महाराज की जय..

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
4 Jul 2022 - 9:38 am

माझ्या नोकरीच्या निमित्ताने मी एका गावी राहात होते. माझ्या कडे एक १५/१६ वर्षांची मुलगी कामाला होती. वरकाम करायची. मी तिला शाळेतही घातलेली होती. तिच्या शिक्षणाचा खर्च मीच करायची. तिची आई माझ्याकडे काही जास्तीचं काम निघालं तर ते करायला यायची. तिचा नवरा दारुड्या होता. काबाडकष्ट करून मुलीचं,नवऱ्याचं आणि स्वतःचं पोट भरत होती. नेहमीचं चित्र.

एके दिवशी मी तिला विचारले,"उद्या माळा झाडायचाय. येशील का?" तर ती म्हणाली,"मला हजार रुपये उसने द्या. मला भगताकडं जायचंय."मी म्हटलं "का ग?भगताकडं का? तुला काही होतंय का?"

तिनं उत्तर दिले,"मला बाया आल्याती. उतरवायच्या आहेत."

मला काही कळलं नाही. मी बाया येणं हा प्रकार पहिल्यांदाच ऐकत होते. मी विचारले,"बाया म्हणजे काय?" आपल्या छातीकडे बोट दाखवत ती म्हणाली,"छातीत गाठी झाल्यात. बायांचा कोप झालाय माझ्यावर. बायांना उतरवलं पायजे. भगत उतरवतो."

मी म्हटलं,हे बघ. मी तुझ्या छातीत कुठं गाठ लागतीय ते बघू का चाचपून?"ती बर म्हणाली. तिनं चोळी सैल केली. मी चाचपून पाहिले तर माझ्या बोटांना गाठी लागल्या. मी तिला म्हटले,"ठीक आहे. गाठी आहेत. पण तू भगताकडं जाऊ नकोस. मी तुला उद्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. तिथं डाॅक्टरीणबाई तुझी गाठ तपासतील. तुला औषध देतील. त्या गाठी काढून,त्यांची तपासणी करतील. मी तुझ्या औषधपाण्याचा खर्च करेन. मी तुझ्याबरोबर दरवेळी येईन. तू काळजी करू नकोस."
तिनं होकारार्थी मान डोलावली. ती गाठ कॅन्सरचीही असू शकेल अशी मला भीती वाटली. पण मी तिला तसं बोलून दाखवलं नाही. दुसऱ्या दिवशी आमचं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जायचं ठरलं. मी ऑफिसात थोडी "उशीरा येते"असं सांगून सवलत घेतली.

दुसऱ्या दिवशी मी तिची वाट पाहत बसले. पण ती आलीच नाही. मी तिची तासभर वाट बघून ऑफिसात गेले. ती उद्या आली की तिला का नाही आलीस,असं विचारु असं ठरवून मी माझ्या कामात व्यस्त झाले. (त्याकाळी मोबाईल नव्हते.)

दुसऱ्या दिवशीही ती आलीच नाही. मी माझ्याकडे येणाऱ्या तिच्या मुलीला विचारलं,"काय ग,तुझी आई काल आली नाही,आजही आली नाही,काय झालं? तिला बरं नाही का?"

मुलगी म्हणाली,"ती कुठंच कामाला गेली नाही. ती काल भगताकडं जाऊन बाया उतरवून आली. उद्या पासून जाईल कामावर."

मी चाट पडले. मी तिला इतकं सगळं समजावून सांगितले तरीही ती भगताकडे गेलीच होती. त्या भगतानं काय विधी केले, ते मला माहीत नव्हतं. मुळात"बाया येणं"हा शब्दच मी पहिल्यांदाच ऐकला होता. बाया येणं,बायांचा कोप होणं म्हणजे काय हे मला माहीत नव्हतं. मी तिला भेटायला बोलावलं आणि एवढंच म्हटलं,"भगताकडे जाऊन आलीस ना? झालं ना तुझं समाधान? पण एकदा डाॅक्टरांकडे पण जाऊन ये."

"अवो वैनी, डॉक्टर काय करणार? त्याच्याच्यानं होणारं नाही हे काम !"

शेवटपर्यंत (दुर्दैवाने तिच्या शेवटापर्यंत), ती काही डाॅक्टरकडे गेली नाही. नंतर काही वर्षांनी, आम्ही जागा बदलून दुसरीकडे गेल्यावर ही कॅन्सरने वारली म्हणून कळलं.

