याने येणार्‍या लोकाना आजकाल शहरात कुठे सुखाने जगू देतात? .. मग खेड्यातल्या लोकानी तुम्हाला तुमचे नबाबी शौक पुरे करायला कशाला मदत करायची? जिथे आहात तिथेच सुखाने रहा.... परदेशात होता म्हणताय, मग पास्पोर्ट कुठून काढलात? पार्ल्यातूनच ना? तेंव्हा पार्ल्याच्या पोलिसानी, पास पोर्ट ऑफिसने फुकट कामे करुन दिली होती का? ( माझाही पास्पोर्ट ठाण्याचाच होता, तो तरी फुकट झाला नव्हता.) आता खेड्यातही तोच अनुभव येतोय तर खेड्यातले लोक बघा कसे माजलेत म्हणून मात्र लगेच धागा उघडलात ! आजकाल खेड्यातही भाड्याने जागा मिळणं मुश्किल होत चाललय.. तिथं खेड्यातले घर म्हणजे नबाबी शौक पुरे करण्याची सोय , अशी मेंटॅलिटी असलेल्या लोकाना असे अनुभव येणं यात अगदी काही अनपेक्षित नाही. आणि पैसा खेड्यातल्या सरपंचानं खाल्ला काय आणि मुंबईच्या पोलिसानं खाल्ला काय शेवटी तो मुंबई बसलेला एखादा मंत्री, पक्ष श्रेष्ठी यांच्याच डोंबलावर जाऊन पडणार असतो... तुमच्या पार्ला शिवाजी पार्कातच हे बसलेले असतात.. तुमचेच गाववाले हो! कशाला उगाच त्या खेड्यातल्या लोकांच्या नावानं बोंब मारायची?

ओ येस. शापित, अशा बऱ्याच फ़र्मास, खऱ्या बाजूंच्या नव्या वास्तवांशी जुळवून घेतानाचं चाचपडणं सुकर व्हावं म्हणून तर हा धागा काढला. जगमोहनप्यारे, 'जास्तीचे पैसे लाचस्वरूपात भरावे लागले तर कांगावा करू नये; कारण कुठे ना कुठे आपण सगळ्यांनी ते भरलेलेच आहेत' हा तुमचा मुद्दा समजला. बाकीच्या बहुमूल्य निंदेसाठीही आभार. तुमच्या डोक्यात फ़ुटलेले बार संभवतः त्या पैसे मागणार्‍यांच्याही डोक्यात असू शकतील इतका अर्थबोध तीमुळे झाला. धागा काढला तो कुणी माजलंय बिजलंय अशी रडारड करण्यासाठी नाही. तसा माझा हेतू वा मजकूराचा अर्थ नव्हता, नाही नि नसेल. तुम्हाला कुठे जाणवलाच तर स्वतःची माफ़ी मागून घ्या.

In reply to by कौन्तेय

तुम्हाला कुठे जाणवलाच तर स्वतःची माफ़ी मागून घ्या.
बाबौ शॉल्लीड फुटलो या वाक्यावर. =)) मनीच्या बाता: गण्या लेका ही नव वर्षाच्या स्वागताच्या आतषबाजीची सुरवात तर नव्हे ना?

भ्रष्टाचाराचे समर्थन नाही परंतु, यंत्रातील मोठी चाकं फिरतात तेंव्हा लहान चाकांना फिरावेच लागते अन्यथा मोडून, तुटून पडावे लागते.

In reply to by प्रभाकर पेठकर

तेच तर मी लिहिले आहे... मोठी चाकं पार्ला आणि शिवाजी पार्कातच यांच्याच अंगावरनं फिरतात, तेंव्हा हे काही बोलत नाहीत आणि आता खेड्यातली दोन चार चाकं फिरली तर याना लगेच सच्चाई, देशप्रेम्,समाज शुद्धीकरण, भगवद्गीता ... काय काय 'मोहन भार्गवी ' काव्यमय सुचायला लागलंय! पार्ल्यातला फ्लॅट कुणाला पैसे न देताच यांच्या नावावर झाला की काय!! :)

