मानगड (Mangad )

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
9 Oct 2020 - 1:36 pm

  मिर्झाराजे जयसिंगाच्या स्वारीनंतर शिवाजी महाराजांना राजधानीच्या दुर्गाची जागा बदलण्याची आवश्यकता वाटली. राजगडावरुन राजधानी रायगडावर हलवली गेली. पण यामध्ये राजधानीच्या मुख्य गडाला भक्कम संरक्षण आवश्यक होते. अर्थातच यासाठी निसर्गाने पुरवलेल्या सुरक्षेबरोबरच मानवनिर्मीत दुर्गांच्या चिलखताची आवश्यकता होती. रायगडाभोवती आधीच काही दुर्ग उभारलेले होते.यात चांभारगड, सोनगड हे दुर्ग होतेच. पण आणखी एक प्राचीन दुर्ग रायगडाच्या घेर्‍यात होता. रायगडावर उत्तरेने हल्ला होउ नये म्हणून वायव्य दिशेला मानगड मजबुत केला. याच बाजुने सुरत, मुंबईकडून येणारी वाट नागोठणे-पाली-कोलाड अशी पाचाड व पुढे रायगडाकडे जात होती. मोंघल व इंग्रज या स्वराज्याच्या दोन शत्रुंचा रायगडाकडे जाण्याचा मार्ग हाच असल्याने मानगडाला सहाजिकच महत्व प्राप्त झाले होते. मानगड संदर्भातील महत्वाची बाब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांच्या यादीत याचा उल्लेख आहे. महाराजांच्या काळात मानगड पुनर्बांधणी करून अधिक मजबूत; करण्यात आला. शिवपूर्व काळात देखील कोकण आणि दख्खन यांना जोडणाऱ्या सह्याद्रीतील घाट-वाटा प्रचलित होत्या. या घाट-वाटांना सरंक्षण देणे आणि त्या मोबदल्यात जकात वसूल करणे हि त्या काळातील परंपरा होती आणि हे काम या मार्गांवरील हे किल्ले करीत असत. मार्गांचे रक्षण करण्यासाठी गडावर सैन्य ठेवणे आणि व्यापाऱ्यांकडून मिळालेली जकात आणि परिसराची धारा वसुली सुरक्षितपणे गडावर ठेवणे असे दुहेरी काम या किल्ल्यांवर होत असे. कोकणातील निजामपूर-बोरवाडी-मांजुर्णे - कुंभे-घोळमार्गे घाटावरील पानशेत या व्यापारी मार्गाचे रक्षण मानगड करत होता.मानगडची निर्मिती ही राजधानीचा उपदुर्ग म्हणूनच झाली असली तरी गडावरील खोदीव टाक्या त्याच्या प्राचीनतेची साक्ष देतात. सह्याद्रीच्या अजस्र डोंगररांगेला चिकटून एखाद्या टेकडीसारखा असलेला हा मानगड आईचे बोट धरुन उभा असलेल्या मुलासारखा दिसतो. याच गडाची आज आपण सफर करायची आहे.

