परबची अजब कहाणी---५
( भाग---१ https://www.misalpav.com/node/52354)
( भाग---२ https://www.misalpav.com/node/52356)
(भाग—३ https://www.misalpav.com/node/52365)
(भाग—४ https://www.misalpav.com/node/52367)
फ्रेनी, मी तुम्हाला सांगितले का? नाही? माझा बिल्डींग मटिरिअल सप्लाय करायचा बिझिनेस आहे. पोटापुरतं कमावतो. एक छोटसे ऑफिस आहे. त्या ऑफिसातच माझ्याशी संपर्क साधला गेला. त्यांचा प्रतिनिधी माझी भेट घ्यायला आला होता.
तो साधारण चाळीशीतला असावा. किंचित स्थूल. बोलणे गोड आर्जवी. ह्याला मी दोन चार वेळा पाहिला होता. पण हा “त्यांचा” माणूस होता अशी कल्पनाही कधी आली नव्हती.
“मी गजानन सदावर्ते.”
मला हसू आले. ह्याला काय वाटतंय कि मी लगेच हादरून जाईन, कबुलीजबाब देईन.
हे नाव वापरून झाले आहे. दुसरे काही नाव घ्या. असं त्याला सांगावेसे वाटलं. पण सांगितले नाही.
त्याचे माझ्या चेहऱ्यावर बारीक लक्ष होते.
पण मी निर्विकार! मख्ख.
“मिस्टर सदावर्ते, ग्लॅड टु मीट यू.” मी “सदावर्ते” वर जोर देत बोललो, “बोला काय काम काढल्यात?”
“ओह येस. मी “श्री होम्स” कडून आलो आहे. आम्ही डेवलपर आहोत. मी त्या कंपनीचा परचेस मॅनेजर. आमच्या कैक योजना सध्या कार्यान्वित आहेत. आम्हाला खडी, वाळू, पीओपी सारखा कच्चा माल तर दारे, खिडक्या, सॅनिटरी फिटीग्स यू नो व्हाट आय मीन. तुम्ही यातले वा या सारखे काय पुरवू शकाल? बल्क मध्ये. मार्केटपेक्षा कमी भावात आणि वेळेवर हा. गुणवत्ता आणि वक्तशीरपणा इज द इसेन्स. त्याबाबतीतील तुमची कीर्ति ऐकून मला इथे पाठवले गेले आहे. आमचे साहेब तुमच्यावर बेहद खूष आहेत बरका. तुमचं आणि त्यांचं छान जमेल. तेव्हा काय बोलता? हे माझे बिझिनेस कार्ड. आमचे ऑफिस? सध्या आम्ही साहेबांच्या बंगल्यातच थाटले आहे. तो वीस मजली टॉवर बनतो आहे ना तिथे ऑफिस स्पेस बुक केली आहे.”
साला इतका खोटा आणि नाटकी माणूस मी आयुष्यात कधी बघितला नव्हता. गुणवत्ता आणि वक्तशीरपणा! माझी कीर्ति. माय फूट! ही मोठी लिस्ट देतोय मला. दोन चार आयटेम मध्ये थोडा बहुत धंदा करणारा मी. हा मला गळ टाकतोय. धोका परब धोका. सांभाळून रहा रे बाबा. पण सत्त्याला सामोरे जायची संधी आपणहून माझ्या समोर उभी ठाकली होती, ती मी का बरे सोडावी? हे श्री होम्स वाले कोण लोक आहेत? त्यांनी माझ्यासारख्या नगण्य माणसाशी का बरे संपर्क केला असावा?
माझ्या डोक्यात विचार घोळू लागले. पुढे जाण्यात किती धोका आहे? का हे निव्वळ माझ्या मनाचे खेळ आहेत?
“सदावर्ते, घाई नाहीये ना? म्हणजे मला थोडा विचार करावा लागेल. एक म्हणजे मी ह्या व्यवहारात पडावे कि कसे. आणि पडायचेच झाले तर तुम्हाला कोटेशन द्यायच्या आधी होमवर्क करायला पाहिजे. त्याला वेळ लागणार नाही का? तेव्हा मी काय म्हणतो...”
“मान्य, अगदी मान्य. तुमच्या ऑफरची आम्ही वाट बघू पण जरा लवकर येऊ द्या.”
अशी बोलणी करून त्याने काढता पाय घेतला.
त्यानंतर पहिल्या प्रथम मी काय केले असेल तर आत्तापर्यंत मी केलेले खून, त्या मागील माझी भूमिका इत्यादी गोष्टींचा उहापोह करणारा एक प्रबंध स्वहस्ते लिहून तो एका लेखकाकडे (टीप: म्हणजे माझ्याकडे ) आणि “हा लिफाफा एका वर्षाने उघडावा” अशी वर नोट लिहून पाठवला, उद्देश एव्हढाच होता कि माझे काही बरे वाईट झाले तर माझे संशोधन विद्वतजनांपर्यंत पोचावे. मृत्युच्या छायेत वावरणारा माणूस जशी निरवानिरव करतो तसेच मी करत होतो. “त्यांना” भेटायला जायचे तर नावापुरते काही कोटेशन बनवले. त्यात काही दम नव्हता. दिलेल्या नंबर वर फोन केला.