दुसरं एक उदाहरण काही वर्षांनी घडलेलं! तेव्हा मोठ्या शहरात बदली झाली होती. माझ्याकडे एक बाई कामाला होती. तिला नवरा आणि दोन मुले होती. त्यातल्या एका आठ वर्षांच्या मुलाला एकदा ताप आला. त्याच्यासाठी ती लवकर घरी गेली. दुसऱ्या दिवशी सांगायला लागली की,मुलाचे डोळे पिवळे झालेत. लघवीला पण पिवळं होतंय. अंगात ताप होता. भूक मेलीय. कावीळ असेल काय? मी म्हटलं की, ताबडतोब डॉक्टरांकडे जा. खरंच कावीळ झाली असेल तर लगेच इलाज करायला हवेत. ती म्हणाली,"डॉक्टर काय करणार याला? हितं बाजूला वाडीत एक माणूस आहे. तो कावीळ उतरवतो. त्यांच्याकडे जाऊन कावीळ उतरवून आणते."

ती दुसऱ्या दिवशी सुट्टी टाकून वाडीत गेलीच.

मी गप्प बसायचं ठरवलं. बाई दहावीपर्यंत शिकलेली.मोबाईल, टीव्ही,फ्रीज (सेकंडहॅंड का होईना)वापरणारी, मोठ्या शहरात राहणारी. तरीही अशी अंधश्रद्धा बाळगणारी!

आपल्या देशात अनेक लोक असेच आहेत. आपण काही करू शकत नाही असे म्हणून हताश झाले.

एका निमशहरात मी नोकरी करत होते. तिथं माझ्या परिचयाचे एक डाॅक्टर आहेत. ते मेंटल हॉस्पिटलमध्ये काम करतात. मी त्यांच्याकडे सहज हा विषय काढला. त्यावर ते म्हणाले,"तुम्ही सांगितलेले बाया येणे, कावीळ हे तर शारीरिक आजार आहेत. पण कित्येक आजार मानसिक असतात. कित्येक माणसं मनोरुग्ण असतात. त्यांना मानसोपचार, आणि औषधं द्यायची आवश्यकता असते. पण हे त्यांना पटत नाही. खेड्यापाड्यात अंगात येणं,करणी करणं,भुतानं झपाटणं,झाडानं धरणं हे प्रकार सर्रास घडत असतात. ह्या अंधश्रद्धा आहेत हे त्या माणसांना कळत नाही. पटत नाही. आपल्या गावाकडून एस.टीनं शहरात येणं, डॉ क्टरांची फी देणं त्यांना परवडत नाही. मग ते जातात त्यांच्या भगताकडे, स्वामींकडे, महाराजांकडे. ते चमत्कार करतात. आपलं दुःख नाहीसे करतात अशी त्यांची श्रद्धा असते. मग मी काय करतो, अशा माणसांकडे माझी औषधांची बॅग घेऊन जातो. आणि त्यांना सांगतो की ही औषधे तुम्ही त्यांना अंगाऱ्याऐवजी,भस्माऐवजी द्या. तुमच्यावर त्यांचा विश्वास आहे. माझ्यावर नाही. ते बरे व्हावेत एवढीच माझी इच्छा आहे. तुम्ही दिलेली औषधे ते घेतील. मी ही औषधे विनामूल्य देतो. सोशल सर्व्हिस म्हणून! अंधश्रद्धा निर्मूलन करणं हे कठीण काम आहे. त्याला चिकाटी आणि सततचे प्रयत्न केले पाहिजेत. ते मी करु शकत नाही. मी एवढंच करु शकतो,जे मी आत्ता करतोय."

हे कितपत सुरक्षित आहे माहीत नाही, पण त्यांनी एक डॉक्टर म्हणून पूर्ण विचार केला असेलच. त्यांचा उद्देश खूपच चांगला होता. कळकळ होती. त्या डॉक्टरांबद्दलचा माझा आदर दुणावला. त्यांना नमस्कार करून मी म्हटलं "तुम्ही ग्रेट आहात."

समाजजीवनमानप्रकटनविचार

प्रतिक्रिया

आंबट गोड's picture

4 Jul 2022 - 11:23 am | आंबट गोड

लिहीलं आहे.
पण त्या डॉक्टरांचं पटलं नाही...अशा सरसकट गोळ्या कशा देणार? प्रत्येकाचा आजार वेगळा, त्याची ट्रीटमेंट वेगळी! त्यांचा सदहेतू असेलही .पण.....
हे बाया येणं मीही पहिल्यांदाच ऐकलं.....फारच भयंकर!!

गवि's picture

4 Jul 2022 - 12:49 pm | गवि

लेख उत्तम, सहमत.

