हुतात्मा भगतसिंह आणि भयभीत इंग्रज सरकार

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
23 Mar 2011 - 1:26 am

दिनांक २३ मार्च १९३१ रोजी हुतात्मा भगतसिंह, हुतात्मा राजगुरू आणि हुतात्मा सुखदेव यांनी लाहोर मध्यवर्ती कारागृहाच्या वधस्तंभावर तेजस्वी हौतात्म्य पत्करले. आज त्या हौतात्म्याचा ८० वा स्मरणदिन.

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा होम करणारे असंख्य क्रांतिकारक होऊन गेले. त्यांनी आपल्या ध्येयास्तव स्वत:ला वाहुन घेतले आणि ते हसत हसत फासावर चढले. या सर्व देशभक्त हुतात्म्यांचे शिरोमणी म्हणजे हुतात्मा भगतसिंह. तिसऱ्या दशकाच्या उत्तरार्धात ’भगतसिंह’ हे नांव हिंदुस्थानात सर्वतोमुखी झाले, हा तरूण हिंदुस्थानियांच्या गळ्यातील ताईत झाला आणि अखेर या ’भगतसिंह’ नावाच्या हिंदुस्थानात चेतना जागृत करणाऱ्या झंझावातास नष्ट करणे इंग्रजी सत्तेस आत्त्यंतिक महत्वाचे ठरले. एकदा का सत्तेने एखादा निर्णय घेतला की त्याला परिणाम स्वरूप देणे महसत्तेला अवघड नसते. मग तिथे साक्षी, पुरावे, न्यायसन, न्यायमुल्ये हे सर्व गौण ठरते. अर्थातच हुतात्मा भगतसिंहाना आता जगु द्यायचे नाहीच कारण ते सत्तेच्या हिताचे नव्हते आणि मग तो निर्णय प्रत्यक्षात आणण्यासाठी इंग्रजी सत्तेने न्यायसंस्था पायदळी तुडवीत हुतात्मा भगतसिंह प्रभृतींना दोषी ठरविले व ताबडतोब फाशीची शिक्षा ठोठावली आणि पारही पाडली.

प्रथम माहिती अहवाल क्रमांक १६४ दिनांक १७.१२.१९२८ - सॉंडर्स व चनानसिंग यांच्या हत्येबद्दल ’साम्राज्य विरुद्ध भगतसिंह व सहकारी’ असा अभियोग उभा केला गेला. हा अभियोग म्हणजे ज्याचा निकाल आधीच स्पष्ट झालेला होता असा एक केवळ न्यायालयीन कार्यवाहीचा देखावा होता. येणकेण प्रकारेणं काहीही झाले तरी भगतसिंहांना जीवंत ठेवायचे नाही हे ठरलेलेच होते. हे दिव्य हुतात्मे आपल्या ध्येयासाठी जगले आणि आपल्या ध्येयासाठी खुशीचे मरण पत्करायला हसत तयार होते. सॉंडर्स हत्येमध्ये हुतात्मा भगतसिंह सहभागी होते हे सर्वांनाच ज्ञात आहे. त्यांना जर जगायची आसक्ती असती वा मृत्युचे भय असते तर ते स्वत: संसदेत बॉब टाकयला गेलेच नसते.

मुळात त्यांना फाशीची शिक्षा झाली याचे त्यांना दु:ख नव्हते मात्र ती शिक्षा देण्यासाठी सरकारला खास तेवढ्यापुरताच परकोटीच्या अधोगतीस जाऊन व न्यायसंस्थेस हरताळ फासुन ती फाशी कपटाने द्यावी लागली कारण जर हा अभियोग कायद्याच्या कसोटीवर टिकला नसता तर कोणत्याही परिस्थितीत सरकारला भगतसिंह प्रभृतींना जीवंत ठेवणे परवडणारे नव्हते.

एकदा निर्णय घेतला गेला म्हणताना पद्धतशीरपणे यंत्रणा उभारली गेली. ज्यांना अत्युच्च अधिकार आहेत असे न्यायपिठ कलम ७२ वर बोट दाखवुन स्थापले गेले. वास्तविक असे अमर्याद अधिकार असलेले पिठ स्थापन करण्यासाठी भारत कायदा १९१९ - कलम ७२ द्वारे असे सर्वेसर्वा अधिकार असलेले पिठ केवळ आत्यंतिक आणीबाणीच्या परिस्थितीत केवळ शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी करता स्थापन करता येते आणि सॉंडर्स वधामुळे तशी परिस्थिती निश्चितच निर्माण झालेली नव्हती. मात्र हवा तो निकाल देण्यासाठी व्हॉईसरॉयने गृहखात्यावर दबाव आणुन कायदा मागच्या दाराने वळवला.