In reply to by JAGOMOHANPYARE

धन्यवाद जगमोहनप्यारेजी, जे मी साध्या सभ्य शब्दांत लिहिलं होतं तेच तुम्ही उघड उघड लिहिलं, जेंव्हा आपलं जळतं तेंव्हा ती आग आणि उब मिळते तेंव्हा शेकोटी असा उद्योग करणारे लोक ना कायद्याचं राज्य येउ देतात ना दोन नंबरचं, आणि जेंव्हा जशी वेळ येईल तेंव्हा त्या त्या राज्याच्या नावानं किंवा विरोधात मेणबत्या लावत फिरतात, मला तर या बाबतच्या एका धागाकर्त्याने बरेच वैयक्तिक स्वरुपाचे प्रश्न विचारले, त्याबद्दल खरड केली, पण मी त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देउन एक प्रतिप्रश्न केला की मग त्याला उत्तर अपरिहार्य कारणानं मिळालं नाही. (संदर्भ -http://misalpav.com/node/20887#comment-378272)

In reply to by ५० फक्त

तो धागा बघितला.. शहरातल्या भ्रष्टाचाराच्या मानाने हा खेड्यातला भ्रष्टाचार नगण्यच आहे. http://misalpav.com/node/20887 ----------------------------------------------------- शहरास्ते पंथान: ( एकदा शहराचा रस्ता धरला की षौक फर्मावायला परत खेड्यात येऊ नये.. :) आलच, तर त्याची किंमत मोजावी.) ) ---------------------------------------------------------

मी आता जे लिहिणार आहे ते वाचायचं आणि विसरून जायचे. आमच्या गावात एक जोशी नावाचे कुटूंब टिकून होते. मुलगा टेल्कोत कामाला. बाकी सर्व गावी शेती. बागायती ५ एकर आणि जिरायत २० एक असेल. गावात त्रास सुरू झाला. पण शेवती हद्दच बदलायला लागली तेव्हा जोशी आजोबांनी नातवाला साद घातली. ही जमीन वाचावायची असेल तर नोकरी सोड गावाकडे ये. नातवाने नोकरी सोडली आणि गावी गेला. गेल्या गेल्या धक्काबुक्की होऊन खाली पडला. मग बरेच छळ झाले.... नातवाने वैतागून नेपाळ गाठले आणि येताना कट्टा घेऊन आला. दुसर्‍या दिवशी दारू पिऊन शेजार्‍याच्या छाताडावर रोखला आणि.... सगळं सुरळीत झाले... आज ५ एकरावर उस आणि २० एकरला पाणी यायची शक्यता आहे.... गावाकडे असेच रहावे लागते. ब्राह्मणांनाच नाही तर सगळ्यांनाच....

In reply to by जयंत कुलकर्णी

मी आता जे लिहिणार आहे ते वाचायचं आणि विसरून जायचे.
प्रयत्न केला पण
नातवाने वैतागून नेपाळ गाठले आणि येताना कट्टा घेऊन आला.
हे वाचुन रहावलं नाही. एक बाळ बोध प्रश्न आलाच मनी. कट्टा/कुकरी कितीला पडला/पडली? येण्याजाण्याचा खर्च पहाता तेवढ्याच किमतीला पुण्या/मुंबईतुन एखादी तलवार नक्कीच आली असती. नाही का? ;)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

हा हा हा कट्ट्यार / कट्टा गोंधळ उडाला खरा माझा. आमच्या त्येला भाषेत 'घोडा' म्हंत्यात नव्हं. ;) तरीबी मुंबई/पुण्यात ते स्वस्त नसतं का मिळाल? :)

हम्म...रोचक अनुभव आणि त्यावर वेधक चर्चा चालू आहे. सगळं कसं पैशापाशी सुरु होऊन पैशापाशी येऊन थांबतं, नाही? एक गाव असतं, एक अंगणही असतं पण पैशाची (शब्द पिशाच्चाशी संबंधित वाटतो ना?) भूक ते सगळं सोडायला लावते. जेव्हा पैसा येतो आणि जे सोडलं ते पुन्हा मिळवावं वाटतं तेव्हा ते सगळं नासलेलं असतं. स्वतःची किंवा दुसर्‍याची पैशाची भूक त्यानंतर कधीच शांत बसू देत नाही. ये महलों ये तख्तों ये ताजों की दुनिया ये दौलत के भूखे रवाजों की दुनिया ये इन्सां के दुश्मन समाजों की दुनिया ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है? ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है?

In reply to by नगरीनिरंजन

नगरीनिरंजन गुरूजी, साधारणत: धागाबाह्य प्रतिसाद, बादरायणसंबंधयोजित खिजवाखिजवी वा इतर जावईशोध इ.कडे दुर्लक्ष करण्याचा माझा नेम आहे. पण तुमच्या या टिप्पणीची नजाकत अलग आहे. सुंदर आहे आणि ती १००% ससंदर्भ नसली तरी चर्चाविघटकही नाही म्हणून सहर्ष स्वागत.

