पुन्हा एकदा गोलपिठा

धोंडोपंत's picture
धोंडोपंत in काथ्याकूट
3 Dec 2007 - 9:02 pm
गाभा: 

बाकी ढसाळांच्या विद्रोहात सर्व गोष्टी "क्षम्य" असतात. सभ्य म्हणून गणले गेलेले प्रतिशब्द वापरले तर विद्रोहच संपून जाईल. विवेकवादी चळवळींमध्ये देखील विद्रोहाचे मान व भान राखावे लागते.

आमचे विद्वान आणि नेमकेपणाने लेखन करणारे लेखक स्नेही श्री. प्रकाशराव घाटपांडे यांच्या वरील अभिप्रायावरून विद्रोही साहित्याबद्दल चर्चा घडवून आणण्यासाठी हा लेखनप्रपंच.

विद्रोही साहित्याची परंपरा जरी जुनी असली तरी खर्‍या अर्थाने या प्रकारच्या साहित्याला, 'मान्यता' हा शब्द बरोबर वाटत नाही, पण 'प्रसिद्धि' श्री. नामदेव ढसाळांच्या 'गोलपिठा' या पुस्तकाने मिळवून दिली, हे वास्तव आहे. विद्रोही साहित्यात आजही गोलपिठा हा मैलाचा दगड मानला जातो.

श्री. नामदेव ढसाळ हे आमचे आवडते कवी असले तरी येथे आमच्या वैयक्तिक आवडीनिवडी बाजूला ठेऊन केवळ साहित्याची चर्चा केली आहे. आम्ही आमची मते मांडत आहोत. ती मते आमच्या चिंतनाने बनली आहेत.

नामदेव ढसाळांचे वकीलपत्र घेऊन आम्ही उभे आहोत असे कोणी समजू नये. आणि तशा स्वरूपाचे आरोप आमच्यावर होऊ नयेत अशी अपेक्षा आहे.

गोलपिठामधून नामदेव ढसाळांनी शोषित समाजाची जी वेदना मांडली, ती इतकी अस्सल होती की त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घेण्यास कोणीही धजावणार नाही. त्यांच्या आयुष्यात ज्या विश्वात ते वावरले, तो त्यांचा मुंबईतील फॉकलंड रोडच्या वेश्यावस्तीतील भाग म्हणजे गोलपिठा.

जिथे दारू, मटका आणि रांडबाजी शिवाय कोणी जीवन जगत नाही. जिथे कोंबडं कापावं इतक्या सहजपणे माणसे कापली जातात. जिथे दिवस रात्री सुरू होतो. ढसाळांच्या भाषेतच सांगायचे तर

"मनगटावरच्या चमेलीगजर्‍यात कवळया कलेजीची शिकार उरकून
शेवटच्या बसची वाट पाहणारे बाहेरख्याली लोक"

पदोपदी दिसतात. जिथे हिजड्यांची शरीरेही भोगली जातात. जिथे सर्व ऋतू सारखेच असतात.

"येथला प्रत्येक हंगाम बेदर्दीच असतो
म्हणून फांदीला नुसता सांगाडाच लटकवून भागत नाही रे
इथे माण्सालाच माणूस खात असतो
आणि वाल्याच्या पाठीवरले वळ लपविले जातात रे"

अशा विश्वात, तरूण वयात आजुबाजूचे भयाण जीवन पाहून, अन्याय अत्याचार सहन करून हा एका खाटिकाचा मुलगा कविता लिहायला लागला. सोसलेले अत्त्याचार आग होऊन त्यातून बाहेर पडू लागले. लेखणी मशाल झाली, ज्यात अख्ख्या विश्वाला जाळून टाकण्याची ताकद होती. त्यामुळे तो ठणकावून म्हणतो

" जिवाचे नाव लवडा ठेवून जगणार्‍यांनी
खुशाल जगावे....
मी तसा जगणार नाही "

या विश्वात वावरूनही ढसाळांच्या जाणीवा बोथट झाल्या नाहीत. त्या दिवसेंदिवस धारदार होत गेल्या. त्या अगतिक झाल्या नाहीत, ज्वलंत झाल्या.

"मी तुला शिव्या देतो, तुझ्या ग्रंथाला शिव्या देतो, तुझ्या संस्कृतीला
शिव्या देतो, तुझ्या पाखंडीपणाला शिव्या देतो
इव्हन मी आईबापांनादेखील शिव्या देतो
बांबलीच्यानो इथे जन्म घेऊन तुम्ही बर्बाद झालात
आता मलाही जन्म देऊन तुम्ही बर्बाद केलेत"

या कवितेत शोषणव्यवस्थेला सुरूंग लावण्याची धमक आहे. ती बेधडकपणे सांगते की

"तुमच्या गांडीचे कानवले कुरतडलेत ज्यांनी
त्यांच्या नाशासाठी मी पिकू घातलेय आढी"

हा दिलासा, हे आश्वासन ही कविता देते. त्यामुळे ती जवळची वाटते. स्वत:च्या वेदनेत इतरांना सामावून घेण्याची जबरदस्त ताकद या कवितेत आहे.

