वाजवा रे वाजवा

नीलकंठ देशमुख's picture
नीलकंठ देशमुख in जनातलं, मनातलं
14 Feb 2021 - 8:05 pm

वाजवा रे वाजवा.
   'आता सावध सावधान समयो' लग्नात शेवटचे मंगलाष्टक सुरू होते ."वाजंत्री बहु गलबला न करणे"ही ओळ सुरू झाली की बाहेर उभे असलेले  बॅंडवाले सज्ज होतात.भटजींनी "शुभमंगल सावधान"म्हटले, की बॅंडचा दणदणाट सुरू होतो.बहुतेक वेळा,कानठळ्या बसवणारा, असह्य होणारा ; क्वचित सुरेल स्वरांची,मधुर गाण्याची रिमझिम करडणारा .वाजंत्री कसेही असोत;पूर्वीतरी, लग्नकार्यात बॅंड अनिवार्य वअत्यावश्यक असे.लग्नाच्या आधीचे दिवशी नवर देवाकडचे लोक (वर्हाड) येतात,तेव्हा त्यांचे स्वागतासाठी  बॅंड तयार हवाअसे.नाही तर त्यातल्या काही लोकांना तो अपमान वाटे.त्यांचे स्वागत, वाजत गाजत होणे आवश्यक असे. सिमंतीपुजनाचे वेळी,गुरुजींचे मंत्रा बरोबरीने बॅंडही सुरू असे.कोण काय बोलतो ते कळले नाही तरी चालेल,बॅंड वाजता हवा.नंतर जेवणाचे वेळी पण बॅंड संगीत हवे.लग्नाच्या  दिवशी सकाळी नवरदेवाचे आंघोळीपासून ते,तो बोहल्यावर चढेपर्यंत अखंड बॅंडवादन.राम नगरकरांचे आत्मकथन 'रामनगरी'मधे ,.लग्नाच्या दिवशी त्यांना बहिर्दशेला वाजतगाजत नेल्याची आठवण सांगितली आहेच.
वधुवरांवर अक्षता पडण्यापूर्वी,क्लेरिनेट वर "बहारो फुल बरसाओ 'वाजवत त्यांना  समारंभ पूर्वक मंडपात घेउन जाणे हा लग्नातील आवश्यक विधी झालेला.त्यामुळे तिथे पण बॅंड वाद्यांची उपस्थिती अनिवार्य.मागील काही वर्षांत लग्नापूर्वी वयाची  मिरवणूक आणि त्यासमोर नाचणे हा होम व कन्यादानाहून महत्वाचा विधी बनल्यामुळे बॅंड वाल्यांना जास्त महत्व आले आहे.लग्नाच्या मुहूर्ताची ऐशी की तैशी करत,मिरवणूकीत बॅंडच्या जोडीला,अति भेसूर आवाजात 'ये देश है वीर जवानोंका' पासून 'मन डोले मेरा तन डोले ' वगैरे,आक्रंदणारा स्वर गोड मानून,आबालवृद्ध स्त्री पुरुष नाचायची हौस भागवून घेतात.शेवटी अर्थातच झिंग झिंग झिंगाट.या नवबॅंडमधे चर्मवाद्ये ,बाजा आणि किंचाळकुमारच
जास्त महत्वाचे असतात .
पुर्वी जानोसा (वर्हाड उतरण्याची जागा )वेगळी कडे असे.
त्यांना नाष्टा जेवणासाठी तसेच लग्नमंडपात,वाजतगाजत
आणावे लागे.लग्न लागले नंतरचे कार्यक्रम पण बॅंडच्या गजरात होत. तोपर्यंत बॅंड पथकातील कांही वादक गायब होऊन मोजकेच शिल्लक राहात.ते ही बिचारे वाजवून वाजवून  कंटाळलेलेअसत.काही लग्नात त्यांच्या  नाष्टा,चहापाणी जेवणाची सोय असे.नाहीतर उपाशी पोटीच 'वाजवा रे वाजवा'.मुलीच्या पाठवणीच्या वेळी, "जा मुली जा दिल्या घरी सुखी राहा" किंवा "बाबुल की दुआए लेती जा" वाजवे पर्यंत अनेक विधींसाठी वाजवून, त्यांची तोंडे,घसे व हात थकून गेलेली असत.त्यामुळे पाठवणीचे वेळी हवा तो उदास मुड वाद्यातून आपोआप निघे.वातावरण निर्मिती साठी वेगळे काही करायची गरज नसे.
लग्नात पोलीस बॅंड असणे हे खूप प्रतिष्ठेचे लक्षण.माझे मोठेकाका 'पोलीस पैरवीकार'म्हणजे सरकारी वकील होते.त्यामुळे माझ्या मोठ्या बहिणीच्या पोलीस बॅंड आला होता.त्यांचे ऐटबाज रंगीतपोषाख,चकाकणारी वाद्ये,कोंबडबाज्या(बॅगपाईप),पथकप्रमुखाचेहातातील चांदीच्या मुठीची काठी,त्याने काठीच्या  हालचालींना केलेल्या  इशारेनुसार वादकांनी वाजवलेल्या सुरावटी,धुन;सगळेच गुंगवून टाकणारे.आम्हा मुलांसाठीच