     या गडावर जाण्यासाठी मुंबई - गोवा मार्गावरील माणगाव हे सोयीचे ठिकाण. माणगावपासून मानगड १७ किमी अंतरावर
आहे. माणगावहून बस किंवा रिक्षाने १० किमी वरील निजामपूर गाठावे. तेथून ४ किमी वर बोरवाडी मार्गे ३ किमी वरील मशिदवाडी या मानगडच्या पायथ्याच्या गावात जाता येते. ( रायगडाच्या पायथ्याला असलेले छत्री निजामपूर आणि हे निजामपूर ही दोन वेगळी गावे आहेत).
     कोकण रेल्वेने देखील या परिसरात येउन माणगाव परिसरातील किल्ल्यांची भटकंती करता येते.सकाळी ०६:०० वाजता सुटणारी दिवा - मडगाव पॅसेंजर, १०:०० वाजता माणगावला पोहोचते. मानगड पाहून झाल्यावर लोणेरे गावाजवळील पन्हाळघर पाहून मडगाव - दिवा पॅसेंजर (१७:०० वाजता) गोरेगाव स्थानकात पकडून परत येता येते. केवळ मानगडच पहायचा असल्यास परतीची मडगाव दिवा पॅसेंजर संध्याकाळी ५:१५ वाजता माणगाव स्थानकात येते.
    पुण्याकडून या परिसरात येण्यासाठी ताम्हिणी घाट उतरून निजामपूरला जायचे. येथून रायगडच्या पायथ्याचे गाव पाचाडकडे जाणारा एक फाटा फुटतो. या रस्त्याने जाताना बोरवाडी गाव लागते. बोरवाडी गावातूनच मानगडच्या पायथ्याचे मशीदवाडी गावाकडे जायची वाट फुटते.
     स्वत:च्या वाहनाने रात्री प्रवास करुन पहाटे माणगावला पोहोचल्यास मानगड, कुर्डूगड, पन्हाळघर एकाच दिवशी पहाता येतात, पण त्यासाठी वेळेचे काटेकोर नियोजन करावे लागते. अर्थात या परिसरातील किल्ले आकाराने चिंटुकले आहेत,गड बघायला अवघे दीड-दोन तास लागत असल्याने एखादा किल्ला बघण्यासाठी या भागात येण्यापेक्षा दोन-तीन दिवसाची सवड काढून सोनगड, चांभारगड्,मानगड्,पन्हाळघर, दौलतगड हे सर्व किल्ले बघून होतील. स्वताचे वाहन असेल तर हे नक्कीच शक्य होते.

    गडाच्या प्राचीन इतिहासात डोकावले असता शेवल्या घाटाचा रक्षक म्हणुन याचे स्थान आढळते. मानगडावरील खांब टाके बघता हा गड प्राचीन आहे हे नक्की होते. गडाच्या ढासळलेल्या दरवाज्याच्या कमानीवरील मस्त्य शिल्प बघता या परिसरात शिलाहार राजवट होती का किंवा त्यांची कोणती शाखा नांदत होती हे समजत नाही. मात्र चंद्रराव मोर्‍यांच्या पाडावानंतर मानगड ताब्यात आल्यानंतर शिवाजी महाराजांनी गडाची पुर्नबांधणी केली हे निश्चित. शिवकाळात मानगडच्या सरनौबतीचे अधिकार ढूले या मराठा घराण्याकडे, हवालदारी गोविंदजी मोरे यांचेकडे तर कारखानीस म्हणुन प्रभु घराणे अशी नोंद आढळते. यांचे वंशज सध्या चाच या पायथ्याच्या गावात आहेत असे वाचनात येते. पुरंदर तहात शिवाजी महाराजांनी मोघलांना जे तेवीस किल्ले दिले, त्यात या मानगडाचा समावेश होता. संभाजी महारांच्या काळात १६८४ साली शहाबुद्दीन खान याने येथील प्रमुख लष्करी ठाणे निजामपूर येथे आक्रमण करतानाच आजूबाजूची खेडी उद्धवस्त केल्याचा उल्लेख आहे. सरते शेवटी १८१८ साली पुण्याहून देवघाट मार्गे कुर्डूपेठेत उतरून अवघ्या ४० सैनिकांच्या जोरावर विश्रामगड घेणाऱ्या कर्नल प्रॉथरच्या सेनेचा कप्तान सॉपीट याने मानगड काबीज केला असा उल्लेख आहे. इ.स.१८१८ च्या मे महिन्यात कर्नल सॉफीट याने या गडावर ताबा मिळवला व गडाच्या नशीबी इंग्रजांची सत्ता आली. या किल्ल्यामुळेच या तालुक्याला माणगाव हे नाव मिळाले आहे. गडाच्या परिसरातही असंख्य प्राचीन इतिहासाशी नाते सांगणार्‍या गोष्टी आहेत.
    गडाच्या पायथ्याच्या मशीदवाडी गावाबाहेरच काळभैरवाचे मंदिर आहे.

या मंदिराच्या आवारात वेगवेगळ्या काळातील अनेक विरगळ उघड्यावर ठेवलेल्या आहेत.

या मंदिराशेजारीच एक पुरातन उध्वस्त शिवमंदिराचा चौथरा पाहायला मिळतो.