"शेटसावकारांची आय झवून टाकावी
नात्यागोत्याचा केसाने गळा कापावा
जेवणातून विष घालावे मूठ मारावी
रांडवाडे वाढवावेत: भाडखाव व्हावे"

पण ती पुढे म्हणते -

" नंतर उरल्यासुरल्यांनी कुणालाही गुलाम करून लुटू नये
नाती न मानण्याचा, आयभैन न ओळखण्याचा गुन्हा करु नये
आभाळाला आजोबा अन जमिनीला आजी मानून त्यांच्या कुशीत
गुण्यागोविंदाने आनंदाने राहावे
चंद्रसूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे"

इथे ही कविता विश्वात्मक होते. शेटसावकारांची ' आय झवण्याची' भाषा करणारे ढसाळ मला इथे आभाळासारखे वाटतात. इथे ढसाळ एका जातीपुरते मर्यादित रहात नाहीत, एका धर्मापुरते मर्यादित रहात नाहीत, एका राज्यापुरते, एका भाषेपुरते मर्यादित रहात नाहीत, एका देशापुरते मर्यादित रहात नाहीत तर जगात ज्या ज्या माणसाचे शोषण झाले आहे, मग तो कुठल्याही जातीचा असो, धर्माचा असो, पंथाचा असो, देशाचा असो त्याचे होऊन जातात.

त्यांच्या शिव्या खटकत नाहीत. कारण त्या इतक्या अस्सलपणे आलेल्या असतात की जखमेतून रक्त वहावे तशी ही कविता वहायला लागते. तिला तिच्या अस्सल रूपात वहायला मिळते म्हणून ती प्रामाणिक वाटते.

आणि ती प्रामाणिक असते म्हणून लोभसवाणी असते.

---धोंडोपंत

प्रतिक्रिया

पण 'प्रसिद्धि' श्री. नामदेव ढसाळांच्या 'गोलपिठा' या पुस्तकाने मिळवून दिली, हे वास्तव आहे.

खरं आहे!

आभाळाला आजोबा अन जमिनीला आजी मानून त्यांच्या कुशीत
गुण्यागोविंदाने आनंदाने राहावे
चंद्रसूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे"

क्या बात है, सुंदर ओळी...

वा धोंड्या, ढसाळरावांच्या जळजळीत कवितेचे तेवढ्याच परखड शब्दात अगदी उत्तम निरुपण केले आहेस... माझ्या सुदैवाने म्हण किंवा दुर्दैवाने म्हण, (हवं तर नवलकर साहेबांचे शिष्यत्व पत्करल्यासारखे समज,) मी त्या फॉकलंड रोड आणि फोरास रोडच्या मुंबईतल्या रात्री उघड्या डोळ्यांनी पाहिल्या आहेत, तिथली हालाखी पाहिली आहे!

असो..

छान छान, गोड गोड, गुडी गुडी, सुसंस्कृत वगैरे मराठी लेखन इतर मराठी संकेतस्थळांवर निश्चितच वाचायला मिळेल, परंतु इतकं उघड उघड आणि वास्तववादी लेखन करण्याचं स्वातंत्र्य मिसळपाव व्यक्तिरिक्त इतरत्र नसेल/नसावं! असो..

धोंड्या, हा लेख वाचून मिसळपाववर खर्‍या अर्थाने झणझणीत तर्री खाल्ल्याचा आनंद झाला...

मुळात अत्यंत हळवी आणि मृदू असणारी तुझी लेखणी वेळप्रसंगी अशीच तळपूही दे!

तात्या.

केशवसुमार's picture

4 Dec 2007 - 12:08 am | केशवसुमार

धोंड्या, हा लेख वाचून मिसळपाववर खर्‍या अर्थाने झणझणीत तर्री खाल्ल्याचा आनंद झाला... तात्यशेठ.. एकदम सहमत..

बा धोंडोपंता तुम्हाला दंडवत .. लेख उत्तम आहे.. आवडला..

(नतमस्तक)केशवसुमार..

सर्किट's picture

4 Dec 2007 - 12:16 am | सर्किट (not verified)

इथे ही कविता विश्वात्मक होते. शेटसावकारांची ' आय झवण्याची' भाषा करणारे ढसाळ मला इथे आभाळासारखे वाटतात. इथे ढसाळ एका जातीपुरते मर्यादित रहात नाहीत, एका धर्मापुरते मर्यादित रहात नाहीत, एका राज्यापुरते, एका भाषेपुरते मर्यादित रहात नाहीत, एका देशापुरते मर्यादित रहात नाहीत तर जगात ज्या ज्या माणसाचे शोषण झाले आहे, मग तो कुठल्याही जातीचा असो, धर्माचा असो, पंथाचा असो, देशाचा असो त्याचे होऊन जातात.

