गावाच्या गोष्टी : लक्षुमणाची बायको

साहना's picture
साहना in काथ्याकूट
2 Mar 2021 - 4:55 am
गाभा: 

देव देतो आणि देवचार नेतो अशी कोंकणात एक म्हण आहे. म्हणजे नशीब तुम्हाला काहीतरी देते आणि त्याच प्रकारे काही तरी वाईट घटना घडून किंवा तुम्हालाच दुर्बुद्धी सुचून ती चांगली गोष्ट तुमच्याकडून हिरावून घेतली जाते.

लक्षुमणाच्या बायकोच्या बाबतीत असेच काही तरी घडले. लक्षुमन कोण होता मला ठाऊक नाही कारण तो कधीच दारू पिऊन मेला होता. त्याच्या बायकोचे खरे नाव कुणालाच ठाऊक नाही. सर्वजण तिला लक्षुमणाची बायकोच म्हणायचे. तिच्या कुटुंबात ती, तिचा मुलगा ढब्बू आणि त्यांचा कुत्रा मिकी इतकीच मंडळी. गांवातील सर्वांत गरीब आणि दळिद्री कोण असेल तर ती लक्षुमणाची बायको. आणि ह्याला कारणीभूत सुद्धा तीच होती. पती प्रमाणेच हि सुद्धा दारू पीत असे आणि तिचा मुलगा सुद्धा लहानपणापासूनच दारू पित असे. सुदैव हे कि ह्यांच्या हाती पैसे खुळखुळत नसल्याने विषयसेवन आपोआप प्रमाणात व्हायचे.

गावाच्या वेशीच्या बाहेर ह्यांना कुणी तरी उपकार म्हणून राहायला एक पडीक गोठा दिला होता, तिथे हि मंडळी राहायची. कुत्रा लक्षुमणाची बायको आणि ढब्बू सगळी एकाच ताटांत जेवायची बरोबर झोपायची. सगळी कडे बियर च्या बाटल्यांचा खच, अंड्यांची टरफले, कुत्र्याची विष्ठा असला प्रकार. त्यामुळे ह्यांच्या आजूबाजूला कुणीच फिरकत नसे. दया म्हणून लोक ह्यांना कधी पैसे अन्न वगैरे देत. लक्षुमणाच्या बायकोने काम कधीच केले नाही. इतर महिला बहुतेक करून शेतांत काम करायच्या. परित्यक्ता किंवा विधवा पापड लोणचे ह्यांचा धंदा करायच्या. जणू काही हे धंदे गावाने ह्यांच्यासाठीच राखीव ठेवले होते. पण हि मात्र एकदम आळशी आणि हिच्या गलिच्छ वागणुकीने कुणी हिच्या हाताचे पापड घेतले सुद्धा नसते.

ह्यांच्या पाण्याचा स्रोत म्हणजे जवळ असणारी एक छोटीशी नदी. जी उन्हाळ्यांत फारच गढूळ व्हायची. मग हि आपला जुनाट प्लास्टिकचा घाणेरडा कळसा घेऊन इतरांच्या घरी त्यांच्या विहिरीतील पाणी मागत फिरायची. मग लोक हिला मनाई करायचे. एक तर पम्पाचे पाणी ने नाहीतर आपण विहिरीतून आमच्या कळशीतून पाणी काढून देतो असे सांगायचे. काही उपटसुम्भ लोकांना ह्यांत राजकीय फायदा दिसला. अमुक वाडीतील सवर्ण मंडळी दलित महिलेला पाणी सुद्धा देत नाहीत आणि तिचा छळ करतात असे काही वृत्तपत्रांना वगैरे हाताला धरून त्यांनी प्रकरण तापवले. खरे तर हिची जात वगैरे कुणालाच ठाऊक नव्हती पण गलिच्छपणा सर्वानाच ठाऊक.

काही पत्रकार वगैरे हिची मुलाखत घ्यायला घरी गेले. मग आमदार पदाची आस बाळगणारा एक तरुण उमेदवार मग हिच्या हाताचे पाणी वगैरे पिऊन फोटो ऑप करायला गेला पण विचार बदलून तडक आपल्या घरी गेला. हा सर्व विषय त्या मुळे फुस्स झाला.