 मंदिराच्या सुमारे तीन फुट उंचीच्या या प्रचंड मोठ्या चौथऱ्यावर भव्य आकाराचा नंदी असून जवळच शिवलिंग आहे. आसपास विखुरलेले कोरीव कामाचे दगड, नंदीची घडण यावरून हे मंदिर हेमाडपंथी असल्याचे जाणवते.
        या गडाच्या बाबतीत एक दंतकथा आहे. मानगडाच्या पायथ्याचे मसजितवाडी गाव मोघलांच्या आमदानीत वसवले असे सांगितले जाते, त्यावरुन या गडाला "मसजितवाडीचा गड" असे नाव आहे. या गावाच्या बाहेर एका मैदानात मंदिराचे जोते, पडक्या भिंती व भग्नावस्थेतील नंदी दिसतो. पुर्वी या ठिकाणी श्रीभवानीशंकराचे मंदिर होते असे म्हणतात. पण जेव्हा मोघलांनी मानगड आपल्या ताब्यात घेतला, तेव्हा त्यांनी या मंदिराचा विध्वंस केला. तेव्हा मंदिराच्या पुजार्याने मुर्ती एका डोहात टाकल्या. पुढे याच मुर्ती तिथून दोन कोसावर म्हणजे ६.५ कि.मी.वर असलेल्या गांगोळी नावाच्या गावातील डोहात प्रगट झाल्या.
     गडाच्या घेर्‍यातील चनाट या गावाजवळील दरीला जोर खोरे आहे. या परिसरात हणमंतराव मोरे आणि शिवाजी राजे यांचे युध्द झाले असे मानले जाते. चनाट परिसरात काही सती शिळा आणि वीरगळ आहेत. पायथ्याच्या मशीदवाडी गावात देखील बर्‍याच वीरगळ पहायला मिळतात. याच गडाच्या परिसरातील निजामपुरला देखील प्राचीन इतिहास आहे. जॉन फ्रायरने सन १६७५ मध्ये निजामपुरचा उल्लेख निशामपोर असा केला आहे. येथे १८६७ पर्यंत माणगाव उपविभागाचे मुख्यालय होते. गावात मराठेकालीन दगडी बांधणीचे तळे आहे. याच तळ्याच्या काठावर हेमाडपंथी बांधणीचे मंदिर होते. ते पाडून त्याचे दगड निजामपुरच्या पश्चिमेला १.५ कि.मी. वर असलेल्या पाणस्पे गावातील मशीदीसाठी वापरले अशी माहिती मिळते. सध्या या तळ्याच्या काठावर गणपती मंदिर आहे. त्याच्याजवळ पालिया आणि सती शिळा आहेत. शिवाय गावात कोरीवकाम असलेली विष्णू मंदिरे आहेत.

20200208_083557
 बोरवाडी गावात असलेला शिवाजी महाराजांचा सिंहासनाधीश पुतळा
20200208_083607
 बोरवाडी गावात गडाची माहिती देणारा फलक

 मानगडाचा नकाशा

  मानगडाला भेट देण्यासाठी माणगावच्या रस्त्यावर असणारे निजामपूर गाव गाठावे. निजामपूर गावातून रायगड पायथ्याच्या पाचाड गावात रस्ता गेला आहे. त्या रस्त्याने पुढे गेल्यास वाटेत बोरवाडी व पुढे मशिदवाडी हे छोटे गाव लागते. बोरवाडी गावातून मानगडाला उजवीकडे थेट रस्ता चढतो.

 मुंबईच्या दुर्गवीर या संस्थेतर्फे निजामपूर ते मशिदवाडी या रस्त्यावर मानगडाचा रस्ता दाखवणारे मार्गदर्शक फलक बसवण्यात आले आहेत.   मात्र बोरवाडी ते मशीदवाडी हा रस्ता विलक्षण अरुंद असल्याने स्वताचे वाहन घेउन मशीदवाडीकडे निघाले असताना समोरुन चारचाकी वाहन आले तर रस्ता काढताना अडचणीचे होते, तेव्हा शक्यतो चारचाकी वाहन बोरवाडी गावात लावावे आणि मशीदवाडीपर्यंतचे अंतर चालत जावे हे उत्तम. बोरवाडी गावातून देखील एक थेट रस्ता मानगडावर जातो. हि वाट गडाच्या उत्तर अंगाने म्हणजे गड उजव्या हाताला ठेउन आपण विंझाई मंदिर असलेल्या खिंडीत येतो. बोरवाडी गावात शिवाजी महाराजांचा सिंहासनारुढ पुतळा आहे.

