"गाण्यातली लय!" - तात्या उवाच! (भाग १)

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
19 Jul 2008 - 6:36 pm

राम राम मंडळी,

माझ्या "चला, गाणं शिकुया, समजून घेउया!" - भाग १ या लेखाला प्रतिसाद देताना पक्या यांनी ताल व लय यात फरक काय आहे? हा प्रश्न विचारला आहे. याचे ढोबळ मानाने उत्तर द्यायचे झाले तर प्रथम ताल म्हणजे काय हे ढोबळमानाने पाहावे लागेल. ताल म्हणजे लयीला बांधून ठेवणारी गोष्ट! एखाद्या गाण्याच्या चालीनुसार जी लय असते त्या लयीला अतिशय सुरेख रितीने व सुसुत्रततेने बांधून ठेवणारी गोष्ट म्हणजे ताल. मग तो कधी एकताल असेल, कधी त्रिताल असेल तर कधी केरवा असेल. हे सगळे तालाचे विविध प्रकार आहेत. तालात लयीनुसार काही खंड निश्चित केलेले असतात त्याला मात्रा म्हणतात. ७ मात्रा, ४ मात्रा, १२ मात्रा, १६ मात्रा असलेले तालाचे विविध प्रकार आहेत. धा, धीं, तीन, कत्, त्रक, गे, ना, ही तबल्यातील विविध अक्षरं आहेत, ज्याच्या साहय्याने तबलावादन आणि पर्यायाने तालवादन होते. तालाच वजन तेच राखून, मात्रांची संख्या तीच ठेवून काही वेळेला एकच ताल विविध प्रकारच्या बोलांनी, अक्षरांनी वाजवला जातो त्या ठेका असं म्हणतात. उदाहरणच द्यायचं झालं तर अशी अनेक गाणी आहेत की ज्यात केरवा हा ताल वापरला गेला आहे परंतु त्याचे ठेके मात्र वेगवेगळे आहेत! विविध ठेक्यांमुळे गाण्याच्या सौंदर्यात भर पडते.

असो, ही झाली तालासंबंधी अगदीच ढोबळ व प्रथमिक चर्चा. ताल, तबल्यातील घराणी, विविध बंदिशी, कायदे, रेले ही सर्व तालाची शास्त्रीय अंगं आहेत, त्यात आपण सध्या शिरणार नाही आहोत. तो खूपच मोठा विषय आहे व त्या बाबत सवडीने कधितरी एखादी लेखमालाच लिहायचा माझा विचार आहे. अर्थात, माझाही अजून त्यात अभ्यास सुरू आहे व तो जन्मभर सुरूच ठेवावा लागेल इतका अफाट तबला आपल्या हिंदुस्थानी अभिजात संगीतात आहे! आपलं तालशास्त्र अतिशय समृद्ध आहे!

या लेखात मी संगीतातल्या 'लय' या अत्यंत अवघड अश्या विषयावर प्राथमिक भाष्य करण्याचा प्रयत्न करणार आहे. लय ही जरी अत्यंत सूक्ष्म गोष्ट असली तरी तिचा आवाका प्रचंड आहे. लयविचार हा संबंध संगीतालाच व्यापून टाकणारा प्रकार आहे!

संगीतातली लय आपण नंतर पाहू. पण मुळात लय म्हणजे काय हो?

बरं आधी मला एक सांगा, की हे कुठलं चित्र आहे? :)

हे ईसिजीचं चित्र आहे हे आपण ओळखलं असेलच! डॉक्टर कशाला काढतात हो एखाद्याचा ईसीजी? तर त्याच्या हृदयाच्या ठोक्यांची क्रिया नियमीत आहे किंवा नाही हे बघायला! म्हणजेच त्या माणसाची 'लय' कशी आहे, तो लयीत आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी! हृदयाची 'लय' बिघडली की जीवन बिघडलं आणि गाण्यातली लय बिघडली की गाणं बिघडलं असं समजावं! :)

प्रत्येक माणसाची अशी एक स्वतंत्र लय असते. हा लेख वाचताना एखाद्याच्या नाडीचे ठोके हे मिनिटाला ७५ असू शकतील, तर एखाद्याच्या ८० असू शकतील. परंतु प्रत्येकाचं हृदय एका लयीत सुरू असतं. सांगायचा मुद्दा हा की 'लय' हा जीवनाचा प्राण आहे. वास्तविक हा अगदी छोटा शब्द! दोनच अक्षरी - लय! परंतु त्याची व्याप्ती अफाट आहे. डॉक्टर मंडळी हृदयाला स्टेथोस्कोप लावून हे हृदयाचं संगीत ऐकतात. 'लब-ढब', 'लब-ढब', 'लब-ढब'! आहाहा, काय सुंदर नाद असतो हा? आपण ऐकला आहे का कधी? नसेल ऐकला तर केव्हातरी आपल्या फ्यॅमिली डॉक्टरांकडे त्यांचा जाऊन त्यांचा स्टेथो घेऊन अवश्य ऐका! :)

'लब-ढब', 'लब-ढब', 'लब-ढब'!

हृदयाचं काम एका छान नादमय लयीत सुरू असतं. जीवन सुरू असल्याची ती खूण आहे! हृदयाचे हे लयदार ठोके आईच्या पोटात असल्यापासून जे सुरू होतात ते अगदी शेवटचा श्वास सुरू असेपर्यंत! आमच्या गाण्याच्या भाषेत बोलायचं तर लयीची शेवटची तिहाई पडते आणि जीवनगाणं थांबतं! लय संपली, जीवन संपलं! बरं ही लय बिघडूनही चालत नाही. वर इसिजीचं जे चित्र लावलेलं आहे तो ईसीजी तेच तपसण्याकरता काढतात! पाहा मंडळी, आयुष्याचा आणि गाण्याचा किती जवळचा संबंध आहे तो. हृदयाची लय बिघडली की जगणं मुश्किल होतं आणि गाण्याची लय बिघडली की गाणं बिघडतं!

