सोनगड

Primary tabs

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
18 Sep 2020 - 1:06 pm

  "राज्याचे सार ते दुर्ग" असे अज्ञापत्रात सांगितले आहे. अर्थात दुर्ग हे मुलतः संरक्षणाची वास्तु म्हणून उभारले गेले. लष्करी ठाणी हा बहुतांश किल्ल्यांचा प्राथमिक उद्देश असला तरी काही किल्ल्यांचा इतरही कामासाठी उपयोग झालेला दिसतो. महाडजवळच्या आणि रायगडाच्या घेर्‍यातील सोनगडाचा मुख्यतः वापर कारागृह म्हणून झाला. अर्थात सोनगडाने युध्द पाहीली नाहीत असा मात्र याचा अर्थ नव्हे. सावित्री नदीच्या मार्गाने याठिकाणी गलबतातुन मोठया प्रमाणात व्यापार चालत असे. बंदरावरील या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी दौलतगड,सोनगड,महेंद्रगड या किल्ल्यांची साखळी निर्माण केली गेली. उत्तरेकडे रायगडापासून जी डोंगररांग सुरू होते ती चांभारगड व सोनगड ह्या दोन गडांपाशी येऊन थांबते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडची निवड केल्यावर रायगडाच्या घेर्‍यात समुद्राच्या दिशेने असलेल्या या किल्ल्यांना राजधानीच्या संरक्षणाच्या दृष्टीने अधिक महत्व प्राप्त झाले.

        या किल्ल्यांच्या कड्यामुळे शत्रुला राजधानीवर सहज हल्ला करणे कठीण होते. यातील सोनगडची निर्मिती नेमकी कोणत्या काळात झाली हे सांगणे जरी कठीण असले तरी रायगडचा उपदुर्ग असलेला हा किल्ला खाडीमार्गावरील टेहळणीचा एक महत्वाचा किल्ला होता. या किल्ल्याचा उल्लेख अगदी फेरीश्त्याने सुद्धा केला आहे. त्यामुळे आजघडीला या किल्ल्याला किमान सहाशे वर्ष पूर्ण झाली असावीत असा अंदाज बांधायला हरकत नाही.
        महाराष्ट्रात एकाच नावाचे किंवा नावात साधर्म्य असणारे बरेच किल्ले आहेत. तसाच हा सोनगड किल्ला. सोनगड नावाचा एक किल्ला नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या सोनेवाडी गावाजवळ उभा आहे तर दुसरा रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील पाले गावाजवळ, तर तिसरा सोनगड कणकवलीजवळ आहे.  महाड शहराच्या वायव्येला, महाड गावापासून साधारण ३ किमी अंतरावर, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला लागून असणाऱ्या एका डोंगरात गांधारपाले ही बौद्धकालीन लेणी आहेत. ही लेणी महामार्गावरून सहज नजरेस पडत असल्यामुळे या रस्त्याने प्रवास करताना प्रत्येक भटका या लेण्यांना भेट देतो. पण याच लेण्यांच्या डोंगरावर असणाऱ्या एका भव्य पठारावर सोनगड नावाचा एक इतिहासकालीन किल्ला ठाण मांडून बसला आहे हे मात्र फार कमी लोकांना माहिती असते. हा किल्ला तसा भटक्या लोकांमध्ये सुद्धा अपरिचित आहे. महाड पासून अवघ्या ५ किमी अंतरावर असणारा हा किल्ला गेली कित्येक वर्ष महाड, रायगड, सावित्री खोरे अशा मोठ्या भूभागावर नजर ठेऊन आहे.
  महाडच्या सोनगडाला भेट देण्यासाठी मार्गांचे चार वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. किल्ल्यावर जाणारी एक वाट गांधारपाले लेण्यावरून, दुसरी वाट गांधारपाले लेण्यांच्या थोडे अलिकडे असणाऱ्या बौध्दवाडीतून तर तिसरी वाट या दोन्ही वाटांच्या बरोबर विरुद्ध दिशेने म्हणजे मोहोप्रे गावातून किल्ल्यावर जाते. या तीनही वाटांनी सोनगडाचा माथा गाठण्यासाठी साधारण दीड तासांचा कालावधी लागतो. मोहोप्रे गावातून किल्ल्यावर जाणारी वाट ही खड्या चढणीची तर गांधारपाले लेण्यांच्या कातळमाथ्यावरून जाणारी वाट पावसाळ्यात थोडी अवघड व घसरडी आहे. त्यामुळे यापैकी गांधारपाले लेण्यांच्या अलिकडे महामार्गालगत असणाऱ्या बौध्दवाडी समोरून किल्ल्यावर जाणारी तिसरी वाट तुलनेने सगळ्यात सोप्पी आणि मळलेली आहे.
  वहुर गावातून दिसणारा सोनगड