स्वतंत्र्यानंतर, जेव्हा या अभियोगाची कागदपत्रे राष्ट्रिय संग्रहालयात उपलब्ध केली गेली तेव्हा अनेक संशोधकांनी या अभियोगाचा बारकाईने अभ्यास केला व त्यातल्या अनेक फटी उघड्या पडल्या. भगतसिंहांचा प्रत्यक्ष सहभाग म्हणजे त्यानी सॉंडर्स वर गोळ्या झाड्ताना पाहिल्याचे सांगणारे अनेक साक्षीदार न्यायालयात ढेपाळले, अनेक साक्षींमध्ये अनेक विसंगती आढळल्या, बहुतेक युक्तिवादात ’कदाचित’, ’बहुतेक’, ’असावे असे वाटते’, ’तर्कास वाव आहे’ अशी ढोबळ व संमत विधाने वारंवार केली गेली. मुळात माफीचे साक्षीदार या एकखांबी पायावर सर्व अभियोगाचा डोलारा उभा केला गेला. अर्थातच पुराव्याच्या कायद्यानुसार माफीच्या साक्षीदारांचे जबाब हे पुराव्याच्या पुष्ट्यर्थ्य वापरले जावेत, ते जबाब हा संपूर्ण असा ग्राह्य पुरावा धरला जाऊ नये असे आहे. निकालात हुतात्मा भगतसिंह, हुतात्मा राजगुरू व हुतात्मा सुखदेव यांना दोषी ठरवितांना तीन गोष्टींवर भर दिला गेला.

पहिले म्हणजे प्रत्यक्ष घटनेचे साक्षीदार. यात जयगोपाळ व फणिंद्रनाथ वगळता अन्य साक्षीदार ठाम शाबीत झाले नाहीत. तीघांना जबरदस्तीने जबाब द्यायला भाग पाडले गेले जे पुढे त्यांनी न्यायालयासमोर आणले व आपला जबाब अमान्य केला. खुद्द वाहतुक निरिक्षक फर्न आरोपींना ओळखण्यास असमर्थ ठरला. मुहम्म्द इब्राहीम, हवालदार हबिबुल्ला आणि कमाल दिन यांचे जबाबही बीनबुडाचे निघाले, यांच्या जबानीत असे निष्पन्न झाले की हे तथाकथीत प्रत्यक्ष घटना पाहणारे होते तर यांचा जबाब त्वरीत का नोंदला नव्हता? मुळात यांचा नाव पत्ताही पोलिसांनी तेव्हा घेतला नव्हता. मोटार हाक्या अब्दुल्लाने तर त्याच्या जबानीतील विसंगतीतुन असे उघड केले की त्याचा जबाब पोलिसांनी तब्बल चर दिवसांनी घेतला होता, तत्काळ नव्हे. म्हणजेच दोन माफीचे साक्षीदार वगळता अन्य कोणीही साक्षीदार ठाम साक्ष देऊ शकला नाही. सर्वात भयंकर प्रकार म्हणजे संपूर्ण अभियोगाच्या कालावधीत हे माफीचे साक्षीदार पोलिसांच्या ताब्यात होते, त्यांना न्यायालयीन ताबा देण्यात आला नव्हता. म्हणजेच पोलिसांनी त्यांचे जाब जबाब हे साम -दाम-दंड- भेद याचा वापर करून मिळविले. राहीला प्रश्न तो भगतसिंहांच्या कटातील सहभागाचा. ते साक्षीदार फारतर इतके सिद्ध करु शकले की माफीच्या साक्षीदारांनी कट जेव्हा व जिथे रचला गेला तेव्हा भगतसिंह तेथे उपस्थित होते, मात्र त्यांचा कटातला सहभाग निर्विवाद सिद्ध झाला नाही. शिवाय या संबंधात जबान्यांमध्ये तफावती आढळल्या.

दुसरे कलम म्हणजे वधानंतर लाहोर शहरात झळकलेल्या ’सॉंडर्स’ वधाच्या पत्रकांमध्ये असलेले भगतसिंहांचे हस्ताक्षर. मात्र प्रतिशोधाच्या जाहीरनाम्यावर लेखन हा प्रत्यक्ष वधाचा पुरावा ठरुच शकत नाही!

तिसरे कलम म्हणजे न्याय वैद्यक अधिकार्‍यांचा जबाब. त्यांच्या अभ्यासानुसार सॉंडर्स वधाच्या स्थळी सापडलेली रिकामी पुंगळी ही संसदेतील स्फोटानंतर भगतसिंहांच्या अंगावर जे स्वयंचलीत पिस्तुल सापडले त्यात चपखल बसत होती व त्याच पिस्तुलाचा वापर वधासाठी झाला होता. मात्र जर भगतसिंह घटनास्थळीच तात्काळ व पिस्तुलासह पकडले गेले असते तर या विधानाला काही किंमत होती. प्रत्यक्षात हे पिस्तुल वधा नंतर चार महिन्यांनी हस्तगत केले गेले तेव्हा त्याच पिस्तुलाने भगतसिंह यांनी वध केला हे सिद्ध होत नाही.