किती महत्व सांगावं हो लयीच? मला सांगा लय कशात नसते? इथे आपल्या मिपावर अनेक चित्रकार मंडळी आहेत. त्यांना विचारा की एखादं चित्र काढताना त्या चित्रातली लय किती सांभाळावी लागते ते! चित्रातही एक अदृष्य लय असते, अस्सल चित्रकार ती सांभाळूनच उत्तम चित्र साकार करत असतो. अर्थात, मी या विषयात काही जास्त बोलू शकत नाही कारण मला त्या कलेतलं काही कळत नाही, फक्त आस्वाद घेता येतो. परंतु इथे उत्तमोत्तम कवी आहेत, त्यांना विचारा की कवितेतली एखादी ओळ बांधताना लयीचं महत्व काय अन् ती किती सांभाळावी लागते! लय ही प्रत्येक कलेत असतेच, मी फक्त संगीतातल्या लयीविषयी थोडंफार बोलण्याचा प्रयत्न करणार आहे!

कुठलीही कला ही लयीशिवाय जन्मूच शकत नाही. लय ही स्वयंभू असते, कलेत अंतभूतच असते. कलेच्या अविष्कारात ती कलेपासून वेगळी काढताच येत नाही!

अहो, कलेचं एक वेळ राहू द्या, तुम्हीआम्ही तिची आपापल्या वकुबानुसार निर्मिती करतो, आस्वाद घेऊ शकतो. पण एखाद्या तान्ह्या बाळाचं काय? त्याला कळते का हो लय? :)

एखादं अगदी तान्हं मूल जेव्हा धाय मोकलून रडत असतं तेव्हा आसपासची बरीच मंडळी त्या मुलाला जवळ घेत असतात, त्याची समजूत घालत असतात, तरीही ते गप्प होत नाही. पण जेव्हा त्या तान्हुल्याची आई त्याला हृदयाशी धरते तेव्हा ते पटकन रडायचं थांबतं, खुदकन हसतं! सांगा पाहू का बरं असं? त्या तान्ह्याला हीच आपली आई आहे, हे कसं कळतं बरं? :)

९ महिन्यांपासून ते आईच्या पोटात असतं त्या कालावधीत ते अक्षरश: सतत म्हणजे सतत आईच्या हृदयाची ती 'लब-ढब', 'लब-ढब' ऐकत असतं! तेवढी एकच खूण असते त्याच्याजवळ. ना त्याला काही दिसत असतं, ना काही कळत असतं, ना कुणी समजून सांगायला असतं! त्याची साथ असते ती फक्त त्याच्या माउलीच्या हृदयाची एका ठराविक लयीतली नादमयता! पण तसं प्रत्येकच माणसाच्या हृदयाची धडधड सुरू असते मग ते मूल आपल्या आईच्याच हृदयाचा आवाज कसं ओळखतं? तर त्याला कारण हे की वर म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाची लय वेगळी, प्रत्येकाच्या लयीत सूक्ष्म फरक असतो आणि मंडळी आपल्याला कदाचित अतिशोयोक्ति वाटेल, परंतु विश्वास ठेवा, ते मूल एका क्षणात लयीतला तो सूक्ष्म फरक ओळखून फक्त त्याच्या आईने जवळ घेतल्यावरच एका क्षणात रडायचं थांबतं. आईच्या हृदयाजवळची ती जागा त्याच्या ओळखीची असते आणि आपल्याकरता हीच जागा सर्वात सुरक्षित आहे हा विश्वास त्या लहानग्याकडे असतो! ती ओळख असते ती त्या ठराविक लयीची, त्या माउलीच्या हृदयाच्या 'लब-ढब', 'लब-ढब' या लयदार नादमयतेची!

एक तान्हं मूल आपल्या आईचं हृदयसंगीत ओळखू शकतं, त्यातली नादमयता ओळखू शकतं! अर्थात, हे माझे विचार नव्हेत. ते मी माझ्या गुरुजींकडून शिकलो आहे. बघा बुवा तुम्हाला पटताहेत का ते! आमचे बाबूजी नेहमी म्हणायचे की कवी हा कविता लिहितांनाच त्याची लय निश्चित करत असतो. आपण फक्त ती लय ओळखाची आणि आपल्या आवडीच्या सुरात, आवडीच्या रागात, आवडीच्या धुनेमध्ये, कवितेतल्या भावानुसार ते गाणं बांधायचं! मूळ कविताच जर लयीत नसेल तर गाणं जन्माला येणं मुश्किल आहे! असो..

खरंच मंडळी, लयीचा शोध हा अनंत आहे. आपण तिचा जितका अभ्यास करू तेवढी ती अधिक सूक्ष्म होत जाते आणि पुन्हा अभ्यास करण्याकरता मुश्किल होऊन बसते. परंतु तिचा अभ्यास, तिचा शोध कधीच संपत नाही!

असो, तर मंडळी वरील विवेचन म्हणजे लयीबद्दलचे ढोबळमानाने काही जनरल विचार आहेत. मग आता संगीतातली, गाण्यातली लय म्हणजे काय हो? तिचा अनुभव कसा घ्यायचा? तिचं सौदर्य कसं अनुभवायचं? हे आपण पुढल्या भागात पाहू!

