सण आणि आपण

Primary tabs

नीलकंठ देशमुख's picture
नीलकंठ देशमुख in जनातलं, मनातलं
9 Sep 2021 - 3:42 pm

गौरी/ महालक्ष्मी चा सण येताहेत..
महाराष्ट्रात याचे फार महत्त्व.स्त्रीयांसाठी विशेष.
हा एक प्रकारचा कुलाचार, कुलधर्म. तीन दिवसाचा.
पहिल्या दिवशी संध्याकाळी गौरी/महालक्ष्मी चे
आगमन व प्रतिष्ठापना असते.दुसरेदिवशी मुख्य पूजा व महा नैवेद्य .तिसरे व शेवटचे दिवशी निर्गमन. पुन्हा पुढील वर्षी येण्यासाठी.
भारतीय संस्कृती मधे बहुतेक सणामागील हेतू मानवाचे निसर्गाशी असलेले नाते दृढ व्हावे,त्याची कृपा सदैव आपल्या वर राहावी,'त्याच्या' प्रति कृतज्ञता व्यक्त करावी हाच आहे असे म्हटले जाते.
आपल्या पोषणासाठी ,भरभराटी साठी धान्य, फळे, भाज्यां, वनस्पती आणि इतर अनेक वस्तू धरणी माते कडून मिळतात .पाणी , वारा ,प्रकाश, आकाश ही तत्वे पण त्या साठी सहाय्यभूत असतात.म्हणून पंचमहाभूतांचे
व मुख्य तत्व धरतीचे ,म्हणजे त्या शक्तींचे पूजन करणे,त्यांचे प्रतिकृतज्ञता व्यक्त करणे,आणि पूढेही कायम कृपा राहावी म्हणून प्रार्थना पूजा ही भावना व श्रध्दा या मागे  प्रबळ असावी.
सामान्य लोकांना निर्गूण रूप समजण्यास कठीण असते. म्हणून सगूणस्वरुपात  महालक्ष्मीची प्रतिष्ठापना. त्यासाठी मृत्तिकेचे मुखवटे वापरायचे. कोकणात व इतर काही ठिकाणी अजूनही हीच पध्दत आहे.
हळूहळू त्यात बदल होत शाडू वा धातू चे मुखवटेआले. काहींनी कल्पकतेने त्याला पूर्ण मानवी स्वरूपात साकार केले. सजविले. कुठे पूजे साठी फक्त महालक्ष्मी चे मुखवटे ,तर कुठे भांडे वा तयार मांडण्याचे मदतीने दोन उभ्या स्त्रीयांचे आकर्षक रुप साकार.जेष्ठा व कनिष्ठा या रूपात. कूठे सोबत छोट्या बाळांच्या प्रतिमा असतात . भरल्या संसाराचे प्रतिक म्हणून. कुठे केवळ धान्याच्या राशी ची पूजा .धन व धान्याची पूजा.
आपापल्या कल्पनेने
मांडणी ,आरास ,सजावट .स्त्रीयांना ( बहुतेक)कल्पनाशक्तीने अंगी असलेल्या
कलेचा अविष्कार करण्यासाठी मुक्त संधी या निमित्ताने मिळते.हे सगळे कुटुंबाच्या आपापल्या परंपरा, प्रथेनुसार. आणि मुख्यत्वे प्रत्येकाचा उत्साह ,श्रध्दासोय ,कुवत ,वेळ इ.नुसार असते.महालक्ष्मीच्या प्रतिमांची  मांडणी पासून ते आरास ,पूजा ,पूजेचे साहित्य, नैवेद्य खाद्य पदार्थ,आरत्या इ पर्यंत सर्व गोष्टी आपापल्या कुटुंबाचे प्रथा परंपरेनुसारच व्हायला हवे असा बहुतेक ठिकाणी अट्टाहास असतो. त्यात कुठलीही चूक नको याविषयी मंडळी,विशेषत: स्त्रीया जागरूक वअति संवेदनशील असतात.अर्थात
या प्रथा परंपरा मधेही घरोघरी भिन्नता असते. महालक्ष्म्या पूर्ण रुपात उभ्या की नुसत्याधान्याच्या राशी?की फक्त मुखवटे?मुखवटे धातूचे,मातीचे की शाडूचे? उभ्या असल्यास भांड्यावर मांडायच्या की तयार मांडणीवर?पुजेसाठी साहित्य कुठले ओवाळण्यासाठी,आरतीसाठीकुठल्या प्रकारच्या वाती  वापरायच्या?मुख्य पुजा व जेवण केव्हा ?दुपारी की संध्याकाळी?