कलम ७२ अन्वये उभारलेला हा खास न्यायालयाचा तमाशा फक्त सहा महिने कालावधीचा होता आणि या न्यायासनाने दिलेल्या निकाला विरुद्ध वरच्या न्यायालयात दाद मागायचा अधिकार आरोपींना नव्हता. कामकाज आरोपींच्या गैरहजेरीत चालविले गेले. न्यायालयीन कार्यकालात न्या. आगा हैदर यांना निस्पृह असल्याने हटविले व तिथे सोयीच्या न्यायाधीशास घेतले गेले म्हणजे दंडाधिकारी जी शिक्षा ठोठावतील तीला ३ न्यायाधीशांनी अनुमोदन द्यायचे आणि २ विरुद्ध १ अशी फाशी संमत करुन घ्यायची नामुष्की नको असा हा प्रकार. असे न्यायपीठ या आधी वा या नंतर कधीही कार्यान्वयीत केले गेले नाही.

एकुण चित्र अगदी स्पष्ट आहे. ’भगतसिंह’ या नावाचा इंग्रज सरकारने इतका धसका घेतला होता की त्यांना संपविण्याखेरीज इंग्रजांकडे दुसरा उपाय नव्हता आणि जुलुमी इंग्रजांनी सत्तेच्या बळावर खोटा न्याय हिंदुस्थानियांच्या गळी उतरवला. मात्र ज्यांना फाशी झाली त्या हुतात्म्यांना यत्किंचितही खेद नव्हता. त्यांनी त्यांचे कार्य पुरे केले होते. त्यांच्या चितेतुनच क्रांतीचा वणवा पेट्णार होता.

हुतात्मा भगतसिंह, हुतात्मा राजगुरू व हुतात्मा सुखदेव यांच्या ८० व्या हौतात्म्यदिना निमित्त या महान क्रांतिकारकांना सादर वंदन.

इतिहासप्रकटनविचारलेख

प्रतिक्रिया

पंगा's picture

23 Mar 2011 - 4:05 am | पंगा

गोषवारा: भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना साँडर्सहत्येत दोषी ठरवण्यासाठी काडीचाही पुरावा सरकारजवळ नव्हता. तरीही त्यांना तकलादू आणि कोणत्याही नि:स्पृह न्यायालयात टिकू न शकणार्‍या पुराव्याच्या आधारावर दोषी ठरवून फाशी दिले गेले.

ठीक आहे. हे होऊ शकते. कोणतेही सत्तांध आणि अनियंत्रित प्रशासन अगतिक झाले तर असा प्रकार करू शकते, आणि हिंदुस्थानचे तत्कालीन ब्रिटिश सरकार हे सत्तांध, अनियंत्रित आणि अगतिक होते असे मानण्यास जागा आहे. त्यामुळे याबाबत कोणताही संदेह नाही.

पण मग, या तीन प्रभृतींनी साँडर्सची हत्या केली हे सिद्ध करण्याकरिता कोणताही सबळ पुरावा जर उपलब्ध नसेल, तर त्या परिस्थितीत,

सॉंडर्स हत्येमध्ये हुतात्मा भगतसिंह सहभागी होते हे सर्वांनाच ज्ञात आहे.

असे विधान आपण तरी नेमके कशाच्या आधारावर करू शकतो?

साँडर्सचे नेमके काय झाले? साँडर्सची हत्या कोणी केली?

विकास's picture

23 Mar 2011 - 4:27 am | विकास

असे विधान आपण तरी नेमके कशाच्या आधारावर करू शकतो? साँडर्सचे नेमके काय झाले? साँडर्सची हत्या कोणी केली?

आपला मुद्दा (शंका) मान्य आहे. सर्वसाक्षींना काय म्हणायचे आहे ते, तेच नक्की सांगू शकतील.

माझे वाचताना जे (बरोबर-चूक) मत घडले ते असे की: भगतसिंग-राजगुरू-सुखदेव यांनी सँडर्सची हत्या केली हे निश्चित. पण ते सिद्ध करण्यासाठी तत्कालीन न्यायव्यवस्था अपुरी पडून ते जिवंत राहू शकले असते आणि ते ब्रिटीश सरकारला अवघड गेले असते म्हणून त्यांनी वाट्टेलतसा आटापिटा करत (ज्याचे लेखात वर्णन आहे), त्यांची शिक्षा अमलात आणली...

सर्वसाक्षींना अजून एक प्रश्न: भगतसिंगांना वधस्तंभावर फाशी दिले हे सत्य आहे का तसे मानले जाते? वसंत पोतदारांशी या बाबतीत जेंव्हा चर्चा झाली होती तेंव्हा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे (आणि आता आठवते त्या प्रमाणे) तुरूंगात, त्या गावात आणि देशभर जसा प्रक्षोभ वाढायला लागला तसे टेन्शन येऊ लागले आणि अजून काही गडबड नको, म्हणून त्या तिघांना आधीच (आदल्या दिवशी/काही तास आधी वगैरे) गोळ्यांनी मारून रावीतिरी नेऊन अर्धवट दहन केले वगैरे..

