ब्लेड रनर – चित्रपटात रंगसंगतीचा प्रभावी वापर

चिंतातुर जंतू's picture
चिंतातुर जंतू in जनातलं, मनातलं
11 Mar 2011 - 6:46 pm

काही दिवसांपूर्वी इंद्रराज पवार यांनी चित्रपटातल्या रंगसंगतीविषयी दोन लेख लिहिले होते. (पहा: ‘चित्रपटातील "तानापिहिनिपाजा"’ आणि ‘अनेक भावनांचे प्रतीक : लाल रंग’) ते वाचताना अमेरिकन चित्रपटांमध्ये खूप प्रभावी पद्धतीनं रंगांचा वापर केला आहे असे चित्रपट आठवण्याचा प्रयत्न केला असता पटकन आठवलेला एक चित्रपट म्हणजे ब्लेड रनर. १९८२ सालची ही विज्ञान-काल्पनिका (सायन्स-फिक्शन) आता एक अभिजात कलाकृती म्हणून मान्यता पावली आहे. वर दिलेल्या विकिपीडियाच्या दुव्यावर चित्रपटाची कथा वाचता येईल म्हणून ती पुन्हा इथे तपशीलात दिलेली नाही; फक्त मुद्द्यांच्या अनुषंगानं लागेल तेवढी माहिती जागोजागी दिली आहे.

चित्रपटातलं वातावरण काल्पनिक भविष्यकाळातलं आहे. माणसांनी बनवलेले हुबेहूब माणसांसारखे यंत्रमानव आणि माणसं यांच्यातला उंदीर-मांजराचा खेळ चित्रपटात आहे. यंत्रमानव माणसापेक्षा हुशार आणि शारिरीकदृष्ट्या सक्षम आहेत, पण त्यांना भावना नसतात. त्यांना परग्रहांवर गुलाम म्हणून वापरलं जात असतं. त्यांपैकी काही मानव म्हणून पृथ्वीवर बेकायदेशीररीत्या वावरत असतात. मानवावर मात करण्याच्या त्यांच्या डावपेचांचा तो एक भाग असतो. मानव म्हणून खपून जाण्यासाठी ते भावनिक प्रतिसादांचं सोंग आणतात. त्यामुळे त्यांचे प्रतिसाद कृत्रिम आणि म्हणून माणसांहून वेगळे असतात. समोरच्या व्यक्तीचे भावनिक प्रतिसाद जोखून ती माणूस आहे की यंत्रमानव आहे, हे ओळखावं लागतं. म्हणजे भावना असणं एवढंच काय ते मानवी असण्याचं लक्षण आहे. पण हळूहळू त्याबाबतही नायकाला (हॅरिसन फोर्ड) शंका वाटू लागते. कदाचित काही यंत्रमानव भावनिक बाबतींतसुद्धा माणसासारखेच, किंवा शुष्क/नीरस/स्वार्थी अशा पुष्कळशा माणसांहून श्रेष्ठही बनत आहेत की काय, असं नायकाला वाटू लागतं. पण यंत्रमानवांना पकडून देणं हे त्याचं काम आहे. त्यामुळे त्याला पडू लागणारे मानवी अस्तित्वविषयक मूलभूत प्रश्न हे पाठलागाच्या तद्दन हॉलीवूड कथानकाचा हळूहळू ताबा घेत आहेत असं जाणवू लागतं.

माणूस असणं म्हणजे नक्की काय? मानवजात ज्या दिशेनं चालली आहे तिला प्रगती म्हणायचं का? अशा प्रश्नांना सामोरा जाणारा नायक (आणि इतर पात्रं) दाखवण्यासाठी प्रकाशयोजना आणि रंगसंगती यांचा प्रभावी वापर केलेला आहे आणि त्याचाच आढावा या लेखात घेतलेला आहे.

चित्रपटातलं वातावरण अतिशय निराशाजनक आहे. त्यातलं लॉस अँजेलिस शहर हे सडलेलं, कुबट, रया गेलेलं, अंधारलेलं आहे. फक्त गरीब माणसं आणि गुन्हेगार रस्त्यांवर वावरतात. श्रीमंत लोक टोलेजंग इमारतींत प्रचंड सुरक्षेखाली रहातात. पोलीस उडत्या यानांतून शहरांत फिरत असतात. निराशेचा काळपट भाव पकडण्यासाठी चित्रपट अंधाऱ्या वातावरणात घडतो. बहुतेक प्रसंग रात्री घडतात.

