थोडासा रुह-ओमानी हो जाय...

किल्लेदार's picture
किल्लेदार in भटकंती
20 Feb 2021 - 8:18 pm

थोडासा रुह-ओमानी हो जाय...

"मरू"स्थळ हे नाव सार्थ ठरवणारे "वाळ"वंटी प्रदेश अजिबात आवडत नसल्यामुळे प्रत्यक्षात तर दूरच पण नकाशात देखील त्या प्रदेशात मी कधी फिरकत नाही. मनुष्य "जगू" शकेल अश्या सर्व साधनांचा अभाव असलेल्या जगातल्या सगळ्यात मोठ्या "मरु"भूमीला कसल्या आधारावर "सहारा" नाव दिले असावे याचा विचार करताना गम्मत वाटते. शाळेत असताना भूगोलाचे शिक्षक आणि त्यांची शैली इतकी रुक्ष होती की त्यापुढे अशी मरुस्थळेदेखील हिरवी-गार वाटावीत. अहीमही असुरांप्रमाणे भूगोलाच्या जोडीला इतिहासही होताच. त्या इतिहासाच्या पुस्तकात घुसवलेल्या कितीतरी अनावश्यक संदर्भातून एक संदर्भ मला भूगोलाशी जोडता येत असे. खिलजी असो, नादिरशहा असो अथवा दुर्राणी. हे सगळे इतिहासातले खलनायक वाळवंटातल्या उकाड्याने हैराण होऊन फक्त लुटीसाठी नाही तर उन्हाळ्याच्या सुटीसाठी हिंदुस्थानात येत असावेत अशी माझी समजूत होती. तेव्हा पदरच्या चार मोहरा उधळून मी कुठल्या वाळवंटी प्रदेशात "फिरायला" जाईन हा विचार कधी स्वप्नातही मनाला शिवला नाही.

पण हा योग एकदा यायचाच होता. देवाने हातावरची कुठलीतरी रेषा वाळूने काढून ठेवली असावी. आपले मिपावरील सरनौबत आणि मी जुने जानी दोस्त. गेली बरीच वर्षं ते ओमानमध्ये तळ ठोकून आहेत. पूर्वी आलमगीर बादशहाने सरनौबत नेताजी पालकरांना मुहम्मद कुलीखान बनवून सक्तीने अफगाणिस्तानच्या मोहिमेवर पाठवून दिले होते. इथे पोटाने सरनौबतांवर धर्मांतराची नाही, तरी स्थलांतराची सक्ती नक्कीच केली होती.

दर वर्षी पुण्यात सुट्टीवर आल्यावर आमची भेट व्हायची. सरनौबतांच्या आग्रहाखातर मस्कत मोहीम मुक्करर करण्यात आली. सरनौबतांची भेट आणि गप्पा हेच मुख्य उद्दिष्ट्य असल्यामुळे वाळवंटात काय का आणखी कुठे काय या गोष्टीला फारसे महत्व नव्हते. म्हंटलं चला मस्कत तर मस्कत. लहानपणी मस्कती डाळिंब असा माफक उल्लेख भूगोलाच्या पाठ्यपुस्तकात वाचल्यासारखा आठवायचा. तोही डाळिंब या फळाबद्दल विशेष आपुलकी असल्यामुळे. तेव्हा त्यापलीकडे काही या शहराबद्दल फारशी माहिती नव्हती आणि जाणून घेण्यात रसही नव्हता. आखाती देशांत भयाण उन्हाळा असल्याने तिकडे हिवाळ्यात जावे म्हणजे त्यातल्या त्यात सुसह्य वाटेल असा विचार होता. परंतु एकत्र सुट्ट्यांचे गणित जमत नव्हते. मोहीम पुढे ढकलण्यापेक्षा दोन विकांताचे चार दिवस लांबची ठिकाणे आणि बाकीचे दिवस जमेल तसं जवळपास हिंडू असं ठरवलं.