नाही तर सर्वांसाठी तो चर्चेचा आणि कौतुकाचा विषय होता.
  भुसावळ, चाळीसगाव,सिन्नर आदी गावातील बॅंड पथके खूप प्रसिद्ध होती.हौशी पैसेवाले लोक ,खास वराती साठी त्यांना बोलावत.त्यांचे ऐटबाज ड्रेस पाहायला गाणे ऐकायला लोक गर्दी करत.
  खेडे असले तरी फार पूर्वी आमच्या गावी मोठा व लहान,
असे दोन बॅंड पथक होते.ज्या बॅंड मधे  वाजवणारे लोक दहा,तो 'मोठा',व ज्यामधे सहा वाजवणारे तो 'लहाना' नावाने ओळखला जाई.या शिवाय गावात हालगीवाले ,ताशा वाले,सनईवाले तसेच तुतारी वाजवणारे पण होते.बॅंडवाल्यांकडे असतात तसे निळ्या लाल रंगाचे आकर्षक गणवेश मात्र लहान व मोक दोन्हीही ताफ्याकडे नव्हते. कमरेला धोतर,
लुंगी,किंवा दुबळके (प्यांट), वर सदरा वा बनियन,डोक्याला टोपी,पटका नाहीतर बोडके असा बहुतेकांचा वेष असे.
  लग्नाची तयारी करताना बॅंडवाल्याना सुपारी देणे,म्हणजे त्यांची  बिदागी ठरवणे हा महत्वाचा कार्यक्रम असे. वाजविणारे किती आहेत,किती कार्यक्रम, किती वेळ वाजवणार?,गावी की परगावी? इ.वर त्यांची बिदागी ठरे.ती शंभर पासून ते हजार पर्यंत असे.हालगी ताशे वाल्यांची बिदागी तर आणखी कमी असे.ज्यांना बॅंड परवडत नाही,ते या मंडळींची सेवा घेत.
  लग्नाच्या हंगाम नसला की बहुतेक सगळे वादक, गावात शेतमजुरी करत,किवा साखर कारखान्यात उसतोडीला.काम नसले तर रात्री बेरात्री कुणाच्या तरी शेतात कणसे खुडणे,लाकूड चोरी आदी  किरकोळ चोरी चपाटीच्या उद्योगात पण काहीजण असत.
तुळशीचे लग्नापासुन मार्गशिर्ष महिन्यापर्यंत आणि पुढे  ,
उन्हाळ्यात वैशाखापर्यंत लग्नाचा हंगाम.तेवढ्याच काळात बॅंड वाल्यांना कामाची शाश्वती.शिवाय बारसे,साखरपुडा,गृहप्रवेश,अशा वैयक्तिक; तसेच गावातील सार्वजनिक कार्यक्रम ,मिरवणूका इ.वेळी बॅंडची गरज भासे.एरवी बासनं ( वाद्ये)बांधून ठेवायची.दिवाळी, पाडवा अशा प्रसंगी घरोघरी जाऊन ,वाजवायचे व मिळेल ते पैसे,धान्य,जुने कपडे अशी 'बक्षिसी' पदरात पाडून घ्यायची.असा हा बीनभरवशाचा धंदा असल्याने एकंदरीत परिस्थिती अवघड होती.
  तुलनेने बीडच्या बॅंड वाल्यांची परिस्थिती बरी असावी.तिथे अनेक बॅंड पथके होती,त्यातील आदर्श 'ब्रॉस' बॅंड पथक प्रसिद्ध .हे "ब्रॉस" प्रकरण काय हे तेव्हा कळत नसे.कालांतराने तो शब्द  'ब्रॉस 'नसुन वाद्याचा धातू ब्रासशी संबंधित आहे हे ज्ञान झाले.असो. त्या बॅंड पथकाचे प्रमुख क्लेरिनेट वादकदोडके हे शास्त्रीय संगीत शिकलेले.रागदारी वर आधारित गाणी सुरेल वाजवत.'कुहु कुहू बोले कोयलिया" फार छान वाजवत.ऐकायला मजा येई. अजूनही लग्नसमारंभात बॅंड वा सनईवर सुरेल गाणे वाजत असेल तर तिथे जाउन खुल्या मनाने व सढळ हाताने कौतुक करायचा मोह आवरत नाही.
  मागील काही दशकात क्लेरिनेट,ट्रंपेट,सॅक्साफोन या सुषिर वाद्यांना चित्रपटसंगीत व शास्त्रीयसंगीताने प्रतिष्ठा मिळवून दिली आहे.दाक्षिणात्य संगीतातअनेक वादक कलाकारांचे क्लरिनेटआणि सॅक्साफोन वादनाचे स्वतंत्र कार्यक्रम होतात.आणि आपल्या सारखे रसीक  पैसे मोजून  ऐकायला आवडीने जातात.
  आवडो वा न आवडो बॅंडचा आवाज आला की कानटवकारतात.