 दुर्गवीर या संस्थेने लावलेला किल्ल्याची माहिती देणारा फलक
मशीदवाडी गावाच्या पाठीशी एका छोट्या टेकडीवर किल्ले मानगड वसला आहे. मशिदवाडीतून गावातून मानगडावर जाण्यासाठी प्रशस्त पायवाट आहे.गावात येणारा डांबरी रस्ता जिथे संपतो, तेथून सिमेंटचा रस्ता चालू होतो. या रस्त्याच्या टोकाला एक पायवाट डावीकडे जाते. या पायवाटेने किल्ला डाव्या हाताला ठेवून आपण खिंडीपर्यंत येतो. खिंडीत असलेल्या मंदिरामागून पायर्‍यांची वाट गडावर जाते. सध्या गावकऱ्यांनी वाटेवर ठिकठिकाणी “विन्झाई देवीच्या मानगडकडे” अश्या पाट्या बसवल्याने रस्ता चुकण्याची शक्यता राहिली नाही. मशीदवाडी हे अगदी छोटे गाव. मोजून पन्नास घरट्याचे. गावाच्या अगदी पाठीशीच छोट्या टेकडीवर किल्ले मानगड दिमाखात उभा आहे.

 शाळेच्या पाठीमागे जाणारी पायवाट पकडून चढाई सुरु करायची आणि दम लागेपर्यंत अर्ध्या वाटेवरच्या विन्झाई मंदिरात थांबायचे. घड्याळात वेळ लावून चढाई सुरु केली असेल तर दहाव्या मिनिटाला विन्झाईच्या चरणी डोके ठेवायला पोहोचू असा मानगडचा चढ.

 गर्द झाडीमध्ये बांधलेल्या या मंदिरात विन्झाई देवीची शस्त्रसज्ज मूर्ती आहे. मंदिरासमोर काही फुटक्या वीरगळ आहेत तर एक दगडी रांजणसुद्धा आहे.

गडावर मुक्कामाच्या दृष्टीने ट्रेकर मंडळींसाठी हे मंदिर एकदम आदर्श.
       विंझाई मंदिरापासून एक रस्ता पुर्वेकडे सह्याद्रीच्या रांगेत वर चढतो. हा रस्ता जातो "कुंभे" या गावाकडे. सध्या ईथे जलविद्युत प्रकल्पाचे काम सुरु आहे. शिवाय कुंभे गावाजवळ जननीच्या कोंडाजवळ कुंभी नदीवर असलेला आवर्जून पहावा असा आहे. ईथून थेट घोळ गावाला जाता येते आणि तिथून ईच्छा असल्यास कोकणदिवा पहाता येईल. कुंभे गाव ते धनगरवाडामार्गे घोळला पोहचायला चार ते पाच तास लागतात. वाटेत वस्ती नाही, शिवाय वाटही तितकी वापरात नाही, त्यामुळे एखाद्या वाटाड्या असल्यासच या मार्गाने जाणे योग्य होईल.
 20200208_103217
 पुढे झाडीत एक थडे बघायला मिळते Screenshot_20200215-214930
 याशिवाय एक कबर दिसते
Screenshot_20200215-215024
 बांधीव पायर्‍यांनी गडाकडे जाण्यास सुरवात करायची

 
विझाई मंदिरापासून गडाकडे नजर टाकली की दोन भक्कम बुरुजांच्यापाठी लपलेला गडाचा दरवाजा दिसतो.
 
मानगडाच्या माथ्यावर आवश्यक तिथे बांधलेली तटबंदी डाव्या हाताला दिसते. 

मंदिराच्या पाठिमागुन गडावर जाण्यासाठी कातळात खोदून काढलेल्या पन्नास एक पायऱ्या आहेत.

        या पायऱ्या चढून गेल्यावर मानगडचा उत्तराभिमुख गोमुखी बांधणीचा मुख्य दरवाजा लागतो.

दरवाज्याचे दोन्ही बुरुज सुस्थितीत असून कमान मात्र ढासळली आहे.

प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर डावीकडे पहिल्या प्रवेशद्वाराच्या काटकोनात दुसरे उध्वस्त प्रवेशद्वार लागते.