फाल्गुन मासातील कृष्ण पक्षातील अष्टमीला अर्थात गुरुवार दिनांक ८ फेब्रुवारी, २०१८ ला पुण्याहून मोहिमेचे "रण"शिंग फुंकले. मुंबई ते मस्कत अंतरच ते काय. एक डुलकी काढून झाली आणि खाली मस्कत मधले दिवे लुकलुकताना दिसू लागले. पूर्वग्रह-दूषित मनात विचार आला की रात्रीचा आलो हे एका अर्थी बरेच झाले. डोळ्यांच्या सर्व कडा व्यापून टाकणाऱ्या वैराण पिवळ्या रंगापेक्षा काळा रंग बरा. पण हा पूर्वग्रह लवकरच बदलणार होता.

from air

सरनौबत जातीने विमानतळावर घ्यायला आले होते. त्यांच्या तळावर पोचायला रात्रीचे बारा वाजले. ताजेतवाने होऊन आधी साग्रसंगीत जेवणावर ताव मारला आणि ओमानमध्ये शुक्रवार हा सुटीचा दिवस असल्यामुळे नंतर आरामात गप्पा मारत बसलो. घरात बसून फक्त मसलत करणे हे सरनौबत आणि किल्लेदार दोघांच्याही नावलौकिकास साजेसे नव्हते. त्यामुळे सकाळची न्याहारी करून एका समुद्री किल्ल्याची पाहणी करण्यास सौ. सरनौबतांनी दिलेली शिदोरी घेऊन "अल् सवादीला" निघालो. प्रशस्त रस्ते आणि इमारतींच्या गर्दीतून शहराच्या बाहेर पडलो. वाटले होते तसे सर्वदूर करड्या, पिवळ्या रंगाचेच साम्राज्य होते. महंमदाने हिरवा रंग का निवडावा ते अशा ठिकाणी आले की लगेच कळते.

मस्कतपासून ९० किलोमीटरवर "अल सवादी किल्ला" आहे. विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि बोटीने जाता येतील अशी बेटे हि त्याची खासियत. फेब्रुवारीचा गारवा, भरतीमुळे उचंबळणाऱ्या लाटा आणि दूरवर दिसणारी बेटे! छोट्या बोटीतून किल्ला असलेल्या बेटावर गेलो. सुमारे अर्धा तास पायऱ्या चढल्यानंतर किल्ल्यावर पोचलो. किल्ल्यावरून भोवतालचा परिसर फार सुंदर दिसत होता. चहू बाजूला निळाशार समुद्र, आणि त्यावर पांढरी नक्षी काढणाऱ्या बोटी. भरपूर भटकंती झाल्यावर घरून आणलेले मेथी पराठे खाऊन दुपारी किल्ला उतरून दुपारच्या चहाला घरी पोचलोसुद्धा.

अल सवादी किल्ला
PANO_20180209_144846

हिंडण्याफिरण्या खेरीज "खाणे" ही देखील दोघांची समान आवड. एखाद्याकडे दुपारी चारच्या सुमारास गेल्यास "काय घेणार" हा प्रश्न हमखास असतो. ह्याचे उत्तर "चहा, कॉफी का सरबत" असे अपेक्षित असते. आम्ही दुपारी भेटतो तेव्हा मात्र ह्या प्रश्नाचे उत्तर "रेड लेबल, सोसायटी किंवा वाघ बकरी" ह्यापैकी एक असते. मूड नुसार लाईट किंवा स्ट्रॉंग चहा, त्याला साजेशी क्रोकरी, कपात चहा ओतताना एक थेंब देखील बशीत सांडणार नाही ह्याची घेतलेली दक्षता आणि स्पेशल सूरी ने सफाईदार कापलेला हिंदुस्थान बेकरीचा प्लेन केक. आमच्या खव्वयेगिरीचे असे ३६ गुण जुळत असल्याने साध्या गोष्टींचा सुद्धा सोहळा होतो.