खाली दिलेल्या व्हिडिओतुकड्यामध्ये शीर्षकांनंतर लगेच येणारी दृश्यं दिसतील. त्यांवरून या वातावरणाचा अंदाज येईल.
http://www.youtube.com/watch?v=AbWNZkoQHuE&feature=player_embedded

या अंधार्‍या चित्रपटात सूर्य असलाच तर तो मावळतीला आलेला दिसतो. त्यामुळे वातावरण अधिक टोकदार निराशा दर्शवतं. उदा. हे पहा:

ही निराशा मानवजातीच्या भविष्याबद्दल आहे तशी ती तांत्रिक प्रगतीबद्दलसुद्धा आहे. एवढी प्रगती होऊनही गरीबी, हलाखीसारखे प्रश्न सुटलेले नाहीत आणि मनुष्य आनंदी नाही. हे दाखवण्यासाठी अंधाराबरोबर येणारा दुसरा एक घटक म्हणजे प्रखर अनैसर्गिक प्रकाशझोत. रस्त्यावरच्या निऑन साइन्स आणि सर्व अवकाश व्यापणाऱ्या अजस्र जाहिराती यांचा सतत मारा होत असलेले मनुष्य आपलं मानसिक संतुलन हरवून बसलेले असणार, याची जणू ग्वाहीच प्रत्येक चौकटीतून मिळत रहाते. उदा. हे पहा:

यात दिसणारी पिक्सेलाइजड जपानी स्त्री ही एका सतत चालत रहाणाऱ्या जाहिरातीतली आहे. समोरचं विमान एखाद्या मोटारीच्या आकाराचं आहे. त्यावरून त्या जाहिरातीचा प्रचंड आकार लक्षात येईल.

तांत्रिक प्रगतीमुळे बरंचसं जग हे कृत्रिम आहे, अगदी प्राणीसुद्धा. निसर्गाचं कुठेही दर्शन नसणाऱ्या आयुष्यातली ही कृत्रिमता रंगांच्या माध्यमातून अधोरेखित होते. चित्रपटातले रंग हे लक्षात येतील इतके कृत्रिम आहेत.

किंवा चित्रपटातल्या विविध प्रतिमा एकत्र करून बनवलेलं हे कोलाज पहा:

सबंध चित्रपटात अशी रंगसंगती वापरल्यावर जिथं ती वापरली जात नाही असा प्रसंग कोणता ते पाहणं रोचक ठरतं.

नायक आणि एक यंत्रमानव यांच्यात प्रेमसंबंध जुळतात. त्या प्रसंगातली ही प्रतिमा आहे. इथे रंग उबदार मानवी झालेले लक्षात येतील. हीच यंत्रमानव नायकाला आणि आपल्याला पहिल्यांदा कशी दिसते ते पाहिलं, तर हा फरक अजून ठळक होईल.

आता नायकाचा तिढा दाखवण्यासाठी रंगांचा उपयोग कसा केला आहे हे लक्षात येईल. त्याचं आयुष्य आणि त्याचा परिसर हे अतिशय थंड, अंधारलेले, निराशाजनक आहेत. लांब सावल्या, कृत्रिम, चकचकीत रंग असलेल्या या आयुष्यात आनंददायक, जगण्याची उब असणारं काहीही नाही. मग मिळणारा एकमेव सुखाचा क्षण हा त्याला हवाहवासा वाटणं साहजिक आहे. तो क्षण एका यंत्रमानवाकडून मिळतो. पण समाजात छुप्यानं वावरणाऱ्या यंत्रमानवांना ओळखून ठार मारणं यासाठी त्याची ख्याती आहे. मग आपण जे करतोय ते बरोबर की चूक हेच त्याला कळेनासं होतं. हा तिढाच चित्रपटाला त्याच्या टोकदार परिणतीकडे नेतो. ती काय हे सांगून चित्रपट प्रत्यक्ष पाहण्याची मजा घालवत नाही. रंगांचा प्रभावी वापर चित्रपटातला भाव अधोरेखित करण्यासाठी कसा वापरता येतो याची ही एक छोटीशी झलक होती.

चित्रपटातल्या अजून काही प्रतिमा इथे पाहायला मिळतील
http://www.imdb.com/title/tt0083658/mediaindex
http://tyrell-corporation.pp.se/blade-runner-images/

‘फिल्म न्वार’ (काळ्या) शैलीशी नातं सांगणाऱ्या या चित्रपटाचा ‘फ्यूचर न्वार’ किंवा ‘टेक न्वार’ अशी एक नवी शैली घडवण्यात सिंहाचा वाटा होता. नंतर आलेले 'टर्मिनेटर' किंवा 'मायनॉरिटी रिपोर्ट' हे चित्रपट याच मांदियाळीतले म्हणता येतील.