In reply to by कौन्तेय

टिप्पणीचे स्वागत केल्याबद्दल धन्यवाद आणि ती कोणा एकावर रोखून केलेली नाही हे ही तुमच्या लक्षात आले असेल अशी आशा करतो. स्वतः पैसे कमावण्याच्या चक्रात अडकल्याने स्वत:ला पडलेले हे प्रश्न आहेत बाकी काही नाही. स्वप्नं पाहणे वाईट नाही पण आपली स्वप्नं प्रत्यक्षात मालकीहक्क आणि भौतिक गोष्टींमध्येच का रुततात? एवढं करून आपण जे मिळवायला बघतो ते मिळेल याची खात्री काय? असो.

खेडूत, जयंत कुलकर्णी यांच्याशी सहमत. एकतर तुम्ही आंधीत जागा/जमीन घेतली. त्यात तुम्ही तसे उपरेच त्यामुळे सबुरीनेच घ्यावे लागेल. कट्टा, बॅनर, पुढार्‍यांच्या ओळखी कामाला येतील असे वाटत नाही. मीही दुसर्‍या गावात जमीन घेतली आहे. मी ज्याच्याकडून जमीन घेतली त्याचा शेजारी (त्यांचे एकमेकाशी वाद होते तरी)त्या जमीनीवर डोळा ठेवून होता. त्याने जमीन त्या शेजर्‍याला न विकता मला विकली. हे मला सर्व नंतर कळले. झाले. मी जमीन घेतली. एकाला वाट्याने जमीन कसायला दिली. तर हा पठ्ठ्या शेजारी त्रास द्यायला लागला. रस्ता बंद करणे, औत अडवणे, पंप बंद करणे. शेती अवजारांची चोरी करणे, बैलांवर विषप्रयोग करणे, वाटेकर्‍याला दमदाटी करणे, जिवे मारण्याच्या धमक्या देणे. असे करुन २ वाटेकरी त्याने पळवून लावले. शेवटी मी सलग १५ दिवस त्या गावाला राहून नवीन वाटेकरी लावला. त्या त्रासदायक शेतकर्‍याचा सगळा ७/१२ काढला तर तो गावातही तसाच उर्मटपणे वागत असल्याचे कळले. त्याने पोर्वीचेच प्रकार चालू केल्यावर त्याला पहिल्यांदा समज दिली. तो बधला नाही मग त्याला एक दिवस अक्षरशः बडवून काढला. तर त्याने माझ्यावर अ‍ॅट्रासिटी टाकली. मीतर त्यात माहीर. मी त्याच्यावर जालीम क्रॉस टाकली. दरम्यान त्याला माझा कोर्टाचा 'अनूभव' कळला नि केस मिटवून घेवू म्हणून मागे लागला. त्याला चांगला ६ महीने तंगवून मगच केस मिटवली. आता एकदम सुरळीत चालू आहे. वाटेकर्‍याकडे कधी खत आणण्यास पैसे नसतील तर तोच शेजारी खते देतो. २-३ महिन्यात मी कधी गेलो तर मी त्याला त्याचे पैसे देतो, तर 'नंतर दिले तरी चालतील' असे म्हणून पैसे घेतो.

In reply to by भीमाईचा पिपळ्या.

हा आणि इतर प्रतिसाद वाचून शेतकरी लोक गरीब बिचारे वगैरे नसतात एवढे मात्र कळले. :-) माझ्या कृषीअधिकारी असलेल्या भावाने अनेक नमुनेदार किस्से सांगितले होतेच, हे वाचून त्याला बळकटी मिळाली.

In reply to by भीमाईचा पिपळ्या.

पिपळ्या पैलवान भाऊ, तुम्ही एका दमात उच्चारलेले अनुक्रमे "अडवणूक ... चोरी ... विषप्रयोग ... दमदाटी ... धमक्या ... समज ... बडवणे ... ऍट्रोसिटी ... जालिम क्रॉस टाकणे ... तंगवणे ... मिटवणे" हे सगळे क्रीयाकलाप बघून छातीच दडपली शप्पत. दाद देतो तुमच्या हिंमतीची! तरीही तुम्ही सबुरीचा सल्ला देताय हे त्याहून विशेष. लक्षात ठेवतो. एसोएससाठी तुमचा हस्तध्वनी क्र. देऊन ठेवा राजे. नेमक्या कुठल्या गुहेत पाय टाकतो आहे याची आता हळूहळू कल्पना यायला लागली आहे. पण गुहेतच पाय टाकायचा तर काळीजही वाघाचंच हवं. हौन्‌ जाऊ द्या ...