याची कमान पुर्णपणे ढासळलेली असुन कमानीच्या एका तुकड्यावर कमळशिल्प कोरलेले आहे. समोरच एका कोनाड्यात मारुतीराया विराजमान झाले आहेत.

  दुर्गवीर या संस्थेने लावलेला किल्ल्याचा नकाशा असणारा फलक
 
 मानगडाच्या मुख्य दरवाज्यापासून डावीकडे आणि उजवीकडे अशा दोन वाटा फुटल्या आहेत.
 
मुख्य प्रवेशद्वारातून डावीकडे गेल्यास समोर राहण्यायोग्य एक प्रशस्त गुहा आहे. या गुहेचा उपयोग धान्यकोठार म्हणून होत असावा.

 मानगडावरचे हे खांब टाके गडाचे प्राचीनत्व सिध्द करते.
 
या गुहेच्या बाहेर एक व समोर एक अशी पाण्याची दोन टाकी आहेत.

 समोरचे टाके बुरुजातच खोदलेले आहे. तेथून सरळ गेले की गडमाथ्याचा मार्ग दाखवणारी पाटी असून तेथून काही खोदीव पायऱ्यांच्या मार्गाने दोन ते तीन मिनिटांत आपण थेट गडमाथ्यावर दाखल होतो.

बालेकिल्ल्यावर पोहोचल्यावर समोरच वाड्याचे चौथरे आहेत.


मुख्य दरवाज्यातून उजवीकडे जाणारी पायवाटही गडमाथ्यावरच घेऊन जाते पण उतरताना त्या बाजूने उतरल्यास चहुबाजूंनी किल्ला बघता येऊ शकतो.


गडमाथ्यावर ध्वजस्तंभ असून त्याच्याजवळच पाण्याच्या दोन टाक्या आहेत.

 जोर खोर्‍याचे दृष्य

  गडाची उंची तुलनेने कमी म्हणजे फक्त ७७० फुट असली तरी हवा स्वच्छ असेल तर इथुन दुर्गदुर्गेश्वर रायगडाचे दर्शन होते.

 मानगडच्या माथ्यावरुन सह्याद्रीच्या पर्वतरांगेचे व पायथ्याच्या मशिदवाडी गावाचे मोहक दृश्य दिसते. ढालकाठीपासुन पुढे निघालो की वाटेच्या दोनही बाजुस अवशेषांच्या दगडांचा खच पडलेला दिसतो.

 वाटेवर डाव्या बाजूला खाली दरीत पाण्याचे टाके दिसते.

ते पाहून पुढे गेल्यावर डावीकडे पिराचे स्थान असून त्याच्यासमोर पटांगण आहे. या पटांगणात पुर्वी दांडपट्टा, कुस्ती, बोथाटी वगैरे खेळांचा सराव चालायचा असे सांगितले जाते. गडावरच्या पीरावर दर शुक्रवारी परिसरातील मुसलमान लोक नमाजाला जमतात.


त्याच्या बाजूलाच उध्वस्त मंदिराचे अवशेष पाहायला मिळतात. तेथे जवळच काही भग्न जोती बघायला मिळतात.

मानगडाचे मुख्य आकर्षण असलेला अलीकडेच सापडलेला चोर दरवाजा या वाटेने सरळ पुढे गेल्यास नजरेस पडतो. चोरदरवाज्याला व्यवस्थित पायऱ्या असून तेथून खाली उतरणारी वाट चाच या गावी जाऊन पोचते असे स्थानिक सांगतात परंतु येथून खाली उतरणारी कोणतीही वाट नजरेस पडत नाही. मानगडाचा माथा लहान असून अर्ध्या तासात गडमाथा पाहून होतो. गडावर चढलो त्याच्या विरुद्ध बाजूने उतरायला सुरुवात केल्यास पुन्हा मुख्य दरवाजाजवळ पोहोचतो.

    गडबांधणीच्या काळातील काही अवशेष गडवर दिसतात. दगड कापण्यासाठी पुर्वी जे तंत्रज्ञान वापारत, त्याचे उदाहरण मानगडावर पहायला मिळते. दगडाला त्रिकोणी छिद्रे पाडून त्यात लाकडाचे तुकडे घालून त्यांना भिजवले जात असे. लाकुड फुगले कि दगडाचे दोन तुकडे होत असत.हा दगड त्याच प्रकारातील असावा.