सरनौबतांनी माझ्या आवडी-निवडी लक्षात घेऊन पुढच्या आठ दिवसांचा साधारण मेन्यू ठरवला होता. बाहेर जेवायला गेल्यावर अरेबिक क्युझिन चा आस्वाद घेतला. मस्कतला फलाफील आणि शावर्मा दोन्ही अतिशय उत्तम मिळतात. घरी फ्लॉवर-बटाटा रस्सा, साबुदाणा खिचडी पासून ते अगदी सुरमई फ्राय, स्पेशल फिश करी पर्यंत सर्व गोष्टी बनवल्या.

खाण्यापिण्याची आवड असावी पण वेळ-काळ बघून हौस पुरवावी हे दोघांचे मत. त्यामुळे फिरायला मर्यादित वेळ असल्यास जिभेचे चोचले पुरवण्यापेक्षा हिंडण्यास प्राधान्य. त्यामुळे बहला फोर्ट, जबल अखदर सारख्या थोड्या लांबच्या ठिकाणी जाताना घरूनच पराठे, उकडलेली अंडी, संत्री, केक वगैरे पदार्थ घेऊन बाहेर पडायचो. नाहीतर बऱ्याचदा असं होतं कि हॉटेल शोधण्यात आणि जेवणात इतका वेळ जातो कि हिंडायला फारसा वेळ उरत नाही.

गोवा म्हणलं कि समुद्रकिनारे आणि बिअर ची चित्रे चटकन डोळ्यासमोर येतात. ओमानमध्ये त्याच तोडीचे अतिशय सुंदर आणि स्वच्छ समुद्रकिनारे आहेत. असा सुंदर समुद्र आणि दुपारचे ऊन असताना बिअर न पिणे फाऊल समजले जाते. परंतु ओमानमध्ये सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यास मनाई असल्याने "बीचवर बसल्यास नंतर सहा महिने जेलमध्ये बसावे लागते". अशा प्रकारे नॉन-अल्कोहोलिक बिअर नेऊन दुधाची तहान ताकावर भागवली. सरनौबताबरोबर गप्पांच्या नशेत ती नेहेमीच्या बिअरसारखीच रुचकर लागली.

IMG_20180214_231643

IMG_20180214_110651_HDR

दोन विकांत हाताशी असल्याने तेव्हा "जबल अखदर" आणि पायथ्याशी असलेलं "बरकत अल मौझ" हे अतिशय पुरातन गाव बघता आले. तसेच बहला फोर्ट वगैरे ठिकाणे सुद्धा बघून झाली. आखाती देश (गल्फ) म्हणलं कि नुसती वाळवंटे आणि तेल विहिरी डोळ्यांसमोर यायच्या. ओमान मधील सुंदर समुद्रकिनारे, जागोजागी जपलेली हिरवाई, अतिशय साधी ओमानी अरब माणसं ह्यामुळे माझा पूर्वग्रह संपूर्णपणे बदलला.

बहला फोर्ट
IMG_20180216_193855

जबल अखदरच्या पायथ्याशी असलेलं बरकत अल मौझ हे अतिशय पुरातन गाव
PANO_20180216_105722

आठ दिवसांत भरपूर हिंडता-फिरता आलं. घरी आणि कारमध्ये गप्पा झाल्या. लॉन्ग ड्राइव्ह मध्ये ऐकण्यासाठी आवडीच्या गाण्यांची स्पेशल प्ले-लीस्ट बनवली होती ती अजूनही दोघांकडे आहे. पुल "गणगोत" पुस्तकात लिहितात कि "वाढत्या वयाबरोबर पुढे जाण्याऐवजी मन मागेच पाहण्यात रमते". असा नॉस्टॅल्जिया ह्या आठ दिवसांत अनेकदा अनुभवला. रात्री बीचवर कॉफी पिताना रुपालीतल्या कॉफीची आठवण. “जबल अखदर” पर्वतावर जाताना आमच्या राजगड ट्रेक ची आठवण आली. कारमधून फिरत असताना सीए आर्टिकलशिप च्या वेळी बाईकवरून भोसरी ला जायचो ते दिवस आठवले. तैमूर मशिदीच्या रम्य हिरवळीवरून चालताना पुणे युनिव्हर्सिटी चा परिसर डोळ्यांसमोर यायचा.

