सूचना

वारंवार सूचना देऊनही काही सदस्य वैयक्तिक आणि खालच्या पातळीवरील प्रतिसाद देत आहेत. असे आढळल्यास विना सूचना कडक कारवाई करण्यात येईल.

सुहृद

Primary tabs

रवीन्द्र नारायण पुणेकर's picture
रवीन्द्र नारायण... in दिवाळी अंक
14 Nov 2020 - 10:00 amसुहृद

आरामखुर्चीत बसल्याबसल्याच सुशीलाबाईंना गाढ झोप लागली होती. नाकावरून चश्मा किंचित खाली सरकलेला. हातात अर्धवट विणलेला स्वेटर. लोकरीचा गुंडा जमिनीवर घरंगळलेला. टेबल लॅम्पच्या प्रकाशाचा तवंग अंधारावर पसरलेला. तपासायला घेतलेले पेपर्स टेबल लॅम्पच्या आजूबाजूस पहुडलेले. रात्रीचे अकरा वाजून गेल्याची जाणीव घड्याळ सोडता कोणालाच नव्हती.

नचिकेत लॅच उघडून आत आला. आईची झोपमोड न करता घरात शिरण्याची कला त्याला अवगत झाली होती. त्याने बूट काढले. टाय काढला. पँटच्या आत खोचलेला शर्ट बाहेर काढला आणि गळ्याचं बटण सैल करतो म्हणेपर्यंत सुशीलाबाईंना जाग आली.

“वाजले किती?"
“सव्वाअकरा. पण आई, झोप येते तर आत जाऊन का झोपत नाहीस? आरामखुर्चीत असं वेडंवाकडं झोपून मानेला उसण भरली, तर.."
“हा स्वेटर पूर्ण केल्याशिवाय झोपून चालणार नाही आणि उसण भरूनही उपयोग नाही. आणखी महिन्याभरात तू जर्मनीला जाशील. त्याआधी संपवायला हवा.." जमिनीवरचा गुंडा स्वेटरच्या पोटात खुपसत सुशीलाबाई म्हणाल्या.
“हे पेपर्स कधी द्यायचे आहेत?”
“आणखी आठवड्याने दिले तरी चालतील."
“एकंदरीत स्वेटरच्या भवितव्यापायी ह्या पोरांचं भवितव्य धोक्यात आहेसं दिसतंय.."