   अर्थात या सर्वांपेक्षा सोयीची आणि बहुतेक दुर्गभटक्यांना माहिती नसणारी चौथी वाट आहे, मुंबई-गोवा मार्गावरील वहुर या गावातून. हे गाव तसे छोटे आणि महामार्गापासून थोडे आत आहे. मात्र गावाच्या पार्श्वभुमीवर असणार्‍या डोंगरावर आपल्या कातळमाथ्यावर डौलाने फडकणारा भगवा मिरवत सोनगड उभा आहे. महामार्गालगत असलेल्या वस्तीवरुन थेट सोनगडाला वाट चढते. या मार्गाने गड सतत समोर दिसत असल्याने चुकण्याचा प्रश्न येत नाही. साधारण तास-दीड तासाच्या चढणीनंतर आपण थेट सोनगडावर पोहचतो. खरतर या वाटेने जायचे झाल्यास वाटाड्याची गरज पडत नाही, मात्र तरीही कोणी स्थानिक व्यक्ती बरोबर घेतल्यास या वाटेवर असलेली घोडेखिंडीची पायर्‍यांची वाट व पाण्याची टाकी दाखवितो.
      आपल्याला गडाचा संपुर्ण परिसर भटकायचा असल्याने आणि गंधारपाले लेणी बघायची असल्याने आपण महाडकडून पाले गावाच्या वाटेने येउया आणि वहुरकडून उतरुया. सोनगडावर जाण्यासाठी प्रथम महाडपासून ४ किमी अंतरावरील गांधारपाले लेण्यांच्या पायथ्याचे "पाले" गाव गाठावे. या गावाच्या साधारण १ किमी अलिकडे महामार्गालगत गांधारपाले लेण्यांची एक बौद्धवाडी लागते. या बौद्धवाडीच्या बरोबर समोर एक कच्चा गाडीरस्ता डोंगरावर चढताना दिसतो. या कच्च्या रस्त्याने बाईक किंवा जीप यासारखे वाहन गांधारपाले लेण्या ज्या डोंगरात कोरलेल्या आहेत त्या डोंगराच्या पठारावर असणाऱ्या धनगरपाड्यापर्यंत (गोलगडवाडी) जाऊ शकते. हा धनगरपाडा म्हणजे खऱ्या अर्थाने सोनगड किल्ल्याचा पायथा होय. महामार्गापासून कच्च्या रस्त्याचे हे अंतर वाहनाने फक्त २० मिनिटात पार करता येते. पण जर का या कच्च्या रस्त्याने जाण्यासारखे वाहन जवळ नसेल तर मात्र पायगाडीने धनगरपाड्यापर्यंतचे अंतर गाठण्यासाठी साधारण ४५ मिनिटे लागतात. किल्ल्यावर जाण्याऱ्या या वाटेवर ठराविक अंतराने किल्ल्यावर दुर्गसंवर्धनाचे काम करणाऱ्या "सह्याद्री प्रतिष्ठान" या संस्थेने दिशादर्शक बोर्ड लावलेले आहेत.
        कच्च्या रस्त्याने डोंगर चढत असताना कातळकड्यात कोरून काढलेल्या गांधारपाले लेण्यांची शृंखला फार सुंदर दिसते. विविध अंगाने लेण्यांचे अवलोकन करत पठारावर दाखल होताच कोणतेही निर्बंध नसलेला भर्राट वारा आपले स्वागत करतो व आत्तापर्यंत डोंगर चढून आलेला थकवा कुठल्या कुठे पळून जातो.
मग थंडगार वारे अंगावर झेलत कच्च्या रस्त्याने पठारावरून चालत निघायचे आणि पुढच्या १५ मिनिटात धनगरपाडा गाठायचा.
सोनगड किल्ला ज्या डोंगरावर बांधलेला आहे तो डोंगर दक्षिणोत्तर अवाढव्य पसरलेला असून या डोंगराची एक धार धनगरपाडयापर्यंत खाली उतरलेली आहे. या डोंगरधारेने चढायला सुरवात करायची आणि पुढल्या २० मिनिटात थोड्या सपाटीवर पोहोचायचे. या डोंगर सपाटीवर बरीच उंच झाडी वाढलेली असल्याने किल्ल्याचा माथा येथून देखील दृष्टीक्षेपात येत नाही.
त्यामुळे आणखी थोडा चढ चढत त्या झाडीभरल्या डोंगरमाथ्यावरून चालत राहायचे की पुढील १० मिनिटात आपल्याला किल्ल्याचा माथा आणि त्यावर फडकणारा भगवा ध्वज दिसायला लागतो. आता समोर दिसणारा छोटासा डोंगरमाथा म्हणजेच सोनगड किल्ला हे आपले पुढील लक्ष मानून किल्ल्यासमोर डेरेदाखल व्हायचे. गांधारपाले गावाच्या बौध्दवाडीत गाडीत लावल्यापासून या ठिकाणी पोहोचण्यास साधारण दीड तासांचा कालावधी लागतो. या वाडीत केवळ ४० माणसे वस्तीला असुन वाडीतील तरुणाई कामधंद्यासाठी शहरात असल्याने गावात किल्ल्यावर जाण्यासाठी वाटाड्या मिळत नाही. गडावर फारसे कोणी जात नसल्याने वाटा बुजलेल्या आहेत त्यामुळे आधी गावकऱ्याकडून वाट नीट समजून घ्यावी व नंतरच गडावर निघावे. गावकरी वाट सांगताना गडावरील झेंडा पहात गडावर जावे असे सांगतात पण गड चढताना हा झेंडा सतत नजरेसमोर राहत नाही. चिंचोळा माथा असलेला किल्ल्याचा डोंगर दक्षिणोत्तर पसरलेला असुन किल्ल्याची समुद्रसपाटीपासुन उंची ८९० फुट आहे.