जेवणात व फराळात पदार्थ कुठले?हे तपशील फार महत्वाचे .यात थोडासा ही बदल झाला तर मोठे अरिष्ट ओढवेल ही भिती मनातून असते .
पूजा साग्रसंगीत होणे अपेक्षित असते.हे काम मुख्यत्वे पुरुष मंडळी कडे असते .त्यांना यात किती स्वारस्य व वेळ असेल त्या वर पूजा साग्रसंगीत होईल की उरकली जाईल हे अवलंबून. नेमका त्याचवेळी टिवीवर क्रिकेट सामना वा इतर आवडता कार्यक्रम असेलकिंवा ईतर 'जास्त "महत्वाचे काम असेल तर एक डोळा व कान व चित्त तिकडे असण्याची शक्यता जास्त.पूर्वी पूजा सांगणे साठी भटजी सहज उपलब्ध असत. हल्ली ते अवघड झाले आहे. मग पुस्तकात पाहून किंवा ऑडीओविडीओ
माध्यमांचे मदतीने पूजा केली जाते .हल्लीतर ऑनलाईन पूजेची पण  सोय उपलब्ध करून दिली जाते. महानैवेद्यासाठी पुरणपोळी हवीच .त्याशिवाय किती व कुठल्या भाज्या,?कोशिंबीरी,गोड पदार्थ, खिरी ,लाडू, तळणाचे पदार्थ किती व कोणते? पंचामृत,चटण्या (सुक्या व ओल्या)आणि कायकाय.आणि मुखवासासाठी तांबुल तर हवाच .
मुख्य पुजा संध्याकाळी असेल तर दुपारी साध्या पुजेला नैवेद्य म्हणून व खरेतर घरातील मंडळीच्या पोटपूजेसाठी फराळ.त्यासाठी चकल्या ,करंज्या ,लाडू साटो-या,अनारसे ,खिचडी इ.अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ. ह्याचे
विषयी कुटुंबा कुटुंबात भिन्नता आढळते.जेवण व फराळाच्या पंगतीत अग्रक्रम असल्यास ब्राम्हण व सवाष्ण,बच्चे कंपनी ,आणि पुरुष मंडळी यांना. स्त्री वर्ग मात्र शेवटी.सवाष्ण कुठल्या जातीचे असावी ते त्या त्या कुटुंबाचे प्रथेनुसार असते.
नैवेद्यासाठी आवश्यक सोळा भाज्या माळ्याकडून मिळत म्हणून गावी आमच्या घरी माळी जातीतील सवाष्ण असे.हल्ली ते शक्य होत नाही.आता बाजारात पावकिलोत सोळा भाज्या एकत्र मिळतात. पूर्वी सारखे तब्येतीने खाणारे कुठे आहेत?असो.जेवणाचे आधी, महानैवेद्यानंतर एक महत्त्वाचा
उपचार असतो तो आरतीचा.आरती म्हणजे देवाची स्तुती व प्रार्थना असणारी कवने.तो प्रसन्न होउन त्याची कृपा दृष्टी आपल्या वर आपले कुटुंबात राहावी हाच हेतू.आरत्यांच्याचाली पारंपारिक.आणि क्रम ही ठरलेला.त्यात पण चूक झालेली चालत नाही. प्रथम गणपतीची,नंतर देवीची ' दुर्गे दुर्घट भारी' .त्यानंतर आपापल्या कुटुंबाचे प्रथेनुसार शंकर ,दत्त, हनुमान ,मुंजा, कुलदैवत, बालाजी ,कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजाभवानी, माहूरची रेणुका, सप्तश्रंगी इ.आणि शेवटी विठ्ठलाची आरती असा क्रम. .अनेक ठिकाणी आपापले गुरू महाराज,वेगवेगळे संत विभुती यांच्या ही आरत्या म्हणल्या जातात. हा सोहळा एक तासभर किंवा जास्त ही लांबू शकतो .म्हणणारे मंडळीला उदंड ऊत्साह असतो.पण बाकीलोक,
बच्चे कंपनी कंटाळते.सगळे लक्ष जेवणाकडे. कांही घरात मात्र आरत्या पाच मिनीटात ही आटोपल्या जातात.सामुदायिक रित्या ,टाळ,घंटा,टाळ्या वाजवत योग्य पध्दतीने सूरात तालात आरत्या गायिल्या तर पवित्र वातावरण निर्माण होते.वेगळी अनुभूती येते.पण बेसूर ,भसाड्या आवाजात ,चूकीच्या पधद्तीने ,नको ते अनावश्यक शब्द घुसडून आरत्या गाण्याचा (?)अट्टाहास का केला जातो असा नेहमी प्रश्न पडतो.अशा आरत्या