मग ख्रिस्ती मिशनरी मंडळींना हि बातमी पोचली. मग हि मंडळी हिच्या घरी येऊ लागली. तिला तिची झोपडी ठीक करण्यासाठी पैसे वगैरे दिले पण ते तिने दारूत उडवले. मग चर्चने श्रमदान करून तिच्या झोपडीला ठीक करायचे ठरवले पण तिचा गलिच्छ पणा पाहून सर्व मंडळी विटली आणि ते श्रमदान सुद्धा जास्त काळ चालले नाही.

मग ढब्बूने एका दुसऱ्या गावांत दुचाकीची चोरी केली. त्याला पकडून लोकांनी बेदम मारला. मग तो सुधार गृहांत पोचला. तिथे तो सुधारला कि ठाऊक नाही पण पुन्हा गावांत जास्त दिसला नाही. लक्षुमणाच्या बायको मग एक दिवस दारू पिऊन एका कड्यावरून खाली पडली (असावी). त्या भागांत कुणाचीच ये जा नव्हती त्यामुळे काही आठवडे ती सापडलीच नाही. मग पोलिसांनी तिच्या मृतदेहाचा अंतिम संस्कार केला.

अतिशय दुर्दैवी असे तिचे आयुष्य होते. पण दुर्भाग्य पहा, हिच्या नशिबाने थोडा जरी फेर फार केला असता तर हिच महिला पूर्णपणे वेगळे आयुष्य जगली असती. हिची कथा गांवांत अतिशय कमी लोकांना ठाऊक. हि दूरच्या एका गावाची. हिच्या घरी एकूण ९ भावंडे. त्यातील ६ मुली. मुलांना पोसायला जड आणि तरुण पोरीवंर सर्वांची नजर म्हटल्यावर आईवडिलांनी ह्यांना पैसे घेऊन दत्तक द्यायला सुरुवात केली. दत्तक म्हणजे त्या काळी कुणी सधन परिवार अश्या गरीब मुलींना दत्तक घ्यायचा आणि घरी काम करायला ठेवायचा, योग्य ते शिक्षण वगैरे देऊन मग त्यांचे हात सुद्धा पिवळे करायची जबाबदारी हि मंडळी घेत असे. काही मुले पुणे, मुंबई, गोवा इत्यादी ठिकाणी सुद्धा पोचायची.

हिला दत्तक घेतले तिच्याच सक्ख्या मावशीने. मावशी तिला घरी ठेवून राब राब राबवायची. कधी कधी मारायची. मावशीचा नवरा गेला होता पण ती तरुण होती आणि गांवातील एक नालायक तरुण माणसाबरोबर तिचे लफडे होते. हा माणूस गरीब होता आणि गुंडगिरी करायचा. लफड्यांत बरीच वर्षें गेली. ह्या तरुण पुरुषाची नजर आता मावशीवरून वयांत आलेल्या तिच्या दत्तक मुलीकडे स्वाभाविकपणे जाऊ लागली. मावशीला ईर्ष्या उत्त्पन्न होऊन ती हिचा आणखीन छळ करू लागली. शेवटी पर्यवसान अश्यांत झाले कि मावशीला तिच्या प्रियकराने हाकलून लावले आणि तिच्या दत्तक मुलीला आपलेसे केले. बिनलग्नाची ती शेवटी गरोदर राहिली आणि तिने एका मुलीला जन्म दिला. तान्ह्या बाळाला पाहून पित्याच्या मनात वासना जाऊन प्रेम निर्माण झाले. त्याने कायदेशीर रित्या हिच्याशी लग्न करून मुलीला आपण आपले नाव देणार हि घोषणा केली. पण साधारण २० वर्षांची असणारी हि युवती मात्र घाबरली आणि एक रात्री आपले बॅग घेऊन तान्ह्या बाळाला तसेच सोडून पळून गेली. त्यानंतर १-२ वर्षं तरी तिच्या प्रियकराने तिला पुन्हा घरी बोलवून लग्न करण्याचा प्रयत्न केला. पण हिला ते मान्य नव्हते. कारण कदाचित दारू आणि इतर व्यसने हिला लागली असावीत. काय ठाऊक ? विनाशकाले विपरीत बुद्धी.

