मामलेदार नावाचं गारूड

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
3 Dec 2020 - 12:04 am

काल मामलेदार मिसळ चे जनक गेले आणि प्रकर्षाने तात्याची आठवण झाली. ज्या संकेतस्थळाचं नाव मिसळपाव आहे त्यावर मामलेदार मिसळ विषयी काही तरी लिहावे अशी अतीव इच्छा झाली.
या संकेतस्थळाचा जनक तात्या अभ्यंकर आणि मामलेदार मिसळ म्हणजे तात्याचा जीव की प्राण.
बाहेरून आलेल्या कुण्या जालमित्राला मामलेदार ला घेऊन जाणं हा तात्याचा छंदच.
काल लक्ष्मण शेठ गेले आणि सर्व प्रसारमाध्यमांनी त्याची आवर्जून दखल घेतली, खास करून व्हॉट्स ॲप वर अनेकांनी मामलेदार मिसळ वर भरभरून लिहिलं. मामलेदार मिसळ ही ठाणे शहराची एक ओळखच.
आमंत्रण हे त्याचं जरा कौटुंबिक सामाजिक रूप. पण तिथे सुद्धा लाईन असतेच, फरक इतकाच की मूळ जागी आडवी लाईन तर आमंत्रण पहिल्या मजल्यावर असल्याने जिन्यावर उभी लाईन.
अट्टल मिसळबाजांच्या मते खरी मजा मूळ छोटेखानी जागेत रांगेत उभं राहून आणि गर्दीत बसून खाण्यातच. मित्रमंडळी जमून मामलेदार ला जायचं आणि लाईन लावायची अगदी टोकाला कांदा कापत बसलेल्या पोरापर्यंत. दारावरचा पोऱ्या प्यासा मधल्या गुरूदत्त ची फेमस पोज घेऊन उभा असायचा. मापात पाप नाही, जितके आतून बाहेर पडतील तितकेच लाईनवाले आत जाणार. नेहमी जाणारे आमच्या सारखे पोऱ्या 'फक्त चार' बोंबलत असतानाही बेधडक पाचच्या घोळक्याने दडपून आत शिरायचो, वर त्याला 'राजा तू कशाला टेन्शन घेतो, आम्ही सांगतो शेठला' असं सांगायचो. नंबर लागला म्हणजे परब्रह्म भेटले! मग आंत शिरताच हात वर करून 'नमस्कार' असं अभिवादन गल्ल्यावर बसलेल्या बाळूशेटना करून लगबगीने दोनच्या बाकड्यावर तीन फीट्ट् बसायचो. ईथले सराईत सहज ओळखता यायचे. नवखा माणूस समोर उभा टाकलेल्या वेटरला क्या अच्छा मिलता है असं विचारणार किंवा मेनू कार्ड लाव म्हणताच समस्त जनांना तो *** पहिल्यांदाच आलाय हे समजायचं. एक तर काय मिळतं विचारणार आणि तेही हिंदीत म्हणजे भाऊ नवखा किंवा चुकून आलेला.
तिथे खाणं हा एक मोठा पद्धतशीर कार्यक्रम. आत शिरल्यावर सरळ रिकाम्या जागी बसून घ्यायचं, समोरच्या खरकट्या बशांची पर्वा न करता आपल्या दिशेने येणाऱ्या वेटरला फक्त बोटं वर करून ' तिखट' वा ' मिडियम' अशी ऑर्डर द्यायची अर्थातच मिसळ हा शब्द न उच्चारता. नेहमी जाणाऱ्या परिचितांना रस्सा मागवायची गरज पडायची नाही, खाणाऱ्याच्या बशीतली मिसळ कोरडी पडलेली दिसली की मागवायच्या आधीच वेटर रश्शाची बशी ओतायचा.