सुशीलाबाईनी एव्हाना पसारा आवरला होता. तास-दीड तासाच्या झोपेने त्याना तरतरी आली होती.
“जेवण गरम करते."
“नको, संगीताने डिनर दिलं."
“तरीच म्हणते उशीर का म्हणून.. म्हटलं, जर्मन भाषेचा क्लास एवढा वेळ कसा.. की पहिल्याच दिवशी सर्व भाषा आत्मसा.."
“संगीताचा मॅडपणा तुला माहीत आहे ना? जर्मनीला जायचं नसतं तर मला कुठली हौस होती भाषा शिकायची? पण ही येडी.. मी क्लासला जाणार म्हटल्यावर स्वतःपण आली. उगीच पासटाइम.."
“तिचं सारं तुला सहन करायलाच हवं. नाहीतरी तिच्या शिफारशीनेच तुला नोकरी लागली."
“मला नोकरी द्यायला ती कारणीभूत आहे इथपर्यंत ठीक आहे आई. पण माझ्या हुशारीमुळेच मी नोकरीत टिकून आहे, हे तरी मान्य करायलाच हवं. तिच्या वडिलांना एम.डी. म्हणून काही जबाबदाऱ्या आहेतच ना. नुसता संगीताचा मित्र म्हणून मला नोकरीत ठेवून चालणार नाही."
“कबूल. पण हल्ली नोकरीतलं पहिलं पाऊलच महत्त्वाचं असतं. नंतर सारी हुशारी."
“ठीक आहे. तुझ्याशी काय वाद घालणार.. चल, आवर सगळं. झोपायला जाऊ या." आळसावून जांभई देत नचिकेत म्हणाला.
“नचिकेत, एक विचारू?"
“विचार ना." त्याच्या डोळ्यात झोप डोकावत होती.
“तू संगीताशी लग्न का करत नाहीस?'
“आई..."
“त्यात गैर काय आहे? तुम्ही दोघं हिंडता फिरता, ठिकठिकाणी जाता, लंच-डिनर करता.. अगदी कधी कधी सिनेमालाही जाता..'"
“आई, ह्या सर्व गोष्टी एकत्रपणे केल्या म्हणजे लग्नासाठी क्वॉलिफिकेशन झालं का? आमच्या दोघांच्याही मनात असा विचार कधी आला नाही. एखादा मुलगा आणि मुलगी एकत्र आली की त्यांचं फक्त लग्नच होऊ शकतं, हा विचार फार जुना झाला. हल्ली प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असतं. प्रत्येक घटनेला स्वतंत्र अस्तित्व असतं."
"पण अजून आपल्याकडे हा विचार रुजलेला नाही."
“ह्याचा अर्थ तुम्हाला मान्य असलेला मार्गच आम्ही स्वीकारावा, हा अट्टाहास का? आणि आम्ही दोघांनी एकमेकांकडे त्या नजरेने पाहिलेलं नसताना?"
“अरे, सहवासाने प्रेम निर्माण होतं.. कित्येकदा प्रथमदर्शनी किंवा काही वेळा कालांतराने."
“इतक्या वर्षांच्या आमच्या मैत्रीनंतरही जर तथाकथित लग्नास योग्य असं प्रेम जर आमच्यात निर्माण होऊ शकलेलं नाही, तर तो आमचा दोष समजायचा का?”
“मी तशी जुन्या काळातली. ह्या पातळीवरून विचार नाही करू शकत. मनात होतं ते आपलं बोलून दाखवलं."
“ते जाऊ दे. लिमयेसाहेब तुला भेटायचं म्हणत होते. तुझ्या सोयीप्रमाणे कधी येऊ देत ते सांग."
“आत्ताच त्यांना का यावंसं वाटावं? कदाचित ते हाच विषय काढणार असतील. तू नाहीच म्हणणार. त्यापेक्षा न येतील तर बरं..."
“ते काय हिंदी सिनेमातले श्रीमंत बाप वाटले नोकरीच्या बदल्यात पोरगी गळ्यात मारायला? संगीताशी मी लग्न करावं ह्या विचाराने तुला ग्रासलंय."
“म्हणतोच आहेस तर येत्या रविवारी बोलव. तू जाण्यापूर्वी ओळख झालेली बरी..."

नचिकेत कीर्तने सायन्सला असताना संगीता लिमये त्याची वर्गमैत्रीण होती. नचिकेत पुढे एम.टेक.ला गेला. संगीताने बी.एस्सी.नंतर शिक्षण सोडलं. कारण गरज नव्हती. तिच्या भवितव्यासाठी लिमयेसाहेबांचं स्टेटस पुरेसं होतं. त्याला साजेसे लायन्स क्लब, पुष्पयोजना, गजल कॉन्सर्ट्स, कॉकटेल पार्टीज इत्यादी उद्योग तिला उपलब्ध होते. इतकं असूनही तिने नचिकेतबरोबर मैत्री टिकवून ठेवली होती. ती एकमात्र गोष्ट अशी होती, जी स्टेटस सिम्बॉल नव्हती. उच्चभ्रू समाजात वावरताना उबग आला की अगदी मनातल्या गोष्टी बोलायला नचिकेतचा सहवास हा एकच उतारा होता. सुशीलाबाईंना भेटायलादेखील तिला आवडायचं. तिची नचिकेतबरोबरची मैत्री त्याच्या सहकाऱ्यांना सलायची. पण कोणाचाच इलाज नव्हता. नचिकेत स्वकर्तृत्व कितीही मिरवत असला, तरी 'एम.डी.ज मॅन' म्हणूनच त्याचा उल्लेख होत असे. आता तर तो जर्मनीला जाणार म्हटल्यावर कुजबुज वाढतच चालली होती.