काहीतरी खास घडलंय असे वाटते.ते काय असेल हे जाणण्याची उत्सुकता, नकळत का होईना, बहुतेकांना असते.हा सामान्य  मानवी स्वभाव.गावी बॅंड,हालगी,ताशाचा आवाज कानी पडला की;मुले ,बायका लगबगीने दरवाजात जात.कुणीतरी टोपल्यात गुळ घेऊन मिरवत जाताना दिसे.कुणाला तरी ,कुठल्या तरी, निमित्ताने झालेला आनंद गावात ,'शेअर' करण्यासाठी 'शेरणी 'वाटली जात असे.चिमुटभर गुळ हातावर ठेवला जाई.कधी कधी  अपेक्षाभंग होई. वाजवणारां मागे एखादी बाई हातात कसले तरी ताट मिरवत जाताना दिसे.पाहाणाराचे हाती मात्र काही पडत नसे.लग्नातील रुखवताचे जिन्नस,अगदी खाण्याचे पदार्थांची वाजत गाजत मिरवणुक काढायची रीत होती.ते फक्त पाहून चवीची कल्पना करायची.
   बॅंड मधील खुळखुळा सोडून, ईतर सगळी वाद्ये वाजवायाची कल्पना मी लहानपणी करायचो.सॅक्साफोन, क्लेरिनेट, ट्रंपेट तसेच साईड ड्रम,ढोल,
मोठा भोंपू या वाद्यांचे मला भारीआकर्षण होते.ती वाद्ये वाजवायची प्रबळ इच्छा असे .पण ते शक्य नसे.लग्नात बॅंडवाले जेवायला गेले तरी वाद्यांचे राखणीला कुणी तरी असे.एकदा मात्र संधी साधून ड्रमवर टीपरी बडवली होती.तो आवाज ऐकून बॅंडवाले आल्यावर धुम ठोकली.वाजवता तर येत नाही निदान ,बॅंडवाले गाणे कसे बसवतात हे तरी पाहावे,ऐकावे असे वाटे.पण ते  कुठे व कधी प्रॅक्टीस करत हे कळत नसे.
बीडच्या बहुतेक बॅंड वाल्यांची केशकर्तनालये होती.बॅंड हा साईड बिझीनेस होता.किंवा केशकर्तन हाच साईड बिझीनेस असेल.केश कर्तनाचे कामातून उसंत मिळाली की त्यांची बोटे वाद्यावर नर्तन करीत.डोक्या ऐवजी ढोलावर हात चालवे.म्हणजे एखादा मेहनती कारागीर क्लेरीनेट किंवा ट्रंपेट वा जे त्याचे वाद्य असेल त्यावर गाण्याचा सराव करत बसे.त्यामुळे  गाणे बसवतात कसे हे कधी ऐकायला मिळे. पण एकत्रित सराव पाहायची ऐकायची,व बॅंड वाजवायची इच्छा मात्र पूर्ण झाली नाही.बालपणीच्या अनेक इच्छां सारखी ती पण अपुरी.आज आता त्या इच्छांची दखल घ्यावी असे काही नाही.त्या  ही एकार्थाने अदखलपात्र अन उपेक्षित.वाजंत्र्यां सारख्याच.पण मन मात्र गावाकडच्या बॅंडवाल्यांची दखल घेते.तिथे ते उपेक्षित नाहीत बॅंडचा आवाज कानावर पडला  की, कधी कधी गावाकडचे दोन्ही बॅंड आणि वाजवणारे लोकांचे चेहरे समोर येतात.काळा वर्ण,विरळ केसांना भरपूर तेल,ते चेहर्यावर ओघळलेले,डोळ्यात काजळ,अंगात बनीयन व लुंगी असा अवतार असणारा ,'कलाट' वाजवणारा ,चुड्या (चुडीराम)आठवतो.तो मोठ्या'बॅंडपथकाचा प्रमुख असावा .तोंड आणि तोंडात धरलेली क्लेरिनेट,किंचित वर करून वाजवताना,त्याचे डोळे उर्ध्व दिशेला जात आणि,गळ्याच्या शीरा टरारुन फुगत.ते चित्र आणि त्याच्या साहेबा,आस्रुबा,नामदेव आणि इतर साथीदारांच्या वाजवतानाच्या वेगवेगळ्या भावमुद्रा आणि इतर वेळचे निस्तेज चेहरे डोळ्यासमोर उभे राहतात.एका दिवाळीत संध्याकाळ संपता संपता ,सगळीकडे लावलेल्या पणत्या, दिवे अंधाराचे साम्राज्यावर मात करत होते .त्या सोनेरी पिवळ्या  प्रकाशात तुतारीवाल्याचा तुतारी वाजवताना उजळून निघालेला चेहरा ही आठवतोय. त्यातले कुणीच आता गावी नाहीत.कुठे आहेत?आहेत की नाहीत हे ही माहिती नाही.त्यांच्यासाठी व तमाम बॅंडवाल्यां साठी हे शब्दरुपी वादन .
'वाजवा रे वाजवा.'
नीलकंठ देशमुख

