एक घर बनाउन्गा ??

शेर भाई's picture
शेर भाई in काथ्याकूट
16 Oct 2021 - 6:01 pm
गाभा: 

आपल्याला फुकट वस्तूंचे आकर्षण का असते?? हा प्रश्न आजकाल सारखा माझ्या समोर टपकायला लागला आहे. त्याला कारण आहे आमच्या इमारतीचा पुर्नविकास. आधी अस्मादिक स्वयंविकास या शब्दाने खूप भारलेले होते. पण नंतर अभिहस्तांतरण प्रक्रिया हा एक खूप चिवट प्राणी आडवा आला. त्यात आमच्या इमारतीची हस्तांतरण प्रक्रिया करणे आमच्या पूर्वज कार्यकारिणीने जाणीवपूर्वक टाळले होते. कारण कोणी म्हणे म्हाडा नामक बागुल बुवा आहे आणि तो नुसता खातो. त्यामुळेच का होईना, कार्यारिणीतील इतर सगळ्यांच्या मते आम्ही बिल्डर नामक जमातीला सामोरे जायचे ठरवले. आणि तसेही बिल्डर नामक जमात म्हाडा नामक बागुल बुवाची मालक असते म्हणे.

बर हि बिल्डर नामक जमात त्यांच्या दिमतीला PMC म्हणून कोणी दूत ठेवतात. खर म्हणजे हे PMC गृहनिर्माण संस्थेचे हित बघतात अस पण म्हणे आणि म्हणेच. काही PMC तर स्वतः Architect पण आहेत काही जण Mediator ची काम पण करतात.

तर असेच काही Mediator PMC आम्ही बोलावलेले नसताना आमच्याकडे आले आणि म्हणू लागले कि अमुक तमुक साहेब तुमच्या बरोबर काम करायला उत्सुक आहेत. तेव्हा आमच्या कार्यारिणीतील मान्यवर लगेच उड्या मारून आमची मिटिंग त्या साहेबांसोबत लावतात. तर आता आमच्या बैठकींच एक प्रारूप ठरल आहे, ते पुढील प्रमाणे:
ठरल्या दिवशी ते साहेब वेळेपेक्षा उगीच एक तास उशीरा येतात आणि आल्या आल्याच सुरुवातीला म्हणतात तर म्हणे म्हाडाची तुमची सगळी काम दोन दिवसात अब्रा का डब्रा करून टाकतो. ह्याव करतो त्याव करतो, बाकी सगळ आम्ही बघतो फक्त तुम्ही काय घेणार ते सांगा आणि आम्हाला आमच्या पद्धतीने काम करू द्या. ज्या कार्यकारिणी मान्यावरांनी ह्या साहेबाला आणलेले असते त्यांची, PMC आणि या साहेबांची नेत्र पल्लवी अशा वेळेस लपून राहत नाही.

ह्या अशाच कार्यकारिणी मान्यावरांनी इतर सभासदांमध्ये अभिहस्तांतरण प्राण्याची अशी प्रतिमा तयार केली आहे, कि जणू आमचा पुनर्विकास म्हणजे उंच हवेलीतील राजकन्या आहे, जिच्या हवेलीभोवती अभिहस्तांतरण प्राणी गुरकावत फिरत आहे, आणि बिल्डर साहेब म्हणजे कोणी उमद्या घोड्यावरून आलेला देखणा राजपुत्रच. त्यात म्हाडा बागुल बुवा मध्येच थकीत सेवाशुल्क, ह्याचे शुल्क त्याचे शुल्क अशी आपली शल्ये आम्हाला त्रास द्यायला पाठवतच असतो. बर, जर शांतपणे विचार केला तर हि सगळी शुल्के भरायची म्हटली तर फार फार तर काही शे – लाख लागणर आहेत. त्यामुळे उद्या खरोखरच पुर्नविकास करायचा म्हटल तर हि रक्कम उभी करणे आम्हाला सगळयांना मिळून अशक्य नाही. आणि इथेच फुकट वस्तूंचे आकर्षण जोरात बोंबलायला लागते. का तर म्हणे ते बिल्डर साहेब आपले सगळे पैसे भरणार आहेतच शिवाय आपल्याला Corpus देणार आणि जागा पण!!!!

आमचे फक्त एव्हढेच म्हणणे आहे कि आपण जर पुर्नविकास आपल्या जागेचा करणार आहोत बिल्डर साहेबांनी आमच्या म्हणणे ऐकावे. जस कि आम्हाला किती क्षेत्रफळाच्या सदनिका हव्यात आणि आम्हाला किती वाढीव सभासद हवेत. पण अस होताना दिसत नाही आणि उगाच आमचा मनस्ताप वाढत आहे. ह्या फुकट्याचे आकर्षण असणाऱ्या लोकांना कसे पटवावे कि पुर्नविकास हा सगळयांचा सगळयांना सारखाच मिळायला हवा.

जाणकारांच्या सल्ल्याचा प्रतीक्षेत.

प्रतिक्रिया

mangya69's picture

16 Oct 2021 - 6:08 pm | mangya69

आज काय सगळे म्हाडावरच धागे निघत आहेत
एकाने फ्लॅटवर धागा काढला
तर एकाने अख्ख्या बिल्डिंगवरच धागा काढला.

शेर भाई's picture

16 Oct 2021 - 6:21 pm | शेर भाई

हा म्हाडावर नाही, तर पुर्विकासावर आहे. मान्य आहे कि यात म्हाडा आहे, पण सध्या ते एका कोपऱ्यात आहे. तुमच्याकडे गार करणारा सल्ला असेल तर तुमच्या सल्लागाराच्या भूमिकेचे स्वागत.

mangya69's picture

16 Oct 2021 - 8:01 pm | mangya69

कसला पर्याय ?

जेवढ्याला तेवढ्याच लोकांनी बांधला तर तुम्हाला पदरचा खर्च करावा लागेल , वाढीव मिळेल , तेवढे बांधायची तयारी प्रत्येकाची नसणारच.

बिल्डरला दिलेत तरी फारसा वाढीव मिळणार नाही, नैतर मग बिल्डर काय खाणार ?

mangya69's picture

16 Oct 2021 - 8:04 pm | mangya69

सध्या गावातही अशीच लफडी सुरू आहे
पूर आला , पाऊस आला , वाडा मोडला ,
3000 , 5000 क्षेत्रफळ आहे , पण स्वतः बांधून त्यात रहाणार कोण ? पैसाही नाही

बिल्डरला द्यायचे तर गावात एफ एस आय 1.5 च मिळतो , त्यात बांधणार किती आणि दोघे वाटून घेणार किती ?