तैमूर मशिद
PANO_20180212_101236

मथरा कॉर्निशवरील भटकंती
IMG_20180213_100422_HDR
PANO_20180213_102235

ग्रँड मॉस्क
PANO_20180211_103533

ते आठ दिवस कापराप्रमाणे भर्रकन उडून गेले. ठरवल्यानुसार अनेक गोष्टी घडून आल्या तर काही राहून गेल्या. पुढच्या मस्कत भेटीत उरलेल्या गोष्टी कव्हर करू असे म्हणत मस्कतचा निरोप घेतला. मुंबईला जाणाऱ्या विमानात बसल्यावर विचार आला कि पुढच्या वेळी “दोघांनाही सुट्टी” एवढाच निकष ठेवायचा. तिकडे हिवाळा आहे का उन्हाळा असले विचार करायचे नाहीत. कारण मित्राबरोबर हास्यविनोदाचे तुषार उडत असताना मे महिन्याची टळटळीत दुपार देखील चंद्राप्रमाणे शीतल वाटते.

अब तो तमन्ना-ए-दिल-ए नादाँ है के
यह दोस्ती ला-फ़ानी* हो जाए
जिस्म-ओ-जान गुलज़ार और रूह ओमानी हो जाए...

किल्लेदार

*ला-फ़ानी - अमर

mosque

प्रतिक्रिया

वाह किल्लेदार ! जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लवकर पुढची मोहीम आखूया.

"तेरे साथ बिताये लम्हों की
उमर बढ़ती जाये,
आसमान का नीला रंग
समंदर में घुल जाये,
थोडासा रूह-ओमानी हो जाये"

~ सरनौबत

सौंदाळा's picture

20 Feb 2021 - 10:33 pm | सौंदाळा

सुंदरच लिहिलेत,
प्रवासवर्णन कम ललितलेख आणि नेत्रसुखद फोटो.

गणेशा's picture

20 Feb 2021 - 11:53 pm | गणेशा

अप्रतिम.. मस्त.. वाचताना मज्जा आली..
तुमच्या सोबत आम्हीही फिरतोय तेथे असेच वाटले..

मुक्त विहारि's picture

21 Feb 2021 - 8:15 am | मुक्त विहारि

मस्कत, बहारिन, ही बकेट लिस्ट मधली शहरे आहेत .....

मुक्त विहारि's picture

21 Feb 2021 - 8:27 am | मुक्त विहारि

दोन्ही मस्तच ....

(फक्त तो, रुपालीचा उल्लेख टाळायला हवा होता.... तद्दन फालतू हाॅटेल आहे ... एकदाच गेलो होतो, अतिशय टुकार डोसा आणि बेचव काॅफी, आमची सौ. अतिशय उत्तम इडली आणि डोसा बनवते आणि काॅफी आमच्या डोंबोलीत टिळक टाॅकिजच्या गल्लीतला उडपी मस्त बनवतो...अप्पम आता डोंबोलीत, जागोजागी आणि चांगले मिळते...अर्थात, अन्नपूर्णा सारखी चव नाही, अन्नपूर्णा बंद पडले आणि डोंबोलीत अप्पमची दुकाने उघडली ....)

श्रीरंग_जोशी's picture

21 Feb 2021 - 8:56 am | श्रीरंग_जोशी

प्रवास + स्थल वर्णन खूपच उत्तम रंगले आहे. फोटोज तर लाजबाव.

अथांग आकाश's picture

21 Feb 2021 - 9:13 am | अथांग आकाश

मस्त वर्णन आणी फोटो!