ठरल्या वेळेप्रमाणे लिमयेसाहेब रविवारी संध्याकाळी पाच वाजता नचिकेतच्या घरी आले. सुशीलाबाईंनी घर नेहमीपेक्षा जरा अधिकच टापटीप ठेवण्याचा प्रयत्न केला होता. बाहेरच्या खोलीतला टेबल लॅम्प हा शिक्षिकेचा स्टेटस सिम्बॉल समजला जाईल ह्या हेतूने त्याची आतल्या खोलीत रवानगी झाली होती. त्यावरून सकाळी नचिकेतचा आईबरोबर वाद झाला होता. कोणाला काय वाटेल ह्या न्यूनगंडापायी आपण आपली राहणी कशाला बदलायची? हा नचिकेतचा मुद्दा. सुशीलाबाईंना पटत होता आणि नव्हताही.

सुशीलाबाईंनी लाडू, चकल्या, चिवडा असा खास दिवाळी थाटाचा फराळ आणून ठेवला. त्याबरोबर कॉफीचे कप. लिमयेसाहेबांच्या चेहऱ्यावर 'हे खावं की ते खावं' असे लहान मुलाचे भाव दिसत होते.

“मिसेस कीर्तने..."
“माई म्हटलंत तरी चालेल. सर्व जण माईच म्हणतात."
“माई...आज दिवाळी बऱ्याच वर्षांनी अनुभवतोय. एरवी खऱ्या दिवाळीच्या वेळेस आमच्याकडे जुगार चालतो.. सिंधी कल्चर..."
“म्हणजे..."
“कमला सिंधी. तिच्या डॅडींच्या मेहेरबानीने तर मी इथपर्यंत पोहोचलो. पण त्यामुळे माझं मराठीपण हळूहळू खच्ची होत गेलं. आज बऱ्याच वर्षांनी मराठी घरात बसलोय. त्यात तुम्ही दिवाळाचा फराळ केलेला."
“संगीता कधीतरी येते माझ्याकडे. पण तिच्यावर परिणाम झालेला दिसत नाही सिंधी कल्चरचा.."
“कमलाने बराच प्रयत्न केला तिला सिंधी ग्रूप्समध्ये मिक्सअप करायचा. पण संगीताचा खरा पिंड मराठीच. ह्याचं खरं श्रेय तिच्या नचिकेतबरोबरच्या मैत्रीलाच द्यायला हवं. रुपारेलला न पाठवता सोफियाला किंवा जयहिंदला पाठवलं असतं, तर.. संगीता लिमयेची मिरचंदानी किंवा गिडवानी व्हायला वेळ लागला नसता."

नचिकेत जरासा अस्वस्थ होऊ लागला होता. त्याला उगीचच वाटत होतं की कदाचित लिमयेसाहेब पटकन्‌ संगीताविषयी सुचवून मोकळे होतील. ते संगीताचा विषय टाळतील तर बरं. सुशीलाबाईंचही काही सांगता येत नव्हतं. त्यांनी संगीताविषयी विचारलं तरीही पंचाईतच!