गडमाथा थोडासा उतरून पुढे जाऊ लागलो की उजवीकडे माचीवर जमिनीवरील खडकात खोदलेली ६ पाण्याची टाक आहेत.


 येथे आपली गडफेरी पुर्ण होते व परत आल्या वाटेने खाली उतरायचे.
  मानगड उतरल्यावर आणखी एक आवर्जून बघायची गोष्ट म्हणजे पाय्थ्याच्या मशीदवाडीतील कारखानीस यांच्याकडे असलेली शिवकालीन तलवार पाहणे. ती त्यांनी आजही जपून ठेवली आहे. आला-गेलेल्यांना ते आवडीने आपल्याकडची तलवार दाखवतात आणि त्यांना ज्ञात असलेली माहितीही सांगतात. त्यावेळी गडाच्या सरंक्षणासाठी रेड्यांचा बळी द्यायचा हि पद्धत होती अशी दंतकथाही ते सांगतात.किल्ला म्हणजे अख्खा कारखानाच. त्यासाठी देखरेख, संरक्षण, पुरवठा, हिशोब, वसुली हि सर्वच खाती ओघाने येत आणि या प्रत्येक खाण्यासाठी माणसे नेमली जात होती. मानगडच्या व्यवस्थेसाठी सुद्धा सरनोबत, हवालदार, कारखानीस, सबनीस नेमण्यात आले होते. विशेष म्हणजे यांचे वंशज आजही मानगडच्या पंचक्रोशीत आहेत तर कारखानीस-प्रभू यांची घरे मशिदवाडीत आहेत. यांच्या पूर्वजांनी महाराजांच्या काळात घेतलेल्या अपार कष्टांमुळे स्वराज्य उभे राहिले याचा सार्थ अभिमान या वंशजांना आजही आहे.
या शिवाय मानगड परिसरात आणखी एका वैशिष्ठ्याविषयी वाचायला मिळाले.ती म्हणजे "पांडवांची गादी".अर्थात हि गोष्ट वैयक्तिक मी बघीतली नसून श्री.अमोल तावरे व हर्ष पवळे यांचा आहे.खाली त्यांच्या फेसबुकची लिंक देत आहे.
पांडवांची गादी
तो अनुभव त्यांच्याच शब्दात वाचुया:-
मध्यंतरी रायगडच्या फेऱ्या वाढल्या होत्या, रायगडावर एक दोन नव्हे 4 हक्काची घर झाली आहेत, सखू मावशी, गोरे काका, गणेश ही मंडळी त्यापैकीच. जेव्हापासून रायगडला येणं होत होत , तेव्हापासून ऐकत होतो की रायगडच्या मागील बाजूस म्हणजे मानगडच्या जंगलात आहे पांडवांची गादी.

रायगड आणि परिसर हा तसा प्राचीन.पण त्याचा संबंध थेट महाभारतात/ रामायणात जातो हे माहीत नव्हतं.कुठे तरी वाचलं होतं की ह्या भागात कुठेतरी प्रभू श्रीराम आणि पांडवांचा स्वतंत्र मुक्काम पडला होता. पण ह्याचा पुरावा मिळत नव्हता.2-3 वर्ष मी आणि माझे सहकारी 'अमोल तावरे' आम्ही ह्याचा पाठपुरावा करत होतो. रायगड आणि आसपासच्या भागात जाता येता चौकशी करत होतो, अचानक एके दिवशी आम्ही रायगडवरून मानगड- पाचाड मार्गे परत येताना एक बातमी लागली की मानगडच्या पायथ्याशी असलेल्या धनगरवाडीमध्ये बाळकृष्ण गव्हाणे (बुवा) नावाची एक व्यक्ती आहे, ज्याने ते पांडवांची गाडी किंवा "सिंहासन" बघितलं आहे. ही व्यक्ती देवीची पुजारी आहे आणि त्याला देवींनी साक्षात्कार दिला आणि वर दाट जंगलात असलेल्या हा जागेबद्दल दृष्टांत दिला.झालं त्या माणसाचा शोध घेतला आणि आमची स्वारी निघाली या ऐतिहासिक गोष्टीकडे.
धनगरवाडी गावातून 3-4 तास चालल्या नंतर(जंगलातुन- कोणत्याही प्रकारची वाट नाही.. ) शेवटी आम्ही एका जागी आलो, संपूर्ण डोंगरावर चढ होता ( तो असतोच) पण इथे मात्र जवळपास 6-7 गुंठे एवढी सपाट जागा होती. मोठमोठे तळखडे होते सोबतच इतर अशा गोष्टी होत्या ज्या सिद्ध करत होत्या की इथे अगोदर कोणीतरी राहत असावं.