अगदी खरे आहे.

माझे मत. विद्रोहाचा शिव्यांशी जवळचा संबंध आहे, हे खरे. एलकुंचवार, तेंडुलकरांनी देखील नाटकांना सोवळ्यातून बाहेर आणण्याचा साहित्यिक विद्रोह केला, तो देखील शिव्या देऊनच. पण गार्बो म्हणा किंवा गिधाडे, त्यातील शिव्या म्हणजे "सोवळ्याचा पायजामा" शिवावा तशा आहेत. म्हणजे माफक विद्रोह. मध्यमवर्गीय वाचकांना झेपेल एवढा. पार्ल्यात किंवा धरमपेठेत, एवढा विद्रोह पुरेसा.

ढसाळांच्या गोलपिठ्यात ह्या विद्रोहाचा स्फोट होतो, असे वाटल्याखेरीज रहात नाही.

- सर्किट

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Dec 2007 - 5:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पंत,
लेखन आवडले.
विद्रोही साहित्यात आजही गोलपिठा हा मैलाचा दगड मानला जातो.
सहमत.......!!!
विद्रोही चळवळीतल्या लेखकांनी वास्तववादी जीवन या आणि इतर अशा अनेक कविता,कथा, आत्मचरित्रातून मांडलेले आहे, या बद्दल आमच्या मनात तरी कोणतीही शंका नाही.

अवांतर :- पंत, काल प्रा.केशव मेश्रामांच्या ज्ञानेश्वरीवर लिहिता-लिहिता, आज विद्रोही साहित्यातील वास्तववादावर लिहीले. मागे एकदा उर्दु गझलांवरचे लेखन असेच सुंदर होते. पुन्हा फलजोतिष, ग्रह-त्यांचे परिणाम आहेच. धोंडोपंत, आपल्या लेखनीने आम्ही भारावून गेलो आहोत. असेच लिहीत राहा !!!

धोंडोपंताचा स्नेही.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

किमयागार's picture

4 Dec 2007 - 8:08 am | किमयागार (not verified)

"त्यांच्या शिव्या खटकत नाहीत. कारण त्या इतक्या अस्सलपणे आलेल्या असतात की जखमेतून रक्त वहावे तशी ही कविता वहायला लागते."
इथल्या 'नकली' अध्यक्षांना हे कोणी समजावयाचे आता??
-कि'गार
***********************************
अल्कोहोलचा परिणाम दुसरे काय?

विसोबा खेचर's picture

4 Dec 2007 - 8:31 am | विसोबा खेचर

इथल्या 'नकली' अध्यक्षांना हे कोणी समजावयाचे आता??

अद्याप तुम्हाला इथल्या 'नकली' अध्यक्षांचीच काळजी पडली आहे त्याबद्दल धन्यवाद! बाकी तुमच्या बर्‍याचश्या प्रतिसादांत इथल्या 'नकली' अध्यक्षांचा उल्लेख येतो त्यावरून त्यांचा तुमच्यावर किती जबरदस्त पगडा आहे याची कल्पना येते! :)

असो, पंतांच्या या सुंदर लेखात आता अधिक विषयांतर न करता आम्ही इथेच थांबतो! तुमची गरळओक, जळजळ, मळमळ, पोटदुखी चालू द्या...:)

तात्या.

बेसनलाडू's picture

4 Dec 2007 - 8:57 am | बेसनलाडू

पंत,
ज्योतिष, शेअरबाजार, संतसाहित्य, गझल आणि आता हे विवेचन - तुमच्या लेखनवैविध्याला कुर्निसात!
(नतमस्तक)बेसनलाडू

प्रकाश घाटपांडे's picture

4 Dec 2007 - 6:46 pm | प्रकाश घाटपांडे

त्यांच्या शिव्या खटकत नाहीत. कारण त्या इतक्या अस्सलपणे आलेल्या असतात की जखमेतून रक्त वहावे तशी ही कविता वहायला लागते. तिला तिच्या अस्सल रूपात वहायला मिळते म्हणून ती प्रामाणिक वाटते.

आणि ती प्रामाणिक असते म्हणून लोभसवाणी असते.

वा काय बोललात धोंडोपंत.

एकदा साडेनउ च्या बातम्यात पाहुणे म्हणुन आले होते. त्यावेळी बातम्या सांगणार्‍या निवेदिकेने त्यांना थेट ब्राह्मण द्वेषा विषयी विचारले. त्यावेळी ते म्हणाले " अहो ते केव्हाच भुर्र् र उडाले सिलिकीन व्हॅलीला, आता राहिलेत ते आपल्यातलेच" ढसाळांची मुलाखत मला विद्राहातुन विवेकाकडे प्रवासाची वाटली.