चौकटराजा's picture

21 Feb 2021 - 9:36 am | चौकटराजा

किल्लेदार लेखक आहे म्हटल्यावर मी आवर्जून त्यान्चा धागा उघडतो कारण की त्यान्च्या फोटोग्राफीचा " पंखा " आहे ! अचाट फोटो आलेत हो किल्लेदार साहेब ! सगळीकडे रूल ऑफ थर्ड चा वापर केलेला कम्पोझिशन मधे दिसतोय ! फिल्टर व डी एस एल आर जोडीला असले तरी त्यामागचा मेन्दू तितकाच महत्वाचा ! सबब सलाम ! असला मेन्दू त्या डोम्बिवलीच्या " स्पा" कडेही आहे ! उत्तम ! टर्की हा देश तुमची वाट पहात आहे हे लक्षात असू द्यावे !

त्यामागचा मेन्दू तितकाच महत्वाचा........

प्रचंड सहमत, आमच्या कडे ही "कला" पण नाही...

========
असला मेन्दू त्या डोम्बिवलीच्या " स्पा" कडेही आहे !

त्यात काय नवल? डोंबोली ही जागतिक राजधानी आहे .जे जे डोंबोलीत, ते ते सर्वत्र...

जाताजाता, नासाने आखलेल्या मंगळावरच्या मोहिमेत, एखादा तरी डोंबोलीकर असण्याची शक्यता नाकारता येत नाही....

तेजस आठवले's picture

21 Feb 2021 - 1:35 pm | तेजस आठवले

उत्तम लेख.+१

झेन's picture

21 Feb 2021 - 1:56 pm | झेन

तुमच्या लेखनाची शैली, फोटो, प्रवासवर्णन, मैत्री सगळेच जमून आले आहे.

चौकस२१२'s picture

21 Feb 2021 - 2:03 pm | चौकस२१२

वर्णन उत्तम , खाऊ गिरीचे पण थोडे फोटो असतील तर ते हि टाका ...,यूएई फेरीत ओमान बद्दल ऐकलं होत पण janए झाले नाही .. बस ने हि जाता येत ..
ओमान ( मस्कत) ला मासे खूप चांगले मिळतात असे ऐकले आहे

सिरुसेरि's picture

21 Feb 2021 - 2:13 pm | सिरुसेरि

सुरेख प्रवास वर्णन . ओमानची मोहीम फत्ते शिकस्त . +१ .

राघव's picture

21 Feb 2021 - 4:59 pm | राघव

नेहमीप्रमाणेच मस्त! खूप दिवसांनी लिहिलेलं बघून आनंद वाटला!
बाकी तुझ्या फोटोंचं कितीही कौतुक केलं तरी कमीच पडतं हे मला आता नीट पटलंय. त्यामुळे त्याबद्दल केवळ कृतज्ञ भाव आहे! :-)

किल्लेदार's picture

21 Feb 2021 - 8:18 pm | किल्लेदार

सरनौबत - क्या बात!!! सध्याचा वेढा फोडून बाहेर पडलो की दुसरी मोहीम लवकरच आखू

सौंदाळा - धन्यवाद

गणेशा - धन्यवाद. आठवणी वाचतांना परत फिरायचा फील यावा म्हणूनच हा प्रयत्न

मुक्त विहारी - पुणे, डोंबिवली, मुंबई, मस्कत किंवा तिथली कुठलीही हॉटेल्स हा मुद्दाच गौण आहे. आठवण येते ती रुपालीच्या किंवा मस्कत मधल्या कॉफीची नव्हे तर एकत्र गप्पा मारत घालवलेल्या वेळेची. त्यासाठीच लेखाचा खटाटोप. चवीचाच मुद्दा म्हणाल तर तेवढ्यासाठी पुण्याहून डेक्कन क्वीनने फोर्टला फक्त जेवणासाठी बऱ्याचदा गेलेलो आहे.