(टीपः मूळ धाग्यात वापरलेली 'नायिकेचं प्रथम दर्शन' ही प्रतिमा दिसत नव्हती म्हणून आता वेगळी प्रतिमा टाकली आहे. स्वसंपादनाची सुविधा दिल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून व्यवस्थापनाचे आभार!)

कलासंस्कृतीसमाजतंत्रचित्रपटलेखमाध्यमवेधआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

रेवती's picture

11 Mar 2011 - 7:11 pm | रेवती

लेखन आवडले.

श्रावण मोडक's picture

11 Mar 2011 - 7:58 pm | श्रावण मोडक

+१

चित्रा's picture

12 Mar 2011 - 7:51 am | चित्रा

असेच म्हणते.

मॅट्रिक्स /मेट्रिक्स या चित्रपटातही असेच कृत्रिम, काळसर, निळे, हिरवे रंग वापरले आहेत असे दिसते.

http://en.wikipedia.org/wiki/File:The_Matrix_Poster.jpg

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Mar 2011 - 10:45 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

चित्रपट बघणं म्हणजे काहीतरी गुन्हा आहे, करमणूकीसाठी दोन-तीन तास चित्रपट पाहिला, अमका नट, दिग्दर्शक आहे म्हणजे चित्रपट बघण्यायोग्य अशा पायर्‍या चढल्याचं आठवतं. पण चित्रपट बघण्यायोग्य म्हणजे काय हे ऑज्बेक्टीव्हली समजावून सांगणार्‍या जंतूंचे आभार. पूर्वी बघितलेले, तेव्हा आवडलेले चित्रपट का आवडले याचा विचार करण्यासाठी पुन्हा पहावे असं वाटतं.
मी आपणहून चित्रपट पहाताना असा विचार करणार नाही, पण अशा प्रकारचं लेखन वाचून करमणूकप्रधान चित्रपटही विचारांना खाद्य देऊ शकतो हे सांगण्याबद्दल जंतूंचे पुन्हा एकदा आभार.

मुक्तसुनीत's picture

11 Mar 2011 - 8:01 pm | मुक्तसुनीत

लेख आवडला.

असे चित्रपट पाहताना ज्या गोष्टी मन नकळत टिपून घेत होते त्याला शब्दरूप मिळाले , नव्या संज्ञा कळल्या.

आमचा एक बाळबोध प्रश्न विचारतो : हे तुम्ही सुंदर सुंदर शॉट्सची छायाचित्रे इथे डकवता ती सिनेमा कंप्युटर वर पाहाताना स्क्रीन प्रिंट घेऊन का जालावरची छायाचित्रे वापरून ?

ता क. चित्रपटविषयक आमचे लाडके लेखक : जंतु, निनाद आणि प्रसिद्ध समीक्षक श्री. गणेश मतकरी . :)

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Mar 2011 - 7:05 pm | बिपिन कार्यकर्ते

+१

निनाद's picture

16 Mar 2011 - 9:28 am | निनाद

छायाचित्रे जर पडद्यावर चित्रपट सुरू असतांना कॅमेर्‍याने काढली तर चालावे. मात्र त्यात चित्रपट जेथे चालला आहे ते उपकरणही दिसले पाहिजे, म्हणजे मॉनिटर किंवा टिव्ही. मात्र स्क्रीन कॅप्चर करून छायाचित्र म्हणून चिकटवणे यात प्रताधिकार भंग होत असावा असे वाटते.
हे चुकीचे असेल तर कुणी सांगा. म्हणूनच मी छायाचित्रे देत नाही.

ता क. चित्रपटविषयक आमचे लाडके लेखक : जंतु, निनाद आणि प्रसिद्ध समीक्षक श्री. गणेश मतकरी . Smile
गुदगुल्या झाल्या! धन्यवाद! :)

चर्चेच्या निमित्ताने फेअर यूझ तत्त्व लागू होईल. प्रत-अधिकाराचा भंग होणार नाही.

विकिपेडियासाठी अंतर्गत धोरण असे :

Some copyrighted images may be used on Wikipedia, providing they meet both the legal criteria for fair use, and Wikipedia's own guidelines for non-free content.
...
Film and television screen shots: For critical commentary and discussion of the cinema and television.
...

