क्रिकेट आणि स्टॅटिस्टिक्स - ४: सचिनचा स्वार्थीपणा आणि तत्सम श्रद्धा

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in क्रिडा जगत
30 Mar 2011 - 9:32 am

क्रिकेट आणि स्टॅटिस्टिक्स - ४: सचिनचा स्वार्थीपणा आणि तत्सम श्रद्धा

सचिन तेंडुलकर. नाव घेतलं की एक असामान्य व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभं राहातं. गेली वीस वर्षं, प्रत्येक वेळी मैदानावर पाऊल टाकताना, शंभर कोटींच्या आशा, अपेक्षांची धुरा खांद्यावर वहाणारं. आदर्श फलंदाजी म्हणजे काय याचा नमुना म्हणजे सचिन तेंडुलकर. क्रिकेटच्या पिचवरचं सळसळतं चैतन्य. तंत्रशुद्धता आहे, पण बॉयकॉटसारखा कंटाळवाणा खेळ नाही, चौफेर फटकेबाजी आहे पण युसुफ पठाणसारखा धर की हाण असा एकांगीपणा नाही. बुद्धी आणि शक्ती, लालित्य आणि निर्घृणपणा यांचं अचूक मिश्रण. सचिनविषयी मी कोण लिहिणार - खुद्द ब्रॅडमनला सचिनमध्ये आपलं रूप दिसलं. युगात एकदाच येणारा खेळाडू.

सचिनच्या या कर्तृत्वामुळे अर्थातच जवळपास सर्व क्रिकेट खेळणाऱ्या, पहाणाऱ्या विश्वात त्याचे चहाते आहेत. बुकीदेखील तो खेळत असताना आपली बुकं बाजूला ठेवून त्याचा खेळ बघत बसतात. त्याच्या विरुद्ध खेळणाऱ्या टीमचे समर्थकही त्याची सेंचुरी होण्याची वाट बघतात. अशा चहात्यांमध्ये अर्थातच सचिनचा खेळ आवडणारे काही असतात, तर काही त्याला देव मानणारे असतात. सचिनविरुद्ध एक अक्षरही बोललेलं त्यांना खपत नाही. याउलट सचिनला दिलेलं हे देवपण न आवडणारेही काही असतात. सचिन चांगला खेळाडू आहे हे मान्य करतील. पण शेवटी तो माणूसच आहे असं ते सांगतात. तेही चुकीचं नाही. पण काहींना सचिनला मिळणाऱ्या या वलयालाच आक्षेप असतो. का कोण जाणे पण 'सचिन चांगली बॅटिंग करतो पण तो केवळ आपल्या रेकॉर्ड्सच्या मागे असतो' 'संघाचं हित कशात आहे याचा विचार करण्यापेक्षा आपल्या रन्स सर्वाधिक कशा होतील हेच पहातो' असं म्हणणारेही अनेक असतात. यात अर्थातच 'सचिनमुळे टीमचा फायदा होतो तितकाच तोटाही होतो' हे अध्याहृत असतं. सचिनला देव म्हणणं हे भक्तिपोटी होतं. त्याला स्वार्थी म्हणणं कशापोटी होतं? त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे सत्य या दोन टोकांमध्ये नक्की कुठे आहे? सचिन स्वार्थी आहे की नाही हे कसं सिद्ध करणार?

सर्वसामान्य माणसाप्रमाणे क्रिकेट बघणाराच्याही अनेक क्रिकेटविषयक श्रद्धा असतात. 'राव, सचिनने सेंचुरी मारली भारत हारतोच' असा विश्वास व्यक्त केलेला दिसून येतो. नुकताच सुधीर काळे यांनी एक लेख लिहून (मिसळपाववरील लेख, उपक्रमवरील लेख) या दाव्यातला फोलपणा सिद्ध केला. थोडक्यात सचिनने केलेल्या सेंचुरींपैकी ३३ वेळा भारत जिंकलेला आहे व १३ वेळा भारत हरलेला आहे. (निकाली सामन्यांत) सचिनने सेंचुरी केल्यावर सुमारे ७२% वेळा भारत जिंकलेला असतानाही असा समज का रहातो? कुणीतरी म्हटलं होतं की विदा नसतानाही एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणं याला श्रद्धा म्हणावी, व विरुद्ध विदा असतानाही एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणं याला अंधश्रद्धा म्हणावी. या व्याख्येनुसार ही अंधश्रद्धा म्हणायला हरकत नाही.