हम्म... दुसर्‍या बाजूशीही सहमत. गावाला जाऊन राहायचे तर वेळ आली तर प्रेमाने अन वेळ आली तर खमकेपणाने. गावी अनेक लोक मोडेन पण वाकणार नाही अशा प्रकारचे असतात, त्यांना वेळीच इंगा दाखवावा लागतो.

एकंदरीत काय, मा. श्री. महात्मा मो.क. गांधीनी जो संदेश दिला खेड्यात चला, त्याला काही अर्थ उरलेला दिसत नाही, किंवा खेड्यात चला अन चार दिवसांनी परत या असं नवं व्हर्जन यायला हवं.

हॅ हॅ हॅ.. एकंदरीत उद्बोधक धागा.. माझंही गाव आहे आणी तिथे मी नियमीत जातो.. या सगळ्या चर्चेला दोन बाजू आहेत... खूप वर्षांनी गावाकडे जाणं हे खरंच अवघड आहे, बसलेल्या, सुरळीत चालणार्‍या सीस्टीममधे तुम्हे बाहेरून जाता म्हणल्यावर त्रास होणारच की... तुमच्याजागी मी मला कल्पून बघितलं आणि जरा निराळा अँगल समोर आला... मला असं जाणवलं की मला असं गावात जाऊन राहाणं तितकंसं अवघड जाणार नाही, निदान आत्तातरी तसं वाटत नाही कारण, गावातून कुणी तरी शहरातलं काही ना काही काम घेउन नेहेमीच माझ्या घरी येत असतो, आणि तो माणूस नात्यागोत्याचा नसताना, केवळ गाववाला म्हणून माझ्याकडे येतो याचा मला आनंदच होतो. ते जे काही काम असेल ते करण्याचा मी मनापासून प्रयत्न करतो. किमान अगदी विस्तॄत माहिती तरी नक्की देतो. कुणी नोकरी मागायला आलेला असतो, तर कुणी सरकारी ऑफीस मधे एखादं काम काढून आलेला असतो, कुणाला चांगला दवाखाना हवा असतो, किंवा डॉक्टरची, वकिलाची ओळख हवी असते.. असे ५-१०-१५ वर्षे झाल्यावर मग संबंध तयार होतात, माणसं जोडली जातात, गावची आमंत्रणं मिळत जातात, वानवळा पोच होतो, मग गावकडं जायला अवघड वाटत नाही.... मला तर उलटं वाटतं आता, मला शहरात काही अडचण आल्यावर गावकडची ओळख निघेल का असा मी नकळत विचार करायला लागतो. आता हे सगळं नसताना, मी काय केलं असतं.. म्हणजे घर बांधणं हे एकमेव ध्येय न ठेवता तिथे कायम राहाणंही सुलभ होइल यासाठी... एखादी स्कॉर्पियो घेतली असती, पांढरे कडक स्टार्चचे कपडे घालून, गाडीवर चालक ठेउन अथवा स्वत:च खंडीभर धुरळा उडवत एक वर्ष ये जा केली असती तिकडे, एखादा पोलीस अधिकारी, एखादा आमदार, एखादा पाटबंधारे अधिकारी, एखादा सिवील सर्जन याला तिकडे दोन तीन वेळा जेवायला घेउन गेलो असतो. तिकडे गेल्यावर ड्रायवरला दिवसभर रिकामा सोडून असली काही वाक्ये पेरायला सांगीतलं असतं. "च्यायला साहेब लै बाराचा आहे, लैच गरम काम आहे" "सायबानं फोनाफोनी केल्यावर मोठ्यामोठ्या लोकांची फाटते" "सेठ कशी पाचर मारंल सांगता येत नाय" वगैरे वगैरे.. गावतल्या तरण्या लोकांच्या पाठीवर हात ठेऊन जाता येता, "कसं काय रे, काय लागलं तर सांगत जा" असं म्हणलो असतो, त्यातलेच ५-७ जण जमवून तालुक्याला अथवा जिल्ल्ह्याला एखाद्या ३ स्टार बारमधे बसून लै पाजली असती, त्यात गावातल्या सगळ्या भानगडी काढून घेतल्या असत्या.. वगैरे वगैरे वगैरे.. एखादा २ वर्षाचा कोर्सच म्हणा ना....