विकिपेडियाचे अंतर्गत धोरण हे कायद्याशीही सुसंगत असावे.

सहज's picture

12 Mar 2011 - 6:38 am | सहज

दिग्दर्शकाने उलगडून दाखवलेली पटकथा समजवायला श्री चिंजंतू यांच्यासारखे शिक्षक लागतात.

बाकी अभिजात कलाकृती म्हणून हा सिनेमा नावाजला गेला असल्याने, घाईघाईत विकांताला बघु नये, महाकंटाळवाणा वाटू शकेल. अर्थात हे परिक्षण वाचून किमान अंदाज येईल व सिनेमाच्या अभ्यासकाला मात्र मजा येईल.

'गॅटका' ह्या सिनेमाचे परिक्षण श्री. जंतू यांनी करावे हि विनंती.

बबलु's picture

12 Mar 2011 - 2:03 pm | बबलु

>>> बाकी अभिजात कलाकृती म्हणून हा सिनेमा नावाजला गेला असल्याने, घाईघाईत विकांताला बघु नये, महाकंटाळवाणा वाटू शकेल.

प्रचंड सहमत. हा चित्रपट अत्यंत टाकाउ आहे असे आमचे मत. अभिजात कलाकृती म्हणून कुणी निवडला म्हणजे चांगलाच असेल असे नाही याचे उत्तम उदाहरण.
दिग्दर्शक रिडली स्कॉट याने प्रचंड निराशा केली. (हो हो... हाच तो रिडली स्कॉट ज्याने पुढे Gladiator आणि Black Hawk Down बनवले).

असो... प्रत्येकाचं आपापलं मत, काय ?

गोगोल's picture

12 Mar 2011 - 9:51 pm | गोगोल

तुम्ही मिसळपाव ची चव लागेल म्हणून मेतकूट भात खायला बसला तर कस व्हायच?

बबलु's picture

13 Mar 2011 - 12:08 am | बबलु

तुम्ही conflicting opinions देताय राव. खाली तुमच्याच प्रतिसादात तुम्ही म्हणताय की सुंदर चित्रपट. आणि इथे म्हणताय मेतकूटभात. काहीतरी गल्लत होतेय का ?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

16 Mar 2011 - 4:22 pm | विश्वनाथ मेहेंदळे

मेतकुट भात सुंदर नसतो असा तुमचा Opinion दिसतो, त्यांचा नसेल. शिम्पल.

गोगोल's picture

12 Mar 2011 - 8:53 am | गोगोल

एका छान चित्रपट असा सुन्दररित्या उलगडून सांगितल्याबद्द्ल धन्यवाद.
सुरेख परिक्षण.

धनंजय's picture

12 Mar 2011 - 10:57 pm | धनंजय

सचित्र सोदाहरण रंगांच्या वापराबद्दल लेख अगदी जमला आहे.

कृष्णधवल फिल्म न्वार मध्ये हे जुलमी (डिस्टोपिक) परिणाम कॉन्ट्रास्ट वाढवून साधले जात.

( "प्लेझंटव्हिल" या चित्रपटात कृष्णधवल/रंगीत या फरकाचा सांकेतिक अर्थ असा बेमालूम न ठेवता उघड-व्याख्यात केलेला आहे, ते आठवले.
सोज्ज्वळपणात घुसमटलेल्या कृष्णधवल चित्रपटातील रंगीत-अनुरक्त स्त्री येथे बघावी :
http://www.imdb.com/media/rm4132608000/tt0120789 )

चिंतातुर जंतू's picture

13 Mar 2011 - 4:17 pm | चिंतातुर जंतू

प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार. प्रतिसादांत उपस्थित झालेल्या काही मुद्द्यांना माझे प्रतिसाद देत आहे.

मॅट्रिक्स - हो. काळोखं, निराशाजनक वातावरण हा या चित्रपटात हेतुपुरस्सर वापरलेला एक घटक होता. विशेषतः आभासी जग आणि प्रत्यक्षातलं जग यांच्यातला फरक हा अशा रंगसंगती/प्रकाशयोजनेच्या वापरामुळे अधिक अधोरेखित होत होता.

बाकी अभिजात कलाकृती म्हणून हा सिनेमा नावाजला गेला असल्याने, घाईघाईत विकांताला बघु नये, महाकंटाळवाणा वाटू शकेल.