डॉ च्या औषध देण्याबद्दल प्रथम असेच काहीसे वाटले. पण ऑन सेकंड थॉट

1. तुलना ही स्टँडर्ड ट्रीटमेंटशी नसून अघोरी उपायांशी आहे.
2. डॉ अभय बंग/ राणी बंग यांनी केलेले कार्य अवचट यांच्या लेखात वाचले आहे. डॉ बावीसकर यांचेही.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, खेड्यात, लहान गावांत अगदीच पूर्ण तांत्रिकमान्त्रिक यांच्या हाती कण्ट्रोल असण्यापेक्षा तुलनेत अशिक्षित स्थानिक दाई किंवा तत्सम लोकांना "barefoot doctors" बनवून काही किमान औषधे त्यांच्या तर्फे पोचवणे हे जास्त चांगले. दुसर्या पारड्यात शून्यच आहे.

त्यांनी नीट अभ्यास करुन त्यातल्या त्यात सेफ औषधे निवडली असं वाचण्यात आलं आहे. (संदर्भ: डॉ अवचट यांचे डॉ बंग आणि बाविस्कर यांच्यावरील लेख). डोस, प्रमाण हेही त्या दायांना समजावून दिलं होतं.

त्या डॉक्टरची जागा घेऊ शकत नाहीत पण किमान काही जीव वाचवू शकतात (न्युमोनीया, डायरीया)

मानसिक आजाराबाबत औषधे जास्त डेंजरस असू शकतात. त्या डॉ नी औषधे विचारपूर्वक निवडली असतील आणि किती द्यायची हे लक्षणानुसार सांगितले असेल असे असल्यास प्रयत्न स्तुत्य वाटतो असे वै.म.

चित्रगुप्त's picture

4 Jul 2022 - 12:18 pm | चित्रगुप्त

वाचनीय धागा. नवीन माहिती मिळाली. धागा जास्त लोकांनी वाचावा म्हणून लेखाचे शीर्षक बदलून "अंगावर बाया आल्या" असे ठेवता आले तर बघावे असे सुचवावेसे वाटते.

सस्नेह's picture

4 Jul 2022 - 12:48 pm | सस्नेह

हॉरिबल.
लहानपणी ग्रामीण भागातील शाळेत एक वर्ष काढलं तेव्हा अंगात येणे हा प्रकार पाहिला आहे. वर्गात बसल्या बसल्या एका मुलीच्या अंगात यायचं. वय वर्षे दहा.

Nitin Palkar's picture

4 Jul 2022 - 1:21 pm | Nitin Palkar

सुमारे पन्नास वर्षांपूर्वी 'बाया येणे' हा वाक्प्रचार देवी येण्यासंदर्भात वापरला जाई. खेडेगावातील अशिक्षित लोकांमध्ये अज्ञान व त्या मुळे अंधश्रद्धा असणे समजू शकतो. पण मुंबईसारख्या शहरात आजच्या काळात सुशिक्षित दिसणाऱ्या व्यक्ती देखील मंदिरासमोर बांधलेल्या गायीला (जर्सी) चारा घालुन, कबुतरांना चणे घालून आणि भटक्या कुत्र्यांना दुध पाजून, बिस्किटे अथवा घरातल्या उरलेल्या शिळ्या चपात्या चारून पुण्यसंचय करतात तेव्हा आपण नक्की कुठल्या युगात आहोत असा प्रश्न पडतो.

श्वेता व्यास's picture

4 Jul 2022 - 3:13 pm | श्वेता व्यास

अवघड आहे, काही श्रद्धा या अंधश्रद्धा असतात हे अशा लोकांना लवकर कळो.

Nitin Palkar,


मुंबईसारख्या शहरात आजच्या काळात सुशिक्षित दिसणाऱ्या व्यक्ती देखील मंदिरासमोर बांधलेल्या गायीला (जर्सी) चारा घालुन, कबुतरांना चणे घालून आणि भटक्या कुत्र्यांना दुध पाजून, बिस्किटे अथवा घरातल्या उरलेल्या शिळ्या चपात्या चारून पुण्यसंचय करतात तेव्हा आपण नक्की कुठल्या युगात आहोत असा प्रश्न पडतो.

नेमका प्रश्न आहे. मुंबईसारख्या शहरात आजच्या काळात सुशिक्षित दिसणाऱ्या व्यक्ती देखील करोनाच्या थोतान्दावर विश्वास ठेऊन लस घ्यायला धावतात. तेव्हा आपण नक्की कुठल्या युगात आहोत असा प्रश्न पडतो.

मेकॉलेछाप शिक्षणामुळे अंधश्रद्धा वाढीस लागतात.

आ.न.,
-गा.पै.