अवांतर- असेच "दलित ब्राह्मण" हा कथासंग्रह लेखक शरणकुमार लिंबाळे ( बहुतेक खात्री नाही) अत्यंत सुंदर आहे. कथेतल्या नायकाची दोन्ही बाजूने होणारी घुसमट टिपली आहे. सदानंद मोरे यांचे एक नाटक ही असेच आहे. नाव आत्ता आठवत नाही.
प्रकाश घाटपांडे

धोंडोपंत's picture

5 Dec 2007 - 8:52 am | धोंडोपंत

मित्रवर्य तात्या, केशवसुमार, सर्कीटराव, प्राध्यापक साहेब, कि'गार, बेसनलाडू, प्रकाशराव

या अभिप्राय देणार्‍या सर्व मित्रांचे मनापासून आभार. आपणाला आमचे लेखन आवडले याचा आनंद आहे.

आपला,
(आभारी) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

सर्किट's picture

5 Dec 2007 - 9:12 am | सर्किट (not verified)

धोंडोपंत,

तात्याला मित्रवर्य लिहिलेत, आणि आम्हाला कोरडेपणाने "सर्किटराव" ? हे बरे नाही !

आपले लेखन नेहमीच आम्हाला आवडले आहे. (जरी आपल्या ज्योतिशास्त्राविषयी घृणा, नावड, आणि अविश्वास असला तरी, त्याला आम्ही मनोरंजक लिखाण म्हणतो ;-)

- सर्किट

धोंडोपंत's picture

5 Dec 2007 - 1:23 pm | धोंडोपंत

सर्कीट,

तुमचा गैरसमज होतोय.

आमच्या लिहीण्याचा उद्देश असा आहे की

मित्रवर्य ...... कोण कोण? तर तात्या, केशवसुमार, सर्कीटराव, प्राध्यापक साहेब, कि'गार, बेसनलाडू, प्रकाशराव

कृपया या पध्दतीने या वाक्याकडे पहावे.

आता राव काढून टाकतो म्हणजे अडचण नको.

आपला,
(स्नेही) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

मुक्तसुनीत's picture

6 Dec 2007 - 10:23 am | मुक्तसुनीत

धोंडोपंतांचे अभिनंदन !

तुमच्या या लेखाचा तसा उद्देश नाही हे मला माहित आहे ; पण ढसाळांच्या राजकीय प्रवासाबद्द्ल मला नेहमीच कुतुहल वाटत आले आहे. त्यांची शिवसेनासुद्धा घडलेली असावी हे तर मला अकल्पित वाटते. एकूणच , एक फार मोठा कवी , पण एक अतिसामान्य सामजिक-राजकीय कार्यकर्ता-नेता अशा काहीशा गोळाबेरजेकडे मी येतो. त्यांच्या काव्याची रेन्ज , त्यातील धगधगीतपणा, स्फोटकता याला मराठीमधे तरी मला समांतर काही सापडत नाही. पण माणूस म्हणून मलिका अमरशेख यानी आपल्या आत्मचरित्रात घडविलेले त्यांचे दर्शन , त्यांच्या एकूण राजकीय प्रवास या सार्‍यामुळे एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होते असे मला वाटते.

गोलपिठा आणि इतर कविता यांच्या पलिकडे तुम्हाला ढसाळ कसे दिसतात ? त्यांची वर्गवारी नक्की कुठल्या खात्यावर करायची ?

विसोबा खेचर's picture

6 Dec 2007 - 10:34 am | विसोबा खेचर

पण माणूस म्हणून मलिका अमरशेख यानी आपल्या आत्मचरित्रात घडविलेले त्यांचे दर्शन , त्यांच्या एकूण राजकीय प्रवास या सार्‍यामुळे एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होते असे मला वाटते.

विचार करण्याजोगा मुद्दा!

गोलपिठा आणि इतर कविता यांच्या पलिकडे तुम्हाला ढसाळ कसे दिसतात ? त्यांची वर्गवारी नक्की कुठल्या खात्यावर करायची ?

मुक्तसुनितांचा प्रतिसाद आवडला, धोंड्याकडून वरील प्रश्नाचे उत्तर अपेक्षित आहे...

तात्या.

धोंडोपंत's picture

6 Dec 2007 - 11:09 am | धोंडोपंत

मुक्तसुनीत यांस,

सर्वप्रथम अभिप्रायाबद्दल धन्यवाद. अत्यंत लोभसवाणा, अत्यंत सुसंस्कृत, अत्यंत विचार करण्याजोगा अभिप्राय तुम्ही दिलात. या अभिप्रायाला सविस्तर उत्तर देण्याशिवाय पर्याय नाही.