वाडीतून गवताने भरलेल्या वाटेवरून दोन लहान टेकाडे व छोटे जंगल व काही सपाटी पार करत अर्ध्या तासात आपण किल्ल्याच्या दक्षिण दिशेस असलेल्या बुरूजासमोर पोहोचतो.

या बुरुजाची मोठया प्रमाणात पडझड झालेली असुन बुरुजाशेजारी दरीच्या दिशेने असलेल्या पुर्वाभिमुख उध्वस्त दरवाजातून आपण गडावर प्रवेश करतो.
दरवाजाशेजारी असलेले बुरुज मोठया प्रमाणात उध्वस्त असुन त्यांचा काही भाग आजमितीला शिल्लक आहे.
 
 दरवाजातून आत शिरल्यावर वाटेच्या डाव्या बाजुला डोंगर उतारावर खडकात खोदलेली दोन पाण्याची टाकी दिसतात पण तिथे जाणारी वाट मात्र घसाऱ्याची असल्याने धोक्याची आहे.
वाटेच्या पुढील भागात थेट भिंतीवरून आपण एका इमारतीत प्रवेश करतो. हि दगडी इमारत चौथऱ्यावर बांधलेली असुन या इमारतीच्या भिंती व दरवाजाची चौकट आजही शिल्लक आहे.
या इमारतीच्या दरवाजाबाहेर आत येण्यासाठी आठ पायऱ्या आहेत.
हि इमारत गडाच्या सर्वात उंच ठिकाणी असुन या इमारतीच्या आत भगवा झेंडा रोवला आहे.
 
हा भगवा ध्वज थेट महाड शहरातून दिसू शकतो.