श्रीरंग जोशी - धन्यवाद

अथांग आकाश - धन्यवाद

चौकट राजा - फोटो आवडलेत, छान वाटलं. स्तुती कोणाला नको असते. ही सर्व छायाचित्रे मोबाईल फोनने घेतलेली आहेत. आमचा SLR कालबाह्य झाला आणि तीन वर्षांपूर्वी विकून टाकला. आता खिशात मावणारा आणि खिशाला परवडणारा फोनच वापरतो. तुर्कीची माझी मोहीम कागदावरच राहिली असली तरी सरनौबतांनी मात्र इस्तंबूल-पार भगवा फडकवला आहे.

तेजस आठवले - धन्यवाद

झेन - आवडले वाचून छान वाटले

चौकस - धन्यवाद चौकस. प्रवासवर्णनापेक्षा जुन्या आठवणींना उजाळा हे प्रयोजन असल्यामुळे मोजकेच फोटो टाकले. मस्कतला मासे छानच मिळतात. तुमच्यासाठी काही...

IMG_20180213_221739

सिरुसेरी - हाहा. मोहीम फत्ते झाली पण शिकस्त कोणाला द्यायची नव्हती. हा लेखही माझी आणि सरनौबतांची संयुक्त मोहीमच होती.

राघव - पुढची बिअर आणि गोव्याचा फोटो तुझ्याबरोबर

मुक्त विहारि's picture

22 Feb 2021 - 8:23 am | मुक्त विहारि

चवीचाच मुद्दा म्हणाल तर तेवढ्यासाठी पुण्याहून डेक्कन क्वीनने फोर्टला फक्त जेवणासाठी बऱ्याचदा गेलेलो आहे.

हे आवडले

प्रचेतस's picture

21 Feb 2021 - 8:19 pm | प्रचेतस

मस्त.
लेखनही छान, फोटोही सुरेख.

गवि's picture

21 Feb 2021 - 8:24 pm | गवि

उत्तम प्रवासवर्णन. पेठकरकाकाही तिथेच असतात असे वाटत होते. त्यांचे तिथे उपाहारगृह आहे त्याबद्दल धागा वाचला होता. पूर्वी ते नक्की मस्कतला होते. आता कदाचित अन्य देशात असतील.

गोंधळी's picture

21 Feb 2021 - 8:45 pm | गोंधळी

वर्णन व चित्रे दोन्ही 👌

आपला भारत असा चकाचक कधी होइल?

गोरगावलेकर's picture

22 Feb 2021 - 8:41 am | गोरगावलेकर

खूप छान लिहिले आहे आणि फोटो तर एकाहून एक सुंदर. आपली परवानगी गृहीत धरून डेस्कटॉपच्या वॉलपेपरसाठी डाउनलोड केले आहेत फोटो.

जुइ's picture

22 Feb 2021 - 9:09 am | जुइ

सुंदर प्रकाशचित्र आणि तितकेच चांगले वर्णन! भटकंती आवडली.

किल्लेदार's picture

22 Feb 2021 - 6:19 pm | किल्लेदार

प्रचेतस - धन्यवाद
गवि - धन्यवाद. सरनौबतांना कदाचित माहिती असेल.
गोंधळी - भारतही चकाचकच आहे की.
गोरगावलेकर - जरूर वापरा. आनंदच वाटेल.
जुई - धन्यवाद

मदनबाण's picture

22 Feb 2021 - 6:47 pm | मदनबाण

छान वर्णन आनि सुंदर फोटो !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pagal Nahi Hona (Official Video) Sunanda Sharma | Sonu Sood | Jaani | Avvy Sra | B2gether | Sky

@गवि - पेठकरकाका चांगलेच परिचयाचे आहेत. त्यांचे एक उपहारगृह (मुंबई कॉर्नर) आमच्या घराच्या कॉर्नरलाच आहे. मराठी मंडळाच्या निमित्ताने अनेकदा गाठभेट होते

चौथा कोनाडा's picture

23 Feb 2021 - 5:24 pm | चौथा कोनाडा

व्वा, क्या बात हैं !
सुंदर वर्णन आणि खुप छान फोटो !