“माई, आय अ‍ॅम प्राउड ऑफ नचिकेत. नचिकेतच्या आईला भेटण्याची माझी बऱ्याच दिवसांची इच्छा होती. तो तुमच्याविषयी बरंच सांगत असतो. संगीतासुद्धा सांगत असते."
“साहजिकच आहे. नचिकेतला समजायला लागल्यापासून त्याने फक्त मलाच पाहिलंय. कीर्तने गेल्यापासून आम्ही दोघंच आहोत. जबाबदारी फार मोठी होती, पण शक्ती लाभत गेली. मुलाने चीज केलं म्हणून बरं."
“मुलांना आई वाढवते की तिची माया? तसं बघितलं तर संगीताला कोणी वाढवलं? मी सांगू शकत नाही."
“नचिकेतवर मी मायेची पाखर घातली, त्याचबरोबर कासवाची पाठही दिली.. वज्रासारखी घट्ट पाठ. त्यावर काहीही कोसळलं तरी नचिकेत पाय रोवून उभा राहिला पाहिजे ह्यासाठी. त्याची फार गरज असते हल्ली."

गप्पा मारता मारता लिमयेसाहेबानी समोरच्या पदार्थांची चव घेतली होती. अधूनमधून कॉफीपान सुरू होतं.

“आई, तो विषय पुरे आता. प्रत्येक जण आपापल्या परीने जगत असतो, वाढत असतो. लिमयेसाहेबांना सांगून काय होणार? त्यांना बोअर होईल."
“नचिकेत, नेहमी तू आईविषयी सांगत असतोस. आज तिलाही बोलू दे."
सुशीलाबाई गप्प झाल्या होत्या. नचिकेतच्या रूपाने त्यांच्या अश्रूंची केव्हाच फुलं होऊन गेली होती. स्वत:ला त्या अलीकडे निर्माल्यवत समजू लागल्या होत्या. असं मानलं की नवीन पिढीचे नवे विचार आणि मार्ग सहज स्वीकारता येतात.

“माई, एक प्रपोजल आहे."
लिमयेसाहेब बोलले मात्र आणि नचिकेत व सुशीलाबाई दोघांनी एकमेकाकडे पाहिलं.
“नचिकेत आता जर्मनीला जाईल, तो साधारणपणे तीन महिने तरी परतणार नाही. संगीतालाही तुमची बरीच ओढ आहे. तेव्हा..."
नचिकेत पुन्हा एकदा अस्वस्थ आणि सुशीलाबाईंच्या चेहऱ्यावर 'तरी मी म्हणत नव्हते' हा भाव..
“तेव्हा थोडे दिवस तुम्ही आमच्या घरी येऊन राहिलात तर संगीतालाही बरं वाटेल, तुम्हालाही एकटेपणा जाणवणार नाही."
“नाही, ते मी करू शकणार नाही. हे गेल्यापास्नं मी जो एक व्रतस्थपणा स्वीकारलाय, त्यात फक्त स्वतःचं घर आणि त्याच घरातलं अन्न एवढचं बसतं. नचिकेतने इतक्यांदा सांगूनही मी कधी हॉटेलात चहाचा कप घेतला नाही. एकटेपणा हा माझा स्वतःचा आहे. मला त्याचा कंटाळा नाही. मात्र संगीता केव्हाही इकडे येऊ शकते."
लिमयेसाहेब आले नसते तर बरं, असं नचिकेतला सारखं वाटत होतं. पण आता नाइलाज होता. सुशीलाबाईचा व्रतस्थपणा हा त्यांच्या अहंकाराचा भाग होता, असं वाटण्याइतपत त्या टोकाला गेल्या होत्या.

“मला माफ करा. तुम्ही आमच्याकडे निदान डिनरला या असं सांगणार होतो. तेही आता शक्‍य नाही."
“तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. नचिकेत येऊ शकेल. इतक्या वर्षांची घालून घेतलेली बंधनं.. सहजासहजी मोडता येत नाहीत."
“हरकत नाही. ज्या जगात मी वावरतो, तिथे मी फक्त सोयीप्रमाणे तत्त्व बदलताना पाहिली आहेत. त्या पार्श्वभूमीवर तुमच्यासारख्या व्यक्तीविषयी मला नेहमीच आदर वाटतो. अशा व्यक्ती क्वचितच आढळतात. मी निघतो."