ऐकून देव प्रसन्न होतील की कंटाळतील? गणपतीची आरती रामदासांनी सतराव्या शतकाचे मध्यावर रचली .तर 'दुर्गे दुर्घट भारी' ही नरहरीने एकोणीसावे शतकाचे शेवटी लिहिली. इतर अनेक आरत्या तर अगदी अलीकडेच लिहिलेल्या.त्या आरत्या रचल्या जाण्याचे पूर्वी ,आपले पूर्वज कुठल्या प्रकारे देवाची स्तुती प्रार्थना करत असतील ?असा विचार  कधी  कुणी करत नाही.कालौघात आरत्यांमधे अनेक नको ते शब्द घुसडले गेल्याने त्या मुळ शुद्धस्वरूपात राहिलेल्या नाहीत. हे ध्यानात घेतल्यास अमूक आरती चूक का असेना म्हणलीच पाहिजे हा अट्टाहास किती चुकीचा आहे हे कळेल. हल्ली अर्थासहीत शुद्ध स्वरूपात आरत्या उपलब्ध असतात.तो अर्थ लक्षात घेउन शुद्ध स्वरूपातच म्हणणे योग्य.ते शक्य नसेल तर ऑडीओ स्वरुपात सुरेल आवाजात उपलब्ध आरत्यां चा पर्याय का वापरू नये?पण  लक्षात कोण घेतो?आरत्यां मधून कवी देवाकडे काही मागणे मागतो.
उदा."दुर्गे दुर्घट भारी " या आरती मधे दुसरे कडव्यात ,"क्लेषापासून सोडी (त्या नंतर मुळ आरतीत नसलेला ,'दुःखापासून 'हा समानार्थी शब्द घुसडलाय ते सोडा)तोडी भवपाशा "अशी आर्त विनवणी नरहरी करतो.
आपण सारेच ,मी ,माझी मुले ,माझे कुटुंब ?माझे स्वकीय,या परिघात गुंतलेले असतो. हाच भवपाश आहे.माझे व माझ्या "आपल्यांचे " सारे काही चांगले व्हावे,अशी भावना असणे स्वाभाविक आहे, त्यात चूकीचे काही नाही. पण त्या पूढे ही ,जे आहे, त्यापेक्षा आणखी भौतिक सुखे मिळावी,(या वाटण्याला अंत नाही)इतरांपेक्षा "आमच्या "कडे जास्त असावे ,असे वाटते . (इतरांकडे आपल्या पेक्षा कमी वा काहीच नसावे असे पण कांही ना कांही वेळा वाटते)बरे आपल्याला जे असावेसे वा नसावेसे वाटते तसे सदा सर्व काळ असते वा नसते असे नाही.म्हणून तर  दुःख असते. ह्यातून सुटका हवी असेल तर" मी ,माझे ,आम्हालाच हवे ,आणखी हवे" ह्यातून बाहेर पडता यायला हवे.जे जसे आहे त्याचा स्वीकार करता आला पाहिजे. या भवपाशातून सुटावे असे आपल्याला मनापासून
वाटते का? हा प्रश्न आहे. जर वाटत नसेल तर देवाकडे तशी विनवणी करणारी आरती म्हणून काय उपयोग?
जे नको आहे ते केवळ तोंडाने म्हणणे ही विसंगती नाही का?फसवणूक नाही का?अन् कुणाची ?अशा अनेक विसंगती बाळगतच आपण जगत असतो फसवतोअसतो खरे तर स्वतःलाच.
परंपरेने आलेल्या गोष्टी सण,कुलाचार आवश्य साजरे करावेत. श्रध्दा जगण्याला बळ देते .श्रध्दा असणेगैर नाही. पण ती अंधश्रद्धा नसावी.
आपण  करतो,ते  केवळ कर्मकांड.सोपस्कार. पूर्वापार चालत आले म्हणून. अज्ञान व अंधश्रध्देतून.खरेतर भितीपोटी. ते का करतो ? जे करतो ते शास्त्रीय आहे का? त्या मागचा मुळ ऊद्देश काय?कर्मकांडांचे