आमचे पक्याराव, 'तात्या, लय म्हणजे काय हो?' हा प्रश्न किती सहज विचारून गेले! परंतु हा प्रश्न विचारून त्यांनी माझी किती पंचाईत करून ठेवली आहे, नक्की कुठल्या परिक्षेला मला बसवलं आहे याची त्यांना तरी कल्पना आहे की नाही, देवच जाणे! :)

-- तात्या अभ्यंकर.

संगीतवाङ्मयविचारअनुभवआस्वादप्रतिभा

प्रतिक्रिया

प्राजु's picture

19 Jul 2008 - 7:24 pm | प्राजु

लय या शब्दाची व्याप्ती इतकी अप्फाट असू शकते याची कल्पनाच नव्हती केली. लय.. लय.. असं सहजच कित्येक वेळा म्हणून गेले.. पण त्याचा आवाका जबरद्स्त आहे..
तात्या, तुम्ही खूप सुंदर उदाहरण दिले आहे. बाळाचे आणि आईचे.

९ महिन्यांपासून ते आईच्या पोटात असतं त्या कालावधीत ते अक्षरश: सतत म्हणजे सतत आईच्या हृदयाची ती 'लब-ढब', 'लब-ढब' ऐकत असतं! तेवढी एकच खूण असते त्याच्याजवळ. ना त्याला काही दिसत असतं, ना काही कळत असतं, ना कुणी समजून सांगायला असतं! त्याची साथ असते ती फक्त त्याच्या माउलीच्या हृदयाची एका ठराविक लयीतली नादमयता! पण तसं प्रत्येकच माणसाच्या हृदयाची धडधड सुरू असते मग ते मूल आपल्या आईच्याच हृदयाचा आवाज कसं ओळखतं? तर त्याला कारण हे की वर म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाची लय वेगळी, प्रत्येकाच्या लयीत सूक्ष्म फरक असतो आणि मंडळी आपल्याला कदाचित अतिशोयोक्ति वाटेल, परंतु विश्वास ठेवा, ते मूल एका क्षणात लयीतला तो सूक्ष्म फरक ओळखून फक्त त्याच्या आईने जवळ घेतल्यावरच एका क्षणात रडायचं थांबतं. आईच्या हृदयाजवळची ती जागा त्याच्या ओळखीची असते आणि आपल्याकरता हीच जागा सर्वात सुरक्षित आहे हा विश्वास त्या लहानग्याकडे असतो! ती ओळख असते ती त्या ठराविक लयीची, त्या माउलीच्या हृदयाच्या 'लब-ढब', 'लब-ढब' या लयदार नादमयतेची!

पटलं. कारण मी यातून गेलेली आहे. माझा समज होता स्पर्श कळतो.. पण स्पर्शाची ओळख होण्याआधीच बाळाला लयीची ओळख होते... एकदम पटले.
- (सर्वव्यापी)प्राजु
://praaju.blogspot.com/http

सहज's picture

19 Jul 2008 - 7:32 pm | सहज

मुद्दा हा की 'लय' हा जीवनाचा प्राण आहे.

क्या बात है!

'लब-ढब', 'लब-ढब', 'लब-ढब'! - वाट पहात आहे पुढच्या भागाची ..

:-)

सुंदर लेख आहे, तात्या.

माझ्या एका शिक्षिकेचे शब्द आठवले -
व्हायोलिनच्या गजाची हालचाल म्हणजे व्हायोलिनच्या गाण्याला श्वासोच्छ्वास. वाजवणार्‍याने गजाला आपल्या श्वासाची लय द्यावी - आणि गाण्याची हृदयातली लय वाद्यातून आपोआप उतरते.
(स्वगत : आम्ही चांगले सल्ले नुसते ऐकणार - अंगीकार करणे आम्हला जमत नाही.)

केशवसुमार's picture

19 Jul 2008 - 8:05 pm | केशवसुमार

तात्याशेठ,
अतिशय सुंदर विवेचन..
आमच्या सारख्या औरंगजेबाला पण नीट समजलं लय आणि ताल म्हणजे काय .. धन्यवाद!!
(बेताल)केशवसुमार
स्वगतः केश्या तुझ्या विडंबनांनी तू मिपाची लय बिघडवतो आहेस समजलं का? :SS

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jul 2008 - 8:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुंदर लेख, सुंदर विवेचन !!!

आईच्या हृदयाची ती 'लब-ढब', 'लब-ढब' ........
क्या नजाकत है !!! कुछ बात कहनेकी.

तालात लयीनुसार काही खंड निश्चित केलेले असतात त्याला मात्रा म्हणतात. ७ मात्रा, ४ मात्रा, १२ मात्रा, १६ मात्रा असलेले तालाचे विविध प्रकार आहेत. धा, धीं, तीन, कत्, त्रक, गे, ना, ही तबल्यातील विविध अक्षरं आहेत,

तात्या, कवितेत लघु-गुरु ओळखतांना र्‍हस्व-दीर्घ च्या अक्षरावरुन मात्रे ठरवल्या जातात. तसे कोणत्या लयीला किती मात्रा हे कसे ठरवतात ? का आम्हाला वाक्य समजलं नाही :(

बाकी, लय समजवण्यासाठी इसीजीचे चित्र ......आणि 'लय' बिघडली की जीवन बिघडलं आणि गाण्यातली लय बिघडली की गाणं बिघडलं असं समजावं!
लय भारी !!!

