स्वराज्याचा लढा आणि पुरंदरचा तिढा ! ( भाग २)

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in जनातलं, मनातलं
15 Jan 2021 - 8:50 pm

आधीच्या भागाची लिंक
स्वराज्याचा लढा आणि पुरंदरचा तिढा ! ( भाग १)


सध्याचा लालमहाल

मुळ लालमहालाचे कल्पनाचित्र

पुणे हे शहाजी राजांच्या राजधानीचे ठिकाण होते.बेंगळूरुवरुन आल्यावर शिवाजी राजे व जिजाउंनी स्वताच्या निवासासाठी लालमहाल नावाचा वाडा बांधून घेतला. या लालमहालाची रुंदी होती साडे सतरा गज म्हणजे साडे बावन्न फुट तर लांबी होती साडे सत्तावीस गज म्हणजेच सव्वा त्र्याएंशी फुट. वाड्याची उंची साडे दहा गज म्हणजे पावणे एकतीस फुट होती. वाड्यामध्ये वाड्यात कारंजे, सदर, पाण्याच्या तीन विहीरी, तळघर हे सर्व बांधले होते.
अर्थात जिजाउसाहेब, शिवाजी राजे आणि दादोजी पुण्यात आले तरी त्यांच्यासमोर डोंगराएवढी आव्हाने होती.सततच्या पडणाऱ्या भयंकर दुष्काळामुळे रयतही त्रस्त झालेली होती. मोगल, आदिलशाही, निजामशाही यांच्या सततच्या लढायांमुळे जहागिरी उद्ध्वस्त झाली होती. लोक परागंदा झाले होते. सन १६३० च्या सुमारास म्हणजेच शिवाजी महाराजांच्या जन्मावेळी शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीच्या दरबारात आलेले होते. निजामशाहीतही मोठा अंतर्गत कलह वाढलेला होता. शहाजीराजे सुद्धा शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी निजामशहाच्या बाजूने खानदेशातील मोगलांच्या स्वारीत गुंतलेले होते याच वेळी आदिलशाही फौजांनी पुण्याच्या जहागिरीत घुसून पुणे कसबा उद्ध्वस्त केला.आदिलशाहाच्या आदेशावरुन मुरारजगदेवाने तर पुणे बेचिराख केले होते. शहराचा कोट पाडून टाकला. पुण्यात अक्षरशः गाढवाचा नांगर फिरवून एक पहार ठोकली होती आणि त्याला तुटकी चप्पल टांगली होती. जणू गाव बेवसाउ करण्यासाठी हा ईशारा होता.पुण्याचा सर्व वेसा पाडल्या गेल्या.शहाजी राजांचे दोन वाडे या पुण्यनगरीत होते.शहाजी राजांवर राग म्हणून तर हि पुण्यावर धाड पडली होती. सहाजिकच हे वाडे जाळले होते. मुरार जगदेवानी ईथेल राजधानीचे स्थान यवतजवळच्या भुलेश्वर डोंगरावर हलवून तिथे तटबंदी उभारून किल्ला बांधला व नाव दिले "दौलतमंगळ".

सुरवात तर मुळापासून करायची होती. रयतेला धीर देण्यासाठी पहार उपसली गेली आणि जी भुमी गाढवाने नांगरली ती सोन्याचा फाळ लाउन नांगरली गेली. तसेच धार्मिक विधी म्हणुन पांढरीची पुजा केली.

त्यावेळचे पुणे हे छोटेसे गाव होते.शेजारी असलेली मुठा नदी, पलिकडच्या उत्तर तीरावर असलेले भांबुर्डा, दक्षिणेला कात्रज, आंबेगाव परिसर हा तसा मोकळा प्रदेश. फक्त पश्चिमेला कोंढाण्याचा पर्वत, त्यापलीकडे तोरणा राखण करीत होता. मुलुख आदिलशाहीचा असल्याने मोंघलापासून भिती होतीच.दौलतीच्या मालकासाठी एकच वाडा असावा हे दादोजींना मान्य नव्हते. सुरक्षेच्या दृष्टीने ते योग्यही नव्हते.

म्हणून दादोजींनी पुण्याच्या द्क्षिणेला कात्रजच्या डोंगरापलीकडे खेडेबारे या गावी वाडा बांधला. खेडेबारे गाव डोंगराच्या आडोश्याला असल्याने आक्रमणाची चाहुल लागली तरी बचावासाठी पुरेसा वेळ मिळावा हा हेतु होता. ईथे जी गावे वसवली तीला शिवाजी राजांवरुन "शिवापुर", जिजाउसाहेबांवरुन "जिजापुर" अशी नावे दिली. दौलतीचे हवालदार म्हणुन मुदगल नर्‍हेकर देशपांडे यांना नेमले.आमराई लावली गेली. येथील आंबे वाखाणले जात. या बागेला शहाजी राजांचे नाव देण्यात आले, "शहाबाग". राजांचा मुक्काम काहीकाळ पुण्यात तर काही काळ शिवापुरात असायचा.
स्वराज्यातील पहिले धरण छत्रपती शिवरायांनी इसवी सन १६५६ साली खेडशिवापूर येथून वाहणाऱ्या शिवगंगा नदीवर स्वराज्यातील पहिले धरण बांधून प्रजेच्या पिण्याचे व शेतीच्या पाण्याची सोय केली.. या धरणाचे वैशिष्ट्य म्हणजे धरणाच्या दोन्ही बाजूनी पाणी गावात खेळते राहण्यासाठी २ पाट काढले त्यातील उजव्या बाजूचे पाणी खोलेश्वर मंदिरा जवळून खेड शिवापूर येथील शिवाजी महाराजांच्या वाड्याजवळून तसेच पुढे भाऊ नागोजी वाड्याच्या पाठीमागुन जाते व तसेच पुढे केतकाई येथे आंबील ओढ्यास जाउन मिळते.. व डाव्या बाजूच्या पाटाचे पाणी शेतीसाठी पटी या विभागातून पुढे जाऊन खेड शिवापूरचे श्रद्धास्थान असलेल्या आई भवानी मातेच्या हेमाडपंती मंदीरा जवळून जाउन पुन्हा आंबील ओढ्यास मिळते. येथे असलेल्या साळोबा मंदिरा मुळे या धरणास साळोबाचे धरण म्हणतात..
२००५ - २००७ च्या दरम्यान शिवापूर गावावर असलेल्या दुष्काळाच्या दरम्यान गावकऱ्यांना या साळोबाच्या धरणानेच पाणी पुरवले, पाण्याची वानवा संपल्यावर त्यातील एक पाट बंद करण्यात आला, पण आजही शिवापूर गावच्या शेतीसाठी लागणारे हे पाणी साळोबाचे धरण पुरवते.