तुमच्या या लेखाचा तसा उद्देश नाही हे मला माहित आहे ; पण ढसाळांच्या राजकीय प्रवासाबद्द्ल मला नेहमीच कुतुहल वाटत आले आहे. त्यांची शिवसेनासुद्धा घडलेली असावी हे तर मला अकल्पित वाटते.

आमच्या लेखनाचा उद्देश हा केवळ त्यांच्या साहित्यापुरताच मर्यादित आहे. त्यातल्यात्यात फक्त 'गोलपिठा' पुरता. कारण आम्ही म्हटल्याप्रमाणे, 'गोलपिठा' हाच विद्रोही साहित्यातील मैलाचा दगड आहे.

एकूणच , एक फार मोठा कवी , पण एक अतिसामान्य सामजिक-राजकीय कार्यकर्ता-नेता अशा काहीशा गोळाबेरजेकडे मी येतो. त्यांच्या काव्याची रेन्ज , त्यातील धगधगीतपणा, स्फोटकता याला मराठीमधे तरी मला समांतर काही सापडत नाही.

गोळाबेरजेचे विधान सोडून इतर गोष्टींशी १००% सहमत. "अतिसामान्य सामाजिक कार्यकर्ता" या विधानाशी आम्ही सहमत नाही कारण "पँथरचे दिवस" वाचल्यावर ढसाळांना अतिसामान्य सामाजिक कार्यकर्ता म्हणवत नाही.

पण माणूस म्हणून मलिका अमरशेख यानी आपल्या आत्मचरित्रात घडविलेले त्यांचे दर्शन , त्यांच्या एकूण राजकीय प्रवास या सार्‍यामुळे एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होते असे मला वाटते.

एखाद्या माणसाच्या वैवाहिक जीवनावर भाष्य करण्याचा आम्हाला अधिकार नाही त्यामुळे याविषयी आम्ही काही बोलत नाही. त्याचप्रमाणे कोणाच्या वैवाहिक जीवनाची वाताहात चविष्टपणे चघळण्यात आम्हाला आनंद वाटत नाही.

गोलपिठा आणि इतर कविता यांच्या पलिकडे तुम्हाला ढसाळ कसे दिसतात ? त्यांची वर्गवारी नक्की कुठल्या खात्यावर करायची ?

उत्तम प्रश्न.

आम्ही ढसाळांकडे पाहतांना गोलपिठा, तुही इयत्ता कंची, खेळ, गांडू बगीच्या, या सत्तेत जीव रमत नाही, मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे आणि इतर ललित लेख याच्या पलिकडे जाऊन पहात नाही. कारण याच्या पलिकडे त्यांच्या खाजगी जीवनात डोकावणे आम्हांला प्रशस्त वाटत नाही.
याचं कारण असं आहे की, आमची भूमिका ही आस्वादकाची आहे. कलाकाराच्या कलाकृतीशी आमचे नाते आहे. त्या पलिकडे त्या कलावंताचे खाजगी आणि वैयक्तिक आयुष्य, त्याची जातपात, त्याचा धर्म, त्याची धार्मिक मते, त्याचे राजकीय दृष्टीकोण या गोष्टींशी आमचा खरे तर काहीही संबंध नाही. आमचाच नव्हे तर कोणाचाही नाही.

पुन्हा एकदा धन्यवाद.

आपला,
(आभारी) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

विसोबा खेचर's picture

6 Dec 2007 - 11:11 am | विसोबा खेचर

सुंदर उत्तर..!

आपला,
(धोंड्या आणि मुक्तसुनितांची म्यॅच पाहणारा) तात्या.

मुक्तसुनीत's picture

6 Dec 2007 - 11:21 am | मुक्तसुनीत

यापुढची चर्चा म्हणजे कलास्वाद आणि इतर सामाजिक-राजकीय क्षेत्रे आणि एकूण आयुष्य यांच्यातील नाते , त्याना विभागणार्‍या सीमारेषा , एखाद्या व्यक्तिला अभ्यासताना "कुठे थांबावे" याबद्दलची नैतिकता यांची चर्चा होईल. पर्यायाने तुमच्या मूळ विषयापासून ते भरकटणार आणि ज्याना हा लेख वाचायचाय् आणि मनापासून प्रतिक्रिया द्यायचीय् त्याना गांगरवून सोडल्यासारखे होणार. तेव्हा मी माझी प्रश्नबाजी इथेच थांबवतो.

गोलपिठाखेरीजच्या त्यांच्या कवितांचे असेच रसग्रहण/विश्लेषण तुम्ही केलेत , त्यातून त्यांच्या कवितेचा प्रवास कसा घडला हे दाखवलात तर फार मजा येईल. ते एक लेखमाला एका सायंदैनिकात लिहायचे. त्याबद्दलही जमल्यास लिहिलेत तर खूप आनंद होईल.