पंगा's picture

23 Mar 2011 - 5:05 am | पंगा

भगतसिंग-राजगुरू-सुखदेव यांनी सँडर्सची हत्या केली हे निश्चित. पण ते सिद्ध करण्यासाठी तत्कालीन न्यायव्यवस्था अपुरी पडून ते जिवंत राहू शकले असते आणि ते ब्रिटीश सरकारला अवघड गेले असते म्हणून त्यांनी वाट्टेलतसा आटापिटा करत (ज्याचे लेखात वर्णन आहे), त्यांची शिक्षा अमलात आणली...

सिद्ध करण्यासाठी पुरावा अपुरा असणे किंवा botched-up असणे हे सहज शक्य आहे. माझा मुद्दा एवढाच, की जर हे सिद्ध होऊ शकत नाही, तर 'भगतसिंग-राजगुरू-सुखदेव यांनी सँडर्सची हत्या केली हे निश्चित.' हे पहिले विधान तरी आपण ठामपणे नेमके कशाच्या आधारावर करू शकतो?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

23 Mar 2011 - 4:17 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>>पहिले विधान तरी आपण ठामपणे नेमके कशाच्या आधारावर करू शकतो?
कारण न्यायदेवता आंधळी असते, आपण नाही. म्हणून आपण म्हणू शकतो, न्यायदेवता नाही. तरीही कुणाला तसे म्हणायचे नसेल तर सक्ती नाही. त्यांनी नाही म्हटले तरीही भारतातील आणि जगातील करोडो माणसे म्हणतीलच.

राही's picture

23 Mar 2011 - 4:29 pm | राही

सर्वप्रथम भगतसिंह,राजगुरू आणि सुखदेव या हुतात्म्यांस आदरांजली.
अति अवांतर : मृत्युदंड अंमलात आणण्याच्या अनेक प्रकारांपैकी फाशीं म्हणजे फासामध्ये किंवा फासावर लटकवणे आणि सुळावर चढवणे हे दोन प्रकार अधिक प्रचारात असावेत कारण त्यांचाच जास्तीत जास्त उल्लेख जुन्या साहित्यात दिसतो. यांपैकी सुळासाठी स्तंभाची आवश्यकता असावी आणि फासासाठी नसावी असे वाटते. अर्थात आपण अलंकारिक अर्थाने वधस्तंभ या शब्दाचा वापर करीत असतो हे मान्य.
बळी द्यावयाच्या प्राण्याचा तलवारीने अथवा अन्य धारदार शस्त्राने शिरच्छेद करतानाला त्याला एका बळकट खांबाला बांधून ठेवले जात असे/जाते. त्या खांबाला मेख/मेढ म्हटले जात असे/जाते. अश्वमेध करताना (यज्ञामधे घोड्याचा बळी देताना) किंवा अन्यही मेधप्रसंगी या खांबाची आवश्यकता असे. कुठल्याही शुभकार्यप्रसंगी/दरम्यान बळी देण्याचा प्रघात असल्याने ही मुहूर्तमेढ रोवण्याची प्रथा रूढ झाली असावी आणि मेख/मेढ हा शब्द मेध वरून आला असावा असे श्री. विश्वनाथ खैरे यांनी एका लेखात लिहिले आहे. नक्की संदर्भदुवा देता येत नाही याबद्दल क्षमस्व.

सर्वसाक्षी's picture

23 Mar 2011 - 11:10 pm | सर्वसाक्षी

आपले आकलन अगदी अचूक आहे. मुळात हा अभियोग अशा खास न्यायालयापुढेच चालविणार्‍या सरकारला कदाचित खात्री असावी की साँडर्स चा वध हुतात्मा भगतसिंह व त्यांच्या सहकार्‍यांनीच केला मात्र आरोपींना निर्विवाद दोषी ठरविणे व त्यांचा अपराध १००% संशयातीत असा सिद्ध करणे जर शक्य झाले नाही तरीही साम्राज्याला असणारा सर्वात मोठा शत्रू म्हणजे हुतात्मा भगतसिंह व त्यांचे सहकारी हे कोणत्याही परिस्थितित जिवंत राहु देता कामा नये.

आता हे वध हुतात्मा भगतसिंह प्रभृतिंनीच केले हे कशावरुन?