@मुक्त विहारी - तुमच्या तीक्ष्ण नजरेतून "हिंदुस्थान बेकरीचा प्लेन केक" सुटला बहुतेक. कृपया डोंबोलीत कुठे उत्तम केक मिळतो ते सांगा म्हणजे पुढच्या वेळी त्याचा उल्लेख करू ;-)

मुक्त विहारि's picture

28 Feb 2021 - 7:17 pm | मुक्त विहारि

बहुदा, बेकर्स हट असे नाव असावे ... सध्या तरी, चिपळूणला फक्त 2-3 तासच जात असल्याने, त्या 2-3 तासांत बरीच कामे असल्याने, शोधले नाही...

आता, मुद्दाम शोधून काढीन....

नागपुरला, अजित बेकरी मध्ये, त्यातल्या त्यात बरे केक मिळतात...

मध्यंतरी, फोर्ट भागात एका पारशी बेकरीत, बेकरी आयटेम्स चांगले मिळाले होते....

डोंबिवलीत, सध्या तरी, उत्तम केक मिळत नाहीत.आधी माॅन्जीनीज मध्ये मिळत होते, पण सध्या तरी म्हणावे असे उत्तम दुकान, डोंबिवली येथे नाही.

मुवि, असे का म्हणता?---केळकर रोड ( डोबिवली पूर्व ) ला ribons & ballons , मॅजेस्टीक ग्रंथभांडार समोर patticeri uno,( सर्वेश कार्यालया जवळ) मला आवडणारी ही cake shops आहेत. दुकानांची सजावट , केकचा दर्जाही चांगला आहे. डोंबिवली भक्त अजिबात नसलेली, बंबई मेरी जान असलेली,बालपण व तरूणपणातील काही वर्षे मुंबईत काढलेली nutan.

nutanm's picture

2 Mar 2021 - 9:16 pm | nutanm

nutanm

मुक्त विहारि's picture

2 Mar 2021 - 9:45 pm | मुक्त विहारि

तिथले केक खाल्ले आहेत... तिथला गार्लिक ब्रेड पण ठीक-ठाक आहे.

पण, चिपळूण मधल्या केकची सर नाही....

प्रत्येक व्यक्तीच्या जीभेचे चोचले वेगळे असतात, असेच जाणवायला लागले आहे...

कारण, एकाच ठिकाणी खाल्लेल्या पदार्थांच्या बाबतीत, मतभेद होत आहेत...

चालायचेच

चौकस२१२'s picture

3 Mar 2021 - 7:21 am | चौकस२१२

बऱ्याच उपनगरात केरळी लोकांनी चालवलेल्या बेकऱ्या असतात तिथे साधा पण चांगले केक मिळतो ( मावा बहुतेक ) तास डोबीलीत न्हाय काय?

पण,

मला अपेक्षित असलेली चव आणि उत्तम दर्जा असलेले पदार्थ नाहीत...

अय्यंगार बेकरीतील पदार्थ मला तरी आवडले नाहीत...

ज्ञानोबाचे पैजार's picture

24 Feb 2021 - 11:48 am | ज्ञानोबाचे पैजार

लेख आवडला, फोटो तर अत्यंत देखणे आहेत
पैजारबुवा,

अनिंद्य's picture

26 Feb 2021 - 8:17 pm | अनिंद्य

'मरू' भूमीला 'सहारा' हे नाव :-) :-)

लेख, वर्णन, फोटो सगळेच झकास पण जास्त हेवा दोघांच्या मैत्रीचा वाटला - चष्म-ए-बद-दूर !