तुम्हाला धन्यवाद.

विसोबा खेचर's picture

6 Dec 2007 - 11:36 am | विसोबा खेचर

2 All! :)

दोघांनाही धन्यवाद! आता मीही थांबतो...:)

तात्या.

धोंडोपंत's picture

6 Dec 2007 - 3:05 pm | धोंडोपंत

गोलपिठाखेरीजच्या त्यांच्या कवितांचे असेच रसग्रहण/विश्लेषण तुम्ही केलेत , त्यातून त्यांच्या कवितेचा प्रवास कसा घडला हे दाखवलात तर फार मजा येईल.

ढसाळांच्या कवितेवर अजून काही लिहायचा तूर्तास विचार नाही. पण आरती प्रभूंच्या 'दिवेलागण' वर लिहायचे मनात आहे. अर्थात संपूर्ण १०५ कवितांवर लिहायला जमणार नाही पण....

ये रे घना ये रे घना न्हांवू घाल माझ्या मना

तिच्या मनाच्या ऐलपैल मी श्वास पेरिले होते,

चार डोळे: दोन काचा दोन खाचा

मर्मावर मार घेत आम्ही जन्मा यावें

आमुच्या गोवर्‍या | आम्हीच थापाव्या | आम्हीच राखाव्या | मरणापर्यंत

या निवडक कवितांवर लिहावयाचे मन होत आहे.

'दिवेलागण' च्या मोहिनीतून आणि एकूणच खानोलकरांच्या साहित्याच्या नशेतून या जन्मी आम्ही बाहेर येऊ असे वाटत नाही.

जगतात येथे कोणी, मनात कुजून
तरी कसे फुलतात, गुलाब हे ताजे?

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे.....कुणाचे ओझे..

आपला,
(खानोलकरभक्त) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

केशवसुमार's picture

6 Dec 2007 - 3:43 pm | केशवसुमार

धोंडोपंतशेठ,
काय संकल्प आहे... दिल खूष हूवा.. शुभेच्छा...
लवकर येऊ दे लेखमाला..

(आतूर) केशवसुमार..

विसोबा खेचर's picture

6 Dec 2007 - 5:18 pm | विसोबा खेचर

हेच म्हणतो..!

धोंड्या, तुझ्याकडून खानोलकरसाहेब समजून घ्यायला नक्कीच आवडतील!

लेखांची वाट पाहात आहे....

(आतूर) तात्या.

सर्किट's picture

6 Dec 2007 - 11:32 pm | सर्किट (not verified)

"नक्षत्रांचे देणे"" हे दिवेलागण मध्ये आहे का ? आरती प्रभूंचेच आहे ना ते ?

धोंडोपंत,

खानोलकरांविषयी लिहाच !

आम्ही वाचनास उत्सुक आहोत !

- सर्किट

चित्रा's picture

8 Dec 2007 - 8:10 pm | चित्रा

तुमच्या या लेखाने बरेच काही वाचायचे राहिले असे कळले आहे. धन्यवाद.
खानोलकरांवरही लिहा, वाचायला आवडेल.

अर्धवटराव's picture

5 Jun 2010 - 4:50 am | अर्धवटराव

मिपा वर धोंडोपंत नावाचा एक अवलीया वाचायला मिळतोय !!
माझ्यापुरते तरी, या विद्रोहीसाहित्य वगैरे गोष्टी मला आपल्या सारख्या रसायनांकडुनच चाखायल मिळतात. त्यांच्याशी प्रत्यक्ष भिडण्याचि (कि पचवण्याचि??) माझी ईच्छा (कि हिम्मत??) नाहि.
धन्यवाद पंत !!

(वाचक) अर्धवटराव
-रेडि टु थिंक

प्रकाश घाटपांडे's picture

5 Jun 2010 - 8:36 am | प्रकाश घाटपांडे

हल्ली धोंडोपंत लिहित नाहीत याचे आम्हाला दु:ख आहे. त्यांच्या ज्योतिषाच्या ब्लॉग वर ते नेहमी लिहितात.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

मुक्तसुनीत's picture

7 Dec 2007 - 12:28 am | मुक्तसुनीत

खरे सांगायचे तर खानोलकर, ग्रेस यासारख्या कवींबद्दल आता आपल्याला काय वाटते हे पुन्हा तपासून पहायची वेळ आली आहे असे मला केव्हापासून वाटते. नव्वदीच्या दशकापर्यंत आजुबाजुच्या वातावरणामधे , माध्यमांमधे , मित्रांमधे या दोन कवींना केव्हढे ग्लॅमर होते ! हृदयनाथ मंगेशकरांच्या लोकप्रियतेला ऐंशीच्या शेवटाला आणि नव्वदीच्या सुरुवातीच्या वर्षांत मोठा बहर आल होता. या सुमारास मला वाटते, संगीतकाराच्या आणि या कविंच्या लोकप्रियतेचा एकत्रित परिणाम खूप मोठा होता. या दोन (आणि इतरही काही) कविंकडे तरुण वाचकाना वळविण्याचे काही श्रेय या संगीतकाराला द्यायलाच हवे. अशाच स्वरूपाचा परिणाम त्याआधी एक-दोन दशके पु.लं.च्या एंडॉर्समेंटमुळे झाला होता असे म्हणता येईल.