ती पुसुन पुसुन सनमायक्यावरील डिझाईन गायब झालेली टेबलं, वर मालगाडीच्या डब्यागत लावलेले पाण्याचे ग्लास ही मिसळीची नांदी.
चाळीस एक वर्षांचा राबता. अनेक आठवणी. ती गर्दी, जागा मिळाल्याचा आनंद, भर गर्दीच्या डोक्यावरून तुकारामांच्या गाथेगत तरंगत येणारं गरमागरम रश्श्याचं तसराळं, कुणाची बर्फाची फर्माईश असा जबरदस्त माहोल मिसळ आपली साथीला. बर्फावरुन आठवलं: एकदा एका गिऱ्हाईकाने टेचात ऑर्डर दिली, ' दोन तिखट, बिगर बटाटा' मस्त झणझणीत आण, बर्फ लागला पाहिजे. पोऱ्या मिसळीबरोबर बर्फही एका बशीत घेऊन आला. बर्फाकडे पाहत गिऱ्हाईकानं विचारलं'हे काय'? पोऱ्या म्हणाला तुम्ही बोललात ना बर्फ लागला पाहिजे म्हणून? खदाखदा हसत ते दोघे म्हणाले अरे बर्फ लागला पाहिजे म्हणजे उद्या सकाळी लागला पाहिजे. सगळे जोरदार हसले. इथे एक से एक तिखट खाणारे पाहायला मिळाले, तिखट मिसळ पाव न घेता नुसती खाणारे. मला तिथे येणारे एक गुरूजी अजून आठवतात. धोतर, पांढरा सदरा काळी गोल टोपी अशा पोशाखात येणारे हे गुरूजी नुसती उसळ चापून खायचे, वर तर्री मागवायचे.
तिखट, मिडियम व लाईट अशा तीन श्रेणी असल्या तरी माल एकच, फरक असतो तो ढवळण्याचा आणि डावाच्या खोलीचा. आणणाऱ्याचा मूड खराब असेल तर त्या दिवशी मिडियमसुद्धा पाणी काढायची. इथे समाजवाद खऱ्या अर्थाने पाहायला मिळायचा. गाडीवाला आणि हातगाडीवाला एकाच बाकड्यावर खेटून बसून खाताना सर्रास दिसायचे. पण चेहऱ्यावरील तृप्ती आणि नाकावरचे, कपाळावरचे घर्मबिंदू सारखेच
एकदा मी तात्या, पेठकर साहेब आणि आणखी एक दोघं मामलेदार ला गेलो होतो, अर्थातच रविवार असल्याने मैफिल आमंत्रण ला रंगली. एकदा मी हापिसात असताना तात्याचा फोन , ' अरे साक्षी, आपला नंदन आलाय सध्या इकडे, आज त्याच्याबरोबर मामलेदार ला आलोय बोल त्याच्याशी. एकदा संतोषकडे मामलेदार मिसळ कार्यक्रम झाला होता. संतोषकडचा एक आचारी बरोब्बर मामलेदार मिसळ बनवायचा, त्याला बोलावून संतोष कडे मिसळ पार्टी झाली होती. मी , तात्या , रामदास नक्की आठवतंय पण आणखी काही मिपाकर होते, मध्यरात्र झाली संपेपर्यंत पण मजा आली.
काल मामलेदार मिसळवाले लक्ष्मणशेठ मुर्डेश्वर गेल्याचं वाचलं आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या