सोनगडाचा वापर हा शिवकाळात कैदी ठेवण्यासाठी होत असे आणि याचा उल्लेख आपल्याला इंग्लिश रेकॉर्ड्स मध्ये मिळून जातो. या गोष्टीला भौतिक पुरावा कोणता असे विचारल्यास, सोनगडावरील उभी असलेली एकुलती एक वस्तू हे होय. या वास्तूशिवाय या किल्ल्यावर सांगण्याजोगे असे कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत हे मात्र खेदाने सांगावे लागते.
 
इमारतीच्या दुसऱ्या बाजुला काही प्रमाणात सपाटी दिसुन येते.
या सपाटीवर दोन उध्वस्त वास्तुंचे अवशेष पहायला मिळतात. सपाटीच्या पुढील भागात एक लहानसा उंचवटा असुन त्यापुढील भागात सपाटीवर किल्ल्याचा उत्तर टोकावरील बुरुज आहे.
 
या बुरुजाच्या टोकावर आपली गडफेरी पुर्ण होते. संपुर्ण किल्ला फिरण्यास अर्धा तास पुरेसा होतो मात्र पायथ्यापासुन इथवर यायला अडीच तास लागतो. एकंदरीत या किल्ल्यावर राहण्यासाठी सोय नाही.फारतर पठारावरील धनगरवाडीत राहता येईल.
 
किल्ल्यावर पाण्याची दोन टाकी आहेत त्यातील पाणी वर्षभर रहात नाही. पिण्याचे पाणी पठारावरील धनगरवाडीत मिळेल. त्यामुळे शक्यतो सकाळी लवकर महाडवरुन निघून संध्याकाळपर्यंत हा गड बघणे हेच सोयीचे.
 सोनगडाच्या शेजारचा डोंगर
    
 
    किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावरून नजर फिरवताच पश्चिमेला सावित्री नदीचे विस्तीर्ण पात्र, त्याच्या शेजारून धावणारा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, महामार्गालगत पसरलेले महाड शहर, उत्तरेला गांधारी नदीचे खोरे तर पूर्वेला चांभारगड किल्ला असे विहंगम दृश दिसते.
हवा स्वच्छ असताना आपण सोनगडावर असु तर उत्तर दिशेला फार मोठा पॅनोरमा नजरेला पडतो.