लिमयेसाहेब जायला निघाले. नचिकेतने दरवाजा उघडला. निघता निघता लिमयेसाहेब म्हणाले,
“येत जाईन कधी कधी. बरं वाटलं.."
“जरूर येत जा. संगीतालाही घेऊन या."

दरवाजातच हे बोलणं चाललं असताना वरच्या मजल्यावरून देशमुख उतरला. नचिकेतला कळून चुकलं की देशमुखने एम.डीं.ची गाडी खाली पाहिली होती आणि आपल्या दरवाजाचा आवाज ऐकून तो साळसूदपणे त्याच्या घरातून बाहेर पडला होता.

“नमस्कार सर..."
“देशमुख, तुम्हीही इथंच राहता का?"
“वरच्याच मजल्यावर सर. ..सर येता का?”
"सम अदर टाइम. आता जरा निघायचंय.."

नचिकेतला देशमुखचं अवचित टपकणं आवडलं नव्हतं. स्वच्छ सफेद शर्टावर कावळा शिटावा तसं त्याला वाटलं.
रविवारच्या संध्याकाळचा टीव्हीवरचा चित्रपट अर्ध्यावर सोडून देशमुखने घराबाहेर पडणं हे अस्वाभाविक होतं. पण तो तसं वागला ह्यात आश्वर्य वाटण्यासारखंही काहीच नव्हतं.

सोमवारी नचिकेत ऑफिसात पोहोचला, तेव्हा त्याला कुजबुज जरा वाढल्यासारखीच वाटली. कदाचित काल टपकलेला देशमुख त्याच्या मनात रेंगाळत असावा. पण तसं नव्हतं. खरोखरच देशमुखने आँखो देखा हाल ऑफिसला सुनवला होता. लिमयेसाहेबांची सेक्रेटरी मेहरू नचिकेतला म्हणाली,
“नचि, यू आर सो लकी! एम.डी. साब तुज्याकडे काल आला होता."
“तुला कसं समजलं?”
“देशमुख नोज ऑल दॅट इव्हन एमडीज सेक्रेटरी डजन्ट नो. इज इट ट्रू यू आर गोइंग टु मॅरी संगीता?"
“मेहरू, डॅम इट. डिस्‌गस्टिंग. प्लीज लीव्ह मी अलोन."

मेहरू नचिकेतच्या रूममधून बाहेर पडली. देशमुखशी बोलण्यात अर्थच नव्हता. देशमुखने बराचसा अनर्थ कालवलेला दिसत होता. त्या क्षणी देशमुख समोर दिसला असता, तर नचिकेतने खरोखरच त्याच्या दोन कानफटात ठेवून दिल्या असत्या. ही बातमी इतकी पसरली असेल तर लिमयेसाहेबांच्या कानावर गेलीच असणार. त्यांना जर वाटलं की तो स्वत:च ह्याला जबाबदार आहे, तर? नचिकेतने लिमयेसाहेबांना भेटून सर्व प्रकरणाची शहानिशा करण्याचं ठरवलं.

नचिकेत केबिनमध्ये शिरला, तेव्हा लिमयेसाहेब फोनवर बोलत होते. त्यानी खुणेनेच नचिकेतला बसायला सांगितलं. थोड्या वेळाने फोन ठेवल्यावर त्यानी नचिकेतकडे मोर्चा वळवला.
“नचिकेत, कालची संध्याकाळ अविस्मरणीय होती. माईंच्या रूपाने जे स्फुल्लिंग दृष्टीस पडलं, ते कधीही विसरता येणार नाही. असं तपस्वी जीवन मी कधी जगू शकेन का..."
लिमयेसाहेब अशा प्रकारचं काही बोलू शकतात ह्याचंच नचिकेतला आश्वर्य वाटत राहिलं.