जीवनमानआस्वादमाध्यमवेधविरंगुळा

प्रतिक्रिया

महासंग्राम's picture

3 Dec 2020 - 12:09 am | महासंग्राम

जुन्या आठवणींचा कोलाज खूप सुंदर

गवि's picture

3 Dec 2020 - 12:33 am | गवि

छान आठवणी. समयोचित.

श्रीरंग_जोशी's picture

3 Dec 2020 - 2:02 am | श्रीरंग_जोशी

डोळ्यासमोर चित्र उभे करणारे लेखन मनाला भावले.

लक्ष्मणशेठ मुर्डेश्वर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

कंजूस's picture

3 Dec 2020 - 8:40 am | कंजूस

तिखटाची वर्णनं ऐकून कधी तिकडे फिरकलो नाही हे खरंच. पण शेट ( लक्ष्मणशेट म्हणणारे थोडे लोकंच असतील) ही एक संस्था असावी.

लेखावरून कल्पना येते की दबदबा प्रकरण होतं.

सर्वसाक्षी's picture

3 Dec 2020 - 10:40 am | सर्वसाक्षी

लोकप्रियतेची कल्पना यावी म्हणून काल कुठल्याश्या वाहिनी वर ऐकलेली पाहिलेली काल संध्याकाळची बातमी सांगतो
" मामलेदार मिसळचे श्री लक्ष्मण मुर्डेश्वर यांच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्या लोकांनी नियम धाब्यावर बसवून दोन वेळा शववाहिकेचे दरवाजे दर्शन घेण्यासाठी व हार घालण्यासाठी उघडले. नियमानुसार शववाहिकेचे दरवाजे वाटेत उघडता येत नाहीत"

टर्मीनेटर's picture

3 Dec 2020 - 8:53 am | टर्मीनेटर

मस्तच आठवणी 👍
अगदी मिसळ खावी तर मामलेदारचीच वगैरे एवढं मला तिचं कौतुक नसलं तरी तिथली झणझणीत मिसळ आणि त्यावर ताक प्यायला आवडते!
लक्ष्मणशेठना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

योगी९००'s picture

3 Dec 2020 - 9:53 am | योगी९००

लक्ष्मणशेठ मुर्डेश्वर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

मिसळीला एवढी मुंबई ठाणे परिसरात प्रसिद्दी दिली म्हणून कौतूक.

खरं सांगायचे तर २-३ वेळा ही मिसळ खाण्याचा योग आला. मला अजिबात आवडली नाही. केवळ तिखट म्हणून आवडणार्‍या लोकांना ही मिसळ आवडायला हरकत नाही. ताक मात्र छान होते. पण आधी तिखट मिसळ खाल्याने ताक पिल्यावर बरे वाटले. मिसळीशिवाय घेतले तर त्याची चव चांगली वाटणार नाही.

चौकस२१२'s picture

3 Dec 2020 - 10:24 am | चौकस२१२

आयुष्यात एकदाच गेलो होतो ... काहीही विशेष वाटली नाही ... नुसता तिखटपणा म्हणजे चविष्टपणा हे काही पटत नसल्यमुळे असेल कदाचित...
मामलेदार काय , पुण्याचे रुपाली वैशाली काय खाण्यापेक्षा अड्डा म्हणून जास्त प्रसिद्ध झालेत असे वाटते .. वैशाली च्या खाण्यापेक्षा व्याडेश्वर चे खाणे जास्त रुचकर वाटले
(असो मामलेदार अड्डा मेम्बरांना दुखावयाचा हेतू नाही )

कदाचित ही जागा या मतासाठी योग्य नसेल, पण तसा धागा कधी निघेल माहीत नसल्याने... मामलेदार मिसळ हा ब्रँड लोगोसहित बनवून फ्रन्चायजी तत्वावर शाखा काढणे ही कल्पना उत्तम होती, पण प्रत्यक्षात तसा कठोर क्वालिटी कण्ट्रोल ब्रान्चेसमधे केला गेला तरच अर्थ राहील.

आत्ताचे चित्र पाहता विशेषत: मिसळ हा पदार्थ पार्सल रुपात होम डिलीव्हरीसाठी झोमाटो , स्विगी यांवर लिस्ट करणे हा या ब्रँडचा प्रयोग फसलाय असे वाटते. मिसळ ही तिथल्या तिथे गरम खाण्यानेच तिला अर्थ प्राप्त होतो. रस्सा सेपरेट पार्सल दिल्यास हाताळणे कठीण, त्यातही रस्सा कोमट गार झाला असेल तर मजा गेली. .. किंवा मिक्स करुनच मिसळ पार्सल दिली असल्यास गार + रस्सा पूर्ण शोषून कोरडे पडलेले फुगीर फरसाण असे रुप बनते.

ऑनलाईन रिव्ह्यू "ओव्हरहाइप्ड आणि प्रत्यक्षात ट्राय करायला गेलो तर निराशा" असे झुकताना भासतात. या ब्रान्चेसनी खूप व्हरायटीवाला मेन्यू (मिसळीखेरीज प्याटिस, बटाटावडा, फराळी कचोरी किंवा तत्सम अनेक) आकर्षक रुपात प्रिंट करुन लावला आणि प्रत्यक्षात त्यातले बहुतांश पदार्थ उपलब्ध नाहीत असेच दिसते. वास्तविक मिसळीपुरते मर्यादित ठेवले असते तरी चालले असते. पण मोठाले मेन्यू लावून नंतर हे नाही, ते नाही, अमुक आज उपलब्ध नाही, तमुक पदार्थ "अजून सुरु व्हायचेत"-(जे स्टेटस सहा महिने वर्ष होऊन गेल्यावरही बदलत नाही).. शेवटी मग उपलब्ध आहे तरी काय ? .. तर फक्त मिसळ. असे केल्याने उगीच अपेक्षांवर पाणी पडते.