अगदी पश्चिम बाजुला सह्याद्रीच्या मुख्य रांगेला चिकटलेला ईटुकला मानगड, त्याच्या थोड्या पुर्वेला त्रिकोणी शिखराचा कोकणदिवा, एखाद्या भिंतीसारखा पसरलेला दुर्गदुर्गेश्वर रायगड, थोड्या बारकाईने पाहिल्यास नगारखान्याची आणि जगदीश्वर मंदिराची वास्तु ध्यानी येते, त्यानंतर थोड्या पुर्वेला मढ्या घाट आणि वरंधा घाटाचा परिसर, मंगळगड, रायरेश्वर्,कोल्हेश्वराचे पठार, आग्नेयेला महाबळेश्वर आणि प्रतापगड. शिवाय स्वच्छ हवेत राजगड आणि तोरणा दर्शन देतात, एकाच ठिकाणहून ईतका परिसर बघायला मिळणे हे तसे अविश्वसनीय !
      सोनगडाच्या इतिहासात डोकावून पाहिल्यास शिवाजी महाराजांनी ऑक्टोबर १६५७ ते जानेवारी १६५८ च्या दरम्यान जावळीच्या खोऱ्यात उतरून चंद्रराव मोऱ्यांचा पराभव केल्यानंतर जावळीच्या खोऱ्यातील चंद्रगड, कांगोरी, मकरंदगड, सोनगड, चांभारगड हे किल्लेही स्वराज्यात दाखल करून घेतले. ह्यातील काही गड केवळ टेहळणीसाठी वापरत असल्यामुळे ते घेणे फारसे अवघड गेले नसावे पण ते घेण्यासाठी त्यांनी नेमका कुठला मार्ग घेतला ते इतिहासाला माहित नाही पण हे सर्व किल्ले नोव्हेंबर व डिसेंबर १६५७ ह्या दोन महिन्यात घेतल्याचे दिसुन येते. महाराज पन्हाळगडावर अडकले असता राजापुरच्या इंग्रजांनी विजापूरकरांना केवळ दारुगोळाच पुरवला नाही तर सिद्धी जोहारच्या सैन्यात येऊन इंग्रजी निशाण फडकावीत तोफा डागल्या त्यामुळे पन्हाळ्याच्या कोंडीतून सुटल्यावर मार्च १६६१ मध्ये एक हजार घोडदळ व तीन हजार पायदळ महाराज राजापुरास धडकले. राजापुर वखारीचा रेसिडेंट रेव्हिंग्टन व काही इंग्रजाना पकडून कैद केले. त्यातील दोन इंग्रज कैदेतच मरण पावले. या कैद्यांना महाराजांनी रायगडजवळील सोनगड येथे आणले व त्यांना रावजी पंडितांच्या स्वाधीन केले. हे कैदी काही
काळ सोनगडावर कैदेत होते. शेवटी रेसिडेंट रेव्हिंग्टन आजारी पडला तेव्हा बरे होताच परत येण्याच्या अटीवर तो १७ ऑक्टोबर १६६१ रोजी सुरतेस गेला.
पुरंदर तहात मोघलांना दिलेल्या २३ किल्ल्यात सोनगडाचा उल्लेख येतो. मात्र महाराष्ट्रात तीन सोनगड असल्याने नेमका कोणता याचा गोंधळ होतो. अर्थात यावेळी कणकवलीजवळचा सोनगड आणि सिन्नरजवळचा सोनगड शिवाजी राजांच्या ताब्यात नसल्याने, रायगडाजवळचा सोनगड महाराजांनी मोघंलाना दिला असला पाहीजे. अर्थात पुढे लगेचच दोन वर्षांनी हे सर्व गड महाराजांनी परत घेतले. यानंतर सोनगडचा उल्लेख इ.स.१८१७ मध्ये पेशवे दफ्तरात मिळतो. यात रायगड ताब्यात घेतल्यावर पेशव्यांनी सोनगड भागाचा बंदोबस्त ठेवण्यासाठी ३०० पायदळ नेमल्याची नोंद आढळते.