 बर ही जागा प्राचीन नसून शिवकालीन असावी किंवा फारफार तर त्या आधी 100 वर्षांपूर्वीची असावी असा विचार मनात आला, कारण इतिहास हा विषय भावनिक नसून वास्तववादी आहे हे आम्हाला माहीत होतं. पण या ठिकाणी असलेले तळखडे आणि ती जागा तसं दर्शवित नव्हती, आजवर वेगवेगळे किमान 200 किल्ले बघितले होते आणि त्यामुळे हे तळखडे शिवकालीन नाहीत असं पक्क झालं.

जो माणूस आम्हाला इथे घेऊन आला त्याला ह्या ठिकाणी काळघाई देवीचा (मोरेंची कुलदैवत) साक्षात्कार झाला होता,

(याच ठिकाणी मोरेंनी देवीला कौल लावला होता,जेव्हा महाराजांनी रायरी म्हणजे रायगडचा डोंगर ताब्यात घेतला होता.
 आणि म्हणून फक्त हीच व्यक्ती आजवर इथवर येऊ शकली होती. अन्य कोणी इथे पोहोचण्याचा प्रयत्न केला तरी त्याला वाट सापडत नसे. (ही माहिती आम्हाला परत खाली आल्यावर गावातल्या लोकांनी दिली. आणि तो आमच्यासाठी आश्चर्याचा धक्का होता)
याच ठिकाणी त्यांना सितामातेची जोडवी, गळ्यातील काही ऐवज, आणि बांगड्या(धातूच्या) सापडल्या. सोबतच यादव कालीन काही होन आणि सोन्याच्या मोहरा देखील सापडले. ( यातील काही गोष्टी आम्ही स्वतः बघितल्या आहेत, फोटो काढू न दिल्याने फोटो काढले नाहीत, नंतर कोणीतरी पुरातत्व विभागातून आलो आहे, अस सांगून यातील काही होण आणि बाकी वस्तू गायब केल्या; जी दुर्दैवी गोष्ट आहे.
ह्याच ठिकाणी【 पूर्वी आपण बघत असाल तर आठवेल की "सिंहासन बत्तीशी" कार्यक्रम लागत होता...】 त्यासारखं एक दगड आहे...ज्यात 32 दिवे लावायला जागा आहे.


 हा दगड आतून पूर्ण पोकळ आहे.. आणि त्याला आत जायला एक दरवाज्यासारखी जागा आहे ... पण ती बंद आहे.

संपूर्ण डोंगरावर उतार आहे पण फक्त हीच जागा सपाट आहे. ह्या ठिकाणी 12 महिने रानफळे, आणि जंगली फळे असतात जेणेकरून खाण्याची चिंता राहत नाही...
जवळच एक छोटं तळ आहे, ज्यात जिवंत झरे असलेली विहीर आहे.फक्त इथून फळे बाहेर नेऊ नये असं ते म्हणाले. आम्ही मनसोक्त 2 फणस खाल्ले..
अर्थात अधिक माहिती म्हणून हा अनुभव लिहीला आहे.याची कोणतीही खात्री मी देउ शकत नाही.असो.
 गड तुलनेने दुय्यम असला आणि अवशेष मोजकेच असले तरी या गडाला आवर्जून भेट द्यायची ते दुर्गवीर या दुर्गसंवर्धन करणार्‍या संस्थेच्या कार्याला दाद देण्यासाठी.
     मुंबईच्या ‘दुर्गवीर’ संस्थेने गडाच्या संवर्धनाचे काम हाती घेतले असून गडाच्या मूळ वैभवाला धक्का न लावता त्यांनी गडाला नवीन रूप प्राप्त करून दिले आहे. संस्थेने संपूर्ण गडावर अवशेष दाखवणारे फलक बसवले आहेत. दुर्ग संवर्धनासाठी काम करणाऱ्या या संस्थेच्या मावळ्यांनी येथे केलेले काम वाखाणण्याजोगे आहे. स्वताच्या हक्काच्या सुट्ट्या सोडून या लोकांनी शिवकार्याला वाहून घेतले आहे. दर वर्षी एकच गड घेउन पुर्ण वर्षभर दर रविवारी त्या गडवर जमून दुर्गसंवर्धनाचे कार्य हि संस्था करते. गडाचा उपदरवाजा सापडण्याचे श्रेय याच लोकांना जाते. आपणही शक्य तर अश्या उपक्रमांना आर्थिक सहाय्य द्यावे, तसेच शक्य झाल्यास त्यांच्या कार्यात सहभागी होउन आपलाही या गोवर्धनाला हातभार लावावा.