सर्वसाक्षी's picture

3 Dec 2020 - 1:43 pm | सर्वसाक्षी

फ्रॅन्चाईजी मुळे मामलेदार ला काहीसा बट्टा लागला हे खरं. मुळात ही प्रणाली योग्य प्रकारे योजली व राबविण्यात आली नाही. कितीतरी ठिकाणी टपऱ्यांवर मामलेदार मिसळ असे फलक गेल्या पाच वर्षांत झळकले, पैकी बहुतेक लोकांचा मामलेदार शी काही संबंध नव्हता. भलतीच मिसळ मामलेदारच्या नावे खपवल्या गेल्याने ती खाणाऱ्यांचे मत मामलेदार विषयी प्रतिकूल झाले नाही तर नवल.
मात्र स्विगी झोमॅटो वा पार्सल बाबतीत असहमत.
गविशेठ, आपण ठाणेकर. एकदा आमंत्रण खालच्या 'फक्त पार्सल' दुकानात जाऊन पाहा. मुळ उसळ व रस्सा सोडता प्लेट गणिक मापलेल्या फरसाण, कांदा व बटाटा भाजी पुड्या आगाऊ करून ठेवलेल्या असतात. ऑर्डर प्रमाणे उसळ व रश्शाच्या थैल्या बनवायच्या आणि संख्येनुसार त्या बांधलेल्या पुढल्या देऊन ग्राहकाला कमीत कमी वेळात मोकळा केला जातो.
माझा अनुभव असा की पार्सल घेऊन आल्याबरोबर जर खायला बसलं तर उसळ व रश्शाची पुडी उघडताना हाताला चटका बसेल इतक्या गरम असतात. सर्व घटक वेगवेगळे बांधल्याने गचका होण्याचा प्रश्नच नाही
आज जर मामि खायची लहर आली तर त्या भागात जायचं दिव्य करण्यापेक्षा चार पैसे जातात पण स्विगी झोमॅटो कडून घरबसल्या मिळते. ऑर्डर देताना नकाशावर पाहून आपली ऑर्डर कुठून येणार याची खातरजमा करून घेतली की चिंता नाही. आणि रिक्षा वा गाडीने तिथे जायचा सोस करायचा तर भाडं किंवा पेट्रोल चा खर्च आहेच.
मात्र चार जुने मित्र जमत असतील तर गावातल्या मामलेदार मध्येच आस्वाद घ्यायचा

सुबोध खरे's picture

3 Dec 2020 - 11:51 am | सुबोध खरे

ठाणे कॉलेजमध्ये ११ ला गेलो तेंव्हा मामलेदार मिसळ या रसायनाशी ओळख झाली. तोवर इतकी झणझणीत मिसळ आयुष्यात कधीच खाल्ली नव्हती.
तसे पाहता जगात सर्वोत्कृष्ट (असे शब्द पुण्यात फार लोकप्रिय आहेत) असे या मिसळीत खास काही आहे असे नाही.

परंतु तेथील वातावरण( पाण्याचे १२ ग्लास दोन रांगेत लावून ठेवलेले असतात), वय आणि मित्रपरिवाराबरोबर मजेत घालवलेला वेळ हे या मिसळीला तितकाच रंग आणतात हेच खरे.

सुरुवात मिडीयम मिसळीपासून झाली आणि आजही मिडीयमच मिसळ खातो वरअधिकची तर्री मागवून. सुरुवातीलाच तोंड भाजलं तर मिसळीची मजा उतरत जाते हे अनुभवाने समजलेले आहे.

या मिसळीची चव लागल्यावर दोन वर्षांनी पुण्याला गेलो तेंव्हा पुणे शहरात फिरून मी रामनाथ विश्रांती गृह हे टिळक रॉड वरील मिसळीचे दुकान शोधले (कॅम्पात मिसळ सदृश्य काहीच नव्हते) तेथील मिसळ मामलेदारापेक्षा वेगळी होतो म्हणजे फरसाण बारीक होतं आणि ब्रेडचे जाड स्लाइस( [पावाऐवजी) देत असत.