पिवळा डांबिस's picture

19 Jul 2008 - 9:15 pm | पिवळा डांबिस

प्राध्यापक साहेबांशी सहमत आहे.
लगे रहो, तात्याभाय!
-पिडा

संजय अभ्यंकर's picture

19 Jul 2008 - 11:48 pm | संजय अभ्यंकर

डॉ. साहेब, डांबिसराव,
थोडे स्पष्टीकरण...

मात्रा लयीला नसतात तर ताला ला असतात.
लय म्हणजे एका विशिष्ट वेगाने होणारी स्पंदने वा ठोके (उदा. आगगाडी विशिष्ट वेगाने धावू लागली की एकसाचा आवाज येतो तद्वत किंवा लब ढब लब ढब इ.).

ताल म्हणजे विविध ध्वनींच्या शृंखलेची पुनरावृत्ती. उदा. तात्यांनी सांगितल्याप्रमाणे लब ढब / लब ढब. येथे चार अक्षरांची शृंखला पुन्हा पुन्हा ऐकू येते. "लब ढब" हि चार अक्षरे म्हणजे चार मात्रा.

आणी चार मात्रांचा मिळून होतो तो ताल केहेरवा.

तद्वत, सहा मात्रांचा दादरा, सात मात्रांचा रुपक इ.

(शाळकरी वयात काही वर्षे तबला शिकुन थोडेफार संगीत कळू लागले होते. त्याच्या आधारावर हे लिहीत आहे).

ता.क. : तात्यांनु चुकलो असल्यास सांभाळून घ्या!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jul 2008 - 10:01 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभ्यंकर साहेब,
माहितीबद्दल आभारी, आम्ही 'लय' ऐवजी 'ताल' असे म्हणायला पाहिजे होते.

थोडा आणखी त्रास देतो.
लब ढब = चार मात्रा
लब ढब लब = सहा मात्रा म्हणजे दादरा.
लब ढब लब ल = सात मात्रा = रुपक

असेच का ?

विसोबा खेचर's picture

20 Jul 2008 - 2:36 pm | विसोबा खेचर

लब ढब लब ल = सात मात्रा = रुपक

नाही बिरुटेसाहेब, असं नाही होणार! :)

रुपक हा सात मात्रांचा ताल आहे, त्याचे ३ व ४ असे भाग होतात. प्रत्येक तालात 'खाली'-'भरी' नावाचा एक प्रकार असतो. समेपासून 'भरी' सुरू होते व कालापासून 'खाली' सुरू होते. परंतु रुपक हा असा ताल आहे की ज्यात आधी कालाची 'खाली' सुरू होते व मग 'भरी' येते. फारच सुरेख ताल आहे हा! :)

" तीं तीं ना, धी ना धी ना " अश्या ३ व ४ खंडात रुपकची 'खाली-भरी' असते.

त्यामुळे लब ढब च्या भाषेत रुपक मांडायचा असेल तर तो,

" लब लब ढब, लब ढब लब ढब "

असा मांडावा लागेल! :)

बिरुटेसाहेब, खरंच, रुपक हा एक तसा अनवट परंतु एक अत्यंत डौलडार ताल आहे. त्याचा रुबाब काही आगळाच.

'हे सुरांनो चंद्र व्हा', 'हे शामसुंदर राजसा', 'तेरे मेरे मिलन की ये रैना', इत्यादी अनेक एकापेक्षा एक सुरेख गाणी रुपक तालात आहेत. अभिजात संगीतातदेखील मध्यलयीतल्या रुपकात गवई मंडळी एखादी बंदिश खूप छान रंगवतात. आमचे रामभाऊ मराठे सोहनी रागातली, मध्यलय रुपकातली 'जियरा रे' ही बंदिश केवळ अप्रतीम रंगवत. रामभाऊंचं लयीवर विलक्षण प्रभूत्व होतं! मी अगदी भरभरून ऐकला आहे रामभाऊंचा रुपक! क्या बात है...!

असो,

अजून खूप काही लिहिता-बोलता येईल रुपकच्या सौंदर्याबद्दल. दादरा आणि केरव्याबद्दलही लिहीन केव्हातरी!

आपला,
(रुपकप्रेमी) तात्या.

संजय अभ्यंकर's picture

20 Jul 2008 - 8:44 pm | संजय अभ्यंकर

मी सुद्धा रुपक चा फॅन आहे.

माझ्या निरिक्षणा नुसार रुपक तालात बांधलेले गीत बहुतेक वेळा हीट होते.

उदा.

पीया तोसे नैना लागे रे...
दिल लगाकर हम ये समझे..
तुम गगन के चंद्रमा हो...
आपकी नझरोंने समझा..
मेरा जीवन कोरा कागझ कोरा ही रह गया..

चांदणे शिंपीत जाशी..
चंद्रिका ही जणू...

यादी संपत नाही.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

भडकमकर मास्तर's picture

20 Jul 2008 - 9:38 pm | भडकमकर मास्तर

मेरे हमसफर मेरे हमसफर,
मेरे पास आ मेरे पास आ...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

अन्या दातार's picture

21 Jul 2008 - 9:56 am | अन्या दातार

रुपकाचे सौंदर्य खरंच काय वर्णावे? त्या तालाने खरंच तबल्यात वेगळीच जान आणली असे वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jul 2008 - 9:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ताल, मात्रा,रुपक, माहितीबद्द्ल आभारी आहे.
हा विषय आमच्या आवाक्याबाहेरचा आहे. पण तरीही अनाडी माणसाला आपण समजून सांगण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल आम्ही आपले सही दिलसे शुक्र गुजार आहोत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
(तात्याचा लेखनाचा पंखा )

नंदन's picture

19 Jul 2008 - 11:42 pm | नंदन

>>> आमच्या गाण्याच्या भाषेत बोलायचं तर लयीची शेवटची तिहाई पडते आणि जीवनगाणं थांबतं!
-- क्या बात है!