रुस्तुम's picture

28 Feb 2021 - 5:59 pm | रुस्तुम

लेख आणि वर्णन सुंदर...फोटो अप्रतिमच किंबहुना फोटो मुळे मस्कत जास्तीच सुंदर वाटायला लागलेय. तैमूर मशिदीसारखीच रम्य हिरवळ जागोजागी आहे...आमच्या घरासमोर आहे अगदी पण कधी फोटो काढायलाही जाणे झाले नाही.....जात जाता इस्तंबूलचा विषय प्रतिसादात आला म्हणून तैमूर मशिदीचे बांधकाम इस्तंबूल मधल्या मशिदीच्या (ब्लू मॉस्क) बांधकामांच्या धर्तीवरच आहे.

टर्मीनेटर's picture

3 Mar 2021 - 10:58 am | टर्मीनेटर

वाह...छान लेख आणि सुंदर फोटो. 'अल सवादी किल्ला' फार आवडला &#128077
बाकी समुद्र, नद्या, नुसते किंवा बर्फाच्छादित डोंगर, जंगले आणि वाळवंटे अशा सर्वच निसर्ग निर्मित गोष्टींचे मला प्रचंड आकर्षण असल्याने लेखातून अनुभवलेली ओमानची 'मरु'भूमी देखील खूप आवडली!
धन्यवाद &#128591

किल्लेदार's picture

7 Mar 2021 - 8:47 pm | किल्लेदार

मदनबाण - धन्यवाद
चौथा कोनाडा - धन्यवाद
ज्ञानोबाचे पैजार - धन्यवाद
अनिंद्य - प्रत्यक्ष भेटता येत नसल्यामुळे निदान लेखातून मित्राची भेट घडावी म्हणूनच खटाटोप
रुस्तुम - इस्तंबूल ला जायची इच्छा प्रचंड आहे. कधी योग येईल कुणास ठाऊक.
टर्मीनेटर - धन्यवाद. मरुभूमी आवडत नसल्यामुळे मी बघितलेली ही पहिलीच. राजस्थान ला सुद्धा अजून गेलेलो नाही.

अभिजीत अवलिया's picture

7 Mar 2021 - 9:43 pm | अभिजीत अवलिया

छान वर्णन.

किल्लेदार's picture

16 May 2021 - 5:41 am | किल्लेदार

धन्यवाद

कर्नलतपस्वी's picture

16 Mar 2021 - 3:43 am | कर्नलतपस्वी

मीत्राशीवाय करमेना
आई जवळ मन रमेना
लवकरच येतो म्हणून
डोंगराला भेटायला गेला

भेट झाली मीत्रांची
दोघा पण खुश झाले
अधंळी कोशीबिरीचा खेळ
पुन्हा खेळू लागले

किल्लेदार's picture

16 May 2021 - 5:41 am | किल्लेदार

हा हा हा

कुमार१'s picture

15 May 2021 - 8:52 pm | कुमार१

लेख, फोटो छान !
...............
माझी भर :

वालुकामय टेकड्या

ok
.......................
'नखल' किल्ला

ok

किल्लेदार's picture

16 May 2021 - 5:42 am | किल्लेदार

अरे वाह

अनिंद्य's picture

28 May 2021 - 5:18 pm | अनिंद्य

अरे वा, कुमार१ - तुमचे ओमान कनेक्शन विसरलो होतो - त्या दिवसांबद्दल लिहू शकाल तुम्ही आमच्यासाठी. बघा जमले तर !

चौथा कोनाडा's picture

28 May 2021 - 5:25 pm | चौथा कोनाडा

व्वा, मस्तच !
कुमार१जी याबद्दल जरूर लिहावे !

कुमार१'s picture

28 May 2021 - 6:49 pm | कुमार१

अनिंद्य व चौको,
धन्यवाद.

मला मनापासून त्या प्रकारचे लिखाण आवडत नाही. म्हणून टाळले आहे.
विशेष पैलू आठवल्यास विचार करेन

Nitin Palkar's picture

5 Aug 2021 - 8:07 pm | Nitin Palkar

उत्तम लेख. सुंदर प्रकाशचित्रे.