छायाचित्रात जांभळी धरण
शिवाजी राजे,जिजाउ यांचा मुक्काम शिवापुराला असायचा याचा एक पुरावा आहे. दादोजी कोंडदेव यांनी २ एप्रिल १६४६ रोजी विठ्ठल गिरमाजी हवालदार शिरवळ यास लिहीले आहे,"रामजी विठ्ठल देशकुलकर्णी शिरवळ हा पुण्यास येउन सौ मातुश्री जिजाबाई यांच्या समक्ष बोलला कि आपला व तिमाजी पुरुषोत्तम यांच्या वतनाचा निवाडा गोत देउन करावा.त्यावरुन तुम्हास हे पत्र लिहीत आहे.तरी परगण्याचे देशमुख, पाटील व वतनदार यांचे माथा घालून निवाडा गोतन्याय करणे.शिवापुरचे मुक्कामी वाटणीचा मजहर करुन दिला आहे.त्यावर जाउ नये". ( एतिहासिक पत्र सार संग्रह खंड १, पृष्ट १११) या पत्रात लिहीले आहे तेच शिवापुर कसे त्याचा उलगडा पुरंदरे दप्तर ३, पृष्ट १३० यावरील पत्रात सापडतो. हे पत्र सन १६५३ चे आहे. "महाराज साहेबी ( शहाजी राजे) मातुश्री आउसाहेब व तुम्हास ( शिवाजी राजे) खेडेबारीयास दादाजी पंतापाशी पाठविले. ते वेळेस कसबियामध्ये वाणियाचे व बाजे मोहतर्फा कुळे यांची घरे मोडून तो जागा वाडीयासी केला व त्या कुळासाठी शिवापुर पेठ वसवायचा तह केला". यावरुन खेडेबारे हेच शिवापुर होते हे सिध्द होते व शिवापुरचा वाडा बांधण्याच्या आधी शिवाजी राजांचा मुक्काम पुण्यात होता हे हि समजते.
याच वेळी पाषाण गावाजवळून राम नदी वहात होती.या नदीकाठी एक शिवालय होते, त्याचे नाव "सोमेश्वर".मंदिराला दगडी आवार बांधण्यात आले, नदीला घाट बांधला आणि या नवीन परिसरात नवीन पेठ वसवून तीला आउसाहेबांचे नाव देण्यात आले, "जिजापुर".
दादोजी कोंडदेव
आता येउया शिवचरित्रातील अनेक वादग्रस्त प्रकरणांपैकी एक म्हणजे दादोजी कोंडदेव होय. दादोजी कोंडदेव शिवरायांचे गुरु असल्यापासून ते शहाजी राजांचा कारभारी तसेच शिवाजी राजांच्या राज्यस्थापनेचा विरोधक असल्यापर्यंतची विधानं इतिहासकारांनी करत असतात. त्यांपैकी दादोजी हे शिवाजी राजांचा गुरु व मार्गदर्शक हि दोनचं जास्त प्रचलित आहेत.
ज्ञात इतिहासात दादोजी कोंडदेव हे शहाजी राजांच्या पुणे जहागीरीतील कारभारी तसेच आदिलशाही नियुक्त कोंडाण्याचे सुभेदार असल्याची माहिती मिळते. पैकी, प्रथम आपण आदिलशाही सुभेदार म्हणून आढळणाऱ्या दादोजींच्या कागदपत्रांची माहिती घेऊ, तसेच दादाजीच्या अधिकारांची सुभेदार म्हणून व त्यांच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती किती होती हे पाहू.
दादोजींचे अधिकार तसेच त्याचे प्रशासकीय व्यवस्थेतील स्थान समजावून घेण्याकरता प्रथम आदिलशाही राजवटीत सुभेदाराच्या दर्जाचे, हुद्द्याचे नेमके स्वरूप काय होते याची माहिती घेऊ. आदिलशाही राजवटीच्या प्रशासकीय व्यवस्थेची परिपूर्ण माहिती देणारी साधने उपलब्ध नाहीत. मराठी इतिहासकारांनी याबाबतीत ग्रँट डफच्या बखरीचाच प्रामुख्याने आधार घेतल्याचे,तेव्हा विजापुरी प्रशासकीय व्यवस्थेबाबत डफ काय म्हणतो ते प्रथम पाहू. डफच्या कथनानुसार गोवळकोंडा, विजापूर व निजामशाही या तिन्ही राजवटींच्या प्रशासकीय व्यवस्थेत सर्वांत मोठा प्रांत ' सरकार ' असून त्यानंतर अनुक्रमे परगणा, कर्यात, संमत, महाल, तालुका अशी विभागवार उतरंड आहे. शिवाय प्रांत आणि देश अशी दोन हिंदवी नावे असल्याचाही त्याने उल्लेख केलाय. पण त्यावरून त्या विशिष्ट भूप्रदेशाचे आकारमान समजावून घेता येत नाही.
आता मोकासदारा विषयीची डफची माहिती पाहू :- ' विजापुरचे राज्यांत एक मोठा अमिल होता त्याचे नांव ' मोकासेदार ' ठेविले असे, आणि दुसरे अमिल त्याचे आज्ञेत वागत असत. असे कितीएक मोकासेदार वीस वीस वर्षे कामावर होते ; त्यांत कोणी मेला असतां त्या कामावर त्याचे पुत्रास ठेवावे, अशी चाल होती ; कां की, मोकासदारांस त्या द्रव्याचा कांही विभाग होता. कितीएक वेळां एका वर्षात मोकासेदार पहिला दूर करून दुसरा ठेविला असे झाले. आणखी मोकासेदारी निरंतर मुसलमानांसच द्यावी असे नव्हते, कधी कधी हिंदूंसही देत होते. त्या राज्यांत मोकासेदारीपेक्षा मोठा अधिकार दुसरा बहुतकरून नव्हता. कधी कधी ' सुभा ' मोठा असे, परंतु सुभ्याने नेहेमी त्या प्रांती नसावे, बहुधा दरबारीच असावे. त्याने मुलखाचे वसुलाचे काम न करावे, परंतु त्याचे मुलखाचे दप्तरावर त्याची सही घ्यावी लागत असे.
डफच्या माहितीनुसार आदिलशाही प्रशासनात मोकासदार हा श्रेष्ठ असून सुभेदार हा त्याचा कनिष्ठ असल्याचे सिद्ध होते. अर्थात इथे त्याने कधी कधी सुभेदार मोठा असल्याचे सानाग्त शंकेला थोडी जागा ठेवली आहे परंतु उपलब्ध पुराव्यांच्या आधारे त्या शंकांचे निरसन करता येऊ शकते.
इतिहास संशोधक ग. ह. खऱ्यांनी ' शिवकालीन राजपत्रांची लेखनपद्धति ' नावाचा एक लेख लिहिला होता. त्यातील आदिलशाही लेखनपद्धतीची माहिती देताना काही महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख केलाय तो असा :- 'विजापुरी दुय्यम प्रतीच्या म्हणजे सुभेदार वगैरेंनी लिहिलेल्या हुकुमांचे आरंभी ' अज रख्तखाने ' चा प्रयोग नेहमी असतो. सुभेदारांच्या नांवापाठीमागे खुदायेवेद, खाने अली शान, खाने-अजम-अकरम, मशरूल हजरत (राजविख्यात), मशरूल अनाम (लोकविख्यात), मोतमीद दौलत (विश्वासनिधि) वगैरे उपपदे लावून पुढे खुली-खलद-तुली दयाम-दबाम दौलतहू (अखंडितलक्ष्मी, खंडेश्वरी) हे उपपद हमेशा लाविलेले आढळते.तिय्यम प्रतीचे अधिकारी म्हणजे हवालदार, महालकरी वगैरे. यांनी लिहिलेल्या पत्रांचा सामान्यतः आरंभी ' अज दिवाण ठाणा ' असा प्रयोग येतो. शेवटी ' मोर्तब सुद ' हा शेरा व त्याचाच शिक्का उठविलेला असतो. हवालदाराच्या हाताखाली सुभेदाराप्रमाणे सुरनीस, बारनीस, दफ्तरनीस वगैरे अधिकारी नसल्याने यांच्या पत्रावर ' रुजु सुरु, बार ' वगैरे शेरे सहसा नसतात.
खऱ्यांची माहिती, डफचे विवेचन गृहीत धरून शिवकालीन पत्रसार संग्रहातील दि. ११ डिसेंबर १६४५ च्या एका पत्राचा ( क्र. ५०७ ) मायना पाहिला तर त्यात दादाजीचा ' अज दि. दादाजी कोंडदेऊ सुभेदार कोंडाणा ' असा उल्लेख आहे.