या दोनात उच्च नीच करणे कठीण आहे.

नंतर काटाकिर्र( याबद्दल माझे मत अजिबात चांगले नाही) सारख्या अनेक ठिकाणी अनेक तर्हेच्या मिसळी खाल्ल्या/ खात राहीन.

पण मिसळीची गोडी मामलेदाराने लावली हि वस्तुस्थिती आणि निदान ३५-४० वर्षे तरी त्यांनी आपला दर्जा( हा वादाचा मुद्दा बाजूला ठेवला तरी) टिकवून ठेवला आहे.

मामलेदार दुकान बंद असले तरच आमंत्रण मध्ये जायचे कारण तेथे मामलेदाराचे वातावरण नाही.

फ्रॅन्चायजी मध्ये तेवढा दम नाही हे सत्य परंतु त्यांचे पार्सल घरी घेऊन येणे हि सर्वानी१०-१५ जण असतील तर ( सह कुटुंब सह परिवार) उठून जायच्या ऐवजीची सोय आहे. त्यांचा रस्सा पातळ असतो आणि फरसाण मध्ये फक्त गाठ्या पापडी असते.

यामुळे आम्ही अमूलचे ताक आणि डीप फ्रिजरमध्ये ठेवायचे, वेगळे फरसाण आणायचे आणि प्रत्यक्ष खायच्या वेळेस रस्सा एकदम गरम करून घ्यायचा असे करून दुधाची तहान ताकावर भागवतो.

अजून एक आठवण म्हणजे आमचे डॉक्टर मित्रवर्य यांच्या बरोबर रविवारी सकाळी आमंत्रण किंवा आम्हाला सुटी असली तर मामलेदार सकाळी ७ वाजता अर्धा पाऊण तास तळ्यात बोटिंग करून (ठाण्याच्या तळ्याचे बोटिंगची मालक हे त्याचे रुग्ण असल्यामुळे वेळ काळ याचे बंधन नसे) मग मिसळ खाऊन भाजल्या तोंडाने तेथेच चहा पिऊन आपली सुटी/ रविवार साजरा करत असू

कंजूस's picture

3 Dec 2020 - 12:18 pm | कंजूस

प्रांतात 'भटाचे' हॅाटेल हा एक ब्रँड आहे. म्हणजे अमुक एक अस्ताव्यस्त वातावरण, मालकांना ओळखणारे, नेहमीची गिऱ्हाइकं आठ दहा दिवसांत फिरकली नाहीत की मालक चौकशी करणार आणि लोकल गावगप्पा . तसं वातावरण ठेवलेलं. स्टेशनसमोरचं गोखले उपहारगृह, अशोक टॅाकिजजवळचं स्वच्छ, ( गिरगाव - डोंबिवलीचं गोवगोविंदाश्रम, सँढस्रोडसमोरचं प्रभू, जुन्नर डेपोजवळचे महाजन) या प्रकारात मोडतात.
चवीचं होतं इकडे तिकडे पण चौकट पक्की.
मालकाचा मुलगा,बायको,सून,जावई गल्ल्यावर बसू लागतात अधुनमधून तसं गिऱ्हाइकही फिरतं।
चर्चा आणि चौकशांचा अड्डा पूर्वीचा.

मामलेदार मिसळ मला भलतीच तिखट वाटली. चव या पेक्षा ही मिरची आल्याचा मारा अधीक होता.
मिसळीत सातारची बामणे मिसळ / चंद्रविलास मिसळ एकदम भारी वाटली.
पुण्यातली रविवार पेठेतली वैद्य मिसळही चवीला सौम्य आणि चांगली असायची ( आता आहे की नाही माहीत नाही)
पुण्यात एम एच तडका नावाचे एक मिसळीची दुकान होते कमला नेहरु पार्क जवळ तिथेही मिसळ चांगली होती . रामनाथची मिसळ ही नुसतीच तिखटाचे पणी मारलेली .
नाशीक ला एक काळ्या रश्शाची मिसळ मिळते त्याबद्दल ऐकून आहे.
पण मामलेदार मिसळीच्या दुकानातले वातावरण ही त्याची खासीयत

सर्वसाक्षी's picture

3 Dec 2020 - 1:46 pm | सर्वसाक्षी

विजुभाऊ
मामिमध्ये आलं नसतं हो.
बाकी आवडणं नावडणं हे व्यक्तिसापेक्ष आहे.