मानगडाचे व्हिडीओतून दर्शन

माझे सर्व लिखाण आपण एकत्रित वाचु शकता
भटकंती सह्याद्रीची

(तळटीपः- काही प्रकाशचित्रे आंतरजालावरुन साभार)
संदर्भः-
१) रायगड जिल्हा गॅझेटीयर
२) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
३) महाराष्ट्र देशातील किल्ले- चितांमणी गोगटे
४) किल्ल्यांच्या दंतकथा- महेश तेंडुलकर
५) www.trekshitiz.com हि वेबसाईट
६) www.durgabharari.com हि वेबसाईट

प्रतिक्रिया

सौंदाळा's picture

9 Oct 2020 - 8:52 pm | सौंदाळा

उत्कृष्ट माहिती आणि फोटो
मस्त चालू आहे अनवट दुर्गसफर

सतिश गावडे's picture

9 Oct 2020 - 10:49 pm | सतिश गावडे

आपल्या तालुक्याचे नाव एका किल्ल्यावरुन पडले आहे आहे आणि तो किल्ला निजामपूरपासून पाच सात किमी अंतरावर आहे हे तुमचे लेख वाचेपर्यंत माहितीच नव्हते. आता एकदा हा किल्ला पाहण्यासाठी गावी जाणार आहे :)

सतिश गावडे's picture

2 Jan 2022 - 10:33 pm | सतिश गावडे

हा लेख वाचल्यापासून मानगड पाहण्याची खूप ईच्छा होती. ती पंधरा दिवसांपूर्वी पूर्ण झाली. गडाची उंची कमी असल्याने जेमतेम एक दिड तासात गड चढणे, पाहणे आणि पुन्हा उतरणे होते.

पुणे दिवेआगर प्रवासात हाताशी दोन तास अधिक असल्यास सहज पाहता येईल हा किल्ला.

सतिश गावडे's picture

2 Jan 2022 - 10:35 pm | सतिश गावडे

माणगाव बस स्टँड ते या गडाचा पायथा हे अंतर १५ किमी आहे.

गोरगावलेकर's picture

10 Oct 2020 - 12:15 pm | गोरगावलेकर

माझ्या भटकंतीच्या यादीत नोंद घेतली आहे. सकाळी लवकरच प्रवास सुरु केला तर एका दिवसात गड पाहून परत येणे शक्य होईल असे वाटते.

स्वच्छंदी_मनोज's picture

10 Oct 2020 - 9:36 pm | स्वच्छंदी_मनोज

मस्त लेख.
याच भागाच्या भटकंतीवर फार पुर्वी मी एक लेख इथेच लिहीला होता - https://misalpav.com/node/39779
आम्हीही मानगड करून पुढे माजुर्णे मग कुंभे आणी पुढे घोळ असा एक दिवसाचा पल्ला गाठला होता..

प्रचेतस's picture

12 Oct 2020 - 4:26 pm | प्रचेतस

तपशीलवार माहितीमुळे लेख अत्यंत परिपूर्ण झालेला आहे.

चौथा कोनाडा's picture

12 Oct 2020 - 9:54 pm | चौथा कोनाडा

सुंदर ट्रेकलेख ! प्रचि आणि इतर संदर्भ झकासच !
बरीच नविन माहिती मिळाली.
धन्यवाद, दुर्गविहारी _/\_