“पण सर, मला काही सांगायचंय...."
"गो अहेड."
“सर, संगीता आणि माझ्याविषयी आज ऑफिसात बातमी पसरली आहे. तुमच्या कानावर येण्यापूर्वी.."
“नचिकेत, आज आल्याआल्याच मेहरूने माझं अभिनंदन करून चकित करून सोडलं. देशमुख इज अ‍ॅन इंटरेस्टिंग पर्सन.."
लिमयेसाहेब छानपैकी हसले.

“देशमुखने जे केलं ते हसण्यावारी नेऊ नका सर. मला ते आवडलेलं नाही."
“नचिकेत, एक लक्षात घे. संगीता, तू, मी आणि माई ह्यांच्यात काही गैरसमज नसले म्हणजे सारं व्यवस्थित होत राहील. दुसरी गोष्ट म्हणजे तू जर्मनीहून परतल्यावर त्या एका भांडवलावर मी माझी मुलगी तुझ्यासाठी सुचवेन असं तुला वाटत असेल, तर तसं मनातही आणू नकोस."
“सर, मी असा विचार कधीच केला नाही. पण आमच्या मैत्रीचा असा विपर्यास व्हावा ह्याचं मला वाईट वाटतं."
“पण हा विचार अगदीच टाकाऊ वाटत नाही. गुड आयडिया. जर तुम्ही दोघांनी ठरवून प्रपोजल मांडलं, तर माझी काहीच हरकत नसेल."
“पण सर.. ."
“त्यात भांबावून जाण्यासारखं काही नाही. लग्नाच्या गाठी विधात्यानेच बांधून ठेवलेल्या असतात. आपण फक्त निमित्तमात्र असतो."

नचिकेत तसाच लिमयेसाहेबांच्या केबिनमधून बाहेर पडला. मन हलकं करायला म्हणून तो त्यांच्याकडे गेला होता, परंतु मनावरचं दडपण अधिकच वाढलं होतं. आईच्या मनात आधीपासूनच होतं, लिमयेसाहेब 'ये शादी नही हो सकती' असं म्हणत नव्हते आणि त्याने स्वतःने हा विचारच कधी केला नव्हता. संगीताने एकदा ठरवलं असतं तर नचिकेत किंबहुना लग्नाला विरोध करू शकणार नव्हता. अजून तरी संगीताने तिच्या विचारांचा थांगपत्ता लागू दिला नव्हता. निदान जे घडतंय, ते तिच्यापर्यंत पोहोचवायला हवं होतं.

नचिकेतने फोन करून संगीताला 'संतूर'मध्ये संध्याकाळी सहा वाजता भेटण्याचं नक्की केलं. फोन केल्यावर संगीता उपलब्ध असावी आणि एरव्ही इकडे तिकडे भटकणारी ही पोरगी घरीच सापडावी हा एक चांगला योगायोग आहे, असं त्याला वाटलं. नचिकेतला भेटणं याउप्पर भेटीचं कारण जाणून घेणं तिला गरजेचं वाटलं नाही. सहसा फोन न करणारा हा प्राणी आज फोन करून भेटायला बोलावतोय, म्हणजे काहीतरी विशेष असावं एवढचं तिला जाणवलं.

“काय आज विशेष?”
“तुला भेटतोय ह्यात काय विशेष असायचं?”
“तसं नव्हे.. बहुतेक वेळा मी तुला भेटायला बोलावते, आज तू मला बोलावलंस हे विशेष."

संगीताच्या कानावर ही बातमी गेली असावी आणि आपण विषय काढतो का ह्याची ती वाट बघत असावी असं नचिकेतला वाटत होतं. आपण सरळ प्रपोज केलं तर साऱ्या समस्येचा झटक्यात निकाल लागेल. तिला तसं काही वाटतंच नसेल, तर आपलाच निकाल लागायचा.