In reply to by अर्धवट

उत्तम सुचना, एक विनंती अशाच सुचना नविन संस्थळ काढणा-यांसाठी देता येतील काय कुणाला, माझ्या कडं एक गुंठा मंत्री आहे त्याला एक संस्थळ काढायचं आहे.

आता हे म्हंजे तुम्ही निराळंच काढलंत. उत्तरार्धातली अवस्था माझ्या आजच्या परिस्थितीला अनुरूप असल्याने मी तसं तसं करावं असा सल्ला असेल तर त्यातून आपसूक निघणारा अर्थ हा की आत्ताला वरचे पैसे टिकवून काम काढून घ्या, नि पुढच्या काळात लफडा नको असेल तर किमान हे हे करा! एका घराचं मार्गी लावण्यासाठी पांढरे, कडक ष्टार्च इस्त्रीचे कपडे, (कदाचित एक रे ब्यान गागल नि बोटभर रुंदीची सोन्याची चैन) एक स्कोर्पिओ, डायवर, त्याचा पगार, दारू पिण्याची सुरुवात वा पाजण्याची हातोटी हे सगळं जुळवून आणणं आहे. आवघड आहे राव.

कौन्तेय एकतर तुम्ही ५० हजाराला चूना लागल्यानन्तर हा धागा काढला आहे :P थोडेफार व्यवहार नि संवादकौशल्याच्या जोरावर तुमचे हे (किरकोळ) काम झाले असते. प्रत्येक गावात सगळेच माणसे नीतीभ्रष्ट, विघ्नसंतोषी नसतात. सविस्तर व्यनि करतो.

नाही. अजून पैशाचं कबूलही केलेलं नाही नि अव्हेरलंही नाही. मी स्वत: तिथे पोहोचून काही बोलबच्चन करून संवादकौशल्य गाजवायचं म्हणतोय. आता त्यामुळे रक्कम घटते की वाढते हे बघायचं. :-D प्रत्येक माणसाची नियत खराबच असं समजून वागू लागलो तर जगात जगायलाच नको. मला सगळे नीतीभ्रष्ट असतात असं अजिबात वाटत नाही. माणसाच्या चांगूलपणावर विश्वास असल्यानेच बहुदा मला आजवर चांगले अनुभव येत गेले आहेत. यातही येतील. व्यनि.चं स्वागत आहे -