विजापुर राज्यात सरदार आणि प्रशासक यांना त्यांच्या कामगिरीच्या मोबदल्यात सरंजाम अथवा जहागिरी देण्यात येत असे. अश्या जहागिरीत अर्थात किल्ल्यांचा समावेश नसे.त्यामुळे एखाद्या नाठाळ अमीर, उमरावाला वठणीवर आणण्यासाठी बादशहाला विशेष त्रास पडत नसे. तसेच एकाद्या सरदारावर बादशहाची खप्पा मर्जी झाली तर त्या सरदाराला किल्ल्याचे अथवा गढीचे संरक्षण नसल्याने आपल्या जहागिरीचे रक्षण करण्यासाठी कोणतेही साधन नसे. त्यातही सह्याद्रीतील मावळातील गिरीदुर्ग आणि सागरातील जंजिरे यांना त्यांच्या मोक्याच्या स्थानामुळे विशेष महत्व असे. विजापुर दरबाराने शहाजी महाराजांना जी पुण्याची जहागीरी दिली तरी या परिसरातील महत्वाचे किल्ले म्हणजे कोंढाणा उर्फ सिंहगड, चाकणचा भुईकोट, पुरंदर यावर बादशाही अंमल होता.येथील किल्लेदार शहाजी महाराजांच्या अखत्यारीत नसून थेट आदिलशाही चाकरीत होते. कदाचित एन तारुण्यात हा सगळा प्रसंग पाहिल्यामुळे शिवाजी राजांच्या मनात किल्ल्यांचे महत्व ठसले असावे आणि पुढे त्यांनी आयुष्यभर गड,कोटांसाठी अनेक झुंज केली आणि अनेक नवे गड बांधले.
याव्यतिरिक्त दादोजी कोंडदेवांची सुभेदार म्हणून आढळणारी सुमारे आठ दहा पत्रे शिवकालीन पत्रसार संग्रहात ( शिपसासं ) प्रकाशित झाली असून त्यांपैकी सर्वात पहिले स. १६३३ च्या डिसेंबर मधील आहे. ( क्र. ३७०, ३७१ ) पैकी, पत्र क्र. ३७० मध्ये दादोजींचा उल्लेख ' रा. दादाजी कोंडदेऊ सुभेदार दिवाण जाले ' असा येतो. पत्र क्र. ३७०, ३७१ एकाच निवाड्याशी संबंधित असून ते एकाच तारखेचे असल्याचे नमूद आहे. पैकी, क्र. ३७० कबूलकतबा असून क्र. ३७१ महजर आहे. कतब्यात दादोजींच्या पुढे सुभेदार दिवाण शब्दप्रयोग असून महजरात फक्त सुभेदार म्हणून उल्लेख आहे.
दादोजी कोंडदेवांचा फक्त सुभेदार म्हणून उल्लेख पत्र क्र. ३७१, ४३२, ४५७, २४९२, २५१४ मध्ये येतो. त्याखेरीज दादोजींच्या मृत्यूनंतर शिवाजीच्या पत्रांतही त्याचा उल्लेख काही वेळा सुभेदार असाच येतो. शिवकालीन पत्रसार संग्रहात काही पत्रे अशीही आहेत ज्यात दादोजींचा निर्देश सुभेदार वा दिवाण म्हणून न येता नुसता दादाजी कोंडदेऊ असाच येतो. ( पत्र क्र. ४५६ ) अर्थात, मूळ पत्र समोर नसल्याने हि पत्रे यास्थळी विचारात घेणे चुकीचे ठरेल.
प्रथम आपण दादोजींच्या सुभेदार, दिवाण पदाचा उलगडा करण्याचा प्रयत्न करू. उपलब्ध पत्रांमधील व इतिहासकारांच्या लेखातील माहिती पाहता दादोजी कोंडदेव हे कोंडाण्याचा सुभेदार होते तसेच किल्ले कोंडाणाही त्यांच्या ताब्यात होता. दादोजीकडे जो प्रांत आदिलशाहीत सुभा म्हणून आला तो तत्पूर्वी निजामशाहीत मोडत होता. त्यावेळी कोंडाणा विभाग हा सुभा अथवा वेगळा प्रांत असल्याची माहिती मिळत नाही. त्याचप्रमाणे पुढे शिवाजी राजांच्या राजवटीतही कोंडाणा अथवा सिंहगड नावाचा सुभा असल्याचे उल्लेख मिळत नाहीत. यावरून निजामशाही अस्तानंतर निजामशाही भूप्रदेश क्रमाक्रमाने ताब्यात घेत असताना तात्पुरत्या प्रशासकीय सोयीकरता कोंडाणा सुभा निर्माण करण्यात आला असावा असे वाटते. तसेच दादोजींची ' सुभेदार नामजाद किले कोंडाणा व महालनिहाये ' हि पदवी व डफने दिलेली विजापुरी प्रशासकीय व्यवस्था लक्षात घेता असे दिसून येते कि, त्या काळात आदिलशाहीने काही महालांचा एक गट --- विशिष्ट सुभा बनवून त्यावर दादोजींची नियुक्ती केली होती व प्रांताच्या रक्षण, सोयीसाठी व त्या भूप्रदेशात मोडणारे मजबूत स्थळ म्हणून कोंडाणाही त्याच्यांकडे सोपवला होता. अर्थात हि व्यवस्था तात्पुरती असून त्यातील सुभेदार पदासही फारसे मह्त्व नसून केवळ प्रशासकीय सोयीकरता --- जसे शिवाजीने पुढे सरसुभेदार पद निर्माण केले होते तसेच या स्थळी आदिलशहाने कोंडाण्याच्या बाबतीत केल्याचे दिसते. बाकी, दादोजींचा मूळ हुद्दा, अधिकार दिवाणाचेच दिसतात व त्याची मुख्य कामगिरीही याच क्षेत्रातील असल्याचे उपलब्ध पत्रव्यवहारावरून दिसून येते.
अर्थात हा सगळा गोंधळ व्हायला कारणीभुत होती ती मावळातील बंडाळी आणि एकुणच बेबंदशाही. अगदी निजामशाहीमध्ये उत्तम प्रशासकीय व्यवस्थेसाठी प्रसिध्द असणार्‍या मलिक अंबरच्या कारकीर्दीत ही मावळात हि पुंडगिरी सुरु होती. एकुणच जो देशमुख प्रबळ तो सारा वसुली करायचा. शके १५५९ मध्ये दादोजी कोंडदेवानी जेव्हा मावळाचा कारभार हाती घेतला तेव्हा कोणतेही उपाय योजून या परिसरात शिस्त बसवण्याची जबाबदारी दादोजींकडे सोपवण्यात आली होती. जरी पुणे परगण्याची जहागिरी शहाजी राजांकडे असली तरी मोकासदार नेमून त्याद्वारे सरकारी कामे करण्याचा अधिकार आदिलशहाकडे होता. अगदी शहाजी राजांकडे सुपे, शिरवळ येथील सर्वाधिकार देण्यात आले नव्हते असे दिसते. याचा अर्थ दादोजी आदिलशहाने नेमलेले सुभेदार असून ते शहाजी राजांच्या जहागिरीची आणि मोकास्याची जबाबदारी पार पाडत असावेत हाच निष्कर्श निघतो. आता आपण दादोजी कोंडदेव हे शहाजीच्या पुणे जहागिरीतील पोटमोकासदार, कारभारी होते कि नव्हते याची चर्चा करू.
[ विशेष टिपः- भोसले कुटुंबियांशी संबंधित ऐतिहासिक कागदपत्रांत दादाजीचा प्रथम उल्लेख दि. ३१ जानेवारी १६२० च्या इनामपत्रात येतो. प्रस्तुत इनामपत्र सनदापत्रे तसेच ऐतिहासिक पत्रबोध व मराठ्यांचा इतिहास : साधन परिचय मध्ये छापलेलं असून ऐतिहासिक पत्रबोधच्या संपादकांनी रियासतकार सरदेसायांनी या सनदेच्या सत्यतेविषयी साशंकता व्यक्त केली आहे. परंतु त्यांना या इनामपत्राच्या अस्स्लतेविषयी शंका का आली, याचा खुलासा केलेला नाही.