सुबोध खरे's picture

5 Jul 2022 - 9:56 am | सुबोध खरे

कोणत्याही लेखात तुमचे करोनाच्या लशीबद्दल तुणतुणं कशाला आणताय?

तुम्हाला पटत नाही, मान्य आहे

त्यासाठी तुम्ही वेगळा लेखही पाडला आहे.

मग ते धुणं इथे कशाला धुताय?

गामा पैलवान's picture

5 Jul 2022 - 5:03 pm | गामा पैलवान

सुबोध खरे डॉक्टर,

मेकॉलेछाप शिक्षणामुळे झालेली वैचारिक हानी अधोरेखित करण्यासाठी मी करोना व लशीचं तुणतुणं वाजवीत आहे.

आ.न.,
-गा.पै.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Jul 2022 - 6:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उत्तम लेखन. लिहिते राहा आजी.

-दिलीप बिरुटे

प्रकाश घाटपांडे's picture

5 Jul 2022 - 9:12 pm | प्रकाश घाटपांडे

आजी औषध उतारे आणि आशिर्वाद हा पुस्तक परिचय जरुर वाचा. तुमचा लेख वाचल्यावर त्याची आठवण झाली. तुमच्या परिचयातल्या डॉक्टरांची आयडीया आवडली.

प्रकाश घाटपांडे's picture

9 Jul 2022 - 6:00 pm | प्रकाश घाटपांडे

डॉक्टरांनी भगताकडे दिलेली औषधे शारिरिक व्याधींसाठी होती कि मानसिक व्याधींसाठी होती? यावर काही प्रकाश टाकता येईल का? भगताने रुग्णाची लक्षणे डॉक्टरांना सांगून मग त्यांनी दिलेली औषधे संबंधित रुग्णाला दिली असतील तर काही गुण आला असेल. हे कितपत सुरक्षित आहे माहीत नाही, पण त्यांनी एक डॉक्टर म्हणून पूर्ण विचार केला असेलच हे आपण गृहीत धरले आहे. मेडिकल एथिक्स मधे हे बसत नसावे पण डॉक्टरांच्या एथिक्स मधे त्यांनी हा निर्णय घेतला असावा.

भीमराव's picture

6 Jul 2022 - 8:10 am | भीमराव

यातला, कावीळ उतरवणं हा पारंपरिक औषध उपचार आहे अंधश्रद्धा नाही. झाडपाल्याची औषधे खाऊ घालतात उतरवणारे. त्या औषधांच्या प्रभावामुळे कावीळ बरी होते.

तुषार काळभोर's picture

6 Jul 2022 - 10:13 pm | तुषार काळभोर

गावी आणि इतर नातेवाईकांत दोन महिलांना कर्करोग झाला होता. दोघी गेल्या. सुरुवातीपासून वैद्यकीय उपचार सुरू होतेच. पण जेव्हा उपचारांचा काहीच उपयोग नाही, असे दिसून आले तेव्हा शेवटची आशा म्हणून देवाचं वगैरे बघायला त्यांच्या कुटुंबीयांनी सुरुवात केली. दोन्ही वेळा त्यांना (मोठ्या बायांचं) आहे असं सांगितलं गेलं होतं. हा प्रकार लेखात उल्लेख केलेल्या प्रकारासारखाच असेल हे नक्की. आमच्याकडे म्हणजे हवेली आणि पुरंदर तालुका.

अलिकडील काळात कोविड, कॅन्सर वगैरेमुळे मृत्यु पावलेले बरेच लोक ठाऊक आहेत. मृत्युपूर्वी इस्पितळात उपचारांच्या नावाने कित्येक लाख रुपये उकळून झाल्यावर शेवटी आता 'देवाच्या हातात' सर्वकाही आहे असे सांगून डॉक्टर मंडळी हात झटकून मोकळी झाल्यावर ती व्यक्ती (जणु आता पुढील उपचारासाठी -) देवाघरी जाते असे सर्वच केसांमधे घडलेले दिसले. अशी अनेक उदाहरणे सर्वांनीच बघितलेली असल्याने "नको तो डॉक्टरी इलाज" असे वाटणे स्वाभाविकच आहे.
आमच्या जवळच्या नात्यातील एका स्त्रीचा भाचा स्वतः एम. डी. डॉक्टर असल्याने कॅन्सरवर किमोथेरॅपी वगैरेच्या नादी न लागता उरलेले काही महिने आयुष्याचा जास्तीत जास्त आनंद लुटून घ्या असा त्याने सल्ला दिला आणि त्या बाई तशाही स्थितीत अमेरिकेला आपल्या लेकीचे नवे घर बघायला गेल्या. मग शेवटल्या दिवसापर्यन्त खरेदी, खाणे-पिणे, नातेवाईकांना भेटणे वगैरे त्यांना वाटेल ते करत राहून शांतपणे मृत्युला सामोर्‍या गेल्या. याउलट जवळच्या नात्यातील एक अन्य व्यक्ती वर सांगितल्याप्रमाणे इस्पितळाचे चक्कर, किमो आणि अन्य इलाज यात लाखो रुपये खर्च करत अत्यांत कष्टमय परिस्थितीत मृत्यु पावली. या व्यक्तीची इस्पितळातील डॉक्टरवर तशीच 'श्रद्धा' होती, जशी या लेखातील व्यक्तींची भगत, बुवा वगैरेंवर.
या दोन्ही व्यक्तींचे शेवटले दोन-तीन महिने त्यांच्या निकट संपर्कात असल्याने मी हे खात्रीपूर्वक सांगू शकतो आहे.