हुतात्मा भगतसिंहांचे जे सहकारी सरकारच्या हाती लागले नाहीत व जे लाहोर कटात सक्रिय सहभागी होते - उदाहरणार्थ हुतात्मा आजाद, हुतात्मा महावीरसिंहः त्यांच्याकडुन पुढे समग्र हकिगत समजली व प्रसृत झाली. आजादांचे निकटवर्ती व हिंदुस्थान समाजवादी प्रजासत्ताक सेनेचे प्रख्यात नेमबाज श्री. भगवानदास माहोर यांनी आपल्या पुस्तकात या संबंधी तपशिलवार असा रोमहर्षक वृत्तांत दिला आहे. माहोर हे उत्तम नेमबाज, मर्दाचा पोवाडा मर्दानी गावा तसे त्यांनी हुतात्मा राजगुररू यांचे मुक्तकंठाने कौतुक केले. हुतात्मा राजगुरूंनी पहिल्याच गोळीत साँडर्सच्या कानशिलाद्वारे मस्तकाचा वेध घेतला होता इतकेच नाही तर माहोरांकडे लटकी तक्रारही केली की आपण काम पहिल्याच गोळीत फत्ते केले असतानाही भगतसिंहांनी नाह्क आणखी गोळ्या झाडुन वाया घालविल्या. मात्र आपल्या नेमबाजी विषयी ते असे म्हणाले की नेम घेतला होता छातीचा पण बसला कानशिलावर. खरेतर हा त्यांचा विनय, पण पुढे त्यांचे पिस्तुल हातालत असता माहोरांना असे आढळुन आले की काडतुसे व पिस्तुलाची नळी यांचा क्रमांक पूर्णतः जुळत नव्हता, त्यामुळे कदाचित गोळी विचलीत होणे शक्य होते. अशा अनेक हकिकती हुतात्मा भगतसिंहांच्या सहकार्‍यांकडुन पुढे जगासमोर आल्या.

फाशी विषयी ती आदल्या दिवशी दिली हे सत्य आहे. २३ मार्च ला सायंकाळी ५ वाजता हुतात्मा भगतसिंह, हुतात्मा राजगुरू व सुखदेव यांच्या नातेवाईकांची अखेरची भेट मुक्रर केली होती. फाशी २४ ला अमलात येणार होती. मात्र सायंकाळी काही बंद्यांना काहीतरी वेगळेच घडत असल्याची कुणकुण लागली आणि अल्पावधीतच फाशी सगळे नियम धाब्यावर बसवुन त्याच दिवशी म्हणजे २३ ला सायंकाळी फाशी दिली गेली. बरोबर ७.३३ मिनिटांनी त्या तीन हुतात्म्यांचे चेतन देह फाशीच्या तक्त्याखाली लटकले. लाहोरमध्ये जमलेला महसमुदाय व संभव्य प्रक्षोभाची भीती ओळखुन हे केले गेले असावे. रात्री साडे आठ्च्या सुमारास मागील भागातील लोहार कामाच्या जागेनजिक भींतीचा भाग पाडुन हे तीन देह व त्यांना जाळायचे सामान घेऊन दोन मालमोटारींमधून हे देह कैसर ए हिंद पुलावरुन नेत पुढे फिरोजपूर नजीक त्यावर घाईघाईने अंत्यसंस्कार करायचा प्रयत्न केला गेला. श्री. विकास यांनी म्हटल्याप्रमाणे कै. वसंत पोतदारांनी असा उल्लेख त्यांच्या लेखनात केला आहे. मात्र त्यांना फशीच दिले गेले, गोळ्या घालणे कदापी शक्य नव्हते कारण या तिघांनी स्वत्;च असा अर्ज दिला होता की तुम्ही आमच्यावर जर सरकारविरुद्ध युद्ध पुकारल्याचा आरोप ठेवला आहात (कलम १२१, १२१अ, १२१ ब, १२२, १२३ ई) तर आम्ही योद्धे ठरतो तेव्हा आम्हाला योद्ध्याचे मरण हवे आहे आणि त्यासाठी बंदूकधारी पथक पाठविले जावे.

फाशी अर्थातच स्तंभावर दिली जात नाही तर वधस्तंभाचा उल्लेख प्रतिकात्मक आहे.

साक्षी

विकास's picture

23 Mar 2011 - 11:31 pm | विकास

२३ मार्च ला सायंकाळी ५ वाजता हुतात्मा भगतसिंह, हुतात्मा राजगुरू व सुखदेव यांच्या नातेवाईकांची अखेरची भेट मुक्रर केली होती.

राजगुरू-सुखदेव यांच्या संदर्भात माहीत नाही. पण आठवते त्याप्रमाणे, भगतसिंगाच्या आई-वडीलांनी त्याच्या आजी का आजी-आजोबांना पण त्याला शेवटचे भेटायची इच्छा आहे म्हणून परवानगी द्यावी अशी जेलरकडे विनंती केली. ती विनंती फेटाळण्यात आली. म्हणून ते देखील न भेटता माघारी फिरले. त्यावेळेस बाहेर फाशीच्या विरोधात असलेल्या जमावाने, या आई-वडीलांना हताश होऊन परत येताना पाहीले आणि आरडा-ओरड चालू केली. परीणामी आधीच घाबरलेल्या सरकारने लोकक्षोभाच्या भितीने फाशीची तात्काळ कारवाई केली... आणि हो, बरोबर आहे, फाशी दिली गोळ्या नाही झाडल्या...