या इनामपत्रानुसार रंगो गणेश सोनटके हा कुलकर्णी असून हिशेब देण्याकरता किल्ले कोंडाण्यास गेला. तिथे दादो कोंडदेऊच्या घरी भोजनास राहिला. भोजनानंतर खोलीत बिछाना घालून निद्रा केली. पाच सहा घटकांनी अंगाची आग होऊन पाणी पाणी करत प्राण सोडला. विशेष म्हणजे खोलीस बाहेरून कुलूप असून ते दुसऱ्या दिवशी उघडण्यात आले. रंगो सोनटके भोसल्यांचा जुना चाकर असल्याने जिजाबाईने रंगो सोनटकेच्या सुनेला एकशेवीस बिघे जमीन चोळी - कांकणास इनाम म्हणून दिली. प्रस्तुत सनदेच्या शेवटी लेखनकाल दिला आहे ' शके १५२६ सिध्यर्थीनाम संवत्सरे, माघ शुद्ध सप्तमी रविवार लेखनसीमा '
शकाचे १५२६ चे इ. सनात रुपांतर केल्यास १६०४ वा १६०५ येते. सनद जिजाबाईंनी दिली हे लक्षात घेता शक लिहिण्यात चूक झाली हे निश्चित. कारण शहाजींचे जन्मवर्षच मुळी इतिहासकारांनी स. १५९४ ते १६०१ दरम्यान धरले आहे. दुसरे असे कि, शक लेखनातील चूक मूळ दान पत्रावर आहे कि नकलेवर आहे, याचा खुलासा कोणत्याच संपादकाने केलेला नाही. खेरीज सनदापत्र कसबे जिंतीमधून देण्यात आले आहे व रंगो सोनटके हिशेब देण्यासाठी कोंडाण्यास गेल्याचा उल्लेख आहे. त्यावेळी कोंडाणा हे जिंती परगण्यावरील प्रमुख ठिकाण होते का हा प्रशन उद्भवतो. तसेच जिंती गाव श्रीगोंदा परगण्यात येत असल्याचे याच सनदपत्रात नमूद असताना जिंतीचा कुलकर्णी कोंडाण्यास कसा हाही प्रश्न आहेच.
दुसरे असे कि, दादोजी कोंडदेवांचा हुद्दा, अधिकार यात स्पष्ट नाही. तसेच सनद खरी मानल्यास दादोजी कोंडदेव हे देखील इतरांप्रमाणेच यावेळी निजामशाही नोकर होता असे म्हणावे लागते. ज्यास प्रत्यंतर पुरावा नाही. तसेच सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे श्रीगोंद्याचे मूळ नाव चांभारगोंदे असून त्याचे नामांतर यावेळी झाले नव्हते. तेव्हा हे इनामपत्र जमेस धरणे योग्य ठरणार नाही.
शिवकालीन पत्रसारसंग्रहात क्र. ५१३ मध्ये एक पोटपत्र छापलेलं असून त्याची तारीख २ एप्रिल १६४६ आहे. प्रस्तुत पत्र दादाजी कोंडदेवांनी शिरवळचा हवालदार विठल गिरमाजी यांस लिहिले असून, त्यातील मजकूर असा :- " रामाजी विठल देशकुलकर्णी शिरवल हा पुण्यास येऊन सौ. मातुश्री जिजाआऊसाहेब यांच्या समक्ष बोलला की, आपला व तिमाजी पुरुषोत्तम यांच्या वतनाचा निवाडा गोत देऊन करावा. त्यावरून हे पत्र तुम्हास लिहिले आहे. तरी परगण्याचे दे||ख, पाटील व वतनदार यांचे माथा घालून निवडा गोतन्याये करणे शिवापूरचे मुक्कामी वाटणीचा महजर करून दिला आहे त्यावर जाऊं नये. "
उपरोक्त पत्रात जिजाबाईचा उल्लेख ' सौ. मातुश्री जिजाआऊसाहेब ' असा केला आहे. अर्थात, संपादकांना हे मूळ पत्र मिळालं होतं कि नक्कल याचा खुलासा होत नाही. त्याचप्रमाणे पत्रातील हा उल्लेख मूळ जसा होता तसाच ठेवला कि नकलकाराने त्यात भर घातली हे समजायला मार्ग नाही. दुसरे असे कि, रामाजी विठल हा जिजाबाईस भेटला असला तरी तिच्या आज्ञेवरून दादाजींनी हा हुकुम काढल्याचे यात दिसून येत नाही. तसेच शिरवळ शहाजीच्या मूळ मोकासदारी प्रदेशात मोडत नसून तो स्वतंत्र विभाग होता. बारा मावळातल्या काही भागांची व्यवस्था तिथून पाहिली जात होती, असे काही इतिहासकारांचे मत आहे. शिवाय कोंडाणा प्रांतीचा सुभेदार व दिवाण म्हणून शिरवळशी दादाजी कोंडदेवांचा काही संबंध होता कि नव्हता याचीही स्पष्टता होत नाही. त्यावरून भागातील मुख्य मोकासदाराच्या मुतालिकांकडे आपल्या वतनाची तक्रार रामाजी घेऊन गेला असता मोकासदार शहाजी भोसलेची पत्नी या नात्याने व अन्य काही अज्ञात अधिकारांमुळे जिजाबाईने प्रस्तुत प्रकरण प्रशासकीय व्यवस्थेच्या पद्धतीनुसार दादाजींकडे पाठवले व त्यानेही कार्यपद्धतीनुसार शिरवळच्या हवालदारास योग्य ते निर्देश दिले. याहून अधिक याविषयी काही लिहिणे शक्य नाही.
शिवकालीन पत्रसार संग्रहात क्र. २७४७ वर शिवाजींनी पुरंदरचा नाईकवाडी निलो नीलकंठराव यांस फसवून पुरंदरचा किल्ला कसा ताब्यात घेतला याचा वृत्तांत दिला आहे. या कागदाची तारीख संपादकांनी २९ ऑगस्ट १६७४ अशी दिली असून त्यात दादाजी कोंडदेवांविषयी असा उल्लेख आहे की, ' शिवाजी राजे याणी निजामशाही किले पुरंधर येथील नाईकवाडी निलो नीलकंठराव त्यांस पत्र पाठविले की, " आम्हाजवळ वडिली दादो कोडदेव ठेऊन दिल्हे होते ते मृत्यु पावले. आता आम्ही निराश्रित जालो. तुमचा व आमच्या वडिलांचा बहुत घरोबा स्नेह यास्तव किल्ल्याचे आश्रयाने माचीजवळ येऊन राहू व तुम्ही सांगाल तैसी वर्तणूक करीत जाऊं. "
याबाबतीत ' मराठ्यांचा इतिहास, साधन परिचय ' मध्ये शहाजींचे दि. ७ मे १६५४ चे एक पत्र उपलब्ध असून त्यातील मजकूर पाहता मृत निळकंठरावास जो सरंजाम होता, तो तसाच पुढे चालवण्यासंदर्भात शिवाजी राजांनी शहाजीला शिफारस केली होती व त्यानुसार शहाजींनी निर्णय घेतल्याचे स्पष्ट होते. म्हणजे अधिकारात शहाजी हे निळकंठरावाचा वरिष्ठ होता. त्यांचा सरंजाम त्याच्या वंशजांना पुढे चालवण्याविषयी शहाजी राजांची परवानगी आवश्यक होती. तसेच शिपसासं मध्ये दि. ९ ऑगस्ट १६५४ चे जे पत्र आहे ( क्र. ६७३ ) त्यातील मजकूर पाहता शिवाजींची भाषा साहेबी अर्थात, वरिष्ठ अधिकाऱ्याची दिसते. तो शिवाजी शिपसासं क्र. २७४७ मधील उपरोक्त अवतरणातील भाषा लिहील हे संभवत नाही. तसेच ज्या शिवाजी राजांनी जावळी प्रकरणात स्वबळावर हस्तक्षेप केला असे इतिहासकार मानतात, त्यांनीच उपरोक्त पत्रातील मजकुरास केवळ दादाजींच्या उल्लेखास्तव संमती दर्शवावी यांस काय म्हणावे ?
दादाजी कोंडदेव व शहाजी भोसले यांचा संबंध दर्शवणारी माहिती देशपांडे करिणा, सहा कलमी शकावली, सभासद बखरीत येते. त्यांपैकी प्रथम देशपांडे करिणा विचारात घेऊ.
' पुरंदरे दफ्तर भाग ३ रा ' या कृ. वा. पुरंदरे संपादित ग्रंथात खेडेबारे देशपांडे करिणा प्रकाशित झाला आहे. हा करिणा त्यातील मजकुरावरून शिवकालीन ठरतो. यामध्ये दादाजी साहेबाचा सुभेदार असल्याचा उल्लेख आहे. येथे ' साहेब ' हा शब्द शिवाजीस उद्देशून असल्याची संपादकांची टीप आहे. तसेच शिवाजी लहान असताना शहाजीने त्यांस व जिजाबाईला खेडबारियास दादाजीपतापासी पाठवल्याचा उल्लेख आहे. तसेच शिवापुर पेठ वसवल्याचाही यात उल्लेख आहे.