मंडळी, साधक बाधक नि भरघोस गप्पांसाठी सगळ्यांचे आभार. आत्तापर्यन्त झालेल्या चर्चेतून बरेच मुद्दे हाती आले. काही उत्तरं मिळाली, तर काही नवीन प्रश्न मिळाले! चर्चौघात मिळालेल्या या दुव्यांचाही उपयोग झाला http://misalpav.com/node/20887 | http://www.misalpav.com/node/17574 .या चर्चा मंथनात काही मला मानवणारे व काही न मानवणारे पण वेधक, ठोस मुद्दे सापडले ते असे (द्विरुक्ती वा विस्तारभयास्तव प्रत्येक व्यक्तीचा मुद्दा त्याच विशिष्ट स्वरूपात वा क्रमाने जसाच्या तसा देत नाही) -
  1. प्रत्येकाचा बाप असतो.
  2. कायदा-सुव्यवस्थेच्या व मालकी हक्काच्या भिन्न ग्रामीण व शहरी कल्पना नि त्यांची कार्यवाही (काहींनी मांडलेले वाईट अनुभव)
  3. पैसे टाका, मोकळे व्हा, ’पुढाऱ्याच्या नावाचं एखादं फ़्लेक्स लावा’
  4. आमदाराला वास्तुशांतीला बोलवा; पैसे मागणाऱ्यांत फ़ूट पाडा.
  5. काही ठिकाणी माघारही श्रेयस्कर. पण तत्त्वपूर्ती हाच एकमेव निकष असेल तर अटीतटीची लढाई खेळावी.
  6. आपलं आयुष्य किती - आपण लढतोय किती
  7. मानसिक ताण तणाव झेपणार असतील तरच लाच न देता टक्कर देण्याच्या फ़ंदात पडा.
  8. गावच्या लोकांना जिंका - प्रेमाने, पैशाने (वा इतर कशानेही) [प्रेमाने जिंकायला वावच नाही. अख्खं गाव विकत घेण्याइतके पैसे असल्याविना या वाटेला जाऊ नये].
  9. गावगुंड व झोटिंगांना प्रसंगी जशास तसे उत्तर देण्याची तयारी हवी.
  10. वीकेंड होम ही नापास संकल्पना आहे.
  11. प्रसंगी आडमुठेपणा, खमकेपणा दाखवून देण्यासाठी गुंडपुंड पुढाऱ्यांच्या ओळखी लागतात.
  12. खेडूत मित्र वाढवावेत.
  13. अनधिकृतच बांधकाम करून मग ते नाममात्र दंड भरून अधिकृत करून घेतले तर खर्च कमी येतो.
  14. जगात सगळीकडे असलेल्या लाचखोरीच्या समांतर व्यवस्थेला आपणही कधी कळत कधी नकळत शरण गेलेलो असताना नेमका याच बाबतीत कांगावा का?
  15. जोशी ... छळ ... नेपाळ ... दारू ... कट्टा ... सुरळित
  16. धागाकेसरी पिपळ्या पैलवानाचा पराक्रम
  17. हितसंबंधांचं महत्त्व. गावाचे व तुमचे एकमेकांच्यात रुजलेले असावेत.
  18. व्यवहार, संवादकौशल्य वा इतर साधने पुरेपुर वापरल्याशिवाय चुना लागू देऊ नये.
सगळ्याची गोळाबेरीज म्हणून मधे म्हटल्यानुसार गावाच्या पंचायतीमधे उभा राहून कुणी (१) शहरी, (२) सुखवस्तू दिसणारा, (३) फ़ॉरेनवाला, (४) अनोळखी, नवखा, उपरा माणूस - केवळ स्वतःवर शेकत आहे म्हणून सचोटीचे फ़ंडे देऊ लागला तर त्याचे लगेचचे नि दूरगामी परिणाम चांगले नसतील. या कारणामुळे आत्तातरी विकतची मनःशांती आपलीशी करावी लागेलसं दिसतंय. पण सरते शेवटी जर त्या मार्गाने गेलोच तर
  • - आपण आपलं पाह्यलं, पण गरीबानं काय करायचं?
  • - आपण इतके पैसे दिल्याने गरीबांना नाडणाऱ्या व्यवस्थेला आपण आणखी बळकटी दिली नि घरपट्टी देण्याचा रेट वाढवून ठेवला त्याचं काय?
  • - हा; किंवा आपल्यातला अथवा समाजातला किमान एक दोष तरी निवारण्यासाठी आपण काही करणार आहोत की नाही?
ही शल्यं मनात राहणार आहेत. असो. बाकी या सूत्राच्या अनुषंगाने इथे सुरू झालेली चर्चा सुफ़ळ संपूर्ण झाली असं मी माझ्याकडून जाहीर करतो. शुभम्‌ भवतु।

- आपण इतके पैसे दिल्याने गरीबांना नाडणाऱ्या व्यवस्थेला आपण आणखी बळकटी दिली नि घरपट्टी देण्याचा रेट वाढवून ठेवला त्याचं काय? >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> त्याची चिंता तुम्ही करु नका... घर कच्चं आहे, पक्कं आहे, नवीन आहे, जुनं आहे, आतल्या सोयी.. अशा गोष्टींवर फाळा ठरतो... त्यामुळं इतरांची चिंता तुम्ही करु नका. - हा; किंवा आपल्यातला अथवा समाजातला किमान एक दोष तरी निवारण्यासाठी आपण काही करणार आहोत की नाही?>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> याला मात्र फक्त तुम्हीच जबाबदार आहत.. पार्ल्याला फ्लॅट घेऊन किती वर्षे झाली? तेंव्हा बी एम सी ला किती पैसे मोजले होते? तेंव्हा जर वरच्या १८ पैकी काही केले असते तर ही वेळ कदाचित आली नसती नै का? ------------------------------------------------------------------------- शहरास्ते पंथानः :) ---------------------------------------------------------------------------

>>> आपण आपलं पाह्यलं, पण गरीबानं काय करायचं? -- गरिबाला असले प्रश्न पडतच नाहीत!

जागो. तुमचा पार्ले नि शिवाजीपार्क यां 'स्थळां'बाबत काही नाजुक तगादा असेल - मी समजू शकतो; पण त्याचा राग या चर्चासूत्रावर का काढता??? आणि आता तेही संपलं आहे. मंडळ आभारी नाही! गुडनाइट.