चित्रपट अतिशय वेगानं घडणारा, अ‍ॅक्शन आणि पाठलागांच्या दृश्यांची पखरण असणारा आहे. पहिल्या पाच मिनिटांत काहीतरी धक्कादायक घडणं, नंतर थोड्या थोड्या काळानं थरारक काहीतरी घडत जाणं, अखेरच्या प्रसंगात सर्वाधिक धोकादायक शत्रूशी लढताना नायकाच्या जिवावर बेतणं वगैरे तद्दन हॉलिवूड फॉर्म्युला इथं वापरलेला आहे. त्यामुळे रसिकमान्य कलाकृतींविषयीचे असे पूर्वग्रह बाजूला सारून मजा घेता येईल असा हा चित्रपट (मला तरी) वाटतो. १९८०च्या दशकातली 'पंक' संस्कृती, म्यूझिक व्हिडिओ वगैरे घटकांचा चित्रपटातल्या दृश्य घटकांवर प्रभाव आहे. चित्रपटाचा विशिष्ट 'लुक' नीट दिसून येण्यासाठी चित्रपट शक्यतो मोठ्या पडद्यावर पाहण्यासारखा आहे असं मात्र म्हणेन.

लेखात वापरलेली छायाचित्रं जालावरून घेतलेली आहेत.

निखिल देशपांडे's picture

14 Mar 2011 - 7:36 pm | निखिल देशपांडे

वर लिहिलेला मॅट्रिक्स बद्दलचा मुद्दा लिहिणारच होतो..
लेख आवडला..
असे रंगाचा सुयोग्य वापर झालेले भारतीय चित्रपट कोणते????

निवांत पोपट's picture

14 Mar 2011 - 8:14 pm | निवांत पोपट

‘उत्सव’ ह्या चित्रपटाचा उल्लेख येथे करता येईल. फ़िकट पिवळ्या रंगाचा सुरेख वापर केलाय गिरीश कर्नाड ह्यांनी.

चिंतातुर जंतू's picture

15 Mar 2011 - 6:37 pm | चिंतातुर जंतू

असे रंगाचा सुयोग्य वापर झालेले भारतीय चित्रपट कोणते????

भारतीय चित्रपट रंगांधळ्या लोकांनी बनवलेले असतात असं बर्‍याचदा वाटलेलं आहे ;-) याला अपवाद असं पटकन आठवलेलं उदाहरण म्हणजे राम गोपाल वर्माचा 'सत्या'. माझ्या आठवणीनुसार (चू.भू.द्या.घ्या.) यात निरभ्र, निळंशार आकाश फक्त नायक-नायिकेच्या रोमँटिक प्रसंगांत दिसतं. इतर वेळी मुख्यतः मुंबईच्या पावसाळी वातावरणातलं कुंद आभाळ दिसतं. 'साहिब, बीबी और गुलाम'मध्ये र्‍हास पावणार्‍या जमीनदारी व्यवस्थेची बळी छोटी बहू (मीनाकुमारी) नेहमी अंधारात किंवा कृत्रिम प्रकाशात दिसते, तर प्रगतीशील, आधुनिक ब्रह्मो समाजातली जबा (वहीदा रेहमान) मोकळ्या अवकाशात, स्वच्छ सूर्यप्रकाशात बागडताना दिसते ('भंवरा बडा नादान' वगैरे).

बबलु's picture

16 Mar 2011 - 12:57 pm | बबलु

"सत्या" बद्दल १००% सहमत.

("सत्या" पाहून थिएटरमध्ये अवाक झालेला) बबलु

राजेश घासकडवी's picture

15 Mar 2011 - 9:06 pm | राजेश घासकडवी

रंगसंगतीसारख्या, कॉन्शस पातळीवर सहज न जाणवणाऱ्या गोष्टींकडे डोळसपणे पहायला प्रवृत्त करणारी व शिकवणारी लेखमाला.

सिन सिटी व ३०० या सिनेमांच्या रंगसंगती, चित्रणशैलीविषयी देखील लिहावं ही विनंती.

प्राजु's picture

16 Mar 2011 - 7:08 am | प्राजु

लेखन आवडले.. :)

निनाद's picture

16 Mar 2011 - 10:15 am | निनाद

उत्तम ओळख करून दिलीत रंगसंगतीची. तुमच्या सोबत चित्रपट चर्चा करायला (म्हणजे तुमचे ऐकायला!) मजा येईल!

मृत्युन्जय's picture

27 Jun 2011 - 10:53 am | मृत्युन्जय

सहज म्हणुन धागा उघडला तर एक उत्तम चित्रपट परीक्षण सापडले. खुपच छान.