पैकी दादाजी हा साहेबाचा --- येथे शिवाजी असे जरी संपादकांनी नमूद केले असले तरी पर्यायाने शहाजीचा सुभेदार होता का हे प्रथम पाहू.
उपलब्ध माहिती, साधने पाहता कोंडाणा किल्ला शहाजी राजांच्या ताब्यात असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे दादोजींना सुभेदार म्हणून शहाजी नेमूच शकत नाहीत. कारण अस्सल कागदपत्रांत दादोजी हे कोंडाण्याच्या सुभेदार असल्याचे नमूद आहे. शिवाय, कोंडाणा जर शहाजींच्या ताब्यात होता व दादोजी हा त्यांनी नियुक्त केलेला सुभेदार होता असं क्षणभर जरी गृहीत धरलं तरी दादोजींच्या मृत्यूनंतर विजापूरने मिया रहीम अहमद यांस कोंडाण्याचा सुभेदार नेमल्याचे उल्लेख मिळतात, त्याचे काय करायचे ? ( शककर्ते शिवराय, पृ. २१० )
शिवाजी राजांचे अधिकृत काव्यमय चरित्र शिवभारत त्याच्याच हयातीत परमानंदने रचले. त्यामध्ये शहाजींनी दादाजीपाशी शिवाजी राजांची रवानगी केल्याचा उल्लेख नाही. त्याचप्रमाणे शिवचरित्राच्या साधनांत विश्वसनीय साधन म्हणून मानल्या जाणाऱ्या जेधे शकावलीत दादोजी संबंधी याच काय, पण कोणत्याही बाबतीत साधं अवाक्षरही येत नाही, याचा अर्थ काय घ्यायचा ? त्याशिवाय जेधे करीनाही यासंबंधी कसलाच उल्लेख करत नाही.
दादाजी कोंडदेवचे भोसले कुटुंबियांशी किती जवळचे संबंध होते, हे सिद्ध करण्यापुरताच इतिहासकारांनी देशपांडे करिणा उचलून धरल्याचे माझे मत आहे. अन्यथा याच करिण्यात ' माहादेवभट माहाभास राजेश्री राजियाचे गुरु ' असा जो मजकूर आहे तो दुर्लक्षिला नसता.
दुसरे असे कि, या करिण्यातील घटनांचे कालनिर्देश करिण्यात येणाऱ्या प्रसंगांवरून अनुमानाने ठरवावे लागतात. करिण्याच्या आरंभास दिलेल्या ' सन १०६३ [ श. १५७४ ] ' एवढा कालनिर्देश अपवाद केल्यास संपूर्ण करिण्यात कालनिर्देशाचे उल्लेख येत नाहीत.
या करिण्यासंदर्भात शिपसासंमध्ये क्र. १२११ हे दि. १० मे १६६८ रोजीचे पत्र छापले असून त्यात वेगळीच माहिती मिळते. या पत्रानुसार ज्या वतनासाठी बरीच वर्षे सखो भिकाजी शिवाजीच्या मंत्रीमंडळाशी, अधिकाऱ्यांशी भांडत होता, त्या वतनाचा निवाडा करण्याचे अधिकार शहाजींकडे असून निवडा निकालार्थ शहाजींकडे गेला असता त्याने त्यासंबंधी निर्देश दिल्याचेही यात नमूद आहे. आणि करिण्यात शहाजींकडे प्रकरण गेल्याचा वा त्याने निर्देश दिल्याचा उल्लेख नाही. त्यामुळे करिण्यातील उल्लेख ग्राह्य धरता येत नाही.
दादाजी - शहाजी संबंधांचा उल्लेख करणारे आणखी एक साधन म्हणजे सहाकलमी शकावली. ' शिवचरित्र प्रदीप ' मध्ये प्रकाशित झालेल्या या शकावलीतील सहाव्या कलमात, " शके १५५७ युव नाम संवत्छरी शाहजी राजे भोसले यांसि बारा हजार फौजेची सरदारी इदलशाईकडून जाली सरजांमास मुलूक दिल्हे त्यात पुणे देश राज्याकडे दिल्हा राज्यानी आपले तर्फेने दादाजी कोंडदेव मलटणकर यांसि सुभा सागून पुणियास ठाणे घातले तेव्हां सोन्याचा नांगर पांढरीवर धरिला शांती केली मग सुभेदार याणी कसब्याची व गावगनाची प्रांतात वस्ती केली कोल्याचवषे दिल्हे साहांवे साली तनखा घेतला शाहजी राजे विज्यापूर प्रांती गेले कलम १ "
यावरील आक्षेप असे :- प्रथम शके १५५७ ऐवजी शके १५५८ हवे आहे. कारण शहाजीने आदिलशाही दरबारची नोकरी शके १५५८ तथा स. १६३६ मध्ये पत्करल्याचे सर्वमान्य आहे. यासंबंधी जेधे शकावलीतही शके १५५८ ऐवजी १५५७ असेच वर्ष नमूद केल्याचे लक्षात येते.
दुसरा आक्षेप असा कि, दादाजी कोंडदेव मलटणकरास शहाजीने सुभा सांगून पाथ्व्ल्याचा यात उल्लेख आहे. प्रत्यक्षात दादाजी कोंडदेव हा आदिलशाही नियुक्त सुभेदार असल्याचे अस्सल कागदपत्रांधारे सिद्ध झालेलं आहे.
तिसरा आक्षेप असा कि, प्रस्तुत शकावलीचा रचनाकाल दिलेला नाही. त्यामुळे हिचाही विश्वास धरता येत नाही.
दादाजी - शहाजी संबंधांचा उल्लेख कृष्णाजी अनंत हिरेपारखी उर्फ कृष्णाजी सभासदच्या बखरीत येतो. प्रस्तुत बखर शिवाजीच्या निधनानंतर राजारामच्या कारकिर्दीत लिहिलेली असून तिचा करता कृष्णाजी सभासद हा शिवाजी तसेच राजारामाच्या दरबारी असल्याचे इतिहासकार सांगतात. प्रस्तुत बखरीत दादोजी संबंधी पुढील उल्लेख येतो :- " शाहाजी राजे यांसि दौलतेमध्ये पुणे परगणा होता. तेथे दादाजी कोंडदेव शाहाणा, चौकस ठेविला होता. तो बेंगरूळास महाराजांचे भेटीस गेला. त्याबरोबर राजेश्री शिवाजी राजे व जिजाबाई आऊ ऐशी गेली. ते समयी राजियास वर्षे बारा होती. बराबर शामराव निळकंठ म्हणून पेशवे करून दिले व बाळकृष्णपंत, नारोपंत दीक्षिताचे चुलतभाऊ, मजुमदार दिले व सोनोपंत डबीर व रघुनाथ बल्लाळ सबनीस ऐसे देऊन दादाजीपंतास व राजे यांसि पुण्यास रवाना केले. ते पुण्यास आले. "
सभासद शिवाजींच्या काळातील माहितीगार इसम असला तरी दादोजी कोंडदेव हे आदिल का शहाजीनियुक्त सुभेदार असल्याचा बिलकुल उल्लेख करत नाही. याचाच अर्थ असा कि, दादाजी कोंडदेवांविषयी त्याला किंवा त्याला माहिती पुरवणाऱ्याला फारशी माहिती नव्हती. त्यामुळे त्याला दादोजींविषयी जितके माहिती होते वा जी माहिती पुरवली गेली तेवढीच नमूद करून तो गप्प बसला. त्याच्या या वृत्तांतास अस्सल कागदपत्रे तसेच जेधे शकावली - करीना, शिवभारत दुजोरा देत नसल्याने सभासद बखरीला दादोजी कोंडदेव प्रकरणी विश्वसनीय मानता येत नाही. ]
दादाजी - शहाजी संबंधांविषयीचा एकमेव अस्सल पुरावा म्हणून शिपसासं मधील क्र. २४९८ च्या आदिलशाही फर्मानाकडे निर्देश केला जातो. प्रस्तुत फर्मान ग. ह. खरे संपादित ' ऐतिहासिक फारसी साहित्य प्रथम खंड ' मध्ये तपशीलवार दिले असून ' मराठ्यांचा इतिहास, साधन परिचय ' मध्येही ते प्रकाशित झालेलं आहे. या फर्मानाची तारीख दि. १ ऑगस्ट १६४५ असून यातील मजकुर असा :-