या दोन कवींना कमी लेखायचा माझा हेतु बिलकुल नाही. पण भूतकाळातील प्रत्येक गोष्टीप्रमाणे त्यांचेसुद्धा मूल्यमापन आपण कळत न कळत करतोच.

तुमच्या खानोलकरवरील लिखाणाची आतुरतेने वाट पाहतो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Dec 2007 - 2:26 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आपण सर्व अभासू, जिज्ञासू लोकांना एक साधा प्रश्न!

"मैलाचा दगड" हा शब्दप्रयोग इंग्लीश milestone चं भाषांतर वाटतं. याला अस्सल मराठी पर्याय आहे का? आपण साहेबाच्या मागून लवकरच मैल सोडले आणि किलोमीटर वापरू लागलो पण तरीही मैलाचे दगड हटले नाहीत.

संहिता

धनंजय's picture

7 Dec 2007 - 4:36 am | धनंजय

पण हा संस्कृतातून घेतलेला आहे, फोडला तर मराठीत अर्थ लागत नाही.
मान = "मोजणे" असा अर्थ सामान्य नव्हे, अणि मोजण्याच्या पट्टीला "दंड" म्हणण्याची पद्धतही मराठी नव्हे.
शिवाय "मानदंडा"ला स्वतःचे अर्थवलय आहे, त्यामुळे तो इथे चालणार नाही. मानदंडाने अनेक वस्तू पुन्हापुन्हा मोजल्या जातात, प्रवासात आपण एकदा मैलाच्या दगडाजवळ येतो, आणि मग पुढे चालत राहातो.

खरे तर आजकाल मैल वापरत नाही, आणि दगडही वापरत नाहीत. बहुतेक नवीन रस्त्यांवर, महामार्गांवर "अंतराचे फलक" किंवा "अंतराच्या पाट्या" असतात.

इंग्रजीतून मराठीकृत सर्वच शब्द टाकाऊ मानू नयेत. ज्या वस्तूचे आपल्याला प्राथमिक ज्ञान इंग्रजीतून झाले, त्याचा मराठी प्रतिशब्द इंग्रजीला समांतर असला तर काय वावगे? "मैलाचा दगड" ठीकच वाटतो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Dec 2007 - 3:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

माझे आजोबा मला मैलांत अंतर सांगायचे आणि मी बाबांकडे प्रश्नार्थक चेहेय्राने पहायचे. नक्कीच आजपासून काही वर्षांनी मैलाचा दगड हा वाक्-प्रयोग कालबाह्य होईल. आजच्या किती (भारतीय) मुलांना मैलाचा दगड (/milestone) समजेल? U.K. मधे मैलाचा दगड भाषेत अडथळा आणणार नाही, कारण तिथे अजूनही अंतरं मैलांमधे मोजतात.
प्रश्न फक्त अनुवादीत वाक्-प्रयोगांचा नाही तर कालबाह्य असण्या-नसण्याचाही आहे!

संहिता.

याबाबत उपक्रमावरील ही चर्चा वाचून गंमत वाटेल :
http://mr.upakram.org/node/899

खरे म्हणजे या बाबतीत १.६१ हा आकडा नेमका माहीत नसून साहित्यिक अर्थ लागतो. मैल हा गावा-गावामधील अंतरांसाठी उपयोगी असलेले कुठलेसे अंतर होते असा साधारण अर्थ माहीत असला म्हणजे पुरे.

तोळा-मासा, शेरास सव्वाशेर (म्हणजे नेमके किती वजन?)
क्षणभर थांब (क्षण म्हणजे किती सेकंद हो भाऊ?),
नमनाना घडीभर तेल (नेमके किती?),
पल पल दिल के पास तुम रहती हो (यह 'पल' कितना समय है?)
Give a camel an inch and he will take an ell. (हाऊ मच विल द कॅमल टेक, एग्झॅक्ट्ली?)
या सगळ्या ठिकाणी (कंसातला) प्रश्न न विचारताही काही अर्थ कळतो, आणि जेवढा कळतो तो पूर्ण असतो.