फक्त यात भगतसिंग नक्की त्याच्या आईवडीलांना शेवटचा कधी भेटला ते आठवत नाही. मात्र त्या शेवटच्या भेटीत तो त्यांना या अर्थी म्हणाला की मी जरी जात असलो तरी माझा भाऊ तुझी काळजी घेईल. तो भाऊ म्हणजे पार्लमेंटमध्ये त्याच्याबरोबर केवळ निषेधासाठी (कुणी मरणार नाही याची काळजी घेत) बॉंबस्फोट करणारा बटूकेश्वर दत्त. दुर्दैवाने बटूकेश्वर दत्त हा भगतसिंगाच्या आईस त्याच्या अंतकाळी हलाकीच्या अवस्थेत भेटला. (मला वाटते त्याने स्वातंत्र्य सैनिकांचे पेन्शनपण घेण्याचे नाकारले कारण त्याच्या दृष्टीने त्याने कर्तव्य केले होते, उपकार अथवा काम नाही...)

दिनांक २३ मार्च १९३१ रोजी हुतात्मा भगतसिंह, हुतात्मा राजगुरू आणि हुतात्मा सुखदेव यांनी लाहोर मध्यवर्ती कारागृहाच्या वधस्तंभावर तेजस्वी हौतात्म्य पत्करले.

या वाक्यात 'वधस्तंभ' असा शब्द वापरलेला आहे असे लक्षात आले. एका वेगळ्या संदर्भात, गांधींचे नथुराम गोडसे यांनी जे काही केले, ती 'हत्या' नसून 'वध' होता, असा एक युक्तिवाद हल्ली मांडला जातो. यामागे, 'हत्या' म्हणजे कोणतीही हत्या, तर 'वध' म्हणजे एखाद्या खलाच्या निर्मूलनाकरिता केलेली हत्या किंवा एका प्रकारचे justifiable (किंवा justified) killing, अशा प्रकारचा अर्थच्छटेचा फरक या दोन शब्दांत असण्याबद्दल दावा करण्यात येतो.

हा दावा खरा असल्यास, भगतसिंहप्रभृतींना फासावर लटकवण्यासाठी जे काही वापरले गेले, त्याकरिता 'वधस्तंभ' अशी शब्दयोजना रोचक वाटते. या अनुषंगाने,

- भगतसिंहप्रभृतींची फाशी हे एक justifiable किंवा justified killing होते, की
- गांधीहत्येच्या बाबतीत 'हत्या' आणि 'वध' या दोन शब्दांच्या अर्थच्छटांच्या फरकाबद्दलचा केला गेलेला दावा हा काहीही करून एका घृणास्पद कृत्याचे ओढूनताणून समर्थन करण्याकरिता केला गेलेला (बहुधा) खोटा दावा होता, की
- वरीलपैकी दोन्ही,

यांपैकी नेमके खरे काय ते कळत नाही.

अतिअवांतर: विनोबा भाव्यांच्या अखेरच्या काही वर्षांत एकदा त्यांनी गायींच्या हत्येवर बंदी आणण्याकरिता उपोषण सुरू केले होते, असे अंधुकसे आठवते. तत्कालीन मराठी वर्तमानपत्रांनी याकरिता 'गोवधबंदी' असा शब्दप्रयोग केल्याचे मात्र चांगलेच आठवते. याचा अर्थ गायीची हत्या किंवा 'वध' हे justifiable किंवा justified killing होते असा घ्यावा किंवा कसे, याबद्दल साशंक आहे. अर्थात पेपरवाले काय मनाला येईल ते छापतात म्हणा, त्यामुळे ते कितपत ग्राह्य धरावे हा प्रश्न आहेच. पण तरीही, 'गोवधबंदी' या शब्दावर गूगलसर्च मारला असता चक्कचक्क 'पाञ्चजन्य'मध्येसुद्धा 'गोवधबंदी' असा शब्द वापरला गेलेला आढळला (या शोधदुव्यावरील चौथी शोधनिष्पत्ती पाहावी. उघडल्यास फाँटची मात्र गोची आहे.), त्यामुळे हा शब्दप्रयोग योग्यच असावा, अशी शंका येते.

नक्की काय ते कळत नाही.

गांधीहत्येबाबत गांधीवध म्हणणारे (विशेष करून मराठी) कदाचीत "दुष्टांचा नाश" म्हणजे वध अशा अर्थाने म्हणत असतीलही. मात्र तितकाच अर्थ नसावा.

मोल्सवर्थच्या मराठी शब्दकोषातील अर्थः
वध [ vadha ] m Killing. 2 In arithmetic. Product. Note. Under the sense of Killing and answering to cide neat compounds are common, and others may be formed; as पितृवध, मातृवध, भ्रातृवध, भर्तृ- वध, मनुष्यवध, राजवध, ब्रह्मवध, गोवध Patricide, matricide, fratricide, mariticide, homicide, regicide &c.

त्या निमित्ताने Center for Indian Language Technology (CFILT) आय आय टी मुंबईने तयार केलेले शब्दकोषांचे एक सुंदर संस्थळ मिळाले. (हा फायदाच झाला!)

मराठी शब्दकोषः

हत्या, खून, वध, संहार - एखाद्या माणसाला किंवा जनावराला मुद्दाम एखाद्या उद्देशाने मारून टाकची क्रिया "बळी देण्याच्या प्रथेमुळे अनेक पशुंची हत्या होत असते."