मुहम्मद आदिलशाह --- कान्होजी जेधे ?

ज्या अर्थी शहाजी भोसले दरबारातून निर्वासित व अपमानित झाला आहे व त्याचा मुतालिक दादाजी कोंडदेव कोंडाण्याच्या बाजूस आहे ( त्या अर्थी त्यांस ) दफे करण्यासाठी व ती विलायत ताब्यांत आणण्यासाठी खंडोजी व बाजी घोरपडे यांस तुमच्यासह नेमिले आहे. तरी तुम्ही आपल्या हशमासh मशारनिल्हे जवळ जाऊन त्यांच्या संमतीने दादाजी कोंडदेव व त्या हरामखोराचे संबंधी यांना शिक्षा देऊन नेस्तनाबूद करा व ती विलायत ताब्यांत आणा. ते तुमच्या उत्कर्षाचे कारण आहे. ता. ७ जमादिलाखर हि. १०५४

प्रथम आक्षेप असा कि, फर्मान कान्होजी जेध्यास पाठवले हा संपादकांचा निव्वळ तर्क आहे. फर्मानातील कान्होजी शब्द फक्त निश्चित आहे.
दुसरा आक्षेप असा कि, स. १६४४ च्या पूर्वार्ध - उत्तरार्धात शहाजींनी आदिलशाही दरबार विरोधात काही कृत्य केल्याचा उल्लेख समकालीन कागदपत्रांत मिळत नाही. एका जेधे करीन्यात याविषयी " ... त्यावरी रणदुलाखान मृत्य पावले त्यास संतान नाही म्हणून त्यांची दौलत त्यांचा खीजमतगार अफजलखान कर्ता देखोन त्यास दिल्ही अणी चंदीस रवाना केले त्या बा| माहाराजास ही फौजेनसी रवाना केले बा| कान्होजी ना| ही जमेतीनसी गेले चंदीस वेढा घातला जर केली त्यास चंदीस राचेवार मऱ्हाटे होते त्यांचा व माहाराजाचा घरोबा आहे सामान पुरविताती यैसी बदगोई ( तक्रार ) अफजलखान याणी विजापुरास पातशाहास मुस्तुफाखाना लिहिली त्यावरून माहाराजास धरून विज्यापुरास बोलाऊन नेणे बा| कान्होजी नाईक होते पातशाहानी तहकिकात मनात आणीता तुफानी गोष्टी ( खोट्या गोष्टी ) यैसे जाले त्यावरी पातशाहानी माहाराजाचा सन्मान केला सदर बकसीस दिल्ही सीरपाव दिल्हे बेगरूळ प्रांत पांचा लक्षा होनाची जहागीर देऊन वेगली मसलती सांगितली बा| कान्होजी ना| ही जमावानसी होते .... " हि माहिती मिळते. परंतु करीन्याचा रचना काल बराच नंतरचा शिवाजी व संभाजींच्या मृत्यूनंतरचा असल्याने यावर विसंबणे, विशेषतः जेधे शकावलीत यांस दुजोरा देणारा मजकूर नसताना अयोग्य आहे.
शिवाय करीन्यातील वृत्तांत काही क्षण जर गृहीत धरला तर प्रथम काही गोष्टी लक्षात घेणे भाग आहे. (१) करीन्यानुसार हि घटना रणदुल्लाखानाच्या मृत्यूनंतर व शिवाजीच्या पुणे आगमनापूर्वी घडली आहे. (२) कान्होजी जेधे यासमयी शहाजी सोबत चंदीला होता व तेथून तो शहाजीसह विजापुरी गेला. मग आदिलशहाने उपरोक्त फर्मान कोणत्या कान्होजीला पाठवले ? (३) रणदुल्लाखानाचे मृत्यूवर्ष शिपसासं मधील पत्र क्र. ४८८ नुसार स. १६४३ - ४४ असे आहे. अर्थात, जेधे करीना व उपरोक्त आदिलशाही फर्मानातील मजकूर क्षणभर खराच मानल्यास स. १६४३ - ४४ नंतर शहाजीवर विजापुरी गैरमर्जी ओढवली. नंतर त्यावर कृपा झाली व हे सर्व झाल्यावर शिवाजीची पुणे प्रांती शहाजीने रवानगी केली. याचा अर्थ असा कि, शिवाजींचे पुणे आगमन वर्ष इतिहासकार नमूद करतात त्याप्रमाणे स. १६४१ - ४३ दरम्यान ठरत नसून स. १६४५ नंतरचे ठरते. आणि एकही प्रत्यंतर पुरावा या निष्कर्षास बळ पुरवत नाही.
तिसरा आक्षेप असा की, दादोजी कोंडदेवांचा यात शहाजीचा मुतालिक म्हणून उल्लेख आलेला आहे. उलट स. १६४४ - ४५ मधील शिपसासं क्र. २४९२ च्या पत्रात दादाजी हे ' सुभेदार नामजाद किले कोंढाणा व महालनिहाये ' असल्याचा उल्लेख आहे. याचा मेळ कसा बसावा ? तारखांतील अंतरामुळे जरी संशयाचा फायदा घेता येत असला तरी दादाजींना कोंडाण्याचा सुभेदार म्हणून नियुक्त करणं, पदच्युत करणं जर आदिलशाहीच्या हाती होतं व कोंडाण्यावर इतर कोणाचीही सुभेदार म्हणून नियुक्ती करण्याचा आदिलशहाला अधिकार होता तर या फर्मानातील दादाजी कोंडदेव शहाजीचा मुतालिक कसे काय होऊ शकतो ? तात्पर्य, उपरोक्त फर्मानातील मजकूर विश्वसनीय मानता येत नाही.
या स्थळी मुलभूत प्रश्न असा उद्भवतो कि, शहाजींचा मुतालिक म्हणून दादाजी कोंडदेवचं एकही पत्र मान्यवर इतिहास संशोधकांना का प्रसिद्ध करता आलं नाही ? शिवकालीन पत्रसार संग्रहात अस्सल, नक्कल, बनावट अशी तिन्ही प्रकारची पत्रे प्रकाशित आहेत परंतु दादाजी शहाजीचा मुतालिक असल्याचं कोणतंच पत्र प्रसिद्ध झालेलं नाही. याचा अर्थ काय ?
इथवरच्या चर्चेअंती दादाजी कोंडदेव हे कोंडाण्याचा आदिलशाही नियुक्त सुभेदार दिवाण असल्याचे व शहाजीचा चाकर, कारभारी वा मुतालिक नसल्याचे स्पष्ट होते. आता काही ठिकाणी असेही त्याचे उल्लेख आढळतात, ज्यात त्याच्या पदाचा निर्देश केलेला नाही.
उदाहरणार्थ, ' शिवचरित्र साहित्य खंड २ रा ' मधील ले. १०४, हा अर्धवट स्वरूपाचा असून यात ' राजश्री दादाजी कोडदेऊ याणी मुलकास कौल देऊन वसाहाती करविली ' असा उल्लेख आहे. तसेच ले. १०५ चा मसुदा शके १७११ ( स. १७८९ - ९० ) मधील असून त्यात ' .. अैस गावसमधे कचे हिसेबास दादा कोडदेवाचे वेलेस किले सिव्हगडास नेऊन तिघांची डोकी मारिली ' असा उल्लेख आहे. असो.
शिवाजीच्या कित्येक पत्रांत दादाजी कोंडदेवांचे उल्लेख आढळतात. त्यावरून काही इतिहासकार दादाजी - शिवाजी किंवा दादाजी - शहाजीचा संबंध असल्याचे मत मोठ्या आवेशाने मांडत असतात. त्या मताचा प्रस्तुत स्थळी परामर्श घेत प्रकरण आटोपते घेतो.
सर्वप्रथम आपण हे लक्षात घेतलं पाहिजे कि, शहाजी भोसले हे विजापूरचा मोकासदार असून दादाजी हा सुभेदार होता. अर्थात, डफची माहिती गृहीत धरता शहाजी त्यांचे वरिष्ठ अधिकारी ठरतात. शहाजी कर्नाटक प्रांती मोहिमेवर असल्याने त्यांनी आपल्या पुणे व इतर परगण्यांच्या मोकासदारी कारभाराकरिता ठिकठिकाणी पोटमोकासदार नियुक्त केले. कर्यात मावळ शिवाजीकडे, सांडस खुर्द मंबाजीकडे, सुपे परगणा संभाजी मोहित्याकडे अशी विभागणी केली.
पैकी, पुणे परगण्या अंतर्गत मोडणाऱ्या मोकासदारीची विभागणी वादग्रस्त तसेच संशयास्पद आहे. उपलब्ध माहितीनुसार पुणे परगण्यातील ७ तर्फांत एकूण २९० गावांचा समावेश होता. पैकी कर्यात मावळ ( ३६ ) व सांडस खुर्द ( २० ) अशी छपन्न गावं वजा केली असता उर्वरित २३४ गावांचा ताबा त्याने कोणाकडे सोपवला हा मुख्य प्रश्न आहे. बऱ्याच इतिहासकारांनी यासंदर्भात दादोजी कोंडदेवांचे नाव घेतले असले तरी दोनशेहून अधिक गावांचा कारभार करणाऱ्या दादोजींच्या नावे --- शहाजींचा कारभारी वा मुतालिक या अर्थाने एकही कागद उपलब्ध झालेला नाही. त्याउलट तुलनेनं शिवाजी - मंबाजींकडे कमी गावं असूनही त्यांच्या नावचे कागद आज उपलब्ध आहेत. तेव्हा उर्वरित २३४ अथवा पाच तर्फांवरील शहाजींच्या मुतालिकासंबंधीची कागदपत्रे उपलब्ध होणे वा त्यादृष्टीने संशोधन होणे अत्यावश्यक आहे.
शहाजी व दादोजी हे एकाच प्रांतातील, एकाच दरबारचे नोकर असल्याने शासकीय कामकाजानिमित्त उभयतांचा कागदोपत्री संबंध येणे स्वाभाविक आहे. कारण, शहाजींना अमुक एक गावचा मोकासा दिला असता त्या गावचा तेच एकमेव प्रशासकीय अधिकारी ठरत नाही. त्या गावच्या एकूण उत्पन्नापैकी त्यांचा ठराविक वाटा वगळल्यास उर्वरित उत्पन्नाच्या जमाखर्चाची नोंद शासकीय कर करणारे सरकार नियुक्त दुसरे अधिकारीही असत. म्हणजेच एकाच गावात आदिलशाहीच्याच मोकासदार व महसूल अधिकाऱ्याचे सरकार चाकरीशी निगडीत परस्पर संबंध असू शकतात. नव्हे होते. या संबंधांत अधिक विवेचनाचे भारुड न लावता डॉ. नभा अनिल काकडे संपादित ' छत्रपती शिवरायांची अस्सल पत्रे ' या संदर्भ ग्रंथातील दि. २३ नोव्हेंबर १६४७ चे पत्र येथे देत आहे.
श. १५६९ मार्ग शु. ७
सु. १०४८ जिल्काद ६
इ. १६४७ नोव्हें. २३
अजर. रा. सिवाजी राजे दाम. व. कार. ता| कऱ्हे पठार पा| पुणे वि. (सु||) ( रवा सुद ) समान अर्बेन अलफ दरीविले श्री. मोरेश्वर गोसावी सेकिन मोरगाउ ता| मजकूर हुजूर. आपणास इनाम दर सवाद मौजे मजकूर चावर निमे .||. देखील नख्त व खर्चपटी व पायेपोसी व सेलबैल ता| ठाणे व ता| देहाये दिल्हा आहे तेणेप्रमाणे चालत होता दरम्यान सन खमसा कारणे मौजे मजकुरीचे हुदेदारी व मोकदमी इस्कीळ ( इस्कील - खोडी, आडाकाठी ) करून सेलबैल व मोईन सादिलवार नि|| ठाणे व गाव खर्च तुटपटी वें हकदार व तूप कानूचे व पटीचे व हुमायून पटी व वेले खेडीच्या पटियाची तकसीम मागत होते म्हणौन सदरहू हकीकत मा| दादाजीपंत सुभेदार त्यासी गोशगुजार ( श्रुत ) केली त्यावरून पंडित माइलेने सनद दिधली होता की मौजे मजकुरीचे अज कासेस सदरहू इनाम बाद देऊन ( वजा करणे ) वरकड कासेवरी पटीकरून गावांची उगवणी करीत जाणे कुलबाब पटीया माफ केल्या असेती पेस्तर नव्या होतील त्या सालाबाद माफ केल्या असेती इनाम सेत घरवाहो करितील अगर प्रजेसी लावितील त्यासी वेठी बेगारी हरयेक बाबे येक जरीयाची तसवीस न देणे म्हणोन सनद दिधली होती. तेणेप्रमाणे ता| साल गु|| तसुरफाती ( अधिकार, ताबा ) चालिली हली साल म|| कारणे सदरहू ठाण्याबाबे व गाव नि|| पटिया नख्त व येन जिनस पटी करून इनामतीच्या सेतावरी पटीची ता| घातली आहेत दरीबाब ( दर इबाब = त्या बाबीमध्ये ) सरंजाम होये बिनबा रा. सदरहू इनाम देखील नख्त. व खर्च पटिया व पायपोसी व सेलबैल ता| ठाणे व ता| देहाये दे|| मोईन सादिलवार बाब हाये नि|| ठाणे व गावखर्च तुटपटी व हकदार व तूप कानू व खा| हुमायून पटी कडबे व वेठी व बेगारी व बाजे पटिया हाल व पेस्तर कुल. दिधला असे ता| साल गु|| सदरहु प्रमाणे चालिले असोन साल मजकुराकारणे इस्कील करणे काये माना ( गोष्ट, अर्थ, हकीगत ) आहे हली एक जरीयाची तसवीस न देणे दर हर. औलाद. पेस्तर फिर्यादी येऊ न देणे असेली श्री मोरेश्वर गोसावी यापासी परतून देणे मौजे मजकुराचे मोकदमे हली पटी घातली आहे त्याची तसवीस न देणे पेस्तर यासि येक जरियाची तसवीस लागो न देणे सदरहू इनाम मौजे मा| चे अजकासेपैकी अजीबाद देऊनबाकी कासेवरी पटी + +