पण पहा भाग्य कसे फळफळते. हिच्या तान्ह्या मुलीला वडिलांनी लहानाचे मोठे केलेच पण इतर गुंडप्रमाणे हे सुद्धा राजकारणात घुसले. पंच सरपंच होत आमदार झाले. मग पार्टीची कामे पाहू लागले. पेट्रोल पम्प, हॉटेल, ट्रक्स, गाड्यांचे शोरूम्स, गॅस एजन्सी अश्या पद्धतीने ह्यांची नेत्रदीपक प्रगती होत गेली. कदाचित शेकडो कोटींचे ह्यांचे नेटवर्थ असावे. ह्यांची मुलगी शिकून सवरून सध्या कॅनडा मध्ये स्थायिक आहे.

मातेने आणि मुलीने एकमेकांचा चेहरा सुद्धा पाहिला नाही.

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

2 Mar 2021 - 8:42 am | अर्धवटराव

काय काय होतं जगात... (कपाळावर हात मारायचे इमोजी कशी टंकावी? )

शाम भागवत's picture

2 Mar 2021 - 1:20 pm | शाम भागवत

129318; 8205; 9794; 65039; हे चार कोड आहेत. प्रत्येक कोडच्या अगोदर "&" व "#" एकत्र करून जोडले की झाले.

🤦‍♂️

अर्धवटराव's picture

2 Mar 2021 - 7:03 pm | अर्धवटराव

धन्स :)

साहना's picture

2 Mar 2021 - 1:47 pm | साहना

मराठींत त्या इमोजी ला हस्तमुखासन असे म्हटले जाते .

मुक्त विहारि's picture

2 Mar 2021 - 11:37 am | मुक्त विहारि

मनोरंजक कथा आहे...

प्रत्येक गाव म्हणजे एक महाकाव्य असते...

प्राची अश्विनी's picture

2 Mar 2021 - 11:45 am | प्राची अश्विनी

ही मालिका फारच सुंदर चालू आहे. यातील लेखांची वाट पहात असते.

विजुभाऊ's picture

2 Mar 2021 - 1:00 pm | विजुभाऊ

यात लक्षुमण कसा आला?

ठाऊक नाही. कारण लक्षुमणाला मी पहिले सुद्धा नव्हते. तो कधीच वारला. ढब्बूचा सुद्धा तो बाप होता कि नाही कुणास ठाऊक.

गामा पैलवान's picture

2 Mar 2021 - 11:39 pm | गामा पैलवान

साहना,

हे काहीतरी भलतंच दिसतंय. गावाला कळलं कसं हे सगळं? कोणीतरी कोणालातरी काहीतरी पिन मारली असेल. त्या पिनेची पण सुरस व चमत्कारिक कथा असेल बहुतेक !

असो. मालिका मस्त चाललीये.

आ.न.,
-गा.पै.

दारूच्या नशेत हि कधी कधीच आमदार साहेबांबद्दल बोलायची. लोकांना वाटायचे हि काही तर बरळत आहे. कारण हि खूपच दूर गावची. मग हिची मावशी जिने हिला दत्तक घेतले होते ती आली हिच्या मदतीला, एक दोनदा, ढब्बूला सुधार गृहांत पाठवला तेंव्हा सुद्धा मावशीनेच येऊन सोपस्कार केलेआणि तिच्यामुळे हिच्या कथेला कदाचित लोकांनी सिरियसली घेतले असावे. त्या मावशीला आमदारांनी पुन्हा आपल्या घरी घेतले नसले तरी तिला थोडी आर्थिक मदत वगैरे ते करत असावेच.

मला वाटते ह्या स्त्रीचे बालपण अब्युज्ड असावे आणि त्यामुळे तिची मानसिक स्थिती बरोबर नसावी त्यामुळे काय करावे आणि काय करू नये ह्याचे तारतम्य जाऊन ती सेल्फ डिस्ट्रक्टिंग मार्गावर चालू लागली. ह्या मार्गावर चालणारे लोक परत येत नाहीत.

गामा पैलवान's picture

3 Mar 2021 - 2:46 am | गामा पैलवान

साहना,

या स्त्रीचं बालपण अपयोजित असणार हे तुमचं निरीक्षण / तर्क बरोबर वाटतो.

आ.न.,
-गा.पै.

सविता००१'s picture

3 Mar 2021 - 11:27 am | सविता००१

मालिका चालली आहे. किती तरी वेगळ्याच कथा वाचायला मिळत आहेत. मी वाट पहाते या मालिकेची फार