तुम्ही धाग्याचा शेवट केलेला आहे. मात्र मी आत्ताच धागा पाहील्याने माझे काही स्वानुभवाचे बोल. वर दिलेले खेडूत, पिपळ्या, अर्धवट यांचे उपाय चांगलेच आहेत. त्यात पुढील भर घाला .. - दारात एक कार कायम उभी असू द्यात. - दुसर्‍यांना मनापासून मदत करता आली पाहीजे. ( अर्थीक नाही. पैसे उसने दिले की गेले. वेळेला आपल्या कडील वस्तू इ. शेअर कराव्यात.) - दुबळी कडी असा माणूस ओळखून त्याला अंकीत करा. मात्र त्याचे काही चुकले की कानातील केस जळतील अशा अस्सल शिव्या त्याला द्या. तुम्हाला घाण घाण शिव्या येतात हे जगाला माहीत असू द्यात. (आधी अभ्यास करा. पॉवरफुल माणसाला शिव्या द्याल तर मग .. ) - पोलीस हे खाकी वर्दीतील सहाय्यक तुमच्या बाजूनी करुन घ्या. एकदा शेजार्‍याच्या पोराने खोडी काढायला माझे ड्रीप चे लॅटरल दारु पिवून उपटून काढले. मी पोलीसाला १००० रु. दाखविले. ५०० आत्ता ५०० काम झाल्यावर , त्याला उचल. माझे हजार गेले. पोलीसाने त्याला दोन कानफटात मारल्या त्याचे कडून ही ५०० काढले. आता माझ्या कडे चोरी होत नाही.बोअर मारताना शेजार्‍याच्या आंब्याची फांदी जी आमचे कडे वसवा/ अतीक्रमणच होती, थोडी छाटली, त्याने बोअर ची गाडी बंद केली ,बोअर वाल्याला धमकावले. एकदम टेन्शन. त्याला म्हटले **** त दम असेल तर अर्धा तास इथेच थांब. तालुक्याला जावून पोलीस जीप व सहा पोलीस आणले. खर्च ५००० रुपये. नंतर चार बोअर झाले. - तुमच्या जमीनीचा तुकडा तुम्हाला विकायचा आहे अशी आवई उठवा. (सर्व जमीन नाही , तुकडा फक्त) ओळख नसलेले लोक राम राम घालतात. -विरुध्ध पार्टीला तुम्ही जमीन विकणार असा संशय दोन्ही पार्टींमध्ये पेरा. दोन्ही पार्ट्या तुमची काळजी घेतील. - विरुध्ध पार्टीतील सावकारांना तुमच्या जमीनीचे अमिष दाखवून किरकोळ कर्ज दोघांकडून ही काढा. (एवढेच कर्ज, की जे तुम्ही कधीही फेडू शकाल.) ते कर्ज थकवा. तुम्हाला आपोआप रक्षणकर्ते मिळतील. - तुम्हाला कशाची ही घाई नाही हे दाखवा. काम नाही झाले तरी विचलीत होवू नका. -हा माणूस काहीही करु शकतो याच्या नादी लागायला नको असे तुमच्याबद्दल रिपोर्टस लोकांपर्यंत जावू द्यात. ( मात्र तसे काहीही करण्याच्या भानगडीत पडू नका) - फार कोणाच्यात मिसळू नका. गावच्या राजकारणात तर अजीबात जावू नका. मात्र दोनचार प्रतिष्ठीत लोकांशी गोड बोलून संपर्कात रहा. - बिन्धास्त भ्रष्टाचार करा. (भ्रष्टाचा विरोधी आंदोलनात काय घडते ते जवळून पहात आहे. सन्मार्ग आपला नाही हे माहित करुन घ्या) पस्तीसाव्या वर्षी पुणे सोडून शेतावर स्थायीक व्हायचा निर्णय घेवून मी गेली पंधरा वर्षे शेतावर राहूनच हे सर्व एन्जॉय करतो आहे. त्यामुळे पहील्या धारेचा सल्ला देवू शकतो आहे.

सातबाराराव, काय हान्‌लाय्‌!!. ... व्वा - मझा आला. माझी फ़क्त एका निवासी भूखंडाव्यतीरिक्त कुठलीही शेतजमीन नसल्याने तुम्ही दिलेले सगळेच जालिम उपाय आजमावता येणार नाहीत, पण एकंदर अर्क रामबाण आहे. आभारी आहे. कसलेला अध्यक्ष सभेत नेहमी उशीरा येऊन समारोपाच्या भाषणात अशी काही सर्व्हिस टाकतो की सगळे जाम प्याक्‌! ... ! तुमचं समर्पक, मुद्देसूद नि चपखल समारोपाचं भाषण पाहून मला पुन्हा एकदा आभारप्रदर्शनाला उभं रहावं लागलं. बहुत बढिया. आयोजकांनी सभा संपन्न म्हणून घोषित केली असली तरी अजून पसायदान होणं बाकी आहेसं दिसतं. चेक्‌ चेक्‌ चेक्‌ - ध्वनिपरीक्षण एक दोन तीन ...