जाणे तालीख मोर्तब सुदु ( ष. को )
रुजू सुरु
नीवीस
तेरीख ६ माहे जिलकादि
जिलकादी

उपरोक्त पत्रातील " ... म्हणौन सदरहू हकीकत मा| दादाजीपंत सुभेदार त्यासी गोशगुजार केली त्यावरून पंडित माइलेने सनद दिधली होता की .. " या मजकुरास दुजोरा देणारे दादाजी कोंडदेवचे पत्र शिपसासंमध्ये ( क्र. २४९२ ) छापले आहे. या पत्राच्या आरंभी दादाजीचा उल्लेख ' रा. दादाजी कोंडदेऊ सुभेदार नामजाद किले कोंढाणा व महालनिहाये ' असा येत असून त्याने हे पत्र बापुजी मुद्गल हवालदार व पुणे परगण्याच्या कारकुनांस लिहिले आहे. त्यातील मजकूर असा :-

सा. ३ ले. ५१७ } ( २४९२ ) { श. १५६६

सु. १०४५ } { इ. १६४४ - ४५

रा. दादाजी कोंडदेऊ सुभेदार | बापूजी मुद्गल हवालदार व कारकून परगणे

नामजाद किले कोंढाणा व महालनिहाये | पुणे.

श्री मोरेश्वर गोसावि सेकीन वस्ती मोरगौ येही मालूम केले जे महाराजे आपणास मौजे मजकुरी इनाम दिल्हा आहे त्याचे खुर्दखत मजकूर जे, वज बदल धर्मादाऊ इनाम जमीन .||. गजशरायेनी ( २४ तसूंच्या मापाच्या मोजणीनुसार ) देखील नख्त खर्चपटी इ. तरी मौजेमजकुरीचे हुदेदार व मोकदम पटिया मागताती. तरी पटियाची तकसीम सालाबाद नेघणे ( न घेणे ) म्हणोनु कागद देविला पाहिजे. तरी कडकासेवरी पटी करून गांवाची उगवणी करीत जाणे. सदरहु व नव्या पटिया यांसि माफ केल्या असेती. हे आपला इनाम घरवाहो अगर प्रजेसी लावितील तरी याचा उजूर ( अपेक्षा, हरकत, आक्षेप ) न + करणे.

या पत्राखाली संपदकांनी '+' या चिन्ह खुलासा करता दिलेला मजकूर येणेप्रमाणे :- [ + याच मजकुराची व तारखेची रुस्तुमजमाने पत्रे लिहिली आहेत. त्यांत मूर्तजाबाद, मुरंजन, इसलामाबाद ह्या परगण्याच्या अधिकाऱ्यास चेऊल, ठाणे, कोरकोडा मुरबाड व देऊचे ह्या गावापैकी लारी २ व एक देण्याबद्दल लिहिले आहे. ]
त्यानुसार शिपसासं चाळला असता क्र. २५०२, २५०३, २५०४ हि पत्रे त्या संदर्भातली असल्याचे आढळून आले. पैकी २५०२ - ०३ या पत्रातील मजकुरानुसार मलिक सैदने मोरेश्वर गोसाव्यास दिलेल्या खुर्दखतान्वये इनामदाखल बाब पुढे चालवण्याचे रुस्तमजमाने संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले असून क्र. २५०४ अर्जदास्त असून त्यात मोरेश्वर गोसाव्याचे इनाम चालवण्याचे आदेश आहेत. परंतु या पत्रांचा दादोजींच्या पत्राशी कसलाही संबंध येत नसून मोरेश्वर गोसाव्यास कोणाकडून काय इनाम मिळाले होते, चालू होते याची माहिती देण्यापुरताच आहे. असो.
उपरोक्त दोन्ही पत्रांतील मजकूर, दादाजीच्या पत्रातील मायना लक्षात घेता दादोजी हे शहाजी राजांचे नोकर नसून आदिलशाही सेवक असल्याचे सिद्ध होते. त्याचप्रमाणे महसुली बाबतीत एकाच सत्तेच्या दोन नोकरांचे विविध कारणांनी परस्परांशी कागदोपत्री संबंध कसे येतात याचा देखील खुलासा होतो. या गोष्टी इतक्या स्पष्ट, सरळ असतानाही काही इतिहासकारांनी मुद्दामहून दादोजी कोंडदेवांचा शहाजी सोबत पर्यायने शिवाजींशी संबंध जोडण्याचा निंदनीय प्रयत्न केला. आरंभी साधनांच्या अभावाने, माहितीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे अशा चुका झाल्या असतील तर त्या क्षम्य होत्या. परंतु आजच्या काळात शिवचरित्राची पूर्वीच्या तुलनेनं विपुल साधने असतानाही चुकीच्या गृहीतकांना, मतांना चिटकून राहणे खऱ्या इतिहासकारास, संशोधकास, अभ्यासकास शोभून दिसत नाही.
प्रथम हे लक्षात घेतलं पाहिजे कि, शहाजींकडे पुणे व आसपासचा जो भूप्रदेश जहागिरी दाखल होता, त्याच प्रदेशात त्यास क्रमाक्रमाने सरकारतर्फे आदिलशाही दरबाराकडून मोकासदाराचेही अधिकार मिळत गेले. इथे मोकासा व जहागीरदार यातील अंतर जाणून घेण्यासाठी द. वि. आपटे यांची ' शिवभारत ' ची प्रस्तावना अथवा ' शिवचरित्र निबंधावली ' तील लेख पाहावेत. इथे फक्त एवढेच नमूद करतो कि, जहागीर हि वंशपरंपरागत असून मोकासा हा काही वर्षांपुरता वा महिन्यांकरता असतो. जहागीरदार व मोकासदाराची कर्तव्यं जरी जवळपास एकसारखीच असली तरी मोकासदार हा सरकारनियुक्त असल्याने त्याच्याकडे काही खास अधिकारही असतात, जे जहागीरदारास नसतात. उदाहरणार्थ, एखाद्याकडे इनाम चालवायचे झाल्यास त्यासाठी (१) बादशाही फर्मान (२) वजीर वा मोकासदाराची खुर्द्खते आणि (३) सुभेदाराची सनद या तीन पत्रांची गरज असे. यात जहागीरदाराचा संबंध येत नाही.
बव्हंशी इतिहासकारांच्या मते, शहाजींना पुणे परगण्याचा मोकासा मिळाला त्यावेळी त्यांनी त्यातील २९०( काही ठिकाणी २८८ गावं दिली आहेत. ) गावांपैकी कर्यात मावळात मोडणाऱ्या ३६ गावांचा मोकासा शिवाजी राजांच्या नावे केला. सांडस खुर्द कडील वीस गावं त्याने आपला चुलत भाऊ मंबाजी भोसलेकडे दिली तर उर्वरित गावांची जबाबदारी दादोजी कोंडदेवांकडे सोपवली. विशेष म्हणजे यात जिजाबाईच्या वाटणीस एकाही गावाचा मोकासा नाही. हि बाब खटकते.यासाठी उपलब्ध साधने अभ्यासली असता खेडेबारे प्रांतातील मौजे कामथडी हा गाव जिजाबाईंच्या सरदेशमुखीचा असल्याचे समजले. या संबंधातील वतनपत्र, निवाडापत्र सातारकर शाहूच्या ( संभाजी पुत्र ) काळातील आहे. या निवाड्यातील माहितीनुसार स. १६३० च्या आसपास कामथडी गाव जिजाबाईकडे इसाफतीने तथा इनाम म्हणून सरदेशमुखी बाबत चालत होते. जिजाबाईचा शिक्का फारसी असल्याच्या उल्लेख बव्हंशी इतिहासकार करतात. मग जर त्यांच्याकडे शिक्का आहे तर कामकाजादाखल एखादं गाव का असून नये ? त्याहीउपर म्हणजे खासगी खर्चासाठी एखाद दुसरं गाव आपल्या कुटुंबाकडे लावून देण्याचा तो काळ लक्षात घेता, शहाजीने जिजाबाईंकडे गाव सोपवलं नाही असे कशावरून म्हणता येईल ?याचा अर्थ शहाजी राजांनी स्वतःस मिळालेला मोकासा जो इतरांना पोटमोकासदार म्हणून शिवाजी - मंबाजीत जसा वाटला त्याचप्रमाणे जिजाबाईंकडेही काही गावांचा अंमल असावा. यासंदर्भात शिवकालीन पत्रसार संग्रहातील पत्र क्र. ६१४ विशेष उपयुक्त आहे. हे पत्र खुर्दखत स्वरूपाचे असून ते जिजाबाईंच्या कचेरीतून गेल्याचे त्यात स्पष्ट दिले आहे. यावरून जिजाबाईंकडेही शहाजीने काही अधिकार निश्चितच सोपवल्याचे स्पष्ट होते. यासंदर्भात आणखी कागदोपत्री पुरावा उपलब्ध झाल्यास याकाळातील बऱ्याचशा गूढ गोष्टींवर प्रकाश पडेल.
मोकासदार म्हणून शिवाजी राजांची मुद्रांकित पत्रं प्रथमतः उलपब्ध होतात ती स. १६४६ सालातली. त्यापूर्वीचा त्यांचे नावे आढळणारा पत्रव्यवहार पत्रसारसंग्रह तसेच इतरत्र आहे परंतु अलीकडेच ' छत्रपती शिवरायांची अस्सल पत्रे ' मध्ये ज्या पत्रांचा समावेश केला गेला आहे --- जी निःसंशय शिवाजी राजांची असल्याचे डॉ. काकडेंचे मत आहे त्यामुळे स. १६४६ सालापूर्वीची पत्रं, ज्यामध्ये शिवाजींच्या नावे आदेश वगैरे गेले आहेत, ती जमेस धरण्याची मला गरज वाटत नाही.
शहाजीं महाराजांना पुण्याव्यतिरिक्त सुपे, इंदापूर, चाकण परगण्याचाही मोकासा प्राप्त झाला होता. पैकी, सुप्यावर त्यांनी संभाजी मोहिते या आपल्या द्वितीय पत्नीच्या भावास नियुक्त केले असून चाकण व इंदापूर बाबत खुलासा होत नाही. परंतु स. १६४६ च्या पत्रानुसार इंदापूर परगणा शिवाजीं राजांकडे सोपवाल्याचे स्पष्ट होते.
