गुढीपाडव्यानिमित्त पदकांच्या / बत्ताश्याच्या गाठ्या बनवण्याची पाककृती

वामन देशमुख's picture
वामन देशमुख in पाककृती
13 Apr 2021 - 1:10 am

गुढीपाडव्याची नैमित्तिक खरेदी - झेंडूची फुले, कडुलिंबाचा मोहोर, आंब्याची, केळीची पाने, फळे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गाठ्या इ. साठी बाहेर जायला आज दिवसभरात वेळ मिळाला नाही. मग ही खरेदी उद्या सकाळी उठून करावी असं ठरलं. रात्री जेवणे झाल्यावर, गाठ्या करून बघाव्यात असा विचार पत्नीच्या मनात आला. मीही तिला मदत करायला (म्हणजे लुडबुड करायला) तयार झालो!

या गाठ्या आम्ही trial and error basis वर केल्या आहेत. त्या बऱ्याच बऱ्या जमल्या आहेत असं वाटत आहे. या वीकांताला अजून प्रयत्न करून घरीच गाठ्या बनविण्याचं कौशल्य प्राप्त करायचंच असं ठरलं आहे.

गाठ्या किंवा नुसतेच बत्तासे करताना शक्यतो लहान-लहान बॅचेसमध्ये करणं चांगलं, असा तर्क अनुभवांती खरा ठरला आहे.

प्रत्येकी सात पदकाच्या चार गाठ्या बनवण्याची कृती

साहित्य:

  • साखर - दोन वाट्या
  • खाण्याचा सोडा / इनो - एक चमचा
  • पाणी - पाव वाटीपेक्षाही कमी
  • खाण्याचा रंग - वैकल्पिक
  • जाड दोरा - दुहेरी अंदाजे तीस इंच, असे चार तुकडे

कृती:

केकचे कागदी साचे किंवा ताटाला अगदी थोडाच तुपाचा हात लावून घ्या. सिलिकॉनचे साचे वापरायचे असतील तर तुपाची गरज नाही. त्यावर दोरा तळाला चिटकेल असा पसरून ठेवा.

पदकांच्या / बत्ताश्याच्या गाठ्या
.

पदकांच्या / बत्ताश्याच्या गाठ्या

जाड बुडाच्या स्टीलच्या पातेल्यात साखर घ्या. साखर जेमतेम बुडेल इतकेच किंवा थोडे कमीच पाणी घाला. मंद आचेवर साखर विरघळू द्या. साखर विरघळली कि गॅस मध्यम करून गोळीबंद पाक होईपर्यंत हलवत राहा. ताटात एक थेंब पाक टाकल्यावर तो पसरला नाही तर गोळीबंद पाक झाला असे समजावे.

मग त्यात सोडा आणि हवा असेल तर रंग घाला. या पूर्ण प्रक्रियेदरम्यान पाक सतत ढवळत राहा. बुडबुडे येऊ लागले की गॅस बंद करून पळीने ताटात / साच्यांमध्ये दोरा बुडेल असा पाक घाला. ही क्रिया झटपट करायला हवी नाहीतर पातेल्यातच पाक घट्ट होऊन साखर तयार होत जाईल.

पदकांच्या / बत्ताश्याच्या गाठ्या
.
पदकांच्या / बत्ताश्याच्या गाठ्या

दहा मिनिटांनी गाठ्या थंड झाल्यावर हळुवारपणे ताटापासून / साच्यातून सोडवून घ्या.

आपल्या हातांनी घरी बनवलेल्या गाठ्यांनी गुढीची सर्वोपचारसंपन्न पूजा करा. नंतर रुचकर पन्हेर आणि मधुर गाठ्यांचा आस्वाद घ्या.

पदकांच्या / बत्ताश्याच्या गाठ्या
.

पदकांच्या / बत्ताश्याच्या गाठ्या

श्री शालिवाहन शके १९४३ प्लव नाम संवत्सर प्रारंभानिमित्ताने सर्व मिपावासीयांना गुढीपाडवा तथा हिंदू नववर्षदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष सुखाचे जाओ!

प्रतिक्रिया

वामन देशमुख's picture

14 Apr 2021 - 9:33 am | वामन देशमुख

गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री उशिरा हा धागा लिहीत बसलो होतो. शीर्षक लिहीत असताना चुकून दोनदा प्रकाशित झाला.

संपादक मंडळ,

दुसरा धागा अप्रकाशित करावा ही विनंती.

सौंदाळा's picture

14 Apr 2021 - 5:47 pm | सौंदाळा

मस्तच झालीय
यावर्षी बत्तासे माळा मिळतच नव्हत्या. तश्या बऱ्याच ठिकाणी होत्या पण पिवळट, काळपट पडलेल्या. मागच्या वर्षीचा स्टोक वाटत होत्या म्हणून घेतल्याच नाहीत.
पाकृ थोडी आधी टाकायला पाहिजे होती. डोक्यात घरी बनवायची विचार आला होता पण डिटेल माहिती नव्हती आणि 9 वाजून गेले होते मग अजून वेळ नको म्हणून कॅन्सल केला.

वामन देशमुख's picture

14 Apr 2021 - 8:20 pm | वामन देशमुख

>>> पाकृ थोडी आधी टाकायला पाहिजे होती.

हं, बरोबर आहे.

आम्ही राहतो त्या हैद्राबादच्या भागात गाठ्या / माळा मिळत नव्हत्या. होळीलादेखील मिळाल्या नव्हत्या. गाठ्या पाहिजेतच असा आईचा आग्रह होता. म्हणून मग थोडं युट्युबिंग करून आम्ही हा प्रयत्न करून पहिला. थोडं-बहुत जमलं आणि, अजून एकदोनदा प्रयत्न करून जाळीदार बत्तासे करता येतील असा आत्मविश्वास आला.

हरकत नाही, पुढच्या वेळी उपयोगी पडेल.

अवांतर: हैद्राबादच्या जुन्या शहरात हे सगळं काही सहज मिळायचं. म्हणजे मराठी सणवार साजरे करणं हे विशेषतः स्त्रियांना खूपच सहज सोपं होतं.

पहिल्याच प्रयत्नात सुबक सुंदर झाल्या आहेत. फोटो / प्लेटिंग खूप सुंदर कलात्मक !

आमच्या आजीला बत्तासे आणि गाठ्या करता यायच्या. जिलबीचा रंग / केशर वापरून सुंदर सोनेरी केशरी रंग.. गुढीला, पेटवण्याआधी होळीला आणि लहान मुलांच्या पहिल्या होळीला गळ्यात गाठीच्या माळा घातल्या जायच्या.

... हैद्राबादच्या जुन्या शहरात हे सगळं काही सहज मिळायचं. म्हणजे मराठी सणवार ....

जुन्या हैदराबादेत गवलीगुडा, लाडबाजार, फीलखाना, पत्थरहट्टी भागात माझे काही जवळचे - दूरचे नातेवाईक स्थायिक होते. आता विखुरलेत जगभर, वर्षानुवर्षे भेट नाही :-(

जुइ's picture

25 Apr 2021 - 1:51 am | जुइ

गाठी छान जमली आहे! गेल्या ३-४ वर्षांपासून मीही गाठ्या घरीच तयार करत आहे.