पण milestone च्या बाबतीत तुम्ही नवीन कुठला चित्रदर्शी शब्द वापरात आणायचे म्हणत आहात ते चांगलेच आहे. तसा सुटसुटीत शब्द कोणी वापरात आणला, तर मी वेळोवेळी जरूर वापरीन.

हा शब्द कसा वाटतो?
किंवा अमुक एका कलाकृतीनं त्या क्शेत्रात "मन्वंतर" घडावलं.
किंवा नवं युग आणलं किंवा "युगांतर " केलं असा वाक्प्रचार सध्याही आहे कि आपल्या मायभाषेत.

आपलाच,
मनोबा

धनंजय's picture

7 Dec 2007 - 6:08 pm | धनंजय

या बाबतीत माझे वाचन फार तोकडे आहे. या तोंडओळखीने या विद्रोही कवितांबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे, संग्रह मिळवून वाचीन. धन्यवाद धोंडोपंत!

नंदन's picture

9 Dec 2007 - 4:09 am | नंदन

म्हणतो. ढसाळ, खानोलकर यांच्याविषयी लिहिलेत तर वाचायला नक्की आवडेल.
बाकी आपल्या चौफेर लेखनाबद्दल बेसनलाडवाशी सहमत आहे.

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

धोंडोपंत's picture

8 Dec 2007 - 8:17 pm | धोंडोपंत

धन्यवाद धनंजयराव,

या बाबतीत माझे वाचन फार तोकडे आहे. या तोंडओळखीने या विद्रोही कवितांबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे, संग्रह मिळवून वाचीन. धन्यवाद धोंडोपंत!

आपले कुतूहल जागे झाले याचा आनंद आहे. विद्रोही साहित्य जरूर वाचा. माणसांनी आयुष्यात काय काय सोसलाय ते त्यातून कळतं.

गोलपिठाबरोबर १) मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे २) गांडू बगीच्या ३) या सत्तेत जीव रमत नाही ४) तुही इयत्ता कंची ही पुस्तकेही वाचा.

खरतरं कोणतेही साहित्य मनात कोणताही 'इझम' न ठेवता वाचले पाहिजे. तरच ते खर्‍या अर्थाने समजून घेता येते. पण अनेक लोकांना ते जमत नाही.

त्यामुळे ढसाळांच्या लेखनात काही वाक्ये वाचनात आली की, मनातला सुप्त 'इझम' जागा होतो आणि त्या साहित्यातील वेदना समजून न घेता त्याचे एकांगी मूल्यमापन केले जाते.

त्या पासून वाचले पाहिजे.

आपला,
(संतुलित) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

आरती प्रभूंच्या निवडक काव्यांचे जाहीर वाचन पु.ल. आणि सुनीताबाई देशपांडे करत असंत , पण त्यावरचे भाष्य ( निरुपण ? ) मात्र फारसे होत नसे. कदाचित कार्यक्रमाला वेळेचं बंधन असावं .

बर्‍याच कवितांना अर्थाचे एकापेक्षा अधिक पैलू असू शकतात, आणि आपण कविता विचारांच्या एकांगानेच वाचत असतो. त्या कवितेचा स्वभाव, तिच्यातल्या संवेदना समजून देणारे, त्यातला अर्थ उलगडणारे लेखन वाचायला निश्चित आवडेल.

खरतरं कोणतेही साहित्य मनात कोणताही 'इझम' न ठेवता वाचले पाहिजे. तरच ते खर्‍या अर्थाने समजून घेता येते. पण अनेक लोकांना ते जमत नाही. - हे अगदी खरे आहे.

जव्हेरगंज's picture

15 May 2016 - 5:27 pm | जव्हेरगंज

लै भारी !

बोका-ए-आझम's picture

16 May 2016 - 10:14 pm | बोका-ए-आझम

ढसाळ म्हणजे उकळत्या पाण्याने एखाद्याला झोपेतून उठवण्यासारखं आहे. गोलपिठा आणि दया पवारांचं ' बलुतं ' हे जबरदस्त आहेत.

मारवा's picture

15 May 2016 - 7:30 pm | मारवा

मस्त जव्हेरगंज मस्त धागा काढलात तुम्ही वर

त्यांच्या शिव्या खटकत नाहीत. कारण त्या इतक्या अस्सलपणे आलेल्या असतात की जखमेतून रक्त वहावे तशी ही कविता वहायला लागते.

किती समर्पक !

खूप आवडले लेखन.

महासंग्राम's picture

16 May 2016 - 4:41 pm | महासंग्राम

ढसाळ कायम आवडत्या कवींपैकी एक होते , आजही त्यांचे लिखाण वाचले कि आजूबाजूच्या परिस्थितीवर नजर पडल्याशिवाय राहत नाही. जव्हेरगंज भाऊ खूप सुंदर धागा वर आणलात