मानवी हत्या, खून, वध, हत्या - एखाद्या व्यक्तीस एखाद्या उद्देश्याने किंवा जाणूनबुजून मारून टाकण्याची क्रिया "मानवी हत्या ही निंदायुक्त अपराध आहे."
संहार, वध - एखाद्या वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तीला ठार मारणे "श्रीकृष्णाने कंसाचा संहार केला"
हत्या, खून, वध - एखादी व्यक्ती किंवा लोकांकडून एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचा अचानक हल्ला करून केलेली हत्या "इंदिरा गांधीजींची हत्या केली होती."

तिथलाच हिंदी शब्दकोष

हत्या, खून, ख़ून, कत्ल, क़त्ल, वध, हनन, घात, मर्डर, अपघात, विघात, जबह, संघात, सङ्घात, प्रहण, संग्रहण, सङ्ग्रहण, प्रमाथ, शामनी, अवघात, क्राथ, विशसन, आर, आलंभ, आलम्भ, आलंभन, आलम्भन, निजुर, आहनन - किसी मनुष्य, प्राणी आदि को जान-बूझकर किसी उद्देश्य से मार डालने की क्रिया "उसने अपने पिता की हत्या कर दी / किसी भी प्राणी की हत्या महापाप है"

हत्या, खून, ख़ून, कत्ल, क़त्ल, वध, मर्डर - किसी व्यक्ति या व्यक्तियों द्वारा ही किसी प्रसिद्ध व्यक्ति की हत्या जो अचानक आक्रमण करके की जाए "इंदिरा गाँधी के सुरक्षाकर्मियों ने ही उनकी हत्या कर दी"

....चक्कचक्क 'पाञ्चजन्य'मध्येसुद्धा 'गोवधबंदी' असा शब्द वापरला गेलेला आढळला

तुम्हाला http://www.golwalkarguruji.org/biography-19 येथे (गोळवळकर गुरूजींवरच्या अधिकृत संस्थळावर) देखील गोवधबंदी दिसेल. याचा उलटा अर्थ असा देखील निघतो की विरोधकांनी (ते देखील मराठी) मुद्दामून तसा अर्थ लावत गांधीहत्या समर्थक असलेल्यांना भडकावले आणि त्याचा संबंध संघाशी लावत संघाला बदनाम केले. :-)

पंगा's picture

23 Mar 2011 - 7:52 am | पंगा

म्हणजे एकंदरीत 'हत्या' आणि 'वध' यांमधील अर्थच्छटांत खास फरक दिसत नाही तर. (तशी शंका होतीच.)

याचा उलटा अर्थ असा देखील निघतो की विरोधकांनी (ते देखील मराठी) मुद्दामून तसा अर्थ लावत गांधीहत्या समर्थक असलेल्यांना भडकावले आणि त्याचा संबंध संघाशी लावत संघाला बदनाम केले.

क्षणभर असे समजून चालू.

तरीही, Caveat emptor.

५० फक्त's picture

23 Mar 2011 - 7:29 am | ५० फक्त

आपण एवढ्या ब्रिटिश परंपरा डो़ळे झाकुन पा़ळतो आहोत, तर मग ह्या परंपरा सुद्धा पाळुन सगळे अतिरेकी आणि भ्रष्ट राजकरणि व नेते याच्या विरुद्ध असेच खटले चालवुन त्यांना गुपचुप फाशी का देउन टाकत नाही.

बाकी, सर्वसाक्षीजी, एवढ्या अभ्यासपुर्ण माहितीसाठी अतिशय धन्यवाद. प्रिंट काढुन ठेवत आहे, मुलाला वाचण्यासाठी.

नगरीनिरंजन's picture

23 Mar 2011 - 7:44 am | नगरीनिरंजन

भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या आत्म्यांना शांती लाभो. असं आपलं एक पद्धत म्हणून म्हणायचे. स्वातंत्र्यप्राप्तीपासून आजपर्यंतची वाटचाल पाहता या लोकांनी कशाला जीव दिला असा प्रश्न पडतो. नक्की कोणाला काय म्हणायचंय ते कळूनही तांत्रिक मुद्यांवर वाद घालणार्‍या बुद्धीजीवी वर्गाला मात्र आपला लवून मुजरा.
असो. हे असले धागे पुन्हा उघडायचे नाहीत अशी खूणगाठ मारलेली आहे.

- नंगड निगरगट्ट

विश्वनाथ मेहेंदळे's picture

23 Mar 2011 - 4:07 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>>नक्की कोणाला काय म्हणायचंय ते कळूनही तांत्रिक मुद्यांवर वाद घालणार्‍या बुद्धीजीवी वर्गाला मात्र आपला लवून मुजरा.
प्रचंड सहमत. तरी बरे, काही बुद्धिवादी सध्या थंड आहेत.

नितिन थत्ते's picture

23 Mar 2011 - 10:20 am | नितिन थत्ते

भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना आदरांजली.