योगी९००'s picture

3 Dec 2020 - 1:53 pm | योगी९००

आमच्या कोल्हापुरला विसरलात..

फडतरे, राजारामपुरीतली गावरान मिसळ, बावडा मिसळ, चोरघे मिसळ...

फडतरे स्पेशालिटी म्हणजे मिसळी बरोबर ब्रेड पण ते स्वतःच बनवतात. फार मऊ ब्रेड असतो जो मिसळीचा रस्सा शोषून घेतो. त्यामुळे मजा येते.

ठाणेकर किसनशेठ यांनी मामलेदार मिसळ खाऊ घातली होती. मिसळ साधारणच वाटली. मात्र मामलेदारचा बटाटावडा आणि त्यासोबत दिलेली हिरवी चटणी खूप आवडली होती.

राजेंद्र मेहेंदळे's picture

4 Dec 2020 - 11:54 am | राजेंद्र मेहेंदळे

वेगवेगळ्या मिसळींची नावे वाचुन तोंडाला पाणी सुटले.
आईचे ऑफिस समोरच असल्याने लहानपणी मामलेदार मिसळ खाल्ली आहेच. पण नंतरही कधी कधी जाणे होई.
पुण्यात आल्यावर टिळकरोडची रामनाथ मिसळ(सुमार), बेडेकर मिसळ(गोड), काटाकिर्र(आवडली), विश्रांतवाडीला राजुशेट्ची मिसळ(जळजळीत) खाल्ली, पण मामि ती मामिच.

अभिरुप's picture

4 Dec 2020 - 1:41 pm | अभिरुप

मामलेदार मिसळ तिखट खाणार्या लोकांसाठीच असावी कारण मलातरी ती चवीला यथातथाच वाटली. नायगांव- भोईवाड्यात पोलीस मुख्यालयाजवळ "आनंद भुवन" नावाचे मिसळीसाठी एक स्पेशल हॉटेल आहे. तिथे पोळा उसळ नावाची एक डिश मिळते. पोळा म्हणजे नीर डोसा. आनंद भुवनची मिसळ तर अप्रतिमच.

तसेच पुणे-सोलापूर रस्त्यावर लांबोटी म्हणून एक गाव आहे तिथे एक-दोनदा मटकी मिसळ खाल्ली होती. अप्रतिम अशी गावठी, चवदार आणि झणझणीत मिसळ खाणे म्हणजे एक पर्वणीच होती.

खेड शिवापूर टोल नाक्याजवळ एक गणेश नावाचे हॉटेल आहे तिथे एका रम्य हिवाळ्यातील सकाळी थंडगार बर्फ घातलेली मिसळ दिली गेली होती. मिसळ थंड का असे विचारले तर गरम मसाला जास्त असल्यामुळे बर्फ टाकला असल्यचे त्या पोर्याने सांगितले. असा एक गमतीदार प्रसंगही आमच्यासोबत घडला.

जगप्रवासी's picture

7 Dec 2020 - 4:00 pm | जगप्रवासी

दर रविवारी क्रिकेट खेळून आल्यावर आम्हा मित्रांचा दुपारचा अड्डा आनंद भुवनलाच असायचा. मिसळपावचा मी आवडीने खात असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेलात / नाक्यावर खाल्ली आहे. परळला आता आय लव्ह मिसळ नावाचं एक हॉटेल आहे पण मिसळीच्या नावाखाली बकवास डिश दिली जाते इतकी पुचाट मिसळ कुठेच खाल्ली नव्हती. परळच्याच किर्ती महल मधली तर्री मारलेली मिसळने डोळ्यातून नाकातून धूर काढला होता. दादरला प्लाझाच्या बाजूला मिसळ हाऊस आहे तिथली चव देखील छान आहे.