पुणे, सुपे प्रांतांवर मुख्य मोकासदार तथा मालक म्हणून शहाजीचं उपलब्ध असलेलं शेवटचं पत्र स. १६५५ डिसेंबरचं आहे. त्यानंतरचा त्याचा पत्रव्यवहार निदान पत्रसारसंग्रहात तरी उपलब्ध नाही. हि नोंद तसेच जेधे शकावली - करिना, तसेच शिवभारत व काही अस्सल पत्रांच्या आधारे असं दिसून येतं कि, स. १६५५ पर्यंत शिवाजी राजांच्या ज्या काही हालचाली वा कृत्यं इतिहासात नमूद आहेत, त्या सर्वांमागे शहाजींचा हात आहे. किंबहुना हेच विधान स्पष्टपणे असं करता येईल कि, स. १६३६ मध्ये शहाजी राजांनी निजामशाहीची शरणागती दिली असली तरी त्यानुभावाद्वारे त्यांचे स्वतःच्या राज्यनिर्मिती / विस्ताराचे प्रयत्न आदिलशाही नोकरीत आल्यावरही चालू होते. त्यामुळेच विजापूर दरबाराची त्याच्यावर स. १६३६ ते ५० दरम्यान दोनदा नाराजी ओढवली. विशेषतः दुसऱ्या वेळी ओढवलेल्या गैरमर्जीमुळे त्यांस कैदही भोगावी लागली. परंतु त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांत खंड पडल्याचे दिसून येत नाही. उलट त्यानंतर त्यांनी आपल्या डावपेचांत बदल करून आपल्या मुलाचे विशेष कर्तुत्व लक्षात घेत स. १६५५ नंतर शिवाजींना स्वतंत्र हालचालीची मोकळीक दिली. अर्थात, याक्षणी स. १६५५ नंतर पुणे, सुपे आदि प्रांतातील अधिकाऱ्यांना शहाजी राजांच्या नावे / हस्ते गेलेले हुकुम उपलब्ध नाहीत यावर आधारित हे विधान आहे, याची नोंद घ्यावी.
स. १६५५ पर्यंत जी काही पुणे व आसपासच्या प्रांतात शिवाजीं महाराजांनी खटपट केली त्यामागे शहाजीं राजांची योजना असल्याचे, विधान स्पष्ट करण्यासठी या काळात घडलेल्या काही घटनांकडे लक्ष दिले पाहिजे.
पहिली घटना म्हणजे माहुलीवर निजामशाहीची शरणागती देताना घडलेला शहाजी - कान्होजी जेधे भेटीचा करीन्यातील वृत्तांत. त्यानुसार असे दिसून येते कि, शहाजी राजे निजामशाहीसाठी लढत होता त्यावेळी कान्होजी जेधे विजापूरकरांना रुजू असून रणदुल्लाखानाच्या हाताखाली कार्यरत होता. विजापूरकरांशी तह करून शहाजी राजे त्यांच्या नोकरीत आले त्यावेळी पुणे, सुपे प्रांतासोबत मावळ ( बारा मावळ ) भागही त्यांच्या जहागिरीत होता व यातील एका भागात कान्होजी जेधेचे वतन आणि वर्चस्व असल्याने शहाजी राजांनी त्यांस आपल्या चाकरीत घेण्याची इच्छा दर्शवली. कान्होजी जेधेही शहाजी राजांच्या इच्छेनुसार त्यांस रुजू झाला.
दुसरी घटना आहे स. १६४४ ची. या वर्षातील दि. १ ऑगस्ट १६४४ च्या आदिलशाही फर्मानानुसार शहाजीं महाराजांना दरबारातून निर्वासित केले होते -- अर्थात चाकरीवरून दूर केले होते. तसेच त्यांचे मुतालिक दादाजी कोंडदेव कोंडाण्याच्या बाजूस असून त्याचा पाडाव करण्यासाठी खंडोजी व बाजी घोरपड्याची नियुक्ती केल्याचा उल्लेख आहे. इतिहास संशोधकांच्या मते, हे फर्मान कान्होजी जेध्यास पाठवले असून त्याने घोरपाड्यांना सामील होऊन कोंडाण्याचा प्रांत ताब्यात घेण्याकरता मदत करावी अशी आदिलशाहीची अपेक्षा आहे. आज्ञा आहे.
उपरोक्त घटनेस / फर्मानास दुजोरा देणारा भाग जेधे करीन्यात आहे. परंतु त्यातील तपशिलात गोंधळ असल्याचे दिसून येते. प्रथम आपण जेधे करीन्यातील नोंद पाहू.
" ... त्यावरी रणदुलाखान मृत्य पावले त्यास संतान नाही म्हणून त्यांची दौलत त्यांचा खीजमतगार अफजलखान कर्ता देखोन त्यास दिल्ही अणी चंदीस रवाना केले त्या बा| माहाराजास ही फौजेनसी रवाना केले बा| कान्होजी ना| ही जमेतीनसी गेले चंदीस वेढा घातला जर केली त्यास चंदीस राचेवार मऱ्हाटे होते त्यांचा व माहाराजाचा घरोबा आहे सामान पुरविताती यैसी बदगोई ( तक्रार ) अफजलखान याणी विजापुरास पातशाहास मुस्तुफाखाना लिहिली त्यावरून माहाराजास धरून विज्यापुरास बोलाऊन नेणे बा| कान्होजी नाईक होते पातशाहानी तहकिकात मनात आणीता तुफानी गोष्टी ( खोट्या गोष्टी ) यैसे जाले त्यावरी पातशाहानी माहाराजाचा सन्मान केला सदर बकसीस दिल्ही सीरपाव दिल्हे बेगरूळ प्रांत पांचा लक्षा होनाची जहागीर देऊन वेगली मसलती सांगितली बा| कान्होजी ना| ही जमावानसी होते .... " येथून पुढे शिवाजींच्या पुणे रवानगीचा वृतांत आहे. असो.
करीन्यातील माहितीनुसार हि घटना रणदुल्लाखानाच्या मृत्यूनंतर घडली. रणदुल्लाचा मृत्यू स. १६४३ - ४४ चा आहे. तर पत्रसारसंग्रह व शिवचरित्र निबंधावलीनुसार स. १६४४ च्या फेब्रुवारीत शहाजी देशी, अर्थात महाराष्ट्रात आहे. म्हणजे आधीच्या परिच्छेदातील निर्देशित फर्मानाची तारीख गृहीत धरली तर स. १६४४ च्या पावसाळ्यात वा नंतर अथवा तत्पूर्वी शहाजी कर्नाटकात रवाना झाल्यावर त्याच्या कैदेचा करीन्यात दिल्याप्रमाणे प्रसंग घडून आला. परंतु यानंतर करीन्यात जो उल्लेख येतो, त्यामुळे करीन्यातील प्रसंगावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. करीन्यानुसार शहाजींवरील आक्षेप खोटा ठरून आदिलशहाने दरबारात त्याचा सन्मान करत पाच लक्ष होनांची जहागीर बेंगरूळास दिली.
परंतु शहाजीं राजांंचे जुलै १६५६ चे पत्र वेगळीच हकीकत सांगते. त्यानुसार माहुलीवर त्यांनी निजामशाहीची शरणागती दिली त्यावेळीच आदिलशहाने त्यांना चार लक्षांची जहागीर दिली होती. फरक इतकाच आहे कि, शहाजीं राजांच्या पत्रात जहागीर दिल्याचा उल्लेख आहे, विशिष्ट भूप्रदेशाचा नाही. त्यामुळे करीन्यातील कथनावर विश्वास कसा ठेवायचा हा प्रश्न पडतो.
याचा सरळ अर्थ दादोजी हे आदिलशाहीचे नोकर होते आणि शिवाजी राजांचे थेट गुरु नव्हते हे कागदोपत्री सांगणारा पुरावा नाही.
मात्र यामध्ये दुसरी बाजुही आपण समजून घेतली पाहीजे.
१) जर दादोजी शहाजी महाराजांचे नोकर नव्हते तर त्यांना कोणत्या आधारे शहाजी राजांनी जिजाउसाहेब आणि शिवाजी राजांबरोबर पुण्याला जाण्यास सांगितले ? आदिलशाही दरबाराच्या नोकराला ते परस्पर आदेश देउ शकत होते का ?
२) जर दादोजीं केवळ दिवाण होते तर जी जहागीरी पुर्ण उजाड झाली आहे आणि नव्याने वसवायची आहे, त्याठिकाणी त्यांना आवर्जून पाठविण्याचे कारण काय ?
एक लक्षात घेतले पाहीजे दादोजी या परिसराशी खुप परिचित होते, मावळातील एकुण परिस्थितीची त्यांना चांगलीच माहिती होती. आधी ईथली घडी बसवताना, महसुली कारभारातील अडचणी यांची त्यांना चांगलीच जाण होती. या सर्व गोष्टी शिवाजी राजांना सुरवातीच्या कालखंडात निश्चित शिकून घ्याव्या लागणार होत्या. ते शिकण्यासाठी दादोजी कोंडदेवांसारख्या अनुभवी माणसाची निश्चित गरज होती. तेव्हा निदान महसुली निवाडे आणि ईतर बारकावे शिवाजी राजे दादोजी कोंडदेवांकडून शिकले असे निश्चित म्हणता येईल.
( क्रमश : )

आपण माझे सर्व लिखाण येथे एकत्रित वाचु शकता
भटकंती सह्याद्रीची

इतिहासलेखमाहिती

प्रतिक्रिया

सतिश म्हेत्रे's picture

15 Jan 2021 - 10:50 pm | सतिश म्हेत्रे

खुप अभ्यासपूर्ण लेख आहे. पुढील भागास शुभेच्या.

मुक्त विहारि's picture

16 Jan 2021 - 10:45 am | मुक्त विहारि

वाचत आहे...

वैयक्तिक मत असे आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी,इतकी भरीव कामगिरी केली आहे की,त्यांचे गुरू कोण? ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची मला तरी गरज वाटत नाही.

अत्यंत उत्तम आणि मेहनत घेऊन लिहिलेला लेख आहे. अगदी सविस्तर.
धन्यवाद या भागाबद्द्ल.

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Jan 2021 - 4:15 pm | ज्ञानोबाचे पैजार

पुढचा भाग लवकर लिहा
पैजारबुवा,