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

सरिता बांदेकर's picture

14 Feb 2021 - 9:52 pm | सरिता बांदेकर

मला तुमचा लेख वाचताना रामनगरीची आठवण येत होती.त्या बॅंडवाल्यांचे वर्णन राम नगरकरांनी पण खूप छान केलंय.
विरळ केस आणि तेल व्वा व्वा मजा आली मला वाचताना.

नीलकंठ देशमुख's picture

15 Feb 2021 - 3:30 pm | नीलकंठ देशमुख

लेख आवडला हे आपण कळवले. खुप धन्यवाद. अशा प्रतिक्रिया उत्साह वाढवतात

अगदी डोळ्यासमोर सगळं उभं राहिलं,कानात तो आवाजपण गुंतला.खुप खुप सुंदर लिहिलंय.
गावाकडे मुंजीची प्रतिका वाटतांनासुद्धा बॅंड लावून वाजत गाजत कार्यक्रम पाहून मज्जा वाटली.आता डीजेच्या भिंती आल्या आहेत.पण ते बहारो फुलं बरसाओची जागा कोणीच नाही घेऊ शकत :)

Bhakti's picture

14 Feb 2021 - 10:12 pm | Bhakti

आवाज घुमला आणि पत्रिका वाचा.

नीलकंठ देशमुख's picture

15 Feb 2021 - 3:35 pm | नीलकंठ देशमुख

हे काय ते कळले नाही

नीलकंठ देशमुख's picture

15 Feb 2021 - 3:31 pm | नीलकंठ देशमुख

खुप छान वाटले. प्रतिक्रिया वाचून. धन्यवाद.

नीलकंठ देशमुख's picture

15 Feb 2021 - 3:32 pm | नीलकंठ देशमुख

प्रतिक्रिया वाचून छान वाटले धन्यवाद

सौंदाळा's picture

14 Feb 2021 - 10:51 pm | सौंदाळा

छान लिहिलंय.
शेवटी हळवं केलंत.
लग्नकार्यात सर्व लोक एका बेधुंद असताना या बँडवाल्यांच्या मनात कोणते विचार येत असतील? त्यांना ती झिंग कधी येत असेल का?

नीलकंठ देशमुख's picture

15 Feb 2021 - 3:36 pm | नीलकंठ देशमुख

प्रतिक्रिया वाचून छान वाटले धन्यवाद

मुक्त विहारि's picture

15 Feb 2021 - 11:37 am | मुक्त विहारि

लग्न आणि मुंजीतला, हमखास कार्यक्रम म्हणजे....