नि३'s picture

23 Mar 2011 - 5:19 pm | नि३

+ १

sagarparadkar's picture

23 Mar 2011 - 7:16 pm | sagarparadkar

पण थोडी निराशाच झाली :)

किमान हुतात्म्यांचे स्मरण करण्याच्या दिवशी तरी त्यांच्या हौतात्म्यावरुन वाद होउ नयेत ही विनंती.

एक अश्रू त्यांच्या बलिदानाबद्दल , एक अश्रू त्यांच्या उपेक्षेबद्दल ........

नारयन लेले's picture

23 Mar 2011 - 11:26 am | नारयन लेले

मालाही आसेच वाटते.
भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना आदरांजली.

विनित

कलंत्री's picture

23 Mar 2011 - 8:22 pm | कलंत्री

भगतसिंह प्रभूतीबद्दल जास्त माहितीची अपेक्षा आहे. भगतसिंह यांचा प्रभाव बर्‍या अर्थाने त्याकाळातील भारतीय तरुणावर पडलेला होता हे अमान्य करण्याचे काहीही कारण नाही.

सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंह ही दोन्ही व्यक्तिमत्त्वे ही गांधीच्या प्रभावाखाली नव्हती आणि दुसरे म्हणजे या दोघांबद्दल त्याकाळातील हिंदु आणि मुस्ल्मिम समाजांना आदर आणि प्रेम वाटत असे.

बलिदान आणि अश्या घटनापेक्षा त्यांनी कदाचित पूढील काळाला योग्य असे वळण लावले असते ( १९४७ च्या स्वातं त्र्या आणि भारतचे विभाजन ) असा आशावादी विचार मला करावासा वाटतो.

असो. कालाच्या पूढे कोणाचे चालले आहे?

जाताजाता, आजही पाकिस्तानातील तरुणपिढीला भगतसिंहाबद्दल आदर आहे असे वाचल्याचे आठवते.

सर्वसाक्षी's picture

23 Mar 2011 - 11:28 pm | सर्वसाक्षी

द्वारकानाथजी,
<बलिदान आणि अश्या घटनापेक्षा त्यांनी कदाचित पूढील काळाला योग्य असे वळण लावले असते>
आपल्याला नक्की काय म्हणायचे आहे?
या महात्म्यांच्या बलिदानाने देशात नवे चैतन्य निर्माण झाले. शिवाय दिर्घकाळ टिकुन राहणे, सत्ता मिळविणे हे या वीरांचे ध्येय नव्हते. त्यांच्यासारखे तेजस्वी बलिदान जनसामान्यांस शक्य नसले तरी याच जनतेतुन जर आणखी भगतसिंह जन्मास आले तर? हा वचक जुलुमी इंग्रजांना कायमचा बसला. इतका, की ते अचेतन देह पुन्हा संजिवित होतील या धास्तीने त्यांनी मृतदेहांचे तुकडे करून ते जाळुन टाकायचा प्रयत्न केला; ते मृतदेह त्यांनी नातेवाईकांना दिले नाहीत.

आपल्या अखेरच्या दिवशी म्हणजे २३ मार्चला हुतात्मा भगतसिंह त्यांना वाचवायचे प्रयत्न अद्याप चालु असल्याची वार्ता घेउन आलेल्या बंदिपाल महंमद अकबर याला म्हणाले होते

" आज मी माझ्या संघटनेचा मानबिंदू आहे. जर माझी फाशी वाचली तर तो ढळेल. उलट जर मी बेडरपणे हसत हसत फासावर गेलो तर हिंदुस्थानातील माता आपला मुलगा भगतसिंह व्हावा अशी इच्छा मनी धरतील आणि मग स्वातंत्र्यसंग्रामात प्राण देणार्‍यांची शक्ति इतकी वाढेल की, त्यांना आवरणे साम्राज्यवाद्यांना शक्य होणार नाही. तेव्हा फाशी जाता जाता वाचायची इच्छा माझ्या मनात अजिबात नाही"

असे देशभक्त केवळ दैवदुर्मिळ! त्यांनी काहीही न मागता आपले सर्वस्व राष्ट्राला अर्पण केले

नितिन थत्ते's picture

24 Mar 2011 - 10:45 am | नितिन थत्ते

पहिल्या स्पेलमध्ये (मूळ लेखात) सर्वसाक्षींनी बरीच टाईट बोलिंग केली होती.
दुसर्‍या स्पेलमध्ये (प्रतिसादांतून) फुलटॉस आणि हाफव्हॉली टाकायला सुरुवात केली आहे.
.
.
.
.
.
.(बॅट घरी माळ्यावर ठेवलेला)

वाटाड्या...'s picture

23 Mar 2011 - 11:10 pm | वाटाड्या...

इन्किलाब जिंदाबाद....

नरसिंह त्रिकूट भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना सादर प्रणाम व त्यांच्या अद्वितीय कार्याला व बलिदानाला वंदन.

- वाट्या..