ह्या लेखातही अशीच लय साधली गेली आहे, असं वाटत राहतं. पुढील भागांच्या प्रतीक्षेत.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

प्रमोद देव's picture

19 Jul 2008 - 11:44 pm | प्रमोद देव

लयीबद्दलचे विवेचन आवडले. इसीजी तसेच तान्हे मूल आणि आई ह्यांच्यातली हृदयाची भाषा......ही दोन्ही उदाहरणे समर्पक वाटली.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

चित्रा's picture

20 Jul 2008 - 12:21 am | चित्रा

छान विषय, इतके सोपे करून सांगितलेत ते आवडले.

मुक्तसुनीत's picture

20 Jul 2008 - 12:50 am | मुक्तसुनीत

लयतत्वाची सुंदर ओळख ! पुढील भागाच्या प्रतीक्षेत ....

धोंडोपंत's picture

20 Jul 2008 - 7:03 am | धोंडोपंत

तात्या,

लय...... लय भारी .

क्या बात है! मजा आली.

आपला,
(लयकारी) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

डॉ.प्रसाद दाढे's picture

20 Jul 2008 - 7:22 am | डॉ.प्रसाद दाढे

छान लिहिल॑ आहेत तात्या.. रविवार सकाळ एकदम लयीत गेली! मी शाळेत असता॑ना काही वर्षे तबला शिकलो होतो, शाळेच्या कार्यक्रमा॑तून ढोलकीही वाजवित असे.
अवा॑तरः ईसीजी कोणाचा आहे हो? हृदय दोष दिसत आहे म्हणून विचारले

प्रियाली's picture

20 Jul 2008 - 7:30 am | प्रियाली

साध्या सोप्या सरळ शब्दांत लय समजावलीत. आईचं आणि तान्ह्या बाळाचं उदाहरण फारच सुंदर पण ते कसं काय आलं बॉ तुमच्या डोक्यात?

(चकित) प्रियाली

अवांतर: इथे एक गंमत आठवली. आमचं कन्यारत्न तान्हं असताना एका लयीत रडायचं. मोठं झाल्यावर आवाज बदलला पण लय तीच. आता बाईसाहेब रडत नाहीत पण कधीतरी तालासुरात कटकटतात तेव्हा तीच लय ऐकू येते. याबाबत मी तिला काही जुनी रेकॉर्डींग्ज मध्यंतरी दाखवली होती आणि तिलाही ते पटलं आणि मजा वाटली. ज्यांची मुलं लहान आहेत त्यांनी हे निरिक्षण डोक्यात ठेवायला हरकत नाही. :)

ऋषिकेश's picture

20 Jul 2008 - 3:13 pm | ऋषिकेश

वा तात्या! मस्त.. असेच धडे इतक्या सोप्या उदाहरणाने दिलेत तर गाण्याचा आनंद नक्कीच वेगळ्याप्रकारे घेता येईल :)
अनेक आभार

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

यशोधरा's picture

20 Jul 2008 - 9:00 pm | यशोधरा

तात्या, लयबद्ध लेख आवडला. सगळ्यात आवडले ते आई अन् तान्ह्या बाळाचे दिलेले उदाहरण. अगदी चपखल उदाहरण दिलेत.

शितल's picture

21 Jul 2008 - 7:48 am | शितल

तात्या,
गाण्यातील लय खुप छान समजेल असे उदाहरणा सहित सा॑गितलीत.
तुमच्याकडुन गाण्यातील बारकावे शिकायला मिळतील.

पक्या's picture

21 Jul 2008 - 2:00 pm | पक्या

तात्या , मनापासून धन्यवाद. खूप छान समजावून सांगितलतं. हा विषय खूप मोठा आहे (प्रश्न लहान दिसत असला तरी).
माझ्या अवाक्या बाहेरचा आहे . अगदी १००% समजलं नाही तरी बरच कळलं. तरी थोडा गोंधळ आहेच.
संजय अभ्यंकर म्हणतात -
लय म्हणजे एका विशिष्ट वेगाने होणारी स्पंदने वा ठोके (उदा. आगगाडी विशिष्ट वेगाने धावू लागली की एकसाचा आवाज येतो तद्वत किंवा लब ढब लब ढब इ.).
ताल म्हणजे विविध ध्वनींच्या शृंखलेची पुनरावृत्ती. उदा. तात्यांनी सांगितल्याप्रमाणे लब ढब / लब ढब.
इथे मला ह्या दोन्ही वाक्यांचे अर्थ सारखेच वाटत आहे. त्यामुळे लय आणि ताल यातील फरक कळण्यात जरा गोंधळ होत आहे.
आता फक्त एक सांगाल का - लय म्हणजे इंग्रजी मध्ये रिदम असेल तर ताल म्हणजे काय? ह्या उत्तराने कदाचित हा गोंधळ कमी होईल.
बाकी गाणं समजावण्याच्या आपल्या ह्या उपक्रमाने गाण्याचा आनंद नक्कीच घेता येईल ह्यात शंका नाही. आपल्याला पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद.