“एवढा विचार कसला करतोयस? जर्मनीला गेल्यावर आपली भेट होणार नाही, त्याचा आत्तापासूनच विचार नको. विरहाचासुद्धा एक अनुभव असतो."
“ते नव्हे, पण तुला एक सांगायचंय."
“आज एवढा अडखळत का बोलतोयस? सेक्ससारख्या विषयावरसुद्धा आपण आजपर्यंत अनेकदा बिनधास्त चर्चा केलीय. मग एवढी चलबिचल कसली?”
शेवटी सारं बळ एकवटून नचिकेतनं कालपासूनची सगळी हकीकत तिला सांगितली.
“संगीता, हसू नकोस. बी सीरियस."
“काय सीरियस? कोणीतरी एक देशमुख बातमी पसरवतो.. आणि तू त्याला अवास्तव महत्त्व देतोयस."
“तसं नव्हे, तुला नंतर समजलं असतं, तर माझ्याविषयी गैरसमज झाला असता."
“मला तसं वाटत नाही. पण तू इतका गोंधळलेला दिसतोयस की एकदा वाटतं तू आत्ताच मला प्रपोज करणार आहेस..."
“काहीतरी बडबडू नकोस. मला तसं कधीच वाटलं नाही."
“आणि मला पण! लोक काहीही म्हणोत, चारित्र्य हे स्वतःने स्वतःपुरतं सांभाळायची गोष्ट आहे. देशमुख निदान आपलं लग्न ठरलंय असं तरी म्हणाला. त्याही पलीकडे जाऊन बोलणारे लोक ह्या जगात आहेत. अगदी खरं सांगायचं म्हणजे तुझ्यासारखा मित्र मला कधीच लाभणार नाही. इतकी वर्षं आपण भेटतोय, पण मैत्रीचा गैरफायदा घ्यावा असं तुला वाटलं नाही, हा तुझा मोठेपणा. वारंवार होणाऱ्या पार्टीजमध्ये अनेक पुरुष भेटतात. त्यांच्या नुसत्या हँडशेकमधूनच हलकटपणा जाणवतो. पण शिष्टाचार म्हणून हसायचं, बोलायचं. अशा ह्या गलिच्छ समाजात तुझ्यासारख्या एखादाच असणाऱ्या मित्राला नवरा बनवून त्या मैत्रीला मला मुकायचं नाहीय. स्त्री-पुरुष संबंधाकडे फक्त एका विविक्षित नजरेनेच पाहणारी व्यक्ती मला पती म्हणूनही स्वीकारायची नाहीये. अर्थात नशिबी कोण असणार ते बघायचं. पण तू मात्र मला कायम
दीपस्तंभासारखा प्रकाश देत राहशील."

'संतूर'मधून बाहेर पडून काल शिकलेल्या जर्मन वाक्यांची उजळणी करत दोघं युनिव्हर्सिटीला जायला निघाले.

लेखक : रवीन्द्र नारायण पुणेकर
ए ५०१ वृंदावनम
बी एम थोरात चौक
माॅडेल काॅलनी
शिवाजीनगर
पुणे ४११०१६
मो : ९९२३७०२३५२

प्रतिक्रिया

कथेला छान थीम आहे. आवडली.

टर्मीनेटर's picture

15 Nov 2020 - 6:13 pm | टर्मीनेटर

@रवीन्द्र नारायण पुणेकर

'सुहृद'

ही तुमची कथा आवडली  👍

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

✨ शुभ दीपावली ✨

टर्मीनेटर

चौथा कोनाडा's picture

19 Nov 2020 - 2:22 pm | चौथा कोनाडा

छान आहे कथा.
आवडली.
पु.ले.शु.

प्राची अश्विनी's picture

24 Nov 2020 - 6:40 pm | प्राची अश्विनी

एकदम वेगळा शेवट.
कथा आवडली.

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Nov 2020 - 10:36 am | ज्ञानोबाचे पैजार

नेहमी पेक्षा काहितरी वेगळे वाचायला मिळाले
पैजारबुवा,