मला कल्पना आहे की सगळी चर्चा संपली आहे. पण वर पार्ल्याचा उल्लेख आला म्हणून लिहावेसे वाटले की माझा अनुभव लिहावा. आम्ही पार्ल्यात गेली ४० वर्षे रहात आहोत. आम्हीही पासपोर्ट काढला आहे, पोलिस स्टेशनात गेलो आहे. पण पासपोर्टसाठी तरी अजून आमच्याकडे कधीही कोणीही पैसे मागितले नाहीत आणि आमचे काम वेळेत झाले. कोणाचीही ओळख काढावी लागली नाही. बाकी सर्व चर्चा ऐकून गांवाविषयी धडकीच भरली. आमची धांव फार तर पुण्यापर्यंत! तुमच्या कामात तुम्हाला शुभेच्छा.

In reply to by तिमा

नमस्कार. धागाबाह्य लेखन, विषयांतर, प्रतिसादाला प्रतिवाद, तिरकी तिरकी चर्चा, मग भांडणं, व्यक्तीगत हल्ले नि चर्चाविघटन या गोष्टी टाळायच्या म्हणून मीही काही लिहिलं नव्हतं. तुमच्या या अहवालातून मोठे महान प्रश्न पडलेल्यांना उत्तर मिळावं. धन्यवाद. शेवटी गाववालेच धावून आले बघा! पारपत्र (मराठीत पासपोर्ट) व वाहनचालन परवाना यां दोन्ही ठिकाणी वा पो. चौकीत मला जास्तीचे पैसे द्यावे लागले नव्हते. पारल्याचं घर बाबांचं आहे. पंचेचाळीस वर्षांपूर्वी त्यांनीही त्या व्यवहारात पैसे चारलेले नाहीत. मी माझ्या नवी मुंबईतील रहात्या घराच्या व्यवहारातही नाहीत. नशीबाने प्रस्तुत चर्चेतला निवासी भूखंडही गावाबाहेरच्या एका वयस्कर गृहस्थाचा होता, जो तत्वनिष्ठही आहे (गृहस्थ). त्यामुळे आमचा सगळा व्यवहार पांढराच होऊ शकला. गटबुक नकाशा हस्तगत करण्यासाठी ज्या स्थानिक मित्राने खेट्या घातल्या त्याला दाद मिळत नाहीएसं पाह्यल्यावर मी मुद्दाम भारतवारी काढली नि तहसील कार्यालयात थडकलो तर तिथल्या जबाबदार साहेबाने पंधराव्या मिनिटाला तिरक्या नजरेने माझ्या हातात तो ठेवला. तिथलं बदललेलं वातावरण बघता मी त्यांना तहेलकाचा पत्रकार वगैरे वाटलो असण्याची शक्यता आहे. तसं मित्र मला म्हणाला. नवा सातबारा काढण्यासाठी मात्र तलाठ्याला पाचेकशे रु द्यावे लागलेले. तस्मात, गोळाबेरीज पाहता माणसाचा चांगुलपणा नि पैसे न चारताही कामं होण्याची शक्यता या गोष्टी गृहित धरण्याइतपत आयुष्याचा चांगला अनुभव मला आजवर आलेला आहे. याला नशीब म्हणू वा आईवडिलांची पुण्याई. म्हणून समानशील मित्रांशी अनुभवांची देवघेव व्हावी यासाठी हा धागा काढला 'होता'. अन् त्यावरच्या त्वरित नि् अर्थपूर्ण प्रतिसादांसाठी (निंदेसकट) मिपा.करांचे आभार मानावे तितके कमी आहेत. शुभम् भवतु -

बापरे, लेख आणि प्रतिक्रिया वाचून माझं स्वप्न मोठ्ठं होण्याआधिच त्याच्या गळ्याला नख लावलं मी. :(

दादा, 'लगिन पहावं करून नि घर पहावं बांधून' म्हणतात. करून पहावं! जोखीम आहे कबूल, पण ती कशात नाही? घेऊन टाकायची. पुढचं पुढे! आवश्यक पूर्वतयारी केली की झालं. जर लोकांच्या वाईटच अनुभवांवर विसंबायचं ठरवलं तर आयुक्ष्यात कुठे जायला नको न्‌ काही करायलाच नको. शुभ पंथावर बिनधास्स जावा -