या अशा कुंठीत वेळी

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
3 Apr 2021 - 3:55 pm

एकही कविता आताशा
काळजाला भिडत नाही
शब्द मोहक विभ्रमांनी 
भ्रमित आता करीत नाही

कोरडा असतो किनारा 
लाट फुटते मत्त तरिही
जखम होते खोलवर पण 
रक्त आता येत नाही

प्रार्थनांचे मंत्र निष्प्रभ, 
बीजअक्षर श्रांतलेले
भंगलेल्या देवतांना 
आळवूनी भ्रष्टलेले

मार्गदर्शी ध्रुव अन् 
सप्तर्षी आता लोपलेले
दीपस्तंभांचे दिवेही 
भासती मंदावलेले

या अशा कुंठीत वेळी
दाटुनी येते मनी
विफलता, जी रोज उरते 
रोमरोमा व्यापुनी

एक आशा तेवते या घनतमी रात्रंदिनी
शृंखला पायातल्या तुटतील कधितरी गंजुनी

मुक्त कविताकविता

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Apr 2021 - 4:59 pm | ज्ञानोबाचे पैजार

अशा क्लांत वेळी
सैरभैर मन आवरताना,
बालरवी खुदकन हसतो
क्षितिजा मागून डोकावताना

मग परत एकदा चालू लागतो
तेजोमय ती वाट अनंत
प्रशांत मनी आता न उरते
हर्ष खेद ना कुठली खंत

पैजारबुवा,

आगाऊ म्हादया......'s picture

4 Apr 2021 - 8:58 am | आगाऊ म्हादया......

कोरडा असतो किनारा
लाट फुटते मत्त तरिही
जखम होते खोलवर पण
रक्त आता येत नाही

गणेशा's picture

4 Apr 2021 - 11:04 am | गणेशा

कोरडा असतो किनारा
लाट फुटते मत्त तरिही
जखम होते खोलवर पण
रक्त आता येत नाही

वाह...

तुषार काळभोर's picture

4 Apr 2021 - 11:23 am | तुषार काळभोर

जखम होते खोलवर पण
रक्त आता येत नाही
>>
'आता सगळं संपलं. आता लढून काही उपयोग नाही. आता प्रयत्नांचाही उपयोग नाही' अशी स्थिती जाणवते या ओळींतून.
असं कसं चालेल?

कधी जीवनात अशी परिस्थिती आली, की हा विचार करायचा.. दिवसही कायमचा नसतो, अन रात्रही. पौर्णिमासुद्धा नाही अन् अमावस्या सुद्धा नाही.

अनन्त्_यात्री's picture

11 Apr 2021 - 7:14 pm | अनन्त्_यात्री

सर्व कवितारसिकांना धन्यवाद.

राघव's picture

11 Apr 2021 - 7:30 pm | राघव

चांगली रचना.

जखम होते खोलवर पण
रक्त आता येत नाही

येथे "रक्त" च्या ऐवजी "दर्द" या अर्थाचा मराठी शब्द हवा खरंतर.

अवांतरः

या अशा कुंठीत वेळी

मोकलाया वाचून अशी कुंठीत अवस्था झालेली आठवते. :-)

सरीवर सरी's picture

13 Apr 2021 - 11:10 pm | सरीवर सरी

एक आशा तेवते या घनतमी रात्रंदिनी
शृंखला पायातल्या तुटतील कधितरी गंजुनी..

कोरडा असतो किनारा
लाट फुटते मत्त तरिही
जखम होते खोलवर पण
रक्त आता येत नाही

गहिरे..

तुर्रमखान's picture

14 Apr 2021 - 12:58 am | तुर्रमखान

आवडली!