मामलेदारची मिसळ ही नुसती खाण्यासाठी नाही तर तिथे मैत्री जगण्यासाठी खाल्ली जाते. तसाच माझ्या घराजवळ एक सदानंद नावाचं हॉटेल होत तिथेदेखील असाच माहौल असायचा, खाण्यापेक्षा नुसता गप्पांचा फड जमायचा, गिऱ्हाईक नेहमीची मंडळी असल्याने मालक देखील निवांत असायचे. पण त्या जागी आता एक आलिशान टॉवर उभं राहिलंय.

MipaPremiYogesh's picture

4 Dec 2020 - 9:19 pm | MipaPremiYogesh

वाह मस्त मस्त अनुभव मामि चे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे चव हि सापेक्ष आहे आणि आज काल मिसळ म्हटल्यावर हमरीतुमरी वर येतात :). जमाना झाला असं ग्रुप ने मिसळ खाण्यात ह्या करोना मुळे :(

गामा पैलवान's picture

4 Dec 2020 - 11:13 pm | गामा पैलवान

सर्वसाक्षी,

जुन्या आठवणी जागवल्यानिमित्त धन्यवाद! :-)

मी डबल मिसळ बिना पाववाला! तिखटजाळ मिसळ खाल्ल्यावर नंतर बाजूच्या रसवंतीगृहात जाऊन मसाला व बर्फ टाकलेला फुल्लगिलास थंडगोड रस मारायचा. मजा यायची.

आमच्या वेळेस याचा 'मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा सायंकालीन व्यासंग' असा दीर्घविवेचक उल्लेख होई. कारण जवळंच मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची इमारत होती.

आ.न.,
-गा.पै.

सर्वसाक्षी's picture

5 Dec 2020 - 3:39 pm | सर्वसाक्षी

गामाशेठ

झणझणीत मिसळीवर उतारा म्हणून बहुतेक लोक ताक पितात मात्र तिखट आंबट एकत्र नको म्हणून काहीजण तुम्ही लिहिल्याप्रमाणे उसाचा रस पितात, आणखी एक पर्याय म्हणजे काही जण पुढे आमंत्रण च्या कोपर्‍यावर कुल्फी खातात

आणि काही जण डिंक लाडूही खातात, तिथे गल्ल्यावरच्या बरणीत ठेवलेले असतात

तुषार काळभोर's picture

5 Dec 2020 - 12:32 pm | तुषार काळभोर

पुण्यातल्या सोडून इतर मिसळी कधी खाल्ल्या नसल्या तरी, 'लेजंड' व्हावं आणि वर्षानुवर्षे लोकांच्या ओठांवर नाव अन जिभेवर चव रेंगाळत राहावी, ही गोष्ट नक्कीच उल्लेखनीय आहे.
मामलेदारचे जनक्/संस्थापक लक्ष्मणराव मुर्डेश्वर यांना आदरांजली!

अवांतर - काही वर्षांपूर्वी मिपाचं रुपडं पालटायच्या आधी वरच्या बाजूला एक मिसळपावची प्लेट दिसायची, ती मामलेदारची आहे, असं काही जुन्या जाणत्या सदस्यांकडून कळलं होतं.

चांदणे संदीप's picture

5 Dec 2020 - 2:22 pm | चांदणे संदीप

+१
मामलेदारचे जनक, लक्ष्मणराव मुर्डेश्वर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

ठाण्याला कधी गेलो तर मामलेदारला नक्की जाणार. मिपाकर सोबत असतील तर अजून मजा.

(पण जगात नेवाळे मिसळला पर्याय नाही हेच आमचे कालेजपासूनचे मत!)

सं - दी - प

सर्वसाक्षी's picture

5 Dec 2020 - 3:40 pm | सर्वसाक्षी

माझ्या माहितीप्रमाणे ती मामिच आहे

सुबोध खरे's picture

5 Dec 2020 - 8:19 pm | सुबोध खरे

'लेजंड' व्हावं आणि वर्षानुवर्षे लोकांच्या ओठांवर नाव अन जिभेवर चव रेंगाळत राहावी, ही गोष्ट नक्कीच उल्लेखनीय आहे.

बाडीस

दशानन's picture

5 Dec 2020 - 12:49 pm | दशानन

राहिल्या फक्त आठवणी..

अथांग आकाश's picture

5 Dec 2020 - 6:05 pm | अथांग आकाश

मला पण मामि आवडते!!
अतिरेकी तिखट असली तरी!!!
.