विसोबा खेचर's picture

21 Jul 2008 - 2:18 pm | विसोबा खेचर

आता फक्त एक सांगाल का - लय म्हणजे इंग्रजी मध्ये रिदम असेल तर ताल म्हणजे काय? ह्या उत्तराने कदाचित हा गोंधळ कमी होईल.

लय म्हणजे इंग्रजीत 'टेंपो' आणि तालाला इंग्रजीत काय म्हंणतात ते मला माहीत नाही. तालाला जर रिदम म्हणत असतील तर ठेक्याला काय म्हणतात हेही मला माहीत नाही!

लय ही प्रत्येकच संगीतात असते परंतु ताल आणि ठेका हे प्रकार पाश्चिमात्य संगीतात किती समृद्ध आहेत हे मला माहिती नाही! आपलं संगीत हे विविध तालांनी आणि त्यांच्या ठेक्यांनी नटलेलं आहे, समृद्ध आहे, श्रीमंत आहे. पाश्चिमात्य तालशास्त्राबद्दल मला कल्पना नाही!

आपल्या संगीताबद्दल बोलायचं झालं तर एक 'त्रिताल' समजून घ्यायला संबंध जन्म पुरत नाही इतकं आपलं तालशास्त्र समृद्ध आहे, अफाट आहे, अमर्याद आहे! तबल्यातील एकेक बंदिश म्हणजे अक्षरश: काव्य आहेत! आमच्या मुनीरखासाहेबांनी, थिरखवाखासाहेबांनी, आमिरहुसेनखासहेबांनी, अनोखेलालनी, आब्बाजी अल्लारखासाहेबांनी आपला तबला खूप समृद्ध केला आहे!

आपला,
(तबलजी) तात्या.

धनंजय's picture

22 Jul 2008 - 12:48 am | धनंजय

लय म्हणजे टेंपो.

मात्रा = बीट
ठेका = पल्स - जे प्रत्येक तालचक्रात पुन्हा एकदा येऊन 'चक्र' बनवते.
ताल (म्हणजे केहरवा, तीनताल वगैरे, अशी यादी) = मीटर (किंवा विशिष्ट वापरात "टाईम"; उदा : ४/४ टाईम)
ताल = रिदम (अधिक विशाल अर्थ)

अभिजात पाश्चिमात्य संगितातले बहुतेक मीटर त्या मानाने सोपे असतात. एका तालचक्राचे २-२ किंवा ३-३ भाग करता आले पाहिजेत. (किंवा आधी २ खंड, मग प्रत्येक खंडाचे ३ भाग; किंवा आधी ३ खंड, मग प्रत्येक खंडाचे २ किंवा ४ भाग.) त्यामुळे सामान्यपणे वेगवेगळ्या तालचक्रात मात्रांची पर्यायी संख्या अशी असते :
२, ३, ४, ६, ९, १२ (८ किंवा १६ मात्रा असल्या तर ४ मात्रांचीच दुप्पट किंवा चौपट लय आहे, असे मानले जाते. कित्येकदा ९ मात्रा असल्या तर ३ मात्रांचीच तिप्पट लय आहे असे मानले जाते.) काही ठिकाणी लोकसंगीतात ७ किंवा १० मात्रांचे ताल आहेत, त्यांच्या स्फूर्तीने क्वचित तसे संगीत लिहिले गेले आहे.

(आता 'फ्लामेन्को'ला लोकसंगीत म्हणावे की शास्त्रीय, ते माहीत नाही - पण त्यातले ताल गुंतागुंतीचे असतात.)

विसोबा खेचर's picture

22 Jul 2008 - 1:01 am | विसोबा खेचर

ठेका = पल्स - जे प्रत्येक तालचक्रात पुन्हा एकदा येऊन 'चक्र' बनवते.

पण याला तर सम म्हणतात. ठेका वेगळा! मग इंग्रजीत सम कशाला म्हणतात?

एका तालचक्राचे २-२ किंवा ३-३ भाग करता आले पाहिजेत.

पण त्या संगीतात मुळात ताल किती?

किंवा आधी २ खंड, मग प्रत्येक खंडाचे ३ भाग; किंवा आधी ३ खंड, मग प्रत्येक खंडाचे २ किंवा ४ भाग.)

हा ताल नव्हे! हे केवळ गणित झालं! तशी अनेक गणितं करता येतील! मुद्दा आहे तो मूळ तालाचा! पश्चिमात्य संगीतात असे मूळ ताल किती आहेत?

२, ३, ४, ६, ९, १२ (८ किंवा १६ मात्रा असल्या तर ४ मात्रांचीच दुप्पट किंवा चौपट लय आहे, असे मानले जाते.

हे पुन्हा गणित झालं! त्याकरता तबल्याची आवश्यकता नाही. ते साध्या डफावर देखील करता येईल! आपण म्हणता त्यात मात्रांच्या अक्षरांचं सौंदर्य आहे का? असल्यास कुठे? मुळात पाश्चिमात्य संगीतात तालाची मुळक्षरं किती? बेसिक कायदे कोणते? पेशकार, गती, रेल्यांचं काय?

काही ठिकाणी लोकसंगीतात ७ किंवा १० मात्रांचे ताल आहेत, त्यांच्या स्फूर्तीने क्वचित तसे संगीत लिहिले गेले आहे.

परंतु त्याला रुपकाचं किंवा झपतालाचं वजन आहे का? त्यातील लयीला त्या वजनाची खालीभरी आहे का?

(आता 'फ्लामेन्को'ला लोकसंगीत म्हणावे की शास्त्रीय, ते माहीत नाही - पण त्यातले ताल गुंतागुंतीचे असतात.)

