पडद्यांचे जग

अनुस्वार's picture
अनुस्वार in जनातलं, मनातलं
12 Feb 2021 - 10:08 am

हौसेला मोल नसतं आणि निराशे इतकी स्वस्ताई शोधून सापडायची नाही. दोन्ही मनाचेच खेळ अगदी दोन टोकांवरले. हौसेत जगणं कृतार्थ झाल्याचा भास आणि निराशेत त्याच्या अंताचा. या दोन मर्यादांना जोडणारी रेषा म्हणजे जीवन. या रेषेवरचा प्रवास मोठा गमतीदार. पण इथले बरेचसे प्रवासी भरपूर वजन घेऊन या प्रवासाची सुरुवात करतात. आणि त्याचा व्हायचा तोच अपेक्षित परिणाम होतो. रेषेवर कुठेही असला तरी त्या माणसाची जीवनातली दमछाक काही थांबत नाही. हां सांगायचं राहिलं.. ओझं पडद्यांचं. हो पडदे.. अनेकवचनी! एका स्थिर रंगमंचावर एकाच वेळी अनेक प्रयोग सादर करायचे असतील तर काय करावे लागेल? तो रंगमंच चारही बाजूंनी पडद्यांनी झाकावा लागेल आणि मग ज्या प्रेक्षकांसाठी सादरीकरण करायचे तेवढ्या बाजूचा पडदा वर घ्यायचा. कुणाचे असे चार प्रयोग चालू असतात कुणाचे दहा! ही सगळी ऐच्छिक हमाली फक्त वेगवेगळे भास जपण्यासाठी. कुणी आपले स्वत्व खुले करत नाही आणि म्हणून दुसऱ्या कुणाच्या स्वत्वाची ओळखही करून घेता येत नाही. झाडाच्या सगळ्याच फांद्यांना फळे लागली तर त्या वजनाने झाड मरणार नाही का? अगदी प्रत्येक वाक्याला प्रेक्षकांच्या टाळ्याच पडत राहिल्या तर नाटकाचा प्रयोग पुढे सरकणे अशक्य होईल. यशाचं टोक गाठलं तरी जीवनाचा लंबक उद्या अपयशाचं टोक गाठणारच नाही याची शाश्वती खुद्द परमेश्वराला देता येणार नाही. म्हणून जगाला खूष करण्यासाठी माणसाने अशा भरमसाट पडद्यांचा आधार घेऊन 'जगण्याचे नाटक' करू नये. ते पडद्यांचं ओझं फेकून द्यावं आणि खुल्या आसमंताखाली बेफिकीर होऊन हौस आणि निराशेचा झोका खेळावा. कारण जीवनात आनंद मिळवण्यासाठी जिंकावं लागत नाही.

धोरणमांडणीविचार

प्रतिक्रिया

Never apologized for being yourSelf
-paulo coehlo

गणेशा's picture

12 Feb 2021 - 11:22 am | गणेशा

अतिशय छान philosophy.

जीवनात आनंद मिळवण्यासाठी जिंकावं लागत नाही.

अतिशय सुंदर दृष्टिकोन बदलवणारे वाक्य...

Copy करतो आहे ह्या वाक्याची..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Feb 2021 - 11:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडलं लेखन.

-दिलीप बिरुटे

उपयोजक's picture

12 Feb 2021 - 12:31 pm | उपयोजक

पण भारतात हे फारसं शक्य नाही.इतकं खुलेपणानं जगणं

मुक्त विहारि's picture

15 Feb 2021 - 6:10 pm | मुक्त विहारि

आर्थिक घडी बसली की, आपल्या आवडीच्या मागे, धावू शकता...

यश मिळण्या पेक्षा, आवडीचे काम करण्यात एक वेगळीच नशा असते ...

माझ्या ओळखीत दोन जण आहेत ...

एकजण कथाकथन करते ... स्वतःच्या आनंदासाठी कथाकथन करत असल्याने, मानधन म्हणून जे देतील ते स्वीकारते ...

दुसरी व्यक्ती, कविता वाचन करते....

अनुस्वार's picture

26 May 2021 - 12:27 am | अनुस्वार

आवडी जगता येणे यातच यश सामावलेले असते.

छोटासा तरीही विचार करायला लावणारा विचार..
लेखन आवडले.

चौथा कोनाडा's picture

12 Feb 2021 - 8:34 pm | चौथा कोनाडा

परदेेमें रहने दो परदा ना उठाओ
पडद्यांचं ओझं फेकून देता येत नसेल तर काही गोष्टी पडद्याआडच राहू द्याव्यात, अन त्या नेपथ्यापासून आपण दूर पळावं !

चलत मुसाफिर's picture

15 Feb 2021 - 4:56 pm | चलत मुसाफिर

परदा नही जब कोई खुदा से
बन्दो से परदा करना क्या
:-)

लाखमोलाचे शब्द!

मुक्त विहारि's picture

15 Feb 2021 - 6:11 pm | मुक्त विहारि

जिंकणे महत्वाचे नसते, तर भाग घेणे महत्वाचे....

आवडले...

कंजूस's picture

15 Feb 2021 - 6:13 pm | कंजूस

प्रत्यक्षात नसतं. फक्त फळ्यावरची रंगीत खडूनी लिहिलेली वाक्यं.

अनुस्वार's picture

15 May 2021 - 11:03 pm | अनुस्वार

प्रत्यक्षात येण्यासाठी आधी प्रयत्न करायला हवेत. अंथरूणावर न‌ पडता झोपेला दोष देण्यात काय अर्थ आहे.

सोत्रि's picture

19 May 2021 - 6:59 am | सोत्रि

अतिशय सुंदर मांडणी केलीय! प्रचंड आवडले हे स्फुट लेखन.

पडद्यांचं रुपक यथार्थ आहे. मॅट्रिक्समधे फसलेलो आपण सगळे नेमकं हेच करतोय. ‘बाकीच्यांना काय वाटेल’ ह्याचे वेगवेगळे प्रयोग चालू आहेत. ह्यात आनंद म्हणजे नेमकं काय ह्याची व्याख्याच बदलून गेलीय.

सुंदर लेखन.

- (पडद्यामागचा) सोकाजी

कारण जीवनात आनंद मिळवण्यासाठी जिंकावं लागत नाही.
क्रेक्ट... मि शक्यतो, कट्टा उपदेश हे दोन मार्ग वापरतो शेवटी मामला स्वांत सुखाचा आहे हे मला आधिच माहित असतं....

आपण मांडलेले विचार अतिशय योग्य वाटले. आपल्या आजूबाजूला आपण अशी अनेक माणसे बघतो जी दाखवतात एक आणि वागतात एक...आणि सरळ विचार करून वावरत असणाऱ्या बऱ्याच लोकांना त्याचा त्रास देखील होतो.
विशेष करून तुमच्या लेखातील "म्हणून जगाला खूष करण्यासाठी माणसाने अशा भरमसाट पडद्यांचा आधार घेऊन 'जगण्याचे नाटक' करू नये. ते पडद्यांचं ओझं फेकून द्यावं आणि खुल्या आसमंताखाली बेफिकीर होऊन हौस आणि निराशेचा झोका खेळावा. कारण जीवनात आनंद मिळवण्यासाठी जिंकावं लागत नाही." हि वाक्ये खूपच भावली.

अनुस्वार's picture

26 May 2021 - 12:34 am | अनुस्वार

वागण्यात आणि बोलण्यात विसंगती दिसली की लगेच बोट ठेवायचं. लोकं सुधारली नाही तरी आपल्याला येणाऱ्या अशा अनुभवांची संख्या निश्चितच कमी होईल.