गांधारपाले लेणी

रायगड किल्ल्याजवळच्या दक्षीण बाजुच्या डोंगरांगेत गंधारपाले ही बौद्ध लेणी असून महाडनजीक अगदी हाकेच्या अंतरावर आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर महाडच्या आधीच तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या डाव्या बाजूच्या डोंगरातच,गांधारपाले गावाला लागून असलेल्या टेकडीवर ही लेणी आहेत. पायथ्यापासून साधारणपणे ५०-६० मीटर उंचीवर असलेल्या या लेणी समूहात एकूण २८ लेणी आहेत. त्यात ३ चैत्य आणि १९ विहार आहेत. पुरातत्त्व विभागाने लावलेल्या फलकाजवळ उतरल्यानंतर लगेच लेण्यांकडे जाणा-या पाय-या आहेत. ही लेणी पूर्वाभिमुख आहेत.
 ही लेणी तीन थरांमध्ये कोरलेली आहेत. ही लेणी कंभोग वंशातील विष्णू पुलित या राजाने खोदलेली आहेत. पुलित राजनावावरून पाले हे नाव रूढ झालं असावं असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या लेणी समूहात तीन ब्राह्मी भाषेतील शिलालेख आहेत. पहिली लेणी ही चैत्य विहार आहे. या लेणीला सात कमानी आहेत.
     सहा खांब आणि ओसरी असून ओसरीच्या मागे भव्य दालन आहे. सहा खांबापैकी एक खांब पूर्णपणे कोरलेला आहे. दालनात जाण्यासाठी तीन दरवाजे असून उजेड येण्यासाठी दोन खिडक्यांची रचना केलेली आहे. मध्यभागी गर्भगृह आणि गर्भगृहाच्या शेजारी दोन्ही बाजूंना दोन दोन खोल्या आहेत. गर्भगृहाच्या मध्यभागी बुद्धमूर्ती तोरणात बसवली आहे. मूर्तीच्या आसनाखाली धर्मचक्र, हरणे, चवरीधारी आणि आकाशात उडणारे यक्ष दिसतात. दुस-या लेणीचं काम अर्धवट आहे. प्रांगण, ओसरी, दोन दर्शनी खांब आणि खोली अशी रचना आहे.
    तिस-या क्रमांकाची लेणी म्हणजे एक खोली आहे. लेण्यातील खांब, स्तंभ आणि अर्धस्तंभामध्ये कोरलेले आहेत. या लेणींमधून क्रमांक चारच्या लेणीतही जाता येतं. खोली, दालन आणि ओसरी अशी क्रमांक चारच्या लेणीची रचना आहे. दालन खोलीपेक्षा मोठं आहे. दोन स्तंभ आणि अर्धस्तंभ आहेत. ओसरीच्या उजव्या भिंतीवर शिलालेख आहे. मात्र त्यातील काही अक्षरं वाचता येतात. हा शिलालेख ब्राह्मी लिपीत आहे. पाचव्या क्रमांकाच्या लेणीची रचना मंडपासारखी आहे.
    ओसरीच्या आत दालन असून ओसरीत दोन स्तंभ आणि दोन अर्धस्तंभ आहेत. सहाव्या क्रमांकाची लेणी ही खालच्या थरावर आहे. या लेणीचं खोदकाम अर्धवट सोडून दिलं आहे. सातव्या क्रमांकाची लेणी सहाव्याच्याच लायनीत आहे. ओसरी आणि त्यामागे खोली अशी त्याची रचना आहे. ओसरीचा दर्शनी भाग कोसळला आहे. या लेण्यांमधलं सगळ्यात महत्त्वपूर्ण अशी लेणी म्हणजे क्रमांक आठची लेणी. ही लेणी एक चैत्यविहार आहे.
    दर्शनी भागात दोन मोडके खांब आणि दोन अर्धस्तंभ आहेत. डाव्या आणि उजव्या बाजूला दगडी बाक असलेल्या लहान खोल्या आहेत. सध्या येथे स्तूप नाही. मात्र दगडी छत्रावली अजूनही त्या छताशी आहे. गाभा-याच्या उजव्या भिंतीवर शिलालेख आहे. नवव्या क्रमांकाचं लेणं वरच्या पातळीवर असून दालनाला दरवाजा आणि दोन खिडक्या आहेत. दहाव्या लेण्याची रचनादेखील नवव्या लेणीप्रमाणेच आहे. दर्शनी भागाची पडझड झालेली दिसते. लेणीच्या पाय-या नष्ट झालेल्या दिसतात. तळाशी चौकोनी आणि वरच्या बाजूला अष्टकोनी खांब असून खांबावरती वाळूच्या घडयाळासारखी नक्षी आहे. या लेणीला खिडकी नाही.
    क्रमांक अकरा आणि बारा क्रमांकाच्या लेणी एकाच पातळीवर आहेत. ओसरी आणि दालन अशी या दोन्ही लेण्यांची रचना आहे. तेरा क्रमांकाची लेणी खालच्या पातळीवर असून या लेणीला आयताकृती दरवाजा आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूला खिडक्या खोदलेल्या आहेत. दोन स्तंभ आणि दोन अर्धस्तंभ आहेत. या लेणीतल्या अर्धस्तंभावरही वाळूच्या घडयाळासारखी नक्षी आहे. चौदावी लेणी तेराव्या लेणीला लागून असून याची रचना खोली आणि ओसरी अशी आहे.
    पंधराव्या क्रमांकाची लेणी एका कोनाडयात खोदली आहे. यात असलेला स्तूप तीन थरांत असून स्तुपाच्या दंडाकृती गोलावर नक्षी, वरच्या अर्धगोलाकृती भागावर चौकोनी हर्मिका आणि छतापर्यंत जाणारा उलटया पाय-यांचा पाच थरांचा पिरॅमिड आहे. सोळाव्या क्रमांकाच्या लेणीची रचना ओसरी, दालन आणि खोली अशीच आहे. स्तंभाची रचना इतर लेण्यांप्रमाणेच आहे. सतराव्या लेणीचं खोदकाम अर्धवट सोडून दिलं असलं तरी त्याची रचना दालन आणि ओसरी अशी असल्याचं दिसतं.
     अठरा आणि एकोणीस या लेण्यांचीदेखील ओसरी आणि दालन अशीच रचना असून त्यातील खोल्यांचं काम अर्धवट आहे. विसावी लेणी ही अर्धवट स्थितीत आहे. सुरुवात करून लगेच सोडून दिलेलं दिसतं. एकविसावी लेणी हे एक चैत्यगृह असून ते समोरच्या बाजूने खुलं आहे. या लेण्यात स्तुपासाठी मध्यवर्ती खोली असून खोलीच्या उजव्या भिंतीवर आसनस्थ बुद्धाची प्रतिमा आहे. बावीस आणि तेवीस क्रमांकाच्या लेण्यांची रचना ही ओसरी आणि दालन किंवा खोली अशीच आहे.
      पंचविसावी लेणी ही काहीशी वेगळी आहे, म्हणजे ओसरीच्या मागे एकच खोली असून खोलीचा दरवाजा थेट छतापर्यंत पोहोचला आहे. सव्वीस क्रमांकाच्या लेणी रचना ही सर्वसाधारण म्हणजे खोली, दालन आणि ओसरी अशीच आहे.