काळेंच्या लेखामध्ये श्रद्धेचा एक छोटा भाग खोडून काढलेला आहे. पण सचिन स्वार्थी आहे ही श्रद्धा कशी खोडून काढायची? पण कधीकधी यापेक्षाही व्यापक श्रद्धा असतात. आपण 'सचिन संघापेक्षा स्वतःची रेकॉर्डस बनवायला अधिक प्राधान्य देतो' हा एक वर्किंग हायपोथिसिस घेऊ. तो सिद्ध करणं हे खरं तर तो हायपोथिसिस मांडणाऱ्याची जबाबदारी असते. म्हणूनच शशिकांत ओकांच्या 'तुम्ही प्रत्यय घेऊन बघा, नाहीतर या शास्त्रात खोट काढून दाखवा' या आवाहनाला 'तुम्हीच ते शास्त्र सत्य आहे हे सिद्ध करून दाखवा' असं म्हणावं लागतं. पण या बाबतीत आपण हा हायपोथिसिस असिद्ध करण्याची संख्याशास्त्रीय पद्धत पाहूया.

'क्ष बाबतीत विशेष काहीतरी आहे' असा हायपोथिसिस सिद्ध करायचा असेल तर 'क्ष मध्ये विशेष काही नाही' (किंवा क्ष हा इतर सर्वसामान्य पदार्थांसारखाच आहे) हे असिद्ध करावं लागतं. 'विशेष काही नाही' या हायपोथिसिसला नल हायपोथिसिस म्हणतात. समजा 'क्ष पदार्थात लोखंडाला आकर्षित करण्याचा गुणधर्म आहे' असा हायपोथिसिस आहे. हे सिद्ध करण्यासाठी क्ष पदार्थ व चुंबकीय गुणधर्म नसलेला पदार्थ (इतर सर्वसाधारण पदार्थ) यांची वागणूक वेगळी आहे हे दाखवावं लागतं. क्ष शेजारी ठेवलेलं बॉलबेअरिंग हे क्षच्या दिशेने येतं. इतर वस्तूंशेजारी ठेवलेलं बॉलबेअरिंग त्यांच्याकडे खेचलं जात नाही. दुर्दैवाने जग इतकं सोपं नसतं. कधी कधी वस्तुंशेजारी ठेवलेलं बॉलबेअरिंग काही इतर कारणाने (जमीन थोडीशी कलती असल्यामुळे) त्या दिशेने घसरेलही. कधीकधी क्ष च्या विरुद्ध उतार असल्याने बॉलबेअरिंग तिथेच राहू शकेल. त्यामुळे 'सर्वसाधारणपणे' 'बहुतेक वेळा' 'सरासरी' अशी मापनं वापरावी लागतात. म्हणजे अनेक वेळा प्रयोग केल्यावर क्ष कडे जाणारी बॉलबेअरिंगची संख्या, त्यांचा वेग इ. गोष्टी या इतर वस्तूंशेजारी ठेवलेल्या बॉलबेअरिंग्सच्या संख्या व वेग यापेक्षा अधिक प्रमाणात आहे हे दाखवावं लागतं. या सरासरी जर विशेष वेगळ्या नसल्या तर क्ष मध्ये चुंबकीय गुणधर्म आहे हे सिद्ध करता येत नाही. कारण क्ष मध्ये विशेष काही तसा गुणधर्म नाही हा नल हायपोथिसिस खोडून काढला जात नाही.

सचिनच्या बाबतीतही हीच पद्धत वापरता येईल. 'सचिन स्वार्थी आहे' किंवा 'संघ जिंको अथवा हरो सचिन सेंचुरीच्या मागे असतो' हे खोडून काढण्यासाठी ते सिद्ध करण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी सचिनच्या सेंचुऱ्या व त्यातून उद्भवणारी संघाची हार वा जीत ही इतर सेंचुऱ्या करणाऱ्या बॅट्समनप्रमाणेच आहे हे असिद्ध करावं लागेल. ते कसं करणार? त्यासाठी सचिन सोडून इतर बॅट्समनच्या सेंचुऱ्या तपासून बघायच्या. त्यापैकी हार व जीतीचं प्रमाण तपासून बघायचं. ते विशेष वेगळं असेल तर काही निष्कर्ष काढता येतो. नसल्यास तो स्वार्थी आहे हे सिद्ध करता येत नाही.

...................सचिनच्या सेंचुऱ्या.............इतरांच्या सेंचुऱ्या
जीत.................३३.....................................८०७
हार..................१३.....................................२६३
एकूण................४६....................................१०७०
जीत-टक्केवारी...७१.७%..................................७५.४%
हार-टक्केवारी....२८.३%..................................२४.६%