बँड, वरात आणि आइसक्रीम (किंवा, कोला किंवा गोल्ड स्पाॅट)

नीलकंठ देशमुख's picture

15 Feb 2021 - 3:34 pm | नीलकंठ देशमुख

प्रतिक्रिया वाचून छान वाटले धन्यवाद

मुक्त विहारि's picture

16 Feb 2021 - 10:13 am | मुक्त विहारि

तसाच आनंद, इतरांना पण दिलात, तर उत्तम ...

तुम्ही जे लीहता तो कल्पना विलास आहे की तुम्ही प्रत्यक्ष अनुभवले आहे हेच समजत नाही
तुमच्या लिखाणात तुम्ही ज्या प्रसंगाचे वर्णन करता तंतोतंत खऱ्या प्रसंगाशी जुळत.
वाचताना कोठे च वाटत नाही हा कल्पना विलास आहे एवढे तुमचे लिखाण सत्य परिस्थिती शी एकरूप होते.
गावाकडील लाइफ ह्या विषयावर तुम्ही जर लिखाण केले आहे तंतोतंत तसेच गावचे लाइफ असते.
कुठेच कृत्रिम पना जाणवत नाही.

नीलकंठ देशमुख's picture

15 Feb 2021 - 3:46 pm | नीलकंठ देशमुख

जे अनुभवले तेच लिहितो . मनाच्या तळाशी असलेल्नया बालपणी च्या आठवणी आता उतारवयात वर येतात.कल्पनेचे चिमुटभर मीठ केवळ चवीपुरते असते.
तुमची प्रतिक्रिया खूप छान.

चौथा कोनाडा's picture

15 Feb 2021 - 12:43 pm | चौथा कोनाडा

भारी लिहिलंय ! वाचताना बॅण्डवाल्या दिवसात रमलो.
तो रुबाब आणि ग्रेस काही औरच असायचा. बदलत्या काळात हळूहळू ते ही पुसट होत चाललेत.
एकदा चहाच्या कट्ट्यावर चहा पीत असताना दोन बॅण्डवाले गप्पा मारताना ऐकले:
पहिला: चला राव भुक लागली, वडापाव खाऊ या.
दुसरा: वडापाव ? गेले आठवडाभर वडापाववरच आहे. चार-पाच दिवस संडास झाली नाय !
मी चमुकून त्याच्या तोंडाकडे पाहिले. चेहर्‍यावरचे भाव बघवले नाही. अजुनही मला तो चेहरा आठवतो.
कुणाच्या वाट्याला काय काय येत असतं !

नीलकंठ देशमुख's picture

15 Feb 2021 - 3:48 pm | नीलकंठ देशमुख

प्रतिक्रिया वाचून छान वाटले धन्यवाद.उपेक्षितांचे जगणे असेच आहे. काय करणार? आपण जे शक्य, जिथे शक्य ,जेवढे शक्य ते करीत जावे.

बाप्पू's picture

15 Feb 2021 - 3:29 pm | बाप्पू

आवडला.
छान आठवणी. लहानपणी का कुणास ठाऊक पण बँडवाल्यांपैकी खुळखुळा वाजवणाऱ्या व्यक्तीची कीव यायची. इतरांना इतकी चांगली वाद्ये दिलेत आणि याला मात्र साधा खुळखुळा.. वाईट वाटायचे.

त्यांचा रंगीबेरंगी पोशाख मात्र बघत राहावेसे वाटायचे..

डॉल्बी सिस्टीम च्या नादात आता बंडवाल्यांचा व्यवसाय कालबाह्य झाला....

नीलकंठ देशमुख's picture

15 Feb 2021 - 3:49 pm | नीलकंठ देशमुख

प्रतिक्रिया वाचून छान वाटले धन्यवाद.

सोत्रि's picture

16 Feb 2021 - 1:36 pm | सोत्रि

बालपणीच्या आठवणी जाग्या करणारा लेख!

त्यांचे ऐटबाज रंगीतपोषाख,चकाकणारी वाद्ये,कोंबडबाज्या(बॅगपाईप)

ह्यामुळेच लहानपणी मला बॅंडवाला व्हावे असा वाटायचे.
(पण मोठ्या माणसांनी हलकं काम, प्रतिष्ठीत काम असला कचरा त्यावेळी डोक्यात भरला :( )

- (नॅास्टॅल्जिक झालेला) सोकाजी

नीलकंठ देशमुख's picture

16 Feb 2021 - 8:57 pm | नीलकंठ देशमुख

माझ्या आठवणी वाचून तुम्ही पण नॉस्टॅलजिक झालात. खुप छान वाटले. धन्यवाद