        सत्तावीस क्रमांकाच्या लेणीत डाव्या भिंतीवर एक शिलालेख कोरलेला आहे. लेखाची लिपी ब्राह्मी आहे. समोर ओसरी, त्यामागे दालन आणि दालनाच्या मागे खोली अशी रचना आहे. दोन खांब आणि दोन अर्धस्तंभ आहेत. याचप्रमाणे अठ्ठाविसाव्या लेणीचीदेखील अशीच रचना आहे. बहुतांश लेण्यांमधील खांब हे चौकोनी आणि अष्टकोनी असे आहेत. तर काही खांबावर वाळूसारखी घडयाळंही दिसतात.
लेण्यांच्या इथून महाड शहर, चांभारगड, सावित्री नदी आणि सभोवतालची हिरवी शेती आणि झाडी असा सुंदर देखावा दिसतो.

( तळटिपः- काही प्रकाशचित्रे आंतरजालावरुन साभार )

माझे सर्व लिखाण तुम्ही येथे वाचु शकता
भटकंती सह्याद्रीची

संदर्भः-

१) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
२) शोध शिवछत्रपतींच्या किल्ल्यांचा- सतिश अक्कलकोट
३) रायगड जिल्हा गॅझेटीयर-
४)  www.durgbharari.com   हि वेबसाईट
५)  www.durgbharari.com   हि वेबसाईट
६) आडवाटेवरचा महाराष्ट्र- प्र.के.घाणेकर

प्रतिक्रिया

कंजूस's picture

19 Sep 2020 - 11:54 am | कंजूस

संपूर्ण गाइड!!! सोनगड आणि लेणी सविस्तर वर्णन फोटोंसह खूप छान आहे.
धन्यवाद.

एका अपरिचित किल्ल्याची सुंदर ओळख.
लेण्यांची माहितीही आवडली.

ज्ञानोबाचे पैजार's picture

21 Sep 2020 - 8:25 am | ज्ञानोबाचे पैजार

महाड मधे असा किल्ला आहे हे माहितीच नव्हते...
मस्त माहिती आणि फोटू...
लेणी सुध्दा रस्त्यावरुनच पाहिली होती.
एकदा ठरवून जावे लागेल इकडे
पैजारबुवा,

तुमच लिखाण अभ्यासपूर्ण तर आहेच ..पण व्हिडीओ पण भारी...आवडला
जरा बाइक चालवताना...सुरक्षा घ्या

दुर्गविहारी's picture

2 Oct 2020 - 11:46 am | दुर्गविहारी

सर्वच प्रतिसादकांना आणि वाचकांना धन्यवाद!

याचा आदर्श नमुना लेख! साधारण शहरापासून जवळ असलेले किल्ले 'गजबजलेले असतात'. उदा सिंहगड, पन्हाळा, अजिंक्यतारा
हा मात्र बराच निवांत आहे.