आता कोणी म्हणेल की २८.३ हे २४.६ पेक्षा निश्चितच मोठे आहेत. बरोबर. पण प्रश्न असा आहे की ते पुरेसे मोठे आहेत का? त्यांमधला फरक हा विशेष फरक आहे का? त्यासाठी काही उत्तम टेस्ट्स असतात. पण इतकं तांत्रिक विश्लेषण इथे करण्याची इच्छा नाही. समजा दोन नाणी दहावेळा उडवली - एकाला पाच वेळा छापा आला व दुसऱ्याला चारच वेळा आला तर त्या दोन नाण्यांना खूप वेगळं म्हणाल का? अर्थातच नाही. कारण एक वेळा नाणं वेगळं पडलं इतकंच. इथे आपण टाय झालेल्या इंग्लंडच्या मॅचचं उदाहरण घेऊ. त्या मॅचमध्ये केवळ एका रनने हार किंवा जीत ठरली असती. त्या एका कमी किंवा जास्त रनने ही आकडेवारी १४ व ३३ किंवा १३ व ३४ अशी होऊ शकली असती. म्हणजे २८.३% ऐवजी २७.७% किंवा २९.७%. एका सामन्यातल्या एका रनने जर २ पर्सेंटेज पॉइंटचा फरक पडत असेल तर इथे दिसणारा ३.७ पर्सेंटेज पॉइंटचा फरक नगण्य आहे असं सहज सिद्ध करता यावं.

या आकडेवारीवरून दिसून येतं की सचिनने सेंचुरी करणं व भारताची हारजीत हे इतर कुणाही बॅट्समनने सेंचुरी करणं व त्या संघाची हारजीत यापेक्षा वेगळं नाही. (सचिन व इतर बॅट्समन्सचा दर्जा सारखाच आहे असा चुकीचा अर्थ काढू नये) याचाच अर्थ सचिन स्वार्थीपणे खेळतो हे सिद्ध करता येत नाही. बाजूने विदा नसल्याने हा हायपोथिसिस म्हणजे एक विश्वास, एक श्रद्धा रहाते. ज्यांना तशी श्रद्धा बाळगायची असेल तशी खुशाल बाळगावी.

क्रिकेट

प्रतिक्रिया

अजून थोडेसे पृथ्थकरण आवश्यक वाटते.
सचिन एकूण केलेल्या शतकांपैकी किती शतके हि धावा पार करताना वा दुस-यांदा बॅटिंग करताना केलेलि आहेत?
हा ही विदा पाहणे आवश्यक ठरेल.
प्रथम फलंदाजी करताना शतक ठोकणे व धावा पार करताना शतक करणे ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या दर्जाच्या असतात असे मानले तर सचिनच्या टिकाकारांचा हाच मुद्दा असतो कि धावांचे लक्ष्य पार करताना फार क्वचित वेळा सचिनने उत्तम धावा केलेल्या आहेत.
त्यातूनच सचिन स्वार्थि वा फक्त विक्रम बनवण्यासाठी खेळतो असा समज पसरतो.

अभिज्ञ.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

31 Mar 2011 - 9:27 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

काल सचिनचं शतक न झाल्यामुळे हा धागा वाईड बॉल समजावा का?

राजेश घासकडवी's picture

31 Mar 2011 - 9:28 pm | राजेश घासकडवी

......................................इतर बॅट्समन.....सचिन तेंडुलकर
प्रथम बॅटिंग व सेंचुरी करून हरले............१९५.............१०
प्रथम बॅटिंग व सेंचुरी करून जिंकले..........४९९.............१९

पाठलाग करताना सेंचुरी करून हरले.........७८...............३
पाठलाग करताना सेंचुरी करून जिंकले.....३०९..............१४

यावरून दिसून येतं की कुठच्याच आक्षेपांमध्ये दम नाही. कुठलीही गुणोत्तरं बघितली तरी ती 'विशेष वेगळी' नाहीत.

दुसऱ्यांदा बॅटिंग करताना इतरांच्या ३८७ सेंचुऱ्या झालेल्या दिसतात. प्रथम बॅटिंग करताना इतरांच्या ६९४ सेंचुऱ्या आहेत. एकंदरीतच पाठलाग करताना सेंचुऱ्या कमीच होतात असं दिसून येतं. ५५.७%. सचिनच्या बाबतीत हेच प्रमाण ५८.६% आहे. असं असतानाही असे गैरसमज करून घेणं होतंच. भलतेसलते आरोप करणाऱ्यांवर साधी आकडेमोड करण्याची सक्ती केली पाहिजे.

आता आक्षेप घेणारे याहीपुढे पृथक्करण करून 'हां, पण सचिन फक्त दुर्बळ टीम्सबरोबर मोठ्ठे स्कोअर करतो. त्याचंही पृथक्करण करून दाखवा' वगैरे म्हणू शकतील. पण त्यांचे गैरसमज दूर करण्यासाठी आपण किती कष्ट करावे? असले हायपोथिसिस सिद्ध करण्याची जबाबदारी मांडणाऱ्यावर असते.

पैसा's picture

31 Mar 2011 - 7:56 pm | पैसा

क्रिकेटमधे एक गोष्ट निश्चित आहे, की सगळंच अनिश्चित आहे!

वेताळ's picture

31 Mar 2011 - 8:15 pm | वेताळ

गणिती प्रमेय वापरुन मांडणी खुप व्यवस्थित केली आहे.मानल बुवा तुम्हाला.