श्वेता व्यास's picture

7 Jul 2022 - 3:59 pm | श्वेता व्यास

अगदी सुरुवातीला कॅन्सरबद्दल समजले तरच इस्पितळातील उपचारांचा उपयोग होतो. माझ्या नात्यातीलच सुरुवातीला समजलेले आणि थोडं उशीरा समजलेले यातला फरक पाहिला. सुरुवातीला समजलं त्यांना इस्पितळातील उपचारांचा फायदा झाला. आता बऱ्या आहेत. उशिरा समजलेले ३-४ जण यांनी उपचार नसते घेतले तर यांचं शेवटचं आयुष्य जास्त बरं गेलं असतं असं वाटून गेलं. शेवटी ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न.

प्रकाश घाटपांडे's picture

8 Jul 2022 - 8:51 am | प्रकाश घाटपांडे

माझ्या बहिणीला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान तसे उशीरा झाले. तिला मल्टिपल कॉम्प्लिकेशन्स होती. वय व प्रकृती व उपचारांना प्रतिसाद या गोष्टीचा विचार करुन ऑपरेशन करु नये असा एक मतप्रवाह होता. त्याने फार तर मरण लांबणीवर पडेल. पण डॉक्टरांचे मत होते कि उपचार केले तर आजार मॅनेजेबल राहिल अन्यथा शारिरिक वेदना होण्याचा संभव आहे. मी काही डॉक्टरांची मते घेतली तर आधुनिक विज्ञानात सुविधा आहे तर त्या घेणे हे रॅशनल आहे. खरं तर माझी बहिण म्हणत होती की आता उपचार नको. जे व्हायच ते होउ द्यात. पण डॉक्टराच्या सल्ल्यामुळे उपचार केले. उपचारा नंतर सहा महिन्यातच ती गेली. वर्षभरात हॉस्पिटल मधे दहा बारा अ‍ॅडमिशन्स झाल्या. वैद्यकीय विम्यामुळे काही खर्च वाचला.

आंबटगोड -ते डॉक्टर सरसकट गोळ्या देत नव्हते. भगताबरोबर अधे मधे बाजूला स्वतः हजर राहून , लक्षणं बघून नंतर भगताकरवी गोळ्या देत होते.

गवि-तुमच्या अभिप्रायावर वर उत्तर दिले आहे.

चित्रगुप्त -तुमचं म्हणणं बरोबर आहे. तुम्ही सुचवलेले शीर्षक अधिक समर्पक.
सस्नेह -तुम्ही वर्णन केलेला प्रकार भयानक आहे.
Nitin Palkar-खरंय तुमचं म्हणणं.
माणसाच्या मनात खोलवर रुजलेली असुरक्षितता आहे ही!
श्वेता व्यास-तुमच्याशी सहमत.
गामा-तुम्ही Nitin Palkar यांना उत्तर दिले आहे.

प्रा.डाॅ.दिलीप बिरुटे -धन्यवाद.लिहिती राहेन.
प्रकाश घाटपांडे -तुम्ही सांगितलेला पुस्तक परिचय जरुर वाचेन. तुमच्या दुसऱ्या अभिप्रायाला सुरुवातीला उत्तर दिले आहे.

भीमराव -असेलही.But I beg to differ.
तुषार काळभोर -तुमची उदाहरणं पटली.

चित्रगुप्त -तुमचं उदाहरण समर्पक. आवडलं. ग्रेट.
श्वेता व्यास-तुमच्याशी सहमत.
प्रकाश घाटपांडे -तुम्ही दिलेलं उदाहरण पटलं.

सर्वांना अभिप्रायाबद्दल धन्यवाद.