अवडंबर वा स्तोम कितपत उचित?त्यामागे खरा भक्ती भावआहे की अंधश्रद्धा अज्ञान व भिती? असे प्रश्न पडतच नाहीत आपल्याला .मग ऊत्तरे कशी मिळतील? पूजा साहित्य ,जेवणाचे पदार्थ  आरत्यांचे क्रम,संख्या
ई.यातील तपशील , बाह्योपचार आहेत. ते फारसे महत्वाचे नाहीत. महत्वाचे आहे तो श्रध्दा व भक्तीभाव.जे करतो त्या मागचा कार्यकारणभाव समजून घेणे. आपले सगळेच याच्या अगदी विरुध्द .म्हणूनच केवळ
महालक्ष्मीच नव्हे तर इतर सगळ्याच सणांना बेगडी
स्वरुप आले आहे. त्यामुळेच नवीन पिढीला  त्यात स्वारस्य वाटत नाही.ती दूर जात आहे. पुढील काही वर्षात आपल्या या धार्मिक कौटुंबिक परंपरा,सण नामशेष होण्याची चिन्हे दिसत आहेत. हे होउ नये असे वाटत असेल तर आपण काही गोष्टी करायला हव्यात.
आजची तरुण पिढी सुशिक्षित आहे. विज्ञान जाणणारी आहे. त्यांचे पैकी जे सश्रध्द आहेत ,आपला धर्म  ,सण., परंपरा, संस्कार ,संस्कृती  यांचे अभिमानी आहेतत्यांची ही जबाबदारी आहे की ,या  सगळ्या मागचे उद्देश ,शास्त्रीय कारणे, तार्किकता ,याचा स्वतः,वा 'जाणकार 'व्यक्ती च्या मदतीने शोध घ्यावा.अभ्यास करावा.त्यातून योग्य अयोग्य काय हे शोधून केवळ
शास्त्रीय आहे  योग्य आहे त्याचाच शुध्द स्वरूपात स्वीकार करावा. जे चुकीचे,अशास्त्रीय  आहे त्या सर्वाचा  त्याग करावा.  
  या सणांची सगळी जबाबदारी कुटुंबातील स्त्री च घेते.शारीरिक कष्टाचे काम असते. काही चुकू नये यासाठी खूप  काळजी घेतले जाते. चुकले तर काही अघटित घडणार नाहीना ही  भिती. म्हणजे  मानसिक तणाव.
पूर्वी  एकत्र कुटुंबात मदतीसाठी इतर स्त्रीया असत . पुरुप व नव्या पिढीतील मुलींची फार मदत होते असे नाही. कर्मकांडे करण्या साठी आपली शारिरीक व मानसिक आरोग्य उत्तम ठेवणे याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. शरीर व मनाला  थकवा येऊ नये यासाठी काळानुरुप आवश्यक ते सर्व  बदल करावे.करोना काळाने  किती परंपरा  प्रथा मोडीत काढल्या,किती बदलघडवलेआहेत हे अनुभवलेच आहे. प्रथे प्रमाणे एखादी
गोष्ट झाली नाही वा चुकीची झाली तर काही भयंकर  होईल ही भिती मनातून पूर्ण पणे काढून टाकणे अति गरजेचे. तेव्हा,जे करायचे ते केवळ परंपरा व प्रथा म्हणून .उपचार ,वा भितीपोटी  नाही तर  डोळसपणे
श्रध्देने आनंद आणि उत्साहाने पुढील पिढीला सोबतघेऊन केल्यास ती पूजा,ती प्रार्थना "त्याच्या "पर्यंत निश्चितपणे पोहचते .
  हे करण्याची सर्वांना सुबुध्दी मिळो ही महालक्ष्मीच्या
   चरणी प्रार्थना.
                    नीलकंठ देशमुख
:

संस्कृतीनाट्यविचार

प्रतिक्रिया

कंजूस's picture

9 Sep 2021 - 6:30 pm | कंजूस

देव्यांचे उत्सव तीन वेगळ्या महिन्यांंत येतात.
दुर्गा,पार्वती - अश्विन
महालक्षम्या/ ललिता - मार्गशीर्ष किंवा चैत्री.

नीलकंठ देशमुख's picture

9 Sep 2021 - 6:43 pm | नीलकंठ देशमुख

आमच्याकडे मराठवाडय़ात. भाद्रपदात गणपती चे दिवसात महालक्ष्मीचा सण असतो.