कृपया दुव द्या, ऐकायला आवडेल!

तात्या.

विसोबा खेचर's picture

22 Jul 2008 - 1:27 am | विसोबा खेचर

आता ताल आणि ठेका यातला फरक एका साध्या उदाहरणावरून पाहू...

दैवजात दु:खे भरता -

ताल केरवा,
परंतु ठेका - धा तीं ता डा ता तीं धा डा!

माना मानव वा परमेश्वर मी स्वामी पतितांचा -

ताल केरवा -
परंतु ठेका - धीं त्रक धी ना कत् त्रक धी ना

म्हणूनच मी वर असं म्हटलं आहे की ताल जरी एकच असला तरी तो विविध ठेक्यांनी नटलेला असतो!

आता इंद्रायणी काठीला भजनी ठेका लावतात, तर राधाधर मधुमिलिंदला धुमाळी लावतात!

असो, आमची धुमाळी बाकी फारच वेड लावणरी हो! काय जाते मस्त! :)

पाश्चिमात्य संगीतात धुमाळी आहे काय? :)

बरं धन्याशेठ, मला एक सांगा, रुपकात ७ मात्रा असतात आणि झुमर्‍यात १४ मात्रा असतात. मग तुम्ही गणिती पद्धतीने रुपकच दोनदा वाजवून त्याला झुमरा म्हणणार काय? हमीरातलं चमेली फुली चंपा रुपकात गाता येईल का ते मला सांगा पाहू! :)

तात्या.

सम, खाली, आणि टाळ्यांचे गणित कुठे जमते आहे... असे काही म्हणायचे आहे ना? खंडही योग्य नाहीत.

या पूर्ण तालसागरात एक सम घट्ट धरून ठेवता-ठेवता मला नाकी नऊ येतात - बाकी मला फारसे कळत नाही.

काही नेमके विचारायचे असल्यास चर्मवाद्य वाजवणार्‍या मित्रांना विचारून सांगेन - पण प्रश्न विचारायलाही तांत्रिक शब्दांचे अनुवाद जमतीलच असे काही सांगता येत नाही. कारण हिंदुस्तानी संगीतातले तांत्रिक शब्द तुमच्या येथील शिकवणीतच शिकत आहे.

धनंजय's picture

22 Jul 2008 - 1:58 am | धनंजय

"सम"ला "ऍक्सेंट" म्हणतात. (किंवा नैसर्गिक ऍक्सेंट - चमत्कृतीसाठी एखादा गाणारा प्रत्येक समेवर जोर देईल किंवा देणार नाही - पण नैसर्गिकरीत्या समेवर बलस्थान असते.)
"पल्स" म्हणजे चक्राकार जाणारे सर्व काही.

> त्याकरता तबल्याची आवश्यकता नाही.
बरोबर. बहुतेक (९९% - उगीच कुठलातरी आकडा सांगतो आहे) वेळा पाश्चिमात्य अभिजात संगीतात तबला (पाश्चिमात्त्य संगीतात अनेक डफांचा सेट - प्रत्येक डफ एक किंवा दोनच बोल देतो) नसतो.

२-५ वाद्ये एकत्र वाजवतात तेव्हा त्यांच्यापैकी साधारणपणे एकही चर्मवाद्य नसते. सम (आणि टाळ्या असलेल्या मात्रांचे बल) तेवढेच सुरावर बल देऊन सांगितले जाते.

फ्लॅमेन्कोबद्दल दुवे मित्रांना विचारून देतो.

पक्या's picture

22 Jul 2008 - 1:15 pm | पक्या

तात्या आणि धनंजय,
ताल , लय ,ठेका ...वगैरेंच्या विवेचनाबद्द्ल आणि माहीती बद्द्ल धन्यवाद. आता बरचसं समजून घेण्याच्या प्रयत्नात आहे.

डॉ.प्रसाद दाढे's picture

28 Jul 2008 - 10:14 am | डॉ.प्रसाद दाढे

इथे एक किस्सा आठविला. एकदा एका मैफिलीत वेड लावणारा त्रिताल तीन तास वाजवून अहमदजान तिरखवा॑साहेब उठले. श्रोत्या॑नी वाहवाचा आणि टाळ्या॑चा अगदी गजर केला. एक रसिक खानसाहेबा॑ना म्हणाले, 'आज तो आपने कमाल कर दिया, ऐसा तीनताल शायदही कभी सुना होगा..' खानसाहेब नम्रतेने म्हणाले, 'अमा अभी अभी तो तीतालेका अ॑दाज आ रहा है॑, अभी बहोत सीखना बाकी है॑..'

चतुरंग's picture

22 Jul 2008 - 12:13 am | चतुरंग

खूप दिवसांनी तुमचे संगीताबद्दलचे लिखाण वाचायला मिळाले.
अतिशय सुरेख लेख. नेटके विवेचन अन चपखल उदाहरणे!
विषय सहजतेने समजावून सांगण्याची तुमची हातोटी लाजवाब आहे.
ईसीजी घेऊन समजावणे मानले!

आई-बाळाचे उदाहरण तर इतके अचूक आहे की त्यावर केला गेलेला एक प्रयोग वाचनात आला होता, तो असा - रडणार्‍या अतिशय लहान बालकांना आईच्या हृदयाची रेकॉर्ड केलेली धडकन जरी ऐकवली तरी ती एकाएकी रडायची थांबतात आणि आवाज कुठून येतो आहे ह्याचा वेध घेऊ लागतात. इतका तो आवाज आपल्या मेंदूत ठसलेला असतो!