“हलो, श्री होम्स चे ऑफिस का? मला सदावर्तेंशी बोलायचेय.”
“काय नाव म्हणून सांगू?” गोड आवाजाच्या मुलीने विचारणा केली.
“मी परब.”
थोड्या वेळाने सदवार्तेचा आवाज आला.
“बोला परब, झाली तयारी?”
“हो हो. भेटायला केव्हा येऊ?”
“केव्हाही या. आम्ही तुमचीच वाट पहात आहोत. आत्ता येताय? या.”
अशा तऱ्हेने मी स्वतःच्या पावलांनी चालत चालत सिंहाच्या गुहेत गेलो. तिथेच मला सारिका भेटली.
“सारिका ये अशी. ओळख करून देतो. हे परब. उभरते उद्योजक आहेत. आपल्या बरोबर त्यांना सहयोग करायचा आहे. परब, सारिका आमची स्टेनो आहे बरका. आपण जी चर्चा करू, त्याचा गोषवारा ती लिहील. पुढे मागे आपल्याला उपयोगी पडतील. तुमची काही हरकत नसणारच. काय बोलता?”
मी काय बोलणार? “उभरते उद्योजक” वगैरे आरती ओवाळून हा मला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होता.
माझा असा ग्रह होता की हा मला कोणाची तरी सुपारी देणार असावा. पण त्या मूर्खाला हे समजत नव्हते कि मी काही भाडोत्री खुनी नव्हतो. विश्वाचे कोडे सोडवण्याच्या मिशनवर निघालेला मी.
मानव हजारो वर्षापासून निरनिराळ्या मार्गांनी सत्याच्या जवळ जायचा प्रयत्न करत आहे. तो मार्ग तत्वाज्ञानाचा असो वा भौतिकी शास्त्राचा. ध्येय एकच.
इकडे सदावर्ते जिलब्यावर जिलब्या टाकत होता. इकॉनॉमी कशी गाळात चालली आहे. सिमेंट, वाळूचे भाव कसे गगनाला भिडले आहेत, साईटवरचे हरामी कामगार कसे कामचोर झाले आहेत, सप्लायर लोक मालात कशी भेसळ करतात, वजनात कसे मारतात...
“परब, माझी खात्री आहे कि तुम्ही त्यांच्यापैकी नाही...”
“अर्थातच नाही, मी धंदा करतो तो केवळ पोटापुरता. आपला नित्याचा खर्च निघाला कि बास. बाकी वेळ मी कोडी सोडवण्यात घालवतो.”
“कोडी? कसली कोडी?”
“हीच. म्हणजे वारा का वाहतो, फुले का फुलतात. पक्षी का गातात. नद्या का वाहतात, समुद्र का गरजत असतो. सदावर्ते साहेब, तुम्हाला म्हणून सांगतो, आपला देह ज्या मूळद्रव्यांपासून बनला आहे म्हणजे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन ह्यांचा उगम त्या बिग बँग मध्ये झाला आहे. त्या बिग बँग मधेच आपली कुंडली लिहिली गेली.”
“परब, मी सांगू का एक? बघा पटतंय का. तुम्ही हे खूळ डोक्यातून काढून टाका. अरे खाओ पिओ, मझा लुटो. चार दिनकी जिंदगानी. माझ्याकडे पहा. आपण कोडी सोडवत नाही, कोडी घालतो. क़्विझमास्टर!”
एकूण गोळी लागू पडली. सदावर्ते साहेब, या असे खुल्या मैदानात या.
पण सदावर्तेने स्वतःला सावरले. आपण फार लवकर फार जास्त बोललो ह्याची त्याला जाणीव झाली असावी,
“परब, यू मस्ट एक्स्क्यूज मी. आता मला मुंबईला जायचं आहे. पुढच्या आठवड्यात भेटू या का? आमच्या कंपनी तर्फे मी आपल्याला आज रात्री डिनरचे आमंत्रण देतो. मी नसणार. पण आमची प्रतिनिधी म्हणून सारिका आपल्याला कंपनी देईल.”
एकूण सारिकेला माझ्यावर "छू" करण्यात आले होते तर.
मी मनात म्हणालो, “चालेल.”
आणि उघड म्हणालो, “कशाला उगच तिला त्रास?
zzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzz
प्रतिक्रिया
26 Jul 2024 - 4:04 pm | श्वेता२४
जसजसे वाचत आहे तसतसे प्रत्येक भागामध्ये पुढील भागाची उत्सुकता वाढत आहे
26 Jul 2024 - 4:32 pm | गवि
वाह. जबरदस्त पॅरानॉईया वाटतोय परबचा. आणखीही काही लपलेले असू शकेल. पुभाप्र.