(अवांतर - ९ वीत असताना तबला शिकलो. एकच वर्षात माझे गुरुजी दुर्दैवाने गेले आणि तबला सुटला तो आजतागायत. त्याची फार मोठी खंत मनाला आहे. पुन्हा संधी मिळाली तर शिकावे असे वाटत रहाते! तुमच्या लेखाने त्या आठवणी जाग्या झाल्या!)

चतुरंग

विसोबा खेचर's picture

22 Jul 2008 - 12:35 am | विसोबा खेचर

त्याची फार मोठी खंत मनाला आहे. पुन्हा संधी मिळाली तर शिकावे असे वाटत रहाते!

अशी संधी तुला अवश्य मिळो रे रंगा...

अवांतर -

९ वीत असताना तबला शिकलो. एकच वर्षात माझे गुरुजी दुर्दैवाने गेले आणि तबला सुटला

पुण्यात एक वाडीकर बुवा म्हणून होते, खूप छान गायचे, परंतु फारसे प्रसिद्धीस आले नाहीत. पण माणूस मोठा गप्पीष्ट अन् मजेशीर! पुलं, वसंतराव, भीमण्णा, ही मंडळी बुवांकडे बर्‍याचदा बैठक टाकून असत. गांण्याची बैठक तर व्हायचीच, शिवाय वाडीकरबुवा काही काही सरस कोट्या/किस्से सांगून करून हमखास सगळ्यांना हसवायचे! :)

का माहीत नाही, परंतु पुण्यातल्याच विनायकबुवा पटवर्धनबुवांवर वाडीकरबुवांचा लटका राग. त्यांना नाही आवडायचा विनायकबुवांचा तापट स्वभाव आणि त्यांचं गाणंदेखील!

एकदा गप्पांच्या ओघात वसंतराव सहजच वाडीकरबुवांना म्हणाले,

"काय करणार बुवा? सध्या कोणाकडेच शिकत नाहीये! काय नशीब आहे माझं, मी ज्यांच्याकडे म्हणून शिकायला गेलो ती सगळी मंडळी अल्पायुषी ठरली. मला फारशी लाभलीच नाहीत! मी शिकायला सुरवात केली आणि अल्पावधीतच ती गेली त्यामुळे माझं खूप काही शिकायचं राहून गेलं!"

हे ऐकल्यावर वाडीकरबुवांमधला मिश्किलपणा जागा झाला आणि ते पटकन वसंतरावांना म्हणाले,

"बुवा, कुणी शिकवायला नाही म्हणता? एक काम करा, वाटल्यास मी तुमची सहा महिन्यांची फी भरतो, पण तुम्ही आजपासूनच विनायकबुवांकडे गाणं शिकायला जा!"

हे ऐकल्यावर वाडीकरबुवा, पुलं, भीमसेन आणि वसंतराव यांच्यात एकच हशा पिकला! :)

अवांतर - ही हकिगत मला स्वत: अण्णांनी सांगितली आहे. अण्णा मुडात असले म्हणजे खूप काही किस्से सांगतात! :)

असो, तेव्हा रंगराव, मिपाचा कुठला हितशत्रू तबला शिकवतो हे सध्या शोधतो आहे. पत्ता लागला की लगेच तुला त्याच्याकडे तबला शिकवायला धाडीन! :)

आपला,
तात्या वाडीकर.

नंदन's picture

22 Jul 2008 - 1:19 am | नंदन

>> ईसीजी घेऊन समजावणे मानले!
-- आता लेख आणि प्रतिक्रिया पुन्हा वाचत असताना ह्या ईसीजीच्या उदाहरणावरून ही ओळ आठवली.

वक्षी तुझ्या परी हे, केव्हा स्थिरेल डोके?
देईल शांतवाया हृत्स्पंद मंद झोके

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

डॉ.प्रसाद दाढे's picture

28 Jul 2008 - 10:16 am | डॉ.प्रसाद दाढे

कोण वाघधरे मास्तर काय? (ह.घ्या)

प्राजु's picture

22 Jul 2008 - 12:19 am | प्राजु

(अवांतर - ९ वीत असताना तबला शिकलो. एकच वर्षात माझे गुरुजी दुर्दैवाने गेले आणि तबला सुटला तो आजतागायत. त्याची फार मोठी खंत मनाला आहे. पुन्हा संधी मिळाली तर शिकावे असे वाटत रहाते! )

अहो दया करो हो... प्लिज!! (ह्.घ्या..... :) )

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चतुरंग's picture

22 Jul 2008 - 12:29 am | चतुरंग

(आम्ही काय त्या कंदिलवाल्या आंबोळीसारखे वाटलो की काय? 'लावला कंदिल की बत्ती गुल' तसे 'लागला शिकायला तबला की गुरुजी गुल'!)
नाही हो, आम्ही एवढे वाईट नक्कीच नाही! आपल्या ओळखीचे आहेत का कोणी तबल्याचे गुरुजी? :O

चतुरंग

बेसनलाडू's picture

22 Jul 2008 - 2:07 am | बेसनलाडू

समर्पक उदाहरणांसहितचे विवेचन आवडले.
(वाचक)बेसनलाडू

घाटावरचे भट's picture

28 Jul 2008 - 9:25 am | घाटावरचे भट

उत्तम विवेचन तात्या...मिपा वर भटकताना हा लेख सापडला, आवडला...
ज्या गोष्टीची आवड असेल त्याबद्दल वाचायला मिळालं की छान वाटतं.

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
रितु आयी सावन की,
रिमक झिमक झिम झिम बून्दनियां बरसे ॥